डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मुख्यत : कवी अशी ओळख असलेल्या आनंद विंगकर यांना चळवळींची पार्श्वभूमी आहे आणि गावसमाजाशी त्यांचे नाते घट्ट जोडलेले आहे. ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट’ ही कादंबरी सहा दिवसांची व त्या काळातील घडामोडींची गोष्ट आहे. पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी प्रदेशातील ही कथा आहे. दारिद्य्र आणि निसर्गाची अवकृपा यांच्या कचाट्यात सापडलेल्या समूहाची ही कहाणी आहे. पश्चातापाच्या भावनेने व पराकोटीच्या ताणाच्या अखेरीस यशवंत आणि पार्वती आपल्या तीन मुली मागे ठेवून आत्महत्या करतात, या शोकात्म कथावस्तूला गेल्या दोन-तीन दशकांचा कालावधी पार्श्वभूमी म्हणून आहे. मात्र विनाशकारी दुष्टचक्र आणि शोकात्म संवेदना यांच्या बरोबरीने दुष्टचक्रातही तगून राहणाऱ्या माणसांच्या चिवट व झुंजार जीवनप्रेरणांचा आविष्कारही ही कादंबरी करते.

हजारो वर्षांपासून गावकुसातील उपेक्षित जाती जमातींची, अफाट उघड्या जगात वाऱ्यावर सोडलेल्या भटक्या विमुक्तांची आणि मानवी मूलभूत गरजांना महाग असलेल्या आदिवासींची, आर्थिक आणि सामाजिक स्थिती ‘मानवी’ या संज्ञेला काळीमा फासणारी होती. पहिल्या पंचवार्षिक योजनेनंतरचा माझ्या बालपणाचा काळ हा देशाच्या विकासाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा काळ. आशा, विश्वास आणि भविष्यातील स्वप्नांची परिपूर्ती करणाऱ्या ठोस कारवाईचा तो काळ. दलितांचे उद्धारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार! यातून तळागाळातील समूहात निर्माण झालेला आत्मविश्वास, दारिद्र्य, जातीयता आणि निरक्षरतेला सामोरं जाताना नव्याने स्वीकारलेल्या बौद्धधम्माच्या आत्मभानातून लोकशाही समाजवादाची स्वप्नं पाहात मी अन्‌ माझी पिढी अतिशय बिकट परिस्थितीत शिक्षित झालो आहोत. त्यामुळेच चाळीशीच्या उपरांत आज लिहीत असलेल्या गावाकडील सर्व कवी लेखकांत सामाजिक जाणिवेचा प्रभाव जोरकसपणे दिसतो. ‘सामाजिक उत्तरदायित्वाची जाण’ हे जागतिक साहित्याला डाव्या पुरोगामी लेखक व कार्यकर्त्यांकडून मिळालेलं योगदान आहे, असं मला नम्रपणे नमूद करावंसं वाटतं. 

समाजाच्या एका उपेक्षित आणि अपमानित जगात माझा जन्म झालाय, म्हणून मानव मुक्तीसाठी... स्त्री-पुरुष समानतेसाठी, जीवसृष्टी अन्‌ पृथ्वीच्या संवर्धनासाठी, ज्ञात-अज्ञात संत, लेखक, कवी, कलावंत, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत या सर्वांकडून मी माझ्या अभिव्यक्तीची ऊर्जा मिळवीत आहे. रामायण, महाभारत, बायबल, बुद्ध, त्याचा धम्म आणि जगभरातील श्रेष्ठ लेखकांचं अनुवादित साहित्य, मी जमेल तेवढं वाचलं आहे. या ग्रंथांनी माझी धार्मिक, सांस्कृतिक आणि काल्पनिक जाणीव विकसित झाली. संशोधक वा प्राध्यापक नसल्याने माझ्या वाचनाला शिस्त नाही. संत वाङ्‌मयाचं वाचन नाहीच. गावात मिळेल तेवढंच तुटपुंजं माझं मराठी साहित्याचं वाचन. 

पूर्वासूरीचे पेंडसे, मुक्तिबोध, व्यंकटेश माडगूळकर आणि अण्णाभाऊ साठे, कवितेत केशवसुतांनंतर करंदीकर, कुसुमाग्रज ते नारायण सुर्वे आवर्जून वाचलेत. साठोत्तरीनंतर आजपर्यंतचे लेखक बऱ्यापैकी आत्मियतेनं वाचले. माझ्या व्यक्तिगत आयुष्यात प्रभाव टाकणारी चार-पाच माणसं. एक सतीश काळसेकरांचे माझे कौटुंबिक स्तरावरचे संबंध. त्यांनी, कुमार शिराळकर, दत्ता देसाई, माया पंडितांनी माझ्या राजकीय व सामाजिक जाणीवेला मानवकेंद्री दिशा दिली. दुसरे रंगनाथ पठारे यांनी माझं लिखाण आस्थेने वाचले. कवितेत नामदेव ढसाळ आणि कादंबरीत भालचंद्र नेमाडे यांच्या प्रभावातून मुक्त होता आले नाही. अजून, या दोघांनी माझ्या शब्दांसाठी अवकाश मोकळे करून दिले. माझ्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य मित्रांचा मी कायमसाठी ऋणी आहे. 

याशिवाय मी ज्या भूभागात राहतो, त्या पश्चिम महाराष्ट्रातील एकूण सामाजिक आणि राजकीय परंपरेचे संस्कारसुद्धा माझ्यावर झाले आहेत. शेतकरी मोठ्या संख्येने मराठा समाजात जास्त असला, तरी जमिनी इतरही जनसमूहाकडे आहेत. जसं कुंभारकी, लोहारकी, सुतारकी, म्हारकी, न्हावकी... अर्थात्‌ मराठा समाजाच्या तुलनेत कमी. अल्पभूधारकांत मोडण्याइतकी. त्यामुळे गरीब अन्‌ भूमिहीन शेतकऱ्यांचं दु:ख काय असतं ते माझ्या अनुभवातून मला माहीत आहे. उर्वरित महाराष्ट्र अन्‌ पश्चिम महाराष्ट्रातील जातीयतेचं स्वरूप वेगळं आहे. संत नामदेव, संत तुकाराम ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापर्यंत झालेले आध्यात्मिक लोकशाही व सामाजिक अभिसरणाचे प्रयत्न; त्यानंतर राजश्री शाहू आणि महात्मा फुले यांचा बहुजन चळवळीचा वारसा; या शिवाय बाबासाहेबांच्या जातीअंताच्या लढ्याचा या भागात वाढलेला जनाधार; क्रांतीसिंह नाना पाटलांचं पत्री सरकार या सर्व गोष्टींतून जातीअंतर्गत संवादाची एक परंपरा आहेच. राखीव जागा, मंडल आयोग, स्थानिक स्वराज्यसंस्थांध्ये मर्यादित सहभाग; क्षीण का असेना डाव्या पुरोगामी राजकारणाने सर्वांभूती आस्था या सर्वांतून संवाद निर्माण झाला, तसा तणावसुद्धा. हा एक संक्रमणाचा काळ आहे. पूर्वीसारखी शिवाशिव आता नाही. एकमेकांच्या घरी जाणं, जेवणं, प्रसंगी राहणं यांतून ‘आपसी सांजा’ संस्कृती निर्माण झालेली दिसते. या सर्वांतून माझी समज अधिक विकसित झाली. त्यामुळेच मला एवढ्या आत्मीयतेनं लिहिता आलं. 

मी ज्या काळात वावरतोय तो केवळ शब्दप्रभूंचा काळ नाही; कवी, लेखकाने घरात बसून लिहीत बसण्याचा हा काळ नाही. कोणत्याही निश्चित स्वप्नांशिवायचा, मानवी अस्तित्वाच्या संघर्षाचा हा काळ. येणाऱ्या काळात शेतकरी शोषित, कष्टकरी यांच्याविषयी पोकळ सहानुभूती व्यक्त करून चालणार नाही. आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार. शब्दापाठीमागच्या प्रत्यक्ष कृतीचा हा काळ आहे. गावाचं घोंगडं खांद्यांवर घेण्याची जबाबदारी केवळ दलित, आदिवासी, देशीवादी, लेखक अन्‌ कवींची नसून ती प्रत्येकाची आहे. सुदैवाने जन्मानेच बाबासाहेबांच्या चळवळीचा वारसा मला मिळाला आहे. शिक्षण, वाचन, कौटुंबिक आणि सामाजिक संस्कारांतून मी संवेदनशील झालोय. माझी पहिली अभिव्यक्ती शब्दांद्वारे व्यक्त झाली असली, तरी लोकांत काम करण्याची उर्मी कमी झालेली नाही. 

हे सर्व सांगण्याचा उद्देश एवढाच, लोकांत वावरल्याशिवाय आणि किमान काही कामाशिवाय मला माझ्या लिहिण्याची सामुग्री मिळत नाही. मुंबईत असताना मी सडक नाटकात काम केलं. मोर्चात सामील होऊन गाणी गायलीत, सभा अटेंड केल्यात; गावी चार-पाच वर्षं लोकांत काम केलं; घराघरांत गेलो, त्यामुळेच मला लिहिता आलं. जात, धर्मापलीकडे मानवी संबंध प्रस्थापित करता आले, उगा माझ्या हीन जातीचं तुणतुणं आळवित बसलो नाही. माझं म्हणून सर्वांना स्वीकारलं. त्यामुळेच कष्ट करणाऱ्यांचं दु:ख समजू शकलो मी. 

1995 नंतर आरूढ झालेल्या जागतिकीकरणाचे अनिष्ट परिणाम भारतीय उद्योग, शेती, शिक्षण आणि आरोग्यावर प्रकर्षाने दिसू लागले. बदलते तंत्रज्ञान, अनिर्बंध बाजार, सर्वस्वाहा चंगळवाद यामुळे गरीब-श्रीमंतात कमालीची विषमता आणि पर्यावरणाचा ऱ्हास जगभर दिसू लागला. यांतच बेभरवशी मान्सून, न परवडणारी आणि अनियमीत वीज, शेतीमालाचे असमतोल भाव, मोडीत निघालेली कल्याणकारी योजना, त्यामुळे शिक्षण आणि आरोग्य सर्वसामान्य लोकांसाठी अधिक महाग झालं. सार्वजनिक वितरण व्यवस्थेची सरकारी अनास्था, गॅट व डंकेलमुळे बियाणं, खतं, अन्‌ किटकनाशकाबाबत वाढलेलं परावलंबित्व. या सर्व कारणांधून पंजाब, हरियाना, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशात लक्षावधी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आपल्या महाराष्ट्रात लाखभर लोकांनी जगण्याचा मूलभूत अधिकार नाकारून व्यवस्थेच्या विरोधी मूक निषेध नोंदविला. 

शेतकऱ्याची आत्महत्या या विषयावर मी प्रथम कविता लिहिण्याचा प्रयत्न केला. जवळपास सात-आठ पानं लिहिली सुद्धा होती; पण लवकरच लक्षात आलं, कवितेचा हा विषय नाही. कादंबरीला परिश्रमाची गरज असते, ती मी अनुभवलेली आहे. या विषयाचं माझं चिंतन बऱ्याच दिवसांचं असावं. प्रत्यक्ष कुठल्या कुटुंबीयांना भेटण्यासही गेलो नव्हतो. संघटनेच्या पातळीवर ते ठीक आहे. कराड, विटा प्रवासात एक मुलगी भेटली. वयाच्या मानाने खूपच प्रौढ; अतीव दु:खाने ती अधिक शहाणी आणि समजूतदार वाटत होती. सहज बोलण्यातून समजलं. तिच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. तिथं मला माझ्या कादंबरीची नायिका उषा भेटली. एकदा संपूर्ण अपरिचित खटाव तालुक्यातील एका गावातील मातीच्या दुखवट्यात सामील झालोय. म्हणजे माझी केवळ तिथं जमावातील उपस्थिती. त्या असंख्य नसा असलेल्या दु:खाची केवळ अनुभूती. काही लोकांना मी जवळून पाहिलंय, बोललो नाही. व्यक्तिगत पातळीवर कोणता दिलासा देणार असतो आपण? 

पण ती काळजात कुरूप करणारी ठसठसती वेदना मी अनुभवलीय. त्यामुळेच एवढ्या उत्कटतेनं मला लिहिता आलं. निर्मितीच्या अगोदरचं चिंतन अबोध पातळीचं असावं, माझा तरी तो अनुभव. कित्येकदा समजत नाही की आपण नेमक्या कोणत्या कारणाने अस्वस्थ आहोत. चालताना बोटाला ठेच लागावी, तशी एखादी ओळ सुचते. नंतर वाहणाऱ्या रक्तासारखी ती उलगडत असते; इतकी की, शब्दांत उतरून घेण्याची गती आपणाला पकडता येत नाही. ही गोष्ट लिहिताना तसं झालय. या क्षणी मी एवढंच सांगू इच्छितो कादंबरी लिहिताना मला खरंच खूप त्रास झाला.

Tags: अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट बाबासाहेब आंबेडकर पश्चिम महाराष्ट्र भालचंद्र नेमाडे नामदेव ढसाळ रंगनाथ पठारे सतीश काळसेकर आनंद विंगकर Babasaheb Ambedkar West Maharashtra Bhalchandra Nemade Namdev Dhasal Ragnath Pathare Satish Kalsekar Anand Vingkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके