शहर भांडवलदारांविरुद्ध दंड थोपटून उभा राहणारा कामगार आपल्या खेड्यांतील दलितांवरील अत्याचार उघड्या डोळ्यांनी पहातो, तुटपुंज्या मजुरीवर जगणाऱ्या शेतमजुरांच्या शोषणाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे हातभारही लावतो, हे काय कामगारातील वर्ग जागृतीचे लक्षण मानायचे?
एक मे.
जागतिक कामगार दिन.
जगातील सर्व कामगार हा दिवस उत्साहाने. साजरा करतात.
"दुनिया के मजदूर एक हो जाओ!" ही घोषणा या दिवशी जेथे तेथे ऐकू येते.
जगातल्या साऱ्या श्रमिकांना एक होण्याचे आवाहन या दिवशी केले जाते.
शंभराहून अधिक वर्षे उलटली या आवाहनाचा आणि घोषणेचा जन्म होऊन.
शोषणावर आधारलेली, माणसाचे माणूसपण हिरावून घेणारी, त्याच्या पायांत गुलामीच्या बेड्या अडकवणारी भांडवली अर्थव्यवस्था साऱ्या श्रमिकांनी संघटित होऊन उध्वस्त करावी आणि तिच्याऐवजी शोषणरहित समाजवादी व्यवस्था निर्माण करावी असा या आवाहनामागचा उद्देश आहे.
मार्क्सने 'क्लासलेस ( वर्गविहीन ) आणि स्टेटलेस' ( शासनरहित ) समाजाचे स्वप्न रंगवले तेव्हा त्याला जुन्याचा नाश आणि नवनिर्माणच अभिप्रेत होते.
या नव्या समाजव्यवस्थेत माणूस आर्थिक, सामाजिक आणि राजकीय शोषणातून मुक्त झालेला असेल असे स्वप्न तो पहात होता.
म्हणूनच त्याने जगातल्या साऱ्या श्रमिकांना संघटित होण्याचे आणि प्रस्थापितांविरुद्ध संघर्ष करण्याचे आवाहन केले.
'जगातल्या कामगारांनो एक व्हा!' कारण "बेड्याशिवाय तुमच्याजवळ गमावण्यासारखे काहीच नाही" असे तो म्हणाला. मार्क्सचे हे तत्त्वज्ञान आपल्याकडे आले, त्यालाही साठेक वर्षे पूर्ण झाली आहेत.
या साठ वर्षांत भारतीय कामगार चळवळीने मार्क्सला अभिप्रेत असलेला 'जुन्याचा नाश आणि नवनिर्माण' या दोन्ही क्षेत्रांत काय कामगिरी बजावली याचा विचार झाला पाहिजे. तर कामगार दिन साजरा करण्याला काही अर्थ उरतो.
कामगारांचा एक वर्ग असतो, त्यांना जातपात नसते, धर्म नसतो, कोणत्याही भेदाभेदाच्या भिंतींचा अडसर ते मानत नाहीत, अशी वाचिक शिकवण कामगार नेते त्यांच्या अनुयायांना सदैव देत असले तरी या शिकवणुकीतील फारच थोडा अंश कामगारांनी आत्मसात केला असल्याचे जाणवते.
कारखानदारांशी संघर्ष करताना कामगारांची भक्कम एकजूट होते, पण त्यांची ही एकजूट मर्यादित उद्दिष्ठांसाठी होत असल्याचाच प्रत्यय येतो. पगारवाढ, बोनस, सुट्ट्या इत्यादी स्वतःला आर्थिक व अन्य फायदे मिळवून देणाऱ्या मागण्या घेऊनच ते संघटितपणे लढताना दिसतात.
भांडवली अर्थव्यवस्थेच्या चौकटीत वरील सर्व आर्थिक लाभ पदरात पडले तरी संघटित कामगारांची फारशी हरकत नसते.
शोषणावर आधारलेल्या समाजव्यवस्थेचा नाश झाला पाहिजे आणि तिच्याऐवजी नवी शोषणरहित समाजव्यवस्था प्रस्थापित झाली पाहिजे यासाठी आपल्या लढ्याची व्यूहरचना कामगार आणि त्यांचे नेते करताहेत असे त्यांच्या कृतीतून तरी दिसत नाही.
शहर भांडवलदारांविरुद्ध दंड थोपटून उभा राहणारा कामगार आपल्या खेड्यांतील दलितांवरील अत्याचार उघड्या डोळ्यांनी पहातो, तुटपुंज्या मजुरीवर जगणाऱ्या शेतमजुरांच्या शोषणाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे हातभारही लावतो, हे काय कामगारातील वर्ग जागृतीचे लक्षण मानायचे?
जातपात, देवधर्म आणि अंधश्रद्धा यांच्याशी संबंधित असलेले आचारविधी इमानेइतबारे पाळत असलेले कामगार पाह्यले म्हणजे संस्कृतीचा आणि माणसाच्या हातातील उत्पादनाच्या साधनांचा संबंध असतो हे मार्क्सचे वचन निरर्थक वाटू लागते.
थोडक्यात म्हणजे शहरांत, कारखान्यांत क्रांतीच्या वल्गना करणारा आमचा वर्ग- जागृत कामगार त्याच्या खेड्यात मात्र प्रस्थापितांचाच एक भाग बनतो!
इतकेच नव्हे तर औद्योगिक शहरातही धार्मिक आणि जातीय तणाव निर्माण झाले तर तेथेही कामगारच आघाडीवर असताना दिसतात. वरळी आणि परवा परवा झालेली जमशेदपूरची दंगल ही कशाची लक्षणे आहेत? भांडवलदारांविरुद्ध खांद्याला खांदा लावून लढणारे कामगार या दोन्ही दंगलीत एकमेकांच्या उरावर बसताना, एकमेकांची डोकी फोडताना दिसले!
अशा प्रसंगी धर्म ही सरंजामशाही समाजाची निर्मिती असून 'नाही रे' वर्गाला गुंगीत ठेवण्यासाठी त्याची निर्मिती झाली आहे, हे मार्क्सचे वचन कामगारांच्या ध्यानी मनीही नसते.
कामगार हा क्रांतीचा अग्रदूत आहे वगैरे चर्पटपंजरी ऐकायला बरी वाटते. परंतु हा अग्रदूत वास्तवात कसा आहे, हे पाहण्याची तथाकथित कामगार नेत्यांना उसंत मिळत नाही.
कामगारांना त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे व त्यासाठी वेळप्रसंगी संघर्षही केला पाहिजे हे खरे असले तरी कामगारांना त्यांच्यावरील सामाजिक जबाबदाऱ्या व वैचारिक बैठक यांचेही भान करून देण्याची गरज आहे.
वैचारिकतेचा हा धागा एकदा का हातचा सुटला तर कोणतीही चळवळ दिशाहीन झाल्याशिवाय राहाणार नाही.
भारतीय कामगार चळवळीने सामाजिक बांधिलकी आणि वैचारिक आशय या दोहोंपासून जणू फारकतच घेतली आहे. अर्थवादाने तिला ग्रासून टाकले आहे.
आणि कोणतीही चळवळ एकदा का अर्थवादाच्या भोवऱ्यात सापडली की तिला भ्रष्ट व्हायला वेळ लागत नाही.
आत्मतेज प्रकट करण्याचे सामर्थ्य मग तिच्यात रहात नाही.
भारतीय कामगार चळवळीची शोकांतिका आहे.
ही शोकांतिका आणीबाणीच्या काळात अधिक विदारक झाली होती.
जे जे हक्क कामगारांनी गेल्या पन्नास साठ वर्षांत झगडून मिळवले होते ते सारे हुकुमशाहीने हिरावून घेतले होते. कामगारांचा बोनस हिरावून घेतला होता. संपाचा अधिकार काढून घेतला होता. तरीही कामगारांनी त्याविरुद्ध बंड तर सोडाच, पण साधी तोंडी नापसंतीदेखील उघडपणे दाखवली नाही.
काही कामगार आणि त्यांच्या नेत्यांनी त्या काळात कारावास पत्करला व अन्य कामे केली. हे खरे असले तरी कामगार चळवळ संघटना म्हणून तरी त्यावेळी स्वस्थच होती.
भारतीय कामगार चळवळीवर पसरलेल्या या अवकळेला तिचे दिशाहीन नेतृत्व बऱ्याच प्रमाणात जबाबदार आहे. या नेतृत्वाने मार्क्सवादाची केवळ चर्पटपंजरी करण्यातच क्रांतिकारकत्व मानले आणि क्रांतीच्या अग्रदूतांना प्रस्थापितांचा एक भाग बनवून टाकले!
या पार्श्वभूमीवर पुण्याच्या हमाल पंचायतीचे काम उठून दिसते. एखाद्या विस्तीर्ण वाळवंटात झुळझुळ वाहणारा झरा दिसावा अन मन आनंदाने उचंबळून यावे तसे अवकळा पसरलेल्या भारतीय कामगार चळवळीच्या विस्तीर्ण वाळवंटात हमाल पंचायतीचे काम पाहिल्यावर वाटते, अन् आशेला पालवी फुटते. वाटते की, मरगळलेली ही कामगार चळवळ अजूनही आत्मतेजाने मानवमुक्तीचा लढा पुढे चालवील.
हमाल पंचायत ही डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली प्रबोधन, संघटन व नवरचना आणि संघर्ष अशा चारही आघाड्यांवर काम करणारी संघटना आहे.
1955 साली स्थापन झालेल्या आणि सुरवातीला सात-आठशे सभासद असलेल्या या संघटनेची सध्याची सदस्य संख्या चार हजारांवर आहे. हमालवर्ग हा उत्पादक शेतकरी जाणि शहरातील ग्राहक वर्ग यांतील दुवा आहे. शेतकरी व कामगार वर्गातीलही तो महत्त्वाचा दुवा आहे.
हा दुवा अद्याप उपेक्षित राहिला आहे. त्याच्याकडे आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या अवहेलनेने पाहिले जाते. असंघटित राहिल्याने आणि शासनावर व्यापारी वर्गाचे वर्चस्व असल्याने हमाल वर्ग पूर्णपणे उपेक्षित राहिला होता.
व्यापाऱ्यांच्या दुकानांत काम करूनही त्यांच्यात मालक आणि मजूर हे नाते कधी निर्माण झालेले नाही. त्यामुळे हमालांच्या श्रमाला वेठबिगारीचे स्वरूप येते.
कामाचे तास, आठवड्याची पगारी सुटी, हक्काची रजा, बोनस इत्यादी प्रकारचे कोणतेही संरक्षण हमालांना नाही.
हमालांना हे सारे हक्क मिळवून द्यायचे तर त्यांची भक्कम संघटना हवी, योग्य नेतृत्व हवे. डॉ. बाबा आढाव यांनी ही जबाबदारी फारच कौशल्याने पार पाडली. व्यापारी आणि शासन यांच्याबरोबर संघर्ष करण्याचे अनेक प्रसंग त्यांच्यावर आले आणि त्यांनी ते यशस्वीरित्या हाताळले.
ही संघटना बांधण्यात बाबांना ज्यांचे सहकार्य लाभले त्यांच्यापैकी दोघेजण सध्या जनता सरकारात महत्वाची खाती सांभाळत आहेत. एक श्री मोहन धारिया. काही काळ ते हमाल पंचायतीचे खजिनदार होते. आणि दुसरे श्री भाई वैद्य. ते तर हमाल पंचायतीने केलेल्या पहिल्या सत्याग्रहाचे सेनानी होते.
हमाल पंचायतीची पहिली पाच सहा वर्षे पायाभरणीत गेली. त्यानंतर उभारणीचे कार्य सुरू झाले. हमालांचे शोषण थांबवायचे तर ज्यांच्याकडून त्यांचे शोषण होते त्या व्यापारी शेटजी वर्गाबरोबर संघर्ष करण्याचे प्रसंग येतात. पंचायत त्या आघाडीवर दंड थोपटून उभी असतेच. पण हमालांची अंतःशक्ती वाढवण्यासाठीही पंचायतीने कष्टाची भाकर, भाऊभेट निधी, पुस्तक पेढी, स्वस्त दवाखाना, हमाल मजूर सहकारी सोसायटी, कामगार, शिक्षण केंद्र, माझे घर योजना, बालवाडी असे विविध उपक्रम सुरू केले आहेत, मालकांशी संघर्ष करून हमालांना मिळणारा आर्थिक लाभ व्यसनांत खर्ची पडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
त्या दृष्टीने हमालांची "माझी बॅन्क" सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे हमालांना बचतीची सवय लागेल. एक सहकारी भांडारही पंचायतीच्या वतीने सुरू करण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमांबरोबरच अंधश्रद्धा, सामाजिक विषमता यांच्याविरुद्धही हमालांचे मानस तयार केले जाते. 'एक गाव:एक पाणवठा' विषमता निर्मूलन शिबिर, मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या चळवळी अशा विविध चळवळींत हमालांनी भाग घ्यावा असा प्रयत्न जाणीवपूर्वक पंचायतीच्या वतीने केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि म. ज्योतिबा फुले यांची जयंती संघटनेच्या पातळीवर साजरी करणारी हमाल पंचायत ही बहुधा एकमेव कामगार संघटना असावी.
हमाल पंचायतीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन हमाल चळवळ संघटित केली आहे. सर्व महाराष्ट्रात ही चळवळ आता पसरली आहे. त्याचे श्रेय हमाल पंचायतीकडे जाते. हमालांच्यात जागृतीबरोबर आत्म- सन्मानाची भावना निर्माण करण्याची मोलाची कामगिरी हमाल पंचायतीने बजावली आहे.
पुण्याच्या मार्केट यार्डात उभी असलेली 'हमाल भवन' ही भव्य वास्तू पंचायतीच्या विधायक पुरुषार्थाचे प्रतीक आहे. पंचायतीच्या प्रत्येक सभासदाने स्वतःच्या कष्टातून प्रत्येकी दोनशे रुपये देऊन पाच लाखांची ही भव्य वास्तू उभी केली आहे. ही वास्तू पंचायतीच्या शक्तीची निदर्शक ठरेल अशीच आहे.
हमाल भवनाच्या उद्घाटनाचा सोहळा केंद्रीय उद्योगमंत्री श्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या हस्ते एक मे रोजी होत आहे.
ही वास्तू महाराष्ट्रातील हमाल चळवळीचे तर केंद्र बनेलच, शिवाय डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विषमता निर्मूलन समितीचेही केंद्र ठरेल अशी आशा आहे.
भारतीय कामगार चळवळीत नवा आशय ओतणाऱ्या हमाल पंचायतीच्या विधायक पुरुषार्थाला शुभेच्छा !
Tags: हमाल भवन पुणे कार्ल मार्क्स जॉर्ज फर्नांडिस कामगार दिवस 1 मे Hamal Bhava Pune Karl Marx George Fernandes Labor Day May 1 weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या