डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

रमईकाका आपल्या हातातली काठी जोरात हवेत भिरकावून जणू आतडे पिळवटून पूर्ण ताकतीने ओरडले; पण नगाऱ्याच्या आवाजात साध्या तुतारीचा आवाज असा कितीसा ऐकायला जाणवणार होता? त्यांचा चीत्कार जखमी पक्ष्याप्रमाणे भिरभिरत मधल्या मध्येच हवेत छिन्नविच्छिन्न झाला. छताच्या जागेवर सगळ्यांत वर त्यांचा मोठा नातू कल्लू उभा होता. त्याच्या हातातली कुदळ परशूसारखी तळपत होती. रमईकाकांच्या अंगातला उरलासुरला जोशही आता विझलेल्या निखाऱ्यांसारखा विझून गेला. संपूर्ण अंगाला जणू अर्धांगवायू झाल्यासारखी त्यांची अवस्था झाली होती. आपल्या पिढ्यांमध्ये वाहणारं रक्तच असं सडकं निघेल याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती. त्यांच्या मनात येत होतं- उंच उडी मारून छतावर जावं आणि सगळ्यांना तिथून उचलून खाली फेकून द्यावं. कल्लूचा तर गळा घोटावा असं त्यांना वाटत होतं.  

खूप भयंकर होती ती रात्र! प्रत्येक सज्जन माणसाच्या डोळ्यांत सैतान धुमाकूळ घालत होता. मारायला आणि मरायला माणसं वेडी झाली होती. अख्ख्या वातावरणात काही असेल तर तो आकांत. दहशतीची वटवाघुळं सगळ्यांच्या डोक्यावर जणू उलटी टांगली होती. प्रत्यक्ष देवाचाही शापाची भीती आता कुणाला राहिली नव्हती. 

मारेकऱ्यांच्या टोळ्या रस्त्यावर जणू होळी जाळत फिरत होत्या. घरंदारं, दुकानं सगळंच खाक होऊ लागलं होतं. बायांच्या आणि मुलांच्या हृदयद्रावक किंकाळ्या दंगेखोरांच्या आवाजात दबून शेवटचा श्वास घेत होत्या. पोलिसांच्या जळालेल्या गाड्यांची संख्या स्मशानातल्या भुतांसारखी सतत वाढत होती. खुद्द रक्षकच आपल्या सुरक्षेसाठी कोपरे शोधत होते. 

डिसेंबरातल्या कडाक्याच्या थंडीतही सारं शहर घामाघूम झालं होतं. भीतीनं सगळ्यांच्या काळजाचा थरकाप उडाला होता. शहराच्या ललाटावर जणू मृत्यूची नोंद केल्याचं चित्र सर्वत्र दिसत होतं. कुणालाच काळत नव्हतं एकाएकी हा भडका कसा उठला आणि त्याने असं सर्वत्र वणव्याचं रूप कधी घेतलं. 

या प्राचीन शहरात न जाणो किती जुन्या इमारती आहेत. जुन्यातल्या जुन्या मोहल्ल्यातली अगदी म्हातारी माणसं आजही जिवंत होती. कपड्यावर ठिगळ दिसावी तशी अर्धमेल्या लोकांच्या जमाती आजही भरपूर आहेत. आजसुद्धा जुन्या विहिरीच्या काठावर जुनी लाल मशीद अल्लासांई परवर दिगारच्या आठवणीत उभी आहे. हजारो लोकांच्या श्रद्धेचं प्रतीक म्हणून. कुदळी, फावडी, टिकाव घेऊन अख्खा जमाव त्यावर तुटून पडला होता; पण भिंती कितीही जर्जर झाल्या तरी सहजपणे तुटत नाहीत. मायावी लोकांसारख्या उभ्या राहतात पुन्हा पुन्हा. आणि तरीही प्रत्येक मायावीचा मृत्यू अटळ असतोच. 

भिंतींना नेस्तनाबूत केल्यानंतर तिन्ही खिंडांरावर चढून माणसं जल्लोष साजरा करीत होती. आणि तमाशा पाहणारे त्यांना क्षणोक्षणी उत्तेजित करीत होते. 

‘‘जमीनदोस्त करा मशिदीला. सोडायचं नाही.’’ 

म्हातारे रमईकाका त्या आवाजाने अधिक उत्तेजित झाले होते. हातात काठी घेऊन ते धावत सुटले. समोरचं ते दृश्य पाहून कितीतरी वर्षांपूर्वीचं दृश्य त्यांच्या थकलेल्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. अमानुषपणे होणाऱ्या कत्तलींच्या त्या झंझावातात हजोरोंचे प्राण वाचविणारे रमईकाका आता खरंच वृद्ध झाले होते. विभाजनाच्या त्या मारामारीत एकट्या त्यांनी आपल्या काठीच्या धाकावर अनेक गावांच्या सीमा सुरक्षित ठेवल्या होत्या, असंही सांगतात. त्यांच्यासमोर मुसलमान सुना-मुलींच्या अंगाला हात लावायची कुणाची हिम्मत होती! दुष्टांचे हात खांद्यापासून कापून फेकायला रमईकाकांची तलवार केवढ्या चपळाईनं विजेसारखी फिरत होती! हिंदू असूनही दुसऱ्या धर्माच्या लोकांप्रति एवढं प्रेम? काही डोकी फिरलेली माणसं त्यांच्या जिवावर उठून वर्षोनुवर्षे त्यांचा मागावर होती. परंतु रमईकाकांच्या छातीला छाती लावून बोलण्याची हिंमत कुणामध्येच नव्हती. 

आजचं हे चित्र पाहून ते स्तंभित झाले होते. बिचाऱ्या या मशिदीत नमाज पडायला तर आता कितीतरी वर्षे उलटून गेली होती. म्हणायलाच आता ती मशीद उरली होती. या जागेत तर आता मुलींचे शिवणवर्गही चालायचे. संध्याकाळच्या वेळी रात्रीचा आश्रय शोधणारे भटके इथे रात्रही घालवायचे. म्हाताऱ्या मौलवीला जाऊन वीस वर्षे तरी उलटली असतील. त्यानंतर तर शहरातल्या कुण्या मशिदीत ना मुल्ला आला, ना मौलवी आला. शहरातले शेशंभर मुसलमान आपापल्या संसाराचा गाडा मेहनत मजुरी करून रेटत होते. कुणाला साधी मरायला उसंत नव्हती तर मारायला तरी कोण पुढे येईल? 

कितीही झालं तरी शेवटी आग ही आगच असते. एकदा लागलेली आग पूर्णपणे विझली नाही तर त्या ज्वाळा आजूबाजूच्या गोष्टीही आपल्यात ओढून घेतात. ज्वाळांचा घेर आणि वेग वाढत जातो आणि या गतीत विध्वंससुद्धा तेवढ्याच वेगाने घडत जातो. गंगा नदीच्या किनाऱ्यावरील कुठल्या ऐतिहासिक नगरीतून उठलेल्या ज्वाळांनी हजारो मैल दूर रमईकाकाच्या खेडेगावापासून तर नव्याने वसलेल्या शहरापर्यंत सगळा परिसर व्यापला होता. घृणेचा, तिरस्काराचा राक्षस जेव्हा पुढे पुढे सरकू लागतो तेव्हा अख्खी सृष्टी आपल्या देहाखाली चिरडून टाकतो. रमईकाका ज्या गोष्टींना उगीचच, अनावश्यक म्हणून समजत होते, त्याचं बीभत्स रूप आज त्यांच्या डोळ्यांना दिसत होतं. त्यांनी कधी विचारही केला नसेल की पन्नास वर्षांनंतरसुद्धा जमिनीत गाडलेले मुद्दे जमीन फाडून उठू शकतात आणि जिवंत वस्त्यांचं स्मशान करू शकतात. 

रमईकाकांच्या अधू डोळ्यांना आता समोरचं दृश्य अधिक स्पष्ट दिसू लागलं होतं. एक मोठा जमाव चबुतऱ्यावर कुदळीचे घाव घालत होता. शेकडो वर्षांपासून ऊन, वारा, पाऊस झेलत उभ्या राहिलेल्या त्या मशिदीच्या चबुतऱ्यावर कुदळी, टिकाव, फावड्यांचे वार असे उलटून वर येत होते की जणू पितळेच्या जाड पत्र्यावर होणारे वार उलटून वर येत आहेत. घाव घालणारे सगळे घामाघूम झाले होते; पण सैतान अंगात भिनला की तो हार जात नाही, तसाच हैदोस सर्वत्र सुरू होता. एकाएकी मोठ्या जल्लोशात धडाम आवाज करीत छताचा काही भाग खाली कोसळला. आता कुदळीचे वार अधिक वेगवान झाले होते. त्यातच चहुबाजूंनी होणाऱ्या जल्लोशाने जणू आकाश डोक्याच्या वर उचलून जमिनीवर आदळत असल्याचा भास होत होता. 

रमईकाका आपल्या हातातली काठी जोरात हवेत भिरकावून जणू आतडे पिळवटून पूर्ण ताकतीने ओरडले; पण नगाऱ्याच्या आवाजात साध्या तुतारीचा आवाज असा कितीसा ऐकायला जाणवणार होता? त्यांचा चीत्कार जखमी पक्ष्याप्रमाणे भिरभिरत मधल्या मध्येच हवेत छिन्नविच्छिन्न झाला. छताच्या जागेवर सगळ्यांत वर त्यांचा मोठा नातू कल्लू उभा होता. त्याच्या हातातली कुदळ परशूसारखी तळपत होती. 

रमईकाकांच्या अंगातला उरलासुरला जोशही आता विझलेल्या निखाऱ्यांसारखा विझून गेला. संपूर्ण अंगाला जणू अर्धांगवायू झाल्यासारखी त्यांची अवस्था झाली होती. आपल्या पिढ्यांमध्ये वाहणारं रक्तच असं सडकं निघेल याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती. त्यांच्या मनात येत होतं- उंच उडी मारून छतावर जावं आणि सगळ्यांना तिथून उचलून खाली फेकून द्यावं. कल्लूचा तर गळा घोटावा असं त्यांना वाटत होतं. पण म्हातारपणाच्या लाचारीमुळे त्यांच्या मनात उसळणाऱ्या भावना वाळूसारख्या भुसभुशीत होत अस्ताव्यस्त होत होत्या. वृद्धत्वामुळे थकलेली गात्रं आणि वांझ संताप यांचा जणू ते शाप भोगत होते! 

धावत आलेल्या झुंडीच्या धक्क्याने रमईकाका खाली पडले. धडपडत, दम घेत त्यांनी उठण्याचा प्रयत्न केला, तर  कुणीतरी त्यांना जबरदस्तीने गल्लीच्या कोपऱ्यापर्यंत ढकलत नेलं. नंतर काय झालं तेच त्यांना कळलं नाही. त्यांनी डोळे उघडले तेव्हा जाणवलं आपण घरात आहोत म्हणून. त्यांना घरापर्यंत कुणी सोडून दिलं होतं ते त्यांनाही आठवत नव्हतं. अर्धवट अचेतानावस्थेत थरथरत्या पायांनी ते घरापर्यंत कसेबसे चालत आले होते. घरी आल्याबरोबर काकीने त्यांना दुलई पांघरून दिली होती. ते मात्र अस्पष्ट असे बडबडत होते. त्यांचं ते बडबडणं घरातल्या कुणाही बाईच्या लक्षात येत नव्हतं. आणि या वेळी घरातले सगळे पुरुष तर बाहेर होते. 

रमईकाका पूर्ण वेळ या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत होते. अस्वस्थतेचा मलमा त्यांच्या आत्म्यावर साचत होता. मशिदीवर होणारा प्रत्येक घाव रमईकाकाने आपल्या काळजावर झेलला होता. रक्तबंबाळ झालेलं शरीर आणि आत्मा आपल्या मनातल्या वेदना वृद्ध शरीर कुठे व्यक्त करू शकत नव्हतं. त्यांची अवस्था अधिक चिंताजनक झाली होती. ‘‘अरेऽ कुणीतरी त्या कल्लूला बोलावून आणाs... कुणीतरी त्या कल्लूला बोलावून आणाऽ...’’ त्यांच्या चीत्कारांनी त्यांची अस्वस्थता अधिकच वाढली. 

पण कल्लूला कोण कुठून घेऊन येऊ शकत होता? ते केवळ ओरडत, चीत्कारत होते. उजाडेपर्यंत कल्लू स्वत:च घरी आला होता. विजयोन्मादाने हत्तीसारखा झुलत. आपल्या उद्देशाच्या परिपूर्तीने जणू मदांध झालेला. उन्मादाने ओरडत हवेत उड्या मारण्यापलीकडे त्याला काहीही सुचत नव्हतं. 

रमईकाका आपली मान मोठ्या कष्टाने वळवीत काहीसे उठते झाले. कल्लूच्या गळ्यातील तावीज आपल्या मुठीत धरून मोठ्या कष्टाने म्हणाले, ‘‘तुला ठाऊक आहे हे काय आहे? ज्यानं तुला जीवदान दिलं तो हा तावीज आहे. आजारपणात तू मारायला टेकला होतास.’’ 

प्रचंड थकव्याने त्यांचा आवाज क्षीण झाला; पण ते बोलायचे थांबले नाहीत. 

‘‘ठाऊक आहे हा तावीज तुझ्या गळयात कुणी बांधला? मशिदीतल्या मौलवींनी! अरे दळभद्र्याऽऽ आज तू त्याच मशिदीला तोडून आलास? जिच्या आशीर्वादावर तू जिवंत आहेस?’’ 

कल्लू विषण्णपणे कधी आपल्या गळ्यातल्या ताविजाकडे, कधी काकांकडे, कधी आपल्या आईकडे, तर कधी स्वत:कडेच पाहत होता. 

मूळ हिंदी कथेचा अनुवाद : रवींद्र शोभणे

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

माधव कौशिक
k.madhav9@gmail.com

हिंदी साहित्यिक, साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके