डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

जयप्रकाशांची विचारयात्रा

"जसजशी वर्षे लोटली तसतशी स्वातंत्र्याने माझ्या देशाच्या स्वातंत्र्याची कक्षा ओलांडली आणि सारे मानवी जीवनच व्यापून टाकले. स्वातंत्र्याची क्षितिजे विस्तारली, स्वातंत्र्य म्हणजे मानवाच्या व्यक्तिमत्वाचे, मनाचे आणि आत्म्याचे स्वातंत्र्य असा व्यापक आशय ह्या स्वातंत्र्याच्या कल्पनेत ओतला गेला. स्वातंत्र्य हाच माझ्या जीवनाचा ध्यास बनला. स्वातंत्र्याबाबत कोणतीही तडजोड मी भाकरी, सत्ता, स्थैर्य, सुबत्ता, शासनसंस्थेचे वैभव अथवा अन्य कारणासाठी कदापिही करणार नाही." -  जयप्रकाश नारायण

जयप्रकाश नारायणांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरवात विसाव्या शतकाच्या चौथ्या दशकात एक कट्टर मार्क्सवादी म्हणून केली. ह्या कालखंडात जयप्रकाश मार्क्सवादाचे एक प्रभावी भाष्यकार आणि प्रवक्ते होते. सर्व सामाजिक घटनांचे विश्लेषण त्यांनी ह्या काळात मार्क्सवादाच्या मूलभूत प्रमेयांच्या आधारेच केले. मार्क्सवादाच्या मूलभूत सिद्धांतांची पुनर्तपासणी करण्याची त्यांना त्या वेळी गरज भासली नाही.

परंतु कालांतराने जयप्रकाशांनी आपल्या मनाची कवाडे उघडली आणि विचार परिवर्तनाचे वारे त्यांच्या मनावर आदळू लागले.

गांधीजींनी गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते: "मला माझ्या घराभोवती भिंत उभारावयाची नाही आणि माझी कवाडेही बंद ठेवायची नाहीत. जगातील सर्व संस्कृतीची दारे मला माझ्या घरावर स्वैरपणे आदळावयास हवेत. पण त्यामुळे जमिनीवर रोवलेले माझे पाय मात्र उध्वस्त होता कामा नयेत."

गांधीजींचे हे बहुमोल शब्दच जयप्रकाशांचे विचार आणि कृती यांचे प्रतीक बनले.

ज्या मार्क्सवादाचा पुरस्कार जयप्रकाशांनी अनेक वर्ष केला होता त्याचा आधारच दुसऱ्या महायुद्धाच्या काळात खचू लागला होता आणि मार्क्सवादाकडे अधिक वस्तुनिष्ठ पद्धतीने पहाणे आवश्यक आहे हे जयप्रकाशांना हळूहळू पटू लागले होते. पण तरीही या काळात जयप्रकाश स्वतःला मार्क्सवादीच म्हणवीत असत आणि विरोधविकास वादावरील त्यांचा विश्वासही अढळ होता.

मानवाचे विचार विविध शक्तींच्या आघाताने बदलत असतात. ह्या शक्तींमध्ये आर्थिक आणि सामाजिक शक्तींना महत्त्वाचे स्थान तर आहेच; तथापि अनेकदा मानवी जीवनातील नैतिक प्रेरणांचाही विचारावर परिणाम होत असतो. जयप्रकाशांच्या वैचारिक जीवनाबाबत हेच घडले.

नवा टप्पा

1948 मध्ये नाशिक येथे भरलेल्या सोशलिस्ट पार्टीच्या अधिवेशनात जयप्रकाशांनी पक्षाचे मंत्री ह्या नात्याने सादर केलेला अहवाल हा त्यांच्या वैचारिक परिवर्तनातील पहिला नवा टप्पा ठरला. आपल्या अहवालात जयप्रकाशांनी साध्य-साधनांची विस्तृत चर्चा केली आणि आग्रहाने प्रतिपादन केले की, साध्याची शुचिता ही साधनांच्या शुचितेवरच अवलंबून असते. ह्या संदर्भात त्यांनी समाजवाद्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की समाजवादी समाजाच्या निर्मितीचा एक अविभाज्य भाग म्हणजे नैतिक आणि मानवी मूल्यांना पोषक अशा वातावरणाची निर्मिती. ह्याच पार्श्वभूमीवर त्यांनी सुचवले की देशाच्या नैतिक पुनरुत्थापनाच्या कार्यात रमण महर्षीच्यांसारख्या अध्यात्मवाद्यांचे सहाय्य घेणेही आवश्यक आहे.

जयप्रकाशांनी व्यक्त केलेले हे विचार त्यांचे विचारचक्र कोणत्या दिशेने फिरत आहे याचे केवळ प्रतीक होते. ह्या प्रश्नाबाबत विस्ताराने आपली मते मांडताना त्यांनी लिहिले:

"समाजवादी तत्वज्ञानास रशियात स्टॅलिनने दिलेले स्वरूप म्हणजे केवळ मॅकॅव्हॅलीप्रणीत आचार संहिता, ज्यात बरोबर की चूक, सदाचार की दुराचार याचा विधिनिषेध नाही. साध्यासाठी कोणतेही साधन समर्थनीय होय आणि जेव्हा सत्ता हेच साध्य असते- मग ती सत्ता वैयक्तिक असो की गटाची, कोठल्या खालच्या थराला साध्य निर्मितीसाठी साधने जाऊन पोचतील याला सीमाच नाही. प्रत्येक कम्युनिस्ट राष्ट्रातील सत्तासंघर्ष- जीर्ण समाजपद्धतीविरुद्धचा संघर्ष नव्हे तर कम्युनिस्ट सत्ताधाऱ्यांतील सत्ता- संघर्ष हा शेवटी हुकुमशाहीकडेच जाऊन पोचला. ह्या हुकुमशाहीचा चेहरा क्रांतीचे उद्दिष्ट म्हणून घोषित करणाऱ्या समाजवादाच्या पितामहाने पुरस्कृत केलेल्या स्वतंत्र आणि समतावादी समाजाच्या ध्येयाशी अजीबात न जुळणारा. अशा प्रकारच्या अनैतिकतावादी तत्वज्ञानाच्या भयानक अवस्थेला गांधीजींनी सुचवलेला पर्याय, समाजवादी केवळ आपल्या ध्येयाशी प्रतारणा करूनच धुडकावून लावू शकतील."

निर्णायक घटना "सदाचाराची प्रेरणा"

तथापि जयप्रकाशांच्या वैचारिक बैठकीत परिवर्तन घडवून आणणारी निर्णायक घटना 1952 मध्ये घडली. यावर्षी आत्मशुद्धीसाठी जयप्रकाशांनी एकवीस दिवसांचे उपोषण पुणे येथे केले. सद्सद्विवेकबुद्धीस होणाऱ्या टोचणीतून त्यांचे हे उपोषण उद्भवले. पोस्ट आणि तार खात्याचे केंद्रीय मंत्री श्री रफी अहमद किडवाई यांच्याबरोबर पोस्ट आणि तार खात्याच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत जयप्रकाशांची बोलणी झाली होती. संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या संपकाळातील वेतनाबाबत जयप्रकाशांनी कर्मचाऱ्यांना मंत्र्यांशी झालेल्या बोलण्याच्या आधारे आश्वासन दिले. परंतु नंतर श्री रफी अहमद किडवाई यांच्या जाहीर निवेदनावरून आढळून आले की मंत्र्यांनी संपकाळातील पगाराबद्दल आश्वासन दिलेच नव्हते. जयप्रकाशांना वाटले की यासंबंधात केंद्रीय मंत्र्यांकडून लेखी आश्वासन न घेण्यात आपली कर्तव्यच्युती झाली होती. या टोचणीतूनच त्यांचे एकवीस दिवसांचे उपोषण उद्भवले.

ह्या एकवीस दिवसांच्या उपोषणाच्या काळात जयप्रकाशांनी आपली पूर्वीची तात्विक बैठक विचारपूर्वक तपासून पाह्यली आणि जीवनातील नव्या आव्हानांचा त्यांनी सखोल विचार केला. उपोषणानंतर एका नव्या स्वरूपात जयप्रकाशांचे वैचारिक जीवन उभारून आले. त्यांच्या विचारात एक नवे परिमाण निर्माण झाले. जयप्रकाशांनी स्वत:लाच एक मूलभूत प्रश्न विचारला. केवळ भौतिकवादाचा आश्रय घेऊन जीवनात सदाचाराची प्रेरणा मिळू शकेल काय? जयप्रकाश ह्या निर्णयास पोचले की ह्या प्रश्नावर मूलभूत विचार करणे आवश्यक आहे.

एकवीस दिवसांच्या उपोषणानंतर 'सदाचाराची प्रेरणा' ह्या आपल्या लेखात जयप्रकाशांनी लिहिले:

'अनेक वर्षे मी विरोधविकासवादाचा पूजक होतो. केवळ भौतिकवाद हा माणसात माणुसकी जागवण्यास अपुरा पडतो. भौतिकवादाच्या पलीकडे जाऊन मानवाला सदाचाराची प्रेरणा धुंडावी लागेल... जड सृष्टी हे अंतिम वास्तव आहे. ह्या सिद्धांताचा त्याग करून समाजातील व्यक्तीला नैतिकतेचे अधिष्ठान प्राप्त करता येते.'

ह्या उपोषणानंतर जयप्रकाश नारायण हे कर्मठ मार्क्सवादी राहिले नाहीत. त्यांच्या तत्त्वज्ञानविषयक विविध घटकांवर मानवतावादाने मात केली आणि त्यांच्या वैचारिक जीवनास नैतिकतेचा एक नवा आधार लाभला.

1952 च्या सार्वत्रिक निवडणुकीत जयप्रकाशांनी झंझावाती निवडणूक दौरा केला, परंतु हा निवडणूक प्रचार करीत असतानाही "मतपेटी" हेच परिवर्तनाचे एकमेव साधन आहे असे जयप्रकाशांनी कधीच मानले नाही. मतपेटीबरोबरच रचनात्मक आणि संघर्षात्मक कार्यावरही त्यांनी भर दिला. सोशलिस्ट पार्टीचा एक प्रखर प्रवक्ता म्हणून वावरत असतानाही जयप्रकाशांनी निवडणूक लढवली नाही हा काही कर्मधर्म संयोग नव्हता. निवडणुका लढवीत असतानाही विधिमंडळाबाहेरील आणि सत्तेच्या कक्षेपलीकडील कार्यही महत्वाचे आहे हे जयप्रकाशांन आपल्या समाजवादी सहकाऱ्यांवर बिंबवावयाचे होते. त्यांच्या दर्जाच्या नेत्याने निवडणुकीची उमेदवारी टाळून प्रत्यक्षात हे उद्दिष्ट साध्य केले.

भूदान-दोन दृष्टिकोण

ह्या वैचारिक परिवर्तनातूनच जयप्रकाशांचा कल विनोबा भावे यांनी तेलंगणामध्ये सुरू केलेल्या भूदान आंदोलनाकडे झुकला. ज्या भूमिहीनांच्या जमिनी तेलंगणातील जमीनदारांनी अन्यायाने गिळंकृत केल्या होत्या ते भूमिहीन जमीनदारांविरुद्ध लढण्यासाठी उभे ठाकले होते. सशस्त्र क्रांतीद्वारे बदल घडवून आणण्याच्या आपल्या कार्यक्रमाची तेलंगण ही प्रयोगभूमी कम्युनिस्ट करू पहात होते. विनोबांचा हिंसेवर विश्वास नव्हता. तथापि भूमिहीनांची जमिनीची भूक रास्त असून भूमिहीनांच्या सशस्त्र लढ्याचा अहिंसात्मक पर्याय आपण निर्माण केला पाहिजे असे विनोबांचे ठाम मत होते.

विनोबांनी तेलंगणामध्ये पहिला भूदानाचा प्रयोग केला आणि जमीनदारांच्या सदभावनेला आवाहन केले की, त्यांनी आपल्या

जमिनीचा मोठा वाटा भूमिहीनांसाठी स्वखुषीने द्यावा.

विनोबांच्या या उदात्त विचारांनी जयप्रकाशांचे संवेदनाशील मन हेलावले आणि त्यांनी पक्षीय राजकारणाचा त्याग करून भूदान कार्यासाठी जीवनदान केल्याची घोषणा केली. भूदान आंदोलनात जातानाही जयप्रकाशांनी आपला संघर्षाचा समाजवादी वारसा सोडला नाही. जयप्रकाशांनी अनेकदा घोषणा केली की, जमीनदारांच्या सदभावनेला आवाहन करून भूदान आंदोलन जमीन मिळवील परंतु त्याचबरोबर जमीनदार किंवा सरकार यांकडून भूमिहीनांवर अन्याय झाला तर त्या अन्यायाविरुद्ध भूदान आंदोलनातील कार्यकर्ते शांततामय संघर्ष करतील. भूदान आंदोलनाने सरकारी यंत्रणेवर अवलंबून राहता कामा नये यावरही जयप्रकाशांनी भर दिला.

आणीबाणीपूर्वी मुंबई येथे भारतीय विद्याभवनात झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या सभेत भूदान आंदोलनातील अपूर्णता सांगताना जयप्रकाशांनी आपली काही पाऊले चुकीची ठरल्याची स्पष्टपणे कबूली दिली. गांधीजी विधायक आणि सामाजिक सुधारणा कार्यात गुंतले असतानाही त्यांनी राजकारणाचे स्वान गौण मानले नाही, त्याची उपेक्षाही केली नाही. राजकारणाच्या माध्यमाचा त्याग करण्याऐवजी गांधीजींनी राजकारणाचा प्रवाह विशुद्ध बनवण्याचा प्रयत्न केला. याउलट विनोबांनी व आपण राजकारणाकडे पाठ फिरवली ही चूक जयप्रकाशांनी प्रांजळपणे कबूल केली.

भूदान आंदोलनात मिळालेल्या जमिनीच्या वाटपाच्या कार्यासाठी आपण सरकारी यंत्रणेवरच अवलंबून राहिलो ही दुसरी चूक जयप्रकाशांनी मान्य केली.

भूदान आंदोलन आवश्यक तेथे अन्यायाविरुद्ध शांततामय संघर्ष करील हे जाहीर करूनही सरकार किंवा जमीनदार यांच्याविरुद्ध अशा प्रकारचे संघर्ष विनोबांच्या नेतृत्वाखाली झाले नाहीत हे सत्य जयप्रकाशांनी कठोरपणे जाहीर रोतीने सांगितले व भूदान आंदोलनातील अपुरेपणाची ग्वाही दिली.

करुणेचा वारसा विनोबा जाणि जयप्रकाश ह्या दोघांनीही घेतला. परंतु जयप्रकाशाची "करुणा " जैसे थे वाद्यांच्या संरक्षणाची अथवा प्रस्थापितांची ढाल म्हणून कधीही वापरली नाही. येथेच जयप्रकाशांच्या विचारांची विनोबांशी फारकत झाली.

आणीबाणीच्या काळाकुट्ट काळातील जनतेचा संघर्ष आणि आणीबाणी उठवण्यात जनतेस बालेले यश म्हणजे विनोबांच्या उदासीनतेवर जयप्रकाशांनी गांधीवादी शांततामय सत्याग्रहाच्या मार्गाने केलेली मातच आहे असे म्हणावे लागेल.

संपूर्ण क्रांती

आणीबाणीपूर्वी गुजरात आणि बिहारच्या लढयाच्या काळात जयप्रकाशजींनी 'संपूर्ण क्रांती' ची कल्पना युवकांना व देशास दिली. जयप्रकाशांची संपूर्ण क्रांतीची कल्पना म्हणजे बदलत्या परिस्थितीमध्ये त्यांच्या पूर्वीच्या क्रांतीच्या कल्पनेत झालेले परिवर्तनच होते. त्यांच्या स्वप्नात सामाजिक आणि आर्थिक क्रांतीबरोबरच नैतिक पुनरुत्थापनाचाही समावेश होता.

जयप्रकाशांची संपूर्ण क्रांतीची कल्पना त्यांच्या अनुयायांनाही मानवणारी नव्हती. उदाहरणार्थ, जयप्रकाशांचा वर्णवाद, सनातनी प्रवृत्ती आणि अंधश्रद्धा यांना असलेला प्रखर विरोध जयप्रकाशांचा जयजयकार करणाऱ्या त्यांच्या अनेक अनुयायांनाही प्रत्यक्षात मानवला नव्हता. वाराणसी येथील मेळाव्यात बोलताना जयप्रकाशांनी परखडपणे सांगितले की, गळ्यातील जानवे हे वर्णवादाचे प्रतीक असल्याने अनेक युवकांनी ते तोडून टाकून वर्णवादाच्या शृंखलेतून मुक्त व्हावे. अर्थात हा प्रतिकात्मक कार्यक्रमच होता.

ही घटना छोटी होती. पण तिचे महत्व मोठे होते. जयप्रकाशांनी तरुणांना सांगितले होते की, केवळ जन्मावरून उच्च-नीच भाव निर्माण करणे अन्यायमूलक होय. केवळ उच्चवर्णीय कुटुंबात जन्म घेतलेला मुलगाच गळ्यात जानवे घालू शकतो आणि म्हणूनच जानवे हे सामाजिक विषमतेचे प्रतीक असून ते त्याज्य मानले पाहिजे. सहाजिकच ज्यांची मने अद्यापिही जुन्यापुराण्या काळातच वावरत होती त्यांना जयप्रकाशांचे हे विचार पटले नाहीत.

वर्ण पिळवणूक-वर्गविग्रह

जयप्रकाशांनी हरिजन आणि आदिवासी यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भात स्पष्टपणे बजावले होते की, सलोख्याने हरिजन आदिवासींवरील सामाजिक अन्याय दूर झाले नाहीत तर शांततापूर्ण वर्गसंघर्षाचाही अवलंब त्यांना करावा लागेल. जयप्रकाशांच्या त्या निवेदनामुळे अनेक प्रतिष्ठित मंडळी दुःखी झाली असतील, त्यांचा गैरसमजही झाला असेल. जयप्रकाशांचा मात्र आग्रह होता की, सामाजिक आणि आर्थिक अन्याय आणि शांततामय संघर्ष ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

जनता पक्षाचेही सरकार असताना राज्य कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी जनतेने "दक्षता समित्या" बनवाव्यात असे जयप्रकाशांनी सुचवले होते. कोणतेही सरकार असो, अशा प्रकारण्या दक्षता समित्या हीच लोकशाहीची शाश्वती आहे आणि त्यावरच जयप्रकाशांचा भर होता.

जयप्रकाशांची संपूर्ण क्रांतीची कल्पना विविध थरांत पोचावी अशी त्यांची अपेक्षा होती. युवाशक्ती व श्रमजीवींची शक्ती हातात हात घालून आगेकूच करील तरच संपूर्ण क्रांती यशस्वी होईल, असा त्यांचा विश्वास होता. नियोजनाचे क्षेत्र तर त्यांना फारच महत्वाचे वाटे. जयप्रकाशांच्या मते भारतासारख्या विकसनशील देशात भांडवलशाही अथवा कम्युनिस्ट राष्ट्रांतील उत्पादनतंत्राचे अंधानुकरण करून चालणार नाही. तर ग्रामोद्योग, लघुउद्योग आणि बडे कारखाने यांत समतोल राखला पाहिजे असा त्यांचा दावा होता.

आर्थिक सत्ता आणि उप्तादन तंत्र यांचे विकेंद्रीकरण जयप्रकाशांच्या दृष्टीने भारतासाठी अत्यावश्यक होते. यासाठी ग्रामोद्योगात निर्माण होणारा माल लघुउद्योगात निर्माण होऊ देणार नाही आणि लघुउद्योगात तयार होणारा माल बड्या उद्योगधंद्यात निर्माण न करण्याचे आपले प्रयोजन असल्याचे जयप्रकाशांनी आग्रहाने सांगितले होते. गांधीजींच्या सैद्धांतिक बैठकीत राहूनच हे धोरण अमलात आणता येईल असा जयप्रकाशांचा विश्वास होता. या तिन्ही क्षेत्रांतील स्पर्धा ही ग्रामोद्योग व लघुउद्योग यांना मारक ठरेल हा इशारा त्यांनी दिला होता.

जयप्रकाशांची विचारयात्रा मार्क्सवादापासून निघून अनेक नागमोडी वळणे घेत शेवटी "संपूर्ण क्रांती" पर्यंत येऊन पोचली. जयप्रकाशांचे संपूर्ण क्रांतीचे चित्र अधुरेच राहिले.

''संपूर्ण क्रांती" म्हणजे केवळ रिकामी खुर्ची पटकावण्याचा "संगीत खुर्ची" हा खेळ नव्हे. त्यासाठी आमूलाग्र परिवर्तनाची नितांत आवश्यकता आहे. ह्या परिवर्तनाची धडपड हीच जयप्रकाशांच्या पवित्र स्मृतीस अर्थपूर्ण श्रद्धांजली!

 

Tags: सोशलिस्ट पार्टी समाजवाद आणीबाणी लोकनायक जयप्रकाश नारायण विनोबा भावे महात्मा गांधी मार्क्सवाद संपूर्ण क्रांती weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

मधु दंडवते

भारतीय समाजवादी व अर्थतज्ज्ञ

जन्म : 21 जानेवारी, 1924; मृत्यू : 12नोव्हेंबर, 2005

 
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके