डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

येत्या शतकातील रंगभूमी : आंतरिक सत्याचा वेध घेईल ?

भौतिक सुखाची अभिलाषा एका टोकापाशी समाजाला नेईल. सांस्कृतिक अधःपतनाचा तळ जसा काही गाठला जाईल आणि पुन्हा चक्र उलट्या दिशेने फिरेल - पंचेंद्रियांना आकलन होणाऱ्या वास्तवापलीकडचे, आंतरिक, आत्मिक सत्य, त्या परिस्थितीत कोण कोणाला आतून धडका देत राहील; ते आंतरिक सत्य अत्यंत वैयक्तिक अशा शैलीमधून प्रकट होईल - प्रतीकवादी, अभिव्यक्तीवादी व अतिवास्तववादी रंगभूमीची ती सुरुवात असेल.

मावळत्याकडे पाठ फिरवून उगवत्याला नमस्कार करावा या जनरीतीला अनुसरून आपण 21व्या शतकाला सामोरे जात आहोत. विसाव्या शतकाचा कंटाळा आला म्हणून की काय, आपल्यापैकी अनेकांनी गेल्या वर्षीच म्हणजे 99 संपत असतानाच शतक संपण्याची समजूत करून घेतली! पुढे, पुढे जाण्याची फारच घाई झालेली दिसतेच आहे. अवतीभोवती ‘हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे’ - अशा वाक्प्रचाराचा अर्थ शाळेमध्ये परीक्षेत विचारायचे, त्याची आता आठवण येते आहे. एकविसाव्या शतकातली मराठी रंगभूमी कशी असेल? येत असलेल्या शतकात मराठीपण असे काही शिल्लक असेल तरी का? ते राहिले, तर ‘मराठी रंगभूमी’ अशी काही अस्तित्वात असेल का? - असे प्रश्न लगोलगच कोणाच्या मनात आल्याशिवाय राहणार नाहीत. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मराठी रंगभूमीने स्वतःपुरती दोन प्रयोजने ठरवून घेतली होती. पहिले प्रयोजन मनोरंजन आणि दुसरे शिक्षण. कोणतीही रंगभूमी प्रथमदर्शनी मनोरंजन करते, हे आपण अनुभवतो. पडदा बाजूला गेला, रंगमंचावर प्रकाशझोत आला की पहिले निमंत्रण असते ते आपल्या डोळ्यांना आणि कानांना.

 रंगमंचावर आपण जे जे पाहतो, तिथून जे जे काही आपण ऐकतो, त्याचा एक स्वतंत्रपणे आनंद आपण घेत असतो. नेपथ्य, कलाकार करीत असलेल्या हालचाली, त्या हालचालींची मिळून होत असणारी तीव्रता, प्रकाशदिव्यांची लयपूर्ण उघडझाप, प्रकाशाचे रंग, नटनटींच्या नाट्यपूर्ण संभाषणांमधून पाझरणारे संगीत, संभाषणाच्या दरम्यान कमी-अधिक शांतता... (तीही आपण ऐकतो!) प्रसंगोचित पार्श्वसंगीत, वेशभूषा, रंगभूषा.. तो सगळा मिळून ऐंद्रिय अनुभव असतो. आतली इंद्रिये सुखावतात. कारण रंगमंचावर जे जे काही घडते, ते सुंदरच असले पाहिजे अशी तिथली पूर्वअटच असते. तिथली झोपडपट्टीही सुंदर असते, अशा अर्थाने की- आवश्यक ती निवड करून, नको तो तपशील टाळून, जाणीवपूर्वक अशी मांडणी तिथे केलेली असते. तो कलात्मक आविष्कार असतो, तर तिथल्या झोपडपट्टीचेही ऐंद्रिय आवाहन असते. पण मनोरंजन म्हणजे केवळ इंद्रियांना सुखावणारे एवढेच असते काय? मौखिक मनोरंजन असते किंवा नाही? गणित म्हणजे विलक्षण करमणूक आहे, असे शाळेच्या दिवसांत गुरुजींनी सांगितले तेव्हा ‘आ’ वासून त्यांच्याकडे आम्ही गणंग पाहत राहिलो होतो... 'बुद्धिबळाचा डाव' टाकून तासन्तास, एकाग्र चित्ताने खेळणारे असतात. त्यांचा आनंद कोणत्या प्रतीचा असतो? ऐंद्रिय आनंदाच्या पलीकडचा असा काही तो असतो… अस्सल रंगभूमी असा दोन्ही प्रतींचा अनुभव व आनंद देते. स्वातंत्र्यपूर्व रंगभूमीने ऐंद्रिय आनंद भरभरून लुटला. (संक्रात जवळ येते, तेव्हा लुटण्याची आठवण होते.) पण बौद्धिक आनंद मात्र तिने अभावानेच दिला. त्या रंगभूमीने दुसरे प्रयोजन मानले ते शिक्षणाचे. ‘शिक्षण’ या संज्ञेने काहीसा गोंधळ उडविलेला आपल्याला दिसतो. शिक्षण म्हणताच आपल्या मनात येतो आदर्शवाद व आशावाद. स्वातंत्र्यपूर्व रंगभूमीने आदर्शवादी व आशावादी असणे पसंत केले. शिक्षणामध्ये अभिप्रेत असणारा सत्याचा वेध त्या रंगभूमीने दृष्टीआड केला. म्हणूनच तर ते मराठी नाटक ‘सुखान्त’ होते. गडकऱ्यांच्या ‘एकच प्याला’चा किंवा खाडिलकरांच्या ‘सवाई माधवराव पेशवे यांचा मृत्यू’ यांसारखे आणखी काही अपवाद सोडले, तर मराठी नाटक ज्याचा शेवट गोड, ते सारे गोड- असे घोकत आले आहे. खुद्द गडकऱ्यांनीही भाववंधन, पुण्यप्रभाव ‘सुखान्त’ केले. इब्सेनप्रणीत वास्तववादी मराठी नाटकांची कथा काही वेगळी नाही. इब्सेनचे प्रखर सत्य डोळे दिपवणारे ठरले.

 आयुष्यामध्ये व व्यवसायामध्ये अनेक चित्रविचित्र आव्हानांना झेलणारे आचार्य अत्रे यांना इब्सेनचे प्रखर सत्याचे आव्हान पेलवले नाही. इब्सेनची नोरा घराबाहेर पडली व तिने सर्व युरोपचे दरवाजे ठोठावले, असे म्हटले जाते. अत्र्यांची निर्मला मात्र पुन्हा घरातच राहते. ‘स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता’ असल्याचे जाहीर करून, पत्नीपणाच्या व मातृत्वाच्या अशा दुहेरी जोखडात अत्र्यांनी स्त्रीला बांधूनच ठेवले... भोंगळ आशावाद व आदर्शवाद अत्र्यांच्या नाटकांनाही चुकला नाही. वरेरकर, रांगणेकर यांची कथा थोड्याफार फरकाने तशीच आहे. हा आदर्शवाद व आशावाद, एकूण व्यावसायिक मराठी रंगभूमीचे एक व्यवच्छेदक लक्षण ठरला आहे. 'परदेशांत स्थायिक न होता, ‘मी भारतातच राहावे- ते का राहावे’ याचे मला पटेल असे फक्त एकच कारण ‘तुम्ही सगळे सांगा...’ असा सडेतोड प्रश्न विचारणारा उच्चशिक्षित तरुण, नाटककार कानेटकर नाटकामध्ये दाखवितात. गारुड्याप्रमाणे साप-मुंगसाची लढाई खेळवितात आणि शेवटी नाटक सुखान्त! उच्चशिक्षित तरुण ज्या कारणासाठी भारतातच राहण्याचे मान्य करतो ते कारण केवळ भोंगळ, उपरे, नाटक संपविण्यासाठी आणलेले... कानेटकरांसारख्या ज्येष्ठ नाटककाराने जिथे भोंगळ आदर्शवादी व आशावादी नाटकांचा रस्ता घातला, त्या रस्त्याने नंतरच्या बहुतेकांनी जाणे पसंत केले… एकूणच माणसाचा, त्याच्या स्खलनशीलतेचा, त्याच्या अस्तित्वाचा, त्याच्या सद्य:कालीन जाणिवांचा वेध घेणारे तेंडुलकर, आळेकर, एलकुंचवार, श्याम मनोहर हे अल्पसंख्याक ठरले आहेत. औद्योगिकीकरणाबरोबर आलेल्या निरनिराळ्या प्रकारच्या ताणांचे ओझे अगोदरच असह्य झाले असताना, गंभीर प्रकृतीच्या त्या नाटकांची आणखी डोकेदुखी कशाला, असा प्रश्न विचारला जात आहे. सुधाकराची डोकेदुखी दूर होण्यासाठी त्याला औषध देणा-या तळीरामाप्रमाणे. नाटककारांमध्ये तळीराम निर्माण झाले आहेत व ताण दूर करणारे गोडगोड नाटकांचे औषध देऊ करताहेत. माणसाच्या, निदान मराठी माणसाच्या जगण्याबद्दलची अंतर्दृष्टी देणारे नाटक लिहिण्यामध्ये ना नाटककारांना रस आहे, ना तशी नाटके पाहण्यामध्ये मराठी प्रेक्षकांना. तथाकथित समस्याप्रधान नाटके लिहिताना अगदी कौटुंबिक समस्येच्याही तळाशी ‘राजकारण’ असते. ते सोयीस्करपणे नजरेआड केले गेले आहे. पृष्ठस्तरीय, उथळ असे दर्शन नाटकांमध्ये येत राहिले आहे व समस्याप्रधान नाटक पाहिल्याचे, मधाचे बोट चाखून मराठी प्रेक्षकाचे समाधान झाले आहे! हसणे आणि रडणे- दोन्ही कृतकच राहिले आहे.

पृष्ठस्तरीय मनोरंजनासाठीच, गेली तर मराठी माणसे नाटकाला जात आहेत. पेजर आणि मोबाइल्स नाटक पाहताना तरी बंद ठेवा, अशी विनंती करावी लागत आहे. नाट्यगृहात खाद्यपदार्थांबरोबर शीतपेयांच्या बाटल्याही घेऊन येणारे आता दिसू लागले आहेत. येणा-या काही वर्षांमध्ये नाटकांच्या ध्वनिचित्रफितींना मागणी असेल. घरबसल्या नाटक पाहिजे तसे पाहावे (किंवा केव्हाही बंद करावे)- असा प्रकार वाढत राहीलसे दिसते. इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या की, भारतातच काय, पण जगभर भ्रष्टाचार सुरू आहे. तर मग मराठी रंगभूमीवरच काय, पण जगभरच्या रंगभूमीवरही असेच सुरू आहे असे सांगून समर्थन करता येईलच.

मराठी मध्यमवर्गीयांनीही, काळाची एक गरज- असे मानून ‘सिलीकॉन व्हॅली’कडे धाव घेतली आहे. ‘कॉर्पोरेट' जग, जागतिकीकरण’ हे परवलीचे शब्द झाले आहेत. माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्राचे अफाट क्षितिज कवेत घेण्यासाठी जगभर प्रचंड स्पर्धा सुरू आहे व त्या स्पर्धेत मराठी युवा-युवतींनी आतापर्यंत आपला ठसा उमटविला आहे. अशा वातावरणात नाटक करण्यासाठी तर नाहीच, पण नाटक पाहण्यासाठीही या व नंतरच्या पिढीला वेळ असेल काय? एकाच उपाहारगृहात, एक माणूस, तिथेच दुसऱ्या एका कोपऱ्यात बसलेल्या माणसाशी मोबाइलवरून बोलत असण्याचे चित्र आता आपण पाहू शकतो; तर नाटक करण्यासाठी किंवा पाहण्यासाठी ते एकत्र येतील, असे कसे म्हणावे? परिस्थिती गंभीर आहे. नाटक करण्या-पाहण्यामध्ये एक तर रस दिसत नाही आणि रस असलाच तर तो हलके-फुलके मनोरंजन पुरविणाऱ्या नाटकांमध्ये आहेसे दिसते. 

एक कविता आठवते 'What then?" नावाची. शाळेमध्ये असताना हुशार विद्यार्थी म्हणून सगळ्यांनी कौतुक केले खरे, पण स्वतःचाच आतून प्रश्न आला, "पुढे काय ?" लग्न केले. मुले झाली, स्वतःचे टुमदार घर, बागबगिचा वगैरे सगळे ओघाने आले व पुन्हा प्रश्न आला, पुढे काय?' लेखक म्हणून नाव झाले. मोठ्या मंडळींमध्ये ऊठ-बस सुरू राहिली. ग्रंथालय तर सजलेच होते... तरी आपला प्रश्न आलाच, 'पुढे काय?'- आयुष्य आपण आपल्या मनात होते तसे जगलो, यशस्वी झालो असे अपार समाधान वाटत असतानाच प्रश्न आला, ‘पुढे काय?’ आत्यंतिक सुखाच्या अभिलाषेपोटी फाऊस्टने स्वतःचा आत्मा मेफिस्टोफलेजला देऊन टाकला... पण त्याला उपरती झाली. त्या उपरतीमध्येच त्याचा विजय झाला होता. भौतिक सुखाची अभिलाषा एका टोकापाशी समाजाला नेईल. सांस्कृतिक अधःपतनाचा तळ जसा काही गाठला जाईल आणि पुन्हा चक्र उलट्या दिशेने फिरेल - पंचेंद्रियांना आकलन होणा-या वास्तवापलीकडचे, आंतरिक, आत्मिक सत्य, त्या परिस्थितीत कोण कोणाला आतून धडका देत राहील, ते आंतरिक सत्य अत्यंत वैयक्तिक अशा शैलीमधून प्रकट होईल.  प्रतीकवादी, अभिव्यक्तीवादी व अतिवास्तववादी रंगभूमीची ती सुरुवात असेल. हा भाबडा आशावाद नाही. पश्चिमेच्या रंगभूमीच्या इतिहासात, वेगळ्या संदर्भात, असे घडलेले आपण पाहतो. पण आंतरिक सत्याची ओळख समाजातील सगळ्यांना थोडीच होईल? संवेदनशील युवा-युवतींना, स्वतः घेत गेलेल्या अनुभवांमुळे ती होईल आणि तसे युवा-युवती पुन्हा अल्पसंख्याकच असणार. जगप्रदक्षिणा करून ते आपल्या घरी आलेले असतील. त्यांच्या मराठीपणाला जगप्रदक्षिणेचा संदर्भ राहीलच. अल्पसंख्याकांनी स्वतःला अनुभवाला आलेले, स्वतःला जाणवलेले सत्य एकसारखे व्यक्त करीत राहिल्यानेच कोंडी फुटेल.
 

Tags: प्रबोधन मनोरंजन उद्देश सद्य:कालीन मराठी रंगभूमी माधव वझे awakening entertainment objective Marathi drama now-a-days madhav vaze weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

माधव वझे
vazemadhav@hotmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके