डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

एक मोठा गंभीर प्रश्न असा की शिवसेना आणि बजरंग दल यांचे अस्तित्व सबंध देशभर कसे पसरले? ते भाजप सरकार केंद्रात आल्यावरच कसे घडले? त्या दोन्ही संघटनांना कुणाची फूस आणि आतून मदत आहे काय, हेही उघड व्हावयास हवे. श्रीमती सोनिया गांधींनी रुबाबात काँग्रसचे अध्यक्षपद स्वीकारले, परंतु त्यांच्या कुवतीबाहेरचे हे धर्मकारण आहे. कारण त्या स्वतः ख्रिश्चन आहेत! जो ऑस्ट्रेलिअन मिशनरी जाळला गेला. त्याचे कार्य पुढे चालविण्यासाठी बजरंग दलावा मिशनरी तेथे जाणार आहे काय?

ओरिसामध्ये एका ऑस्ट्रेलियन मिशनऱ्यास त्याच्या दोन मुलांसह जिवंत जाळण्यात आल्याची जी घटना घडली आहे. तिची आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया झाल्याशिवाय आता राहणार नाही. आतापर्यंत डांग आणि सुरत भागात चर्चेस जाळली जात होती. परंतु कुठेही एखाद्या मिशनऱ्यास जिवंत जाळणे असे घडले नव्हते. बजरंग दल ही भाजपनेच निर्माण केलेली आणि राम रथयात्रेत उपयोगात आणलेली संघटना हे उघडपणे करते आहे. ग्रॅहम स्टेन्स हा मिशनरी 1965 पासून ओरिसाच्या जंगलात, एका खेड्यात राहून महारोग्यांचे रुग्णालय चालवीत होता, जे काम करायला कोणताही हिंदू धर्म प्रचारक कधीही तयार होत नाही. पुन्हा इतक्या वर्षांच्या वास्तव्यात ते सर्व खेडे ख्रिश्चन झाले असेही घडले नव्हते . 200 कुटुंबे तेथे राहतात, त्यांपैकी फक्त 30 जण कॅथलिक धर्माचे होते. त्यांचे धर्मांतर झाले की आधीचे ते त्या धर्माचे होते, याची माहिती बातमीत नाही. कार्यक्रम संपल्यावर चर्चच्या आवारातच आपल्या स्टेशन वॅगनमध्ये ते आपल्या नऊ व सात वर्षांच्या मुलांसह झोपले.

दारासिंग नावाचा बजरंग दलाचा नेता तेथे 100 कार्यकर्ते घेऊन आला आणि त्यांनी ती गाडी पेटवून दिली. काही जण खेडुतांच्या दरवाजावर उभे राहिले. लोक त्यांच्या मदतीसाठी येऊ पाहत होते. परंतु त्यांना अडविण्यात आले. 'जय बजरंग बली' अशा घोषणा देत ते नंतर निघून गेले. त्या मिशन-याची पत्नी घरी होती. तिला निरोप गेला तेव्हा तिने 'ईश्वरेच्छा' मानून दुःख गिळले. केंद्रीय गृहमंत्री यांनी ‘अमानुष’, ‘दुर्दैवी’ वगैरे राजकारणात वापरून गुळगुळीत झालेली विशेषणे वापरून खेद व्यक्त केला. परंतु ज्या गृहमंत्र्यांचा त्यांच्या सहकारी पक्षनेत्यांवर वचक नाही, त्यांच्या या मानभावी प्रतिक्रिया अधिक संताप निर्माण करतात. गुजरातमध्ये त्यांच्या पक्षाचे सरकार आहे. तरी प्रकार यांबलेले नाहीत. ओरिसामध्ये तर काँग्रेस पक्षाचे सरकार आहे, तरी त्यांना थांबविता आलेले नाही. याचे प्रमुख कारण दिल्लीत आपलेच सरकार आहे आणि ख्रिस्तविरोधी आंदोलन करण्याची हीच वेळ आहे अशी बजरंग दल संघटनेची राजकीय विचारसरणी आहे.

सनदशीर मार्गाने कोणतेही प्रश्न सोडविण्याची स्थिती या देशातील संपलेली आहे, अशी लोकांची भावना आहे आणि त्यात शिवसेना, बजरंग दल यांसारख्या संघटना कायदा हातात घेणे आपला हक्कच मानतात. अशा संघटनांचे प्रतिनिधी ज्यांच्या सरकारमध्ये आहेत, ते यापुढे देशात धर्मातीत शासन चालवतील हे संभवनीय नाही. तेलगू देशमचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी जाहीर प्रतिक्रिया व्यक्त करून भारतीय जनता पक्षाने राज्य करण्याचा नैतिक अधिकार गमाविला आहे असे सांगितले आहे. एकटे पंतप्रधान वाजपेयी एका बाजूला आणि त्यांचे सहकारी सत्तेसाठी सर्व तडजोडींना तयार असे हे दारुण चित्र आहे.

'ठाकरे हे देशभक्त आहेत' असे भाजप प्रवक्त्याने सांगायचे, सरमळकर आणि खोपकर ह्या दोन शिवसेनेच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट कार्यालयावर हल्ले झाले आणि त्यांनी 'वर्ल्ड कप' तोडला हे पोलीसप्रमुखांना स्वच्छपणे माहीत असताना शिवसेनेचे वकील आणि खासदार अँड. शिरोडकर म्हणतात, ‘‘त्या हल्ल्याशी आमचा संबंध नाही!’’ कारण एकच, गंभीर खटला होऊ शकतो असा हा मोठा गुन्हा आहे! दिल्लीतील 15 युरोपिअन देशांच्या राजदूतांची बैठक परराष्ट्रमंत्री जसवंतसिंग यांनी शुक्रवारी बोलाविली होती. त्या वेळी पश्चिम जर्मनीच्या राजदूतांनी कॅथॉलिक संस्थांच्या हल्ल्याचा विषय काढला, त्या वेळी जसवंतसिंग संतापले आणि त्यांनी ते फक्त देशाच्या एका कोपऱ्यात घडले आहे आणि पंतप्रधानांनी तेथे स्वतः जाऊन सर्व मिटविले आहे असे सांगितले तेव्हा ओरिसातील हे प्रकरण घडले नव्हते. आता भारताला ख्रिश्चन जगापुढे तोंड काढायला जागा राहिलेली नाही. सुरतेत पुन्हा हल्ले झाले आहेत.

ओरिसाच्या काँग्रेसी मुख्यमंत्र्याला तर आता हटवायलाच हवे. बलात्काराचे गाजलेले ताजे प्रकरण आणि त्यानंतर या ऑस्ट्रेलिअन मिशनऱ्याची दोन मुलांसह झालेली हत्या यावरून तेथील कायदा आणि सुव्यवची स्थिती साफ बिघडली आहे हे उघड दिसते . पटनाईक म्हणजे रोम जळत असताना फिडल वाजवीत असलेल्या नीरोचा नवा अवतार दिसतो. दुसरा एक मोठा गंभीर प्रश्न असा की शिवसेना आणि बजरंग दल यांचे अस्तित्व सबंध देशभर कसे पसरले? ते भाजप सरकार केंद्रात आल्यावरच कसे घडले? त्या दोन्ही संघटनांना कुणाची फूस आणि आतून मदत आहे काय, हेही उघड व्हावयास हवे. श्रीमती सोनिया गांधींनी रुबाबात काँग्रसचे अध्यक्षपद स्वीकारले, परंतु त्यांच्या कुवतीबाहेरचे हे धर्मकारण आहे. कारण त्या स्वतः ख्रिश्चन आहेत! जो ऑस्ट्रेलिअन मिशनरी जाळला गेला. त्याचे कार्य पुढे चालविण्यासाठी बजरंग दलावा मिशनरी तेथे जाणार आहे काय?

न झेपणारी धान्य दरवाढ!

रेशनवरील गहू, तांदूळ, साखर आणि शेतकऱ्यांच्या युरिया खतांच्या किमतींत एकदम वाढ करून अर्थमंत्र्यांनी सामान्य भारतीयांना जबर धक्का दिला आहे. धान्य खरेदीच्या किमतींत सरकारने दोन वर्षांपूर्वी वाढ केली होती, परंतु ग्राहकांना विकायच्या किमतींत वाढ केली नव्हती. तसेच महिनाभरात येणाऱ्या नव्या अर्थसंकल्पातील तूट कमी करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. खतावरील सर्व सबसिडी कमी करता टनामागे 340 रुपये वाढले. ते ऐकूनच काही शेतकरी आत्महत्या करतील. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत जे धान्य विकले जाते, त्यातही सरकारला सबसिडी द्यावी लागते, ती वाचविण्यासाठीच ही दरवाढ करण्यात आली आहे. या दरवाढीने दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांना गहू अडीच रुपये किलोऐवजी सव्वातीन रुपये किलो दराने मिळेल. दारिद्र्‌यरेषेवरील कनिष्ठ मध्यमवर्गीय साडेचार रुपयांऐवजी साडेसहा रुपये प्रत्येक किलो गव्हावर देतील. तांदूळ तर किलोमागे साडेपाचऐवजी नऊ रुपये पाच पैसे देऊन खरेदी करावा लागेल.

साखरेच्या दरात तर सर्वांसाठी किलोमागे साठ पैसे दरवाढ झाली आहे. एकूण आधीच महागाईने पोळलेल्या सामान्य जनतेला दोन वेळचे जेवण दामदुमटीने वाढणार आहे. अर्थसंकल्प मांडण्याचा फेब्रुवारी महिना जवळ आला की एकदम मोठा डोस नको म्हणून पेट्रोलचे दर आधीच वाढविण्याची पद्धती होती. या अर्थमंत्र्यांनी अन्नधान्याचे दर वाढवून अर्थसंकल्पातील एक हल्ला आताच केला आहे. गहू, तांदूळ आणि साखर यांचे विक्रमी उत्पादन यंदा झाल्याच्या बातम्या आलेल्या असताना होणारी ही भाववाढ तूट भरून काढण्याच्या दृष्टीने आवश्यक असली तरी सामान्य लोकांना न परवडणारी अशीच आहे. गेल्या दोन वर्षांत धान्यखरेदीचे दर वाढले, पण विक्रीचे वाढले नाहीत हे कारण जगातील कोणत्याही देशाने आत्तापर्यंत दिलेले नाही.

चीनमध्येच नव्हे तर अमेरिकेतही अन्नधान्याचे भाव स्थिर ठेवण्यासाठी सबसिडीची तरतूद प्रत्येक सरकार करते. चीनमध्ये गेल्या 40 वर्षांत अन्नधान्याचे भाव वाढले नाहीत, देशातील प्रत्येक गावात ते समान राहिले आणि सरकारच्या कार्यक्षम कारभाराचे तेच गमक मानले गेले. कांदा भाववाढीने तीन राज्यांतील निवडणुका भाजप हरला, उरलेल्या राज्यांतील निवडणुका हरण्याची तयारी केंद्र सरकारने केलेली दिसते. महाराष्ट्र सरकारने गरिबांसाठी वेगळी कार काढली, पण या दरवाढीने त्यांची योजना निकालात निघाली आहे. बिहार व उत्तर प्रदेशची लोकसंख्या किती सबसिडी खाते तेही सरकारने जाहीर करावे. ही महागाई न पेलणारी आहे. चार दिवसांनी लोक विसरतील या भ्रमात केंद्र सरकारने राहू नये.

Tags: भाजप कोंग्रेस खाते केंद्र सरकार माधव गडकरी account government madhav gadkari weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके