डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रभाकर पणशीकर यांच्या निवडीचे सर्वांनीच एकमुखाने स्वागत केले. रंगभूमीच्या अवघ्या रंगांमध्ये चिंब भिजलेल्या या संपन्न व्यक्तिमत्त्वाचा नाट्यक्षेत्रातील एका रसिक आणि चिकित्सक दिग्दर्शकांनी करून दिलेला हा रसीला परिचय.

नागपूरला आयोजित केलेल्या मराठी नाटयसंमेलनाच्या स्वागताध्यक्षांचे भाषण, माननीय अध्यक्षांचे व्यक्त झालेले विचार, परिसंवादाची फलश्रुती आणि या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात, मराठी नाट्य संमेलनाची आवश्यकता-अनावश्यकता याबद्दल इथून पुढे काही दिवस वादविवाद, चर्चा होत राहतील. आणि त्यात वावगे काही नाही. मराठी माणसाच्या नाटय-प्रेमाचाच (की नाटय-वेडाचा?) तो एक भाग आहे असे म्हणायला हवे!

प्रत्यक्ष संमेलनात झालेल्या कार्यक्रमांबद्दल  कोणी काही म्हणणार असले, तरी या वर्षीच्या अध्यक्षांच्या निवडीचे मात्र सगळयांकडूनच एकमुखाने स्वागत झाले आहे. रंगभूमीच्या अमच्या रंगांमध्ये चिंब भिजून संपन्न झालेल्या ज्या काही अगदी मोजक्या व्यक्ती आहेत, त्यामध्ये, या वर्षीच्या अध्यक्षांचा-प्रभाकर पणशीकरांचा क्रम फार वरचा लागतो. संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणारी व्यक्ती, तशीच अधिकारी असावी, या रास्त अपेक्षेची पूर्तता पणशीकरांनी अध्यक्षपद भूषविल्याने झाली आहे. 

मराठी प्रेक्षकाला प्रभाकर पणशीकरांबद्दल अतोनात प्रेम माणि आदर आहे, तो ते एक सब्यसावी अभिनेते आहेत म्हणून. ‘तो मी नव्हेच’ हे नाटक लिहिले आचार्य अत्रे यांनी; आणि अत्र्यांचे नाटक म्हटले की, रंगमंचा वरील प्रयोगावरही अत्रे यांच्या लेखणीचा प्रभाव  हुकमत गाजवितो असा नेहमीचा येणारा अनुभव! अत्रे यांनाही त्याचाच अभिमान होता. ‘माझ्या नाटकात अभिनय वगैरे करण्याच्या भानगडीत पडू नका; माझी वाक्ये, माझे संवाद तेवढे व्यवस्थित म्हणा. प्रेक्षक नाटक डोक्यावर घेतील’- अशा प्रकारचा सार्थ  इशारा, एका नटला तालमीच्या वेळीच अत्रे यांनी दिला होता. पण अत्रे यांचे नाटक, जितके अत्र्यांचे तितकेच ते एका अभिनेत्याचेही असू शकते, असा एक सुखद धक्का त्या नाटकातील मध्यवर्ती आणि अन्य काही भूमिका करून, प्रथम पणशीकरांनी दिला.

‘लखोबा लोखंडे'. चा आत्मविश्वास, त्याचा निगरगट्टपणा आणि प्रतिपक्षालाही हतबल करणारा त्याचा धीमेपणा,- हे सगळे पणशीकरांनी ‘नखशिखान्त’ अभिनयामधून साकार केले. लखोबा लोखंडेच्या अन्य मायावी रूपांचे दर्शन घडविताना पणशीकरांना रंगभूषा व वेशभूषेचे साह्य मिळाले हे तर खरेच, पण ती तो व्यक्तिरेखा अगदी मोजक्या, काहीशा गडद छटा वापरून, पणशीकरांनी रंगमंचावर उभ्या केल्या. आता जवळजवळ पाव शतक होत आले. दोनतीन वर्षांनी या नाटकाचे आणि त्याच्या प्रयोगांचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे केले जाईल. 'तो मी नव्हेच' हे नाटक इतके दीर्घकाळ चालले आहे, याची जाणीव प्रेक्षकांना झालेली नाही. एवढ्या एवढ्यातलेच ते नाटक असावे, अशा उत्सुकतेने प्रेक्षक आजही त्या नाट्यप्रयोगास गर्दी करीत आहेत! ‘तो मी नव्हेच‘चा मराठी नाट्य प्रयोग रोप्यमहोत्सवी वर्षाच्या उंबरठयावर असतानाच, पणशीकरांनी त्याचे आता कानडी भाषेतील प्रयोग सुरू केले आहेत त्या प्रयोगातही मध्यवर्ती भूमिका त्यांचीच आहे. ‘तो मी नव्हेच’ रंगमंचावर आणले, ते रांगणेकरांच्या दिग्दर्शनाने. ‘अत्रे थिएटर्स’ ने ते गाजवले. आणि काही काळानंतर पणशीकरांच्या नाटयसंपदेने ते स्वत:कडे घेतले.

स्वतःची नाटयसंपदा ही संस्था स्थापन करून पणशीकरांनी, सातत्याने नवीनवी नाटके रंगमंचावर आणली. अश्रूंची झाली फुले, इथे ओशाळला मृत्यू, मला काही सांगायचंय, पैसा, महाराणी पद्मिनी, थँक्यू मिस्टर ग्लाड या नाटयसंपदेच्या सगळयाच नाटकांच्या प्रयोगात, पणशीकरांनी प्रमुख भूमिका केल्या. त्या भूमिकांपैकी, प्रेक्षकांना पुन्हा एकदा जिंकून गेली ती ‘इथे ओशाळला मृत्यू’- मधील औरंगजेबाची भूमिका. कमरेत वाकलेला, बारीक डोळयांचा, दात पडलेला आणि एखाद्या सापासारखा जीभ सतत आत बाहेर करणारा तो औरंगजेब, पणशीकरांनी स्वतंत्र मुशीमधून निर्माण केला होता. त्या नाटकाचे प्रयोग ज्यांनी पाहिले आहेत, त्यांना नक्कीच आठवेल की मराठयांना नामोहरम करण्याची प्रतिज्ञा करताना, जिहाद पुकारणारा औरंगजेब, पहिल्या अंकाच्या अखेरीला पणशीकर अशा काही सामर्थ्याने उभा करीत की, मध्यंतरात प्रेक्षकांनी सुन्न राहून कोणाशीच काही बोलू नये! त्यावेळेपुरते तरी नाटक औरंगजेबाचे म्हणून जसे काही जाहीर केले जात असे.- आपल्या सगळ्याच भूमिकांना पणशीकरांनी स्वतंत्र व्यक्तिमत्व दिले असे  म्हणता येणार नाही. पण विविध प्रकारच्या भूमिका तोलणारा, एक समर्थ अभिनेता म्हणून पणशीकरांवर प्रेक्षकांचे फार फार प्रेम आहे!

पणशीकर जसे संघाच्या मध्यभागी उभे राहणारे अभिनेते आहेत, तसे एक जाणते, व्यावसायिक निर्माते आहेत. ‘घर पाहावे बांधून’ च्या चालीवर ‘नाटक पाहावे करून असेही म्हटले जाते, त्यावरुनच नाटकाच्या धंद्याची कल्पना यावी. कोणतेही भाकित करू नये आणि केले तरी ते कदापी खरे ठरू नये, असा हा  नाटकाचा धंदा. त्यातली अनिश्चितता भेडसावणारी व लोकांच्या लेखी असणारी अप्रतिष्ठितता, चिंता लावणारी. पण पणशीकरांनी नाटकाचा हा धंदा सातत्याने केला. नफा-तोट्याची समीकरणे सांभाळीत ते नाट्यप्रयोग उभे करीत राहिले. ‘नाट्यसंपदेचा नाट्यप्रयोग’ हा अपेक्षा निर्माण करणारा ठरत गेला. निर्मितीमध्ये कोणत्याही प्रकारची कसूर न करता, कपट करून आणि अनुभवामधून शहाणे होत होत, नाट्यसंपदा प्रयोग उभे करीत राहिली. डॉक्टर श्रीराम लागू, काशिनाथ घाणेकर, चित्तरंजन कोल्हटकर, फैयाज, सुधा करमरकर, सतीश दुभाषी यासारख्या तोलामोलाच्या कलावंतांनी नाट्यसंसदे’ मध्ये भूमिका केल्या, वसंत कानेटकरांनी एका पाठोपाठ आपला नाटके ह्या संस्थेला देऊ केली आणि पुरुषोत्तम दारव्हेकरांनी आपल्या व्यावसायिक रंगभूमीवरील दिग्दर्शनाची वाट, नाट्यसंपदेमधूनच निर्माण केली.

पणशीकरांचे निराळेपण असे की व्यवसाय करीत असताना ते काही एक धोके देखील अंगावर घेत राहिले. महाराणी पद्मिनी हे पु. भा. भावे यांचे नाटक, कोणताही भरवसा ठेवून पणशीकरांनी रंगमंचावर आणले नसावे, आणि आता अलिकडे तर त्यांनी वृत्तपत्रात जाहिरात देऊन, उमेदीच्या कलाकारांना आवाहन केले आणि त्यांना हाताशी धरून  ‘निष्पाप’ हे नाटक रंगमंचावर आणले. त्या निमित्ताने पणशीकरांनी ‘दिलीप परदेशी’ यांना नाटककार म्हणून नाट्यपसंपदेच्या रंगभूमीवर आणले अनिल क्षीरसागर, सविता प्रभुणे या कलावंतांची ‘देणगी’ च  प्रेक्षकांना दिली. सदाशिव अमरापुरकर यांच्या सारख्या अनुभवी दिग्दर्शकाच्या हाती त्यांनी ते नवे नाटक सोपविले आणि अर्थातच पणशीकर पडद्यामागे राहिले- ‘निष्पाप’ च्या प्रयोगाला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. नाटकाबद्दल समाधान नसले, तरी नाट्यसंपदेच्या निर्मितीबद्दल एकंदरीने चांगलेच लिहिले-बोलले गेले. अन्य काही व्यावसायिक नाट्यसंस्था एकखांबी तंबूसारख्या उभ्या राहून अखेरीस मोडकळीला येण्याची भीती निर्माण झाली असताना, पणशीकरांनी नाट्यसंपदेच्या पुढील वाटचालीची केलेली व्यवस्था त्यांच्या अनुभवसंपन्न कलात्म जीवनाची साक्ष देणारी ठरते. 

पणशीकर रोख ठोक आहेत. अव्यवहारी स्वप्ने पाहणारे नाहीत. स्वत:बद्दल विश्वास आणि आवश्यक तो आदर असणारे आहेत. म्हणून तर नाट्यसमीक्षकांच्या मेळाव्यातच, ‘इथे समीक्षक कोण आहेत?’ असा प्रश्न, नकळत त्यांनी विचारला. समीक्षकांना ‘शत्रू’ म्हणायलाही त्यांनी कमी केले नाही. पणशीकारानां निरुत्तर करणारे प्रतिप्रश्न अर्थातच विचारता येतीलही- इथे त्याचा संबंध नाही. पणशीकरांचे रंगभूमीबाबतचे अनुभव आणि रंगभूमीबाबतचे तत्त्वज्ञान, त्यांच्या अशा काहीशा सनसनाटी उद्गारांमागे आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. 

पणशीकरांच्या कालखंडातले, त्यांच्या मागेपुढे असणारे काही निर्माते, नाटककार, दिग्दर्शक, नट, नटी आता विसावत आहेत, त्यांची पावले, जड झाल्यासारखी जाणवतात. पणशीकर मात्र नव्या उत्साहाने, आजही काही करू पाहत आहेत. हा ‘खुळा नाद’ अजून पुरेसा झालेला नाही असे काही ते सांगत आहेत!

Tags: नाट्यसंपदा  प्रभाकर पणशीकर मराठी नाट्यसंमेलन अध्यक्ष माधव वझे अनुभव संपदा natyasampada Prabhakar Panshikar Marathi natyasamelan adhyaksh Madhav Vaze Anubhav sampada weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

माधव वझे
vazemadhav@hotmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके