डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

रा.स्व.संघ - भाजपा परिवाराची परधर्म सहिष्णुता

गेल्या काही महिन्यांत ख्रिश्चनांवरील हल्ले, अत्याचार, जोगिणींवरील बलात्कार यांच्या संख्येत अचानक वाढ झाली. संघ-भाजपा परिवारातील विहिंप, बजरंग दल, हिंदू जागरण मंच या संघटनांच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचे पोलीस तपासात सिद्ध झाले आहे. 'ख्रिश्चन मिशनरी सक्तीने धर्मांतर आणि आंतरधर्मीय विवाह घडवून आणतात, असा प्रचार करून सांप्रदायिक हिंसक दंगली घडवून आणण्याचा या संघटनांनी कट केला असावा अशा संशयाला जागा आहे. अत्यंत गांभीर्याने आणि सखोल तपास केल्यानंतर ख्रिश्चन मिशनऱ्यांवरील कथित आरोप निराधार आणि बिनबुडाचे आहेत,' असे गुजरातचे पोलीस महासंचालक सी.पी.सिंग यांनी ठामपणे सांगितले आहे. हिंदुत्वाच्या या आक्रमकतेत फॅसिझमची दुःचिन्हे दडलेली आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून देशातील अल्पसंख्य धर्मीयांवर, विशेषेकरून ख्रिश्चन‌ धर्मीयांवर होत असलेल्या हल्ले-अत्याचारांत लक्षणीय वाढ झाली आहे. ‘युनायटेड ख्रिश्चन फोरम ह्युमन राइट्‌स’ या खिश्चनांच्या मध्यवर्ती संघटनेने जमविलेल्या आकडेवारीनुसार 1964-96 या बत्तीस वर्षांत ख्रिश्चनांवर अडतीस हल्ले झाल्याची नोंद आहे. तर 1997 मध्ये पंधरा आणि 1998 मध्ये नव्वद हल्ले झाले असून 5 धर्मसेविकांवर (नन्स) बलात्कार, 9 धर्मसेविकांची हत्या, 25 धर्मसेविकांचा विनयभंग, 16 धर्मगुरूंची हत्या, 11 प्रार्थनास्थळांची नासधूस आणि जाळपोळ झालेली आहे, शिवाय धर्मगुरूंना नग्न करून त्यांची रस्त्यातून धिंड काढणे, बायबल जाळणे, येशूख्रिस्त आणि कुमारी माता मेरी यांच्या तसबिरी आणि पुतळ्यांची नासधूस करणे असेही प्रकार घडले आहेत.

केंद्रात तसेच काही राज्यांत भाजपाची सरकारे आल्यापासून ख्रिश्चनांवर होत असलेले हल्ले आणि अत्याचारांत वाढ झाली असल्याचे दिल्लीचे आर्च बिशप श्री. अ‍ॅलन लॉस्टिक यांनी एका मुलाखतीत ('सन्डे' 22 नोव्हेंबर) सांगितले आहे. या अत्याचारांपैकी बहुसंख्य अत्याचार भाजपाची सरकारे असलेल्या राज्यांत झाले असून त्यातील निम्म्याहून अधिक गुजरातमध्ये झाले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-भाजपा परिवारातील विहिंप व बजरंग दल, हिंदू जागरण मंच या संघटनांच्या कार्यकर्त्यांचा यात पुढाकार असल्याचे ख्रिश्चन नेत्यांचे म्हणणे आहे. तर या निंद्य प्रकारांशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-भाजप परिवाराचा काहीच संबंध नसल्याचे परिवाराच्या वरिष्ठ नेत्यांनी जाहीर केले आहे, परंतु प्रसारमाध्यमे काही सरकारी अधिकाऱ्यांच्या मुलाखती, छापील पत्रके आणि परिवारातील स्वानिक पुढाऱ्यांच्या वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या मुलाखतींवरून संघपरिवाराचे नेते खोटे बोलताहेत हेच सिद्ध होते.

ख्रिश्चन शाळांचे हिंदुकरण

कर्नाटकातील मिशनरी संचालित शैक्षणिक संस्थांमध्ये बजरंग दलाच्या लेटर हेडवर छापलेली पत्रके वाटली असून ख्रिश्चन शाळांचे हिंदुकरण करण्यासाठी बारा कलमी कार्यक्रम सुचविण्यात आला असून हा कार्यक्रम त्वरित अंमलात आणा. अन्यथा भीषण परिणामांना तोंड देण्यास तयार राहा, अशी धमकी दिली आहे (टार्गेटिंग स्कूल्स इन कर्नाटक, फ्रंटलाइन 4 डिसेंबर). 'गोडीने हे लोक (ख्रिश्चन) ऐकणार नसतील तर बळाचा वापर करून त्यांना ऐकण्यास भाग पाडले पाहिजे.

भारतीय संस्कृतीवरील आक्रमण रोखण्याचा हाच एकमेव मार्ग आहे,’ असे बजरंग दल, महाराष्ट्राचे जॉइंट सेक्रेटरी आणि विहिंप परिषद मुंबईचे अध्यक्ष श्री. शंकर गायकर यांनी सांगितल्याचे प्रसिद्ध झाले आहे (टाइम्स ऑफ इंडिया 2 जानेवारी 99). परधर्मीयांवरील अत्याचारांमुळे हिंदुत्ववाद्यांना झालेल्या विकृत आनंदाचा नमुना मध्य प्रदेशात चार धर्मसेविकांवर (नन्स) झालेल्या बलात्काराबाबतीत विहिंप परिषदेचे चिटणीस श्री. व्ही.एल.शर्मा यांच्या प्रतिक्रियेत मिळतो. हे बलात्कार म्हणजे 'देशभक्त तरुणांची देशद्रोही शक्तीविरोधी व्यक्त झालेली स्वाभाविक संतप्त प्रतिक्रिया होय,’ असे त्यांनी म्हटले आहे.

गुजरातमधील ख्रिश्चनांवरील अत्याचार आणि दहशतवादी कृत्ये संघ-भाजप परिवारातील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनीच केली असल्याचा निर्वाळा गुजरातचे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस श्री. सी.पी. सिंग यांनी दिला आहे. श्री. सिंग यांनी ‘कम्युनॅलिझम कॉम्बॅट’ ला (ऑक्टोबर 1998) दिलेल्या मुलाखतीत कायदा हाती घेऊन ज्या प्रकारे दहशतवादी कृत्ये केलीत ती पाहता ही बेजबाबदार कृत्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनीच केलीत हे स्पष्ट आहे. अशा बेजबाबदार कृत्यांमुळे सबंध गुजरातमधील शांतता धोक्यात येऊ शकते. ख्रिश्चन मिशनरी सक्तीने धर्मांतर आणि आंतरधर्मीय विवाह घडवून आणतात, अशा प्रचारातून बहुसंख्याकांच्या धार्मिक भावना उत्तेजित करून सांप्रदायिक हिंसक दंगली घडवून आणण्याचा या संघटनांनी कट केला असावा अशा संशयाला जागा आहे. अत्यंत गांभीर्याने आणि सखोल तपास केल्यानंतर ‘ख्रिश्चन मिशनऱ्यावरील कथित आरोप निराधार आणि बिनबुडाचे आहेत,’ असे श्री. सिंग यांनी ठामपणे म्हटले आहे.

गुजरातमधील अत्याचारांची चौकशी करण्यासाठी पाठविलेल्या अल्पसंख्य आयोगाशी सहकार्य करण्याची टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांनी नाइलाजाने का होईना 'ख्रिश्चन आणि मुस्लिमांवर होत असलेल्या हिंसक अत्याचारात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचे मान्य केले आहे. (इंडियन एक्स्प्रेस, 12 ऑगस्ट). हिंदुत्ववाद्यांचा खोटारडेपणा म्हणजे त्यांना अभिप्रेत असलेले चारित्र्य आणि सत्यप्रियता मानायची काय? सध्या मर्यादित क्षेत्रात सुरू असलेले अत्याचाराचे लोण देशाच्या इतर भागात पोहोचण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यातून सांप्रदायिक दंगलींचा डोंब उसळला तर त्याची जबाबदारी संघ-भाजपा परिवारावरच असेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सांप्रदायिक दंगली हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीचा अंगभूत भाग आहे.

अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सांप्रदायिक दंगली घडवून आणण्यात पुढाकार घेत आला आहे. या पराक्रमात संघाची कोणीही बरोबर करू शकणार नाही. 1946-47 मध्ये देशात (विशेषतः बंगाल, बिहार, दिल्ली) हिंदू-मुसलमानांच्या ज्या दंगली झाल्या, त्यात संघाचा पुढाकार होता हे सिद्ध करणारे अनेक पुरावे सरकारदरबारी उपलब्ध आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांनी श्री. गोळवलकर गुरुजी आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना पाठविलेल्या पत्रात देशातील हिंदू-मुस्लीम दंगलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा सिद्ध करणारा पुरावा भारत सरकारजवळ असल्याचा व संघाने केलेल्या वातावरण निर्मितीमुळेच महात्मा गांधींची हत्या झाल्याचे म्हटले आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात अहमदाबाद (1969), भिवंडी (1970), तेलीचरी (1971), जमशेदपूर (1981), कन्याकुमारी (1982) इत्यादी ठिकाणी झालेल्या दंगलींच्या चौकशीसाठी नेमलेल्या आयोगांनी वरील ठिकाणी झालेल्या सांप्रदायिक दंगलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहभागाचा उल्लेख केला आहे. 1982 साली कन्याकुमारी जिल्ह्यात झालेल्या हिंदू-ख्रिश्चन दंगलीच्या चौकशीसाठी नेमलेल्या न्यायमूर्ती पी. वेणुगोपाल यांनी सादर केलेल्या अहवालात 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक लढाऊ आणि आक्रमक संघटना असून, हिंदूंच्या हक्कांचे आपण एकमेव रक्षक आहोत,’ असा या संघटनेचा दावा आहे.

अल्पसंख्याकांना दिल्या जाणाऱ्या विशेष सवलतीमुळे हिंदूंचे रास्त आणि वाजवी हक्क डावलले जातात असे ही संघटना मानते, त्यामुळे अल्पसंख्याकांना त्यांचे स्थान दाखवून देणे हे आपले इतिहासदत्त काम आहे असेही संघटना मानते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जमातवादाला आणि जातीय दंगलींना प्रोत्साहित करण्यात आघाडीवर असतो. संघाची सांप्रदायिक दंगली घडवून आणण्याची एक खास पद्धत आहे. बहुसंख्याकांच्या मनात खिश्चनांविषयी संशय निर्माण होईल असा प्रथम त्यांच्या बाबतीत अपप्रचार केला जातो. ख्रिश्चनांच्या राष्ट्रनिष्ठेविषयी बहुसंख्याकांची मने कलुषित केली जातात... असे न्यायमूर्ती पी. वेणुगोपाळ यांनी परखडपणे नोंदवून त्या वेळी झालेल्या दंगलीत संघाचा सिंहाचा वाटा होता असे स्पष्ट म्हटले आहे. अशा हिंसक कृत्यातून उसळणाऱ्या सांप्रदायिक दंगली संघ परिवाराला आवश्यक वाटतात. कारण अशा सांप्रदायिक दंगली, वांशिक, जातीय व धार्मिक तणावांमुळे समाजाचे निरनिराळ्या धार्मिक-वांशिक गटांमध्ये ध्रुवीकरण होते अशी, संघ-भाजपा परिवाराची धारणा आहे. इतकेच नव्हे तर अशा ध्रुवीकरणातूनच हिंदुराष्ट्राची उभारणी करता येईल असे त्यांना वाटते.

संघ परिवारातील एक पत्रकार श्री. गिरीलाल जैन त्यांच्या ‘नकली धर्मनिरपेक्षता’ या लेखात ‘‘माझा असा विश्वास आहे की हे ध्रुवीकरण अगदी निरनिराळ्या सबबींखाली घडवून आणलेले हिंदू-मुस्लीम दंगेसुद्धा परिवर्तनासाठी होत असलेल्या संघर्षाचा भाग आहे. त्या संघर्षाची निष्पत्ती आहे,’’ असे लिहितात. संघ परिवाराचा हिंसा आणि सांप्रदायिक दंगलींबाबतचा दृष्टिकोन यावरून स्पष्ट होतो.

परधर्म द्वेषाची परंपरा

संघ परिवाराचा मुस्लीमद्वेष सर्वश्रुत असला तरी सध्यातरी त्यांना ख्रिश्चनांपासून जास्त धोका वाटतो. (श्रीमती सोनिया गांधींची धास्ती घेतलेली दिसते !) हे विश्व हिंदू परिषदेचे चिटणीस श्री. गिरीलाल किशोर यांच्या‌ उद्गारांवरून स्पष्ट होते. 25 नोव्हेंबरला चंदिगडच्या एका सभेत बोलताना " सध्या तरी फुटीरतावादी मुस्लिमांपेक्षा आपल्याला ख्रिश्चनांपासून जास्त धोका आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे." असे ते म्हणाल्याचे प्रसिद्ध झाले आहे. याच भाषणात शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष श्री. तोहराही फुटीरतावादी असल्याचे त्यांनी सांगितले. मुस्लीम-खिश्चनांवरील सर्वच अल्पसंख्याकांचे पूर्वज हिंदूच होते या वास्तवाचा स्वीकार त्यांनी केलाच पाहिजे; इतकेच नव्हे तर त्या सर्वांनी हिंदुधर्मात परत आलेच पाहिजे. याला दुसरा पर्याय नाही. अशीही बिगर हिंदुधर्मीयांना तंबी दिली आहे.

सरसंघचालक श्री. राजेंद्रसिंहजीही परधर्मीयांना दमबाजी करण्यात मागे नाहीत. 22 नोव्हेंबर रोजी मीरतला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरात बोलताना ‘‘मुस्लीम व ख्रिश्चनांनी हिंदू संस्कृतीचा स्वीकार केला पाहिजे तरच हिंदू त्यांना सन्मानाने वागवतील, अन्यथा नाही,’’ अशी त्यांनी तंबी दिली आहे. पुढे ‘‘हिंदू संस्कृतीच आपली खरी आणि मूळ संस्कृती आहे असे मुस्लीम आणि ख्रिश्चनांना हृदयापासून वाटले पाहिजे’’ असे म्हटले आहे. मुस्लीम आणि ख्रिश्चनांविषयी हिंदूंच्या मनात द्वेष आणि संशय निर्माण करण्याचे व हिंदूंना भडकावण्याचे काम थेट सावरकरांपासून सध्याचे सरसंघाचालक श्री. राजेंद्रसिंहजी व इतर हिंदुत्ववादी नेते सतत करत आले आहेत.

संघ परिवारातील श्री. गिरीलाल जैन, श्री. सीताराम गोयल श्री. रामस्वरूप, श्री. हर्षनारायण यांच्यासारखे पत्रकार आणि लेखकही त्यांची लेखणी त्याच कामासाठी झिजवीत आहेत. सावरकरांनी 1923 साली लिहिलेल्या ‘हिंदुत्व’ या पुस्तकात मुसलमान आणि ख्रिश्चन काही काळापूर्वी हिंदूच होते; परंतु धर्मांतरानंतर त्यांना आपल्या पूर्वीच्या हिंदू संस्कृती, परंपरा, आदर्शांचा, हिंदू देवदेवता आणि वीर पुरुषांविषयी काहीही आदर राहिलेला नाही असे म्हटले असून, मुसलमान आणि ख्रिश्चनांची पवित्र भूमी आणि श्रद्धास्थाने हिंदुस्थानाबाहेर अरेबिया आणि पॅलेस्टाइनमध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्या हिंदुस्थानला पितृभूमी मानण्याला काही अर्थ उरत नाही असे म्हटले आहे.

धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर, अशी मांडणी हिंदुत्ववादी सतत करत असतात, त्यांचे उगमस्थान सावरकरांच्या या विचारात सापडते. माजी सरसंघचालक श्री. गोळवलकर गुरुजींनी सावरकरांच्या 'हिंदुत्व' या पुस्तकाची खूपच स्तुती केली असून त्यांच्या ‘विचारधन’ या पुस्तकात सावरकरांनी केलेली हिंदुत्वाची व्याख्या विस्तारित केली आहे. या पुस्तकात श्री. गोळवलकर गुरुजींनी मुस्लीम, ख्रिश्चन आणि कम्युनिस्ट हे देशांतर्गत शत्रू असून त्यांच्यापासून भारताला मोठा धोका असल्याचे स्पष्ट म्हटले आहे. मुसलमान आणि ख्रिश्चन पूर्वाश्रमीचे हिंदूच असले तरी धर्मांतरानंतर त्यांना हिंदुस्थानबद्दल प्रेम वाटेनासे झाले आहे. देशाबद्दलचा भक्तिभाव त्यांच्यात उरला नाही. इतकेच नव्हे तर त्यांची पवित्र भूमीही देशाबाहेर असून ते देशाच्या शत्रूंबरोबर ‘आयडेंटिफाय’ झालेले आहेत, असे मुसलमान आणि ख्रिश्चनांवर आरोप ठेवले आहेत. शत्रूबरोबर 'आयडेंटिफाय ' होणारे देशद्रोही ठरतात. त्यांचा निःपात केलाच पाहिजे. त्यासाठी हिंसक सांप्रदायिक दंगली होणे हे ओघाने आलेच. ‘आम्ही कोण? आमच्या राष्ट्रीयत्वाची व्याख्या’ या पुस्तकात श्री. गोळवलकर ‘‘एका वाक्यात सांगायचे तर भारतातील बिगर हिंदूंनी एक तर परकीय म्हणून राहण्याचे सोडून दिले पाहिजे अथवा या देशात हिंदुराष्ट्राचे पूर्ण अंकित दुय्यम म्हणून राहिले पाहिजे. कोणतेही खास हक्क मिळण्याची त्यांची लायकी नाही. मग सवलतीची वागणूक तर दूरच राहिली. नागरिकत्वाचे हक्क देण्याच्या ते लायकीचे नाहीत.’’ असे म्हणतात.

ज्यांना नागरिकत्वाचे हक्क नसतात त्यांना मताधिकार नसतो. रामजन्म भूमी न्यासाचे आचार्य वामदेव यांनी राज्यघटनेत सुचविलेल्या तरतुदीत मुसलमान व ख्रिश्चनांना मताधिकार नसावा असे सुचविले आहे हे येथे लक्षात घेण्यासारखे आहे. बिगर हिंदूंनी परकीय म्हणून राहणे सोडून दिले पाहिजे म्हणजे नेमके काय करावे हेही गोळवलकरांनी वरील पुस्तकात स्पष्ट केले आहे. बिगर हिंदूंनी हिंदू संस्कृतीचा स्वीकार केला पाहिजे. हिंदुवंश आणि संस्कृतीच्या गौरवाखेरीज दुसऱ्या कोणत्याही विचारांना त्यांच्या मनामध्ये स्थान असता कामा नये, असे श्री. गोळवलकरांचे सांगणे आहे. 'हिंदू धर्माव्यतिरिक्त इतर धर्मांना धर्म म्हणणे चूकच आहे असे गोळवलकरांना सांगायचे आहे. गोळवलकरांच्या विचारांचे अधिक चांगले स्पष्टीकरण संघ परिवारातील एक लेखक श्री. सीताराम गोयल यांनी त्यांच्या 'सेक्युलरिझम - राष्ट्रद्रोहका दुसरा नाम' या पुस्तिकेत केले आहे. 'एक धर्म म्हणून इस्लामला मान्यता देणे ही चूकच होय. केवळ अडाणीपणामुळे हिंदूंनी इस्लाम व ख्रिश्चन पंथांना धर्म म्हणून मान्यता दिली ही हिंदूंची चूकच होय. आता सर्व हिंदूंनी इस्लाम आणि ख्रिश्चन पंथांना आम्ही धर्म म्हणून मान्यता देत नाही, असे जाहीर करावे' - अशी ते हिंदूंना चिथावणी देतात. 

फॅसिझमच्या उदयाचे दुश्चिन्ह 

श्री. गोळवलकर गुरुजी आणि त्यांचे अनुयायी नेहमीच हिटलरच्या भाषेत बोलताना दिसतात. 'माईन काम्फ' या आत्मवृत्तात हिटलर ज्यू आर्येतरांचा 'जगण्याचा हक्क नसलेले शूद्र' असा उल्लेख करतो; तर गोळवलकर गुरुजी बिगर हिंदूंचा ‘नागरिकत्वाचे हक्क मिळण्यास लायक नसलेले’ असा उल्लेख करतात. ‘धर्माच्या अस्मितेचे प्रश्न कायद्याच्या चौकटीत सोडविता येणार नाहीत’ असे श्री. लालकृष्ण अडवानी म्हणतात, तर ‘वंशाच्या अस्मितेचे प्रश्न कायद्याच्या चौकटीबाहेर सोडविले पाहिजेत,’ असे हिटलर म्हणतो. (माईन काम्फ) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपा परिवार फॅसिझमचाच पुरस्कार करणारे आहेत हेच यावरून सिद्ध होते.

एक डावपेचाचा भाग आणि सत्ता हस्तगत करण्याचा सोईचा आणि व्यावहारिक मार्ग म्हणून ते लोकशाहीचा स्वीकार करतात.‘ लोकशाही, समाजवाद या सर्व पाश्चात्त्य संकल्पना असून ही प्रवाहपतित अवस्था परानुकरण वृत्तीचे निदर्शक' असल्याचे श्री. गोळवलकर गुरुजी 'विचारधना’त‌ म्हणतात. हिटलरचा नाझी पक्ष आणि संघपरिवार यांची कार्यपद्धतीही एकच आहे. फॅसिझमच्या यशस्वितेसाठी दोन घटक आवश्यक असतात.

1. सर्वांना एक सूत्रात गुंफणारे भावनिक आवाहन

2.ज्याच्याबद्दल आत्यंतिक द्वेष व तिरस्कार व्यक्त करता येईल असा शत्रू. हिटलरने आर्य वंशाच्या श्रेष्ठत्वाचे आवाहन करून जर्मन लोकांना संघटित करून त्यांना ज्यूंचा आत्यंतिक द्वेष व घृणा करण्यास शिकविले. संघ परिवार 'सनातन गौरवसंपन्न परंपरेचे' (रामजन्म भूमीचे) भावनिक आवाहनाद्वारे हिंदूंना संघटित करून त्यांना मुस्लीम-ख्रिश्चन धर्मीयांचा द्वेष व तिरस्कार करण्यास शिकवीत आहेत.

संघ परिवाराचे सभासद एकाच वेळी आक्रमक, जातीयवादी आणि प्रखर राष्ट्रवादी आहेत. अशा प्रकारचा आक्रमक जातीयवाद आणि प्रखर राष्ट्रवाद यांच्या संयोगातून फॅसिझमचा उदय होतो. हिटलरने ज्याप्रमाणे आर्यन वंशवाद व जर्मन राष्ट्रवाद यांचे एकत्रीकरण केले, त्याच पद्धतीने संघ-भाजपा परिवार हिंदुत्ववाद आणि राष्ट्रवाद (हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व) यांचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न करताहेत. हे फॅसिझमच्या उदयाचे दुश्चिन्ह आहे. 

नेहरूवाद एक परकीय शक्ती ? 

श्री. गोळवलकर गुरुजींनी मुस्लीम, ख्रिश्वन आणि कम्युनिस्ट यांचा 'देशांतर्गत धोकेबाज शत्रू' असा ‘विचारधन’ या पुस्तकात उल्लेख केला आहे. श्री. गुरुजींच्यानंतर त्यांच्या अनुयायांना आणखी एका अंतर्गत धोकेबाज शत्रूचा(?) शोध लागला आहे. त्या अंतर्गत शत्रूचे नाव आहे ‘नेहरूवाद’! देशापुढे गेल्या पन्नास वर्षांत ज्या जटिल समस्या 'आ' वासून उभ्या राहिल्या आहेत, त्यांच्या मुळाशी 'नेहरूवाद' असल्याचे लालकृष्ण अडवानीपासून विश्व हिंदू परिषदेचे श्री. अशोक सिंघल यांचापर्यंत सर्वांचे मत आहे. मुस्लीम, ख्रिश्चन, कम्युनिस्ट यांच्या पंगतीला नेहरूंना बसवून नेहरूवादापासून देशाला धोका असल्याचा त्यांनी अपप्रचार सुरू केला आहे.

दिल्लीतील संघ परिवारातील 'व्हॉइस ऑफ इंडिया' नावाच्या प्रकाशन संस्थेने त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या पुस्तकांची सूची प्रसिद्ध केली आहे. सूचीत प्रकाशनसंस्थेचा हेतू स्पष्ट करताना हिंदू समाज आणि संस्कृती सध्या आणीबाणीच्या अवस्थेतून मार्गक्रमण करीत असून, 'मुस्लीम, ख्रिश्चन, कम्युनिस्ट आणि नेहरूवाद या चार परकीय शक्तींच्या वेढ्‌यात आपण अडकलो आहोत,' असे म्हटले आहे. पुढे या चार परकीय शक्ती हिंदूंच्या चिरंतन आणि श्रेष्ठतम नैतिक मूल्यांचा विध्वंस करण्यासाठी टपून बसल्या असून हिंदू मानसिकतेचे खच्चीकरण करण्याचे कूट कारस्थान रचीत आहेत; त्यासाठीच हे सर्व हिंदू समाजासमोर ठेवून, हिंदू धर्मावर गुदरलेल्या या आपत्तीची सर्व हिंदूंना जाणीव करून देण्यासाठी आणि हिंदू समाज व हिंदू संस्कृतीला ठोस सैद्धांतिक अधिष्ठानावर उभे करण्यासाठी निरनिराळी प्रकाशने प्रसिद्ध करण्याचा 'व्हॉइस ऑफ इंडिया’चा निर्धार प्रकाशकांनी व्यक्त केला. 

एक राष्ट्र, एक जनसमुदाय आणि एक संस्कृती 

सारनाथला 6 नोव्हेंबरला बौद्ध महोत्सवाच्या वेळी झालेल्या परिसंवादात बोलताना, 'बुद्धाने कोणताही नवा धर्म सांगिलला नसून, पुरातन अशा ‘इन्डोआर्यन’ संस्कृतीच्या काही श्रेष्ठ अशा नैतिक मूल्यांवर भर दिला आहे. भगवद्‌गीतेतूनच त्याने प्रेरणा घेऊन बौद्ध तत्त्वज्ञानाची मांडणी केली आहे. खरे म्हणजे तो विष्णूचाच अवतार होता, असे श्री. लालकृष्ण अडवाणी यांनी सांगितले. अडवाणींचे हे विधान अनेकांना संघ-भाजपा परिवाराच्या तथाकथित परधर्म सहिष्णुतेचे निदर्शक वाटण्याची शक्यता आहे. बुद्धाला अवतारी पुरुष मानल्याने तशी धूळफेक करता येते. परंतु संघाच्या तत्त्वज्ञानाची आणि जीवनसृष्टीची ज्यांना कल्पना आहे अशांची अडवाणींच्या 'बुद्ध विष्णूचा अवतार होता' या विधानाने फसवणूक होणार नाही. (सारनाथच्या परिसंवादात भाग घेतलेल्या श्रीलंका, जपान, ब्रह्मदेश, थायलंड इत्यादी देशांतून आलेल्या बौद्ध पंडितांनी श्री. अडवाक्णींच्या वरील विधानास आक्षेप घेतला होता. संघ परिवाराचा अजेंडा ऐकण्याला आम्हांला आमंत्रित केले आहे का, अशी त्यांची प्रतिक्रिया आणि कुजबूज होती.)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाबतीत एक मुद्दा स्पष्टपणे समजून घेतला पाहिजे तो म्हणजे हिंदुस्थानातील धार्मिक अल्पसंख्याकांना स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व (आयडेंटिटी) आहे हेच मुळी संघ-भाजपा परिवाराला मान्य नाही. हिंदुस्थानातील सर्व बिगरहिंदू धर्म- मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शीख इत्यादी हे स्वतंत्र धर्म नसून हिंदू धर्माचेच उपपंथ असल्याची संघपरिवाराची वैचारिक धारणा आहे, तशी त्यांची मांडणी आहे. 'एक राष्ट्र, एक जनसमुदाय आणि एक संस्कृती हा आमच्या राष्ट्रीयत्वाचा आधार असून हीच आमची राष्ट्रवादाची आधारशिला आहे' असे भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यात म्हटले असून ही कल्पना सत्यसृष्टीत आणण्यासाठी भाजपा वचनबद्ध असल्याचे जाहीरनाम्यात म्हटले आहे. श्री. अडवाणींनी बुद्धाला ‘विष्णू’चा पेहराव देऊन त्याला हिंदू बनविले आणि बौद्ध धर्माला नकार दिला आहे.

भारतातले इतर धर्म हिंदू धर्माचेच उपपंथ असल्यामुळे "मुसलमानांनी स्वतःचा ‘मोहमदिया हिंदू’ व ख्रिश्चनांनी 'ख्रिश्चन हिंदू' असा उल्लेख करावा,’’ असा उपदेश मुरलीमनोहर जोशी त्यांच्या ‘हिंदू राष्ट्रवाद’ या पुस्तिकेत म्हणतात. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बौद्धिक प्रमुख श्री. के. सी. सुदर्शन इस्लामचे 'हिंदुकरण' होणे म्हणजे हिंदू धर्माशी एकरूप होणे असे म्हणतात. त्यासाठी 'मुसलमानांनी इस्लाममधील आवश्यक त्या 10% भागाचे जतन करून उरलेल्या 90% भागाचा त्याग करून हिंदू धर्माशी एकरूप (अ‍ॅसिसिलेट) व्हावे अशी श्री. सुदर्शन यांची मुसलमानांना सूचना (की दमबाजी?) आहे. सरसंघचालक श्री. राजेंद्रसिंहजींनी मुस्लिमांना आणि ख्रिश्चनांना हिंदुस्थानात सन्मानाने जगायचे असेल, त्यांना हिंदूंनी बरोबरीच्या नात्याने वागवावे असे वाटत असेल तर त्यांनी (मुस्लीम आणि ख्रिश्चनांनी) हिंदुधर्माशी एकरूप झालेच पाहिजे अशी तंबी दिली आहे हे वर एका ठिकाणी आलेच आहे. संघपरिवाराला देशाची एकात्मता सर्वंकष हिंदुत्ववादानेच साध्य होईल असे वाटते.

एकात्मतेसाठी सर्व नागरिकांना समान दर्जा ही कल्पनाच संघ परिवाराला मान्य नाही. मुसलमान आणि ख्रिश्चनांना समान, बरोबरीचा दर्जा हवा असेल तर त्यांनी आपल्या मुस्लीम व ख्रिश्चन आयडेन्टिटीचा त्याग केला पाहिजे असे संघपरिवाराचे मुस्लिम/ख्रिश्चनांना सांगणे आहे. संघपरिवाराची ही भूमिका श्री. गिरीलाल जैन यांनी त्यांच्या वर उल्लेख केलेल्या ‘नकली धर्मनिरपेक्षता’ पुस्तकात ‘‘त्यांनी (मुस्लीम-ख्रिश्चन) एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एखाद्या कुटुंबातसुद्धा एक व्यक्ती बलिष्ठ असल्याशिवाय ते घरही नीट चालत नाही, त्याच न्यायाने या देशात हिंदू वर्चस्वच राहिले पाहिजे, जर का हिंदू व इतर धर्मीयांना (मुस्लीम-ख्रिश्चन) समान दर्जा असेल तर देश चालणार नाही.’’ अशा शब्दांत स्पष्ट केले आहे. हिटलरने आर्यनवंश श्रेष्ठत्वाचा अहंकार जर्मन लोकांचा मनात जोपासून ज्यूंना नामोहरम केले त्याच धर्तीवर संघपरिवार हिंदूंच्या मनात हिंदुश्रेष्ठत्वाच्या अहंकाराला उत्तेजित करून मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मीयांना नामोहरम करू पाहात आहे. संघ परिवारातील नेत्यांची ही भाषा हिंदुधर्मातील सहिष्णुतेचे प्रतीक आहे असे कोण म्हणेल?

Tags: खोटी परधर्म सहिष्णुता ख्रिश्चन बिगरहिंदू-मुस्लीम हिंदुत्ववाद भाजपा रा. स्व. संघ राजकीय false religious tolerance christian nonhindus-muslims hinduism bjp rss political weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके