डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

नारळीकरांनी विज्ञानकथेला आधुनिक बनवले

नारळीकर 1974 सालापासून गेली 38 वर्षे अखंडपणे विज्ञानकथा आणि विज्ञानकादंबऱ्या लिहीत आहेत. या काळात त्यांचे ‘यक्षांची देणगी’, ‘अंतराळातील भस्मासूर’, ‘टाइम मशीनची किमया’ आणि ‘सूर्याचा प्रकोप’ हे चार विज्ञानकथा संग्रह प्रकाशित झाले तर ‘प्रेषित’, ‘वामन परत न आला’, ‘अंतराळातील स्फोट’, ‘व्हायरस’ आणि ‘अभयारण्य’ या पाच कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. हे सर्व त्यांनी त्यांचे संशोधन, आंतरराष्ट्रीय व्याख्यानांचे दौरे, आयुका संस्थेची उभारणी व तिचे संचालकपद, प्रसंगोपात लेखन आणि भारतभर भाषणांच्या निमित्ताने केलेले अनेक दौरे सांभाळून केले, हे पाहिल्यावर अचंबा वाटतो.    

आजवर डॉ.जयंत नारळीकरांचे देशी-परदेशी शेकडो सत्कार झाले. पण ते सर्वच्या सर्व त्यांच्या खगोलभौतिकी क्षेत्रातील कामगिरीसाठी. पण आजचा महाराष्ट्र फाऊंडेशनचा सत्कार मात्र त्यांच्या ललित-विज्ञान लेखनासाठीच आहे. प्रा. फ्रेड हॉएल यांच्या मार्गदर्शनाखाली नारळीकरांनी केवळ पीएच.डीचे संशोधनच केले असे नाही; तर त्यांच्यातील ललित-विज्ञान लेखनाचा गुणही घेतला. स्वत: फ्रेड हॉईल यांनी अनेक विज्ञानकथा, टीव्ही मालिका लिहिल्या आहेत. नारळीकरांनी त्यांच्यापासूनच ललितविज्ञान लेखनाची स्फूर्ती घेतली. 

नारळीकर 1973 सालच्या जालना येथे भरलेल्या मराठी विज्ञान संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यावर्षीच्या विज्ञानरंजन कथा स्पर्धेतील विजेत्यांना त्यांच्या हस्ते पारितोषिके दिली गेली. ही पारितोषिके वितरीत करीत असतानाच त्यांच्या मनात पुढच्या वर्षी आपणही या स्पर्धेत भाग घ्यावा असा स्फुल्लिंग पडला असणार! कारण त्यांनी 1974 सालच्या स्पर्धेत भाग घेऊन ‘कृष्णविवर’ नावाची कथा पाठवली. पण त्यासाठी नाव घेतले, ‘नारायण विनायक जगताप’. स्वत:च्या नावाची आद्याक्षरे उलट्या क्रमाने लिहून. जयंत विष्णू नारळीकर म्हणजे जविना, त्याऐवजी नाविज. आणि आदल्या वर्षीचे अध्यक्षीय भाषण स्वत:च्या हस्ताक्षरात मराठी विज्ञान परिषदेला पाठविले असल्याने ते ओळखून परीक्षकांवर दडपण येऊ नये, म्हणून विज्ञानकथा त्यांच्या पत्नी डॉ.मंगला नारळीकरांच्या हस्ताक्षरात पाठवली. आणि त्या कथेला पाहिले पारितोषिक मिळाले. तसे ते कथालेखक श्री.नारायण विनायक जगताप यांना कळविल्यावर नारळीकर बुरख्यातून बाहेर आले. 

मौज प्रकाशनाकडून 1979 साली प्रकाशित होणाऱ्या त्यांच्या ‘यक्षांची देणगी’ या कथासंग्रहात ही कथा समाविष्ट करायची होती, म्हणून त्यांनी पत्र लिहून मराठी विज्ञान परिषदेकडे परवानगी मागितली होती. नारळीकरांच्या ललित लेखनाची सुरुवात अशी झाली. त्यानंतर ते मराठीतील विविध मासिकांत कथा लिहू लागले. ‘यक्षांची देणगी’च्या प्रस्तावनेत नारळीकरांनी त्यांची विज्ञानकथा लेखनामागची भूमिका स्पष्ट केली आहे. 

‘‘विज्ञानाची माहिती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा प्रचार आवश्यक आहे. त्यासाठी लेख, भाषणे, वर्तानपत्रे, रेडिओ, टीव्ही अशांसारखी अनेक माध्यमे उपलब्ध आहेत. पण दुर्दैवाने ह्या बाबतीत वैज्ञानिकांत एक प्रकारची उदासीनता दिसून येते. हे काम कमीपणाचे आहे असेही बऱ्याच वैज्ञानिकांना वाटते. खुद्द आईन्स्टाइनने आपली ‘रिलेटीव्हिटी’ इतरांना समजावी ह्यासाठी सोप्या शब्दांत पुस्तके लिहिली आणि भाषणे दिली. एडिंग्टन, जेम्स जीन्स या खगोलशास्त्रज्ञांनी असाच प्रयत्न केला. इतर विषयांतील नामवंत शास्त्रज्ञांनीही असे प्रयत्न केले आहेत. फ्रेड हॉएल यांनाही यात कमीपणा वाटत नाही. माझ्या मते विज्ञानकथा या तंत्राचा ह्या कामासाठी बराच उपयोग होईल. विष्णुशर्म्याने पंचतंत्रात गोष्टीचे माध्यम वापरून मुलांना शास्त्रनिपुण केले. विज्ञानाची गोळी जर कडू वाटत असेल तर त्याला कथेच्या रूपातील साखरेचे ‘कोटिंग’ द्यावे. मी तरी अशा उद्देशाने विज्ञानकथा लिहितो.’’ 

विज्ञानकथा कशा असाव्यात ह्याचे उत्तर त्या कोणत्या  उद्देशाने लिहिल्या आहेत यात सापडते. मराठी साहित्यात या तंत्राचा विकास झाला नाही. इंग्रजीमध्ये ज्यूल व्हर्न, एच.जी.वेल्स यांनी सुरू केलेल्या परंपरेला अनेकांनी हातभार लावला आहे. विज्ञानकथा मनोरंजक आणि उद्‌बोधक असावी. सध्या माहीत असलेल्या विज्ञानावर किंवा स्वत:च्या कल्पनाशक्तीने भर घालून उद्याच्या विज्ञानाचे चित्र रेखाटण्याचा त्यात प्रयत्न असावा. आर्थर क्लार्कने टेलिव्हिजन प्रक्षेपणाची कल्पना मांडली, ती आता प्रत्यक्षात उतरली आहे. फ्रेड हॉएल यांनी ‘द ब्लॅक क्लाऊड’ या पहिल्या विज्ञानकादंबरीत ताऱ्यांच्या दरम्यान कृष्णमेघ असल्याची कल्पना 1956 च्या सुमारास केली होती. नंतर 1960 ते 70 च्या दरम्यान जीवनाचे मूलघटक म्हणून समजले जाणारे रासायनिक रेणू सापडले, मात्र विज्ञानकथा लेखकाची कल्पना नेहमीच सफल झाली असे नाही. 

नारळीकरांनी आपल्या काही कथांत विज्ञान समजावून देण्यासाठी आकृत्यांचा वापर केला आहे. उदा. ‘उजव्या सोंडेचा गणपती’ या कथेत मोबियसची पट्टी समजण्यासाठी आकृत्या छापल्या आहेत. ‘धोंडू’ कथेत त्यांनी आलेख काढले होते. आणि ‘यक्षांची देणगी’ या कथासंग्रहाला एक परिशिष्ट जोडून प्रत्येक कथेमागची वैज्ञानिक कल्पना स्पष्ट केली आहे. म्हणजे ती कथेतून पुरेशी स्पष्ट होत नसावी म्हणून त्यांनी हे परिशिष्ट लिहिले का? वाचकांना नीट समजावे म्हणून कदाचित त्यांच्यातील शिक्षक जागा झाला असणार. तसे परिशिष्ट ‘टाइम मशीनची किमया’ या पुस्तकातही आहे. संशोधनात्मक प्रबंध, मागोवा घेणारा लेख, वैज्ञानिक मुद्‌द्याची चर्चा करणारा लेख, विज्ञानकोश, सुशिक्षितांसाठी लिहिलेला लेख आणि विज्ञानकथा या सहा प्रकारांत त्याच क्रमाक्रमाने विज्ञानाचे प्रमाण कमी कमी होत जाते आणि त्या त्या प्रमाणात माध्यमाचे महत्त्व वाढत जाते. उदा. विज्ञानकथेत कथेचे महत्त्व वाढत जाते आणि त्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. 

एखादी विज्ञानकथा अतिविशाल, चमत्कृतीपूर्ण अथवा काहीशा अनाकलनीय घटनेवर आधारलेली असेल तर त्याचा संबंध वाचकाला माहीत असलेल्या पार्श्वभूमीशी जोडल्याखेरीज त्या मनोवेधक ठरत नाहीत. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या 1979च्या वार्षिक अंकात नारळीकरांनी ‘स्फोट’ नावाची विज्ञानकथा लिहिली तेव्हा त्यांना या गोष्टीची जाणीव झाली. ‘‘पृथ्वीवर एखादा सुपरनोव्हा उद्‌भवला तर किती हाहाकार उडेल या विषयावर ती कथा नारळीकरांनी बेतली आहे. विज्ञानकथानक कितीही फुलवले तरी ते वैज्ञानिक तथ्याची कास सोडून असू नये. उदा. प्रकाशाची वेगमर्यादा ओलांडता येत नाही हे गृहीत धरल्यावर ‘प्रेषित’ ही विज्ञानकादंबरी लिहिताना नारळीकरांवर काही बंधने आपोआप आली. आपल्या साहित्याकडे विज्ञानसाहित्य म्हणून बघितले जावे असे वाटत असेल तर लेखकाने प्रस्थापित विज्ञानाचा पायाच वापरला पाहिजे. हा निकष लावला तर विज्ञानकथा आणि परीकथा किंवा निव्वळ फँटसी यांच्यातला फरक कळून येतो. उदाहरणार्थ, भयकथा म्हणजे विज्ञानकथा असे म्हणता येणार नाही. विज्ञानाची चांगली माहिती असणे हे जरी उत्तम विज्ञानकथेकरिता आवश्यक असले तरी पुरेसे नसते. कथानक रंगवण्यासाठी जरुरी असणारे इतर गुण त्याच्यात पाहिजे. उदा. सस्पेंस हा प्रकार पुष्कळ विज्ञानकथा रंगवण्यासाठी उपयोगी पडतो, पण हा प्रकार सगळ्यांनाच जमतो असे नाही. 

विज्ञान हे जिज्ञासेतून निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक अनाकलनीय गोष्टी समजायला मदत झाली आहे. उदा.सूर्याच्या आंतरिक समतोलात सूक्ष्म असा बदल झाला आणि त्याचे तापमान थोडे जरी खाली आले तरी पृथ्वीवर हिमयुग येऊ शकेल, किंवा जेनेटिक इंजिनिअरिंग या विषयात सध्या जे प्रयोग चालले आहेत तशासारखे प्रयोग, अशा विज्ञानाचा पाया माहीत नसेल, तर अशा कथा या भयकथा होऊ शकतात. आणि सगळ्यांनाच नेमकी विज्ञानकथा ठाऊक नसल्याने अनेक भयकथांची गणना विज्ञानकथेत मग होते. वाचकाला विज्ञाननिष्ठ करावे हा विज्ञानसाहित्याचा हेतू असेल तर तो अशा भयकथांनी साध्य न होता वाचकाला अंधश्रद्धेकडे ढकलतो. विज्ञानकथेत सांगितलेली विज्ञानाची संकल्पना कथानकाच्या ओघाओघात आली पाहिजे. तशी ती ‘राऊंड दी वर्ल्ड इन एटी डेज’ या कादंबरीत आली आहे. लेखक ती समजावून देण्याच्या भानगडीत पडला तर मात्र ती केवळ लेक्चरबाजी ठरेल. विज्ञानकथेतील पात्रांना सजीव करणे आवश्यक आहे. कितीही मोठा शास्त्रज्ञ असला तरी तो मुळात तुच्या आमच्यासारखा माणूस आहे हे वाचकाला पटले पाहिजे. किंबहुना वाचकाने त्याच्याशी तादात्म्य पावले पाहिजे. 

1976 मध्ये नारळीकरांनी ‘धूमकेतू’ नावाची एक विज्ञानकथा लिहिली होती. त्यात पृथ्वीची एका धूमकेतूशी टक्कर होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यातून पृथ्वी व पृथ्वीवासियांना कसे वाचवायचे? मग जागतिक स्तरावरील शास्त्रज्ञ एकत्र येऊन त्या धूमकेतूवर अण्वस्त्र धाडायची कल्पना मांडतात. त्यांनी तसे केल्यावर धूमकेतूची दिशा बदलते व पृथ्वीवरील अरिष्ट टळते. त्यानंतर 12-13 वर्षांनी नासापुढे असाच प्रश्न आला आणि त्यांनी योजलेला उपाय नारळीकरांच्या गोष्टीत सुचविल्याप्रमाणेच होता. 1975-77 दरम्यान नारळीकरांनी लिहिलेल्या ‘पुत्रवती भव’ कथेत लिंग तपासणीचे धोके वर्णन केले आहेत. ते आज नेमके अनुभवायला मिळत आहेत. ज्या विज्ञानकथेत तर्कशून्य विधाने केलेली असतात किंवा कथेची लेखनशैली वाईट असते किंवा स्वभावचित्रे अपूर्ण असतात त्या विज्ञानकथा निकृष्ट समजाव्यात असेही मत नारळीकर एके ठिकाणी मांडतात. 

विज्ञानकथेचे खऱ्या अर्थाने आजवर समीक्षण झाले नाही असे जेव्हा सर्व विज्ञान कथाकार म्हणतात, तेव्हा मराठी वाङ्‌मयातील समीक्षक या वाङ्‌मय प्रकाराची दखल घेत नाहीत अशी त्यांची खरी तक्रार असते. पण विज्ञानकथेत कथा आणि विज्ञान असे दोन्ही असते आणि यातील विज्ञान समजत नाही म्हणून ते याची दखल घेत नाहीत. त्यामुळे जे वैज्ञानिक मराठी वाङ्‌याचे रसिक आहेत, उत्तम वाचक आहेत, त्यांनी विज्ञानकथेची समीक्षा करायला हवी; अथवा विज्ञानकथाकारांनी ती जबाबदारी स्वीकारायला हवी. नारळीकरांना 2005 साली ‘चतुरंग प्रतिष्ठान’ने जीवनगौरव पुरस्कार दिला. त्यानिमित्त जी स्मरणिका प्रकाशित झाली त्यामध्ये नारळीकरांच्या कथांवर डॉ.बाळ फोंडके यांनी एक लेख लिहिला आहे. 

त्यात ते म्हणतात, ‘‘नारळीकरांपूर्वीही मराठी विज्ञान परिषद विज्ञानरंजनकथा स्पर्धा घेत होतीच आणि मराठीत विज्ञानकथा लिहिली जात होतीच; पण या क्षेत्राला नारळीकरांच्या आगमनामुळे एक प्रतिष्ठा प्राप्त झाली. एक जगप्रसिद्ध वैज्ञानिक विज्ञानकथा लिहीत आहेत याचे स्वागत दुर्गाबाई भागवत यांनी साहित्य सेंलनाच्या व्यासपीठावरून केले. मुकुंदराव किर्लोस्करांनी त्यानंतर ‘किर्लोस्कर’ मासिकातून त्यांच्या कथा छापल्या. पण त्यांच्या वैज्ञानिक कर्तृत्वाचे वलय कथेला लाभले असे नसून त्यांनी खऱ्या अर्थाने मराठी विज्ञानकथेला एक नवे परिमाण दिले. नारळीकरांनी पूर्वी लिहिलेल्या विज्ञानकथा चमत्कृतीपूर्ण आणि विज्ञानबहुल असल्याची टीका झाली होती. किंबहुना तिची उपेक्षा झाली आणि काहीवेळा बालसाहित्य म्हणूनही तिची संभावना झाली; पण ज्यूल व्हर्न किंवा एच.जी.वेल्स यांच्या कथांचे जे अनुवाद मराठीत केले गेले त्या कथाही मुळात अद्‌भुतरसाच्याच आहेत. भालबा केळकर, द.पां.खांबेटे यांच्या कथाही परिकथा आणि अद्‌भुतकथाच होत्या. ‘कृष्णविवर’, ‘उजव्या सोंडेचा गणपती’, ‘धूकेतू’सारख्या कथांतून नारळीकरांनी अप्रत्यक्षपणे विज्ञानकथेचे स्वरूप व निकषही प्रस्थापित केले. मराठी कथेला गंगाधर गाडगीळ- पु.भा.भावे-अरविंद गोखले- व्यंकटेश माडगूळकर यांनी नवकथेचे लेणे देऊन आधुनिक बनवले तसे नारळीकरांनी विज्ञानकथेला आधुनिक बनवले.

नारळीकर 1974 सालापासून गेली 38 वर्षे अखंडपणे विज्ञानकथा आणि विज्ञानकादंबऱ्या लिहीत आहेत. या काळात त्यांचे ‘यक्षांची देणगी’, ‘अंतराळातील भस्मासूर’, ‘टाइम मशीनची किमया’ आणि ‘सूर्याचा प्रकोप’ हे चार विज्ञानकथा संग्रह प्रकाशित झाले तर ‘प्रेषित’, ‘वामन परत न आला’, ‘अंतराळातील स्फोट’, ‘व्हायरस’ आणि ‘अभयारण्य’ या पाच कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. हे सर्व त्यांनी त्यांचे संशोधन, आंतरराष्ट्रीय व्याख्यानांचे दौरे, आयुका संस्थेची उभारणी व तिचे संचालकपद, प्रसंगोपात लेखन आणि भारतभर भाषणांच्या निमित्ताने केलेले अनेक दौरे सांभाळून केले हे पाहिल्यावर अचंबा वाटतो. 

Tags: महाराष्ट्र फौंडेशन डॉ.बाळ फोंडके एच.जी.वेल्स ज्यूल व्हर्न विज्ञानकथा फ्रेड हॉएल डॉ.जयंत नारळीकर अ. पां. देशपांडे Maharashtra Foundation Dr Bal Fondke H G Wells Jules Verne Sciencefiction Fred Hoyle Jayant Narlikar A P Deshpande weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके