डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

ओरिसाचे ‘क्लिंटन’ जे. बी. पटनाईक

गेली 12 वर्षे मुख्यमंत्रिपदावर असलेले पटनाईक हे ओरिसाचे ‘क्लिंटन’ आहेत असे चित्र वृत्तपत्रांनी रंगविले आहे. याउलट पत्रकारांना, ‘गटारे साफ करणारे,’ ‘चिखल साफ करणारे झाडूवाले.’ या शब्दांत पटनाईक यांनी संबोधिले आहे.

ओरिसाचे मुख्यमंत्री जे. बी. पटनाईक आणि त्यांच्यामुळे काँग्रेस पक्ष सध्या अडचणीत आला आहे. अंजना मिश्रा या एका अधिकाऱ्याचे प्रकरण गेले काही महिने गाजत असताना शनिवारी रात्री ती मोटारीतून प्रवास करीत असताना तिच्यावर पाच जणांनी बलात्कार केला. त्या प्रकरणाचा उपयोग मुख्यमंत्र्यांच्या विरोधकांनी जोरदारपणे सुरू केला. ते दिल्लीत सोनिया गांधींकडे येऊन धडकले आणि त्यामुळे काँग्रेसाध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना दिल्लीला बोलाविले आहे. कुणाच्याही दबावाला बळी न पडता अंजना मिश्रा या तेथे लढा देत आहेत असे आतापर्यंतचे चित्र होते. परंतु मुख्यमंत्री पटनाईक यांनी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर आता तिला द्यावेच लागेल. ‘रात्री प्रवास करून त्या जंगलातून जाण्याचे तिला एवढे कसले काम होते?’ असा प्रश्न मुख्यमंत्र्यांचा आहे. तिच्याबरोबर एक दूरदर्शनची व्यक्ती होती. चांगला संरक्षकही नव्हता. शेवटी सर्व सत्ये अर्धसत्ये असतात असा हल्ली जो अनुभव येतो त्याचाच हा प्रकार वाटतो. जे.बी.पटनाईकांचे सरकार उलथून पाडण्यात अनेकांना रस आहे. त्यांना हे प्रकरण तयार मिळाले आहे! 

अंजना मिश्रा यांचे पती जंगलखात्यात अधिकारी होते. त्यांचे निधन झालेले आहे. ओरिसाचे माजी अँडव्होकेट जनरल इंद्रजीत राय यांनी 1997 मध्ये आपल्यावर बलात्कार केला असा आरोप केला आहे. ते प्रकरण एकीकडे सुरू असताना हे दुसरे फारच मोठे प्रकरण घडले आणि या दोन्ही घटनांबाबत मुख्यमंत्री जे.बी.पटनाईक हे बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप आहे. 

19 जानेवारी रोजी मुख्यमंत्री पटनाईक दिल्लीस येतील. तेव्हा काँग्रेस कार्यकारिणीचीही बैठक असल्याने तेव्हा याबद्दलचा निर्णय होईल. तोपर्यंत ओरिसा बंदचा उपक्रम विरोधक आणि विरोधी पक्ष पुरा करतील. मुख्यमंत्र्यांनी न्यायालयीन चौकशी जाहीर केली असली तरी त्याची अजून सुरुवातही झालेली नाही. लोकांना आणि राजकीय विरोधकांना निर्णयाची घाई असते आणि असे प्रश्न एका रात्री निकालात निघत नाहीत. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे अशी मागणी अंजना मिश्राने हायकोर्टात केली. सीबीआयच्या वकिलाने ती मान्यही केली, परंतु सरकारची बाजू ऐकल्याशिवाय निर्णय देण्यास हायकोर्टने नकार दिला. 18 जानेवारीला कोर्ट निकाल देईल. तोपर्यंत हे प्रकरण तिथे खोळंबून राहील. मोर्चे सुरू आहेत. पोलिसांनी एका मोर्चावर लाठीमारही केला आहे. 

आधीचे प्रकरण नसते तर मुख्यमंत्री पटनाईक यांच्यावर असा दोषारोप झाला नसता. परंतु या दुसऱ्या अमानुष घटनेनंतर (सत्य असल्यास) पटनाईक या स्त्रीच्या प्रथमपासून विरोधात आहेत असे लोकांचे मत झाले आहे. भुवनेश्वरहून त्या कटकला येत असताना हे घडले. तिच्यावर विरोधकांची पाळत होती हे ही निश्चित. परंतु सरकार आपल्या विरोधात आहे हे माहीत असताना अंजना मिश्राने अपरात्रीचा हा प्रवास टाळायला हवा होता, असे कुणीही म्हणेल! पुरुषानेसुद्धा धोका पत्करू नये अशी गुंडगिरीची स्थिती असताना या बाई प्रवास करीत होत्या. 

अंजना मिश्राला आपल्या घरी कामासाठी बोलावून अ‍ॅडव्होकेट जनरल इंद्रजित राय याने बलात्कार केला, ते प्रकरण अनेक वळणे घेत गेले आणि त्यात माजी पोलिसप्रमुख त्रिपाठी यांनी खुद्द मुख्यमंत्र्यांनाच गुंतविले. गेली 12 वर्षे मुख्यमंत्रिपदावर असलेले पटनाईक हे ओरिसाचे ‘क्लिंटन’ आहेत असे चित्र वृत्तपत्रांनी रंगविले आहे. याउलट पत्रकारांना, ‘गटारे साफ करणारे,’ ‘चिखल साफ करणारे झाडूवाले.’ या शब्दांत पटनाईक यांनी संबोधिले आहे. कोर्टाच्या सांगण्यावरून पोलिसप्रमुख त्रिपाठी यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात पटनाईक हे त्या अॅडव्होकेट जनरलचे साथीदार असल्याचे, अनेक स्त्रियांशी संबंध असलेले निवेदन केले आहे. त्यामुळे अॅडव्होकेट जनरलना पटनाईकांचे संरक्षण असल्याचे जवळजवळ सिद्ध झाले असताना हे नवे प्रकरण घडले. या पोलिस आयुक्ताच्या प्रतिज्ञापत्रातील अर्धा मजकूर जरी खरा असला तरी पटनाईक यांना सत्तेवरून हाकलण्याखेरीज काँग्रेस अध्यक्षांना पर्याय नाही. परंतु तसे केले तर काँग्रेस पक्षही बदनाम होईल. बिजू पटनाईक काँग्रेसकडे सत्ता जाईल आणि ते तर केंद्र सरकारच्या गटात आहेत. 15 जानेवारी रोजी वाजपेयी नव्या मंत्र्यांचा शपथविधी करणार असल्याचे जाहीर झाल्याने तो होईपर्यंत सोनिया गांधी काहीच करू शकणार नाहीत आणि जसा वेळ जाईल तसे हा नवा बलात्कार घडलाच नाही, असे पटनाईक पक्षाध्यक्षांना पटवून देतील. महत्त्वाकांक्षी स्त्रिया राजकारण्यांच्या जाळ्यात सापडल्याची अनेक प्रकरणे आहेत.

----------

सर्वत्र चंद्राबाबूंचा प्रभाव

जागतिक मराठी परिषदेमुळे गेले दोन दिवस चंद्राबाबू नायडूंच्या हैद्राबादेत माझा मुक्काम आहे. अधिवेशनाचा उद्घाटन सोहळा, सत्कार-मूर्तीचा गौरवसोहळा आणि एकूण चार परिसंवाद फार चांगले झाले आणि रविवारी सायंकाळी खुल्या अधिवेशनानंतर अधिवेशन समाप्त झाले. या दोन दिवसांच्या अधिवेशनाने श्रोत्यांना भरपूर ऐकायला मिळाले. त्यामुळे विचार परिवर्तन झाले नाही तरी विचारचक्र सुरू व्हावे. या अधिवेशनावरच नव्हे तर बाहेरून आलेल्या सर्व प्रतिनिधींवर सर्वांत मोठी छाप पडली ती मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची. अतिशय कार्यक्षम मुख्यमंत्री, मंत्री म्हणून न वावरणारा, ‘चीफ एक्सिक्युटिव्ह’ म्हणून गौरवीत झालेला मुख्यमंत्री, नोकरशहांना वठणीवर आणणारा अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. 

अधिवेशनासाठी परिषदेचे अध्यक्ष म्हणून शरद पवार आले उपचाराचा भाग म्हणून त्यांनी नायडूंचा गौरव केला. ताबडतोब आंध्रमधील काँग्रेस नेत्यांनी कावकाव सुरू केली. मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी उथळ भाषणात म्हटले, ‘दोन मुख्यमंत्री या देशात उत्तम काम करीत आहेत, एक चंद्राबाबू नायडू आणि दुसरा मी!’ लोक तेवढ्यापुरते हसतात, परंतु नंतर टीका करतात हे मुख्यमंत्र्याच्या लक्षात येत नाही. चंद्राबाबू नायडू लवकर गेले परंतु दोन वर्षांतून एकदा भरणाऱ्या परिषदेच्या अधिवेशनासाठी मुख्यमंत्री जोशी अर्धा दिवसही काढू शकले नाहीत. परिषदेचे अध्यक्ष रघुनाथराव माशेलकर यांच्या भाषणासाठीही ते थांबले नाहीत. माशेलकर यांनीही त्याबद्दल खेद व्यक्त केला. शेवटी या शास्त्रज्ञ अध्यक्षाला काय बोलायचे आहे हे ऐकण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही तर त्यांनी मांडलेले विचार कार्यवाहीत आणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शरद पवार मात्र दोन्ही दिवस थांबले, श्रोत्यांत बसून त्यांनी काही चर्चा ऐकल्या आणि खुल्या अधिवेशनाचे अध्यक्षपदही भूषविले. 

चंद्राबाबू नायडू यांनी पवार , माशेलकर आणि सुनील देशमुख (अमेरिका) यांना रविवारी सकाळी न्याहारीला बोलावले तेव्हा तिघांत जी चर्चा झाली, त्यात एका शब्दाने ही राजकारण नव्हते. माशेलकर यांच्याकडून त्याबद्दलचा अहवाल मी ऐकला. जागतिक दळणवळण क्षेत्रात ही जी क्रांती झाली आहे, त्याबद्दल सर्व बोलणे झाले. आता हैद्राबादच्या बाहेर सायबरसिटी तर निर्माण झाली आहेच, परंतु एक नवा ‘नॉलेज पार्क’ तयार होणार आहे. ही कल्पना माशेलकरांची. त्यासाठी 200 एकर जमीन राजकीय विरोधकांची पर्वा न करता नायडूंनी दिली आहे.

माशेलकर उद्याच्या जगाचे नव्हे तर नागरिकांचे वर्णन ‘नॉलेज वर्कर’ असे करतात. हे ‘नॉलेज वर्कर्स’ या ‘नॉलेज पार्क’ मध्ये काम करतील आणि नवी माणसे जोडत जातील. ज्ञानेश्वरापासून विज्ञानेश्वराकडे, उद्याचे जग जाणार त्यांचा हा नॉलेज पार्क, महाराष्ट्रात यायचा होता. परंतु मुख्यमंत्री जोशींपुढे ही योजना आली तेव्हा कितीजणांना तेथे नोकऱ्या मिळणार असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला. नायडूंनी ती चूक केली नाही. सायबर सिटी आणि नॉलेज पार्क या दोन गोष्टी आता हैद्राबादची भूषणे ठरत आहेत. हैद्राबाद हे शहर बकाल असेल अशी त्यांची समजूत होती. परंतु आजचे हैद्राबाद पूर्ण स्वच्छ आणि मोठमोठ्या रस्त्यांचे आहे. हुसेनीसागर तलाव, त्यावरचा हमरस्ता, दोन्ही बाजूला पुतळे यांनी शहर सजले आहे . निदान स्वच्छता ही नव्या मुख्यमंत्र्यांची कामगिरी. 

नायडू यांनी सध्या जो ‘जन्मभूमी प्रकल्प’ आंध्रमध्ये सुरू केला आहे. त्यावर स्थानिक काँग्रेस आणि भाजप नेते तुटून पडले आहेत. याचे कारण या कार्यक्रमामुळे चंद्राबाबू गावागावांत उतरले आहेत. लोकांशी त्यांचा परस्पर संपर्क आला आहे आणि लोकांच्या उपस्थितीत कामे होऊ न देणाऱ्या अधिकाऱ्यांची ते खरडपट्टी काढीत आहेत. भाजप आणि काँग्रेस नोकरशाहीच्या बाजूला तर चंद्राबाबू आणि लोक दुसऱ्या बाजूला असे हे चित्र आहे. तर शहरी वृत्तपत्रे नायडूंवर टीका करीत आहेत. जन्मभूमी योजनेनुसार प्रत्येकाने शारीरिक मेहनतीचे काहीतरी काम केले पाहिजे असा दंडक नायडूंनी घातला आहे. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक,सरकारी कर्मचारी, आय.ए.एस.  अधिकारी, सरपंच, पंचायत सदस्य अधिकारी, या सर्वांनी दिवसातील एक तास तरी श्रमदान करणे हे आवश्यक केले आहे. 

आपला परिसर स्वच्छ ठेवणे हे त्यांचे पहिले काम, विद्यार्थ्यांनी झाडे लावणे, पाणी घालणे, हे नित्याचे काम केले आहे. नवे रस्ते बांधले जात आहेत. अशा गोष्टींवर नेहमी होणारी पहिली तक्रार भ्रष्टाचाराची असते. या सर्व कामांबद्दल सरकार पैसे देते. त्यात खर्च आणि होणारे काम याचे व्यस्त गणित ही पहिली तक्रार. काही बाबतीत खरी असेल, परंतु केवळ हैद्राबादच नव्हे तर सबंध आंध्र प्रदेश स्वच्छ आणि हिरवागार करणे हे उद्दिष्ट चंद्राबाबूंनी ठेवले आहे. चंद्राबाबुंच्या चेहऱ्यावर कसलेही भाव नसतात. त्यांची दाढी उग्रता फक्त दर्शविते ही टीका येथे सतत ऐकतो आहे. त्यांच्या हनुवटीवरील कातडीला काही जखम झाल्याने त्यांना दाढी वाढविणे भाग पडले असा खुलासाही ऐकला. परंतु चित्रकार हुसेन यांनी चित्रपट सुंदरी माधुरी दीक्षित हिच्याबरोबर जो मोठा स्टुडिओ आणि आर्टगॅलरी निर्माण केली आहे. तिचे उद्घाटनही रविवारी झाले आणि माधुरीसह चंद्राबाबू चालताना लोकांनी पाहिले, दुसरीकडे चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन रविवारीच झाले तेथेही दाक्षिणात्य सिनेतारकांबरोबर ते चालताना दिसले. ‘वन विंडो’ ही कल्पना येथे पूर्ण अस्तित्वात झालेली आहे. 

उद्योगधंदा काढण्यासाठी केलेल्या अर्जाचे काय झाले याची माहिती टेलिफोनवर दिली जाते आणि ती जुजबी नसते, खरी असते. वीज आज पुरेशी नाही. ती अधिक उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र , आंध्र आणि कर्नाटक या तीन राज्यांची तुलना मी येथे ऐकतो आहे . आंध्रने कॉम्प्युटर जगात मोठी झेप घेतली असली तरी बंगळूर आजही आघाडीवर आहे. महाराष्ट्रही कमी नाही. परंतु आंध्र मुख्यमंत्री आणि नव्या योजना यांचे जे समीकरण येथे झाले आहे ते कुठेही महाराष्ट्रात नाही. कारण चंद्राबाबू नायडू राजकीय भाषणेच करीत नाहीत.

(‘दै. ऐक्य’ वरुन)

Tags: माधव गडकरी जे.बी.पटनाईक Madhav Gadkari J B Patnaik weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके