डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

हॉलमध्ये आता गोंधळ माजला होता. सगळे आपापल्या जागेवरून उठून उभे राहिले. ज्यांचा नंबर लागला होता त्या आया आपापल्या मुलांना प्रेमानं कुरवाळत होत्या. एकमेकींचं अभिनंदन करीत होत्या. काही बाया तर एकमेकींना आलिंगन द्यायच्या प्रयत्नात होत्या; पण सार्वजनिक स्थळाची मर्यादा त्यांना मध्येच अवरोधत होती. ज्यांचा नंबर लागला नव्हता ते हताश आणि उदासपणे उभे होते. इथून जाण्याचीही इच्छा आता त्यांच्यात नव्हती. ते केवळ नि:शब्द, निश्चल होते. आणि ज्यांचा नंबर लागला होता ते सतत बोलत होते. प्रशांत शांत होता; मात्र त्याला तिळमात्रही दु:ख झालं नव्हतं. हे सगळं तो कृतक कौतुकानं पाहत होता. आपल्या मुलाला प्रवेश मिळाला नाही म्हणून त्याच्या मेंदूत दुःखाच्या जाणिवेनं मुळीच उचल खाल्ली नव्हती.  

शाळेचा हॉल खच्चून भरला होता. बाया आपापल्या मुलाचं बोट धरून उत्सुकतेने इकडे तिकडे पाहत होत्या. त्यातली किमान तीन चतुर्थांश माणसं आपापल्या हातात हेल्मेट घेऊन, एकमेकांना खेटत हातातल्या लाल कागदांची पावती उलटपालट करीत पाहत उभे होते. हॉलमधील शेवटच्या रांगेपर्यंत सगळे बाकडे माणसांनी बळकावल्यामुळे उरलेले डाव्या आणि उजव्या बाजूंच्या रिकाम्या जागेत आपापसांत बोलत उभे होते. हळूहळू इंग्रजीच्या भारदस्त शब्दांनी तिथलं सगळं वातावरण व्यापून गेलं होतं. 

त्याने खिडकीतून बाहेत एक नजर टाकली. शेकडो स्कूटर्स आणि डझनावारी कार्स दिमाखात उभा होत्या. ते सगळं पाहून तासभर ताटकळत, बसमध्ये धक्के खात, बऱ्यावाईट माणसांच्या गर्दीत केलेल्या इथवरच्या आपल्या प्रवासाची त्याला आठवण झाली. समोर व्यासपीठावर हालचाल होऊ लागली. माईक लावण्यात आले. एका उंच टेबलावर सोनेरी कागद चिकटवलेला एक मोठासा पुठ्‌ठ्याचा डबा ठेवण्यात आला. त्यावर ‘बेस्ट ऑफ लक’ आणि त्याच्या खालीच ‘लकी ड्रॉ’अशी अक्षरे लिहिली होती. काही वेळाने प्रिन्सिपॉल आणि त्यांचे सहकारी धुसफुसत, त्या गर्दीतून वाट काढीत कसेबसे व्यासपीठावर पोहोचले, तशी हॉलमधली बाया-माणसं शांत झाली आणि व्यासपीठाकडे एकटक पाहू लागली. 

आपल्या बाजूला टेबलावर ठेवलेल्या त्या पुठ्‌ठ्याच्या डब्याकडे बोट दाखवीत प्रिन्सिपॉलनी आपल्या भाषणाला इंग्रजीत सुरुवात केली. ‘‘हे बघाऽ नर्सरीत प्रवेश मिळण्यासाठी हा लकी ड्रॉ आहे. हा डबा रिकामा आहे.’’ त्यांनी डब्यात हात घालून तो आडवा-उभा फिरवला. मग डबाच उचलून आडवा, तिरपा करीत समोरच्यांची खात्री झाल्याचं दिसताच पुन्हा जागेवर ठेवून दिला. 

‘‘...आणि या आहेत तुमच्या फॉर्मच्या पावत्या. या यात टाकल्या जातील. एकूण जागा आहेत एकशे पस्तीस.  त्याशिवाय वीस पावत्या वेटिंग जागांसाठी काढण्यात येतील. या सगळ्या पावत्या मी आता या डब्यात टाकतो.’’ 

तशा तिथल्या सगळ्यांनी आपापल्या हातातल्या पावत्यांवरील नंबर पुन्हा पुन्हा वाचून तो आपल्या डोक्यात पक्का नोंदवून घेण्याचा प्रयत्न केला. मनात घोळवून घोळवून. तिथल्याच एका मास्तराच्या हाताने सगळ्या पावत्या त्या डब्यात टाकण्यात आल्या. सगळ्या पावत्या टाकून झाल्यावर त्या मास्तराने हात घालून त्या उलटपालट करीत चांगल्या मिसळवल्या. त्यानंतर तिथल्याच एका तीन-चार वर्षांच्या छोट्या मुलीला वर बोलावून तिच्या हाताने एक नंबर काढण्यात आला. 

‘‘पहिला विद्यार्थी नंबर आठशे बारा.’’ 

टाळ्यांच्या प्रचंड गडगडाटाने तो काहीसा आश्चर्यचकित झाला. हे सगळं त्याच्यासाठी कुठल्या तमाशाच्या पलीकडलं नव्हतं. त्याच्या गावात तर खुद्द मास्तरच घरोघरी फिरत असायचे. इथं शाळेत प्रवेशासाठी इतकी मारामार आणि तिकडे तर कधीही जा. सहजच प्रवेश मिळायचा. 

पण ही राजधानीतली मॉडेल स्कूल होती. सगळ्यांच विषयांचं इंग्रजी माध्यमातून शिक्षण. अख्खं इंग्रजी वातावरण. त्याला प्रश्न पडला, समजा आपल्या बिट्टूला या शाळेत प्रवेश मिळाला तरी तो इतक्या दूरच्या शाळेत कसा येऊ शकेल? मुळातच तो हिंदी माध्यमाच्या शिक्षणाच्या बाजूचा होता. पण रीमा मात्र जिद्दीलाच पेटली होती. ‘‘आपल्या भागातली सगळीच मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकतात. मग आपणच का आपल्या बिट्टूला हिंदी मीडियममध्ये शिकवायचं? आपणही त्याला इंग्रजी मीडियममध्ये घालू. हिंदीमध्ये असं काय ठेवलं आहे?’’ 

‘‘आपण तर हिंदीमधूनच शिकलो ना?’’ त्याने उत्तर दिलं. 

‘‘म्हणूनच ना? असे कोणते मोठे साहेब झालात तुम्ही? साधे क्लर्कच तर राहिलेत ना? फुकटात शिकले तसे फुकटात काम केल्यासारखीच नोकरीही मिळाली. जेवढी साखर टाकाल तेवढी गोडी वाढते नं?’’ तिच्या त्या टोमण्यांनी त्याला आपली जागा दाखवून दिली. त्यावर पुढे काहीही न बोलता तो उठला आणि बिट्टूसाठी मॉडेल स्कूलचा फॉर्म भरून घरी परतला. आज त्याच संदर्भातली ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती. 

‘‘अरेऽ प्रशांतबाबूऽ...!’’ 

मागून आवाज आला तसं त्यानं वळून पाहिलं. त्याचे वरिष्ठ अधिकारी गुलाटीसाहेब आपल्या मुलाला घेऊन तिथे उभे होते. 

‘‘सर, तुम्ही? या ना सर, या बसा.’’ तो बसल्या जागेवर थोडंसा सरकला. तेवढ्या जागेवर गुलाटीसाहेब कसेबसे बसले. 

‘‘मुलाला नाही आणलं?’’ गुलाटीसाहेबांनी विचारलं. 

‘‘नाही सर. आज तशी मुलाला आणायची काही आवश्यकतासुद्धा नव्हती ना?’’ 

त्याच्या मनात आलं; सांगावं, इतक्या दुरून बसमध्ये धक्के खात मी इथवर आलो हे काय कमी झालं? 

‘‘फॉर्म नंबर किती आहे तुमचा?’’ 

‘‘सर सिक्स व्टंटी थ्री.’’ 

त्यानं नंबर सांगितला; पण नंतर तो आपल्याच इंग्रजीच्या उच्चारांवर काहीसा ओशाळला. व्यासपीठावरून एकेक नंबर उच्चारला जात होता. इतर माणसं टिपून घेत होते. प्रशांत आपल्याच गोष्टींमध्ये हरवून गेला होता; तथापि त्याला प्रिन्सिपॉलसाहेबांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. त्याने व्यासपीठाकडे एक दृष्टिक्षेप टाकला. मघाच्या त्या छोट्याशा बाहुलीसारख्या दिसणाऱ्या मुलीऐवजी आता त्या जागी एक आठ-दहा वर्षांचा मुलगा पावत्या काढत होता. दोन, अडीच तास उलटून गेले होते. बायांच्या चेहऱ्यांवर आता थकवा आणि निराशेचं सावट पसरलं होतं. तोंडावर पावडरचा लेप लावून सकाळी घरून निघलेल्या बायांच्या चेहऱ्यांवर डवरलेल्या घामामुळे मूळ पावडरच्या गंधाला एक वेगळाच दर्प जाणवत होता. उबगलेपणाचा दर्प. पुरुषांची व्यग्रता अस्वस्थतेत बदलली होती. एक दबलेली उबग. 

अशातच गर्दीतला एक टक्कल पडलेला माणूस उठून व्यासपीठावर येत, ड्रॉवाला डबा हलवत म्हणाला, 

‘‘प्रिन्सिपॉल साहेब, तुम्ही ते माझ्याकडे द्या. त्यातल्या पाच पावत्या मी काढतो. कुणास ठाऊक तुम्ही काय करता ते. दोनशेच्या आकड्यातला तर एकसुद्धा नंबर आला नाही.’’ 

...आणि मग त्याने तो डबा उचलून त्याला जोरात हलवला. त्यात हात घालून पावत्या काढल्या आणि त्या नंबरानुसार क्रमाने लावू लागला. 

‘‘हॅलोऽ’’ समोर बसलेली एक मॅडम आपल्या मुलाला जणू फरफटत, ओढत पुढे सरसावली; तसे सगळेच अवाक झाले.  

‘‘या मुलाला तिथून बाजूला करा. एका तासापासून तोच पावत्या काढतो आहे. तर! ये पिंटू. हा माझा मुलगा आता पुढच्या पावत्या काढील.’’ 

ते पाहून प्रिन्सिपॉल छद्मीपणे हसले. त्यांच्या हसण्यात एक वेगळाच छद्मी भाव होता. तो टक्कल पडलेला माणूस एकेक पावती फेकत होता आणि पिंटू आपल्या ममीच्या साह्याने त्या उचलत होता. हा प्रकार बराच वेळ सुरू होता. तरीही त्या दोघांचं समाधान झाला नाही की काय, म्हणून त्या टक्कल पडलेल्यानं तो अख्खा डबाच जोरात खाली आपटला. प्रिन्सिपॉलच्या चेहऱ्यावरील शिरा ताणल्यासारख्या झाल्या. पण दुसऱ्या क्षणी सगळं विरलं. ती मॅडमसद्धा पिंटूला घेऊन खाली उतरली. 

यादी तयार करणाऱ्यांनी जाहीर केलं- ‘‘एकशे चौतीस विद्यार्थ्यांचाच प्रवेश निश्चित झालेला आहे.’’ 

‘‘...आणि आता शेवटचा प्रवेश.’’ प्रिन्सिपॉलचा आवाज घुमला, ‘‘पावती क्रमांक टू फोर्टी फाइव्ह.’’ 

‘‘अरेऽ माझा नंबर लागलाऽऽ!’’ प्रशांतजवळ बसलेले गुलाटीसाहेब जणू उडी मारतच उठले आणि कुणाकडेही न पाहता मुलाला उचलून घेत तीरासारखे बाहेर पडले. 

ज्यांच्या मुलांचे नंबर लागले नाहीत त्या सगळ्यांचे चेहरे खर्रकन उतरले. बहुतेक बायांच्या डोळ्यांत आसवं उभी राहिलीत. मागे बसलेली एक बाई आपल्या मुलाला समजावीत होती, ‘‘हार्ड लक माय स्वीट बाबा.’’ आणि तो मुलगा आपल्या आईकडे काहीसा निरागसपणे पाहत होता. 

हॉलमध्ये आता गोंधळ माजला होता. सगळे आपापल्या जागेवरून उठून उभे राहिले. 

ज्यांचा नंबर लागला होता त्या आया आपापल्या मुलांना प्रेमानं कुरवाळत होत्या. एकमेकींचं अभिनंदन करीत होत्या. काही बाया तर एकमेकींना आलिंगन द्यायच्या प्रयत्नात होत्या; पण सार्वजनिक स्थळाची मर्यादा त्यांना मध्येच अवरोधत होती. ज्यांचा नंबर लागला नव्हता ते हताश आणि उदासपणे उभे होते. इथून जाण्याचीही इच्छा आता त्यांच्यात नव्हती. ते केवळ नि:शब्द, निश्चल होते. आणि ज्यांचा नंबर लागला होता ते सतत बोलत होते. 

प्रशांत शांत होता; मात्र त्याला तिळमात्रही दु:ख झालं नव्हतं. हे सगळं तो कृतक कौतुकानं पाहत होता. आपल्या मुलाला प्रवेश मिळाला नाही म्हणून त्याच्या मेंदूत दुःखाच्या जाणिवेनं मुळीच उचल खाल्ली नव्हती. एवढ्यात माईकवर आवाज आला. 

‘‘आता वेटिंग लिस्टची पाळी. सगळ्यांनी आपापल्या जागेवर बसावं. कृपया खाली बसा.’’ 

त्यावर फारसे कुणी खाली बसले नाही. ‘‘सिक्स ट्वेंटी थ्री.’’ माईकवर घोषणा झाली. 

प्रशांतला आश्चर्य वाटलं. बाजूलाच बसलेल्या भल्या गृहस्थानं सांगितलं, ‘‘तुमच्या मुलाचा नंबर लागला.’’ 

‘‘हो हो.’’ 

‘‘काँग्रॅच्युलेशन! वेटिंगमधला पहिलाच नंबर. तुमचं ॲडमिशन तर पक्कं आहे.’’ ‘‘कुणास ठाऊक?’’ पण प्रशांतला आनंद झाला नव्हता. काही न बोलता तो उठला आणि गर्दीतून स्वत:ला सांभाळत, वाट काढत तिथून बाहेर पडला. स्थानिक बस स्टॉपवर आला आणि बसची वाट पाहू लागला. 

‘‘यूसलेस स्साला कुठला! म्हणत होता, वेटिंगमधला पहिलाच नंबर. तुमचं ॲडमिशन तर पक्कं आहे. नाँसेन्स!’’ त्याच्या तोंडाची तर चवच गेली होती. 

त्याला दहा वर्षे आधीच्या त्या दिवसाची आठवण झाली. एका चांगल्या, मोठ्या कंपनीत नोकरीसाठी मुलाखत द्यायला तो गेला होता. त्याच्या आधीच्यानं त्याच्यापेक्षा लेखी परीक्षेत अधिक गुण मिळवले होते. काही वेळ बाहेर बसायला सांगितल्यावर निवड तज्ज्ञांची विशेष बैठक झाली. त्यानंतर त्याला पुन्हा आत बोलावलं गेलं. तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष गंभीरपणे बोलू लागले- ‘‘हे बघा मिस्टर प्रशांत, तुमची लेखी परीक्षा आणि प्रत्यक्ष मुलाखत दोन्ही अतिशय छान झाल्या. पण त्या तुमच्या आधीच्या उमेदवाराचा परफॉर्मन्स अधिक उजवा होता. तेव्हा त्याचा क्लेम आधी आहे. हांऽ तो ठरलेल्या तारखेवर जर कामावर रुजू झाला नाही तर त्या जागेवर तुमचा क्लेम चालेल.’’ दहा वर्षांपूर्वीच्या त्या आठवणीने प्रशांत पुन्हा अस्वस्थ झाला. 

‘‘ड्रॉ.... हँऽ.... काय अर्थ आहे या शब्दाला? एका संपूर्ण पिढीला नशिबाच्या स्वाधीन करण्याचं आधुनिक नाव या पलीकडे आणखी काय? ड्रॉ आणि वेटिंग कधीही न येणारा क्षण! एक कपटनीती! संपूर्ण समाजाप्रति आणि देशाप्रति.’’ त्याला एक जाणीव झाली- येणाऱ्या पिढीला या व्यवस्थेनं वेटिंग लिस्टच्या स्वाधीन करून ठेवलं आहे आणि त्यांच्यासोबतच त्याचा मुलगासुद्धा या व्यवस्थेचाच एक बळी ठरलेला आहे. 

अनुवाद : रवींद्र शोभणे

Tags: रवींद्र शोभणे अनुवादित कथा हिंदी वाङ्मय माधव कौशिक अनुवाद कथा हिंदी साहित्य weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

माधव कौशिक
k.madhav9@gmail.com

हिंदी साहित्यिक, साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके