डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

भारताला स्वातंत्र्य मिळणार हे दिसायला लागलं होतं. अर्थशास्त्राच्या पुढील शिक्षणासाठी पिताजी अमेरिकेला जायला निघाले. सर्व तयारी झाली. ओहायो विद्यापीठात प्रवेश, प्रवासासाठी पासपोर्ट, व्हिसा सर्व मिळवून प्रत्यक्ष गांधीजींचा आशीर्वाद घ्यायला पिताजी बापुकुटीत गेले. गांधीजी खाली चटईवर बसून लिहीत होते. पिताजींनी प्रणाम केला व आशीर्वाद मागितला. दोन क्षण त्यांच्याकडे बघून गांधीजी उद्‌गारले- ‘‘अर्थशास्त्र सीखना है तो अमेरिका के बजाय भारत के देहातों में जाओ।’’ पिताजी शांतपणे बाहेर आले व बापुकुटीच्या बाहेरच त्यांनी आपले ॲडमिशनचे व प्रवासाचे कागदपत्र फाडून टाकले.

वर्धा शहरापासून दोन-तीन किलोमीटर अंतरावर आलोडी नावाचे खेडे आहे. गावाच्या बाहेर चेतना-विकास संस्थेचा परिसर आहे. माझे वडील सध्या तिथे राहतात. आज त्यांच्या विषयी थोडंसं. वडिलांना आम्ही दोन्ही मुलं ‘पिताजी’ म्हणून हाक मारतो. लहानपणी आश्रमात राहत असल्यामुळे तो हिंदीचा परिणाम असावा. पिताजी आता खूपच थकले आहेत. चौऱ्याण्णव वर्षे पूर्ण केल्यावर कोणीही थकणार. त्यांची गती आता मंदावली आहे; पण त्यापूर्वी पन्नास वर्षे ते सतत प्रवासात होते - वर्षाला लक्ष किलोमीटर रेल्वेने आणि पाच-सहा हजार किलोमीटर पायी भूदान पदयात्रा त्यांनी वर्षानुवर्षे केली. आता त्यांची श्रवणशक्ती व बोलण्याची शक्ती बरीच क्षीण झाली आहे. पण त्या पूर्वी सत्तर वर्षे त्यांनी सतत समाजाच्या शिक्षणाचे काम केले आहे. त्यांच्या जीवनातील लोकप्रियतेची चौथी लाट येऊनही आता चौतीस वर्षे झालीत. आजची निम्म्याहून अधिक माणसं त्यांनतर जन्माला आलीत. ती ठाकुरदास बंग यांना कशी ओळखणार? 

अमरावती जिल्ह्याच्या एका खेड्यात, गरीब घरात जन्माला आलेल्या ठाकुरदासने शालेय शिक्षण अमरावतीला ज्या विधवा आत्याकडे राहून पूर्ण केलं, तिचं वर्षाचं पेन्शन होतं आठ रुपये. ती चोवीस तासांत फक्त संध्याकाळी दिवे लागणीला पंधरा मिनिटं तेलाचा दिवा पेटवायची. त्यामुळे जुन्या काळातील चरित्र-नायकांबाबत वाचायला मिळतं त्या पद्धतीने, म्हणजे म्युनिसीपालटीच्या रस्त्यावरील दिव्यांच्या प्रकाशातच ठाकुरदासचा शालेय अभ्यास पार पडला. स्वत:च स्वत:ला घडवायचं! मार्गदर्शन करायला घरी कोणीच नव्हतं. आपली स्वत:चीच अभ्यास करण्याची पद्धत व कठोर परिश्रम याशिवाय तिसरा आधार नाही. 1936 मधे बी.अे.चा आपला निकाल बघायला ते कॉलेजमधे गेले व नोटीस बोर्डवरील निकालपत्रात तिसरा वर्ग, दुसरा वर्ग दोन्ही यादीत आपलं नाव नाही बघून हिरमुसले. परत येणार तितक्यात त्यांच्या मित्रांनी त्यांना चारी बाजूनं घेरून डोक्यावर घेतलं. ते विद्यापीठात प्रथम होते - पाच सुवर्णपदकांसह. त्या काळात हा नागपूर विद्यापीठात विक्रम होता, जो अनेक वर्षे अबाधित राहिला. 

अर्थशास्त्रात सुवर्णपदकासह एम.ए व एल.एल.बी करून शिक्षण पूर्ण केलेले ठाकुरदास आपल्या आई- वडिलांची इच्छा- त्यांनी आय.सी.अेस. किंवा बॅरिस्टर व्हावे- नाकारून गांधीजी व जमनालाल बजाज यांनी वर्ध्याला सुरू केलेल्या राष्ट्रीय विचारांच्या कॉलेजमधे प्राध्यापक म्हणून 1940 साली रुजू झालेत. त्यांच्या गरीब वडिलांच्या फुटक्या संसाराला हातभार म्हणून आपली पाचही सुवर्णपदकं विकायला देऊन ते स्वत: देशसेवा करण्यास मोकळे झाले. बेचाळीस साली आठ ऑगस्टला रात्री गोवालिया टॅक मैदानावर गांधीजींनी ‘करो वा मरो’ चे आवाहन केल्यावर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे अतिशय लोकप्रिय असलेले प्रोफेसर बंग नोकरीचा राजीनामा देऊन स्वातंत्र्य आंदोलनात उतरले. भूमिगत होऊन आंदोलन चालवत असतांना शेवटी फितुरीमुळे देवळीला त्यांना अटक झाली तेव्हा ब्रिटिश पोलीसांनी त्यांना रस्त्यावरून अनेक किलोमीटर जाहीरपणे मारत मारत ठाण्यात नेले. दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली. जबलपूर जेलमधे जेलरच्या अन्यायाच्या निषेधार्थ जेलची बरॅक तोडून बाहेर आले म्हणून शिक्षा अजूनच कठोर झाली. वर्धा जिल्हा हा त्या काळात गांधीजींच्या प्रभावळीतील अनेक नररत्नांनी भूषित होता. त्यांच्यात प्रोफेसर बंग ‘जहाल’ अहिंसक सत्याग्रही म्हणून ओळखले जाऊ लागले. 

जेलमधून सुटल्यावर त्यांचे आई-वडील लग्नासाठी मागे लागले. तरुण प्रोफेसर बंग मुलगी बघायला निघाले. मुलीला प्रश्न विचारला तो हा - समजा, लग्नानंतर मी मेलो तर तू काय करशील? मुलगीही देशभक्त घरातली होती. ती म्हणाली - तुचं देशसेवेचं काम पुढे सुरू ठेवीन. दोघांचेही वेड सारखेच, म्हणून लग्न जुळलं. देश गुलामीत, नेते जेलमधे, म्हणून लग्नात कमीत कमी खर्च करायचा. ठाकुरदासांनी फक्त स्वत:जवळच्या गांधीजींच्या फोटोला फ्रेम करून घेतली. बस, तेवढाच सहा आणे खर्च. आज अद्‌भुत वाटावे अशा पद्धतीने हे लग्न झाले. तो काळच तसा अद्‌भुत होता. माझ्या ध्येयवेड्या बापाला तशीच ध्येयवेडी बायको- सुन मिळाली. दोघं सेवाग्रामला चरखासंघात राहत होते. रोज संध्याकाळी घरासमोरून प्रत्यक्ष महात्मा गांधी फिरायला जायचे! 

भारताला स्वातंत्र्य मिळणार हे दिसायला लागले होते. अर्थशास्त्राच्या पुढील शिक्षणासाठी पिताजी अमेरिकेला जायला निघाले. सर्व तयारी झाली. ओहायो विद्यापीठात प्रवेश, प्रवासासाठी पासपोर्ट, व्हिसा सर्व मिळवून प्रत्यक्ष गांधीजींचा आशीर्वाद घ्यायला पिताजी बापुकुटीत गेले. गांधीजी खाली चटईवर बसून लिहीत होते. पिताजींनी प्रणाम केला व आशीर्वाद मागितला. दोन क्षण त्यांच्याकडे बघून गांधीजी उद्‌गारले- ‘‘अर्थशास्त्र सीखना है तो अमेरिका के बजाय भारत के देहातों में जाओ।’’ पिताजी शांतपणे बाहेर आले व बापुकुटीच्या बाहेरच त्यांनी आपले अँडमिशनचे व प्रवासाचे कागदपत्र फाडून टाकले. 

गांधीजींच्या त्या एका वाक्याच्या आदेशाने आपली दिशा बदलून पिताजी वर्ध्याजवळच्या बरबडी व नंतर महाकाळ या खेड्यांत आपल्या नवपरिणित पत्नीसुनसोब त जाऊन राहिले. या प्रयोगाला त्यांनी नाव दिले ‘साधना-सदन’ धाम नदीच्या किनाऱ्यावर महाकाळ गाव होतं. तिथूनच पुढे चार-पाच किलोमीटर अंतरावर पवनारला प्रत्यक्ष विनोबा राहत होते. त्याकाळात त्यांचा ‘कांचन-मुक्ती’ प्रयोग सुरू होता. साधना-सदन चे मार्गदर्शक स्वत: विनोबा होते. मधे मधे ते स्वत: येऊन बघून जायचे. प्रयोगात पिताजींसोबत कॉलेजमधील देशभक्त विद्यार्थ्यांचा छोटा समूह होता. सर्व मिळून संयुक्त कुटुंब पद्धतीने शेतात राहायचे. 

हा सुवर्ण पदक विभूषित प्राध्यापक व स्वातंत्र्य सैनिक रोज शेतीत राबून ग्रामीण अर्थशास्त्र अक्षरश: जगून शिकत होता व मग आठ किलोमीटर नाले व चिखलांचे अंतर सायकलीने पार करून वर्ध्याला कॉलेजमधे अर्थशास्त्र शिकवत होता. त्यांचे हे तापसाचे जीवन जवळून पाहिलेले त्यांचे अनेक विद्यार्थी आयुष्यभरासाठी समाजसेवक व सहकारी झालेत. पुढे महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री म्हणून शिक्षणनीतीवर आपली मुद्रा उमटवणारे स्वर्गीय श्री. मधुकरराव चौधरी हे देखील पिताजींचे त्या काळातले एक निकटचे विद्यार्थी सहकारी. आई-वडील बरबडी- महाकाळमधे असे जगत असतांना माझा जन्म झाला. त्यालाही आता एकसष्ट वर्षे पूर्ण झालीत. 

अत्यंत गरीबीत बालपण काढलेल्या ठाकुरदास बंगांना पैसे कमविण्याचा कधीही मोह न पडणे हे एक आश्चर्यच आहे. आता प्राध्यापकीमुळे त्यांची आर्थिक व सामाजिक बाजू मजबूत झाली होती. पण त्या गोष्टींचा त्यांना किंचितही मोह नव्हता. 1951 साली भूदान आंदोलनाचा जन्म झाला. 1953 साली विनोबांच्या आवाहनावर पिताजींनी प्राध्यापकाच्या नोकरीचाही राजीनामा दिला व बऱ्याच विचारानंतर आणि आईच्या संतीने विनोबांच्या भूदानयज्ञ व सर्वोदय कार्यासाठी ‘जीवनदान’ घोषित केले- व पुढील पंचावन्न वर्षे ते निभावले. 

मी तीन वर्षांचा असतांना पिताजी नोकरी व घर सोडून भूदान कार्यासाठी गावोगावी फिरायला लागले. त्यांचे घरी येणे खूप कमी झाले. पण तरीही माझ्या 6 व्या जन्मदिवसाला पिताजींचे बोट धरून खादीचे कपडे घातलेला चालत जाणारा अभय अजूनही माझ्या डोळ्यांसमोर आहे. माझे नाव शाळेत टाकले गेले. माझा सहावा जन्मदिवस असा साजरा झाला. त्यानंतर कालपर्यंत दरवर्षी माझ्या जन्मदिवशी पिताजी स्वहस्ताने लिहिलेले पत्र मला पाठवत आले आहेत. त्या पत्रात माझ्या वर्षभरातील विकासाचे पित्याने केलेले कौतुक असायचे व पुढील वर्षासाठी मार्गदर्शन असायचे. अशा 55 पत्रांचा वारसा मला मिळाला. 

‘1957 हे वर्ष देशात ‘भूमि-क्रांती’ साठी द्या’ या विनोबांच्या आवाहनावर वडील व आई दोघेही वर्षभर घरी न येता भूदान पदयात्रा करीत होते. आम्हा दोन्ही मुलांना वर्षभरासाठी जळगाव जिल्ह्यातील एका दूरच्या खेड्यात माझ्या मावशीकडे पाठवून आई-वडील भूदान कार्यासाठी निघाले. देशात प्रत्येक जागी स्वत: विनोबा जाऊ शकत नव्हते. तिथे ‘गरिबांसाठी जमीन दान द्या’ असे जमीनदारांना, मोठ्या शेतकऱ्यांना त्यागाचे आवाहन कोण करणार, कसे करणार? या प्रश्नावर प्रो. बंगांच्या नेतृत्वात विदर्भातील भूदान आंदोलनातील कार्यकर्त्यांनी ‘सामूहिक  पदयात्रा’ हा नवा मार्ग शोधला. जिथे, व्यक्ती विभूती ‘नाही’ तिथे कार्यकर्त्यांची ‘सामूहिक विभूती’. सर्वोदय आंदोलनात हा पॅटर्न देशभर गाजला, प्रसारित झाला. 

पुढील वीस वर्षे प्रो. ठाकुरदास बंग महाराष्ट्रात व देशभरात सतत फिरत होते. भारतीय रेल्वेच्या डब्यातील तृतीय श्रेणीचा बाक, किंवा रेल्वे स्टेशनचा प्लॅटर्फॉम किंवा भूदान पदयात्रेत कोणत्याही खेड्यातील शेतकरी-मजुराची झोपडी- कधीकधी तर गोठ्यातही ते रात्र काढायचे. तसे ते महिन्यातून दोन-तीन दिवस घरी यायचे. पण तेही रेल्वेस्टेशनवरून प्रथम पायी आपल्या ऑफिसमध्ये जायचे. महिन्याभराच्या पत्राची उत्तरे द्यायचे- दिवसाला शंभर पोस्टकार्ड लिहिणे हा त्यांचा रोजचा खुराक असावा- व मग घरी यायचे. सोबत कार्यकर्त्यांचा एक समूहच आमच्या घरी जेवायला पोचायचा. 1953 नंतर एक पैसाही न कमविणाऱ्या आपल्या नवऱ्याचा संसार माझ्या आईने कसा केला असेल, ही देखील एक स्वतंत्र कहाणीच आहे. 

स्वत:साठी पैसाही न कमविणारे वडील आता सर्वोदयाचे राष्ट्रीय नेते झाले होते. 1969 मधे ते सर्वोदय आंदोलनाची मध्यवर्ती संघटना- सर्व सेवा संघाचे- राष्ट्रीय महामंत्री व नंतर अध्यक्ष झालेत. वीस वर्षे त्यांनी या जबाबदाऱ्या भूषविल्या. हा काळ प्रथम विनोबांचे ग्रामदान आंदोलन, मग जयप्रकाशांचे बिहार आंदोलन व संपूर्ण क्रांती आंदोलन, आणीबाणी व पुढे जनता सरकार येण्याचा होता. या सर्व घटनांधे सर्व सेवा संघ ही केंद्रबिंदूला असलेली संघटना होती व ठाकुरदास बंग तिचे महामंत्री व नंतर अध्यक्ष होते. तो सर्व इतिहास घडतांना बघणे व घडविणे यात त्यांची एक प्रमुख भूमिका होती. 

बिहार आंदोलनात पटन्याला जयप्रकाशांच्या केंद्रीय संचालनालयाचे ते प्रमुख होते. नितीशकुमार, लालूप्रसाद हे विद्यार्थी नेते त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते. (‘‘लालू तेव्हाही चालू होता’’ - पिताजींचं मत.) इंदिरा गांधींनी प्रा.ठाकुरदास बंग व आचार्य राममूर्ती यांना बिहारबंदी करून हद्दपार केले. वस्तुत: जयप्रकाशांना आव्हान देण्यासाठी ते शासकीय सत्ता प्रदर्शन होते. पण तरी जयप्रकाशांचे आंदोलन वाढतच गेले. काही महिन्यांनी आणीबाणी लागू झाली व शासनाने पिताजींना अटक केली, तेव्हा ते बिहारमधेच सापडले होते. पुढील 19 महिने ते दुसऱ्यांदा जेलमधे होते. 

हा सर्व काळ मी कधी जवळून तर बहुतेक वेळा दुरून बघत होतो. माझे वैद्यकीय शिक्षण समांतर सुरू होते. पण एकीकडे मृत शरीरांचे विच्छेदन किंवा हॉस्पिटलमधील रुग्णांची तपासणी व उपचार शिकताना दुसरीकडे सर्वोदय आंदोलन, तरुण शांति सेना, संपूर्ण क्रांती आंदोलन यांत मी सक्रियपणे सहभागी होतो. स्वत: घडत होतो. वडिलांच्या सोबत राहून त्यांच्या राष्ट्रीय पदांचा फायदा घेण्याची परंपरा आमच्या घरात नव्हती. आई-वडिलांच्या त्यागाचे व समाजसेवेचे मात्र आम्ही वारस होतो. तो वसा माझा मोठा भाऊ अशोक व मी आम्ही दोघांनी थोडा घेतला. माझ्या घडण्यावर एकीकडे महात्मा गांधी व विनोबा या दोन विभूतींच्या विचारांचा जेवढा परिणाम आहे तेवढाच माझ्या आई व वडिलांच्या प्रत्यक्ष जगण्याचा व संस्कारांचा आहे. माझ्या लहानपणापासून पिताजी माझे आदर्श, माझे हिरो राहिले आहेत. बुद्धिमत्ता, साहस, त्याग, नम्रता, निर्मोह, कठोर परिश्रम व तितिक्षा... त्यांच्या व्यक्तिमत्त्वात हे सर्व गुण असामान्य पातळीचे प्रकट झाले. निष्काम कर्मयोग त्यांच्या रूपात साक्षात प्रकट झाला. आचार्य तो, ज्याचं जीवन आचरणीय आहे, ज्यांच्याकडून आपण जगावे कसे हे शिकतो. 

1940 मधे प्रोफेसर बनलेले पिताजी गेली सत्तर वर्षे खऱ्या अर्थाने ‘नॅशनल प्रोफेसर’ म्हणून जगले. ‘देहभान हरपून गेले’ हे वाक्य भक्तीच्या क्षेत्रात आपण वाचतो. समाजसेवेत गेली सत्तर वर्षे पिताजींचे देहभान हरपलेले आहे. भूक-तहान, थकवा, वेदना त्यांना खरेच कळत नाही. आठवण करून दिली तर थोडा वेळ लक्षपूर्वक विचार केल्यावर म्हणतात, ‘‘हो, भूक लागली आहे खरी!’’ एकदा शेतात काम करतांना त्यांना इंगळीने डंख केला. तीव्र वेदना अंगभर पसरली. काहीही उपचार न करता पिताजी काही तास त्या वेदनेकडे अलिप्तपणे बघत राहिले. दिवसभरानंतर वेदना हरली, आपोआप सरली. मनाने शरीरावर विजय मिळवला! 

महात्मा गांधींसोबत स्वातंत्र्य आंदोलन, विनोबांसोबत सर्वोदय आंदोलन व जयप्रकाश नारायणांसोबत संपूर्ण क्रांती आंदोलन या तीन राष्ट्रीय उधाणांत सहभाग घेतलेल्या व दोनदा भारताला तत्कालीन हुकुमशाही शासनापासून मुक्त करण्यात यशस्वी झाल्यानंतर आता पिताजी आयुष्यात पहिल्यांदा सामाजिक कामातून निवृत्त झाले आहेत. वाचन मात्र सुरूच आहे. एकदा गांधीजींनी लिहिलेले सर्व काही संकलित असलेले Collected Works of Mahatma Gandhi एका वर्षात वाचायचा संकल्प त्यांनी केला. पंच्याऐंशी वर्ष वयाचे पिताजी त्या वर्षभरात रोज सकाळी तीन वाजता उठून चार तास वाचायचे. वर्षभरात त्यांनी पाच-पाचशे पानांचे 80-90 भाग वाचून काढले. नंतर दिवसभर काम करायला मोकळे! 

आशेची एवढी उत्तुंग शिखरे पाहिल्यावर आजची स्थिती बघून यांना कधीच निराशा का येत नाही, हा मलाच प्रश्न पडतो. एक कारण मला दिसले- त्यांना या सर्व प्रयत्नांतून स्वत:ला काही मिळावे- पैसा, पद, प्रसिद्धी- याचा अजिबात मोह नव्हता. त्यांना व्यक्तिगत प्राप्तीची कोणती आकांक्षाच मुळी नाही. इतकी निर्मोही व निष्काम वृत्ती त्यांना कशी काय साधली? आमच्या लहानपणी  सेवाग्राममधील एका दोन खोल्यांच्या घरात आमचे कुटुंब राहायचे. त्या काळात मी त्यांना म्हणतांना ऐकले आहे- ‘‘माझं स्वप्न आहे, की आपलं तेवढं देखील घर असू नये. आपण पूर्ण अनिकेत बनून झाडाखाली राहावं.’’ अशोक चव्हाण, तुम्ही हे वाचता आहात का? या देशातले राजकीय नेते ‘आदर्श सोसायटी’मधे फ्लॅट बुक करत असताना पिताजींचे स्वत:च्या मालकीचे कुठेच घर किंवा जमीन नाही. 

स्वातंत्र्य सैनिकाचा ताम्रपटही त्यांनी स्वीकारला नाही. कोणत्याच शासकीय किंवा राजकीय पदाची आकांक्षा नसल्याने कोणताही सत्ताधारी त्यांना प्रभावित करू शकला नाही. ते अंगच त्यांना नाही. पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंना भेटून परत आल्यानंतर सरळ खेड्यात जाऊन रात्री कोणा गरिबाच्या झोपडीत राहताना मी त्यांना पाहिले आहे. व्ही.पी.सिंग पंतप्रधान असतांना दिल्लीला त्यांना भेटून मग गडचिरोलीला माझ्याकडे आले व अमिर्झा नावाच्या खेड्यात घराघरांत जाऊन गांधीजींची दोन रुपयांची पुस्तके विकायला लागले. पंतप्रधान मनमोहन सिंग वर्ध्याला आले असतांना शेतकऱ्यांच्या समस्यांवर त्यांची पिताजींसोबत एकदा चर्चा झाल्यावर काही तासांनी ‘पुन्हा चर्चा करण्यासाठी या’’ असा पंतप्रधानांनी निरोप पाठवल्यावर, ‘‘पुन्हा भेटण्याची मला गरज वाटत नाही. आपण जे बोललो तेच प्रथम अमलात आणा.’’ असे उत्तर पिताजीच देऊ शकतात. 

1970 मधे विनोबा अमृत वर्षाच्या निमित्ताने 75 लाखांचा निधी (त्या काळात हा खूप होता) व 1980 साली जयप्रकाश अमृत कोषासाठी देशभरातून निधी गोळा करण्याच्या संकल्पाचे ते प्रमुख होते. एक कोटी रुपये गोळा करून घरी परततांना वर्धा स्टेशनवरून घरी तीन किलोमीटर ते पाठीवर सामान घेऊन पायी चालत आले. असं का करता विचारलं तर म्हणाले, ‘लोकांनी दिलेल्या पैशातला एक रुपया उगाच का खर्च करायचा?’ 
सुरेश कलमाडी, तुम्ही ऐकता आहात का? 

गांधीजी व विनोबांनी इच्छिलेला सर्वोदयी समाज ज्याला प्रत्यक्षात आणायला पिताजींनी आपल्या आयुष्याची सत्तर वर्षे अक्षरश: हो पेटवला- त्यांच्या जीवनकाळात आता प्रत्यक्षात येणार नाही हे त्यांना स्पष्ट दिसत असावे. तरी त्यांना निराश का वाटू नये? याचे दुसरे कारण काय? मी त्यांनाच विचारले. ‘‘श्रद्धा.’’ एवढा एकच शब्द ते बोलले. ‘‘पण तुम्ही तर बुद्धिवादी आहात; अर्थशास्त्राचे प्राध्यापक. तुम्हाला ही श्रद्धा कुठून मिळते?’’ मी पुढे कोरून पाहिले. ‘‘गीता’’. पुन्हा एवढेच बोलले. ते केवळ अर्थशास्त्रज्ञ नव्हते. संस्कृतमधेही त्यांना सुवर्णपदक होते हे मी विसरलो होतो. बुद्धी व श्रद्धा, अर्थशास्त्र व अध्यात्म दोन्ही पंखांनी उडणाऱ्याला निराशा कशी येणार? 

गेली दोन वर्षे सर्व सार्वजनिक जबाबदारीतून स्वत:ला पूर्णपणे निवृत्त व निर्लिप्त करून पिताजी शांतपणे घरी आहेत. म्हणाले, ‘‘मला आता जगण्याचा मोह उरलेला नाही, पण मृत्यूचीही घाई नाही. जे घडत आहे ते साक्षीभावाने बघणे रोज सुरू आहे. ईश्वर इच्छा करेल तेव्हा ते संपेल.’’ एखाद्या प्रश्नावर ‘मार्गदर्शन करा’ असे म्हणत आता पंतप्रधान जरी त्यांच्याकडे गेले तर पिताजी काय म्हणतील? अलेक्झांडर भारत विजयाला आला. एका ऋषीचे खूप नाव ऐकले म्हणून त्यांना भेटायला वनात गेला. तपाने कृश झालेले ऋषी सकाळच्या उन्हात ध्यान करत शांत बसले होते. अलेक्झांडरकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं. 

बराच वेळ वाट बघितल्यावर आपण कोण आहोत हे यांना माहीत नसावे असे वाटून अलेक्झांडर म्हणाला- ‘मी विश्वसम्राट अलेक्झांडर आहे. तुम्हाला भेटायला आलो. तुम्हाला काय हवं ते मागा.’ 

ऋषींनी डोळे उघडून शांतपणे त्याच्याकडे पाहिले, म्हणाले- ‘‘तुच्यामुळे ते ऊन अडून माझ्यावर सावली पडते आहे. शक्य असल्यास बाजूला सरा व ते उन मला परत द्या.’’ 

‘निर्माण’ युवा संघटनेतला एक तरुण नुकताच पिताजींकडे गेला व त्याने त्यांना ‘वैचारिक’ प्रश्न विचारला, ‘पिताजी, तुम्ही गांधीजींना प्रत्यक्ष पाहिलेत. गांधीजींची दुसऱ्या महायुद्धाच्या काळातली ब्रिटिश साम्राज्य विरोधी भूमिका योग्य होती की अयोग्य, तुमचं काय मत आहे?’ 

त्याला क्षणभर वरून खालपर्यंत बघून पिताजी उद्‌गारले- ‘‘हे बघ, गांधीजी तर मेले. मी ही लवकरच मरणार. प्रश्न एवढाच उरतो की आता पुढे तू काय करणार?’’ 

प्रश्न एवढाच उरतो!! 

Tags: गडचिरोली निर्माण भूदान विनोबा अभय बंग जयप्रकाश नारायण गांधी अमरावती जीवनगौरव ठाकूरदास बंग Gadchiroli SEARCH Bhudan Vinoba Abhay Bang Jaiprakash Narayan Mahatma Gandhi Wardha Amravati Thakurdas Band weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. अभय बंग
search.gad@gmail.com

 'सर्च' या संस्थेमार्फत गडचिरोलीतील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा आणि संशोधन (बालमृत्यू नियंत्रणावरील संशोधन). 
 स्वतःच्या हृदयरोगावरील अनुभवकथनाचे माझा साक्षात्कारी हृदयरोग हे पुस्तक प्रसिद्ध आहे. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके