डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

'श्यामची आई' चित्रपटाने मला काय दिलं? कलाकृतीचे असे थेट संस्कार कोणावर होत असते, तर काय पाहिजे होतं? गुरुजी गेले तेव्हा मी अकरा वर्षांचा होतो. संस्कार म्हणजे काय, हे तरी कुठं माहीत होतं तेव्हा? आणि संस्कार असे ठरवून होतात?... 'श्यामची आई' या अजरामर सिनेमात श्यामची भूमिका करणाच्या माधव वझे यांचे आत्मनिवेदन

पुण्यामध्ये शनिवारवाड्यासमोर आमचं एकत्र कुटुंब, आजही आहे. पण पन्नास-बावन्न साली होता, तसा पंधरावीस जणांचा राबता आता मात्र नाही. पांगापांग झाली आहे. वडीलमाणसं अंतराअंतरानं त्यांचं निधन झालं... पन्नास-बावन्नमधलं वातावरण वेगळं होतं. वडील पहाटेपहाटे उठून बंबात गरम पाणी तापवायला लागायचे आणि एकीकडे आम्हांला झोपेतून उठविण्यासाठी श्लोक, अभंग, कविता, ओव्या मोठमोठ्यानं म्हणत राहायचे, तोच आमच्यापुरती भूपाळी असायची. शिवाय शनिवारवाड्यामध्ये नगारा निनादत असे आणि सनईचे सूरही पहाटे हलक्याशा झुळुकांबरोबर कानांवर येत असायचे. स्नानसंध्या तर होतीच. वडील वैश्वदेवही करीत असायचे. सकाळी अकरा वाजता शाळेला जाताना सगळ्या सख्ख्या-चुलत बहीण-भावंडांची पंगत एकदमच बसायची. त्या वेळी आधी गीतेचा अध्याय म्हटला जायचा. वडील एकएक ओळ सांगायचे आम्ही आपापल्या पुस्तकात पाहून म्हणायचो. गीतापाठासाठी प्रत्येकाला एकेक स्वतंत्र पुस्तक आणून दिलं होत.

वडील आमच्याच नू.म.वि. इंग्रजी शाळेत इंग्रजी, संस्कृत शिकवायचे. त्यांचं खूप नाव झालं होतं. एव्हाना रात्रीच्या जेवणाच्या वेळी दुसराच प्रकार.  सकाळसारखीच एकत्र पंगत, जेवणं सुरू झाली की एकेकाला पाटावर उभं राहून काही ना काही म्हणून दाखवावं लागत असे. ओवी, अभंग, श्लोक, सिनेमातलं गाणंसुद्धा चालेल! कधी काही एकदम आठवलं नाही नवीन, तर जून पूर्वी म्हटलेलं पुन्हा म्हणायला परवानगी होती. पण काहीतरी म्हटलं हे पाहिजेच… वडील आमचे उच्चार शुद्ध होतील हे पाहायचे. छान तालासुरात कविता कशी म्हणावी ते दाखवीतही कित्येकदा... मग केव्हातरी इंग्रजी शब्दांचं स्पेलिंग सांगायचा खेळ जेवताना सुरू होत असे. कधी वर्तमानपत्रात आलेल्या बातमीबद्दल चर्चा सुरू होई. रात्रीची जेवणं तासतास चालायची. पाटावरच हात कोरडे होऊन जायचे... हो, पानात काही टाकायचं नाही असा दंडक होता; तसं जमिनीवर सांडायचं पण नाही! 

पुढे आचार्य अत्र्यांनी लिहिलं ते अगदी खरं होतं. साने गुरुजी लहानपणी ज्या वातावरणात वाढले, त्या वातावरणात माधव वझे वाढला असल्यामुळे पाण्यातील एखाद्या माशाप्रमाणं तो सहज चित्रपटात वावरत होता... असं काहीसं त्यांनी म्हटलं. आणखी एक. शनिवारवाड्यासमोरच्या पटांगणात सभा होत असत, त्याचबरोबर सापाच्या टोपल्या घेऊन येणारे नेहमी यायचे. ते खेळ शाळेत जाता येता पाहणं हे नेहमीच ठरलेलं होतं. मग घरी येऊन , धाकट्या भावाला घेऊन ते खेळ आम्ही करत असू. वडिलांना आणि त्यांच्यापेक्षाही काकांना त्याचं खूप कौतुक वाटायचं. पाहुण्यांच्या बैठकीत आम्हांला बोलावून ते खेळ करायला सांगायचे आणि वर बक्षीसपण द्यायचे. काकांनीच बक्षीस दिल्यामुळे पाहुण्यांनाही ते द्यावंच लागत असे... खूप पैसे जमले त्या वेळी. आपण काही करून दाखवलं की पैसे मिळतात हे लक्षात आलं.(तसं लवकरच!)... पुढेपुढे तर पाहुणे आले की मी आपण होऊन त्यांना विचारायचो, ‘‘तुम्हांला आमचा खेळ पाहायचाय?" त्या वेळी किती पैसे मिळाले ते आठवत नाही. एक मात्र नक्की, मला लोकांसमोर धीटपणाने उभे राहता येऊ लागलं. शाळेत वक्तृत्व स्पर्धांसाठी माझी निवड ठरलेली असायची आणि नाटक तरी काय? नाट्यछटाकार दिवाकरांच्या नाट्यछटेतल्या त्या बालनटासारखाच तोरा होता. 

आंतरशालेय नाट्यस्पर्धेतला माझा अभिनय प्रख्यात संगीतकार केशवराव भोळे आणि ख्यातनाम अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांनी पाहिला होता. त्या वेळी मी सातवी पास होतो. आचार्य अत्रे यांनीच मोठे यांना कंटाळून सांगितलं होतं की 'श्यामची आई' पुस्तकावर चित्रपट सुरू तर केला आहे. पण 'श्याम’ची भूमिका करण्यासाठी कार्टं मिळत नव्हतं. त्यांच्या सांगण्यावरून आचार्य अत्रे घरी आले. मला बघायला (?). 

आमच्या घराच्या दारातून त्यांना वाकून यावं लागलं होततं, इतके ते उंच होते. हाडपेरही दणकट. अफझलखानासारखे वाटले तेव्हा. माझ्या जवळच्या स्वाक्षरी पुस्तकात त्यांनी सही केली, तर एकाजवळची एक अशी दोन पानं सहीसाठी त्यांना लागली. आणि ते आले होते म्हणून उसाचा रस आणला होता. त्यांच्यासाठी आणि अर्थातच आम्हां सगळ्यांसाठी. कासंडी भरून रस होता. बोलता बोलता काय झाल कुणास ठाऊक! पण त्यांनी कासंडी उचलली आणि सगळा रस संपवून खाली ठेवली. आम्ही खूप हसलो. आम्ही का हसतो आहोत ते त्यांनाच कळेना! 

मुंबईस दादर-चौपाटीला लागूनच एका इमारतीत ते राहायचे. माझी व्यवस्थादेखील तिथंच झाली. अजून चित्रीकरण सुरू झालं नव्हतं. एका संध्याकाळी त्यांच्या मोटारगाडीत बसून आम्ही दोघंच फिरायला गेलो. चौपाटीपाशी आल्यावर त्यांनी पदपथाला अगदी चिकटून गाडी उभी केली. मावळतीचा सूर्य, समुद्रावर तांबूस पिवळी छटा, वाऱ्याच्या झुळुका. आमच्या मोटारगाडीबाहेर पदपथावर एक माझ्याएवढा दिसणारा मुलगा कोयत्याने शहाळी सोलत होता. मळकट गंजीफ्रॉक, फाटलेली राखाडी चड्डी. डोक्यावर केसांचं जंगल. काळाकभिन्न मुलगा. सपसपसप असा हात चालवीत शहाळी सोलत होता. साहेब म्हणाले, (आचार्य अत्रे यांना सर्व जण साहेब म्हणायचे तर मीही तसंच!) ‘‘तो तुझ्याएवढा आहे. तुला येईल का असं शहाळ सोलता? कसा सफाईदारपणा, पण नाजूक हात फिरवतो आहे. जे काय करायचं ते असं सुंदर असलं पाहिजे.....’’ माझ्यापेक्षाही साहेब स्वतः हरवून गेले होते. त्यांनी दोन शहाळी त्या पोराला सोलायला सांगितली. तो मुलगा आता कुठे असेल?

आम्ही चित्रीकरणासाठी कोकणात गेलो होतो. रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीपाडा इथं चित्रीकरण सुरू झालं होतं. त्या दिवशी दुपार कलली होती. एका बारीकशा चढावरती आम्ही तिघेच होतो. साहेब, मी आणि आमचे कॅमेरामन रेवे, साहेब अनिमिष नजरेनं लांबवर दिसणारी गर्द हिरदी झाडी बघत होते. अशा वेळी ते त्यांच्या चश्म्याची जाड काडी धरून ठेवायचे... थोडा वेळ गेला आणि साहेब म्हणाले, ‘‘रेळे, ते समोरचं दृश्य कॅमेऱ्यात घेऊन ठेवा... निसर्गाचे ते विलोभनीय रूप आपण चित्रपटात दाखवू या...’’ रेळे यांनी कॅमेरा सुरू केला मात्र आणि काही क्षणांतच बंद केला. साहेबांनी विचारले, "काय हो ? काय झालं?’’ साहेब केव्हा केव्हा फार व्याकूळ झालेले वाटायचे. रेळे थंडपणाने म्हणाले, ‘‘आपल्यापाशी फार थोडी फिल्म शिल्लक आहे. तुमच्याजवळ आहेत का पैसे जास्त फिल्म विकत घ्यायला? निसर्गाचं दृश्य घेऊन ठेवण्याची ही चैन तुम्हांला परवडणारी नाही...’’ काही क्षण तसेच गेले, घोंघावणारा वारा तेवढा ऐकू येत होता, आणि पानांची सळसळ. साहेबांनी चश्मा काढला आणि पँटच्या भल्यामोठ्या खिशातून चुरगळलेला राखाडी रुमेल काढून डोळे पुसले. 

रागही आला असावा. कारण पुढे 'श्यामची आई' चित्रपटगृहांमध्ये झळकल्यानंतर जेव्हा आमचे सत्कार सुरू झाले, त्या वेळी प्रत्येक भाषणात ते हटकून हिंदी चित्रपटांचा उल्लेख करून म्हणायचे, "संडे के संडे, मेरी जान मेरी जान" असला आचरटपणा दाखविणाऱ्या फिल्मसाठी पैसे मिळतात. आम्हांला मात्र भिका मागाव्या लागतात. चित्रपट झळकल्यानंतर आमचे सत्कार सुरू झाले. दररोज सत्कार. आज काय गायवाडीत, उद्या झावबाच्या वाडीत, परवा मुगभाट लेनमध्ये... केव्हा तरी शिवाजी पार्कला. खरं तर स्वतः साहेबच ते सत्कार होतील अशी व्यवस्था करायचे. त्यांचं नवयुग साप्ताहिक होतं. आणि येणारी जाणारी एकसारखी भोवती फिरणारी खूप माणसे होती. अनंत काणेकर, सोपानदेव चौधरी, माधव मनोहर, अप्पा पेंडसे ही मंडळी नेहमी असायचीच. प्रत्येक सभेत या सगळ्यांची भाषण ठरलेतीच. एक दिवस साहेबांनी मला सत्काराच्या आधी त्यांच्या घरी लवकर बोलावलं. तेव्हा मी दुसऱ्या चित्रपटात ‘वहिनींच्या बांगड्या’मध्ये भूमिका करीत होतो आणि दुसरीकडे राहत होतो. मी साहेबांच्या घरी गेलो तर साहेब म्हणाले, ‘‘माधव आजच्या सभेत तूसुद्धा बोलायचं.’’ आणि एक कागद-पेन्सिल देऊन त्यांनी मला भाषण लिहून काढायला सांगितलं. मनात येईल तसे मी भाषण लिहिलं आणि साहेबांना वाचून दाखवलं. म्हणाले, ‘‘वाच दोनचारदा. पाठ होऊन जाईल.’’ त्या दिवशी सभेमध्ये साहेबांनीच मी बोलणार असल्याचं जाहीर केलं. मी बोलायला सुरुवात केली. एक वाक्य झाल्याबरोबर साहेबांनी प्रथम टाळ्या वाजवल्या. त्यामुळे सभेला आलेल्या श्रोत्यांनाही टाळ्या वाजवाव्या लागल्या. असं माझं  भाषण संपेपर्यंत सुरू होतं. टाळ्यांच्या गजरात माझं भाषण संपलं.

दोन-चार दिवस गेले आणि एक दिवस पुन्हा साहेब म्हणाले, ‘‘माधव, आजच्या सभेत तुझं भाषण होणार आहे.’’ मी म्हटलं, ‘‘या द्या कागद-पेन्सिल, भाझण लिहून काढतो.’’ आपला हाताचा मोठा पंजा पसरून साहेब गरजले, ‘‘अक्कलशून्य! अरे भाषण तेच परवाचंच करायच! श्रोते फक्त निराळे." त्यानंतर ते भाषण मी पुढे जवळजवळ 15-20 सभांमध्ये केलं. 

चित्रीकरण होत असताना एकदा गंभीर प्रसंग निर्माण झाला. श्यामच्या वडिलांच्या घराची जप्ती होते अस दृश्य होतं. जप्त होणाऱ्या सामानात ताटं, वाट्या, ओगराळी, भांडी, देवघरातले देव असं बरंच काही होतं. न्यायालयातील कारकुनाची भूमिका प्रसिद्ध नट-दिग्दर्शक दामूअण्णा जोशी करत होते- त्यांनी एकेक वस्तू बघून यादी म्हणायला सुरुवात केली..... ताट, वाटया, ओगराळी वगैरे... तिथला एक कंदील त्यांनी हातात घेतला आणि म्हटलं, ‘‘एक कंदील.....’’ 

दृश्य फार उत्तम वठत होतं. साहेब खूश दिसत होते. त्यांचा एक हात चश्म्याच्या काडीपाशी गेला होता. कॅमेऱ्याचा कर्रर्र... असा अस्फुटसा आवाज तेवढा होता. तेवढ्यात दृश्य सुरू असतानाच दामूअण्णा कडाडले, "अहो साहेब हा कसला कंदील? कोणी आणून ठेवला हा? याला वात कुठे आहे? असा कुठे कंदील असतो की काय?’’ 

कॅमेरा एकदम बंद झाला. दामूअण्णा म्हणजे साहेबांनाही मोठे. गलका झाला. दुसरा एखादा कंदील मिळविण्यासाठी धावाधाव सुरू झाली. प्रत्येक जण दुसऱ्यावर चुकीचं खापर फोडत राहिला. मी सगळ्यांत लहान. मी साहेबांजवळ बसून होतो. तिकडे कंदिलावरून हमरीतुमरी सुरू असताना साहेबांनी एक कुठलासा चिटोरा फाहला आणि जिभेने ओठ निपटून ठळक काहीतरी त्यावर लिहिलं आणि ते दामूअण्णांना दे म्हणून सांगितलं... दामूअण्णांनी तो चिटोऱ्यावरचा मजकूर वाचला आणि साहेबांकडे हसत मनापासून मान डोलावली. साहेबांनी लिहिलं होतं, दामूअण्णा यादी अशी वाचायची... "ताट, वाट्या, ओगराळी, एक कंदील त्याला वात नाही!’’
कारकुनाची काक दृष्टी, त्याची हृदयशून्यता त्या एका वाक्यामधून स्पष्ट झाली होती.

एक साहित्यिक परिमाण साहेबांनी मिळवून दिलं होतं. साहेबांनी हट्टच धरला होता की, शेवटच्या गाण्यामध्ये दृश्यं दाखवायची. कवी यशवंतांची कविता ‘आई कुणा म्हणू मी? आई घरी न दारी, त्या गीतातल्या दोन ओळी... "धारा मुखी पिलांच्या चिमणी हळूच देई, गोठ्यात वासरांना या चारतात गाई।।’’ चिमणी आपल्या पिलाला घास भरवीत असल्याचा एक फिल्मचा तुकडा साहेबांना मिळाला आणि त्यांनी चित्रपटात गीतामध्ये वापरलाही. आता पाहिजे होती गाय, वासराला ममतेनं चाटणारी. साहेबांच्या ओळखीचे एक पुढारी होते पुण्यामध्ये. त्यांच्या घरी गाय आणि वासरू दोन्हीही होते. आम्ही तिघंही तिथं पोचलो. खूप प्रयत्न करूनही गाय काही वासराला चाटेना. उलट जो जो प्रयत्न करावा, तो गाय दुसरीकडेच तोंड फिरवायची. तिला गवत घातलं, वासराच्या पाठीवर गवत पसरलं. एकदा तर वासराला गायीनं चाटावं म्हणून वासराच्या पाठीवर मधसुद्धा थापला. पण मधाच्या वासानं गाईनं पुन्हा दुसरीकडंच तोंड फिरवलं. सगळे प्रयत्न फसले, युक्त्या फसल्या. अखेर साहेबांनी सगळी तयारी गुंडाळायला सांगितली आणि स्वतः मोटारीत जाऊन बसले. कॅमेरामन रेळे यांनी नाइलाजानं कॅमेरा पेटीत घातला आणि आम्ही सगळे निराश होऊन पुन्हा मुंबईच्या दिशेने निघालो... मोटारीनं जेमतेम खडकी ओलांडली नसेल, तर तेवढ्यात साहेब मोटार चालता चालवताच स्वतःशी एकदम म्हणाले, "मूर्ख!"... आम्ही सगळे चपापलो. रेळ्यांना तर वाटलं की आपण काय बुवा मूर्खपणा केला?... रेळ्यांनी तसं साहेबांना विचारायचं धाडस मात्र केलं नाही. पुन्हा काही क्षणांनंतर साहेब गरजले, ‘‘मूर्ख! महामूर्ख!!’’ आता मात्र रेळ्यांना राहावलं नाही. हलक्या आवाजात त्यांनी विचारलं, कोण मूर्ख?’’ 

"मी, मी स्वतः मूर्ख महामूर्ख, अहो ती गाय त्या वासराला चाटणारच नाही हे माझ्या मूर्खाच्या आधीच लक्षात यायला पाहिजे होतं. मी मूर्ख आहे महामूर्ख... अहो साधी गोष्ट आहे. ज्या पुढाऱ्याचं आपल्या स्वतःच्या जनतेवर प्रेम नाही, त्याच्या घरातली गाय तरी पासराला कशी काय चाटणार? मीच मूर्ख आहे!..." 

साहेबांच्या स्वभावात नेहमीच एक लहान मूल लपले होते. म्हणून तर असं भाबडेपणानं ते केव्हा केला बोलून जायचे. पुढारी आणि गाय.. हे कोणतं तर्कशास्त्र ? पण साहेबांपुरतं हे खरं होतं, त्याला अर्थ होता. तसं आजही खूप काही आठवतं. अगदी काल घडल्यासारखं. पण एका प्रसंगाचं मात्र नवल वाटतं. तसा अनुभव पुन्हा नाही आला. श्यामनं पुस्तक घेण्यासाठी काकांच्या खिशामधून एक रुपया चोरला आणि पुढे श्यामच्या आईने शिक्षा म्हणून त्याला शिपडीनं मार दिला. त्याला देवासमोर ढकललं आणि फर्मावलं, ‘‘सांग, पुन्हा असं करणार नाही म्हणून.’’ एकाला जोडून एक अशी दोन दृश्यं होती. आईनं मारण्याचं आणि नंतर देवासमोर चूक कबूल करण्याचं... आई श्यामला मारते, ते दृश्य नीट झालं. माझ्या आईनं म्हणजे वनमालाबाईंनी... मला फार लागणार नाही याची काळजी चित्रीकरणाच्या वेळी घेतली. मीसुद्धा काही फारसं लागलं नसताना, खूप मार बसल्यासारखा रडलो (!) नंतरचं दृश्य होतं देहाऱ्यासमोर. ती संध्याकाळची वेळ होती.  

दिवसभराचं काम संपत आलं होतं आणि आता चारपाच दृश्यं तेवढी त्या दिवसातली राहिली होती. देव्हारा मांडला होता. त्यामध्ये निरनिराळ्या मूर्ती होत्या. त्यांना फुलं वाहिली होती. समोर हळद-कुंकू, तेवणारं निरांजन, उदबत्ती... अशी सगळी तयारी होती. आईनं ठरल्याप्रमाणे श्यामला "देऊ नको दुष्ट वासना । तूच आवरी आमुच्या मना" - ते गायला सुरुवात केली. मात्र रडूच आलं. डोळ्यांत साठलेलं पाणी गालांवरून ओघळत राहिलं. तोपर्यंत वनमालाबाईही माझ्या शेजारीच. माझ्या खांद्यावर हात ठेवून बसलेल्या. ‘‘फार लागलं नाही ना तुला श्याम?’’ असं हळुवारपणे विचारताना त्यांनी आपला गाल माझ्या गालापाशी आणला आणि जाणवलं, त्यांच्याही डोळ्यांमधून पाणी घळाघळा वाहत आहे.... दृश्य साहेबांच्या मनासारखं झालं. कॅमेरा थांबला. दिवे विझले; पुढच्या दृश्याची तयारी सुरू झाली. पण माझ्या डोळ्यांतल्या पाण्याला खळ पडेना. एकसारखं रडू येत राहिलं. साहेबांनी विचारलं, ‘‘माधव भूक लागलीय का?’’ मानेनंच नाही म्हणून मी सांगितलं.

मग म्हणाले, मघाशी छड्या जोरात लागल्या का?’’ पुन्हा मी मानेनंच नाही म्हटल. तर पुन्हा त्यांचा प्रश्न ‘‘पुण्याला जायचंय का? घरची आठवण येते आहे का?...’’ माझी मान पुन्हा तशीच हलली- नाही म्हणण्यासाठी. शेवटी साहेबांनी विचारलं. ‘‘मग का रडतो आहेस?’’... हुंदके कसेबसे आवरीत मी म्हटलं, "मला माहीत नाही.’’ खरोखरच माहीत नव्हतं. एकसारखं पाणी का साठत होतं डोळ्यांमध्ये. आता माझ्या लक्षात येतं, केव्हा केव्हा गाफील क्षणी भूमिकाच नटाला आक्रमून जाते. त्या संध्याकाळी, त्या विशिष्ट वातावरणात माझा मी राहिलो नाही..  "अत्र्यांनी तुला काय दिलं ?’’ असा प्रश्न विचारणारे विचारतात. त्यांना उत्सुकता असते. मला पैसे किती मिळाले त्याची. पैसे घेण्या-देण्याचा प्रश्नच नव्हता, भूमिका ‘श्याम’ची होती; एवढ्यावरच घरच्यांना आनंद होता. शिवाय आमचं घरचं उत्तम होतं. खाऊनपिऊन अगदी मजेत असायचो आम्ही. पण प्रश्न विचारला जातोच, तेव्हा क्षणभरही न घालवता मी सांगतो, ‘‘अत्र्यांनी मला माधव वझे हे नाव दिलं.’’

‘श्यामची आई’ चित्रपटानं मला काय दिलं? - कलाकृतीचे असे थेट संस्कार कोणावर होत असते तर काय पाहिजे होतं? गुरुजी गेले तेव्हा मी अकरा वर्षांचा होतो. संस्कार म्हणजे काय हे तरी कुठं माहीत होत तेव्हा? आणि संस्कार असे ठरवून होतात थोडेच? कधी तरी केव्हातरी वाऱ्याबरोबर एखादं बी कुठंतरी मातीत जाऊन पडतं आणि त्या तिथल्या मातीलाच काही कल्पना नसताना अचानक एक दिवस तिथे एक हिरवागार कोंभ नजरेत भरतो. 'श्यामची आई’मुळेच ते झालं किंवा नाही, ते नाही मला सांगता येणार; पण आता मी मागे वळून पाहतो तेव्हा जाणवतं की वाऱ्याबरोबर आपल्याही आयुष्यात असं बी-बियाणं रुगलं असावं...

अगदी गेल्या काही वर्षांतील गोष्ट. महाविद्यालयात इंग्रजीच्या पुस्तकातला पाठ शिकवत असताना, वर्गात कुठल्याशा मुलाने टारगटपणा केला. त्याला खूप खडसावत असताना त्याचा निगरगट्टपणा पाहून काय झालं कोणास ठाऊक, रागाच्या भरात मी त्या मुलावर हात उगारला. मुलगा वरमला. त्यानं क्षमा मागितली. विजेत्यासारखा मी वर्गामधून बाहेर पडलो... पण मनाला खात राहिलं, आपण का म्हणून त्या मुलावर हात उगारला? आपला तोल गेल्याचंच ते लक्षण! बुद्धी संपली आणि आता बळाचा वापर करावासा वाटला. त्या मुलाच्या मनात आपल्याबद्दल आता कोणती भावना असेल... एक की दोन - हजारो प्रश्न समोर उभे राहिले. रात्री झोप नाही आली. दुसऱ्या दिवशी वर्गात गेलो तर तो मुलगा शांतपणे बसलेला आणि सगळाच वर्ग अत्यंत शांत असलेला.

क्षणभर थांबून, वर्गावर नजर फिरवून बोलत राहिलो, ‘‘मला क्षमा मागायची आहे या मुलाची. त्याच्यावर हात उगारल्याबद्दल. एक प्रकारच्या हिंसेलाच मी उद्युक्त झाल्याबद्दल.’’ मुलांना काय वाटलं ते माहीत नाही. पण मला शांत वाटलं. विद्यार्थ्याची क्षमा मागण्याचं धैर्य मला झालं हे किती छान झालं... नाही तर ती जखम स्वतःमध्ये वागवीतजकावं लागलं असतं. स्वतःशी प्रतारणा कधी... कशी करून जातो... हा प्रश्न मला छळतो. असूया, मत्सर, अहंगंड, वासनांमुळे चिंध्या होत राहतात जगण्याच्या. एक तर ते मला जाणवतं आणि अपराधी वाटतं. स्वतःपाशी आणि मन घट्ट करून कबुली द्यावी असा अनुभव केव्हा केव्हा येतो आणि खूप बरं वाटतं.  वाटतं, आपल्यामधील घाण साफ करता आली तर बरं होईल. त्यालाही आता उशीर झाला. फार वेळ आहेच कुठे? 

अनेक वर्षांपूर्वी पुणे विद्यापीठात शिकत असताना, डॉ. नागराजन यांनी 'मॅक्बेथ’ची सविस्तर चर्चा केली होती. दोनच शब्दांभोवती ते आम्हांला आणत होते. 'गुडनेस' आणि 'ग्रेटनेस’..... काय बरं म्हणत होते सर? 
‘श्यामची आई' चित्रपटामध्ये भूमिका करण्यासाठी माझी निवड झाली, तोपर्यंत मी इतर असंख्य लहान मुलांसारखा राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जात होतो. मी तिथे खरं तर मनाने कधी रमलो नाही. शाखेत जाण्याचा कंटाळा येऊन, ती टाळावीशी वाटायची. पण शाखेतल्या शिक्षकांची चिकाटी अशी की, ते अनेक हेलपाटे घरी मारायचे आणि 'शाखेत पाठवा' अशी यांना विनंती करायचे. मला त्यांचे हेलपाटे आवडायचे नाहीत. म्हणजे आपल्या शाखेत कंटाळा येतो असे सांगायचीही सोय ठेवली नव्हती.

अनुपस्थितीबद्दल कारण सांगितलं की खोदून खोदून चौकशी सुरू असायची. प्रसंगी घरी येऊन खातरजमा करून घेत असत. विश्वास असा नव्हताच आमच्यावर. आता मागं वळून पाहतो तेव्हा वाटतं, ठीक आहे. संस्कार होणं महत्त्वाचं असतंच एका विशिष्ट वयात. पण एक तर संस्कार करायचे ते हसतखेळत, लहान मुलांना आकर्षक वाटेल अशा रीतीने ते केले जावेत. जिथे संस्कार केले जातात, त्यांनाच टाळावं असं वाटायला लागलं असेल तर कुठंतरी चुकत आहे हे मान्य करायला पाहिजे. माझे  वडील संघात जात असत. एके काळी त्यांनी आमच्या घरी स्वयंसेवकांना बोलावून कधी चर्चा वगैरे केल्याचं आठवतं; पण तरीही आम्ही संघात जावं अशी त्यांची इच्छा असली तरी आग्रह कधीच नव्हता. सक्ती तर मुळीच नव्हती. आमच्या घरी रात्री जेवताना गाणी-गप्पा होत असत. आम्हांला मोकळेपणाने बोलता येत असे. संघातील आणखी एक मनावर ठसलेली गोष्ट म्हणजे कमालीची गुप्तता. सतत वाटायचं की आपल्याला टाळलं जात आहे. आपल्याबद्दलच चर्चा सुरू आहे. आपल्याला विश्वासात का घेतलं जात नाही, असा प्रश्न पडायचा. 'श्यामची आई'नंतर संघापासून मी दुरावलो तो दुरावलोच. 

नेस वाडिया महाविद्यालयात नोकरीला लागलो तो इंग्रजीचा अध्यापक म्हणून. प्राचार्य नूलकरांनी तिथे दलित विद्यार्थ्यांसाठी ‘समता मंडळ’ सुरू केलं आणि ‘श्यामची आई’तला मी ‘'श्याम’ म्हणून ह्या मंडळाचं काम माझ्यावर सोपवलं. दर शनिवारी सकाळी आम्ही समता मंडळाची सभा बोलावीत असू आणि दलित विद्यार्थ्यांना बोलतं करावं असा आमचा प्रयत्न असायचा. पहिला मेळावा भरायचा तो विठ्ठलवाडीच्या देवळात. चांगली 60-70 मुलं यायची. सवर्ण विद्यार्थीही कोणी कोणी येत. त्याप्रमाणे दोन-तीन तरी पारसी, गुजराती मुलंमुली मेळाव्यात सामील होत असत. तिथे प्रत्येकाने आपापला भोजनाचा डबा जरी आणला असला, तरी ते सगळे डबे एकत्र रिकामे केले जायचे आणि ते वर्तमानपत्राच्या कागदावर वाढलं जायचं. ‘साने गुरुजी’ यांच्या-विचार आचारांची व्यक्ती प्रमुख पाहुणा असायची. ग. प्र. प्रधान सर, नानासाहेब मोरे, एस. एम. जोशी भालचंद्र फडके असे आणखी कोण कोणी. बाबा आढाव यांना एखाद्या सभेला महाविद्यालयात बोलवा, असं मुलं म्हणायची, मीही ते प्राचार्यांना सुचवायचो. पण प्रधान सर, एस. एम. किंवा नानासाहेब निरुपद्रवी वाटायचे, तसे बाबा आमच्या प्राचार्यांना वाटत नसावेत. बाबा आढाव आले की राजकारण येणार, अशी त्यांना धास्तीच वाटायची.

म्हणजे समता मंडळ तर पाहिजे; पण ते 'गुंगी’सारखं, मुलांनाही फार विचार करायला लागणार नाही असं... विठ्ठलवाडीच्या मेळाव्यातील आणखी एक गोष्ट मनावर ठसा उमटवून गेली. आम्हा सगळ्यांनाचकागदावरच वाढलं जात असे आणि आम्ही पाणी पीत होतो ते तिथल्याच एका नळाचं; पण प्राचार्य मात्र पिशवीतून दोन थाळ्या काढायचे. एक प्रमुख पाहुण्यांसाठी आणि एक स्वतःसाठी. शिवाय ते पाणीही घेऊन आलेले असायचे. ना कधी आम्ही प्राचार्यांना त्याबद्दल विचारू शकलो ना प्रमुख पाहुण्यांनी ती विसंगती दाखवून दिली. ‘समता मंडळ हे असं पाठीवर शाबासकी देऊन प्रायोजकासारखं सुरू ठेवलं होतं... मनानं मी त्या मंडळापासून कधीच दूर गेलो होतो. अखेर आणखी कोणीतरी माझ्याऐवजी मंडळाची व्यवस्था पाहायला लागले, तेव्हा मला हायसं वाटलं, 

दलित मुलंमुली नेहमी घरी येत असत. नाटकाच्या तालमीसाठी किंवा मंडळात कोणती चर्चा ठेवावी त्याबद्दल बोलण्यासाठी. ते आले की सात-आठ जण असायचे. एकदा असेच आम्ही खूप वेळ माझ्या घरी बोलत राहिलो, तेव्हा त्यांना मी म्हटलं, ‘‘आपण सगळे चहा पिऊ या.’’ पण माझी बायको त्यावेळी घरी नसल्यानं मीच स्वतः चहा करायचं ठरवलं. मुलांना म्हटलं, ‘‘मी आपल्याला चहा करणार, तुम्ही इथं खोलीत बसणार हे काही खरं नाही. तुम्ही सगळेच खालच्या मजल्यावर स्वयंपाकघरात या. सगळी आली. टेबलाभोवती बसून आम्ही सगळ्यांनी चहा घेतला. मुलं परतली. या घटनेला काही वर्षे झाली. समता मंडळाच्या वार्षिक सभेत विजय खरात हा विद्यार्थी बोलायला उठला. बोलण्याच्या ओघात त्यानं सांगितलं की वझे सरांनी त्यांच्या स्वयंपाकघरात नेलं आणि घरातले सगळे वापरतात त्या कपबशांमध्ये त्यांनी आम्हांला चहा दिला....’’ हे ऐकताना मला विलक्षण संकोचल्यासारखं झालं, पाणीच तरारलं डोळ्यात. मी अस काय वेगळं केलं होतं होत? आणि काय मोठं विचारपूर्वक असं केलं होतं? पण ते कुठंतरी नोंदवलं गेलं होतं, ते तर खरंच. 

सगळीच हकिकत सांगत बसत नाही. पण महाविद्यालयातच एकदा काही कारण नसताना संमेलनानंतरच्या अल्पोपाहाराच्या वेळी मला टाळल आहे हे लक्षात आलं. कोणताच तमाशा, त्रागा न करता प्राचार्यांशी जाऊन, मी संमेलनातून बाजूला होत असल्याचं त्यांना हळू आवाजात सांगितलं... मी स्वतःच आत्मक्लेश करून घेणे आवश्यक आहे, असंही काहीसं मी बोलून दाखविलं. आत्मक्लेशावर माझा विश्वास आहे. प्रमादाचं परिमार्जन करण्यासाठी, स्वतःला शिक्षा करून घ्यावी अशी माझी भावना उत्तरोत्तर होत गेली आहे.... नेहमीच ते जमलं असा माझा दावा नाही. पण ते शक्य झालं नाही, असंही नाही... आचार-विचारांत राहणारी विसंगती मला अस्वस्थ करते...असं जगण्यापेक्षा! तेंडुलकरांचकया नाटकातलं वाक्य आठवतं... हे शरीर सगळा घात करतं!  खरंच आहे त्या सगळ्याला ओलांडून जायला मी साने गुरुजी थोडाच आहे? म्हणून तर मी माधव वझेच राहिलो आहे.. 
'श्यामची आई' नंतर माझ्या मर्यादाही जाचक ठरत गेल्या!
 

Tags: आचार्य अत्रे गुरुजींचे संस्कार छोटा ‘श्याम’ - माधव वझे आठवणी चित्रपट acharya atre ‘श्यामची आई’ nurturing of sane guruji small 'shyam' - madhav vaze memories a great movie 'shyamchi aai' weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

माधव वझे
vazemadhav@hotmail.com
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके