जुन्या सत्यशोधकांनी आजचा बहुजन समाज व अस्पृश्य समाज घडविला आहे. त्यांच्या ऋणाची फेड हल्ली चालू असलेल्या सत्यशोधक शताब्दीच्या वेळी समाजाने व शासनाने करणे अवश्य आहे. पन्नास साठ वर्षांपूर्वीचे सत्यशोधक कार्यकर्ते, लेखक, पत्रकार, जलसेवाले यांची माहिती गोळा करून ती ग्रंथरूपाने प्रसिद्ध व्हावयास पाहिजे व या समाजोद्धारकांना श्री. धायगुडे यांच्यासारख्या यातना वृद्धपणी भोगाव्या लागू नयेत, व त्यांच्यावर असहाय जीवन कंठण्याचा प्रसंग येऊ नये म्हणून शासनाने त्वरित मानधन द्यावयास पाहिजे, हे शासनाचे कर्तव्य आहे.
‘साधना‘कारांनी ता.24 च्या अंकात ‘ही उपेक्षा थांबलीच पाहिजे’ हे संपादकीय लिहून, एका महत्वाच्या प्रश्नाकडे जनतेचे लक्ष वेधले याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. त्यांनी हे संपादकीय लिहून त्या अंकात ‘चटका लावणारा हा पत्रव्यवहार’ प्रसिद्ध करून यांचा प्रश्नाचा अखेरपर्यंत पाठपुरावा करावा, अशी माझी आग्रहाची सूचना आहे.
तळमळीने कार्य
टिळकांना भरसभेत समोरासमोर विरोध करणारे, समाजासाठी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवणारे, गेली सहा तपे सत्यशोधक तत्त्वासाठी बाणेदारपणे लढणारे हरी पिराजी धायगुडे यांचा व माझा पन्नास वर्षांपूर्वीच निकटचा संबंध. वृद्धावस्थेत त्यांचे शरीर वाकेल, पण हे मात्र कोणापुढे वाकणार नाहीत. तत्वासाठी कोणाचाही मुलाहिजा न ठेवण्याचा त्यांचा पीळ अद्यापि कायम आहे. समाजासाठी अहोरात्र कष्ट घेऊन कणाकणाने झिजलेल्या त्यांच्या शरीरास आधिव्याधीने जखडले आहे. त्याना वृद्धावस्थेत आपले जीवन कशा असहाय प्रकारे व्यतीत करावे लागत आहे, हे पाहिले म्हणजे अंतःकरण विदीर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. सत्यशोधक समाजाच्या ऐन उमेव काळातील ही माणसे ! त्यांनी रानोमाळ तुडवून सत्यशोधक समाजाचा प्रसार केला. मुलाबाळाना शाळेत पाठवा, अस्पृश्यता घालवा, घातक धर्मरूढींना तिलांजली दया म्हणून खेडुतांना सांगितले. लोकांतील अंधश्रद्धा नाहीशी व्हावी व सर्वांनी समानतेने, बंधुभावाने वागावे म्हणून आंतरिक तळमळीने प्रयत्न केले, त्यांच्याकडे त्यांच्या वृद्धावस्थेत तरी समाजाने पाहावयास नको काय ?
अनंत अडचणींचा मुकाबला
ब्रिटिशांचे राज्य असताना सत्यशोधक समाज वाढला व रुजला. राज्य ब्रिटिशांचे असले तरी बरीचशी सत्ता ब्राह्मण नोकरशाहीने आपल्या मुठीत ठेवली होती. या स्वकीय नोकरशाहीने भोळाभाबडया निरक्षर अशा बहुसंख्याक सत्यशोधकांवर अनन्वित अत्याचार केले. अनेकांवर खोटे खटले घालण्यात येऊन त्यांना दंड व शिक्षा झाल्या. अनेकांना घरदारास व शेतास मुकावे लागले. काही सरकारी नोकरांच्या नोकऱ्या गेल्या. कित्येकांच्या गैरसोयीच्या जागी बदल्या झाल्या. सातारच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी एक सर्क्युलर काढून शिक्षकांना या चळवळीत भाग घेण्यास बंदी केली होती. पोलिस-पाटलांनी जलशांना हस्तेपरहस्ते मदत करू नये, शिवाय जलशास हजर राहू नये असेही सर्क्युलर सातारा जिल्हा अधिकाऱ्यांनी काढले होते.
एक उदाहरण
कायद्याचे ज्ञान सर्वसाधारण जनतेस त्यावेळी अगदीच कमी होते. त्याचा फायदा ब्राह्मण नोकरशाहीने घेऊन, ‘हम करोसे कायदा’ सर्वत्र चालू ठेवला होता. याचे 50 वर्षांपूर्वीचे माझ्या आठवणीतील एक उदाहरण येथे देण्यासारखे आहे. कराड येथे नदीकाठाजवळील एका पटांगणात सत्यशोधाकांची एक जाहीर सभा भरणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्या सभेत पुण्याहून ‘विजयी मराठा’कार ती. श्रीपतराव शिंदे यांच्यासमवेत मीही गेलो होती. शिवाय आमच्याबरोबर पुण्याची व इतर गावची काही मंडळीही होती. सभा सायंकाळी सुरू होते न होते तोच एक पोलिस पार्टी, सरकारी अधिकाऱ्यांसह त्या ठिकाणी येऊन दाखल झाली व तिने सभाबंदी केल्याची घोषणा केली. एवढयावरच न थांबता तिने सभेस जमलेल्या सर्व लोकांना हुसकावून लावले आणि परगावाहून आलेल्या सर्व लोकांना नावेत बसवून तीरापर केले ! हे सर्व करण्यास अधिकाऱ्यांना सबळ कारण कोणते, व ते सभाबंदी आणि परगावच्या मंडळींची हद्दपारी कोणत्या हुकमाने करीत होते कोण जाणे! ती रात्र आम्ही सर्वांनी नदीच्या दुसऱ्या तीरावर शेतात काढली. बरोबर अंथरूण-पांघरूण नसल्यामुळे, आम्हांस जमिनीवरच निजण्याचा प्रसंग आला.
हे तप विसरू नका
अशा प्रकारे ब्राह्मण नोकरशाही सत्यशोधकांवर अनन्वित दडपशाही करत होती. त्याला राष्ट्रीय पुढारी व केसरीसारखी वृत्तपत्र साथ देत होती. एकीकडे पुढारलेल्या वर्गाचा, भांडवलवाल्यांचा, सावकारांचा सत्यशोधकांना विरोध तर दुसरीकडे नोकरशाहीची दडपशाही, यांतूनही सत्यशोधक आपले कार्य निष्ठेने, निःस्वार्थपणे करीत होते. पैसा, प्रसिद्धी, पुढारीपण मिळवण्यासाठी चळवळीत शिरायचे. या कल्पना त्यांना माहीत नव्हत्या. ते समाजोन्नतीसाठी तुरुंग, दंड, जुलूम, अन्याय, अत्याचार सहन करीत होते. त्यांच्या चळवळीने फळ म्हणजे अज्ञानान्धःकारात व अंधश्रद्धेत गुरफटलेला बहुजन समाज 50 वर्षे पुढे आला. अस्पृश्यता निवारणाचे प्रयत्न सुरू झाले. समतेसाठी ब्राह्मणेतर व दलित समाज झगडू लागला. हळूहळू मागासलेला समाज शिक्षणात प्रगत होऊ लागला. राज्याधिकारही तो गाजवू लागला. हे दृश्य आज दिसण्यामागे जुन्या सत्यशोधकांची दीर्घ तपश्चर्या आहे.
म. फुले यांची टीका ब्राह्मण जातीवर होती
अशा जुन्या सत्यशोधकांना विसरणे म्हणजे कृतघ्नतेची परमावधी तर आहेच, पण त्याहीपेक्षा चीड आणण्यासारखी दुसरी गोष्ट म्हणजे, बहुजन समाजातीलच काही सत्ताधारी अधिकारी, सरकारी अधिकारी,सार्वजनिक संस्थांचे किंवा साखर कारखान्यांचे अध्यक्ष हे सत्यशोधकांची ब्राह्मणेतराची चळवळ ही ब्राह्मणद्वेष्टी व स्वार्थी लोकांची चळवळ होती असे म्हणत आहेत, व तशा अर्थाचे लेखही लिहितात ! पण लोकांत आपण अप्रिय होऊ नये म्हणून म. फुल्यांना तेवढे यांतून वगळतात. म. फुल्यांची टीका तेवढी मात्र ब्राह्मण जातीवर नव्हती, ती ‘ब्राह्मण्या’वर होती, असे लोक म्हणतात; पण म. फुले यांचे वाङमय पाहिले तर त्यांनी ब्राह्मण जातीवर कोणताही आडपडदा न ठेवता टीका केल्याचे दिसून येईल. सत्यशोधकही तशीच टीका करतात. आणि त्यात गैर असे काही नाही. कारण जोपर्यंत एखादा मनुष्य ब्राह्मण जातीत जन्मला तर तो एकदम श्रेष्ठ, भूदेव, वर्णगुरू, पूजनीय ठरतो व महार जातीत जन्मला तर अस्पृश्य, नीच, शूद्र ठरतो; त्याच्या अंगी ‘ब्राह्मण्य’ आहे किंवा नाही अगर तो स्पर्श करण्यास अपात्र आहे किंवा नाही, हे पाहिले जात नाही, तोपर्यंत जातीला अनुलक्षून आपले विचार मांडणे हे उचित ठरते. यासाठीच म. फुले यांनी कोणाचीही भीडमुर्वत न ठेवता ब्राह्मण जातीवर टीका केली आहे. त्यांची तेवढी टीका ब्राह्मण जातीवर नव्हती, ‘ब्राह्मण्या’ वर होती असे म्हणणे हा दांभिकपणाचे ठरेल. लोकहितवादी देशमुख आदी अनेक ब्राह्मण बंधूनी आपल्या जातीवर स्पष्ट शब्दांत टोका केली आहे. म्हणून त्यांना असे ‘ब्रह्मद्वेष्टे’ म्हणता येणार नाही, तसे सत्यशोधकांनाही म्हणता येणार नाही. ब्राह्मण जातीवर टीका करणे म्हणजे ब्राह्मणांचा द्वेष करणे नव्हे किंवा त्यांना शत्रू मानणे नव्हे. सत्यशोधकांचे अनेक मित्र ब्राह्मण जातीतीलच होते व आहेत.
नोकऱ्या मिळवणे हा स्वार्थ नव्हे-न्याय्य हक्क
वर निर्देश केलेल्या दांभिक लोकांचा सत्यशोधकांवर व ब्राह्मणेतरांवर दुसरा आरोप हा की, त्यांनी ही चळवळ इंग्रज राजवटीत नोकऱ्या व दिवाणगिऱ्या मिळवण्यासाठी सुरू केली होती. ही चळवळ सुरू करण्याचा मुख्य उद्देश तो नव्हता; तरी पण सरकारी खात्यांत पुढारलेल्या वर्गाचाच भरणा होता; त्या ठिकाणी आपणास नोकऱ्या मिळाव्यात व विधिमंडळात दिवाणपद मिळावे म्हणून ब्राह्मणेतर प्रयत्न करत होते, हे खोटे नव्हे. परंतु हा जागा मिळणे हा त्याचा स्वार्थ होत नसून तो त्यांचा न्याय्य हक्कच होता; तो त्यांना मिळाला पाहिजे, असेच कोणीही नि:पक्षपाती मनुष्य म्हणेल. यावरून कित्येक ब्राह्मणेतरांची ही टीका केवळ ब्राह्मणांची खुशामत करण्यासाठी असते हे दिसून येईल. पण ज्यांच्या तपश्चर्येमुळे आपण हे मोठेपण मिळवीत आहोत त्यांच्यावर अशी क्षुद्र टीका करण्याने, आपण आपल्या कृतघ्नतेचे प्रदर्शन करीत आहोत, हे मात्र वरील दाम्भिकांच्या लक्षात येत नाही..
खन्या सत्यशोधकांना त्वरित मानधन द्या
जुन्या सत्यशोधकांनी आजचा बहुजन समाज व अस्पृश्य समाज घडविला आहे. त्यांच्या ऋणाची फेड हल्ली चालू असलेल्या सत्यशोधक शताब्दीच्या वेळी समाजाने व शासनाने करणे अवश्य आहे. पन्नास साठ वर्षांपूर्वीचे सत्यशोधक कार्यकर्ते, लेखक, पत्रकार, जलसेवाले यांची माहिती गोळा करून ती ग्रंथरूपाने प्रसिद्ध व्हावयास पाहिजे व या समाजोद्धारकांना श्री. धायगुडे यांच्यासारख्या यातना वृद्धपणी भोगाव्या लागू नयेत, व त्यांच्यावर असहाय जीवन कंठण्याचा प्रसंग येऊ नये म्हणून शासनाने त्वरित मानधन द्यावयास पाहिजे, हे शासनाचे कर्तव्य आहे; व ते करण्यासाठी शासनास भाग पाडण्याची जबाबदारी सर्व समाजावर आहे.
Tags: M. Phule. Vijayi Maratha Satara Brahman British Satyashodhak Samaj Hari Piraji Dhaygude Tilak म. फुले विजयी मराठा’ सातारा ब्राह्मण ब्रिटिश सत्यशोधक समाज हरी पिराजी धायगुडे टिळक weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या