डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

मित्रवर्य 'अरविंद '- एक निर्मोही व्यक्तिमत्त्व

बेळगावात होणाऱ्या वाङ्मयाविषयक सभा, परिसंवाद, स्नेहसंमेलने, व्याख्यानमाला, यांमधूनही अरविंद अलीकडे क्वचितच भाग घेत असे. एकंदरीत मनाने तो फार एकाकी होऊन चिंतनातच व्यग्र असे. समाजातील नैतिक मूल्यांची अवनती, कार्यकत्यांची सत्ताभिलाषा, सर्वत्र चाललेला भ्रष्टाचार आणि अधिकाराचा स्वार्थासाठी दुरुपयोग अशा अनेक व्यथांनी ‘हेच फळ काय मम तपाला?’ अशा नि:स्वार्थी समाजसेवकांची झालेली मानसिक व्यथा पाहून तोही विषण्ण आणि उदास दिसे. आपल्या जगण्याचा तरी उपयोग काय? असे गुरूजी अंतकाळी पत्रात लिहीत तशीच अलीकडे अरविंद भाषा बोलायचा. अशा वैकल्यानेच त्याने एकांताशी मैत्री केली होती खरे. मला भेटल्या वेळी म्हणाला, ‘लागले नेत्र रे, पैलतिरी' सारे मित्र एका पाठोपाठ एक दुरावल्याने तो जास्तच एकाकी झाला.

ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीचा अंतर्मुख वृत्तीने अनुभव घेत एक कृतार्थ जीवन काळाच्या पडद्याआड अंतर्धान पावले. माझा जिवाभावाचा मित्र अरविंद-(प्राचार्य अरविंद कृष्ण याळगी) याच्या दुःखद निधनाची वार्ता लोकसत्तेत मी वाचली तेव्हा मन अत्यंत अस्वस्थ झाले. अखेर बेळगाव गाठले. अरविंदच्या 95 वर्षाच्या वृद्ध मातेचे शोकाकुल दर्शन घेतले, त्याची पत्नी शकुंतला - एकमेव पुत्र मिलिंद- त्याचे सर्व वडील बंधू व भगिनी आणि त्यांचे कुटुंबीय यांना मन घट्ट करून भेटलो. सर्वच मंडळी त्याच्या वियोगाने विलक्षण व्याकुळ झाली होती. सारेच समदुःखी होतो, कोण कुणाचे कसे सांत्वन करणार? हळूहळू मनाला सावरत असतानाच अरविंदबरोबर जिथे जिथे वावरलो, त्या परिसरात तीन दिवस फिरत राहिलो. मनाने मी भूतकाळात- सुमारे तीन तपांच्या काळातच मग्न होतो. बालपणात, युवावस्थेत, तारूण्याच्या उंबरठ्यावर, बिदया- जनाच्या वाटचालीत, प्रौढावस्थेत, सामाजिक संस्थांच्या सभासमारंभात, साहित्यसंमेलने, पत्रकार परिषदा, नाटयसंमेलन, संगीताच्या मैफिली, बालगंधर्वांची भजने, सेवा दल शिबिरे, वाङ्मयचर्चा मंडळाच्या वसंत व्याख्यानमाला, वक्तृत्व-काव्य व नाट्यस्पर्धा असे अनेक कार्यकम सर्वार्थानि यशस्वी करण्यात तसेच सानेगुरुजी, महर्षी कर्वे अशा थोर महापुरुषांची व्याख्याने, प्रवचने आयोजित करून त्यांच्या पोर समाजसेवेचा सन्मान करण्यासाठी व त्यांच्या कार्याला आपणही साह्य करावे म्हणून सेतुबंधनातील खारीच्या भावनेने केलेली धडपड- अरविंदच्या सहवासातील हेच मोलाचे क्षण आज माझ्या आयुष्यातील पाथेय झाले आहे.

अरविंदसह गावोगाव ‘साधना’ साठी व ‘आंतर भारती’ साठी बेळगाव, धारवाड, कारवार, सदाशिवगड या भागात मी फिरलो. गुरुजींची गीताप्रवचने ठरवून भ्रमंती केली. तेव्हा मी व अरविंद घरोघरी फिरून निधी जमवीत असू. ग्रामसफाई, विद्यार्थ्यांना कथा-कथन असे कार्यक्रम ठरवून त्यात सहभागी होत असू. या प्रवासात सर्वात अविस्मरणीय आनंद असा की सर्व कार्यक्रमातून मोकळे झाल्यावर रात्री समुद्रकाठावर गुरुजीसह लाटांचा मनोहारी खेळ आणि नभोमंडळातील चांदण्यांचा लपंडाव अंतरंगात कायमचा साठवला. कधी गुरुजी आपली बंडी अरविंदच्या अंगावर घालायचे- तोही उमेदीने घालायचा-कधी कधी आपली शाल गुरुजी आमच्या अंगावर पांघरूण घालीत.

एकदा सदाशिवगड जवळच्या अंगदी गावी रात्री उशिरा झोपलो. पहाटे लवकर उठून निघायचे होते. गुरुजी मध्यरात्रीच हळूवार पावलाने उठून दाढी उरकून आणि गार पाण्याने आंघोळ करून बसले होते. आम्हाला का उठवले नाही म्हणून मी विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘अरे, तुम्ही तरूण मुलं- खूप दमला होता. झोपमोड होऊ नये म्हणून उठवलं नाही. म्हणून अलीकडे झोपच येत नाही. म्हणून स्नान केलं.’ अरविंदने नंतर मला हळूच सांगितलं ‘अरे, हे अहिंसेचं मूर्त रूप.’ ‘म्हणे पावो धडपडीला | तरी स्वामीची निद्रा मोडेल ||’  हाच भावार्थ.

मी व अरविंद बी. ए. च्या वर्गात असता कवी वि. म. कुलकर्णी आमचे प्राध्यापक होते. त्यांना एक संस्मरणीय प्रेमाची भेट दयावी असा विचार आमच्या मनात आला. अरविंदने ठरविले आणि एकदा सानेगुरुजी सेवा दल कार्यक्रमासाठी आले असता गुरूवर्य वि. म. यांना त्यांच्या हस्ते ‘ज्ञानेश्वरी’ भी प्रत भेट दिली. गुरुजींच्या हस्ते ज्ञानेश्वरी भेट मिळाल्याने वि. म. इतके भारावून गेले की, नंतर अनेकदा पत्रातून ते मला लिहीत की, ‘तुम्ही दिलेली ज्ञानेश्वरी माझ्या जीवनात प्रेम-करूणेची थोर आठवण झाली आहे!' खरे श्रेय अरविंदचेच.

एकदा आचार्य भागवत वाङ्मयचर्चा मंडळाच्या व्याख्यानासाठी आले. विषय होता ‘यंत्रयुग आणि साहित्य.’ पाश्चात्य आणि पोर्वात्य संस्कृतीची स्थित्यंतरे वर्णन करणारे ते भाषण इतके विचारसंपन्न तसेच प्रभावी भाषा-विलासाचा दिव्य आनंद देणारे होते की, आजही तसे चिंतनशील वक्तृत्व दुर्लभ वाटते. हे घडविण्यात अरविंदचीच घडपड प्रामुख्याने होती.

राष्ट्र सेवा दलाच्या वार्षिक मेळाव्याच्या निमित्ताने एकदा कला-पथकाच्या कार्यक्रमात कै.अनंत काणेकर यांचा ‘घर’ या एकांकिकेचे नाट्यदर्शन बसविले होते. प्रमुख भूमिका अरविंद यानेच केली होती. त्या एकांकिकेचा प्रयोग इतका प्रभावी आणि लोकप्रिय झाला की, त्याच वेळी अरविंदच्या अंगी असलेली मूक अभिनय करण्याची उपजत कला सर्वांच्या अंत:करणाचा ठाव घेऊन गेली. नंतरच्या काळात त्याने अनेक नाटके रंगभूमीवर स्वतः दिग्दर्शित करून व स्वतः भूमिका करूनही यशस्वी केली व राज्य- पातळीवरील नाट्यस्पर्धेत दिग्दर्शनाची व अभिनयाची पारितोषिकेही मिळविली. मात्र पारितोषिके समक्ष स्वीकारण्यास रंगमंचावर स्वारी कधीच फिरकली नाही. समारंभानंतर मला त्याचे पत्र यायचे व त्याचे पत्र घेऊन पारितोषिक मंडळाकडून पदके व प्रशस्तिपत्रे यांचा स्वीकार करून कुणामार्फत तरी, अगर पोस्टाने पाठवावी लागत. नाटकाचे यश हे एकट्याचे कधीच नसते, ते सामूहिक सहसंवादाचे असते असे तो मानत असे.

बी.ए.च्या मराठी अभ्यासक्रमाचे आमचे दुसरे गुरुवर्य होते थोर समीक्षक आणि भाषाशास्त्रज्ञ डॉ. गं. ब. ग्रामोपाध्ये. विचारसौंदर्याचे थोर उपासक व तत्वचिंतक म्हणून ओळखले जाणारे कै. वामन मल्हार यांचे संपूर्ण वाड्.मय अभ्यासाला होते. त्या वेळी अनेकदा ‘रागिनी मधील मार्मिक विचार गर्भ परिच्छेद किंवा ‘इंदू काळे व सरला भोळे’ या पत्रात्मक कादंबरीच्या अखेरच्या प्रकरणातील विनायकरावांच्या तोंडून उदात्त आणि सेवाभावी जीवनाची थोर शिकवण देणारा मनोज्ञ तसाच भावसंपन्न उपदेश- अशा साहित्याचे सामूहिक वाचन करताना अरविंदचा भरून आलेला कंठ, त्याचे पाझरलेले डोळे, गहिवरलेले शब्द आजही जिवंतपणे त्याची चाहूल ते परिच्छेद वाचताना मनात जागृत करतात.

थोर साहित्याचा अरविंद एक गाथा रसिक वाचक होता. कधी अब्राहम लिंकनच्या ध्येयवादी चारित्रात स्वारी गुंग असे, कधी दुर्गा भागवत यांचे ‘पैस’ उराशी कवटाळून उघड्या डोळयांनीच समाधि सुखाचा अनुभव घेण्यात देहभान हरपलेला दिसे. की ‘कोलंबसाचे गर्वगीत’ आठवून मित्रवर्य नाथ पैने केलेल्या त्यावरील भाष्याची आठवण सांगणारा अरविंद, कामी अनिलच्या फुलवातीने भानमुन्य झालेला तर कधी टॉलस्टायच्या जीवनाच्या झोकांतिकेचे धागे त्याच्या ' वॉर अँड पीस' आणि ‘अॅना कॅरेनीना मध्ये शोधत बसनेला अरविंद, अशी त्याची अनेक रूपे आज मनःपटलावर दूग्गोचर होत आहेत.

ज्ञानेश्वरीची अमृतामधुर ओवी तर सदा मुखात घोळवत बसायचा. त्या ओवीचा तो इतका छांदिष्ट की बनेकदा मला व अनेक मित्रांना ज्ञानेशाच्या ओवीबद्ध बोलीतच पत्रे लिहायचा. अरविंदचा स्वभाव म्हणजे कारूण्याचा निर्मळ जीवनास्त्रोतच. इतका अबोल - की साने गुरूजी त्याला मुक्या' म्हणत. त्याला लिहिलेली पत्रे गुरुजी माझ्या पत्रातून पाठवीत असत आणि मला लिहीत, 'मुक्या' अरविंदाला पत्र दे आणि सांग की, प्रवासात असताना तू समक्ष जरी बोलत नव्हतास तरी तुझे डोळे प्रत्येक वेळी माझ्याशी दुरुनही बोलत होते. 'शब्देवीण संवादीजे’ ज्ञानेशाचा उक्तीची कळा म्हणजेच अरविंदचे बोलके भावगर्भ डोळे. डोहासारखे प्रसंन्न. तसेच अंतरंगाचा खोल ठाव घेणारे. दुसऱ्याच्या दु:खाने पाझरणारे आणि आनंदाने पण भरून येणारे. अरविंदचे सारे व्यक्तीमत्व म्हणजे माणुसकीचा जिवंत साक्षात्कार होता.

अरविंद जितका बाह्यतः गंभीर वाटायचा तितकाच अतरंगी विनोदाची कळा उपजतच प्राप्त झालेला असा होता. त्याचा मिस्किल पणा तर पराकोटीचा. मित्र बळवन्त दीक्षित याला त्याने गंमत माणून लिहिलेल्या ओवीबद्ध पत्राचा प्रारंभ आणि समारोप त्याच्यात दडलेल्या लोकविलक्षण मिक्सिलतेची साक्षच देईल. प्रारंभीची ओवी होती-

‘बळवन्तराय त्र्यंबकसुत।

दिक्षित कुलोत्पन्न शौलजातात ।

हेलेंकरांचा (अ) व्दितीय जामात ।

सिंधूकन्या ‘वरोनिया’ ।।

         त्या पत्राचा समारोप होता –

'बळगो कुलोत्पन्न अरविंदवल्ली । 

कृष्णकुमार कडोलकरगल्ली।

या पत्राची रचना बोलिली ।

वेणूग्रामी जाण पै ।।

अरविंदापाठी चहाटी ।

जो ओवी रचील करंटी ।

तेणे शर्करादुग्ध घटी ।

जाण तुम्ही मिसळिली ।

     त्याच्या एका पत्रात पसायदानाचीच केलेली आव्रूत्ती किती कौशल्यपूर्ण बाहे. पहा : 

'सध्या वास्तव् करवीर नगर । 

मल्लविध्धचे प्रसिद्ध आगर ।

रंकाळा नामे शूद्र सागर जेथे असे ॥ 

भूवरील ‘पापाची तिकटी' । 

जाळून करण्या तयाची भूकटी ।। 

अधप्रेरित दुर्जनाचा पेकटी । 

मोडावया समर्थ अंबा ।। 

मास्तराचा म्हावा हेडमास्तर । 

प्रोफेसराचा व्हावा डॉक्टर।।

कारकुनाचा मामलेदार ।

त्वरितगती होबावा ॥ 

सर्वांचा तळिराम गार । 

सर्वाचा वाढो पगार ।।

आणिक काहीना घर । 

डी. ए. पूर्ण मिळावा ।। 

ऐसी बढती बढती बढती । 

मिळत जावो सर्वाप्रती ।। 

गुण कोती बाषि संपत्तो । 

सुख कीर्ती आणि संपत्ती ।

लाभो सर्वा समभावे ।।‘

स्वातंत्र्याच्या चळवळीत याळगी कुटुंब तर आघाडीवर. टिळक, गांधी, नेहरू, विनोबा, जयप्रकाश, लोहिया, पटवर्धन बंधू, नाथ पै, एस. एम., ना. ग. गोरे या साऱ्यांचेच बेळगावातील स्वातंत्र्य चळवळीचे केंद्रस्थान म्हणजे याळगी बंधूंचे कुटुंब, गंगाधरराव देशपांडे यांच्याबरोबरच अरविंदचे काका कै. गोविंदराव हे लोकमान्यांचे उजवे हात समजले जात. साहजिकच देशभक्ती आाणि त्यागाचा जन्मजात वारसा लाभलेला आणि त्याच संस्कारात वाढलेला अरविंद सर्वस्व समर्पणाच्या भावनेने भारला जाऊन बेचाळीसच्या लढ्यात आणि गोवा मुक्ती आंदोलनातही नाथ पैसह अनेकदा तुरूंगात गेला. कित्येकदा भूमिगत राहून स्वातंत्र्यवीरांच्या कुटुंबियाना गुप्तपणे मदत करून तो दिलासा देत असे, त्याचे अनेक रोमहर्षक प्रसंग आठवतात. विनोबांच्या भूदान यात्रेतही अरविंदबरोबर थोडासा मीही सहभागी झालो होतो त्याची आठवण आजही ताजी आहे. त्याची ही सारी देशभक्ती घरांदारावर व शिक्षणावर तुळशीपत्र ठेवून आणि स्वतःच्या कमाईची पदरमोड यज्ञातील समर्पणाच्या भावनेने करत अखंड चालू होती. त्या सार्या कुटुंबाचे एकमेव ‘श्रेयस् आणि प्रेयस्’ होते स्वराज्यसंपादन आणि समाज सेवा. त्यामुळेच स्वातंत्र्योत्तर काळात समाजपरिवर्तनात सत्तेच्या कुठल्याच पदाचा मोह त्यांना पडला नाही. उलट सत्तेकडे पाठ फिरविल्यामुळे अनेकदा आपत्तींना आणि दुर्धर प्रसंगांना त्यांना सामोरे जावे लागते.

राष्ट्र सेवा दल आणि समाजवादी पक्ष यांचे मुखपत्र म्हणून सानेगुरुजी, एस. एम. आणि नाय पै यांच्या प्रोत्साहनानेच बेळगावला ‘साधना’ प्रमाणे ‘प्रेरणा’ नावाचे साप्ताहिक सेवा दल संघटक बळवंत दीक्षित याच्या संपादकत्वाने आमच्या मधुकर प्रेसमध्ये सुरू केले होते. या साप्ताहिकाचा प्रकाशक ‘अरविंद’ होता व मुद्रक मी होतो. एका संस्थेत चाललेला भ्रष्टाचार आणि अन्याय यांना वाचा फोडल्यामुळे संपादक दीक्षित याला शाळेतील शिक्षकाची नोकरी गमवावी लागली. तरीही उदरनिर्वाहाची प्रापंचिक ओढाताण सोसत दीक्षित याने नाय पै यांच्या निवडणूक प्रचारासाठी ‘प्रेरणा’ निर्धाराने चालूच ठेवले, अरविंद तर त्या वेळी शिकवण्या करून आणि कुठे कुठे तात्पुरती नोकरी करूनही हाती आलेला पैसा छपाई खर्चासाठी आग्रहाने माझ्या हाती ठेवायचा. मीही आर्थिक ओढाताणीमुळे अगतिक होऊन केवळ छपाई खर्चासाठी कमीतकमी पैसे जड मनाने घेत असे. अशा प्रकारे नुकसान सोसतच आम्ही ‘प्रेरणा’ चालवीत असू. पण हा ताण असतानाही गुरुजींच्या साधनेसाठी वर्गणीदार, देणगीदार मिळविण्याची अरविंदची धडपड अखंड चालूच होती. एकदा साधनेसाठी आम्ही जमविलेले साडेतीन हजार रूपये गुरूजींना ड्राफ्टने पाठविले. त्या वेळी गुरुजींनी लिहिलेले पत्र आजही संग्रही आहे.

राणी पार्वतीदेवी कॉलेजात प्राध्यापक म्हणून मराठी विषयाचे अध्यापन करीत असता अनेक वर्षे वेतनाचे धन तो स्वत:जवळ ठेवीतच नसे. कौटुंबिक गरजांसाठी सर्व पगार आपल्या वडिलांच्या हाती सुपूर्द करून रित्याहस्ते मित्रांत वावरत असताना मी पाहिले आहे. म्हणूनच त्याला स्वतःच्या सुखोपभोगाची लालसा कधी झाली नाही, नाय पै हा तर त्याचा जणू ‘त्र्यक्षरी’ जीवनमंत्र होता असे ती म्हणे. एका नायने भेटल्यावेळी त्याला सहज म्हटले, ‘You must translate your thoughts into action’ आणि तेव्हापासून तेच ब्रीदवाक्य उरी बाळगून निष्काम कर्मयोगाची’ दीक्षाच घेतल्याप्रमाणे जीवनभर त्याचे वागणे असे. नायच्या अनेक भाषणांतील सुंदर पंक्ती त्याला मुखोद्गत होत्या, आणि वेळोवेळी अरविंदशी गप्पागोष्टी चालू असता गायचे एखाददुसरे सुभाषित त्याचा तोंडून येतच असे. ज्ञानेश्वरांचा दुसर्या एका ओवीचा अर्थ त्याच्या वागण्यात पूर्णपणे भरला होता असे मला नेहमी वाटत आले आहे

‘निम्न भरिलियाविणे | 

पाणी ढळोचि नेणे ।

तेवीं श्राता तोषोनि जाणे। 

सामोरेपा ।’ (अ. 16) . 

अशा प्रकारे कर्तव्य भावनेने प्रेरित होऊन त्याची आयुष्यात सारी वाटचाल दुस- यांच्या सुख-दु:खात समरस होण्यात चालू असे.

विवाहोत्तर जीवनात मग आपली सह धर्मचारिणी झालेल्या पत्नीला-शकुला त्याने अभिनयाचे पाठ दिले व नाटयक्षेत्रात उभयतांनी मिळून अनेक नाटयप्रयोग, एकांकिका यशस्वी केल्या. रसिक प्रेक्षकांनीही त्यांचे कौतुक केले. मात्र अरविंदने लोकप्रियतेच्या मोहाने नाट्यकलेचा व्यापार केला नाहीच. एक हौशी नाट्यप्रेमी कलावंत म्हणूनच तो वावरला, नवे नवे प्रयोग करण्याची त्याला उपजत कल्पकता होती. अलीकडेच काही वर्षांपूर्वी एकपात्री प्रयोग करून तो विविध क्षेत्रातील वेगवेगळ्या स्वभावांच्या व्यक्तिरेखांचे विनोदी भाषेत कलापूर्ण नाट्यदर्शन कमीतकमी शब्दांत आणि मुक अभिनयाव्दारे घडवीत असे.

अरविंद कुणाचाही मित्र झाला की त्याच्या अंतरंगाचाच पुरा ठाव घेत असे. मैत्री हा त्याचा उपचार नसे, तो स्वभावधर्मच व्हायचा माझ्या घरी तर घरचाच एक वडीलभाऊ असा वावरायचा. आईला सांगून आवडते पदार्थ करून घ्यायचा. माझ्या व माझ्या - बहिणींच्या विवाहसमारंभात तो किती आनंदाने सहभागी झाला होता त्याची आठवण - पुन्हा पुन्हा येते. त्यापेक्षाही जेव्हा मी पितृछत्राला पारसा झालो त्या वेळी मलाच नव्हे. तर माझ्या छोट्या भावंडांनाही त्याने किती धीर दिला ते मला या जन्मी विसरता येणार नाही.

मराठी नियतकालिके, मासिके यांतून अधूनमधून तो स्फुट लेखन करीत असे. बऱ्याच वर्षापूर्वी कवी अनिल साहित्य संमेलनाध्यक्ष झाले तेव्हा मनोहर मासिकात त्यांच्या सर्व काव्यसाधनेचा रसपूर्ण लेख त्याने लिहिलेला आठवतो. बेळगावच्याच एका साप्ताहिकात 1982 साली ‘आठ- वर्णीचे वळेसर’ मा शीर्षकातून त्याने आपले मनोगत तसेच कौटुंबिक आणि सामाजिक जीवनानुभव काही घोड्याच लेखातून शब्दबद्ध केलेले आठवतात. अब्राहम लिंकन याच्या स्फूर्तिदायी चरित्र-लेखनात तो अलीकडे मग्न असे. त्या चरित्राची जवळजवळ 25 वर प्रकरणे लिहून त्याची मुद्रणप्रतही त्याने तयार केली होती व ती प्रस्तावनेसह लवकरच प्रकाशनाला देण्याचा आपला मनोदयही त्याने मला सांगितला होता. पण तेही कार्य त्याच्या हयातीत होऊ शकले नाही याची खंत वाटते.

बेळगावात होणाऱ्या वाङ्मयाविषयक सभा, परिसंवाद, स्नेहसंमेलने, व्याख्यानमाला, यांमधूनही अरविंद अलीकडे क्वचितच भाग घेत असे. एकंदरीत मनाने तो फार एकाकी होऊन चिंतनातच व्यग्र असे. समाजातील नैतिक मूल्यांची अवनती, कार्यकत्यांची सत्ताभिलाषा, सर्वत्र चाललेला भ्रष्टाचार आणि अधिकाराचा स्वार्थासाठी दुरुपयोग अशा अनेक व्यथांनी ‘हेच फळ काय मम तपाला?’ अश नि:स्वार्थी समाजसेवकांची झालेली मानसिक व्यथा पाहून तोही विषण्ण आणि उदास दिसे. आपल्या जगण्याचा तरी उपयोग काय? असे गुरूजी अंतकाळी पत्रात लिहीत तशीच अलीकडे अरविंद भाषा बोलायचा. अशा वैकल्यानेच त्याने एकांताशी मैत्री केली होती खरे. मला भेटल्या वेळी म्हणाला, ‘लागले नेत्र रे, पैलतिरी' सारे मित्र एका पाठोपाठ एक दुरावल्याने तो जास्तच एकाकी झाला.

खरे पाहता लोकसंग्रहाची त्याला मनस्वी आवड असूनही परिस्थितीनेच त्याचा मनोभंग केला म्हणणे जास्त युक्त होईल. माझी त्याची जेव्हा अलीकडे अखेरची भेट झाली होती तेव्हा तो खिन्न मनाने इतकेच म्हणाला, ‘मधू, केव्हा केव्हा वाटतं की ज्ञानेश्वरी उराशी कवटळावी आणि आळंदीची वाट धरावी, आणि ज्ञानेश्वराशी मनाने हितगुंज करत तिथेच राहावे.’ असं बोलताना त्यानं एका कागदाचा छोटा चिठोरा हाती घेतला, त्यावर काही शब्द लिहिले, तो कागद माझ्या हाती दिला, आणि इतकंच अखेर म्हणाला, ‘असेच विचार मनात सारखे घुसत असतात रे !’ त्या चिठोऱ्यावरचे शब्द होते...

‘अजानवृक्षा तुझा वाटतो रे हेवा । 

गळामिठी घालोनिया भेटलासी ज्ञानदेवा।’

Tags: मधुकर वि. पै. weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके