माझ्या मनात मात्र ह्या वेळी जे विचार आले ते मी मनातच दाबून ठेवले. मनात विचार आला की हंगेरी, झेकोस्लोव्हाकिया आणि तिबेट येथील जनतेनेही स्वातंत्र्यासाठी अपूर्व असा उठाव केला. परंतु जग उदासीन राहिले आणि साऱ्या जगाला साक्ष ठेवून त्या देशांत स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाचे थडगे रचले गेले. भारताने अशीच उदासीनता बांगलादेशच्या मुक्तिसंग्रामाबाबत दाखविली नाही; म्हणूनच बांगलादेशच्या स्वातंत्र्याची ज्योत उजळून निघाली आणि ह्या ज्योतीनेच शेवटी पाकिस्तानची बांगलादेशावरील हुकूमशाही भस्मसात केली. काही काळ तसाच बांगलादेशच्या भूमीवर होतो, पण डोळ्यांनी आणि कानांनी जे टिपले त्यानंतर डोके सुन्न झाले आणि संसदेत बांगलादेश विमुक्त झाल्याची घोषणा झाली, तो क्षण आठवला.
5 जानेवारी 1972 उजाडताच संसदेचे आम्ही काही सभासद कलकत्त्याहून जैसोरला जाण्यासाठी निघालो. वाटेत आपली मायभूमी गाठण्यासाठी मुंग्यांच्या रांगांप्रमाणे बांगलादेशाकडे जाणाऱ्या निर्वासितांची रीघ लागली होती. अंगावर फाटके कपडे, हातात एखाददुसरे बोचके, अंतःकरणात खोलवर झालेल्या जखमा, पण तरीही 'सोनार बांगला' पाहण्यासाठी आसुसलेले डोळे घेऊन निर्वासितांची पदयात्रा चालू होती. बांगलादेशाच्या भूमीवर पाऊल ठेवल्यावर मात्र ह्या निर्वासितांना दिसली ती उद्ध्वस्त झालेली त्यांची घरटी आणि कोसळलेल्या घरट्यांभोवती इतस्ततः विखुरलेल्या हाडांच्या आणि कवट्यांच्या राशी. जैसोरमध्ये 'मौत का कुवां' म्हणून कुप्रसिद्ध ठरलेल्या आडात आम्ही हाडांचा आणि कवट्यांचा खच पाहिला. बांगलादेशच्या हुतात्म्यांचे हेच अवशेष ह्या भूमीवर शिल्लक होते. आडातील पाणी आटले होते आणि हाडा कवट्यांच्या ढिगाऱ्याखाली माणुसकीचे दफन झाले होते.
जैसोरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी आम्हांला जी माहिती दिली ती ऐकून तर आम्ही थक्कच झालो. जैसोरच्या 60,000 लोकसंख्येपैकी 20,000 निरपराध नागरिकांची पाकिस्तानी सैनिकांनी आणि रझाकारांनी क्रूर कत्तल केल्याचे त्यांनी सांगितले. जैसोरमध्ये आज उत्पन्न झालेल्या हत्याकांडात माणसातील पशुवृत्ती जागृत झाल्यावर काय काय अत्याचार घडतात याचे हिडीस दर्शन होत होते. जैसोरमधील रेल्वेबझार कॉलनीत आम्ही गेलो तेव्हा तेथील सर्व घरे उद्ध्वस्त झालेली दिसली. ह्या घरांत मिळालेल्या प्रत्येकाला यमसदनास पाठविण्यात आले होते. सुरुवातीस बंदुकीच्या गोळीचा चापर करण्यात आला. पण माणसासारखा क्षुल्लक प्राणी गोळीसारख्या मौल्यवान वस्तूने मारण्याच्या लायकीचा नाही, असे मानून नंतरच्या काळात पाकिस्तानी सैनिकांनी आणि रझाकारांनी खाटकांच्या सुऱ्यांच्या वापर करून नागरिकांचे अक्षरशः गळे कापून त्यांना कंठस्नान घालण्यास सुरुवात केली. ह्या कॉलनीत आवामी लीगचे कार्यकर्ते आणि हितचिंतक राहत होते म्हणून या कॉलनीवर पाकिस्तानी सैनिकांचा राग.
ह्या कॉलनीत राहणाऱ्या एका वृद्ध गृहस्थाने त्यास ठार मारण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी सैनिकास आवर्जून सांगितले, "माझा राजकारणाशी काही संबंध नाही, मला ठार मारू नका." त्याला उत्तर मिळाले, "पंचाण्णव टक्के मतदारांनी निवडणुकीत आवामी लीगला मते दिली आहेत; तेव्हा कोणाला मारावे आणि कोणाला सोडावे याचा विचार करण्याचीही आवश्यकता नाही."
एका ठिकाणी कवट्यांच्या आणि हाडांच्या राशीपाशीच काळ्या सळसळीत आणि सुंदर केसांचा झुपका पडलेला होता. कोणा तरुण स्त्रीचा तो केशसंभार होता यात शंकाच नव्हती. स्त्रीची रक्ताने डागाळलेली वस्त्रे मेलेल्या माणुसकीवरील 'कफन' बनून तेथेच पडली होती. शेजारीच एका छोट्या बालकाच्या प्लॅस्टिकच्या दोन चपलाही पडल्या होत्या. त्या सर्वांचा अर्थ लावण्यासाठी कल्पकतेची गरज नव्हती. त्या चिमुकल्या बालकाच्या समोरच त्याच्या मातेवर अत्याचार करून तिला यमसदनास पाठविण्यात आले होते आणि हे सर्व घडल्यावर त्या बालकाची अनंतात विलीन होण्यासाठी अंतिम यात्रा सुरू झाली होती. केवळ आपल्या हौतात्म्याची यादगार म्हणून त्याने आपल्या चपला मागे सोडल्या होत्या.
ह्याच जैसोरच्या आघाडीवर माझ्या धाकट्या बहिणीच्या पतीला वीरमरण आले होते, याची जैसोरमध्ये हिंडताना तीव्रतेने आठवण झाली. पण लगेच मनाला विचार स्पर्श करून गेला की, माझ्या बहिणीच्या दुःखात बांगलादेशातील हजारो भगिनींच्या दुःखवेदनाही सामील झाल्या आहेत. सहवेदनेने वेदनेची तीव्रता कमी होते याचा अनुभव आला तो ह्या क्षणी !
तरुण-तरुणी बांगलादेशाच्या मुक्तिसंग्रामात आघाडीवर राहिल्यामुळे त्यांच्या देशभक्तीचा सूड पाशवी अत्याचार करून पाकिस्तानी सैनिकांनी कसा घेतला याची अंगावर शहारे आणणारी कहाणी कुमारी झुबेदा ह्या मेडिकल कॉलेजमधील तरुण विद्यार्थिनीकडून ऐकावयास मिळाली. नितळ सौंदर्याची साक्षात मूर्ती असलेली ही तरुणी झुबेदा पाकिस्तानी अत्याचाराची कहाणी सांगत होती, तेव्हा ती सुडाच्या भावनेने पेटलेली होती आणि तिच्या डोळ्यांतून क्रोधाचे अंगार बाहेर पडत होते. डाक्का येथील मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर पाकिस्तानी सैनिकांनी धाड घातली. तेव्हा झुबेदा वसतिगृहात होती. पाक सैनिकांच्या हाती आल्या त्या पारिचारिका आणि वसतिगृहातील विद्यार्थिनी, सैनिकांच्या पाशवी बलात्काराला बळी पडल्या. दहशत बसविण्यासाठी भ्रष्ट केलेल्या प्रत्येक तरुणीला यमसदनाला पाठविण्यास पाक सैनिकांनी मागेपुढे पाहिले नाही. आपल्या अब्रूची आणि शीलाची विटंबना आणि नंतर मृत्यू, ही दुहेरी आपत्ती टाळण्यासाठी काही मुली धावत वरच्या मजल्यावर गेल्या आणि 'जय बांगला' ही घोषणा करून त्यांनी उड्या मारल्या, त्यांपैकीच एक कुमारी झुबेदा. झुबेदा मात्र उडी मारल्यावर एका झाडावर पडली आणि लोंबकळत लोंबकळत जमिनीवर कोसळली. भीतीने बोबडी वळलेली झुबेदा लपत छपत तेथून निसटली आणि काही दिवसांनी जैसोरला येऊन पोहोचली. ही करुण कहाणी सांगताना झुबेदाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले, तिचे अश्रू थोपविण्याचे सामर्थ्य माझ्यात नव्हते, कारण झुबेदाच्या अश्रूना माझेही अश्रू साथ देत होते.
फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये, त्याचप्रमाणे युरोपमधील हिटलरविरोधी प्रतिकार आंदोलनात बुद्धिवाद्यांनी मोठा वाटा उचलला होता. तरुणांना प्रेरणा दिली होती. बांगलादेशातील बुद्धिवाद्यांनीही मोठ्या प्रमाणावर हेच काम केले म्हणून त्यांच्यावर पाकिस्तानी सैनिकांचा विशेष रोष होता. डाक्का विद्यापीठातील अनेक विभागांच्या प्रमुखांना विद्यापीठाच्या आवारात उभे करून गोळ्या घालून मारण्यात आले. विद्यार्थिनींवर अत्याचार करण्यात आले. अनेक तरुण मुलींना विकून अरब राष्ट्रांत धाडण्यात आले. गुलामांच्या बाजारापेक्षाही ही घटना भयानक. एका पुनर्वसन केंद्रावर पाच ते सात महिन्यांची गर्भधारणा झालेल्या कॉलेजमधील आणि शाळेतील 300 तरुणी असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
एका ठिकाणी जवळजवळ नग्न अवस्थेतील 250- 300 मुलींना दोरखंडाने बांधून गावातून धिंड काढून रोज सकाळी नदीवर प्रातर्विधी करण्यासाठी नेले जात होते ही माहिती ऐकली, तेव्हा पाकिस्तानी सैनिक कोठल्या काळ्याकुट्ट सरंजामी युगात वावरत होते याची कल्पनाही करवेना.
हिटलरच्या सैन्यानेही दुसऱ्या महायुद्धात पादाक्रांत केलेल्या मुलुखात अनन्वित अत्याचार केले होते. पण केवळ सैन्यातील शिस्त कोलमडून पडू नये म्हणून एक पथ्य पाळण्यात आले होते. स्त्रियांना पळवून नेऊन सैनिकांच्या खंदकात, बंकर्सच्या मागे अथवा पिलबॉक्समध्ये ठेवून त्यांचा उपभोग घेण्यास सक्त मनाई होती. पण पाकिस्तानी सैनिक ह्याही बंधनाच्या पलीकडे होते. दरोडेखोरांनी लूटमार करून दागदागिने पळवावेत त्याप्रमाणे तरुण मुलींना पळवून त्यांना सैनिकांच्या खंदकात डांबून ठेवण्यात येत असे. पाकिस्तानचे संरक्षण आणि पळवून आणलेल्या तरुण स्त्रियांच्या अब्रूचे हरण म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या. अशा सेनेच्या मनोधैर्याला तडा गेला नसता तरच आश्चर्य. खंदकात आणून ठेवलेल्या मुली कदाचित अंगावरील वस्त्राचा फास स्वतःच्या गळ्याला लावून आत्महत्या करतील म्हणून अनेक तरुणींना सैनिकांच्या खंदकात नग्नावस्थेतच ठेवण्यात आले होते. काही स्त्रियांनी आपल्या लांबलचक केसांनी गळा कापून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पाक सैनिकांनी अनेक स्त्रियांचे केशवपन करून त्यांच्यावर बलात्कार करण्याचे सत्र चालू ठेवले होते.
हे सर्व ऐकत असताना वसंत बापट यांच्या 'झेलमचे अश्रू ह्या कवितेमधील शब्द आठवले -
'जिला असावे कालच म्हटले 'बेटी'
तिला धरावे खुशाल भरल्या हाटी
आणि शेवटी झाल्यावर निर्माल्य
तिने भरावी या झेलमची ओटी.'
फरक एवढाचा की फाळणीच्या सुमारास जे अत्याचार झेलमच्या तीरावर घडले त्यांची भयानक पुनरावृत्ती आता बांगलादेशच्या भूमीवर पद्मा नदीच्या तीरावर झाली.
पूर्व बंगालमधील अधिकाऱ्यांवर सूड उगविण्याचा एक नवाच मार्ग पाकिस्तानी सैनिकांनी शोधून काढला होता. डाक्का आणि जैसोर ह्या ठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठका बोलाविण्यात आल्या. अधिकारी वरकरणी पाकिस्तानचे अधिकारी म्हणून वावरत असले तरी बंगाली असल्याने त्यांची खरी निष्ठा बांगलादेशच्या मुक्तिसंग्रामालाच असणार, असे गृहित धरून त्यांना अद्दल घडविण्यासाठी ह्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली. आणि बैठक सुरू होताच पाक सैनिकांनी मशीनगन चालवून बैठकीस आलेल्या प्रत्येक अधिकाऱ्यास ठार केले. हे डाक्का येथे घडले. जैसोर येथेही त्याच वेळी अधिकाऱ्यांची दुसरी बैठक बोलावण्यात आली होती. परंतु मुक्तिवाहिनीच्या हेरांनी बैठकीत काय होणार आहे याची कल्पना ह्या अधिकाऱ्यांना पूर्वीच दिल्याने त्यांचा मृत्यू टळला.
बांगलादेशाची ही करुण कहाणी ऐकताना डोळ्यांत अश्रू उभे राहिले. पण त्याचबरोबर हे पाशवी अत्याचार चालू असतानाही मुक्तिवाहिनीच्या तरुण-तरुणींनी आणि भारतीय सेनेच्या जवानांनी आणि विशेषतः तरण्याबांड अधिकाऱ्यांनी तळहातावर शिर घेऊन जी मर्दुमकी गाजविली ती शौर्याची वीरगाथा ऐकून स्फुरण चढले. शहरी विभागावर पाकिस्तानातील सेनेचा कब्जा असतानाही मुक्तिवाहिनीच्या जवानांनी काही ग्रामीण भागातून पाकिस्तानी शासन उद्ध्वस्त करून टाकले होते. 1942मध्ये भारतात बालिया, सातारा आणि मिदनापूर येथेही प्रतिसरकारे स्थापन झाली होती. परंतु ती शेवटी प्रतीकात्मच ठरली. पण येथे मात्र पाकिस्तानची शासनयंत्रणा काही खेड्यांतून समूळ उखडून टाकण्यात आली होती.
ज्या अभागी तरुणींच्यावर पाक सैनिकांकडून बलात्कार झाले आणि ज्यांच्यावर सक्तीचे मातृत्व लादण्यात आले त्यांना 'वीरमाता' म्हणून मानण्यात यावे आणि मुक्तिवाहिनीच्या तरुणांनी त्यांचे सन्मानाने पुनर्वसन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ह्या आवाहनास प्रतिसाद मिळेल असे मुक्तिवाहिनीच्या कार्यकर्त्यांनी आमच्याशी बोलताना सांगितले. अर्थात, रूढींच्या गर्तेत आजपर्यंत सापडलेला समाज हे कार्य कोठपर्यंत करू शकेल हे भविष्यच ठरविणार आहे.
बांगलादेशामध्ये पाशवी अत्याचारांचे थैमान सुरू झाल्यावर हिंदू स्त्रियांनी केशरी किनार असलेली साडी परिधान करण्याचे सोडून दिले होते. त्यांच्या डोक्यावरील सिंदूरही केव्हाच उडून गेला होता. बांगलादेशाच्या मुक्तीनंतर मात्र केशरी किनार असलेल्या पांढऱ्याशुभ्र साड्या परिधान करणाऱ्या आणि शिरावर सिंदूर धारण करणाऱ्या महिला बांगलादेशच्या भूमीवर निर्धास्तपणे वावरू लागल्या होत्या.
मुक्तिवाहिनीच्या कार्यकर्त्यांमध्ये भारताबद्दल कृतज्ञतेची अपूर्व जाणीव आढळून आली. 'तथाकथित आंतरराष्ट्रीय गुंतागुंतीचा बागुलबुवा उभा करून जर भारताने आपली सेना आमच्या मागे उभी केली नसती तर आम्हांला आमचा संघर्ष व्हिएतनामप्रमाणे अनेक वर्षे चालवावा लागला असता आणि शेवटी आमचे ध्येय केव्हा साकार झाले असते ते सांगता येत नाही,' ही भावना त्यांनी व्यक्त केली.
माझ्या मनात मात्र ह्या वेळी जे विचार आले ते मी मनातच दाबून ठेवले. मनात विचार आला की हंगेरी, झेकोस्लोव्हाकिया आणि तिबेट येथील जनतेनेही स्वातंत्र्यासाठी अपूर्व असा उठाव केला. परंतु जग उदासीन राहिले आणि साऱ्या जगाला साक्ष ठेवून त्या देशांत स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाचे थडगे रचले गेले. भारताने अशीच उदासीनता बांगलादेशच्या मुक्तिसंग्रामाबाबत दाखविली नाही; म्हणूनच बांगलादेशच्या स्वातंत्र्याची ज्योत उजळून निघाली आणि ह्या ज्योतीनेच शेवटी पाकिस्तानची बांगलादेशावरील हुकूमशाही भस्मसात केली. काही काळ तसाच बांगलादेशच्या भूमीवर होतो, पण डोळ्यांनी आणि कानांनी जे टिपले त्यानंतर डोके सुन्न झाले आणि संसदेत बांगलादेश विमुक्त झाल्याची घोषणा झाली, तो क्षण आठवला. त्या क्षणी संसदेतील आम्ही सदस्य आनंदाने बेहोष झालो होतो, पण तेव्हा मात्र कल्पना नव्हती की केवढ्या प्रचंड प्रमाणावर बांगलादेशाचे रक्त आणि अश्रू आमच्या आनंदाश्रूत मिसळले होते. जैसोरहून कलकत्यास परतताना रक्त आणि अश्रुंनी भिजलेला बांगलादेश त्याच भूमीवर उभे राहून मी पुन्हा एकदा डोळे भरून पाहिला. या वेळी लोकसभेमध्ये बांगलादेशच्या विमोचनाबाबत भाषण करीत असताना मी जे उद्वार काढले होते त्यांची आठवण झाली.
"Oh Liberty! can man resign thee!
Once having feet thy generous flame. Can bolts or bars confine thee!
Or whip thy noble Spirit tame"
हे शब्द कानांत घुमत असतानाच कलकत्त्याला पोहोचलो. जैसौर सोडले, पण आयुष्यावर त्याचा चरचरीत डाग राहिला.
(21 जानेवारी 1999 रोजी, साधना प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या 'वेध अंतर्वेध' या पुस्तकात हा लेख पहिल्यांदा प्रसिद्ध झाला होता.)
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या