डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

गंगा नदीच्या तीरावर आणि ग्रँटा नदीच्या काठावर म्हणजे बनारस हिंदू विश्वविद्यालय आणि केंब्रिज युनिव्हर्सिटी या दोन ठिकाणी तारुण्यातील जडणघडण व शिक्षण झालेल्या जयंत नारळीकर यांनी फ्रेड हॉएल यांच्यासोबत विश्वरचना शास्त्रातील सिद्धांत मांडला. वयाच्या पस्तिशीनंतर भारतात आल्यावर त्यांनी टीआयएफआर (मुंबई) आणि आयुका (पुणे) या दोन ठिकाणी खगोलशास्त्र व खगोलभौतिकी या विज्ञानशाखांत संशोधन व अध्यापन केले, पण त्याचबरोबर व्याख्याने व लेखन या माध्यमांतून त्यांनी केलेले विज्ञानप्रसाराचे कार्य लक्षणीय आहे. ‘विज्ञान व वैज्ञानिक’, ‘आकाशासी जडले नाते’ इत्यादी पुस्तकांद्वारे त्यांनी सर्वसामान्य वाचक व विद्यार्थी यांच्या मनात विज्ञानाची गोडी निर्माण केली आणि विज्ञानकथा व विज्ञानकादंबऱ्या लिहून मराठीतील विज्ञान साहित्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. ‘यक्षांची देणगी’, ‘अंतराळातील भस्मासुर’, ‘टाइम मशीनची किमया’, ‘सूर्याचा प्रकोप’ हे चार विज्ञानकथा संग्रह आणि ‘प्रेषित’, ‘व्हायरस’, ‘अभयारण्य’, ‘अंतराळातील स्फोट’, ‘वामन परत न आला’ या पाच विज्ञान कादंबऱ्या लिहून नारळीकरांनी मराठीतील विज्ञानसाहित्याचे दालन समृद्ध केले. 

मी आजवर कामासाठी आणि त्या निमित्ताने स्थलदर्शनासाठी सुारे 50 देशांत भ्रमंती केली. नव्या ठिकाणी आपण ठराविक मुदतीसाठी जातो, तेव्हा आपल्या डोळ्यांपुढे अनेक उद्दिष्टे असतात. अमुक अमुक कामे उरकायची, तमुक प्रेक्षणीय स्थळे पाहायची; यादीवरच्या लोकांना भेटायचे, वगैरे वगैरे. प्रथम-प्रथम वाटते, आपण ज्या मुदतीसाठी येथे आलोय ती मुदत या सर्व उद्दिष्टांसाठी भरपूर आहे. त्यामुळे सावकाश आपण ती उद्दिष्टे ‘उरकायला’ सुरुवात करतो. पण दिवसाांगून दिवस जातात, कसे जातात ते कळत नाही. आणि मग जाणवायला लागते की मुदत संपत आली! सुरुवातीला ठरलेली सर्व उद्दिष्टे पूर्ण होणार नाहीत. मग आपण म्हणतो ‘ह्या गोष्टी आपण पुढच्या भेटीत उरकू.’ 

आयुष्याचे काहीसे असेच असते. सुरुवातीच्या ऐन उमेदीच्या काळात आपण अमुक करणार, तमुक मिळवणार असे मोठे मनसुबे रचतो. निवडलेल्या कामात किती यश मिळवायचे याच्या महत्त्वाकांक्षा असतात. पुढे जाऊन 40- 50-60 वर्षांचे उर्वरित आयुष्य आहे, त्यात हा ‘अजेंडा’ आपण पूर्ण करू, असा आत्मविश्वास असतो. त्यांतील काही गोष्टी साध्य होतातही. पण निवृत्तीकाळ आल्यावर जाणीव होते, की मुदत संपत आली. फरक इतकाच की इथे ‘पुढल्या भेटी’ची शक्यता नसते. हे मनोगत लिहीत असताना मी त्या स्थितीला येऊन पोचलो आहे. अशा वेळी मागे वळून पहावेसे वाटते की, आपले आजवरचे आयुष्य सफल व समाधानकारक मानायचे का? आपण ते वेगळेपणाने जगलो असतो, तर अधिक यश मिळाले असते का? 

आयुष्य पुन्हा पहिल्यापासून जगायला मिळाले, तर काही वेगळा मार्ग निवडाल का, हा प्रश्न पुष्कळांना विचारला जातो. माझ्या बाबतीत याचे ठाम उत्तर ‘नाही’ असे आहे. वैज्ञानिक संशोधन क्षेत्रात आणि जनसामान्यां- साठी विज्ञान प्रसार या दोनही बाबतीत मला कृतीचे समाधान लाभले आहे. वैज्ञानिक संशोधक म्हणून मी केंब्रिज, मुंबई आणि पुणे येथे प्रख्यात संस्थांत काम केले. पण मला सतत याची जाणीव होती की संशोधन हा माझा छंद आहे, माझ्या आवडीचा विषय आहे. छंद जोपासण्यातच आपल्याला उदरनिर्वाहाचे साधन मिळावे, याहून अधिक सुखदायी काय असू शकेल? 

माझे गुरू फ्रेड हॉएल यांच्याप्रमाणे मी संशोधनाचा निवडलेला मार्ग काटेरी आहे, प्रस्थापित कल्पनांना आव्हान देत-देत तो पुढे जातो. प्रस्थापित कल्पनांचा पुरस्कार करणारे संशोधन मी हाती घेतले असते, तर हा मार्ग नक्कीच सोपा, आखीव व कमी विघ्नांचा झाला असता. माझ्या संशोधनाचे मूल्यमापन होऊन मला अनेक पुरस्कार मिळाले, आयएयू कमिशनच्या सभापतीपदाचा मान मिळाला, पण काही काही मानसन्मान हुलकावणी देऊन गेले, ज्यांच्यासाठी प्रस्थापित संशोधनाचाच शिक्का असावा लागतो. परंतु याबद्दल मला यत्किंचितही खंत नाही. केवळ ‘महाजनो येन गत: स पंथा:’ असे म्हणत प्रस्थापित कल्पनांचा पुरस्कार करणाऱ्या हजारांपैकी एक होण्याचे आकर्षण मला पूर्वी नव्हते, आजही नाही. माझे पीएच.डी.चे विद्यार्थी पदवीपूर्वीच्या संशोधनात प्रस्थापित नसलेल्या विषयावर काम करत, पण पुढील संशोधनासाठी त्यांनी प्रस्थापित मार्गच निवडला. त्या वेळी मी त्यांना कसलाही विरोध केला नाही; पण निदान एकाने तरी नवा मार्ग निवडायला हवा होता, असे आज वाटते. 

मी निवडलेला विश्वरचनाशास्त्राचा विषय असा आहे, जिथे विज्ञानाच्या वस्तुनिष्ठतेच्या भिंती ओलांडून स्वत:ची मते त्यात घालण्याचा मोह वैज्ञानिकाला सुटत नाही. ही मते वस्तुस्थिती, वास्तविकता, पुरावे आदींपेक्षा संस्कृतिजन्य असतात. उदाहरणार्थ, विश्वाची उत्पत्ती एका विशिष्ट वेळी झाली असे सांगणारे मध्यपूर्वेत जन्मलेले तीनही धर्म बहुतांश वैज्ञानिकांच्या मानसिकतेवर खोलवर परिणाम टाकून आहेत, त्यांतील काही वैज्ञानिकांनी स्वत: निधर्मी असल्याचा दावा केला असला तरी! त्यामुळे हॉएल आणि मी दोघांनी पुरस्कार केलेल्या ‘अनादि’ विश्वाच्या कल्पनेला विरोध होतो. पण प्रत्यक्षात प्रस्थापित सिद्धान्ताच्या विरोधात असलेले पुरावे दुर्लक्षिले तरी जातात किंवा त्यांची कारणमीमांसा करायला त्या सिद्धांताला नव्या गृहीतकाचे ठिगळ लावले जाते. 

या संदर्भात 2000 हून जास्त वर्षांपूर्वीचा एक किस्सा आजच्या परिस्थितीला चपखल लागू होतो. पायथॅगोरसच्या अनुयायांच्या मते, पृथ्वी सूर्याभोवती फिरत नसून एका केंद्रीय अग्नीभोवती फिरते. अशा मताला विरोध करणाऱ्यांनी विचारले, ‘‘तो केंद्रीय अग्नी आपल्याला दिसत का नाही?’’ यावर पायथॅगोरस उत्तरले, ‘‘कारण पृथ्वी आणि अग्नीच्या दरम्यान एक ‘प्रतिपृथ्वी’ देखील त्या अग्नीभोवती फिरते. ही प्रतिपृथ्वी मधे आल्याने आपल्याला अग्नी दिसत नाही.’’ त्यावर विरोधकांनी प्रश्न केला, ‘‘मग ही प्रतिपृथ्वी का दिसत नाही?’’ यावर त्यांना उत्तर मिळाले, ‘‘कारण आपल्या पृथ्वीवर ग्रीस देश तिच्या उलट बाजूला आहे.’’ थोडक्यात, प्रत्यक्ष पुराव्यापासून आपला सिद्धान्त वाचवण्यासाठी नव्या गृहीतकांची कसरत करावी लागली. 

आज हा किस्सा वाचून त्या वेळची परिस्थिती किती हास्यास्पद होती असे आपण म्हणू. पण दुर्दैवाने आजच्या प्रस्थापित महास्फोटनिर्मित विश्वाच्या सिद्धान्ताला टिकवून धरण्यासाठी प्रतिपृथ्वी सदृश्य सहा-सात गृहीतके स्वीकारावी लागतात, ज्यांना कसलाही प्रत्यक्ष पुरावा उपलब्ध नाही. मग हे अवडंबर का टिकून आहे? याचे एक महत्त्वाचे कारण आहे, (धार्मिक संस्कृतीचा आधीचा मुद्दा वगळता) संशोधनाला उपलब्ध मुबलक पैसा. पैशापाठोपाठ संशोधनाच्या सुखसोयी, आणि त्यांच्याशी जोडलेला अधिकार. हे टिकवून धरायला तुचे सिद्धान्त बरोबर आहेत, हे पैसा पुरवणाऱ्यांना (बहुतांशी सरकारी समित्यांना) पटले पाहिजे. या ‘मोहा’पायी, आहे तो सिद्धान्त टिकवण्याचे प्रयत्न असतात. 

त्यामुळे आता माझे मत होत चालले आहे, की विश्वरचनाशास्त्र हा विषय आज वैज्ञानिक राहिलेला नसून त्यात अवैज्ञानिक अटकळबाजी वाढत चालली आहे. 1960 मध्ये मी या विषयात शिरलो, कारण तेव्हा त्यातील वैज्ञानिक आव्हाने मला आकर्षक वाटली होती. आजची अवैज्ञानिक अटकळबाजी पाहून, असे वाटते की, मी आज संशोधनाच्या उंबरठ्यावरील तरुण शास्त्रज्ञ असतो तर या विषयात शिरलो नसतो. एका विषयात दीर्घकाल संशोधनाचा आनंद घेतल्यावर असे मत व्यक्त करणे हा विरोधाभास नसून, गेल्या 10-15 वर्षांत बदललेल्या परिस्थितीचे सूचन आहे. 

विज्ञान-तंत्रज्ञानाचा मानवी जीवनावर वाढता प्रभाव पाहता समाज आणि विज्ञान यांच्यातली दरी कमी करायची गरज आहे. म्हणून विविध माध्यमांतून समाजाला विज्ञानाभिमुख करणे आवश्यक आहे. त्यासाठी पत्रकार, लेखक, शिक्षक, सिने- दिग्दर्शक आदींच्याबरोबर वैज्ञानिकांनी पुढे सरसावले पाहिजे. ‘आम्ही विज्ञान निर्मिती करू..., विज्ञानप्रसार इतरांनी करावा’ असे म्हणत हात झटकून बाजूला व्हायची ही वेळ नव्हे. कारण ज्या जनताजनार्दनाने भरलेल्या करातून वैज्ञानिकांना संशोधनासाठी पाठबळ मिळते, त्याचे ते देणे लागत नाहीत काय? मला वाटते, स्वयंसेवी विज्ञानप्रसारक संस्थांच्या खांद्याला खांदा लावून राष्ट्रीय वैज्ञानिक संस्थांनी या क्षेत्रात उतरण्याची गरज आहे. अशा कार्यातूनच शास्त्रज्ञांच्या मूल्यमापनात भर पडेल आणि हे जर अधिकृतरित्या मान्य झाले, तर अधिक संख्येने शास्त्रज्ञ या क्षेत्रात उतरतील. 

विज्ञान तंत्रज्ञानाची घोडदौड चालू आहे, पण त्याचबरोबर अंधश्रद्धाही फोफावत आहेत. फलज्योतिष, वास्तुशास्त्र, बुवाबाजीसारख्या गोष्टींमागे धावणारे लोक केवळ अशिक्षित खेडूत नसून, शहरातले व शिकले सवरलेले संपन्न नागरिकही आहेत. असे का व्हावे? याचे कारण, जीवनाची क्लिष्टता वाढली आहे, अनेक महत्त्वाच्या निर्णयाची संख्या वाढते आहे... अशा परिस्थितीत मानसिकता दुबळी होते आणि स्वत: निर्णय घ्यायची जबाबदारी टाळून अंधश्रद्धेवर विसंबण्याची प्रवृत्ती निर्माण होते. अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी विज्ञानप्रसाराबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणेही महत्त्वाचे आहे. 

शेवटची पण कमी महत्त्वाची नाही, अशी एक बाब! मी फ्रेड हॉएल यांचे उदाहरण डोळ्यांपुढे ठेवून विज्ञानकथा/ कादंबऱ्या लिहिण्याच्या फंदात पडलो. याचे कारण विज्ञान जनसामान्यांपर्यंत पोचवण्याचे ते एक उत्कृष्ट साधन आहे. मराठी साहित्यात उत्कृष्टतेचा शिक्का असलेले असे वाङ्‌मय थोडेच आहे. पण विज्ञान आणि समाज यांच्या परस्पर संबंधांना कथा माध्यमातून व्यक्त करणे ही काळाची गरज आहे. मराठी साहित्याचे हे नवे दालन अधिक समृद्ध व्हावे, ही अपेक्षा व्यक्त करून हे मनोगत संपवतो. 

Tags: संशोधन विज्ञान-तंत्रज्ञान केंब्रिज युनिव्हर्सिटी पायथागोरस विश्वरचनाशास्त्र फ्रेड हॉएल जयंत नारळीकर Research Science and technology Cambridge University Pythagoras Fred Hoyle Jayant Narlikar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

जयंत नारळीकर
jvn@iucaa.ernet.in

भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके