प्रा. मधु दंडवते यांच्या वक्तव्याने लोकसभा भारावली
“मी प्रथम भारतीय आणि समाजवादी आणि नंतर एक महाराष्ट्रीय आहे. एक महाराष्ट्रीयन म्हणून महाराष्ट्रामध्ये कन्नड बंधूंवर झालेल्या हल्ल्यामुळे माझे मन शरमेने झुकत आहे आणि एक भारतीय म्हणून कर्नाटककात मराठी भाषिकांवर झालेल्या अत्याचारांनीही मला वेदना होत आहेत. कर्नाटकात आणि महाराष्ट्रातील भ्रातृयुद्धाची किंमत मोजून महाराष्ट्राला न्याय मिळणार असेल तर अशा न्यायाची किंमत मला कवडीमोलाचीही वाटणार नाही. परंतु हे स्पष्ट करू इच्छितो की, 17 वर्षे हा सीमाप्रश्न लोंबकळत ठेवून केंद्र सरकारने हे भ्रातृयुद्ध घडवले आहे. म्हणून माझी आता पंतप्रधानांना विनंती आहे की महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर हा प्रश्न न सोपवता केंद्रानेच हा वाद कायमचा मिटवावा. राष्ट्रवाद, समाजवाद व जातिधर्मनिरपेक्षता यांच्या रक्षणासाठी मी कळकळीची विनंती करतो की, वाद कायमचा मिटवा.”
दि. 3 डिसेंबर रोजी बेळगाव येथे कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नावरील तणावामुळे अभूतपूर्व अशी दंगल उसळली, आणि पोलिसांनी नागरिकांच्या घरात घुसून तरुणांना आणि स्त्रियांनाही बेदम मारहाण केल्याची प्रक्षोभक बातमी शहरभर पसरली. समाजवादी खासदार प्रा. मधु दंडवते ह्यांनी जागरुकपणे हा प्रश्न लोकसभेत दि. 4 डिसेंबर रोजी सभापतींच्या परवानगीने उपस्थित केला. या प्रक्षोभाचे मूळ सतरा वर्षे लोंबकळत राहिलेला महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न असल्याने केंद्राने हा प्रश्न तातडीने सोडवावा अशी मागणी खासदार दंडवते यांनी केली. त्याचप्रमाणे डेप्युटी कमिशनर आणि पोलिस अधिकारी यांच्या उपस्थितीत हे पोलिसी अत्याचार झाले असल्याने ह्या सर्व प्रकरणी आता सी.बी. आय. द्वारा चौकशी करावी, अशी मागणी प्रा.दंडवते यांनी केली.दि. ५ डिसेंबर रोजी खासदार मधु दंडवते ह्यांनी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना एक विस्तृत पत्र लिहून बेळगामध्ये झालेल्या घटनांकडे त्यांचे लक्ष वेधले आणि या दोन राज्यातील संघर्ष टाळण्यासाठी केंद्राने ताबडतोब सीमाप्रश्न कायमचा मिटवावा अशी विनंती केली; आणि दंगलीबाबत सी.बी.आय.चौकशीच्या मागणीचा पुनरुच्चार केला.
दि.8 डिसेंबर रोजी पंतप्रधानांनी खासदार दंडवते ह्यांना पत्र लिहून केंद्रीय गृहमंत्री लौकरच सीमाप्रश्न समाधानकारक रीतीने सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात पुढाकार घेतील असे स्पष्ट आश्वासन दिले. दि. 13 डिसेंबर रोजी लोकसभेमध्ये खासदार दंडवते ह्यांनी महाराष्ट्र-सीमाप्रश्नावर चर्चा करण्याची परवानगी सभापतीकडून मिळवली. तथापि चर्चेला दुपारी 4 वाजता सुरुवात होण्यापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री श्री. उमाशंकर दीक्षित यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांशी विचारविनिमय केला व या विषयावरील प्रक्षोभक चर्चेमुळे म्हैसूर आणि महाराष्ट्रातील वातावरण अधिक तंग होईल, हे ध्यानात घेऊन खासदार मधु दंडवते यांनी चर्चेचा सभागृहात आग्रह धरू नये असे सुचवले. सीमा प्रश्न तातडीने सोडवण्याचे प्रयत्न केले जातील असे स्पष्ट आश्वासन लोकसभेत गृहमंत्र्यांनी दिल्यास त्यांच्या विनंतीचा विचार करू विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सांगितले.
गृहमंत्र्यांचे लोकसभेत आश्वासन
दि. 13 डिसेंबर रोजी लोकसभेमध्ये सीमा प्रश्नावरील चर्चेसाठी सभापतींनी खासदार मधु दंडवते यांचे नाव पुकारताच गृहमंत्री श्री. दीक्षित यांनी एक लेखी निवेदन वाचून दाखविले. कर्नाटक महाराष्ट्रातील प्रक्षोभक वातावरणाची त्यांनी दखल घेतली. शांततेसाठी आवाहन केले, आणि केंद्र सरकार तातडीने सीमाप्रश्न समाधानकारक रीतीने मिटवण्यासाठी ताबडतोबीने प्रयत्न सुरु करील असे लोकसभेत आश्वासन दिले.
राष्ट्रवादी दंडवते यांची वेदना बोलली
केंद्रीय गृहमंत्र्यांच्या आव्हानास साथ देण्यासाठी खासदार मधु दंडवते हे उभे राहिले. भावनावेगाने बोलताना प्रा. दंडवते म्हणाले,”मी प्रथम भारतीय आणि समाजवादी आणि नंतर एक महाराष्ट्रीय आहे. एक महाराष्ट्रीयन म्हणून महाराष्ट्रामध्ये कन्नड बंधूंवर झालेल्या हल्ल्यामुळे माझे मन शरमेने झुकत आहे आणि एक भारतीय म्हणून कर्नाटककात मराठी भाषिकांवर झालेल्या अत्याचारांनीही मला वेदना होत आहेत. कर्नाटकात आणि महाराष्ट्रातील भ्रातृयुद्धाची किंमत मोजून महाराष्ट्राला न्याय मिळणार असेल तर अशा न्यायाची किंमत मला कवडीमोलाचीही वाटणार नाही. परंतु हे स्पष्ट करू इच्छितो की, 17 वर्षे हा सीमाप्रश्न लोंबकळत ठेवून केंद्र सरकारने हे भ्रातृयुद्ध घडवले आहे. म्हणून माझी आता पंतप्रधानांना विनंती आहे की महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर हा प्रश्न न सोपवता केंद्रानेच हा वाद कायमचा मिटवावा. राष्ट्रवाद, समाजवाद व जातिधर्मनिरपेक्षता यांच्या रक्षणासाठी मी कळकळीची विनंती करतो की, वाद कायमचा मिटवा.” लोकसभा भारावून टाकणारे खासदार दंडवते यांचे हे निवेदन समजताच पंतप्रधानांपासून तो सर्व विरोधी पक्षांच्या सभासदांपर्यंत सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात खासदार मधू दंडवते यांच्या राष्ट्रभक्तीने ओथंबलेल्या निवेदनाचे सहर्ष स्वागत केले.
प्रा.मधु दंडवते यांनी मागणी केली की,पंतप्रधानांनीही निवेदन करावे. तेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधी सभागृहात उभ्या राहिल्या आणि प्रा. मधु दंडवते यांच्या भावनेस साद देऊन त्यांनी घोषीत केले की केंद्रीय गृहमंत्र्यांनी सीमा वाद मिटवण्याबाबत जे आश्वासन दिले आहे,त्याच्याशी मी संपूर्ण सहमत आहे.यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही सीमा प्रश्न सोडवण्याची निवड व्यक्त केली. खासदार मधु लिमये यांनी ही 26 जानेवारीपर्यंत ह्या प्रश्नाचा निकाल लावावा अशी मागणी केली.
प्रा. दंडवते यांनी मिळवलेला सर्व पक्षीय पाठींबा
खासदार मधु दंडवते यांनी दुसऱ्या दिवशी सर्व विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळवून सीमा प्रश्न निकोप तत्वाच्या आधारेच तातडीने सोडवून कर्नाटक आणि महाराष्ट्र हया दोन्ही प्रांतामधील अल्पसंख्यांकावर होणाऱ्या हल्ल्यामागचे मूळच नष्ट करावे अशा आशयाच्या पंतप्रधानांना द्यावयाच्या निवेदनावर सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या सह्या मिळवल्या.हया निवेदनावर समाजवादी, उजवे कम्युनिस्ट संघटना, काँग्रेस कम्युनिस्ट,द्रमुक, स्वतंत्र मुस्लिम लीग, भारतीय क्रांती दल, तेलंगणा प्रज्ञा परिषद आदि सर्व नेत्यांच्या सह्या होत्या. हे निवेदन प्रा दंडवते यांनी ता. 20 डिसेंबर रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना भेटून सादर केले. तेव्हा पंतप्रधानांनी खासदार दंडवते यांना नि:संदिग्धपणे सांगितले की आता विलंब न करता सीमाप्रश्न मिटवण्यासाठी केंद्र सरकारच प्रयत्न सुरू करणार असून हा प्रश्न आता केवळ दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांवर सोपवला जाणार नाही.
खासदार मधु दंडवते यांनी समतोल वृत्तीने या प्रश्नाचा लोकसभेमध्ये पाठपुरावा केल्याबद्दल अनेक खासदारांनी त्यांचे अभिनंदन केले असून स्वर्गीय नाथ पै यांनी हाती घेतलेला सीमाप्रश्न खासदार मधु दंडवते त्याच तळमळीने आणि राष्ट्रीय दृष्टी व भावना कायम ठेवून हाताळत आहेत; याबद्दल सीमा भागातही आज समाधानाची भावना आहे. पंतप्रधानांना भेटून खासदार दंडवते तडक बेळगावला गेले. बेळगावमध्ये ज्या घरात घुसून पोलिसांनी अत्याचार केले त्यांची त्यांनी घरोघर हिंडून खात्री करून घेतली आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी जाहीरपणे आवाहन केले आहे की कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी दंडवते यांच्यासमवेत या अत्याचारांची खात्री करून घ्यावी. प्रा.दंडवते यांचे आरोप खोटे ठरले तर निकोप सार्वजनिक जीवनाची आचारसंहिता म्हणून आपण आपल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावयास तयार आहोत असेही त्यांनी जाहीर केले.
Tags: Loksabha Mr.Umashankar Dikshit Prime Minister Indiara Gandhi Pro. Madhu Dandavate Karnatak Maharashtra Seema Prashna Belgaon लोकसभा पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी श्री. उमाशंकर दीक्षित प्रा. मधु दंडवते कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न बेळगाव weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या