डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आचार्यांनी अध्यात्माला एक नवे परिमाण प्राप्त करून दिले. अहिंसक समाजवादी क्रांतीने मार्क्सच्या जडवादी भौतिक वादावरील भर कमी करून आपल्या सर्व राजकीय व सामाजिक चळवळींना नैतिक आणि आध्यात्मिक मूल्यांची जोड दिली पाहिजे हा त्यांचा संदेश राजकारणात उदात्त मूल्यांचा अधःपात होत असलेला प्रत्यही प्रत्ययास येत असताना तर विशेषच मोलाचा वाटतो.

---

‘आधुनिक भारतात लोकशाही यशस्वी होण्यासाठी मी राजकारण करीन, पण मी सत्ता स्वीकारणार नाही. राजकारणाच्या शुद्धीसाठी व अन्याय निवारण्यासाठी मी विशुद्ध व निरिच्छ बुद्धीने सत्याग्रही मार्गाचा जरूर पडल्यास अवलंब करीन, त्यासाठी लोकसंग्रह करीन, आंदोलन करीन पण, त्याला हिंसेचा अगर सत्ताभिलाषेचा स्पर्श होऊ देणार नाही, अशा बुद्धीने विधायक व विग्रहात्मक कार्य करणारा एक यतिवर्ग तयार व्हावयास हवा.’

आचार्य जावडेकर

भारत स्वतंत्र होण्यासाठी हिंदी जनतेने जो प्रदीर्घ आणि प्रखर लढा दिला त्याच्या स्मृती आजच्या पिढीच्या मनातून हळूहळू लोक पाहू लागल्या आहेत. शे-दीडशे वर्षे चाललेला हा स्वातंत्र्य लढा कोणकोणत्या अवस्थेतून गेला, त्याचे वैचारिक अधिष्ठान कोणते होते आणि ज्या राष्ट्रवादावर हा लढा आधारला गेला होता त्यात कोण कोणते प्रवाह समाविष्ट झाले होते, त्याचे प्रणेते कोण होते, हा सर्व तपशील फार करून अलीकडच्या पिढीला माहीत नसतो. काही सशस्त्र क्रांतिकारकांची नावे सोडली तर भारतीय स्वातंत्र्याचे उद्गाते लोकमान्य टिळक, या लढ्यात निःशस्त्र प्रतिकाराचा म्हणजेच सत्याग्रहाच्या ‘हत्यारा’ची अभिनव भर घालणारे महात्मा गांधी, भारताबाहेर जाऊन स्वातंत्र्याचा लढा पुढे रेटण्यासाठी आझाद हिंद फौजेची स्थापना करून भारताच्या सरहद्दीत इंफाळपर्यंत धडक मारणारे देशगौरव सुभाष चंद्र बोस किंवा स्वातंत्र्यलढ्याच्या अखेरच्या पर्वातील ऑगस्ट क्रांतीचे नेतृत्व करणारे लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या लोकाग्रणींची थोडीफार माहिती यांच्या कानावरुन गेलेली असते.

विस्मृतीच्या पडद्याआड जाऊ लागलेल्या महाराष्ट्रातील अशा थोर विचारवंतांत कै. आचार्य शं. द जावडेकर यांचे स्थान फार वरचे आहे. ते हस्तिदंती मनोऱ्यात बसून नुसतेच ‘युक्तीच्या चार गोष्टी’ सांगणारे विचारवंत नव्हते; तर प्रकृतीची अजिबात साथ नसतानाही स्वातंत्र्यलढ्यात प्रत्यक्ष देहदंड सोसलेले कृतीवीर होते. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूर या गावी 26 सप्टेंबर 1894 साली जन्मलेल्या या थोर पुरुषाच्या जन्मशताब्दीच्या या वर्षात मराठी वाचकांना त्यांच्या विचारांची नव्याने ओळख करून देणे निश्चितच उपयुक्त ठरेल.

लोकमान्य टिळकांचे देहावसान झाले त्याच दिवशी महात्मा गांधींनी नि:शस्त्र प्रतिकाराच्या मार्गाने ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढ्याचे रणशिंग फुंकले होते. लोकमान्य टिळकांनी आपल्या हयातीतच चतुःसूत्री कार्यक्रमाचा पुरस्कार केला होता आणि महात्मा गांधींनी हाच कार्यक्रम विकसित स्वरूपात आपल्या अहिंसक लढ्यात समाविष्ट केला होता. परंतु गांधीजींचा अहिंसेवरील भर महाराष्ट्रातील तथाकथित टिळक पंथियांना मान्य नव्हता आणि काँग्रेसचे नेतृत्व टिळकांच्या नंतर गांधीजींकडे जावे यांचे त्यांना मोठे वैषम्य वाटू लागले होते. महाराष्ट्रातील त्या वेळची काँग्रेस कमिटी त्यांच्या हाती होती आणि तिची कचेरीही केसरीवाड्यातच होती.

महात्मा गांधींचे राजकारण जनतेत व विशेषतः तरुण वर्गात लोकप्रिय करावयाचे तर टिळक पंथीयांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस कमिटी त्यांच्या हातून गांधींचे नेतृत्व मानणाऱ्यांच्या हाती आणणे आवश्यक होते. याकामी महाराष्ट्राला हलवून सोडण्याचे महत्त्वाचे कार्य संघटनेच्या पातळीवर कै. देव - दास्ताने या जोडगोळीने केले तर वैचारिक पातळीवर मुख्यतः आचार्य जावडेकर यांनी केले. आचार्य जावडेकर आणि काही प्रमाणात आचार्य ज. स. भागवत यांनी देव - दास्ताने यांच्या घटनात्मक कार्याला तात्विक अधिष्ठान मिळवून देऊन महाराष्ट्रातील सुशिक्षित वर्गात गांधी विचाराला प्रतिष्ठा आणि मान्यता मिळवून देण्याची महान कामगिरी आपल्या लिखाणाने बजावली आणि तेव्हापासून महाराष्ट्रातील अग्रगण्य विचारवंतांत त्यांची गणना होऊ लागली.

आचार्य जावडेकर यांचे संपूर्ण नाव शंकर दत्तात्रय जावडेकर. त्यांचे मूळचे घराणे इंदापूरचे. त्यांच्या वडिलांची म्हणजे रावसाहेबांची सारी हयात संस्थानी राजकारणात गेली. रावसाहेब अध्यात्मप्रवण होते व लो. टिळक, न्या. रानडे, नामदार गोखले वगैरे त्या वेळच्या थोर राष्ट्रवादी नेत्यांशी त्यांचा निकट परिचय होता. आचार्यांचे मामा श्री. सुपेकर राष्ट्रीय वृत्तीचे व चिंतनशील स्वभावाचे होते. भारत सेवक समाजाचे श्री. वझे, व श्री. एस. शिंदे वगैरे लोक हे आचार्यांच्या मित्र परिवारापैकी होते व त्यांच्या चर्चाही जावडेकरांच्या घरात होत. याचा परिणाम असा झाला की सहाजिकच आचार्य राष्ट्रीय विचारसरणीकडे झुकू लागले व आपणही देश कार्याला वाहून घेतले पाहिजे असा त्यांच्या मनाचा कल होऊ लागला.

टिळकांच्या निधनानंतरचा राजकीय बदल

एका बाजूला लोकमान्य टिळकांचा सामाजिक बाबतीत काहीसा प्रतिगामी, जनतेच्या हाडीमाशी खेळून राहिलेल्या परंपरावादी, अंधश्रद्ध विचारांना चुचकारून घेणारा परंतु राजकीय बाबतीत मात्र परकिय सत्तेवर सतत तुटून पडणारा आणि इंग्रजी राजवटीविरुद्ध जनतेच्या मनात प्रक्षोभ निर्माण करण्याची एकही संधी वाया जाऊ न देणारा ज्वलज्जहाल राष्ट्रवाद तर दुसऱ्या बाजूला ना. गोखले यांचे नेमस्त आणि उच्च नीतिमूल्यांची चाड बाळगणारे व इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर विश्वास ठेवणारे सुधारणावादी त्याच बरोबर प्रखर बुद्धिवादाची जळती मशाल हाती घेऊन समाजातील जुनाट विचारांच्या जळमटांना चूड लावण्यास निघालेला अंधश्रद्धा, गतानुगतिकता आणि कालबाह्य ठरलेल्या प्राचीन परंपरांचा वृथा अभिमान बाळगून त्यांना कवटाळून बसणाऱ्या प्रतिगामी लब्ध प्रतिष्ठीतांवर टीकेचे आसूड ओढून त्यांचा दंभस्फोट करणारा आगरकरांचा कृतिशील सुधारणावाद यांच्यामुळे महाराष्ट्रातील समाज जीवनात दोन तट पडले आणि नेमक्या याच वेळी आचार्य जावडेकर सार्वजनिक कार्यात भाग घेऊ लागले व मुख्य म्हणजे आपल्या लिखाणाने महाराष्ट्रातील सुशिक्षितांना नवविचारांचे खाद्य पुरवू लागले.

आपापल्या नेत्याच्या विचारसरणीतील ग्राह्याग्राह्यतेचा विचार करण्याऐवजी त्यांना एककल्ली निष्ठा वाहण्यातच बहुतेकजण कृतकृत्यता मानीत होते. 1920 साली टिळकांचे देहावसान झाले. त्या वेळी भारतीय राजकारणाची म्हणजे काँग्रेसची सूत्रे महात्मा गांधींच्या हाती गेली होती. तोपर्यंतच्या राजकारणापेक्षा गांधीजींच्या राजकारणाचा ढाचा निराळा होता लोकमान्यांच्या लोकानुनया ऐवजी सामाजिक बाबतीत अप्रिय असले तरी सत्य परखडपणे सांगण्याची महात्मा गांधींची शिकवणूक होती. त्यांचा सत्य, अहिंसेवरील भर आणि राजकारणाला धर्माचे आणि अध्यात्माचे अधिष्ठान मिळवून देण्याचा आग्रह त्यावेळी हिंदी राजकारणाला अगदीच अनोळखा होता. त्यामुळे टिळक पंथीय हे ना. गोखले आणि आगरकर यांच्या प्रमाणेच महात्मा गांधींचेही कट्टर विरोधक बनले.

समन्वयवादी आणि मूल्याधिष्ठित लिखाण

कै. जावडेकर यांची दृष्टी टिळक आणि गांधी यांच्या विचारांकडे चिकित्सक दृष्टीने पाहण्याची होती. जावडेकर हे अनेक टिळकपंथीयांप्रमाणे टिळकांचे किंवा गांधीवाद्यांप्रमाणे गांधींचेही अंधभक्त नव्हते. कै.  जावडेकरांनी यापैकी कोणत्याच गटाचा गंडा बांधलेला नव्हता. मात्र या दोन गटांच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या प्रवृत्तींचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता आणि त्यातील ग्रह्याग्राह्य भाग निर्भयपणे जनतेसमोर मांडला होता. त्यातूनच पुढे त्यांचे समन्वयवादी सिद्धांत विकसित होत गेले. आचार्य जावडेकर यांनी स्वतःच एके ठिकाणी लिहून ठेवल्याप्रमाणे आगरकर, टिळक आणि गांधी या तिघांनाही ते गुरुस्थानी मानीत. त्यांत पुढे मार्क्सचाही समावेश झाला. या सर्व द्रष्ट्या नेत्यांचे विचार त्यात कोठल्याही प्रकारचे किल्मिष येऊ न देता त्यांच्या मते देशाला व समाजाला उपयुक्त व अनुकरणीय असलेला भाग त्यांनी साक्षेपाने जनतेसमोर मांडण्यास सुरुवात केली. त्यामुळे अल्पावकाशात महाराष्ट्रातील बुद्धीवादी त्यांच्या लिखाणाकडे आकर्षित झाले व जावडेकर हे त्यांच्या आदराचे निधान बनले.

जावडेकरांचे सारे जीवन म्हणजे ‘बोले तैसा चाले’चा मुर्तीमंत आदर्श होता. आजच्या अनेक नेत्यांत आढळणाऱ्या ‘कथनी आणि करणी’तील विसंगतीचा त्यांच्या वागणुकीत लवलेशही नव्हता. आपल्या जीवनात ते नैतिक मूल्यांना फार महत्त्व देत असत. साध्य, साधन आणि विवेकावरही त्यांचा भर होता. उच्च आणि उदात्त साध्यासाठी साधने ही तशीच उदात्त व उच्च वापरली गेली पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता. म्हणूनच साध्या साठी हीन साधनांचा अवलंब करण्यास हरकत नाही, ही कम्युनिस्टांची नीती त्यांना साफ अमान्य होती. याची परिणती म्हणूनच मार्क्सवादातील भौतिक जडवादाचा स्वीकार केल्यानंतरही आचार्यांनी अध्यात्मिक बल व अध्यात्मिक सामर्थ्य यांविषयीची आपली मते कधीच सोडली नाहीत व त्या प्रश्नांवर त्यांनी कम्युनिस्टांशीही दोन हात करण्यास कमी केले नाही.

“बोले तैसा चाले” चा मूर्तिमंत आदर्श

आचार्यांनी जितका जीवन मूल्ये म्हणून मी स्वीकारली त्याविरुद्ध त्यांनी कधीही आचरण केले नाही. आपली साधी राहणी त्यांनी कधी सोडली नाही. त्याचप्रमाणे स्त्रियांना समान हक्क असले पाहिजेत व स्त्री-पुरुषांत विषमता असता कामा नये असे प्रतिपादन करणारे आचार्य घरात केर काढणे, कपडे धुणे, घर सारवणे यांसारखी केवळ स्त्रियांची समजली जाणारी कामे नि:संकोच पणे करीत असत व आपल्या मुलांनाही त्यांनी तसेच वळण लावले होते. याबाबत आणखी एक उदाहरण देण्यासारखे आहे. त्यावेळच्या मुंबई सरकारने कुळ कायदा पास केल्यानंतर आपल्या मालकीच्या शेत जमिनी कुळाकडे जाऊ नयेत म्हणून लटपटी खटपटी न करता त्यांनी स्वेच्छेने त्या आपल्या कुळांच्या स्वाधीन करून टाकल्या. मोहाच्या क्षणीही जावडेकरांचा विवेक कधी सुटला नाही किंवा कसोटीच्या प्रसंगीही ते कधीही डळमळले नाहीत. यामुळेच त्यांना ऋषीतुल्य म्हणून संबोधले जाते. या संबंधीची त्यांच्या जीवनातील काही उदाहरणे येथे उद्धृत करण्यासारखी आहेत.

कोल्हापूरच्या कोरगांवकर ट्रस्ट तर्फे महाराष्ट्रातील काही कार्यकर्त्यांना ते कोणत्या पक्षाचे आहेत हे न पाहता मासिक मानधन दिले जात असे. शंकरराव देव, आचार्य भागवत, एसेम जोशी यांच्याप्रमाणे आचार्य जावडेकरांना मानधन द्यावे असे त्या ट्रस्टने ठरविले. प्रथम तर आचार्य मानधन घेण्यासच तयार नव्हते. परंतु पुढे दीडशे रुपयांऐवजी 75 रुपये स्वीकारण्यास त्यांनी मान्यता दिली आणि काही दिवसानंतर त्यांच्या पत्नीला नोकरी लागल्यावर ते पंच्याहत्तर रुपयांचे मानधन हे त्यांनी साभार नाकारले.

गांधी हत्येनंतर जनतेचा प्रक्षोभ उसळला की गांधींची हत्या एका ब्राम्हणाने केली आहे हे समजल्याबरोबर लोक ब्राम्हणांची घरे जाळीत सुटले. इस्लामपूरमध्येही असा एक प्रचंड मोर्चा आचार्यांच्या घरावर चालून आला. त्या वेळी हिंदू महासभेचे कार्यकर्ते आचार्यांच्या घरी आश्रयाला आले होते. जावडेकरांनी मोर्चातील लोकांना त्यांच्या अंगाला हातही लावू न देता मोर्चेवाल्यांना परतवून लावले. त्यातही गंमत अशी की ते रेशनचे दिवस असल्यामुळे साखरेचा तुटवडा असे आणि आचार्यांच्या घरात रेशन व्यतिरिक्त काळ्या बाजारातील साखर आणली जात नसे. त्याच सुमारास जयप्रकाश आचार्यांना भेटावयास आले होते. घरात तर साखरेचा ठणठणाट! म्हणून आचार्यांच्या पत्नी वाटीभर साखर उसनी मागायला याच गृहस्थांच्या घरी गेल्या होत्या आणि ती देण्याचे या महाभागाने साफ नाकारले होते! पण आचार्यांनी मात्र त्याला अभय देऊन जीवदान दिले.

आचार्यांच्या शेवटच्या आजारात त्यांची प्रकृती विशेष बिघडली असल्याचे ओळखून त्यांच्या डॉक्टर मुलाने पुण्या-मुंबईच्या डॉक्टरांना प्रकृती दाखवू असे सुचविले परंतु आपल्यासारख्या आर्थिक परिस्थितीतील नागरिकाला जेवढे वैद्यकीय मदत मिळते तेवढे मला मिळत आहे. मी याहून अधिक मदत घेणे बरोबर होणार नाही, असे आपल्या मुलाला आणि पत्नीला त्यांनी सांगितले होते.

तत्वाच्या बाबतीत आचार्य कोणाशीही तडजोड करीत नसत व कोणाच्या रागा लोभाची पर्वा न करता आपली मते ते निर्भीडपणे व्यक्त करीत असत. या वृत्तीमुळेच त्यांनी ज्यांना गांधीयुगाचे महाराष्ट्रातील प्रवर्तक मानले त्यांच्यावर ही टीका करण्यास कमी केले नाही. राष्ट्र सेवा दलाने स्वतंत्र अस्तित्वाचा आग्रह न धरता काँग्रेस संघटनेत दुय्यम स्थान पत्करून राहावे अशी जी भूमिका शंकरराव देवांनी घेतली होती, तिला आचार्यांनी प्रखर विरोध केला आणि भाऊसाहेब रानडे, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे व रावसाहेब पटवर्धन यांच्याप्रमाणेच राष्ट्र सेवा दलाने काँग्रेसबरोबरच आपला संबंध तोडून टाकून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व टिकवावे, अशी तात्विक भूमिका घेतली, इतकेच नव्हे तर दलाच्या विश्वस्त मंडळावर राहून महाराष्ट्रातील तरुणांची मने घडविण्याचे कार्य ते शेवटपर्यंत करत राहिले.

काँग्रेसचा त्याग व लोकशाही समाजवादाचे धडे

नेहरू व जयप्रकाश नारायण यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली स्वतंत्र भारत लोकशाही समाजवादाच्या रोखाने झपाट्याने प्रगती करू शकेल असा आचार्यांचा सुरुवातीला विश्वास होता व त्यादृष्टीने काँग्रेसचे नेतृत्व हळूहळू समाजवादी युवकांकडे गेले पाहिजे, असे ते प्रतिपादन करीत असत. परंतु याबाबतीत नेहरुंच्या संबंधित यांचा भ्रमनिरास होत गेला. पुढे काँग्रेसने आपल्या घटनेत बदल करून काँग्रेस अंतर्गत पक्ष म्हणून काँग्रेस मध्ये राहण्याची दरवाजेच काँग्रेस समाजवादी पक्षाला बंद करून टाकले. या गोष्टीचा आचार्यांना मोठा खेद झाला. त्याच प्रमाणे महात्मा गांधींनी आपल्या अखेरच्या पत्रात काँग्रेस विसर्जित करून तिचे लोकसेवक संघात रूपांतर करण्याचा दिलेला सल्ला नेहरू पटेलांनी मांनला नाही. त्यावेळी आचार्यांनी काँग्रेसबरोबरच आपली कित्तेक वर्षांची ऋणानुबंध संपुष्टात आणून काँग्रेसचा राजीनामा दिला व त्या मागची आपली भूमिका स्पष्ट करणारा मी कॉंग्रेस का सोडली असा लेखही प्रसिद्ध केला.

लोकशाही समाजवादी विचाराने भारलेले व त्या ध्येयासाठी सतत झटत असलेले महाराष्ट्रातील नेतृत्व आचार्य जावडेकरांच्या विचारांवर पोसले गेलेले आहे. आचार्य जावडेकर हे महात्मा गांधींच्या सत्य अहिंसेचे पुरस्कर्ते असले तरी ‘करेंगे या मरेंगे’ असा संदेश देऊन प्रत्येक हिंदवासियाला आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत, असे समजून वागण्याचा महात्मा गांधींनी आदेश दिला, त्यावेळी आचार्यांनी भूमिगत चळवळीला सक्रिय पाठिंबा दिला व भूमिगत राहून चळवळीचे नेतृत्व करणाऱ्यांच्या पाठीशी नैतिक बळ उभे केले. मात्र असे करताना त्या चळवळीत शिरलेल्या काही अपप्रवृत्तींचा त्यांनी तितक्याच परखडपणे निषेधही केला.

निर्भीड पत्रकार आणि साहित्यिक

पत्रकार आणि साहित्यिक म्हणूनही आचार्यांची कामगिरी फार मोठी आहे. टिळक - आगरकरांच्या नंतर महाराष्ट्रातील वृत्तपत्रांच्या इतिहासात नवविचारांचा झुंजार राष्ट्रवादी पत्रकार म्हणून सार्थपणे त्यांचा उल्लेख करावा लागेल. पत्रकारिता हा केवळ पोट भरण्याचा एक व्यवसाय नसून त्यामागे ध्येयवादाची प्रेरणा आहे व स्वार्थत्यागपूर्वक देशाची व समाजाची सेवा करण्याचे ते असिधारा व्रत आहे असे टिळक-आगरकरांप्रमाणे आचार्य मानीत असत. स्वराज्य, लोकशिक्षण, नवशक्ती, चित्रमय जगत, लोकमान्य, नवभारत, लोकशक्ती आणि साधना अशा विविध नियतकालिकातून ते सातत्याने झुंजत राहिले. आपल्या तर्कशुद्ध विवेचनाने गांधीवादाचे शास्त्रीय स्वरूप महाराष्ट्रातील बुद्धीवाद्यांस ज्या प्रमाणे त्यांनी पटवून दिले त्याच प्रमाणे मार्क्सवादा संबंधीच्या भ्रामक कल्पना, त्यातील त्रुटी आणि त्याला लागलेले विकृत वळण यावरही त्यांनी या नियतकालिकातून लिहिलेल्या लेखमाला यांच्या द्वारा झगझगीत प्रकाश टाकला.

पत्रकारिता करीत असताना 1935 आली महाराष्ट्र काँग्रेसचे मुखपत्र म्हणून ‘लोकशक्ती’ या नावाचे दैनिक सुरू करावयाचे ठरविले, त्या वेळी अर्थातच संपादक म्हणून जावडेकर यांचेच नाव पुढे आले. त्या वेळी जावडेकर ‘नवशक्ति’ सोडून ‘लोकशक्ती’ दाखल झाले. 1937साली लोकशक्तीतील व्यवस्थापनात बदल झाल्यानंतर एका लेखाबद्दल मतभेद झाल्याने आपल्या लेखाला मुरड घालण्याऐवजी त्यांनी आपल्या संपादकपदाचा राजीनामा दिला.

त्यानंतर मध्यंतरी काही वर्षे कोल्हापूरहून निघणाऱ्या ‘अखंड भारत’ या साप्ताहिकाच्या संपादक मंडळावर जावडेकर होते. तसेच इस्लामपूरहून प्रसिद्ध होणाऱ्या ‘गावराज्य’ साप्ताहिकाच्या सल्लागार मंडळातही होते. या साप्ताहिकात 1944-45 च्या काळात ‘चावडीवरच्या गप्पा’ नावाचे सदर तेच लिहीत. महाराष्ट्रात राष्ट्रीय विचारांचा सार्वत्रिक प्रसार व्हावा म्हणून ‘सुलभ राष्ट्रीय ग्रंथमाला’ स्थापन करण्यात आली. या मालेतर्फे प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकांची निवड व त्यांचे संपादन करण्याची जबाबदारी आचार्य जावडेकर व आचार्य भागवत या दोघांवर होती. शंकरराव देवांनी सुरू केलेल्या ‘नवभारत’ मासिकाचे संपादकही हे दोघेच होते. साने गुरुजींनी मुंबईहून ‘साधना’ साप्ताहिक सुरु केल्यानंतर जावडेकरांचे लेख, प्रवचने, भाषणे यांचे वृत्तांत ते आवर्जून साधनेतून प्रसिद्ध करत. एवढेच नव्हे तर जावडेकरांचा लेखच अग्रलेख म्हणून छापत असत. मासिके, साप्ताहिके, वृत्तपत्रांतून स्फुट लेखन करीत असताना आचार्यांची लहान-मोठी अशी वीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद

मराठी साहित्यातील सर्वोच्च बहुमान म्हणजे साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद जावडेकर यांना दोनदा प्राप्त झाले. 1941 साली हे मुंबईचे उपनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आणि नंतर 1949 साली त्यांची पुणे येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. जावडेकर यांची विद्वत्ता, त्यांचा गाढ व्यासंग आणि विपुल लेखन याबद्दल कोणाचे दुमत नसले तरी ते ‘ललित’ साहित्यिक नाहीत आणि म्हणून मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्यास ते पात्र नाहीत, असा वितंडवाद पुण्यातील काही तथाकथित साहित्य पुंगवांनी उपस्थित केला होता व काही काळ तो बराच रंगलाही. परंतु वा. म. जोशी, प्रा न. र. फाटक, प्रभाकर पाध्ये, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, ना. ग. गोरे अशा प्रतिथयश साहित्यिकांनी त्या वादाचा उत्त पक्ष घेऊन आचार्य जावडेकर हे साहित्यिक कसे ठरतात व संमेलनाचे अध्यक्ष पदावर त्यांची प्रतिष्ठापना केल्याने मराठी साहित्याचा व साहित्यिकांचा कसा गौरव होणार आहे हे सप्रमाण सिद्ध करून विरोधकांना निरुत्तर केले. ‘कलेसाठी कला’ की ‘जीवनासाठी कला’ या एकेकाळी महाराष्ट्रात गाजलेल्या साहित्यिक वादातही आचार्य जावडेकर यांनी आपल्या तर्कशुद्ध मांडणीने ‘कलेसाठी कला’ वाल्यांना नामोहरम करून टाकले होते. 

आचार्य जावडेकरांची कामगिरी विविध अर्थाने महान आहे. त्यांनी आपल्या तर्कशुद्ध बुद्धीवादी लेखनाने महाराष्ट्रात गांधींचे नेतृत्व प्रस्थापित केले. प्रतिगामी विचारसरणीच्या तथाकथित टिळक पंथीयांच्या हातून काँग्रेस संघटना सोडवून आणली. त्याचप्रमाणे पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रुपाने जातीयवादी हुकुमशाहीचा भस्मासुर डोके वर काढू लागला असताना आचार्य जावडेकरांनी आपल्या बौद्धिकांनी महाराष्ट्रातील तरुण पिढीला त्यापासून परावृत्त केले. गांधीवादाबरोबरच समाजवादाचा, विशेषत: लोकशाही समाजवादी विचारसरणीचाही तरुण पिढीला परिचय करून दिला. गांधीवाद व मार्क्सवाद यांचा समन्वय साधून भारत अहिंसक मार्गाने लोकशाही समाजवादाची स्थापना करू शकेल असा विश्वास त्यांनी निर्माण केला. आपल्या विपुल आणि विचारपरिलुप्त व भारदस्त लिखाणाने त्यांनी महाराष्ट्राची एक पिढी घडविली. समाजवादी शिलाच्या हजारो सेवा दल सैनिकांच्या जीवनात नवा आशय, नवे आकांक्षा व कर्तव्याची नवी क्षितिजे त्यांनी निर्माण केली.

सत्याग्रही समाजवाद - आचार्यांचे राज्यशास्त्राला देणगी

सत्याग्रही समाजवादाचा त्यांनी प्रस्तुत केलेला सिद्धांतही राज्यशास्त्रात घातली गेलेली मोलाची भर आहे. त्याचप्रमाणे त्यांनी मांडलेले यतिधर्माची अभिनव कल्पना म्हणजे लोकशाही राजवटीत सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवू शकेला असा आचार्यांनी दाखवून दिलेला अमोल मार्ग होय. महात्मा गांधींनी काँग्रेस बरखास्त करून लोकसेवक संघात तिचे रूपांतर करण्याचा जो सल्ला आपल्या अखेरच्या पत्रात देऊन ठेवला होता तो आचार्यांच्या यतिधर्माच्या कल्पनेशी सुसंगत असाच होता. आचार्यांनी राजधर्म, प्रजाधर्म यातिधर्म यांचे सूक्ष्म विवेचन करून गांधींच्या मनोगताला शास्त्रीय अधिष्ठान मिळवून दिले. लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी आणीबाणीच्या संदर्भात जी भूमिका घेतली व इंदिरा गांधींना जी पत्रे लिहिली ती आचार्यांच्या यतिधर्माचा पाठपुरावा करणारी होती.

आचार्य विनोबांनी भूदान आंदोलन सुरू केल्यानंतर आणि विशेषतः जयप्रकाश यांनी भूदान कार्यासाठी आपले जीवनदान जाहीर केल्यानंतर जावडेकर फार प्रभावित झाले होते. भूदान आंदोलन आता अहिंसक सामाजिक क्रांती घडवून आणण्याची सुप्तशक्ती आहे व या क्रांतीत लोकशाही समाजवादी नेते बिनी वर असतील असा विश्वासही ते व्यक्त करीत. परंतु भूदान आंदोलनात मागाहून ज्या अपप्रवृत्ती शिरल्या त्यामुळे भूदान आंदोलनाविषयी आचार्यांनी बांधलेले आडाखे खरे ठरले नाहीत हे कबूल करावयास हवे.

आचार्यांनी अध्यात्माला एक नवे परिमाण प्राप्त करून दिले. अहिंसक समाजवादी क्रांतीने मार्क्सच्या जडवादी भौतिक वादावरील भर कमी करून आपल्या सर्व राजकीय व सामाजिक चळवळींना नैतिक आणि अध्यात्मिक मूल्यांची जोड दिली पाहिजे हा त्यांचा संदेश राजकारणात उदात्त मूल्यांचा आध:पात होत असलेला प्रत्यही प्रत्ययास येत असताना तर विशेषच मोलाचा वाटतो. म्हणून आचार्यांच्या विचारसरणीवर साचलेली राख झटकून टाकून त्या विचारसरणीतील धगधगीत अंगार नव्या पिढीच्या प्रत्ययास आणून देण्याचे कार्य थोड्या फार अंशाने तरी त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने तडीस गेले तर ती त्यांच्या जन्मशताब्दीची खरी खरी फलश्रुती ठरेल.

Tags: मलकापूर महाराष्ट्र मार्क्सवाद समाजवाद स्वातंत्र्य ना. गोखले न्या. रानडे लो. टिळक आचार्य जावडेकर Congres Mahatma Gandhi Malakapur Maharashtra Marxism Socialism Independece Na. Gokhale Just. Ranade Lokamany Tilak Acharya Javadekar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके