डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

बादल सरकार नाट्यमहोत्सव : एक जुलूस, माणसांचा

बादल सरकार हे आधुनिक भारतीय रंगभूमीवरील द्रष्ट्ये रंगकर्मी. समांतर मराठी रंगभूमीने याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करीत एक देखणा सोहळा दिग्गजांच्या सहभागासह साजरा केला, त्याचा आँखो देखा हाल.

'जागर' ही पुण्यातील समांतर नाट्यसंस्था. रंगभूमीने सतत वर्तमान काळाचे भान ठेवले पाहिजे ही 'जागर'ची भूमिका. गिरीश कर्नाड यांचे 'तुघलक' नाटक पुन्हा नव्याने 'जागर’ ने रंगमंचावर तीन-चार वर्षांपूर्वी आणले, ते याच भूमिकेतून. बादल सरकार यांच्या 'जुलूस’ चे प्रयोग करण्याचा विचार पुढे आला, तोही ते नाटक आजही स्वतःचे संदर्भ जागवीत असल्यामुळे. अमोल पालेकरने तीसएक वर्षांपूर्वी दिग्दर्शन केलेला ‘जुलूस’ चा प्रयोग आजही अनेकांना आठवतो. प्रयोग चैतन्यपूर्ण तर होताच; शिवाय अगदी व्यावसायिक नाट्यगृहाबरोबरच तो गच्ची, बाग, उपहारगृह, छोटेखानी सभागृह अशा कोणत्याही जागी केला जात असे. आणि प्रयोगाअखेरीचा प्रेक्षकांचा थेट सहभाग तर चर्चेचाच विषय त्यावेळी झाला होता.

अमोलची जुनी ओळख. आता पुण्यात स्थायिक झालेला, त्यानेच 'जागर’च्या प्रयोगाचे दिग्दर्शन करावे, असा विचार पुढे आला; अमोलनेही लगेचच मान्य केले. मात्र पूर्वीच्याच त्या प्रयोगाचे पुन्हा दळण न घालता, बदलत्या काळाचे संदर्भ घेऊन, 'जुलूस’च्या संहितेला पुन्हा नव्याने सामोरे जायचे ठरले. तालमी सुरू झाल्या. पुण्यातल्या 25-30 महाविद्यालयीन मुला-मुलींचा तालमींच्या वेळचा उत्साह आणि त्यांनी आपापल्या अनुभवांमधून प्रयोगाला देऊ केलेले आधुनिक संदर्भ याबद्दल खरे तर स्वतंत्रपणे लिहिले पाहिजे.

प्रयोगाला आपण बादल सरकार यांना अगदी खास निमंत्रण करून आणावे असे आम्हा सगळ्यांच्या मनात आले आणि अमोलने त्या दृष्टीने बादलदांची चौकशी सुरू केली तर कळले की दोनएक महिन्यापूर्वी बादलदांना कलकत्त्यामध्ये गंभीर अपघात झाला होता. 'जागर’चे निमंत्रण घेऊन अमोलने कलकत्त्याच्या त्याच्या भेटीमध्ये, बादल सरकारांचीही भेट घेतली. ती भेट घेऊन परततानाच 'बादल सरकार नाट्य महोत्सवाची' योजना त्याने ठरवली असावी. कारण तो परतल्यावर त्याने त्या योजनेबद्दल सांगताना, 'जागर'च्या ‘जुलूस’ चा प्रयोग हा त्या महोत्सवाचा केवळ एक भाग असणार आहे, हे स्पष्ट केले. त्या योजनेचा आवाका पाहता, 'जागर'ला तशी योजना जमली नसती, ते ‘जागर’ च्या लक्षात आले.

बादलदा आता 80 वर्षांचे होते. 15 जुलै 1925 चा जन्म. नगररचनाकार म्हणून भारत सरकारचे प्रतिनिधी या नात्याने नायजेरियाला जाऊन आलेले ते बादल सरकार आता फारसे कोणाला माहीत नाहीत. पण ते माहीत असायला मात्र पाहिजे त्याला कारण आहे, नायजेरियात केलेल्या कामाचे जे पैसे मिळाले, ते बादलांनी कलकत्त्यात परतल्यावर स्वतःच्या नाट्य चळवळीसाठी खर्च केले. सगळेच देऊन टाकल्यावर, नाटकासाठी पुन्हा पैसे जमविण्याची पाळी त्यांच्यावर आली... तर अमोलला जाणवले, की 'जुलूस’च्या प्रयोगाच्या निमित्ताने बादल सरकार पुण्यामध्ये येतीलच, पण हेच निमित्त साधून आधुनिक भारतीय रंगभूमीवरील या दृष्ट्या रंगकर्मीबद्दलची आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची केवळ 'जागर' संस्थेला किंवा अमोल पालेकरलाच नाही, तर संपूर्ण समांतर मराठी रंगभूमीला ही उत्तम संधी आहे. 

आणि खरोखरच बादल सरकार नाट्यमहोत्सव हा एक कृतज्ञता सोहळाच होता. कशाबद्दलची कृतज्ञता ?

1960 ते 80 या दोन दशकांमध्ये समांतर भारतीय रंगभूमीवर प्रचंड उलथापालथ झाली. पंचेंद्रियांनी ज्ञात होणाऱ्या वास्तवाच्या अतीत असणाऱ्या वास्तवाची केवळ ओळखच त्या रंगभूमीने करून दिली असे नाही, तर त्या वास्तवाच्या डोळ्याला डोळा भिडवण्याचे अतुलनीय धैर्य त्या रंगभूमीने दाखविले. आधुनिक रंगभूमीने माणसाच्या अस्तित्वाबद्दलचे प्रश्न उपस्थित केले. सामाजिक, धार्मिक, कौटुंबिक संस्थांनी निर्माण केलेल्या मूल्यव्यवस्थेला तेव्हा उद्धट वाटणारे प्रश्न केले. अर्थातच नैतिकतेचे नवे संदर्भ शोधले. जीवनाचा वा जगण्याचा अर्थ शोधण्याचा व त्यामधून हाती लागलेली उत्तरे आपल्या नाटकांमधून, नाटयप्रयोगांमधून व्यक्त करण्याचा स्वतंत्रपणे प्रयत्न केला. त्या प्रयत्नांमध्ये रंगभूमीची नव्याने मांडणी केली. संरचनेच्या स्वतःच्या पद्धती निर्माण केल्या. संपूर्ण देशभर समांतर रंगभूमीवर एक उधाण आले होते. मराठी, हिंदी, कन्नड व बंगाली रंगभूमीवर एकाच वेळी प्रचंड घडामोडी होत होत्या, भारतीय रंगभूमीवर रंगाभिसरण घडून आले, तो हा काळ. त्या रंगाभिसरणाच्या त्या रोमहर्षक काळामध्ये, अग्रभागी होते, बादल सरकार, तेंडुलकर, मोहन राकेश व गिरीश कर्नाड. या चारही नाटककारांचे संदर्भ वेगवेगळे लेखनपद्धती वेगवेगळ्या; पण आधुनिक संवेदना हा त्यांच्यामधला महत्त्वाचा दुवा. माणूसपणाचा शोध हे त्यांच्याकडचे समान सूत्र.

त्यातही बादल सरकार पुन्हा अगदी वेगळे. 'नाटककार' असे त्यांनी स्वतःला कधीच म्हटले नाही. ते नाटक खेळणारे रंगकर्मी. त्यांच्या रंगभूमीची वाटचाल, त्यांच्या रंगभूमीचा विकास अपरिहार्यपणे त्यांच्यातील नाटककार-नट-दिग्दर्शकाशी नाते सांगतो. सगळ्या सुविधा असणाऱ्या सुसज्ज नाट्यगृहातील चौकटीतील रंगमंचावरच, परंपरेप्रमाणे बादल सरकार व त्यांची शताब्दी संस्था नाटके करीत होती. पण तशा बंदिस्त नाटयगृहातील रंगमंचाच्या चौकटीमध्ये नाटके करताना ते खूप अस्वस्थ होते. एक तर, पाश्चात्यांकडून आपण ती रंगभूमी उचलली होती. शिवाय तेथे नेपथ्य, प्रकाशादि सुविधा मिळवून नाटके करायची तर ते फारच खर्चिक होते; नाटक करणारे आणि ते पाहणारे यांचे चक्क दोन तट ही त्या रंगभूमीची एक अटच होती. आणि पुन्हा, प्रेक्षकांमध्येही तट होतेच होते. जास्त दराचे तिकीट परवडणारे पुढील रांगांमध्ये, तर कमी दरातले, मागच्या रांगांमध्ये... प्रेक्षागृहात अंधार केल्यामुळेही, प्रेक्षक इतर प्रेक्षकांपासून तुटल्या सारखा झालेला. कलकत्यामध्ये हा अनुभव बादलदा व त्यांच्या सहकाऱ्यांना येत होता. एक मात्र दिलासा होता. पाश्चात्त्य रंगभूमीवरील नाटकांच्या भाषांतर-रूपांतरांचे प्रयोग पाहताना लक्षात येत होते, की माणसाच्या स्वातंत्र्याबद्दलचे प्रश्न ती नाटके वारंवार उपस्थित करीत होती.

दुसऱ्या बाजूला होती, एतद्देशीय रंगभूमी. आपली भारतीय रंगभूमीची परंपरा, जत्रा, तमाशा, भवाई, नौटंकी अशी प्रांतोप्रांती खेड्यापाड्यांतून, गावागावांतून पाहायला मिळाली अ-नागर रंगभूमी. तिथे कसलीच चौकट नव्हती. पाहणारे आणि करणारे यांच्यामध्ये अंतर नव्हते. प्रेक्षकात तट नव्हते... उत्साहाने, उत्स्फूर्ततेने उसळणारी ती रंगभूमी होती. एक मात्र खंत होती; ती रंगभूमी पौराणिक कथा-विषयांपाशी अडकून पडली होती. आधुनिकतेचे कोणतेच भान त्या लोकरंगभूमीला नव्हते.

वसाहतवादी, चित्रचौकटीतील रंगभूमी ही एक; तर लोकरंगभूमी ही दुसरी. दोन्हीची काही बलस्थाने होती; त्याप्रमाणे त्यांची म्हणून काही मर्यादाही होती. तर मग या दोन रंगभूमींचे गुणविशेष घेऊन, एक तिसरीच रंगभूमी उभी केली पाहिजे ! आधुनिकतेचे भान असणारी पण लोकरंगभूमीप्रमाणे सर्वार्थाने मुक्त असणारी अशी तिसरीच एक रंगभूमी...

1978 मध्ये प्रकाशित झालेल्या 'दी थर्ड थिएटर' या त्यांच्या पुस्तकात बादलदांनी हा प्रवास, त्यांच्या रंगभूमीचा हा विकास विशद केला आहे. ‘एवम् इंद्रजित', ‘पगला घोडा’ ही आपली पारंपरिक चौकटी रंगमंचामध्ये केलेली नाटके, मागे तिथेच सोडून बादल सरकार यांनी 'अंगणमंच' या रंगभूमीची सुरुवात केली. आता त्यांची रंगभूमी लोकांपर्यंत जाऊ पहात होती. वस्त्यावस्त्यांतून नाट्यप्रयोग करताना बादलदांच्या लक्षात आले की नाटक पाहण्यासाठी लोकांकडे पैसे नाहीत.... तेव्हा बादलदांनी 'मुक्त' प्रवेश अशा लोकांना द्यायला सुरुवात केली. प्रयोगाअखेर झोळी फिरवून येईल ते उत्पन्न!

‘स्वातंत्र्य’ बादल सरकार यांच्या रंगभूमीच्या केंद्रस्थानी आहे. सर्व प्रकारच्या बंधनांमधून, जाच व काच यांमधून मुक्त होण्याची आवश्यकता व शक्यता बादलदांच्या रंगभूमीने व्यक्त केली. प्रयत्न करीत असताना, आपल्या इच्छित मुक्कामावर पोचली नाही तरी चालेल, पण चालत राहण्याचेही काही महत्त्व आहे, हे तत्त्व अधोरेखित करताना, बादल सरकार जीवनावरील, माणसांवरील प्रेमच व्यक्त करतात... निराशावादी वाटणाऱ्या त्यांच्या नाटकांमध्ये निरंतरचे एक आश्वासन - शोधत राहिले तर सापडेल - अनुस्यूत आहे.

बादल सरकार चित्रचौकटी रंगमंचावर नाटके करीत होते- हे तुमच्या आमच्या सारखे झाले. पण त्यांना जे प्रश्न पडले, त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांनी जो प्रदीर्घ प्रवास आरंभला आणि आपल्या भूमिकेपाशी घट्ट उभे राहून, रंगभूमीच्या मूळ स्वरूपाचे सामर्थ्य त्यांनी ज्या सातत्याने अधोरेखित केले... ते मात्र त्यांचे, खास त्यांचेच आहे. ते काही तुमच्या आमच्या सारखे नाही.

त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करायची ती एका रंगकर्मीबद्दलची; समर्पण वृत्तीबद्दलची; त्यांनी दाखविलेल्या अजोड धैर्याबद्दलची, तत्त्वज्ञ बादलदा यांच्या बद्दलची.

21 आणि 22 ऑगस्टला पुण्यातील सिंबॉयसिस महाविद्यालयाच्या विश्वभवन सभागृहामध्ये सत्कार सोहळा, भाषणे, नाट्यवाचन असे कार्यक्रम; तर त्याच आवारातील उपाहारगृहाच्या जागेमध्ये 'जुलूस'चा प्रयोग -असा भरगच्च कार्यक्रम असणारा हा बादल सरकार नाट्यमहोत्सव अत्यंत उत्साही वातावरणात, कृतज्ञतेच्या भावनेने साजरा झाला. महोत्सवाच्या सगळ्या कार्यक्रमांसाठी असणाऱ्या रु. 300 आणि रु. 200 च्या देणगी प्रवेशिका हातोहात विकल्या गेल्या. (रु. 300 - रु. 200 असे प्रेक्षकांमधले तट मात्र बादलदांच्या भूमिकेशी विसंगत ठरले ! ) अमोल पालेकरच्या शब्दाला मान देऊन विजय तेंडुलकर, पं. सत्यदेव दुबे, अमरिश पुरी, नासिरुद्दीन शाह, रत्ना पाठक-शाह, सुलभा देशपांडे, सचिन खेडेकर, ज्योती सुभाष, रोहिणी हट्टंगडी, शिशिर शर्मा यांच्या बरोबरच श्री. पु. भागवत, पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ, अ.भा. नाट्य संमेलनाचे अध्यक्ष शं. ना. नवरे, महेश एलकुंचवार निरनिराळ्या कार्यक्रमांत सहभागी झाले. नाना पाटेकरांनी तर संपूर्ण नाट्यमहोत्सवाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी स्वीकारली!

या संपूर्ण नाट्यमहोत्सवात नाना पाटेकरांचे सूत्रसंचालनही स्वतंत्रपणे दखल घ्यावी असे ठरले. अत्यंत औचित्यपूर्ण अशी शब्दयोजना, प्रेक्षकांनाही जाणवलेली त्याची निखळ नम्रता, त्याचा सर्वांना परिचित असणारा आश्वासक आवाज आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्याची विनोदबुद्धी व अर्थातच उत्स्फूर्तता - हे सगळे विलोभनीय होते. रंगभूमीचा आमचा तो छंद; बादलदांचा आहे तो ध्यास, अशा अगदी मोजक्या पण नेमक्या शब्दांमध्ये त्याने बादलदांचे मोठेपण सांगितले... एकदा काहीसा तणाव निर्माण झाला असता, प्रसंगावधान ठेवून त्याने दुसऱ्या कोणामार्फत तिसऱ्याची क्षमाही मागितली.

बादलदा यांचा सत्कार विजय तेंडुलकर यांच्या हस्ते व्हावा, हे ओघाने आलेच. त्यामध्ये औचित्य होते. तेंडुलकरही भारावल्यासारखे झाले. बादलदांना त्यांनी बंधूभावाने मिठीत घेतले, तो नाट्यमहोत्सवातला अत्यंत नाट्यपूर्ण क्षण होता असे म्हटले पाहिजे. आपण आपल्या या भावाला भेटण्यासाठी खरे तर आलो आहोत, असे तेंडुलकरांनी वारंवार बोलून दाखवले. दिल्लीमधील ‘नाट्यमहोत्सव संस्थान’ मध्ये आज अनेक दशके भारतीय रंगभूमीचे दस्तऐवज कष्टपूर्वक मिळवून जतन करीत आलेल्या प्रतिभा अग्रवाल खास महोत्सवासाठी आल्या होत्या. बादलदांच्या 18 नाटकांची त्यांनी हिंदीमध्ये भाषांतरे केली आहेत आणि त्यांतली बरीचशी पुस्तकरूपाने उपलब्ध आहेत. बादलदा जेव्हा नाटके करण्यासाठी लोकांना सभासद करवून घेऊन, पैसे जमवित होते, तेव्हाची एक र्हुद्य आठवण प्रतिमाजींनी सांगितली. सभासद म्हणून प्रत्येकाकडून 100 रुपये बादलदा घेत होते. प्रतिमाजींनी स्वतःचे 100 रुपये दिलेही होते. नंतर काही महिन्यांनी बादलदा स्वतः प्रतिमाजींना भेटायला गेले; ज्या योजनेसाठी पैसे घेतले होते, ती प्रत्यक्षात आली नसल्यामुळे आपण 100 रुपये परत करायला आलो असल्याचे बादल सरकार यांनी प्रतिमाजींना सांगितले... पंडित सत्यदेव दुबे यांनी 60 ते 80च्या दोन दशकांमध्ये दिग्दर्शक म्हणून मराठी-हिंदी-इंग्रजी रंगभूमीवर अक्षरशः राज्य केले. बादलदांची ‘एवम् इंद्रजित', ‘पगला घोडा' ही दुबेंची आवडती नाटके. आयुष्यावर प्रेम करणारा माणूस असे त्यांनी बादलदांचे वर्णन केले व बादलदांची नाटके पाहायची, तर प्रेक्षकांनी आपापली आयुष्ये घेऊन ती नाटके पाहण्यासाठी जायला हवे असे आग्रहपूर्वक सांगितले. दुबे म्हणाला, ते ऐकण्यासारखे आणि चिंतन करावे असे होते.

सत्कार समारंभ पहिल्या दिवशी झाला तरी दुसऱ्या दिवशी महेश एलकुंचवार यांचे 'बादलबाबूंचा वारसा' असा विषय घेऊन व्याख्यान होणार होते. पण महेशने व्याख्यान दिले नाही. बादलबाबूंना एक पत्र- अशा रूपात त्याने बादलबाबूंबद्दलच्या त्याच्या भावना व्यक्त केल्या. बादलदांना माणसांबद्दल वाटणारे प्रेम, रस्त्यावरच्या माणसांबद्दल नाटके करण्याची त्यांची असोशी, बादलदांनी जाणीवपूर्वक वास्तववादाची करून टाकलेली ऐशीतैशी, नाटकाच्या आकृतीबंधापेक्षा, आशयालाच त्यांनी सतत दिलेले महत्त्व - आणि हे सगळे करताना त्यांनी दाखवलेले अतुलनीय धैर्य – किंबहुना ते अतुलनीय धैर्य हेच बादलबाबूंचे वैभव आहे... अशा बादलदांच्या अनेक वैशिष्ट्यांचा मागोवा त्या पत्रात घेतला होता. “आपण ठरल्या मुक्कामावर पोचतो किंवा नाही यापेक्षा त्या दिशेच्या शोधात, त्या दिशेच्या वाटेने तुम्ही चालत राहिलात", असा बादलदांचा कृतज्ञतापूर्वक गौरव त्यामध्ये होता.

महेश एलकुंचवार यांच्या मुद्देसूद व उत्कृष्ट अशा पत्राइतकेच लक्षात राहणारे भाषण होते, सत्यदेव दुबेचे. नाट्यमहोत्सवाच्या अखेरीला ते झाले. दुबे नेहमीच उत्कट आणि मुद्याचे बोलतो. पण भाषण मुद्देसूद मात्र असत नाही. त्या त्या वेळी मनात येईल ते ते बोलत असतो. संगती असते; पण शोधावी लागते. कदाचित तशी सवय असावी लागते. म्हणून तर दुबे भरकटतो आहे असे वाटल्यामुळे, प्रेक्षागृहामधून एका विदुषीने त्याला सुनावले की प्रेक्षक बादलदांचे विचार ऐकण्यासाठी आले आहेत. अर्थातच दुबे डिवचला गेला; आणि डिवचला गेलेला दुबेच अनेकदा सुरेख बोलून गेला आहे. तसेच झाले. बादलदांची 'एवम् इंद्रजित', 'पगला घोडा' ही नाटके मराठी, हिंदी, इंग्रजीत आणि तीही निरनिराळ्या पद्धतीने केलेल्या दुबेने, त्याच नाटकांची साक्ष काढून, प्रत्येकाचे मार्ग खुंटले असण्याची जाणीव बोलून दाखविली. नाटक पाहायला जाताना आपण आपापल्या आयुष्यांचे संदर्भ घेऊन गेलो, तरच काही अर्थ गवसतो हा आदल्या दिवशी त्यानेच मांडलेला मुद्दा त्याने पुन्हा स्पष्ट केला. रंगभूमीचेही रस्ता बंद झाल्यासारखे दिसत असताना, यानंतर कोणत्या वाटेने जावे आणि पुढे जावे असा प्रश्नच त्याने बादलदांना केला. ज्यांना ‘एवम् इंद्रजित' माहीत आहे. त्यांना बादलदा कोणते उत्तर देणार याचा अंदाज होता. तो खरा ठरला. “प्रत्येकाने आपापली वाट शोधायची असते. कोणीच कोणाला नाही मदत करू शकत... आणि आता तर रंगभूमीने माझा ताबाच घेतला आहे... नाटक करीत राहण्याशिवाय दुसरा मार्ग राहिलेला नाही... मरेपर्यंत नाटक..." बादलदांनी दिलेले ते उत्तर होते आणि त्याचवेळी ते त्यांचे स्वगत ही होते. नाट्यामहोत्सवाची सांगता अशी एका प्रगट स्वगताने झाले.

बादलदांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाषणे हा काही एकच मार्ग नव्हता. अनेक रंगकर्मींना वाटले, बादलदांच्या नाटकांमधील काही भागाचे जाहीर वाचन सादर करूनही, आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो. त्यांच्या ‘सारी रात' नाटकामधील पहिल्या अंकाचे वाचन नासिरुद्दीन शाह, रत्ना पाठक शाह व त्यांच्या आणखी दोन सहकारी मित्रांनी सादर केले. अमरीश पुरी, अमोल पालेकर, रोहिणी हट्टंगडी, शिशिर शर्मा, गजानन परांजपे, ज्योती सुभाषा व मोहन भंडारी यांनी ‘एवम् इंद्रजित' वाचले; तर ‘बाकी इतिहास’चे संकलन करून ते वाचले सुलभा देशपांडे, सचिन खेडेकर, अरुण काकडे आणि त्यांच्या सहकारी कलाकारांनी. बादलदांची ही तिन्ही नाटके आपल्याकडे रंगमंचावर आली. त्यालाही आता 20-25 वर्षे झाली. माणूसपणाचा शोध, जगण्याच्या धडपडीचा शोध हे त्या नाटकांमधील एक समान सूत्र म्हटले, तर खरे म्हणजे त्या नाटकांची आजही आवर्जून दखल घेतली पाहिजे. करायला चांगले नाटकच नाही म्हणून घरी बसण्याचे कारण नाही, हे या नाटकाचे वाचन ऐकताना कित्येकांना जाणवले असेल. ती नाट्यवाचने ऐकताना प्रकर्षाने लक्षात आली ती वाचनातली सहजता व नाटक म्हणजे ‘उच्चारित शब्द' असतो याचे वाचन करणारांपैकी बहुतेकांना असलेले भान. नासिरुद्दीन शाह, अमरीश पुरी यांनी कष्टपूर्वक कमावलेल्या अत्यंत श्रवणीय आवाजाचेही सौंदर्य, स्वतंत्रपणे लक्षात घेण्यासारखे होते.

पुण्यामध्ये समांतर मराठी-हिंदी रंगभूमी बादलदांच्या प्रति असणारी कृतज्ञता अशी व्यक्त करीत असताना, कलकत्त्याहून येऊन कोणी तरी या सोहळ्यात सहभागी होणे, याला एक विशेष अर्थ असणार होता. अमोल पालेकरने सादरकर्ता म्हणून तेही घडवून आणले. 'अॅक्शन प्लेअर्स' या कलकत्त्यामधील नाट्यसंघाने बादलदांच्याच ‘हाट्टामालार ओपोरे’ चा प्रयोग सादर केला. प्रयोगाचे दिग्दर्शन झरीन चौधरी यांनी किती काळजीपूर्वक व किती नाजूकपणे केले आहे ते प्रयोग पाहताना एकसारखे जाणवत राहिले. दोन भुरट्या चोरांना मध्यभागी ठेवून सांगितली जाणारी एका गावाची ही गोष्ट. एक प्रसन्न सुखात्मिका, ‘देण्याघेण्याच्या व्यवहाराशिवायही मानवी संबंध असू शकतात' असा दिलासा ते गाव देते. पण ते गाव तरी कुठे आहे? ते आहे 'हाट्टामालार'च्या पलीकडे (कुठेतरी!)- रंगभूषा, वेशभूषा, सूचक नेपथ्य, तरल प्रकाशयोजना सुखात्मिकेचे योग्य भान ठेवून तरुण मुला मुलींनी केलेला अभिनय- विशेषतः हालचाली- यांमधून ती फॅन्टसी किती मोहकपणे फुलत गेली! मूकबधिर मुला-मुलींनी सफाईदारपणे केलेला तो सुविहित प्रयोग आणि त्या नाटकातील मध्यवर्ती कल्पना- असा एकत्रितपणे विचार केलेल्या प्रेक्षकांच्या डोळ्यात तराळलेले पाणी काही म्हणू पाहत होते. प्रयोगानंतरही नाना पाटेकरने केवळ खुणांची भाषा वापरून प्रेक्षकांच्या वतीने पसंती पोचविली!

बादलदा स्वतःची ओळख नाटककार म्हणून करून देत नसले आणि त्यांची तशी ओळख त्यांना स्वतःला फारशी आवडत नसली तरी चित्रचौकटीमध्ये त्यांची जी नाटके सादर झाली व आजही होतात, त्यांना एक स्वतंत्रपणे श्रेष्ठ साहित्यमूल्य आहे हे खरेच आहे. म्हणून या सोहळ्यामध्ये बादलदांच्या नाटकांच्या मराठी अनुवादांच्या पुस्तकांचे प्रकाशनही झाले. ‘सारी रात’ चा अनुवाद पु.ल. देशपांडे यांनी केलेला असून, 'मौज'ने तो प्रकाशित केला आणि अमोल पालेकरकृत ‘पगडा घोडा’ चा मराठी अनुवाद प्रकाशित केला तो पॉप्युलर. दोन मातब्बर प्रकाशन संस्थांचा असा साहित्यिक सहभाग, हा या सोहळ्याचा आणखी एक विशेष. अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष शं. ना. नवरे स्वतः नाटककार असल्यामुळे त्यांच्या हस्ते या मराठी अनुवादांचे प्रकाशन होण्यामध्ये एक औचित्य होते. बादलदांच्या या दोन्ही नाटकांचे आवाहन, कालातीत असेल असे सांगताना, ते दोनही अनुवाद आपण आधी वाचले आहेत व त्यानंतरच आपण आपले मत नोंदवीत आहोत, हेही शं. ना. यांनी जाता जाता बजावले. महाभारतातील अनेक घटनांची आठवण करून देऊन, श्री. पु. भागवत यांनी जीवनाच्या अथांगतेचा, व्यामिश्रतेचा मुद्दा पुढे आणला व अशा जीवनाच्या जगण्याच्या संदर्भात बादलदांच्या लेखनातील आशयाचे व त्याच्या गांभीर्याचे आकलन होऊ शकते असा अभिप्राय नोंदवला. “तुम्हांला आनंद देण्यासाठी नाही, तर आमच्याच आनंदासाठी आम्ही सगळे उभे राहून तुम्हांला मानवंदना देत आहोत." अशा काहीशा शब्दांमध्ये 'पॉप्युलर' प्रकाशनाचे रामदास भटकळ यांनी त्यांची भावना बोलून दाखवली.

ज्या 'जुलूस' नाटकाच्या तालमींच्या दरम्यान बादल सरकार नाट्यमहोत्सवाची कल्पना पुढे आली. त्या ‘जुलूस’ चा प्रयोग 'जागर' पुणे या संस्थेने सादर केला. ‘सिंबायोसिस’ च्याच आवारातील तळघरातील छोटेखानी उपाहारगृहामधील तो अवकाश बादलदांच्या ‘थर्ड थिएटर’ च्या तत्त्वज्ञानाशी अगदी मिळताजुळता होता. उपाहारगृहात मध्येमध्ये खांब, एकाच बाजूला लहानसा कट्टा, पडदा बांधायचा किंवा दिवे टांगायचे.

तर तशी कोणती सोय नाही. प्रेक्षकांनी तो अवकाश इतका व्यापलेला की प्रेक्षक आणि नट यांमधली सीमारेषाही पुसली गेलेली..... अशा वातावरणात 'जागर'च्या या प्रयोगामधील 25-30 तरुण मुलामुलींनी स्वतःला झोकून देऊन प्रयोग सादर केले. प्रेक्षकांच्या गर्दीमुळे एका पाठोपाठ एक असे दोन प्रयोग ‘जागर’ ला करावे लागले... तोही एक आनंद देणारा अनुभव ठरला. स्वतः बादलदा, नासिरुद्दीन शाह, अमरीश पुरी यांच्या उपस्थितीत ‘जागर’ने जुलूस'चे प्रयोग सादर केले. स्वतः बादल सरकार यांनी भूमिका केलेल्या ‘जुलूस’च्या प्रयोगाचे केलेले चित्रीकरण या महोत्सवात पहायला मिळाले.

कोणत्याही सण वा सत्कार समारंभाला सवंग, हिडीस रूप दिले जात असल्याचे आजकाल सभोवती अनेकदा पाहावे लागत असताना, अमोल पालेकर यांनी एखाद्या सुंदर कलाकृतीची आठवण व्हावी असा हा बादल सरकार नाट्यमहोत्सव अगदी थोड्या अवधीत घडवून आणला. तात्त्विकतेचा व सौंदर्याचा सुंदर मिलाफ तिथे अनुभवाला आला. एक नाटकीय माहोल तिथे जमून आला. बादलवांचे शब्द घेऊन म्हणायचे तर हा खराखुरा जुलूस होता. माणसांचा जुलूस!
 

Tags: कला संस्कृती रंगभूमी नाटक बदल सरकार Art Stage Artist Culture Drama Theatre Badal Sarkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

माधव वझे
vazemadhav@hotmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके