डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

यशवंतांची कविता इतिहासजमा झालेली नाही...

मातृत्व आणि वात्सल्य समान नाहीत. एक मूर्त आहे, तर दुसरे अमूर्त. एक क्षितिज दाखवते, तर दुसरे क्षितिजापलीकडे नेते. कवी यशवंत आणि कवी माधव ज्यूलियन एकाच काळातले. दोघेही रविकिरण मंडळाचे सदस्य. दोघांनीही ‘आई’वर कविता लिहिल्या आहेत. दोघांचा आशय समान आहे. मात्र दोन्हींतील वात्सल्य सारखे असून, नवा उन्मेष दाखविणारे आहे. माधव ज्यूलियनांची कविता आठवणीतून वात्सल्यसिंधूचे दर्शन घडविते, तर यशवंत आपल्या कवितेत मातृत्वातून आपले वात्सल्य नंदिनीचे सामर्थ्य असल्याचे दाखवितात. दोघांच्या सामर्थ्याचे स्वरूप वेगळे असून, वात्सल्य मात्र समान आहे. मातृत्व पुरुषाच्या सहधर्माने मिळत असले, तरी त्यातील वात्सल्य मानवी जीवनाचा परिपाक आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात आणि तंत्रयुगाच्या पिंजऱ्यात याच वात्सल्याला आपण स्वातंत्र्याचा मुक्त बिंदू ठरवून सलाम केला पाहिेजे.

राजकवी यशवंत (1899-1985) यांच्या ‘आई’ या कवितेस पुणे येथेच शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत, या कवितेचा जन्म पुण्यात झाला. ही कविता घराघरांत आपले अढळ स्थान दाखवून देते. एवढेच नाही, तर चित्रपटसृष्टीतही तिने मानदंड निर्माण केला आहे. आईच्या वात्सल्याचे वर्णन करताना आणि आई या प्रतिमेचे स्थान दाखवून देताना यशवंतांची प्रतिभा नव्याने अजमावून पाहता येईल. यशवंत लिहितात...

          ‘आई तुझ्याच ठायी । सामर्थ्य नंदिनीचे

          माहेर मंगलाचे । अद्वैत तापसाचे

          गांभीर्य सागराचे । औदार्य या धरेचे

          नेत्रांत तेज नाचे । त्या शांत चंद्रिकेचे

          वात्सल्य गाढ पोटी । त्या मेघ मंडळाचे

          वास्तव्य या गुणांचे । आई तुझ्यात साचे’

या कवितेत यशवंतांनी वात्सल्य ही संकल्पना ‘आई’ या प्रतिभेपुरतीच मर्यादित ठेवली आहे. मात्र, वात्सल्याचा विस्तार मर्यादित नाही, तो किती तरी व्यापक आहे. या वात्सल्याचा गौरव प्राचीन-अर्वाचीन काळातील लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनीच केला आहे. इतिहास, पुराण, कला, साहित्य, शिल्प, संगीत आणि नृत्य यांनी आपले सामर्थ्य वात्सल्यातून प्रकट केले आहे. ‘आई’ ही प्रतिमा देहापुरती मर्यादित नाही, ती जातीशी निगडित नाही; हे आपण आईवरील आजपर्यंतच्या कविता वाचून लक्षात घेतले आहे. यशवंतांनंतरच्या अनेक कवींनी आपले कमी-जास्त सामर्थ्य दाखवून दिले आहे. या प्रत्येक कवितेतील आईने व्यक्त केलेले आपल्या वात्सल्याचे वास्तव दर्शन शब्दांतून भिन्न-भिन्न अभिव्यक्तीने दाखवलेले असले तरी, त्यातील अंत:स्थ भावना मात्र एकच आहे. वात्सल्य जसे जातीशी निगडित नाही तसेच ते अद्वैत धारणा दाखविणारे, रंग-रूपापलीकडचे आणि सतत विस्तारित भूमिका दाखविणारे आहे. तसेच ते स्तोत्र गाणारे संस्कारक्षम आहे. आपल्या आजच्या सृष्टीतून काही उदाहरणे देऊन हे पटविता येईल. आजची स्त्रीवादी विचारसरणी लक्षात घेता, या वात्सल्याचा विचार आणि आचार कुठलाही आविर्भाव न दाखविता याकडे पाहता येईल.

आपण प्राचीन वाङ्‌मयातील संतकाव्याकडे नजर टाकल्यास असे दिसते की, मराठी यादवकाळातील महानुभाव पंथ आणि भागवत वारकरी पंथ यांचा पाया याच वात्सल्यावर उभा राहिला आहे. जसे महदाई मुक्ताई, जनाई, कान्हाई, सोयराबार्इंचा यांचा पिंड वात्सल्यस्पर्शीच राहिला आहे. ही सारी नामावली पुढे बहामनी काळात, शिवाजीकाळात, पेशवाईत आणि इंग्रज इकडे येईपर्यंत वात्सल्याभोवती घिरट्या घालीत आपली उंच झेप सर्वांना दाखवून देते. महदंबेचे ‘धवळे’ चक्रधराकडे वात्सल्यातून लहान-मोठा भेद विसरून पुढे जाते. महदंबा ही चक्रधराची आई बनून राहते. तिचे ‘धवळे’कविता वात्सल्य संकल्पनेशी एकरूप झालेली दिसेल. संत ज्ञानेश्वर आणि मुक्ताई यांचे नाते बहीण-भावाचे असून, वात्सल्यापोटी मुक्ताई ‘ताटीचे अभंगांतून’ ज्ञानेश्वरांना वात्सल्यपूर्ण उपदेश करते. एवढेच काय, या काळातील सर्व संतांची मांदियाळी ज्ञानेश्वराकडे ‘माऊली’ म्हणून वात्सल्यपूर्ण पाहतात. नामदेवाचा हट्ट घेता ज्ञानेश्वर ‘योग्याची माऊली’ बनून जातात. इथे वात्सल्य जातीपलीकडे-पंथापलीकडे जाऊन, आपला लिंगभेद विसरून आपली संकोचवृत्तीही विसरतात. एवढेच काय, या वात्सल्यापोटी उभे पंढरपूर चंद्रभागेत आपल्या वात्सल्याची धार ओतून समस्तांना वात्सल्यचिंब करतात. सर्व संत ज्ञानेश्वरांना आपली आई वाटतात; म्हणूनच ते क्रोध, अपराध, माया, मोह अशा विविध प्रवाहांना भक्त पुंडलिकाला सुपूर्त करून आईचे वात्सल्य आपल्याकडे घेतात. संत एकनाथांची भारूडे तर हिंदू-मुस्लिम हा भेद विसरून वात्सल्यमय झालेली दाखवतात. रामदासशिष्या वेणाई आपल्या वासराकडे वात्सल्याने पाहते. इथे वात्सल्य माणूस व पशू असा भेद लक्षात घेत नाही. म्हणजे हे वात्सल्य रंग-रूपाबरोबर आप-परभावही विसरलेले दिसेल. ‘आई’ या कवितेत यशवंत ‘गोठ्यात वासरांना । या चारतात गाई’ या अवतरणातून हीच संस्कृती सृष्टीला अर्पण करतात.

आपली पंचमहाभूते याच वात्सल्याला विसरू शकत नाहीत. आपले पौर्णिमेचे चांदणे वात्सल्यापोटी नवा वर्षाव करते. पंढरपूरची चंद्रभागा वात्सल्याकडे नव्या नजरेने पाहताना समुद्र किनाऱ्यावर स्वत:बरोबर इतरांनाही वात्सल्याचा महिमा गात न्हाऊ घालते. कृष्णाची बासरी वात्सल्याचे सप्तसूर ऐकवीत गोपिकांना व इतरांना मोहविते. संत सूरदास, तुलसीदास ही नामावली भक्तवत्सल वात्सल्याची दर्शने आहेत.

कवी यशवंत हे केवळ ‘स्वामी तिन्ही जगाचा। आईविना भिकारी’ असे म्हणत नसून, या वात्सल्यापोटी स्वत:ला बंदिस्त न करता त्याला चराचर सृष्टीकडे नेतात. आपले म.गांधी ‘राष्ट्रपिता’ म्हणून ओळखले जातात, परंतु त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात एक व्यथा बाळगून ठेवली होती. त्यांचा मोठा मुलगा हरिलाल यांनी या पित्याला कधीच आपलेसे केले नाही. तो आपल्या मुक्तकंठाने कस्तुरबांचा मातृमहिमा गायचा. एकदा अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर गांधी व कस्तुरबा या उभयतांना निरोप देण्यासाठी तुफान गर्दी जमली होती. या गर्दीतून वाट काढीत हरिलाल धावत आला आणि आपल्या हातातले एक संत्रं त्याने आपल्या आईस दिले. हरिलालने या क्षणी आपल्या पित्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. इतर सर्वांनी केलेल्या गांधींचा जयजयकारात एकटा हरिलाल कस्तुरबांचा जयजयकार करू लागला. हे शल्य म.गांधींना होते. एका राष्ट्रपिताच्या दु:खावर कस्तुरबांनी फुंकर घालावी, यापेक्षा वात्सल्याचा महिमा काय वर्णावा?

यशवंतांच्या ‘स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी’ या चरणाची व्यापकता, नव्या अर्थाने बोलकी होते, ती इथे. राम गणेश गडकरी यांच्या ‘एकच प्याला’ या नाटकात शेवटच्या प्रवेशात मृत पावलेल्या सिंधूकडे पाहून सुधाकर म्हणतो, ‘‘रामलाल, अरे तुझी बहीण सिंधू गेली, पण माझी ‘आई’ गेली.’’ गडकऱ्यांची प्रतिभा इथे वात्सल्याची थोरवी नव्याने दाखविते. त्यात बहीण, कन्या, पत्नी व गृहिणी ही सारी नाती एकमेकांत गुरफटून नामशेष होतात आणि उरते ते मातृत्व, अन्‌ त्यातले वात्सल्य. अजिंठा-वेरूळ लेण्यांत जी शिल्पे आपण पाहतो ती अनिर्वचनीय म्हणून बोलकी वाटतात, ती वास्तवात नव्या वात्सल्याची आठवण करून देतात. त्यात कैलास लेण्यातून वात्सल्याने भरलेला कलाकार दिसतो. ही सारी बोलकी उदाहरणे पाहता, मातृत्व व त्याद्वारे येणारे वात्सल्य पुरुषाच्या सहधर्मानेच मिळते का, ते केवळ भोगवादी जीवनाचा परिपाक आहे का- ही सर्व वळणे अर्थहीन वाटतात. मातृत्व हे त्यातल्या वात्सल्यामुळे जगण्याचा परिपूर्ण बिंदू झाला आहे. ते डोळ्यांत भरणारे इंद्रियाद्वारे इंद्रियापलीकडे जाणारे आहे.

भगवद्‌गीतेचे विविध रंग आपण अनेकांच्या विचारसरणीतून ओघवते झालेले पाहतो. त्यात वारकरी संत भक्तियोगात गुंग होतात. आद्य शंकराचार्य ज्ञानयोगात समाधी लावून बसतात. लो.टिळक कर्मयोग नव्याने दाखवितात, तर म.गांधींचा अनासक्तियोग पुन:पुन्हा नवा उन्मेष उजळून देईल. ही सर्व वळणे वात्सल्यापोटी विनोबांना अर्थपूर्ण झालेली वाटतात. त्यांनी आपल्या आईसाठी गीतेला नवा भावार्थ देऊन ‘गीताई’ केले. साने गुरुजी तर वात्सल्यरसावर पूर्ण जगणे बावनकशी सोने करून सोडतात. त्यांचे साहित्य वात्सल्यरसात तुडुंब भरलेले दिसेल. श्यामची आई, धडपडणारी मुले ही पुस्तके साने गुरुजींचे विचार आणि आचार समरसतेच्या वळणावर सतत वात्सल्यपूर्ण करतात. कुंभार माती भिजवून ओंजळीत घेतो आणि चाकावर ठेवून तिला आकार देतो. शिल्पकार दगडाला छिन्नीने सुंदर आकार देतो. सूर्य आपल्या उगवत्या किरणांतून सृष्टीला जागे करतो. समुद्र आपल्या धो-धो प्रवाहाने वसुंधरेला चिंब करतो. वारा आपल्या मुलायम स्वरातून नवे गीत गातो. ही सारी संस्कारक्षमता- पंचमहाभूतांची अविरत किमया आपले झुकते माप आहे, हे विसरता कामा नये.

रामायण आणि महाभारतात याच वात्सल्याने आपली नवी पात्रे अविस्मरणीय केली आहेत. अश्वत्थामा आणि द्रौपदी या दोन्ही पात्रांनी परस्परांचा बदला घेतला आणि ती वात्सल्याला शरण गेली. अजरामर अश्वत्थामा आपल्या भळभळत्या जखमेवर वात्सल्यापोटी तेल लावून आक्रोश करतो. द्रौपदी वात्सल्यामुळे आपल्या मुलांच्या आठवणीने हळवी झालेली असते. तसेच प्रसिद्ध लेखिका दुर्गा भागवत अविवाहित राहून वात्सल्याची जोपासना करतात. त्यांना पुनर्जन्म हवा तो मुंगी होऊन जगण्याचा. त्यांच्या दृष्टीत मुंग्यांची रांग केवळ वात्सल्यावर नर-मादी भेद विसरून आपले नवे जीवन जगत असते. दुर्गाबार्इंना साऱ्या चराचर सृष्टीत आई या नात्याने वात्सल्याचे दर्शन घडते. त्या सृष्टीत वात्सल्य धो-धो वाहताना पाहतात आणि आपल्या लेखणीला सर्जन-विसर्जनाचा नवा अर्थ दाखवून देतात. हाच वारसा तांबे आणि बोरकर या कवींनी आपल्या पत्नीवरील सात्त्विक गीतांनी पुढे नेला आहे.

असा हा वात्सल्यसिंधू प्रवाह विस्तृत व सतत ओघवता राहिला आहे. आपण आजच्या जगात वावरताना, आपल्या जगण्याचे स्वार्थीपण भोगताना अश्वत्थाम्याची प्रतिमा नव्याने उभी झालेली पाहत आहोत. आज या जगण्यात आपण सेवाभाव विसरत आहोत. साने गुरुजींचे साधना-साध्य ध्येय ज्या वात्सल्याने भरलेले होते, त्याची आपण वहिवाट करणार आहोत की नाही? पुरोगामी-प्रतिगामी हे शब्द आपला मूळ अर्थ गमावून आज दुर्बोध झाले आहेत. तसेच परंपरा-नवता या शब्दांची वाहती गंगा तारतम्य गमावून वाहते आहे. परंपरा कुठे तरी नव्याकडे झुकलेली असते, तर नवताही परंपरेचे धागे नव्याने उजळून देते. जन्म या शब्दात जगणे व मरणे यातील अद्वैत दिसते, तसेच सर्जन व विसर्जन एकरूपानेच येते. पुन:पुन्हा मागे-पुढे जाते. शेवटी शाश्वत मूल्ये- मग ती जीवनमूल्ये असोत वा वाङ्‌मयमूल्ये असोत- जुळीच असतात. जुन्यातून नव्याचा ध्यास त्यांना घ्यायचा असतो, म्हणूनच मूल्ये कालबाह्य कधीच नसतात. फक्त ती आपल्या नजरेला क्षितिज-समांतर राहून विस्तारित करायची असतात.

कवी यशवंतांची आई कविता शंभर वर्षांची झाली व तिने वात्सल्याच्या नव्या जगण्याचा विचार दिला. त्यात मला नव्या-जुन्याचा हिशोब दिसला नाही, तर जुन्यात नव्याचा जन्म झालेला दिसला. म्हणून आजही दोन्ही जुनी-नवी वळणे एकमेकांतून तडजोडीचा अनाग्रही वात्सल्याने भरलेला प्रवाह झालेली आहेत, हे विसरू नये. त्यामुळेच यशवंताची कविता इतिहासजमा झालेली नाही.

मातृत्व आणि वात्सल्य समान नाहीत. एक मूर्त आहे, तर दुसरे अमूर्त. एक क्षितिज दाखवते, तर दुसरे क्षितिजापलीकडे नेते. कवी यशवंत आणि कवी माधव ज्यूलियन एकाच काळातले. दोघेही रविकिरण मंडळाचे सदस्य. दोघांनीही ‘आई’वर कविता लिहिल्या आहेत. दोघांचा आशय समान आहे. मात्र दोन्हींतील वात्सल्य सारखे असून, नवा उन्मेष दाखविणारे आहे. माधव ज्यूलियनांची कविता आठवणीतून वात्सल्यसिंधूचे दर्शन घडविते, तर यशवंत आपल्या कवितेत मातृत्वातून आपले वात्सल्य नंदिनीचे सामर्थ्य असल्याचे दाखवितात. दोघांच्या सामर्थ्याचे स्वरूप वेगळे असून, वात्सल्य मात्र समान आहे. मातृत्व पुरुषाच्या सहधर्माने मिळत असले, तरी त्यातील वात्सल्य मानवी जीवनाचा परिपाक आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात आणि तंत्रयुगाच्या पिंजऱ्यात याच वात्सल्याला आपण स्वातंत्र्याचा मुक्त बिंदू ठरवून सलाम केला पाहिेजे.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके