डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

जुने कोकण कसे होते, काय बदल झाले ते विचारायला माझ्याकडे एक फ्रेंच कवी येऊ न गेला. त्याला मी ‘श्यामची आई’ची व्हीडिओ कॅसेट दिली. काही संदर्भ इंग्रजीत सांगितले. जुन्या कोकणातील जीवनशैली विविध अंगांनी ‘श्यामची आई’मध्ये दिसते. दापोलीतील मंडलिक कुटुंबाच्या मदतीने ‘श्यामची आई’चे चित्रण झाले. आचार्य अत्र्यांची टीम मंडलिकांकडे उतरली होती, असे जुने ग्रामस्थ सांगतात. ‘श्यामची आईफची एक चित्रप्रत मी युरोपात त्या रसिक, जिज्ञासू माणसाबरोबर पाठवू शकलो. छोट्या छोट्या गोष्टींत किती आनंद असतो! माझ्या गॅलरीतल्या सदाफुलीसारख्या साध्या साध्या गोष्टीसुद्धा रोजच उमलत असतात. आपणही न घाबरता, न रडता फुलत-बहरत राहिले पाहिजे.

ऊन फार दुरून येते. ते सोनेरी अंगाचे ऊन दगडी द्रोणीच्या पाण्यातही उतरते. चिमुकल्या गप्पीमाशांनाही ‘जीवन’सत्त्व देते. त्यांच्या सप्तरंगांना झळाळी प्राप्त होते. आपणही अंतरंगांना असाच उजाळा द्यायचा असतो.

दापोलीतील उंच उंच झाडे पाहताना मला माझे ज्येष्ठ स्नेही रवींद्र पिंगे यांची आठवण येते. 2009 ते पाहू शकले नाहीत, पण त्यांनी आयुष्यात जे भले-बुरे पाहिले, ते त्यांनी लिहून ठेवले. मुंबईच्या ‘आकाशवाणी भवना’च्या पाचव्या मजल्यावर जेव्हा त्यांचे राज्य होते, तेव्हाही त्यांनी बढाया मारल्या नाहीत. ज्ञानमातादुर्गा भागवतांपासून ‘बोलू ऐसे बोल’ लिहिणाऱ्या वनितामंडळ विभागाच्या लीलावती भागवतांपर्यंत अनेक सुविद्य महिलांशी, उमाकांत ठोमरेंसारख्या चोखंदळ संपादकांशी, ‘ग्रंथवार्ता’ माध्वनिसदरासाठी पुस्तके पाठवणाऱ्या प्रकाशकांशी, माझ्यासारख्या पोपटपंची करणाऱ्या निवेदकांशी, गायक गंधर्वांशी, नटमंडळींशी, हरहुन्नरी कलावती नीलम प्रभूंशी, सुहासिनी मुळगावकरांशी,एस.एन.डी.टी.तील डॉ.कांचनमाला हरमळकरांशी, गीतकारप्रवीण दवणेशी... शेकडो रसिकांशी, पुस्तकविक्रेत्यांशी, रत्नागिरीच्या स्मिता राजवाडेंशी पिंग्यानी शुद्ध स्नेह ठेवला. त्यांचे मैत्र त्यांच्या अगणित पत्रांमधूनही पसरले आहे. पिंगेआमच्या पाशीच आहेत! मंगेश पाडगावकर नि पु.लं.चा सहवास मिळाल्यामुळे. खळ्यांचे म्युझिक आमच्या खळ्यात मळ्यात येण्यापूर्वी पिंग्यांनी ऐकल्यामुळे, फडफडीत पापलेटासारखे ताजेपुस्तक त्यांच्या पुढ्यात आधी पडत असल्यामुळे रवींद्र सांस्कृतिक समृद्धीचे धनी झाले. त्यांनी आमच्याशी हितगुज केले आणि अनेक किस्से मला सांगून ठेवले. ‘हे लिहायचे नाही हां’ अशी गोड तंबीहीते देत असत. ते किस्से सर्वस्वी खरे असतील, असेही नाही. पण मजेदार, अजब असत. कोण किती पाण्यात उभा आहे ते पिंगे ओळखत. एका प्राध्यापकाबद्दल ते म्हणाले, ‘हा XXXX स्पार्क दाखवतच नाही. मी याला भाषणे ठोकायला बोलावतो, कारण रेडियो टॉक कुणी ऐकत नाही, पण या माणसाचे शेवटी काम उरणार. रेडियोतले सगळे हवेवर विरून जाणार...’ रवींद्र पिंगे मात्र त्यांच्या लेखनातील लालित्यासह पुरून उरले. विरून,वितळून गेले नाहीत. उलट, आम्हीच त्यांच्या लेखनाने विरघळत गेलो.

2008ला निरोप देताना वाटले. आयुष्य किती क्षणभंगुर असते. फुलपाखरू येते आणि बागडून जाते. तेव्हा कुणावर कसलेही आरोप न करता ते आनंदात घालवावे. आपण बरे नि आपली अभ्यासिका बरी. मास्तराने एक ‘तासिका’ घेतली, तरी त्याचा आनंद विद्यार्थ्यांना दिवसभर पुरला पाहिजे. काही प्राध्यापक स्वत:बद्दलच वर्गात बोलत सुटतात. मग मुलेही ते येण्याआधी पळून जातात आणि कॅन्टीनमध्ये सिनेमाच्या गप्पा मारत बसतात. ‘दोस्ताना’ फालतू आहे, त्यापेक्षा ‘फॅशन’ बरा आहे आणि मराठी माणसाने काढलाय, असेही ऐकू मेते. मुलामुलींच्या गप्पा मी मुद्दाम ऐकतो. त्यातून नवे जग कळते.

नव्या वर्षाचे स्वागत करताना मी निराश अजिबात नाही. कारण मला प्रिय असलेले बुद्धिवादी लोक प्रत्येक जिल्ह्यातच नव्हे, तर तालुक्यात आहेत. आसपास ‘पाचोळा’ पडत असताना आपापली बंगली ते मठीसारखी राखून आहेत. त्यांच्याशी चर्चा करायला मी छोट्या छोट्या गावाकडे जातो. चिपळूण तालुक्यातही, कोळकेवाडीची राजन इंदुलकरांनी त्यांच्या साथींसह चालवलेली आदिवासी मुलांची शाळा बघून आलो. धनगर आणि कातकरी मुले त्यांचा दिनक्रम गाण्यातून सांगत होती. धुके ओलांडून आम्ही त्या शाळेकडे गेलो. तरुण मुलांना मुद्दामच ती शाळा बघायला मी नेले. ‘लेखक म्हणजे कोणरे?’ मी त्या मुलांना विचारले. ‘जो धडे (पाठ) लिहितो, तोफ, एकाने उत्तर दिले. त्या बालकांना पाठ्यपुस्तक माहीत होते, पण निसर्गाचे केवढे तरी व्यापक, विशाल पुस्तक त्यांच्या आसपास पाने उघडून वाऱ्यावर फडफडत आहे व त्या बुकाशी त्यांची खास दोस्ती आहे. वर्ष संपता संपता कोळकेवाडीची शाळा बघून माझ्या त्या दिवसाचे सार्थक झाले!

नव्या वर्षाचे ऊन पुस्तकांच्या काचकपाटावरही पसरते. माझ्या घरी चोरीमारीचे भय नाही. ‘समाजस्वास्थ्य’पासून ‘अमृत’पर्यंत चे अंक नि विचार करावयास लावणारे ग्रंथ पळवून चोरटा करणार काय? तेव्हा माझी ग्रंथसंपत्ती सुखरूप आहे.

जुने कोकण कसे होते, काय बदल झाले ते विचारायला माझ्याकडे एक फ्रेंच कवी येऊ न गेला. त्याला मी ‘श्यामची आई’ची व्हीडिओ कॅसेट दिली. काही संदर्भ इंग्रजीत सांगितले. जुन्या कोकणातील जीवनशैली विविध अंगांनी ‘श्यामची आई’मध्ये दिसते. दापोलीतील मंडलिक कुटुंबाच्या मदतीने ‘श्यामची आई’चे चित्रण झाले. आचार्य अत्र्यांची टीम मंडलिकांकडे उतरली होती, असे जुने ग्रामस्थ सांगतात. ‘श्यामची आई'ची एक चित्रप्रत मी युरोपात त्या रसिक, जिज्ञासू माणसाबरोबर पाठवू शकलो. छोट्या छोट्या गोष्टींत किती आनंद असतो! माझ्या गॅलरीतल्या सदाफुलीसारख्या साध्या साध्या गोष्टीसुद्धा रोजच उमलत असतात. आपणही न घाबरता, न रडता फुलत-बहरत राहिले पाहिजे.

ज्येष्ठ माणसेही सरत्या वर्षी मी उत्साहात पाहिली. मालाडच्या प्रभाताई तुळपुळेसुद्धा त्यांच्या उपक्रमांबद्दल माझ्याशी फोनवर उत्साहात बोलत होत्या. पुण्यातील ‘पेंडसे ट्रस्ट’च्या निर्मलाताई माझ्या कडून वेगवेगळे उपक्रम करवून घेत राहिल्या. कधी बालकथाकथन, कधी निबंध कार्यशाळा. निर्मला पेंडसे हीच युरोप बघून आल्या. किती उत्साह! केवढा आनंद! तोही ऐंशी वर्षांचे आयुष्य ऊनपावसासह पाहिल्या वर. ही अशी चैतन्य घेऊन वावरणारी काटक माणसे पाहिली की, मी‘बुजगावणे’ बनूच शकत नाही. माझ्यातला ‘माणूस’ नव्या वर्षी अधिक जागा होतो आणि शुद्ध पाण्याचे झरे शोधण्यासाठी भटकू लागतो...

Tags: मंगेश पाडगावकर निर्मला पेंडसे प्रभाताई तुळपुळे नववर्षाच्या वेशीवर माधव गवाणकर weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके