डिजिटल अर्काईव्ह

धर्माधिष्ठित राष्ट्रवादाला सुरुंग

असा ‘जिहाद’ खरोखरीच पाकिस्तानी नागरिक पुकारणार की काय हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे आणि जिहाद पुकारला गेला तर बेजेंजो त्याला तोंड कसे देणार हेही स्पष्ट व्हायचे आहे. सध्या मात्र पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांना आणि धार्मिक नेत्यांना बेजेंजो समर्थपणे धडक देत आहेत.

पाकिस्तानमधील एक बलुची नेते गौश बक्श बेजेंजो हे बलुचिस्तानच्या स्वायत्ततेचे एक खंदे पुरस्कर्ते. जनाब भुत्तोची पाकिस्तानात दडपशाही सुरू होती त्या काळातही ते बलुचिस्तानच्या स्वायत्ततेची मागणी करत होते. बलुचिस्तानमध्ये सध्या जो असंतोष खदखदतो आहे त्याचे बरेचसे श्रेय बेजेंजो यांचेकडे जाते. गंमत अशी की पाकिस्तानच्या अखंडत्वाला खंडित करणाऱ्या मागणीचा ते पुरस्कार करत असले तरी पाकिस्तानातील अनेक वृत्तपत्रे आणि नेतेही त्यांचा 'महान देशभक्त' म्हणून गौरव करत होते. परंतु एके काळचा हा 'महान देशभक्त' पाकिस्तानी वृत्तपत्रे आणि नेत्यांना आता देशद्रोही वाटू लागला आहे! इतकेच नव्हे तर सबंध पाकिस्तानात श्री बेजेंजोवर सध्या जबरदस्त आगपाखड सुरू आहे. या बदलाचे कारण मात्र निराळेच आहे.

मध्यंतरी बेजेंजो यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आणि पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांची झोपच उडवली! पाकिस्तानात सध्या धर्माधिष्ठित राष्ट्रवादाचे वारे सत्ताधारी खेळवत आहेत. स्वतःला मुस्लिम म्हणवून घेणाऱ्या आणि कुराणची शपथ घेऊन आपण मुस्लिम आहोत हे जाहीर करणाऱ्यालाच मतदानाचा अधिकार दिला जाणार आहे. पाकिस्तानचे राज्यकर्ते या दृष्टीने राज्यघटनेत आवश्यक ते बदल करण्यात दंग असतानाच बेजेंजो यांचे पत्रक प्रसिद्ध झाले, अन्‌ एखाद्या अणुबॉम्बचा हादरा बसावा तसा हादरा पाक सत्ताधाऱ्यांना बसला. "सबंध दुनियेत मुस्लिम राष्ट्र (नॅशनॅलिटी) या नावाची काही एक चीज अस्तित्वात नाही," असे बेजेंजो यांनी त्यांच्या पत्रकात म्हटले आहे. आपल्या विधानाच्या समर्थनार्थ कुराण शरीफचा हवाला देऊन ते पुढे म्हणतात, "अल्लाने विविध जाती-जमाती, टोळ्या यांचे अलग अलग राष्ट्रीयत्व आणि त्यांच्यातील विविधतेला साम्यता दिली आहे. त्याच्यावर (अल्लावर) विश्वास ठेवणाऱ्यावर तो जितकी आणि जशी कृपा करतो, तितकीच आणि तशीच तो त्याच्यावर विश्वास न ठेवणाऱ्यांवरही करतो.’’ इतर जाती-जमाती हे पत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर लाहोरहून बेजेंजो यांनी आणखी एक पत्रक प्रसिद्ध केले. या पत्रकात त्यांनी मुस्लिम राष्ट्रवादाची उघड उपड टिंगल केली आहे. ‘‘मुस्लिम धर्मग्रंथात धर्माधिष्ठित राष्ट्रवादाचा कोठेच उल्लेख नाही.’’ असे त्यांनी रोखठोकपणे सांगितले. आहे. याच पत्रकात त्यांनी जनरल याह्याखानच्या धार्मिक विचारांचा खरपूस समाचार घेतला आहे. बेजेंजो यांच्या या पत्रकामुळे पाकिस्तान नॅशनल अलायन्स, (या अलायन्समध्ये पाकिस्तानातील अनेक पक्ष सामील झाले असून, झियाउल हक यांच्या सरकारात ते भागीदारी करत आहेत.) तेथील मुल्ला-मौलवी आणि इतर राजकीय नेते व पत्रकार यांची झोपच उडाली असून त्यांना बेजेंजो यांचे विचार पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांच्या धर्माधिष्ठित राष्ट्रवादाच्या कल्पनेला एक प्रकारचे आव्हानच नव्हे तर या कल्पनेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न वाटू लागला आहे.

बेजेंजो यांनी पाकिस्तानला दिलेला हादरा किती जबरदस्त असेल याची कल्पना सध्या तिकडे बेजेंजोविरोधी उघडलेल्या प्रसार आघाडीवरून येते. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे एक नेते मौलाना कौसर नियाजी यांनी बेजेंजोला धार्मिक बाबतीत लुडबूड करण्याचा इशारा दिला आहे. तर जे लोक पूर्वी बेजेंजो यांचा 'महान देशभक्त' म्हणून उल्लेख करत होते तेच आता त्यांची ‘देशद्रोही’ म्हणून संभावना करू लागले आहेत. सध्याच्या सरकारातील एका मंत्र्याने तर बेंजेजो यांची जीभ छाटण्याची मागणी केली आहे. वृत्तपत्रांनी ‘बेजेंजोला धडा शिकवा' अशी मागणी केली असून पाकिस्तानी नागरिकांनी त्यांच्या विरुद्ध ‘जिहाद’ पुकारण्याची वेळ आली असल्याचा सूर लावला आहे. असा ‘जिहाद’ खरोखरीच पाकिस्तानी नागरिक पुकारणार की काय हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे आणि जिहाद पुकारला गेला तर बेजेंजो त्याला तोंड कसे देणार हेही स्पष्ट व्हायचे आहे. सध्या मात्र पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांना आणि धार्मिक नेत्यांना बेजेंजो समर्थपणे धडक देत आहेत.

Tags: गौश बक्श बेजेंजो धर्माधिष्ठित राष्ट्रवाद पाकिस्तान समता संगर Gaush Baksh Benzo Religious Nationalism Pakistan Samata Sangar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी