डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

या देशात 13 कोटी लोक भटके विमुक्त समाजातील आहेत. त्यांना स्थिर करण्यासाठी, मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी संघर्ष, संघटना व रचना या तीनही मार्गांनी काम करणारे महाराष्ट्रातील प्रमुख नाव बाळकृष्ण रेणके. देशातील 18 राज्यांत पसरलेल्या ‘लोकधारा विमुक्त भटके राष्ट्रीय समन्वय’ या संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. केंद्र सरकारने भटक्या विमुक्तांचा सर्वांगीण अभ्यास करण्यासाठी 2006 मध्ये नेलेल्या आयोगाचे अध्यक्षपद त्यांच्याकडे होते. त्या आयोगाच्या 600 पानी अहवालात भटक्या विमुक्तांची कैफियत तर मांडली आहेच, पण त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी उपाययोजना सुचवल्या आहेत. गेली 50 वर्षे ते भटक्या विमुक्तांसाठी लढत आहेत. 

त्यावेळी आमचा मुक्काम गुलबर्गा जिल्ह्यातील तडवळ या गावी होता. तो स्वातंत्र्यप्राप्तीचा काळ. गांधीवादी व आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी गांवातल्या मुलांना गोळा करून जमेल तिथे बाराखड्या व उजळणी शिकवायला सुरुवात केलेली. गावाच्या कडेला असलेल्या चिंचेच्या झाडाखाली शाळा सुरू झाली. मलाही शाळेत नेऊन बसविण्यात आले. मी असेन आठ-नऊ वर्षांचा. लहान मोठे सारे एकत्र एकाच वर्गात. गावातल्या मुली मात्र या शाळेचा भाग नव्हत्या. सुरू झाली म्हणता म्हणता झाडाखालच्या शाळेचे वर्ष संपले. बाराखड्या, जोडशब्द, उजळणी, बेरीज-वजाबाकी इ. मास्तरांना जेवढे येत होते तेवढे त्यांनी शिकविले. शाळा बंद पडली, तसे आमचे शिक्षणही बंद पडले. पुढील शिक्षणासाठी गावात तर दुसरा मार्ग उपलब्ध नव्हता. भिक्षुकीसाठी वडील व चुलत्यांच्या ताफ्याबरोबर माझेही गावोगांव फिरणे सुरू झाले. 

भटकंतीच्या काळात काही देवमाणसे भेटली. माझी शाळा पुन्हा सुरू झाली; पण आईबापांपासून दूर राहून. आठ शाळा, तीन महाविद्यालये व दोन राज्यांतून शिक्षण घेतल्यावर शेवटी धारवाड विद्यापीठाचा पदवीधर झालो. पण ही वाटचाल फार खडतर ठरली. अपमान, अवहेलना, तुच्छता, भूक, आळ इ. संकटांना नेहमीच सामोरे जावे लागले. काही चांगली माणसे, चांगले मित्र मिळाले म्हणून या संकटांवर मला मात करता आली. शिक्षणासाठी असलेल्या शासकीय सोयी-सवलतींचा लाभ मला मिळू शकला नाही. त्यासाठीच्या नियमांची पूर्ती करणे आवाक्याबाहेरचे होते. कष्ट करूनच जगावे व शिकावे लागले. चिंचेच्या झाडाखालच्या माझ्या पहिल्या शाळेतील मुलांपैकी कुणीही पुढे शिकू शकला नाही. त्यांच्यापैकी काहींना घरे-दारे, शेती-बाडी असूनसुद्धा हे घडले. 

या माझ्या वाटचालीत भटक्यांच्या तथा गरीब वंचितांच्या मर्यादा व दु:खे भोगून कळली होती. ज्यांचे गावात घर नाही; रानात शेत नाही; स्थिर व प्रतिष्ठित व्यवसाय नाही; जे घातक व्यसनांचे व अंधश्रद्धांचे बळी आहेत अशांची मुले-मुली कशी शिकणार? जन्मत: भिक्षेकरी किंवा गुन्हेगार असा पूर्वग्रहदूषित धब्बा असलेल्या व भिन्न व्यवसाय, भिन्न भाषा, भिन्न देवदेवता व भिन्न जातपंचायती असलेल्या भटक्याविमुक्त जमातींना शिक्षणाचे महत्त्व कोण पटविणार? शिक्षणाबद्दल त्यांच्यात आवड कशी निर्माण होणार, असे प्रश्न मला सतावू लागले. सर्वांना आणि खास करून अस्थिर भटक्या जमातींच्या मुलांना सहज व सुलभपणे कसे शिकता येईल, कसे जगता येईल हा विचार मला नेहमीच बेचैन करीत राहिला. 

शाळेत जाणाऱ्या येणाऱ्या गणवेषातल्या आठ-दहा वर्षांच्या मुली पाहिल्या की, अक्षरे काढण्यासाठी कोळशाने भिंत काळी केल्याबद्दल आईकडून मार खाणारी माझी बहीण मला आठवायची. इच्छा व समर्थता असूनसुद्धा ती शिकू शकली नाही याची खंत मनात कायम राहिली. पुढे शिक्षण व लोकसंपर्कामुळे माझ्या जाणिवा व्यापक होत गेल्या. काहीजण विकासप्रक्रियेला रेल्वे गाडीची उपमा देतात. गाडी पळत असली तरी मागचा डबा मागेच राहतो असे म्हणतात. पण इथे तर भटक्या जमातींचा डबाच गाडीला जोडलेला नाही असे स्वानुभव सांगतो. अशा भटक्या वियुक्त जमातींचा समुदायच इतरांपेक्षा जास्त दुर्लक्षित व मागास. त्यांच्या महिला दुप्पट मागास. त्यांच्या लाखो मुली केवळ शिक्षणापासूनच नव्हे तर माणुसकीपासूनही वंचित व पीडित राहिल्याची मोठी खंत मनात निर्माण झाली. 

ही बेचैनी व ही खंत घेऊनच 1964 सालात नशीब अजमावयाला मुंबई गाठली. नायगांव मतदारसंघातली निवडणूक आठवते. दलित पँथरने निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. मतदान केंद्रे ओस पडली होती. मुंबई काँग्रेसचे वरिष्ठ व वजनदार नेते श्री.स.का.पाटील त्यांच्या साथीदारांसह घरोघरी जाऊन लोकांना मतदान करण्यासाठी घराबाहेर पडण्याची विनंती करीत फिरताना पाहिले. मतदान केंद्रावरचा शुकशुकाट कमी झाला नाही. काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला. ‘सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे’ या म्हणीची आठवण झाली. भटक्या जमातींचेही असेच संघटन झाले पाहिजे असा विचार मनात तरळून गेला. 

काही दिवसांत न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे मुलाखतीसाठी बोलावणे आले. निवड झाली. 2 ऑगस्ट 1965 पासून सरकारी नोकरी सुरू झाली. जीवनाला स्थिरता आली. एकीकडे भटक्या जमातींच्या वस्त्यांचा व दुसरीकडे शासन यांच्यासाठी काय करीत आहे याचा शोध व अभ्यास सुरू झाला. भटक्या-विमुक्त जमातींसाठी असलेल्या शासकीय कल्याणकारी योजनांच्या अंलबजावणीचा आढावा घेण्यासाठी नेलेल्या सात आमदारांच्या संयुक्त समितीचा अहवाल मिळाला. हा अहवाल विधानसभेस सादर करण्यात आला होता. ‘खर्च मोठा, लाभ मात्र अत्यंत छोटा; आंधळं दळतं, कुत्रं पीठ खातं; कल्याणकारी योजना काचेच्या कपाटातल्या शोभेच्या वस्तू ठरल्या आहेत’ अशा काही शेलक्या वाक्यांनी योजनांच्या अंलबजावणीची समितीने संभावना केलेली दिसली. हे वाचून आणखी बेचैन झालो. अनुभव, अभ्यास व सदरचा अहवाल यांचा आधार घेऊन एक दीर्घ लेख लिहिला. यांच्याकडे होणारे दुर्लक्ष टाळायचे असेल तर एकेका जातीच्या संघटना उपयोगी पडणार नाहीत; तर सर्व भटक्या-विमुक्त जमातींची एकच भक्कम संघटना होण्याची गरज त्यात प्रतिपादली होती. 

तिरीमिरीतच महाराष्ट्र टाईम्समध्ये गेलो. संपादक गोविंदरावांना भेटलो. हस्तलिखित पंधरा-सोळा पानांचा गठ्ठा त्यांच्या हातांत ठेवला. त्यांनी मला खालीवर निरखले. ‘पाहतो, तुम्ही या’ असे म्हणाले. पंधरा-वीस दिवसानंतर दिनांक 10 व 11 नोव्हेंबर 1971 रोजी पूर्वार्ध व उत्तरार्ध अशा दोन भागांत माझा संपूर्ण लेख छापून आला होता. हे माझे पहिले वृत्तपत्र लेखन. सर्वांत महत्त्वाची व माझ्यासाठी प्रोत्साहनपर गोष्ट म्हणजे माझ्या लेखावर गोविंदरावांनी अग्रलेख लिहिला. मी सुचविलेल्या जागृती, संघटन कार्याचे आणखी महत्त्व वाढविले. लेख वाचून भटक्या-विमुक्त जमातीतले कार्यकर्ते, मित्र वाढतील अशी अपेक्षा होती. पण झाले उलटे. इतर समाजातल्या अनेक मान्यवरांचा प्रतिसाद, प्रेम व सहकार्य मिळाले. त्यांच्या आणि इतर सहानुभूतीदारांच्या सहकार्यामुळेच 9 जानेवारी 1972 रोजी मुंबईत कामगार क्रीडा मैदान, एलफिन्स्टन रोड येथे भटक्या- विमुक्तांची राज्यव्यापी पहिली ऐतिहासिक परिषद घेऊ शकलो. 

परिषदेस सुमारे पंचवीस हजार लोक उपस्थित होते. व्यापक संघटनेची मुहूर्तेढ रोवण्यात आली. त्यावेळचे राज्याचे मुख्यमंत्री श्री.वसंतराव नाईक आणि विधान परिषदेचे अध्यक्ष श्री.बाळासाहेब भारदे यांची उपस्थिती पुढील संघटन कार्याची संजीवनी ठरली. भटक्या- विमुक्तांच्या व्यापक संघटनेचा चेंडू मैदानात प्रथम टाकण्याचा मान मला मिळाला. या परिषदेसाठी भटक्यांपैकी कुणाचा एक पैसा खर्च झाला नाही. सारा खर्च भटके विमुक्त नसलेल्या सहानुभूतीदार मित्रांनी केला. आम्ही केवळ राबत राहिलो. सर्वसाधारण समाजातून मिळालेल्या प्रेामुळे, चांगुलपणामुळे आम्हांला हे शक्य झाले. नाहीतर आम्ही नवखे व फाटके काय करू शकलो असतो? 

समाजात विषमता आहे, शोषण आहे. पण सर्वत्र तेच आहे असे नाही. क्रूरतेबरोबर मानवता आहे, तुच्छतेबरोबर प्रेम आहे, वाईटाबरोबर चांगुलपणा आहे. हे सारे मी माझ्या विद्यार्थीदशेपासून अनुभवले आहे. आता तर परिषदेच्या निमित्ताने अनेकांच्या चांगुलपणातून सामाजिक पराक्रमाचे दर्शन झाले. मनातली बेचैनी, चीड व खंत कमी करण्यासाठी जिद्दीने व सचोटीने लढत राहिलो तर समाजातला चांगुलपणा जरूर साथ देईल असा आत्मविश्वास अनुभवांतून मिळाला. याच मैत्रीभाव व आत्मविश्वासातून प्रेरणा घेतली. 1973 मध्ये नवतारुण्यात सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. संघटनेसाठी स्वयंप्रेरणेने पूर्ण वेळ काम करू लागलो. अर्थात नोकरदार पत्नीने कुटुंबाची जबाबदारी स्वीकारून मला संमती दिल्याने हे शक्य झाले. 

1972 ते 1975 या काळात संघटना वाढली, फोफावली. सामाजिक, राजकीय स्तरावर भटके-विमुक्त चर्चेचा विषय झाला. दौलतराव भोसल्यांच्या रूपाने भटक्या-विमुक्तांना विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळाले. प्रमुख राजकीय पक्षांतर्गत भटक्या-विमुक्तांसाठी वेगळे विभाग सुरू झाले. तालुका, जिल्हा पातळीवरसुद्धा संघटना सुरू झाल्या. लोकांच्या आवाजाचा प्रभाव सरकारवर पडला. भटक्या-विमुक्त जमातींचे वेगळे वर्गीकरण, वेगळ्या राखीव जागा, स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ, स्वतंत्र संचालनालय, मंत्रालयात स्वतंत्र विभाग निर्माण होणे ही राज्य सरकारच्या पातळीवरील धोरणात्मक उपलब्धी आहे. शिक्षण संदर्भातल्या लोकमागणीचा रेटा वाढल्यामुळे आश्रमशाळेच्या योजनेचे विस्तारीकरण होऊन केवळ भटक्या-विमुक्तांसाठी आज राज्यात 600 च्या वर आश्रमशाळा सुरू आहेत. भटक्या-विमुक्तांसाठी असे स्वतंत्र वेगळे धोरण स्वीकारणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे.

Tags: वसंतराव नाईक महाराष्ट्र टाईम्स मुंबई लोकधारा विमुक्त भटके राष्ट्रीय समन्वय बाळकृष्ण रेणके Vasantao Naik Maharashtra Times Mumbai Lokdhara Vimukt Bhatake Rashtriy Samnvay Balkrishna Renake weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके