डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

श्री. मधू देशपांडे हे गुरुजींचे एक अंतेवासी. 'चले जाव' चळवळीत भूमिगत असताना सहा महिने साने गुरुजींबरोबर राहिले. त्या काळातील काही संस्मरणीय आठवणी त्यांनी दिल्या आहेत. 

पूज्य साने गुरुजींची माझी पहिली भेट अमळनेरला हायस्कूलमध्ये शिकत होतो तेव्हा झाली. माझे थोरले बंधू न. रा. देशपांडे हेही त्याच शाळेत शिक्षक होते. त्या वेळी आमच्या घरी गुरुजी आले होते. आखूड खादीचे स्वच्छ धोतर, अर्ध्या बाहीचा शर्ट व खादी टोपी. अत्यंत आस्थेने त्यांनी माझी चौकशी केली असे आठवते.  त्यानंतर मी नगर व पुणे येथे शिकत असताना प्रथम काँग्रेस सेवा दलाचे व नंतर राष्ट्र सेवा दलाचे काम करीत असताना गुरुजींचा थोडा फार संबंध आला. 1942च्या चळवळीत मी कृषी महाविद्यालय सोडून पुणे येथे बुलेटिन्स छापणे, त्यांचे वितरण करणे इत्यादी कामे श्री. शिरुभाऊ यांच्या सांगण्यावरून करीत असे. आणि त्यांच्या टिळक रोडवर जी मोठी मिरवणूक झाली त्या वेळी हॅमंड नावाच्या इंग्रज फौजदाराने गोळीबार केला, त्यानंतर जी धरपकड झाली त्यामध्ये मी पकडला गेलो. 25 दिवस कॉलेजच्या अनेक विद्यार्थ्यांबरोबर होतो. तेथून सुटल्यावर घरी परत पकडवॉरंट आल्याचे कळल्यावरून मुंबईस पसार झालो. तेथे माझे दुसरे धोरले बंधू पु. रा. देशपांडे यांच्याकडे गेलो तर, त्यांच्याकडे पूज्य गुरुजींचे वास्तव्य होते. ते त्या वेळी भूमिगत होते. मीही त्यांच्याबरोबर निरनिराळ्या ठिकाणी फिरू लागलो. त्यांनी लिहिलेली बुलेटिन्स छापण्यास देणे वगैरे कामे करू लागलो. माझ्यावरही वॉरंट असल्याने मी भूमिगत राहूनच काम करू लागलो. 

मुंबई येथे भूमिगत असलेले अच्युतराव पटवर्धन, अण्णासाहेब सहस्रबुद्धे, मधु लिमये, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, माझे तिसरे स. रा. देशपांडे, माधव लिमये, शिरुभाऊ लिमये इत्यादी लोकांच्या संपर्कात आलो व त्यांची कामे करू लागलो. मुंबईत 1942 च्या चळवळीत भूमिगत कार्यकर्त्यांच्या राहण्याच्या जागेचा सांकेतिक भाषेमध्ये उल्लेख केला जात असे. मूषक महाल हे सेंट्रल स्टेशनजवळील एका बोळात हे ठिकाण होते. हडळ हाउसमध्ये एस. एम. उर्फ  इमामसाहेब यांचे नळबाजारात वास्तव्य होते. खेतवाडीमध्ये गुरुजी अनेक वेळा रहात असत म्हणून तिचे नामाभिधान संतवाडी होते. प्रतापगड येथे प्रताप शहा व जयप्रकाशजी राहिले म्हणून ते नाव पडले. ते ठिकाण लॅमिंग्टन पोलीस स्टेशनच्या बोळात तिसऱ्या मजल्यावर होते. माहीम येथे राजमा बिल्डिंगमध्ये पु. रा. देशपांडे राहत असत. ते ठिकाण चौथ्या मजल्यावर होते म्हणून राजगड असे संबोधले जात असे. गुरुजी, एस. एम. हे अनेक वेळ तेथे असत व चर्चा चालत. या सर्व ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांना गुरुजींची आईप्रमाणे माया व वडिलांचे मार्गदर्शन मिळत असे. 

अशा या भूमिगत चळवळीमध्ये गुरुजी म्हणजे प्रेम, कार्यरत मंगलमय शक्ती, गांधींजींचा आदर्श पुढे ठेवून देव-धर्माबरोबर सेवाधर्म मानणारे एक युगपुरुष वाटत. प्रवृत्ती व निवृत्ती, नर वा नारी यांचा विलक्षण संगम त्यांच्यामध्ये आढळतो. एकूण काय, तर गुरुजींच्या रूपाने एक मनस्वी लोकोत्तर पुरुष भेटतो. त्यांच्या अनेक आठवणी आजही मन उल्हसित करीत असतात. त्या आठवणी प्रेमाच्या, आपुलकीच्या, गमतीच्या आहेत.
भांडी घासण्याची पैज  संतवाडीच्या मुक्कामात गुरुजी दररोज अनेक कार्यकर्त्यांना जेवण करून घातायचे. तेथे छोटासा संसार मांडला होता. एक तवा, परात, स्टोव्ह, दोन पातेली, लाटणे, 2-4 वाट्या आणि स्वयंपाकाचे सामान कणीक, डाळ, तांदूळ, मीठ, मिरची, मसाला इत्यादी सर्व कागदाच्या पुड्यांमध्ये ठेवलेले असे. भात, पोळ्या एखादी डाळभाजी असा मेनू असे पण जेवण अत्यंत चविष्ट व रुचकर असे. पत्रावळी जेवावयास असत; कारण की त्या उचलून कुंडीत टाकण्यास बरे पडत असे. तेथे अनेक वेळा वसंत बापट, नलू गोळे, राजा सरंजामे (बाळ अभ्यंकर), रामदास फेणे, निळू लिमये, मधु लिमये, एस. एम., विठू पटवर्धन, शिरुभाऊ व इतर अनेक कार्यकर्ते असत. भांडी घासणे, आवराआवर करणे वगैरे सर्व कामे गुरुजीच करत. 

एके दिवशी सर्व जण म्हणू लागले की, गुरुजी आज मी भांडी घाशीन. पण मग कोण घासणार या बाबत सर्वांची चर्चा झाली. त्यावर  गुरुजींनी एक पैज लावली जो लवकर उठून भांडी घाशील त्याने दिवसभर सर्व काम म्हणजे... घर झाडणे, स्वयंपाक-पाणी करावे असे ठरले. सर्व जण झोपल्यावर मला पहाटे 3 वाजता जाग आली. मी इकडे-तिकडे पाहिले तर सर्व जण झोपले होते. गुरुजीही झोपलेले असावेत असे वाटून सुखावलो. हळूच दार उघडून शेवटच्या खोलीत गेलो, तर गुरुजी भांडी घासून विसळीत होते. मग त्यांनी त्या दिवशी कोणासही काम दिले नाही, असे गुरुजी प्रेमळ व सर्वांना लळा लावणारे होते. 
गमतीचे नामाभिकरण  संतवाडीमध्ये मधू देशपांडे, विठू पटवर्धन, राजा सरंजामे, रामदास फेणे व निळू लिमये नेहमीच राहत असत. तेव्हा गुरुजींनी ‘धूठूजासळू’ असे सांकेतिक नाव ठेवले व त्या एकाक्षरी नावाने ते संबोधित. धू कोठे गेला? जा जेवला का? ठू आज आला नाही, याप्रमाणे गमतीजमती करून आनंद निर्माण करीत असत. 

संकोची गुरुजी
अच्युतराव पटवर्धन,जयप्रकाश नारायण, एस. एम. वगैरे कोणी आले की गुरुजी मुकाट्याने दुसऱ्या खोलीत जाऊन बसायचे. पण एस. एम. वगैरे आत जाऊन त्यांना बाहेर आणत. मग चर्चेमध्ये ते हिरीरीने भाग घेत असत. गुरुजी अत्यंत संकोची व ओशावळ्या वृत्तीचे जरी असले तरी एकदा सभेमध्ये बोलू लागले की मग अतिशय तावातावाने मुद्दे मांडीत व सर्व सभा मंत्रमुग्ध करून टाकीत असत.  सेवा आपद्धर्म प्रतापगडावर जयप्रकाश नारायण एकदा आले. त्या वेळी त्यांचे व माझे अंथरूण घालून स्वतः एका चटईवर गुरुजी धोतर टाकून निजून राहिले. सकाळीच खाली जाऊन हॉटेलमधून त्यांनी जयप्रकाशजींना कॉफीचा ट्रे, ब्रेड, लोणी आणून दिले. 
तेथे सतत सीन दिवस ‘गोड गोष्टीं’चे 5 भाग निरनिराळ्या वह्यांमध्ये गुरुजींनी लिहून काढले. माझ्यातर्फे केशव भिकाजी ढवळे यांना पाठविले. त्यांनी त्याचे फक्त रु. 500 दिले. सर्व हक्क कायमचे करून घेतले. पण गुरुजींनी ते सर्व पैसे अमळनेरच्या कार्यकर्त्यांना श्री. रामभाऊ भोगे यांच्यामार्फत पाठवून दिले. केवढे औदार्य! बड्या लोकांनी देणग्या दिल्या तर त्यांचे कौतुक होते. पण सामान्य माणसाने दिल्याचे स्मरणही राहत नाही. त्याच गोष्टींवर प्रकाशनाने लाखो रुपये कमविले आहेत. 

गुरुजींचे मुलांवरचे प्रेम, माया
गुरुजी कोणाकडे जरी गेले तर तेथील लहान मुलांत ते मिसळून जात. त्यांच्याशी प्रेमाने बोलतील, कडेवर घेतील, घोडा घोडा खेळतील, छोट्या गोष्टी सांगतील, खाऊ देतील. असे अनेक प्रसंग मी पाहिले आहेत. एकदा आम्ही दोघे रेल्वेमधून प्रवास करीत होतो. गाडीत एक बाई मूल सारखे रडत असल्याने त्रासून गेली होती. गुरुजींनी ते पाहिले. गुरुजी त्या बाईकडे गेले. मुलाला त्यांनी घेतले व अडगुलंमडगुलं म्हणत म्हणत पाठीवर थोपटत त्यांनी त्याला शांत केले. त्याच्याशी गोड गोड बोलू लागले तसे ते मूल हसू लागले. गुरुजींना मुलांची अशी माया व प्रेम असे.

पानपट्टीचा प्रसंग
गुरुजींनी कधी पानसुपारी खाल्ली नाही. पण एकदा काय झाले, राजगडावर 8-10 जण चळवळीबाबत चर्चा करीत होते. नंतर जेवणे पण झाली. सौ. गंगू देशपांडे यांनी व गुरुजींनी सर्व स्वयंपाक करून सर्वांना जेवू घातले. जेवण झाल्यावर काही जणांना पानाची तलफ आली. पण चार मजले उतरून पानपट्टी कोण आणणार, यावर एकमेकांकडे अंगुलिनिर्देश चालू होते. बराच वेळ झाला तरी कोणी जाईना. परंतु इकडे गुरुजींनी ती चर्चा ऐकली व खाली कोणाच्या नकळत गेले. पानपट्टीवाल्याच्या दुकानात गेले. पानपट्टीवाला सुका कात, बारीक सुपारी, ओला कात, गुलकंद, जर्दा वगैरे वगैरे विचारू लागला. गुरुजी गोंधळून गेले आणि शेवटी चांगली मसाला पाने 8-10 दे असे सांगून वर येऊन आले व कार्यकर्त्यांना देऊ केली. सर्व जण आश्चर्यचकितच झाले. गुरुजींना कोणी सांगितलेही नव्हते. तरी एकूण संदर्भ पाहून त्यांनी पानपट्ट्या आणल्या. 

रामा गड्याची जोपासना 
मूषक महालात काय किंवा नंतर मेघा भुवनमध्ये काय, रामा गडी काही काम करीत असे. प्रत्येक वेळी खाण्याचे पदार्थ आणले जायचे तेव्हा गुरुजी आधी त्यातील थोडा भाग बाजूला काढून रामासाठी आठवणीने ठेवत असत. गुरुजी भाग बाजूला का काढतात हे प्रथम कोणाच्या ध्यानात यावयाचे नाही. पण मग गुरुजी हळूच तो पदार्थ रामास आवर्जून देत असत. 

माझा पदवी परीक्षेचा निकाल लागला व पास झाल्याचे मी गुरुजींना सांगावयास मेघा भुवनमध्ये गेलो. थोडा वेळ अभिनंदन वगैरे झाले, तेवढ्यात गुरुजी पसार... बाहेर जाऊन त्यांनी पेढे आणले. सर्वांना वाटले. शिल्लक दोनच राहिले. कोण घेणार याची वाट पाहत बसले तर गुरुजींनी ते घेतले व कागदात बांधले. सर्वांना नंतर खाणार असे म्हणू लागले. रामा त्या वेळी नव्हता व गुरुजींनी ते पेढे त्याच्यासाठी ठेवले होते. तो आल्यावर लगेच ते गुरुजींनी त्याला दिले. 

मूषक महालावरची धाड 
18 एप्रिल 1943 रोजी मूषक महालावर पोलिसांनी धाड घातली व अनेक भूमिगत कार्यकर्ते पकडले गेले. मूषक महाल सेंट्रल स्टेशनजवळील एका बोळामध्ये होता. 3-4 खोल्या होत्या. दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी लाकडी जिना होता, तेथे सर्व काही ठीक असल्याची खूण म्हणून त्या एका कठड्यावर लाल फडके लावून ठेवलेले असावयाचे. ते पाहिले की सर्व ठीक आहे, मग वर जाण्यास हरकत नाही असे समजावयाचे.
त्या दिवशी सकाळीच पोलिसांची धाड पडली, त्या वेळी 7-8 जणच होते. परंतु नंतर एकेक कार्यकर्ते ते लाल फडके बघून वर येऊ लागले की साध्या वेशातील पोलीस पकडत असत आणि वर खोलीत नेत असत. ज्यांना समजले ते वाचले; पण जे जे लाल फडके पाहून आले ते पकडले गेले. संख्या वाढतच राहिली. मी व गुरुजी प्रतापगडावरून 4  वाजता निघून साडेचारच्या सुमारास आलो व नेहमीप्रमाणे वर चढू लागलो व पकडले गेलो. वर जवळजवळ 18 जण होतो. त्यामध्ये एस. एम., गोरे वगैरेही होते. आम्ही दोघे मात्र शेवटचे ठरलो. 

नंतर सर्वांना मुंबईत निरनिराळ्या लॉकअपमध्ये ठेवून आठ दिवसांनी बेड्या घालून पुण्यात आणले व येरवडा कारागृहात आमची रवानगी केली. अशा रीतीने जवळजवळ सहा-साडेसहा महिने आम्ही भूमिगत अवस्थेत एकत्रित काढले. निरनिराळ्या अनेक प्रसंगांना तोंडही दिले आणि या स्वातंत्र्यचळवळीमध्ये अल्पसा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला.
 

Tags: एस. एम. जोशी व इतर ना. ग. गोरे ‘चले जाव’ आंदोलन साने गुरुजी मधू देशपांडे s.m. joshi & others संस्मरणीय आठवणी n. g. gore 'chale jao' movement sane guruji madhu deshpande glorious memories weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके