डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

लाला रामदीनने आपली बॅग बंद केली. आपल्या समोरचे पेपर्स गोळा केले. डायरी बंद केली. नाकावरचा चष्मा काढून आपल्या कोटाच्या खिशात ठेवला आणि आपल्या कारमध्ये बसून निघून गेले. ते कुठे गेले, हे कुणीही सांगू शकत नव्हतं. लाला रामदीन पोहोचले. कार्यालयात आता फक्त पाच माणसं उरली होती. मंत्री महोदय, लाला रामदीन आणि त्यांच्याशिवाय आणखी तीन कार्यकर्ते. लाला रामदीननी मनोमन ओळखलं होतं, ही असामी काही सामान्य नाही. सगळेच नि:शब्द होते. मंत्री महोदयांच्या चेहऱ्यावरील औदासीन्याचे भाव अगदी पारदर्शी स्वरूपात दिसत होते. ‘‘तुम्ही सगळे चुकीच्या बातम्या देत आलात. आता या शेवटच्या दिवसांत काय करू शकतो आपण? लाला रामदीननी दिलेली माहिती चुकीची असू शकत नाही. याचा अर्थ, आमचा पराभव निश्चित आहे. आणि ही बाब शंभर टक्के खरी ठरणार.’’  

मध्यरात्रीच्या समयीसुद्धा मुख्य निवडणूक कार्यालय पूर्णपणे गजबजलेलं होतं. त्या महालवजा इमारतीच्या तिन्ही मजल्यांवर शेकडो कार्यकर्ते वेगवेगळ्या कामांत गुंतले होते. दिवस-रात्र भोजनावळी चालू होत्या. जेवण, चहापाणी, बिडी-सिगारेट सगळ्याची व्यवस्था या इमारतीत केली गेली होती. झेंडे, बॅनर्सपासून कार्सची भाडी, सगळ्या मोठ्या नेत्यांच्या येण्या-जाण्याच्या व्यवस्थेपर्यंत सगळी कामं इथूनच चालत होती. 

सगळ्यात वरच्या मजल्यावरील एका हॉलमध्ये चौधरी रामरतन, भोला पंडित, राजाराम सैनी हे इथल्या सगळ्या गजबजाटातही गंभीर विचारविनिमयात गढून काही कागदपत्रांची छाननी करीत बसलेले होते. 

‘‘भोला, ब्राह्मणांच्या सातही गावांची पंचायत कशी का होईना, आपल्याला समर्थन द्यायला तयार झाली ना; तर पाहा कशी मजा येईल ते.’’ रामरतन पुलकित होत म्हणाला. 

‘‘तर मग काही दान-धर्म व्हायला हवा नाऽ?’’ 

‘‘दान-धर्म?’’ रामरतनचे डोळे विस्फारले गेले. ‘‘मागच्या आठवड्यात याच कामासाठी पूर्ण पन्नास लाख रुपये पाठवले गेले नाऽ?’’ कुणास ठाऊक, नीटपणे जागेवर गेले की नाही ते! आतापर्यंतच्या बातम्या तर आपल्या विरोधातच येत आहेत.’’ 

‘‘एवढं सगळं झालं आणि मला त्याची साधी माहितीही नाही?’’ 

‘‘हो ना, कारण ती सगळी व्यवस्था खुद्द मंत्रीसाहेबांनी केली होती. माझ्याकडे ही जबाबदारी आली असती, तर मी तुमच्याशिवाय आणखी कुणावर विश्वास ठेवू शकत होतो? हे कोण सांगणार त्यांना की, आता अशा परिस्थितीत मधली माणसं पैसे खाऊन-पिऊन छान ढेकर देतात आणि आपल्याला सांगतात की, मतदारांना पैसे नीट वाटलेत म्हणून. बरं, या पैशांचा कुठं काही हिशोब किंवा लिखापढी तरी असते का?’’ रामरतन सांगत होता.  

राजाराम आपल्या जागेवरून उठून दुसरीकडे गेला, तर भोला त्याच्या कानात हळूच सांगू लागला, ‘‘मधल्या मध्ये आपला वाटा तर मारला गेला नाऽ!’’ 

‘‘भोलाऽ तू कशाला काळजी करतोस? झेंड्याचं कापड, गाड्यांच्या पेट्रोलचा खर्च आणि गावागावांतल्या प्रचारकार्यालयाचा खर्च- हे सगळं तर आपल्यालाच पाठवायचं आहे ना? सगळी व्यवस्था होईल. तू थोडा चतुराईनं वाग, म्हणजे झालं.’’ 

एवढ्यात लाला रामदीन आले तसे ते दोघे अदबीने उठू उभे राहिले. 

‘‘लालाजी, नमस्कार!’’ 

‘‘नमस्कार! काय खबरबात आहे रामरतन? सगळं व्यवस्थित सुरू आहे ना?’’ 

‘‘आतापर्यंत तर आपणच आघाडीवर आहोत. लाखाच्या आसपास तर पोहोचलो असूच.’’ रामरतन नेहमीच रामदीनच्या समोर सगळं बढाई मारत सांगायचा. 

लाला रामदीन या निवडणुकीचे मुख्य आर्थिक व्यवस्थापक होते. सगळा पैसा जमा करणे, तो नीट वितरित करणे हे सगळं त्यांच्याकडेच होतं. म्हणून लाल रामदीनचा मानमरातब मंत्रिमहोदयांपेक्षा कुठेही कमी नव्हता. आजपर्यंत रामदीनशिवाय कुणालाही ठाऊक नव्हतं, हा एवढा पैसा कुठून येतो ते. फक्त खर्च होणारा पैसा सगळ्यांना दिसत होता. 

‘‘भोला, तुझ्या या ऑफिसच्या खर्चासाठी दोन लाख पुरे होतील ना?’’ रामदीननी बॅग उघडून आपली डायरी काढली आणि नाकावरील चष्मा वर सरकवीत त्यावरून पाहत म्हणाले. 

‘‘फक्त दोन लाख? सात लाखांपेक्षा कमी खर्च नाही इथला. एवढं मोठं ऑफिस थाटलं... एवढे लोक येणारे जाणारे...’’ 

‘‘किती लोक रे बाबा? एक हजार लोकवस्तीचं तर गाव आहे. सात दिवसांचा चहापाण्याचा खर्च दोन लाख म्हणजे कमी झाला नाही.’’ 

‘‘शेटजी, निवडणुकीच्या माहोलात कोण भडवा चहापाण्यावर खूश राहतो हो? सगळेच्या सगळे!’’ 
‘‘बरं, बरं’’ - रामदीननं बोलणं तिथंच थांबवलं. 

‘‘शेठजी, विरोधी पक्षाच्या ऑफिसात सदावर्त सुरू आहेत. जो जे मागेल ते त्याला मिळतं. आणि तुम्ही मात्र...’’ 

‘‘नाही रे भोला, तुला समजलं नाही. आमच्यापर्यंत काही तक्रारी आल्यात नाऽ! त्यांच्यापर्यंत ना झेंड्याचं कापड पोहोचलं आणि ना त्यांना बॅनर्स मिळाले. लोकांनी मधल्या मधेच गडप केलेला दिसतो हा माल!’’ 

रामरतन आणि भोलानं एकमेकांकडे पाहिलं. मग रामरतन आपली बाजू सावरत म्हणाला, ‘‘लालाजी, भोलाच्या वस्तीत खुद्द मी जाऊन आलो. तिथं तर प्रत्येक घरावर आपलेच झेंडे आहेत लावलेले. लहान मुलं, मोठेसगळ्यांना बॅनर्स, बिल्ले मिळाले. कुठेही कमतरता केली नाही.’’ 

लाला रामदीनच्या लक्षात त्यांची मिलीभगत आली, तेव्हा ते गप्प राहिले. हीच तर त्यांची खासियत आहे. सगळं पाहून-सवरून त्याकडे काणाडोळा करायचा. असं भासवायचं की- आपल्याला काहीच ठाऊक नाही. 

एकदा खुद्द मंत्रिमहोदय त्यांना म्हणाले होते- ‘‘रामदीन, एवढा मोठा घोटाळा झाला आणि तुम्ही गप्प राहिलात. आम्हाला काहीच सांगितलं नाही?’’ 

‘‘असा कोणता मोठा घोटाळा? एवढ्या मोठ्या निवडणुकीत दोन-चार लाख म्हणजे किस पेड की पत्ती! हे काय खातील बिच्चारे? हांऽ पाच-सात लाखांवर जोडेचपला कमावल्या नाहीत, तर आपलाच सत्यानाश होईल ना? दहा-वीस हजार मीटर कपडा इकडे-तिकडे गेला, म्हणजे काय आभाळ कोसळलं नाही ना? लोकांना आता खायला-प्यायला घातलं नाही, तर उद्या चालून आणि...’’ रामदीन जणू डोळ्यांची भाषा वापरत हसले. त्यांचा चेहरा शरमेने लाल झाला होता. 

मंत्रीमहोदयसुद्धा काहीसे भारावून म्हणाले, ‘‘रामदीन, तुम्ही नसतात तर आम्ही कामातूनच गेलो असतो. बरं, ‘त्यांनी’ काही दिलं?’’ 

‘‘दिलं तर! पण परमिटबद्दलचं कबूल करवून घेऊनच.’’ 

‘‘चलाऽ ठीक झालं. एवढ्या मोठ्या परमिटसाठी आणखी दुसरं कुणी तयार होणारही नाहीच.’’ 

‘‘तो अधिकारी आला नव्हता ना? रामदीननं विचारलं. वेळेवर सगळे येतीलच. आधी बोलावून आपलीच मारून घ्यायची आहे का? अगोदरच लोक फार हुशार झालेले आहेत. निवडणुकीच्या दिवशी बघा सगळे आपापल्या कामावर असतील. तुम्ही निश्चिंत राहा. फक्त पैसा कमी पडायला नको. माझ्या जिथे कुठे सह्या लागतील, त्या घेऊन ठेवा.’’  

लाला रामदीननं आपल्या बॅगमधून वीसेक कोरे कागद बाहेर काढले आणि त्यांच्यासमोर टेबलवर पसरले. मंत्री महोदय शांतपणे सह्या करू लागले. प्रत्येक कागद पुढे करीत लाला रामदीन कुण्या एका व्यक्तीचं फक्त नाव सांगायचे आणि मंत्रीमहोदय त्या कागदावर लिहिल्या जाणाऱ्या मजकुराचा अंदाज लावीत होते. सगळ्या कागदांवर सह्या झाल्यावर मंत्री महोदयांनी हसत विचारलं, ‘‘आताही झोळी रिकामी राहणार का रामदीन?’’ 

‘‘कुबेराची तिजोरी कधी रिकामी राहिली आहे का साहेब?’’ आणि दोघेही मोठ्याने हसले. 

लाला रामदीन आपल्या हातातल्या डायरीची पाने उलट-सुलट करून पाहू लागले. मग रामरतनकडे न पाहताच ते म्हणाले, ‘‘रामरतन, एक गोष्ट सांगतो. बालकरामनं तर एकाच तारखेला कारचं भाडं दोनदा वसूल केलेलं दिसतं. एकदा माझ्याकडून आणि दुसऱ्यांदा आपल्याच पी.ए.कडून. पण त्याला मात्र सांगू नकोस. तो तसाही आता बाराच्या भावात गेला! आम्हाला काय...’’ 

लाला रामदीननं बालकरामला माध्यम करून रामरतनलाच उघडं पाडलं होतं. रामरतनच्या अंगातलं धावणारं रक्त जणू काही क्षणांसाठी थांबल्यासारखं झालं होतं. त्याने घाबरून भोलाकडे पाहिलं, पण भोलानंही त्याच्यावरची आपली नजर दुसरीकडे वळविली. नाकावरून खाली घसरलेल्या चष्म्याच्या वरून लाला रामदीन त्या दोघांकडेही बेरकीपणे पाहत होते- काय प्रतिक्रिया देतात म्हणून. 

‘‘ठीक आहे. आता एक काम करायचं. गाडी घ्या आणि ताबडतोब पाच गावांमधून एक चक्कर टाकून या. काय?’’ 

तसे रामरतन, भोला, राजाराम आणि आणखी काही कार्यकर्ते एका जुनाट जीपमध्ये जाऊन बसले. जीपच्या समोरच्या भागावर निवडणूक चिन्हाचा एक भला मोठा झेंडा फडकत होता. जीप शहरातून बाहेर पडली आणि कच्च्या रस्त्यावरून धूळ उडवीत गावांकडे धाऊ लागली. 

‘‘लाला मोठा बनेल आहे. त्याच्यापासून सावध राहा’’ रामरतनने तोंडाला बॉटल लावून त्यातले दोन घोट घशात घातले आणि बॉटल राजारामकडे दिली. अशाच काही बॉटल्स भाऊबंदकीचं नातं निभवीत गाडीतल्या गाडीत फिरत रिकाम्या झाल्या. हल्ला-गुल्ला करीत सगळेच उदात्त राजकारणावर भाषणे देऊ लागले. गाव जवळ येताच काहींनी सुचवलं- ‘बाटल्या सीटखाली लपवून ठेवा. गाव जवळ येत आहे.’ 

‘‘बाहेर फेकून द्या नंऽ’’ 

‘‘नाहीऽ फेकू नका. उद्या मी त्या भंगारवाल्याला विकून टाकीन. सीटखाली सरकवून द्या.’’ 

‘‘गाववाल्यांना ठाऊक नाही काय आपण किती सज्जन आहोत ते? तेच तर आपण पाठवलेल्या दारूवर ताव मारत त्यावर इथं धिंगाणा घालत असतील!’’ रामरतन संतापला. 

‘‘गप रेऽ सरपंचाचा वाडा जवळ आला आहे.’’ भोलानं त्याला फटकारलं. 

जीप सरपंचाच्या वाड्यासमोर थांबली. वाड्यात काही माणसं बोलत बसलेली होती. सरपंच आणि तीन ओळखीचे कार्यकर्ते मात्र उदास दिसत होते. सगळेच जीपमधून उतरले. त्यापाठोपाठ झेंडे, बॅनर्स, काठ्या, बिल्ले जीपबाहेर काढू लागले. 

‘‘कशाला हा सगळा पसारा बाहेर काढतोस रे रामरतन? गावातला कुठलाही माणूस आपल्याला एकही मतपत्रिका आणून देणार नाही या वेळी. खास म्हणजे, दलित आणि चांभार तर जणू पाण्यात मीठ घालून बसले आहेत! आपली परिस्थिती मोठी कठीण आहे. आपल्या विरोधी पार्टीतले लोक एवढी ताकद लावून काम करीत आहेत की, विचारू नकोस. प्रत्येक घरी जाऊन एकेका मतदाराला ते भेटत आहेत. त्यांच्या अडचणी जाणून घेतात, त्यांच्यात मिळून- मिसळून वागतात. आणि तुम्ही? अर्ध्या रात्री कधी तरी येता आणि तेही नशेत धुंद होऊन. इथं माझ्याकडे बसून खाता- पिता आणि पुन्हा गायब होता. आजच आपली ही अवस्था वरच्या लोकांना सांग, नाही तर आपण मातीत गेलोच म्हणून समजा!’’ 

तशी सगळ्यांची नशा खाड्‌कन्‌ उतरली. मंत्री महोदयांचा पराभव म्हणजे, त्या सगळ्यांसाठी कुकर्माची सजाच ठरणार होती. सगळ्यांच्या काळजात धडकी भरली. सगळे काही न बोलता तसेच पुन्हा जीपमध्ये बसले आणि दुसऱ्या गावाकडे रवाना झाले. त्यानंतर आणखी पुढच्या गावाला. सगळ्याच गावांतून हे असंच ऐकायला मिळालं, तर आपली हार नक्कीच आहे, हे आता सांगायला कुण्या ब्रह्मदेवाची गरज नव्हती. रात्रभर अशीच गावोगावी जीप फिरवून शेवटी ते सकाळी-सकाळी पुन्हा शहरातल्या मुख्य कार्यालयात दाखल झाले. 

सगळ्यांनी मनावर दगड ठेवून थंड मनाने ही सगळी परिस्थिती लाला रामदीनच्या कानांवर घातली. लाला  रामदीन त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरील भाव वाचत होते. शेवटी त्यांच्या तोंडून एक सत्य बाहेर पडलं. ‘‘हे सगळं आपल्या कर्माचं फळ आहे. मला हे सगळं स्पष्ट दिसत होतं. या गोष्टी आता आपल्यातच ठेवा. आता फक्त दोन दिवस उरले आहेत. काही तरी करावंच लागेल ना? मागच्या वेळी रात्रीतून सगळं उलटंपालटं केलं होतं ना? वाईट याचं वाटतं की, या वेळी पैशांचीही जादू चालली नाही. लोक पैसेही घेतात आणि मतही देत नाहीत ना स्सालेऽऽ!’’ 

लाला रामदीनने आपली बॅग बंद केली. आपल्या समोरचे पेपर्स गोळा केले. डायरी बंद केली. नाकावरचा चष्मा काढून आपल्या कोटाच्या खिशात ठेवला आणि आपल्या कारमध्ये बसून निघून गेले. ते कुठे गेले, हे कुणीही सांगू शकत नव्हतं. लाला रामदीन पोहोचले. कार्यालयात आता फक्त पाच माणसं उरली होती. मंत्री महोदय, लाला रामदीन आणि त्यांच्याशिवाय आणखी तीन कार्यकर्ते. 

लाला रामदीननी मनोमन ओळखलं होतं, ही असामी काही सामान्य नाही. सगळेच नि:शब्द होते. 

मंत्री महोदयांच्या चेहऱ्यावरील औदासीन्याचे भाव अगदी पारदर्शी स्वरूपात दिसत होते. 

‘‘तुम्ही सगळे चुकीच्या बातम्या देत आलात. आता या शेवटच्या दिवसांत काय करू शकतो आपण? लाला रामदीननी दिलेली माहिती चुकीची असू शकत नाही. याचा अर्थ, आमचा पराभव निश्चित आहे. आणि ही बाब शंभर टक्के खरी ठरणार.’’ 

मग काही क्षण थांबत ते पुढे बोलू लागले, ‘‘पण विजय-पराजय तर निवडणूक झाली तरच ठरेल ना? ही निवडणूकच स्थगित व्हायला हवी. निवडणूक स्थगित होईल, अशी परिस्थिती निर्माण करा. हे काम ना मी करू शकत आणि ना लाला रामदीन; हे तुम्हीच करू शकता. बूथ बळकावण्यापासून खोटं मतदान करण्यापर्यंत अनेक पर्याय आहेत. सरकारी यंत्रणेचा गैरवापर होत आहे, चुकीची कामं होत आहेत- या बातम्या आतापासून पसरवणं अन्‌ प्रसिद्धी करणं सुरू करा. केंद्रातल्या पर्यवेक्षकांना बोलावून काय चुकीचं काम करायचं आहे, ते त्यांच्या समोरच करा. लक्षात ठेवा- कुठलीही चूक त्यांच्या नजरेतून सुटायला नको. हे सगळं पाहून निवडणुकीला स्थगिती द्यायला त्यांना काही वेळ लागणार नाही. हे सगळे उपाय बिनकामी ठरले, तर शेवटी आपल्याजवळ हत्यारं ठेवा. बापूजींच्या अहिंसेला थोडंसं बाजूला ठेवलं, तर काही आभाळ कोसळणार नाही आपल्यावर!’’ 

‘‘पण एकदा ही निवडणूक रद्द झाली, तरी पुन्हा काही दिवसांनी होणारच ना?’’ एका कार्यकर्त्याची शंका पुढे आली. 

‘‘पण हीच परिस्थिती पुन्हा उसळली, तर तेच होईल ना?’’ 
दुसऱ्या कार्यकर्त्याने परस्पर उत्तर दिलं, ‘‘आपण पुन्हा हेच करायचं.’’ 

‘‘होऽ पण असं कधीपर्यंत?’’ 

‘‘जोपर्यंत आपल्या विजयाची खात्री वाटत नाही, तोपर्यंत.’’ 

मंत्रीमहोदयांनी आपला शेवटाचा निर्णय सांगितला आणि बैठकीचा समारोप केला. 

अनुवाद : रवींद्र शोभणे

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

माधव कौशिक
k.madhav9@gmail.com

हिंदी साहित्यिक, साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके