डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

एका समर्पक रंगभूमीची वाटचाल

रंगभूमी व्याख्यान देत नाही. कोणत्याही अनुभवाचे वर्णन ती करीत नाही. आत्ता आणि इथे असा थेट अनुभव देते... म्हणूनच अनुबोधन आणि प्रबोधन करण्यासाठी ह्या दृश्य-श्राव्य माध्यमाचा उपयोग वर्षानुवर्षे केला जात असल्याचे आपण पाहतो. आपले भारुड उदाहरणार्थ. आणि ज्या चर्चने रंगभूमीवर बंदी आणली, त्याच चर्चने पुढे ख्रिस्ताच्या जीवनातील चमत्कारांचा साक्षात अनुभव देण्यासाठी, रंगभूमीचाच उपयोग केला! इथे एक गोष्ट आपल्यापुरती स्पष्ट करून घेतली पाहिजे. पथनाट्य किंवा सडक रंगभूमी केवळ एक चूक असू शकणार नाही. जनजागरण करण्याचा वसा घेतलेल्या कार्यकर्त्यांनीच त्या रंगभूमीचा अवलंब केला पाहिजे. 

मंजुल भारद्वाज. हिंदीभाषिक रंगकर्मी. त्यांच्या ‘थिएटर ऑफ रेलेवेन्स’ या पुस्तकामधून त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल आपल्याला काहीच कळत नाही. खरे तर असे म्हणता येईल की मंजुल यांना खासगी असे आयुष्य राहिलेले नाही, हे त्यांचे पुस्तक वाचून संपविल्यानंतर आपल्याला लख्खपणे जाणवते. एका झपाटलेपणाने गेली 20-25 वर्षे ते नाटक एके नाटक करीत राहिले आहेत पण ते प्रस्थापित रंगभूमीवर नाही. तर जनजागरणाचा ध्यास घेतलेल्या रंगभूमीवर. 

मंजुल यांच्या मनात नाट्यप्रशिक्षणासाठी जायचे होते दिल्लीला, राष्ट्रीय नाट्यविद्यालयात, म्हणजे एनएसडीमध्ये. तशी तयारी होऊन फक्त प्रवेश तेवढा घ्यायचा राहिला होता. त्याच वेळी त्यांच्या काही मित्रांनी एक शाळा सुरू केली, ती जवळपासच्या मुला-मुलींना शिकता यावे म्हणून. 15 ऑगस्टला शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम करायचे ठरले होते. मित्रांनी मंजुलना हाक दिली. मंजुल यांनी एका हिंदी चित्रपटातील स्वदेश भक्तिपर गीतावर आधारलेला कार्यक्रम बसविला आणि त्या वेळी त्यांना प्रकर्षाने जाणवले की रंगभूमी हे एक सशक्त, समर्थ माध्यम आहे. त्यांनी निश्चय केला की आपले आयुष्य प्रयोगजीवी कलेसाठीच अर्पण करायचे. 

वर्ष होते 1988. शेक्सपिअर, चेकॉव, ब्रेख्त यांची नाटके करणे हे प्रतिष्ठेचे मानले जात होते. मंजुल यांनीही ठरवले ‘हॅम्लेट’ नाटक करायचे. त्यांनी स्वतः नायकाची भूमिका केली. नेपथ्य तयार केले, मुंबईला राजकमल स्टुडिओमध्ये. जेमतेम चार प्रयोग झाले आणि एका लहानशा अपघातामुळे प्रयोग थांबवावे लागले. नाटकाचे नेपथ्य मंजुल यांनी त्यांच्या सदनिकेच्या सज्जात आणून ठेवले. ते दिवस पावसाचे होते. मुंबईतल्या धुवाँधार पावसामुळे नेपथ्याचे सगळे सामान भिजले आणि अतोनात नुकसान झाले. काय करावे ते मंजुल यांना कळेना. त्यांच्या सदनिकेच्या खाली रस्त्यावर एक अंडीविक्रेता बसायचा. त्याला माहीत झाले होते की मंजुल नाटक वगैरे काहीतरी करताहेत. तो वेळोवेळी मंजुलना विचारीत राहिला. ‘साहेब, आपके नाटक-वाटक का क्या हुआ?’  त्याच्या त्या प्रश्नाने मंजुलना बेजार केले. आपण तर नाटक करू शकत नाही आणि हा माणूस का म्हणून न चुकता नाटकाची चौकशी करतो आहे? एक दिवस मंजुलना जाणवले, तो माणूस म्हणत होता की ‘साहेब, तुम्ही तुमचे नाटक सोडून जरा माझ्याकडे पाहा आणि माझे म्हणता येईल असे नाटक करा...’ 

त्यांच्या पुस्तकात मंजुल म्हणतात, ‘की तो क्षण म्हणजे ‘थिएटर ऑफरेलेवेन्स’चा प्रारंभबिंदू होता.’ ‘थिएटर ऑफ रेलेवेन्स’ म्हणजे समर्पक, प्रसंगोचित, कालोचित रंगभूमी असे म्हणता येईल. मंजुल यांनी 1992 मध्ये ‘दी एक्सपेरिमेन्टल थिएटर फाऊंडेशन’ची स्थापना केली. त्यांनी ठरवले की आपल्याला अभिप्रेत असलेल्या रंगभूमीचे ‘थिएटर ऑफ रेलेवेन्स’चे तत्त्वज्ञान सांगत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीमधूनच आपण ते समाजासमोर मांडावे. काय होते ते तत्त्वज्ञान? तर, नाटक हे समग्र परिवर्तन घडवून आणणारे माध्यम आहे. त्यासाठी नाटकाची प्रत्यक्ष जीवनाशी, जगण्याशी जोड करू दिली पाहिजे. अर्थातच कलेसाठी कला ही प्रणाली त्यांना मंजूर नाही. आपली सामाजिक जबाबदारी स्वीकारून ती पार पाडणे हे रंगभूमीचे आद्य कर्तव्य आहे अशी त्यांची दृढ निष्ठा आहे. म्हणजेच रंगकर्मींनी आणि त्यांच्या रंगभूमीने सामाजिक जीवनाचा अतूट भाग होऊन स्वतःचा शोध जारी ठेवला पाहिजे. 

मंजुल यांना अभिप्रेत असणारी रंगभूमी, रंगकर्मीला आधी त्याच्या स्वतःशी जोडते आणि तिथून सुरुवात करून मग इतरांशी, सर्वांशी जोडते. म्हणूनच ते म्हणतात की एका बाजूला रंगभूमी व्यक्तिगत असूनही ती सामूहिक असते. मध्यमवर्गीय रंगभूमीप्रमाणे प्रेक्षकांना स्थितिशील राहू द्यायचे नाही, तर प्रेक्षकांधील चैतन्याला जागे करून त्यांना रचनात्मक कार्यासाठी उद्युक्त करायचे या रंगभूमीवरचे प्रमेय आहे. कृतिशीलतेचा असा ध्यास मंजुल यांच्या ‘थिएटर ऑफ रेलेवेन्स’च्या केंद्रस्थानी आहे. अर्थातच हे ओघाने येते की समाजाला स्थितिशील करणाऱ्या रूढी-परंपराच्याविरोधी उभे राहून वैज्ञानिक जीवन शैलीचा पुरस्कार करणारी नाटके करावी, प्रेक्षकांशी संवाद साधावा आणि एकूणच समाजाला, मानवतेच्या दिशेने कार्यप्रवण करावे ह्याला मंजुल यांची रंगभूमी प्राधान्य देते. मंजुल भारद्वाज यांच्या दृष्टीसमोर त्यांच्या रंगभूमीचे स्वरूप स्पष्ट होते. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्यांच्या आणि अर्थातच आपल्या समाजाच्या दृष्टीने अभिमानाची आणि समाधानाची बाब अशी की परिवर्तन घडून येत असल्याच्या खुणा दिसू लागल्या आहेत. 

मंजुल यांनी हेरले की लहान मुलांना स्वातंत्र्य दिले पाहिजे. त्यांना हवे ते आणि हवे तसे व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य. मंजुल आणि त्यांचे सहकारी बाल मजुरांपाशी गेले. बालमजुरांना त्यांनी बोलते केले. त्याचा एक परिणाम असा झाला की आपणसुद्धा कोणीतरी आहोत याची त्या लहानग्यांना जाणीव झाली. आता ते लिहितेही झाले. त्यांनी नाटके लिहिली, इतकेच नाही तर स्वतः दिग्दर्शनही केले. फक्त बालमजूर नाही तर, रस्त्यावर राहणाऱ्या, भीक मागणाऱ्या, झोपडपट्‌ट्यांतल्या मुलांपर्यंत मंजुल पोहोचले. त्या मुलांनीच नाटकासाठी विषय निवडले आणि स्वतःच्या अनुभवामधून नाट्यप्रयोग उभे केले. अशा नाट्यप्रयोगांचा उत्सव मंजुल यांनी कुठे घडवून आणावा? मुंबईध्ये पृथ्वी थिएटर, कर्नाटक संघ, बालभवन अशा प्रतिष्ठित मानल्या गेलेल्या नाट्यगृहांमध्ये. या घटनेतला जळजळीत उपरोध आपण समजू शकतो! आणि थेट अंदमान निकोबारमध्ये त्सुनामीग्रस्त मुलांना नाट्यमाध्यमाने कसा दिलासा दिला याचीही नोंद मंजुल करतात. 

युवा-युवतींना ‘थिएटर ऑफ रेलेवेन्स’मध्ये सहभागी करून घेताना, मंजुल यांनी एक विलक्षण प्रयोग करून पाहिला. रंगकर्मींना लोकांच्या जीवनशैलीचा प्रत्यक्ष अनुभव असायला हवा, तरच ते करणार असलेले रंगमंचीय विधान अधिकृत ठरेल असे ते निःसंदिग्धपणे म्हणतात. नाशिकमध्ये त्यांनी ठरवले की नाटक करू म्हणणाऱ्या युवा-युवतींनी कबीर नगरातल्या कसलीच ओळख-पाळख नसलेल्या कुटुंबात एक रात्र राहायचे. अरुंद गल्ल्या-बोळांतल्या झोपड्यांमध्ये, कच्च्या बांधकामाच्या घरांमध्ये त्यांनी राहायचे. अज्ञाताचे भय आणि त्याबद्दलची उत्सुकता म्हणजे काय असते, ते प्रत्यक्ष अनुभवायचे. भटक्या, उपेक्षित युवा-युवतींच्या स्वप्न-इच्छा-अपेक्षांचे भेदक वास्तव घेऊन येणाऱ्या ‘विश्व दि वर्ल्ड’ या प्रयोगाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आणि जर्मनीतील 13 शहरांमध्ये या नाटकाचे 24 प्रयोग सादर झाले. कधी प्रशस्त नाट्यगृहांत, कधी प्रशालांच्या सभागृहांत विद्यार्थ्यांसमोर ते प्रयोग झाले. 

अलीकडेच गुवाहाटीमध्ये एका युवतीच्या छेडछाडीच्या घटनेने सगळ्या देशाचे लक्ष वेधून घेतले. मंजुल यांच्या रंगभूमीने ‘छेडछाड क्यो?’ या नाटकामध्ये एकतर्फी प्रेम, मुलींवर होणारे हल्ले हाच विषय समोर आणला आहे. आता इतक्यातच दिल्लीमध्ये बलात्काराची जी अमानुष घटना घडली, ती कधी नाही इतक तीव्रतेने रंगभूमीच्या माध्यमामधून लोकशिक्षण करीत आलेल्या ‘थिएटर ऑफ रेलेवेन्स’चे महत्त्व अधोरेखित करीत आहे. 

मंजुल यांनी मुंबईला मढ आयलंड इथे वेश्या वस्तीतल्या महिला आणि त्यांच्या मुलांसाठी एक कार्यशाळा घेतली. जिथे आजकाल दूरचित्रवाणीच्या मालिकांचे आणि चित्रपटांचे चित्रीकरण दिवस-रात्र केले जाते, तिथे मंजुल अशी एक कार्यशाळा घेतात, याही घटनेतला उपरोध आपण लक्षात घेतला पाहिजे... त्या कार्यशाळेत वेश्यांच्या कलागुणांचे जे उन्मेष व्यक्त झाले ते खरे तर मंजुल यांच्या पुस्तकातून मुळातूनच वाचण्याजोगे आहेत. 

लोक-चळवळीला आवश्यक ते अर्थसाहाय्य लोकांकडूनच मिळते, याचा अनुभव मंजुल यांनाही आला. आपल्या 25 रंगकर्मींसमवेत विदर्भात गावोगावी परिवर्तनवादी नाटके सादर करीत असताना एका बौद्ध विहारात त्यांचा मुक्काम होता. तिथल्या लोकांनी या रंगकर्मीना भाकरी करून वाढल्या; त्याच विदर्भात काही वर्षांनंतर नागरिकांनी पैसे गोळा करून त्यांच्या हाती दिले. नाशिकमध्ये तर दरमहा प्रत्येकी 10 रुपये देण्याचे नागरिकांनी आश्वासन दिले! आणि पुढे जाऊन ‘क्राम’ या जगप्रसिद्ध संस्थेने ‘थिएटर ऑफ रेलेवेन्स’च्या कार्याची दखल घेऊन अर्थसाहाय्य देऊ केले. 

रंगभूमी व्याख्यान देत नाही. कोणत्याही अनुभवाचे वर्णन ती करीत नाही. आत्ता आणि इथे असा थेट अनुभव देते... म्हणूनच अनुबोधन आणि प्रबोधन करण्यासाठी ह्या दृश्य-श्राव्य माध्यमाचा उपयोग वर्षानुवर्षे केला जात असल्याचे आपण पाहतो. आपले भारुड उदाहरणार्थ. आणि ज्या चर्चने रंगभूमीवर बंदी आणली, त्याच चर्चने पुढे ख्रिस्ताच्या जीवनातील चमत्कारांचा साक्षात अनुभव देण्यासाठी, रंगभूमीचाच उपयोग केला! इथे एक गोष्ट आपल्यापुरती स्पष्ट करून घेतली पाहिजे. पथनाट्य किंवा सडक रंगभूमी केवळ एक चूक असू शकणार नाही. जनजागरण करण्याचा वसा घेतलेल्या कार्यकर्त्यांनीच त्या रंगभूमीचा अवलंब केला पाहिजे. 

लोकशिक्षणाच्या अखंड प्रक्रियेमध्ये नाट्यगृहात, सभागृहात, वस्त्यांध्ये, रस्त्यावर, जिथे जिथे आवश्यक असेल आणि शक्य असेल तिथे तिथे मंजुल यांचे ‘थिएटर ऑफ रेलेवेन्स’ पोचले आहे. आत्ताचे सामजिक व राजकीय पर्यावरण पाहता, लोकशिक्षणाची कधी नव्हती इतकी आवश्यकता आहे हे आपण जाणतो. त्यामुळे मंजुल यांच्या कार्याबद्दल आपल्याला कौतुक वाटेलच. प्रश्न आहे तो हा की कोण कोण आणि कितीजण आपापल्या अवकाशात रंगभूमीच्या माध्यमामधून लोकशिक्षणाच्या प्रक्रियेला साहाय्य करणार? अतुल पेठे यांनी हिमतीने, चिकाटीने गो.पु. देशपांडे यांच्या ‘सत्यशोधक’ नाटकाचे शंभर प्रयोग केले किंवा राजकुमार तांगडे आणि नंदू माधव ‘शिवाजी अंडरग्राउंड इन्‌ भीमनगर मोहल्ला’चे प्रयोग करीत आहेत आणि दोन्ही प्रयोगांना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे! नवे वर्ष सुरू होताना मराठी रंगभूमीवरील या दोन आश्वासक आणि अभिनंदनीय घटना! 

मंजुल भारद्वाज- थिएटर ऑफ रेलेवेन्स 
संपादक : संजीव निकम 
प्रकाशक : दि एक्सपेरिमेन्टल थिएटर फाऊंडेशन, मुंबई 67. 
पृष्ठे : 142, 
किंमत : 200/- रुपये

Tags: एनएसडी थिएटर ऑफ रेलेवेन्स सत्यशोधक राजकुमार तांगडे अतुल पेठे मंजुल भारद्वाज माधव वझे NSD Theatre of Relevance Satyshodhak Rajkumar Tangade Atul Pethe Manjul Bhardwaj Madhav Vaze weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

माधव वझे
vazemadhav@hotmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके