डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

1975 नंतरच्या काळात समाज ज्या सांस्कृतिक संक्रमणातून जात होता, त्या समाजाचे निरीक्षण अनेक लेखकांच्या लेखनाचा विषय झाले. मग त्यात पुरुषसत्ताक व्यवस्थेतील स्त्रीची परवड जशी आली तसेच गिरणी कामगारांचे प्रश्न आले, खेड्यांची वाताहत आली; शहरांकडे मोठ्या आशेने वळलेले ग्रामीण तरुण आले; त्यांचे भ्रनिरास आले; महानगरातल्या झोपडपट्‌ट्या आल्या; वेश्यावस्ती आली; गुंडांचा मोकाट वावर आला; सत्ताकारण आले; अर्थकारण आले, भ्रष्टाचार आला. संस्कृतीचा सगळा चेहरामोहराच बदलून गेला. ह्या बदललेल्या संस्कृतीचे माणसाला उद्‌ध्वस्त करणारे चित्र जयंत पवारांच्या ‘काय डेंजर वारा सुटलाय’ ह्या नाटकात पाहायला मिळते.  

हतबलता ही लेखनाची प्रेरणा होऊ शकते का? मला माहीत नाही. पण ही हतबलतेची जाणीव इतकी वाढत गेली की स्वतःशीच बंड केल्याप्रमाणे ती झटकून टाकण्यासाठी कधीतरी मी लिहायला बसलो. 

ते हे नाटक. ‘काय डेंजर वारा सुटलाय!’ 

‘अधांतर’ हे माझं नाटक मी सात वर्षं लिहीत होतो. परत परत खर्डे करत होतो. ‘डेंजर वारा’चंही जवळपास तेच झालं. पहिली दोन वर्षं आणि नंतर एक गॅप येऊन गेल्यानंतर पुन्हा सहा वर्षं, अशी आठ वर्षं हे नाटक मी पुनः पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीनं लिहीत होतो. तरीही दरवेळी काहीतरी राहून जात होतं; काही निसटत होतं; चिमटीत आलेलं इतकं पसरत होतं की ते आटोक्यात कसं आणायचं या कल्पनेने आणि त्यासाठी केलेल्या प्रयत्नांत दमछाक व्हायची. दमछाक व्हायची; कारण समोर मोठा गुंता पडलेला असायचा वास्तवाचा. 

या गुंत्यातून आपल्याला हव्या त्या आशय-विषयाचा तलम धागा निवडून त्याची तरल मांडणी करणं हेही एक कौशल्यच आहे. पण का कोण जाणे, मी सहसा तसं केलेलं नाही. मला ते स्वार्थीपणाचं वाटत आलंय. माझ्यातल्या लेखकाच्या जपणुकीसाठी केलेला स्वार्थीपणा. मला तो सगळा गुंताच महत्त्वाचा वाटतो. समग्र वास्तव समजून घेणं गरजेचं वाटतं. ते पेलवणार नाही, हे तर पहिल्यापासून जाणवत असतं, पण माझी स्वतःपासून सुटका नसते. ते उरावर घेतल्याशिवाय मला चैन पडणार नसतं. लेखक म्हणून माझा खूप काळ अंधारात चाचपडण्यात, धडपडण्यात, ठेचकाळण्यात जातो. या सर्व काळात वास्तवाचे पदर इतके पसरत जातात की आपल्याला काहीच कळत नाही, हेच अधिकाधिक कळत जातं. पण गोष्टी स्वतःपुरत्या सोप्या करण्यापेक्षा त्या स्वतःसाठी जास्तीत जास्त अवघड करून ठेवणं, हीच जर माझी खोड असेल तर त्यातून माझं लेखन तरी सुटणार कसं? ‘काय डेंजर वारा सुटलाय’ही ह्या त्रासातून सुटलं नाही. 

1995 च्या थोडा आधीचा काळ आहे. गिरणी संपानंतर सुरू झालेल्या गिरण्या पुन्हा बंद पडल्या होत्या आणि कामगारांची थकित देणी देण्यासाठी गिरणीमालक आपल्या ताब्यातल्या गिरण्यांच्या जमिनींचा अधिकाधिक हिस्सा विकण्याची परवानगी सरकारकडे मागत होते. सरकारनेही मुंबईच्या शहर विकासनियंत्रण नियमावलीत (डीसी रूल) साळसूदपणे बदल करून व्यावसायिक कारणासाठी एकूण जमिनीचा एक तृतीयांश भाग विकायला गिरणीमालकांना परवानगी देताना त्यात निवासी संकुलं उभी करण्याची परवानगी गुपचूप देऊन टाकली. तीच वेळ होती मुंबई महानगरीत रिअल इस्टेटचा धंदा तेजीत येण्याची. जागांना सोन्याचे भाव येण्याची. हा तोच काळ आहे, जेव्हा राज्यात सत्ताबदल होऊन एक राजकारणी केवळ बिल्डर लॉबी, उद्योजक आणि उद्योगपती यांच्या दबावामुळे राज्याचा मुख्यमंत्री झाला. शिक्षकी पेशापासून सुरुवात करून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोचलेल्या या माणसाच्या सत्ताकाळात त्याच्याच मतदार संघातल्या अनेक शाळा बंद पडून त्या जागांवर कमर्शियल कॉम्प्लेक्स उभे राहिले. 

त्याच काळात मुंबईतल्या मध्यवस्तीत एका पापभीरू मध्यमवर्गीय इसमाचा फ्लॅट बळकावण्याच्या प्रयत्नात त्या इसमाचा संशयास्पद मृत्यू झाला आणि तो खून असल्याचा आरोप होऊन त्या प्रकरणात एका युवा नेत्याचं नाव गोवलं गेलं. त्याच काळात मी ‘लोकसत्ता’ या दैनिकात नोकरी करत होतो. एक दिवस दैनिकाच्या कार्यालयात आमचा मुख्य वार्ताहर दुसऱ्या वार्ताहराला सांगताना मी ऐकत होतो की, कुलाबा-कफ परेड भागात लोकांच्या जागा बळकावल्या जातात. पोलिसच हे फ्लॅट खाली करून देण्याची सुपारी घेतात. त्यासाठी त्यांचा रेट आहे पाच लाख रुपये. मुंबईत लोकांच्या जागा बळकावण्याचे प्रकार पूर्वापार होत होते; पण आता हे लोण वाढत मध्यमवर्गीय निरुपद्रवी लोकांच्या उंबरठ्यापर्यंत आलं होतं. आणि, आयुष्यात आपल्याला राहायला किमान एक साधी जागा मिळावी आणि ती टिकावी यासाठी जिवाचं रान करणारी माणसं तर मी खुद्द माझ्याच आयुष्यात पाहिली होती. त्यांच्या यातनांचा आणि तडफडाटांचा मी असहाय साक्षीदार होतो. 

ह्या सगळ्यांतली अस्वस्थता अंगावर घेऊन मी एकांकिका लिहिली. तिने काही काळ मला समाधान दिलं; पण लवकरच मला वाटू लागलं, हे फार फार तोकडं आहे. कारण ही केवळ घुसखोरांची आणि बेघर झालेल्या एका माणसाची गोष्ट नाही; ही या शहराचीही गोष्ट आहे. माझ्या एका मित्राच्या आग्रहावरून आणि स्पर्धेच्या गरजेसाठी मी एकांकिकेचं नाटक लिहिलं, तेव्हा त्यात बेघर होणाऱ्या नायकाच्या गोष्टीबरोबर एक कवीही होता. या शहराच्या वळचणीला बसून महाशब्द लिहिण्याचा प्रयत्न करणारा हा कवी रस्त्यावर फेकला जातो आणि तिथेच बसून तो शहराचं शोकगीत लिहू लागतो. हे उतरवताना मनोहर ओकच्या ‘मुंबई मुंबई मी तुझ्यातून फाटक्या भणंगासारखा निघून जाईन’ ह्या ओळी ड्रबीटस्‌ सारख्या कानावर आदळत होत्या. ‘मुंबई तू हरवून बसलीस स्वतःची सिंफनी।किती लपवून ठेवशील आंतर्वाद्य। मला शेवटच्या बीभत्साची गाणी गायचीयेत’ या नामदेव ढसाळने मांडलेल्या आकांतातला पीळ मला जाणवू लागला. शाहीर अमर शेखांच्या ‘सुटला वादळी वारा।वल्हव जोानं जरा।चल गाठू किनारा’ या जोषपूर्ण गीतातल्या वादळी वाऱ्याचा विपरित अर्थ मला दिसू लागला. शाहिरांना अभिप्रेत असलेला ‘क्रांतीचा वारा’ आज ‘भयाचा वारा’ होऊन वाहत होता, जो मला एका तार्किक संगतीने अरुण कोल्हटकरांच्या ‘डेंजर वाऱ्या’पाशी घेऊन आला. 

ही झाली नाटकाची पहिली फेज. मध्ये तीन वर्षांची गॅप पडली. संहितेत एका ओळीची मी भर टाकली नाही; पण डोक्यात विषय धुसत होता. मी खूप आवांतर वाचत होतो. भटकलोही. दुष्काळी प्रदेशातली स्थिती, तिथून शहरात स्थलांतर करणारी माणसं, शहरात येणारे परप्रांतातले मजूर, नाका कामगार, त्यांचं शोषण, दमन, परप्रांतांतून आलेल्यांचा स्ट्रगल हे बघताना वाचताना नाटकाचा नायक दाभाडे याच्या कथानकाबरोबर बबन येलमाये ह्या मराठवाडा-नगरकडच्या दुष्काळी भागातून मुंबईत जगण्यासाठी आलेल्या तरुणाचं उपकथानक आकार घेऊ लागलं. ह्याच आडनावाचा माणूस मला शिर्डीपासून आत 40 किमीवर असलेल्या एका दुष्काळी गावात भेटला होता. या मुख्य आणि उपकथानकाच्या दरम्यान जी माणसं नाटकात आली, त्या प्रत्येकाचीच एक गोष्ट उभी राहिली. ही सगळीच माणसं विस्थापित आहेत वा विस्थापित होण्याच्या प्रक्रियेत आहेत; मग ती दाभाडेंची मुलं असतील वा बायको असेल, त्यांच्या घरात घुसलेले गुंड असतील वा इमारतीतले अन्य लोक वा बबन येलमायेच्या आयुष्यात येणारी माणसं. यांना कोण आपल्या जागेवरून हुसकावतंय? नाटकात असा कोणताही एक चेहरा समोर येत नाही. हे जे सर्व विस्थापन चाललंय त्यामागे कुठली तरी एक अक्राळ-विक्राळ अदृश्य शक्ती आहे. तिला अनेक जबडे आहेत आणि असंख्य हात आहेत. आपला शत्रू कोण हे माणसांना ओळखता येत नाही आणि त्याचा चेहरा लेखक म्हणून मला दाखवता येत नाही. 

आणि अचानक साक्षात्काराप्रमाणे एक सत्य मला गवसलं, या विक्राळ व्यवस्थेत दाभाडेसारख्या निरुपद्रवी माणसांनी नष्ट होणं हेच त्यांचं भागधेय आहे. माणूस हा मुळातच घुसखोर आहे. सगळा मानवी इतिहास घुसखोरीचा आहे आणि घुसखोरी करतच त्याने आपली इथवरची प्रगती केली आहे. लिओ टॉलस्टॉय म्हणतो, ‘प्रगतीवर माणसाचा आंधळा विश्वास आहे. समग्र जीवनाचं आकलन त्याला करता येत नाही आणि ही उणीव तो प्रगतीच्या मागे लागून भरून काढतो.’ ह्या प्रगतीच्या पायाखाली दडलेल्या क्रौर्यात किती दाभाडे चिरडले गेले असतील आणि कितीतरी दाभाडे यापुढेही चिरडले जातील. 

मला माझं स्टेटमेंट सापडलं होतं. अतिशय दमछाक करणाऱ्या ह्या प्रदेशातून वणवण करत एका मुक्कामापाशी येऊन मी पोचलो होतो. या प्रवासात मी नाटकातल्या माणसांच्या वाट्याला आलेले सर्व त्रास भोगले. त्यांची भीती अनुभवली. प्रत्यक्षात अनेकांच्या आयुष्यात येणाऱ्या, येऊ शकणाऱ्या अशा अनुभवांना तोंड देण्याचं बळ व्यक्ती म्हणून माझ्यात नाही. कदाचित अशा अनुभवात मीही नष्ट होईन. माझ्यासारखा कुणीही नष्ट होईल. दाभाडेच्या जागी तुम्ही, मी, आपण कुणीही असू शकतो ही जाणीव निर्माण करणं एवढंच लेखक म्हणून माझ्या हातांत होतं. एक हतबलता लेखनकृतीत उतरली ती अशी. 

Tags: मराठवाडा अरुण कोल्हटकर नाटक मुंबई अधांतर काय डेंजर वारा सुटलाय जयंत पवार marathwada arun kolhatkar drama play Mumbai Kaay danger vara sutlay Jayant Pawar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके