डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

प्रस्थापितांविरोधी कायम आवाज हा या पुस्तकाचा गाभा

समाजकारण, राजकारण करणारी एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या 80 वर्षांच्या कालखंड, त्यातील माणसे, परिसर, शहर, देश- विदेश, आणि या सगळ्यांध्ये झालेली स्थित्यंतरे, समाजातील वेगवेगळे प्रश्न, त्यावर आपल्या पद्धतीने उत्तर शोधताना आलेल्या अडचणी आणि त्याबद्दलचा समाजाचा दृष्टिकोन यावर भाष्य करून समाजाला पुस्तकरूपाने आवाहन करते तेव्हा त्या लिखाणाला वास्तवाचा प्रत्यय आणि अनुभवाचे वजन प्राप्त होते. लीलाताई आवटेलिखित ‘जाग, मना जाग’ या पुस्तकातून हीच प्रचिती येते.    

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच वस्त्रे यत्न करू। 
शब्दचि अमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोकर।। 
तुका म्हणे पहा शब्दचि हा देव, शब्देचि गौरव पूजा करू।। 
- संत तुकाराम 

तुकारामांचा हा अभंग शब्दशः जगणाऱ्या लीलाताई आवटे या प्रचंड उत्साह आणि अखंड उर्जा यांचा स्त्रोत आहेत आणि त्यांच घर म्हणजे वेगवेगळ्या विषयांवरच्या पुस्तकांचे भांडार आहे. ललित साहित्य, ग्रंथ, सामाजिक संस्थांची मासिक, अनुवादित साहित्य, आणि सामाजिक व राजकीय विषयांवरील मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील नवनवीन पुस्तके वाचण्याचा त्यांचा सपाटा कोणत्याही पुस्तकप्रेीला लाजवेल असाच आहे. आपली शिक्षिकेची नोकरी व त्यातून निवृत्त झाल्यानंतर महिला फेडरेशनचे कार्य आणि ‘महिला आंदोलन पत्रिका’ या मासिकाच्या संपादकपदाची जबाबदारी व त्या अनुषंगाने लागणारे नियोजन तसेच लेखन करीत असताना पुस्तके लिहिण्याची, वाचण्याची, दुसऱ्या भाषांतील पुस्तके अनुवादित करण्याची त्यांची passion कधीच कमी झाली नाही. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतारांच्या मार्गावर वाचन आणि लेखन या दोन गोष्टींनी सतत त्यांना साथ दिली. 

लहानपणापासून निर्भिड आणि स्पष्टवक्ता स्वभाव असलेल्या लीलाताई सामाजिक विषमता व अन्यायाच्या विरुद्ध होत्या. अशावेळी त्यांच्या संस्कारक्षम वयामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात मार्क्स व लेनिन यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला नसता तरच नवल. त्याच ध्येयवादाने प्रेरित होऊन स्वातंत्र्यानंतर त्यानी शिक्षकी पेशा पत्करला. स्वातंत्र्य- प्राप्तीनंतर झालेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांनी तुरुंगवासही भोगला. विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणे, त्यांच्यामध्ये अन्यायाविरुद्ध लढण्याची आच निर्माण करणे हे त्यांनी स्वतःचे वैयक्तिक कर्तव्य असल्याप्रमाणे कायम मनाशी जोपासले. त्यांच्या या प्रवासाचा पगडा त्यांच्या लिखाणात प्रकर्षाने दिसतो. आपल्या साहित्यिक आयुष्याच्या सुरुवातीला ‘मी एकटा एकटा’ ही संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या पार्श्वभूमीवरची भावुक कादंबरी लिहिणाऱ्या लीलाताई पुढे अधिकाधिक सामाजिक विषयांकडे खेचल्या गेल्या. 

विद्यार्थ्यांना इतिहासातील थोर व्यक्तींची ओळख व्हावी व त्यातून त्यांना जगण्याचे धडे मिळावेत या उद्देशाने त्यांनी चरित्रमाला लिहिली; ज्यामध्ये लालबहादूर शास्त्री, सी.व्ही.रामन, समाजसुधारक महर्षी अण्णा कर्वे, कॉम्रेड डांगे, अब्राहम लिंकन, मादाम कामा, कॉम्रेड हो चि मिन्ह, कॉम्रेड एस.जी.पाटकर यांचा समावेश आहे. इतिहास व त्यातून शिकता येण्यासारख्या बाबी हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे त्यांनी ‘रशियन समाजवादी क्रांतीचा इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य संग्राम’ (1857 ते 1950), ‘शिवसेनेचा इतिहास: शोध आणि बोध’, ‘महात्मा गांधींचा खून कोणी केला व का?’, ‘राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्यात आणि राष्ट्रउभारणीत पारसी समाजाचे योगदान’ ही पुस्तके लिहिली. यातील भारतीय स्वातंत्र्यसंग्राम या पुस्तकाला 1986 सालचे सोव्हिएत लंडन नेहरू अवार्डचे तिसरे पारितोषिक मिळाले. 

‘एकविसाव्या शतकातील स्त्रियांच्या समस्या’ हे लीलातार्इंचे पुस्तक वाचकांनी उचलून धरले. लीलातार्इंनी काही निवडक इंग्रजी व हिंदी पुस्तकांचा मराठी वाचकांसाठी अनुवाद केला. यातील महत्त्वाची म्हणजे ‘माय फ्युदल लॉर्ड’ (तेहमिना दुराई), ‘इंडिया : टुडे अण्ड टुमारो’ (भारत आजचा आणि उद्याचा) (रजनी पाम दत्त), ‘पेरेस्त्रोईका’ (मिखाईल गोर्बाचेव) आणि ‘1946 चे नाविक आंदोलन’ (चटर्जी). यांव्यतिरिक्त त्यांचा त्यांच्या इतर तीन मैत्रिणींबरोबर लिहिलेला एक कथासंग्रह (चौफुला) हादेखील प्रसिद्ध झाला आहे. या सर्व पुस्तकांव्यतिरिक्त त्यांनी काही मासिकांसाठी (विशेष करून ‘ताज’ हे त्रैासिक) आणि वर्तानपत्रांसाठी (मुख्यत्वे ‘नवा काळ’) मध्ये विशेष लेखमाला लिहिल्या आहेत. 

या सगळ्या लेखनावर एक नजर टाकली तर त्यांची सामाजिक व राजकीय बांधिलकी लक्षात येते. प्रत्येक विषयाची तर्कशुद्ध मांडणी आणि कारणमीमांसा व आकडेवारीपूर्ण माहिती ही त्यांच्या लेखनातील जमेची बाजू. अगदी प्रसिद्ध व्यक्तींचे चरित्र लिहितानासुद्धा त्या त्यांना न पटलेल्या मुद्‌द्यांवर परखडपणे स्वतःची बाजू मांडतात. लीलातार्इंचे हे सर्वच लिखाण अतिशय अभ्यासपूर्ण आहे. आपले विचार पुरेशी माहिती देऊन सर्व बाजूंचा विचार करून ठामपणे मांडणे हे त्यांचे वैशिष्ट्य. या लेखनाचे विषय निवडतानासुद्धा त्यांच्या वैविध्यपूर्ण आणि वेगवेगळ्या विषयांवरच्या वाचनाची आवड कौतुकास्पद आहे. 

समाजकारण, राजकारण करणारी एखादी व्यक्ती जेव्हा आपला 80 वर्षांचा कालखंड, त्यातील माणसे, परिसर, शहर, देश- विदेश, आणि या सगळ्यांध्ये झालेली स्थित्यंतरे, समाजातील वेगवेगळे प्रश्न, त्यावर आपल्या पद्धतीने उत्तर शोधताना आलेल्या अडचणी आणि त्याबद्दलचा समाजाचा दृष्टिकोन यांवर भाष्य करून समाजाला पुस्तकरूपाने आवाहन करते, तेव्हा त्या लिखाणाला वास्तवाचा प्रत्यय आणि अनुभवाचे वजन प्राप्त होते. लीलाताई आवटेलिखित ‘जाग, मना जाग’ या पुस्तकातून हीच प्रचिती येते. उत्तम शिक्षकाची लक्षणे म्हणजे कठीण विषय मुलांना सोपा करून शिकवणे, त्यांना सुसंस्कृत व जबाबदार नागरिक बनवणे आणि त्यांना केलेला उपदेश आचरणात आणणे. परंतु त्यासाठी स्वतः नवनवीन विषय शिकण्याची आस हवी, प्रचंड जिज्ञासू वृत्ती हवी आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे शिक्षकी पेशा हे एक ध्येय असावे; निव्वळ अर्थार्जनाचे साधन नाही. 

या सगळ्या गोष्टी कॉ.लीलाताई यांच्याकडे उपजत आहेत. न समजलेल्या, पटलेल्या मुद्‌द्यावर प्रश्न विचारण्याची, वाद घालण्याची व त्यासाठी स्वतः लढा देण्याची किंवा इतरांच्या लढ्यात साथ देण्याची, पटलेली गोष्ट आचरणात आणण्याची आणि समोरच्या व्यक्तीवर माणूस म्हणून 100 टक्के विश्वास ठेवण्याची वृत्ती हा त्यांचा स्वभाव आहे. ह्या वयातसुद्धा नवीन विषय शिकण्याची त्यांची जिद्द ही अचंबित करणारी आहे. म्हणूनच डॉ.भालचंद्र मुणगेकरांसारखे राज्यसभेचे खासदार (जे त्यांच्या शालेय जीवनात लीलातार्इंचे विद्यार्थी होते) ‘मी असा घडलो’ या त्यांच्या आत्मचरित्रात लीलातार्इंचा विशेष आदराने उल्लेख करतात. 

लोकशाही, धर्मनिरपेक्षता, स्त्रीपुरुष समानता, सामाजिक न्याय, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि राष्ट्रीय एकात्मता ही संविधानातील मूल्ये लीलातार्इंनी सतत जपली व विद्यार्थ्यांना शिकवण्याची कास धरली. या मूल्यांवर आघात करणाऱ्या प्रत्येक गोष्टीविरुद्ध त्यांनी आपल्या ‘महिला आंदोलन पत्रिके’मधून आवाज उठवला. मग ते मुलांच्या, स्त्रियांच्या समस्या असोत की भारतपाकिस्तान संबंध; अंधश्रद्धा असो की बाबरी मशीद पडण्याची घटना; मुंबईतले बॉम्बस्फोट असोत की शिवसेनेची दडपशाही असो, त्यांनी प्रस्थापितांविरुद्ध कायम आवाज उठवला. हीच मूल्ये हा त्यांच्या आयुष्याचा आणि साहजिकपणे या पुस्तकाचा गाभा आहे. तारा रेड्डींच्या निधनानांतर ‘महिला आंदोलन पत्रिका’चे संपादन करण्याची जबाबदारी लीलातार्इंवर आली. त्यानंतरचा संपादकीय लेख लिहिण्याचा आणि एकूणच पत्रिका चालवायचा त्यांचा उत्साह हा तरुण पिढीला लाजवणारा होता. 

आजपर्यंत त्यांनी पत्रिकेत लिहिलेले वेगवेगळ्या विषयांवरील अनेक लेख विषयानुसार एकत्र करून या पुस्तकाद्वारे प्रदर्शित करण्याची कल्पना अतिशय चांगली आहे. लेखनाची त्यांची एक विशिष्ट पद्धत आहे. प्रत्येक लेखाची पूर्वतयारी, त्या खूप आधी सुरू करतात. त्यासाठी लागणारी सगळी माहिती गोळा करतात, सर्व संदर्भ तपासतात. लागलीच तर काही मुद्‌द्यांवर त्या त्या क्षेत्रातील माहितगार व्यक्तींना फोन करून त्यांच्याशी चर्चा करतात. त्यामुळे त्यांचे लेखन माहितीपर आणि रोखठोक असते. मुलांच्या समस्या मांडताना त्यांनी गर्भजल लिंगनिदान, गर्भपात, बाल शोषणाचे विविध प्रकार, मुलांवरील अत्याचार प्रतिबंधक कायदा या सगळ्या बाबींचा विचार केला आहे. स्त्रियांच्या समस्या व्यक्त करताना त्यांनी गेल्या 100 वर्षांतील स्त्रियांचे बदलते स्थान, भारतातील आणि जगातील बदलती सामाजिक, राजकीय परिस्थिती आणि महिला आरक्षण या सर्व बाबींचा विचार करून आपली बाजू मांडली आहे. तसेच हिंदू, इस्लाम, बौद्ध आणि ख्रिश्चन धर्माची स्त्रीबद्दलची भूमिका काय आहे हे अतिशय तपशीलवार सांगितले आहे. 

स्त्री-पुरुष समानतेबद्दल म.फुले, स्वामी विवेकानंद,   र.धों.कर्वे, महर्षी अण्णा कर्वे, म.गांधी, डॉ.आंबेडकर आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे या महापुरुषांचे विचार त्यांनी मांडले पण त्याचबरोबर त्यांच्या विचारांतील त्रुटी, विसंगती निर्भीडपणे दाखवल्या. या महापुरुषांचा कालखंड आणि त्या प्रतिकूल काळातील त्यांचे पुरोगामी विचार पाहता त्यांच्याबद्दल अपरंपार आदरही त्या व्यक्त करतात. स्त्रीविषयक वेगवेगळ्या कायद्यांचा उहापोह करून त्यांध्ये कोणते बदल अपेक्षित आहेत याची आग्रहाची त्या मागणीसुद्धा करतात. याव्यतिरिक्त अपंग, वृद्ध, एड्‌स, शिक्षण पद्धती, आदिवासी, भोपाळ दुर्घटना, दहशतवाद, अमन की आशा, काश्मीर, अंधश्रद्धा, इस्रायल, युनो इत्यादी अनेक विषय आणि घटना यांवर आपले मत प्रकट करतात. महिलांच्या समस्या आणि महिलांवरील अत्याचार यांवर लिहिताना त्यांच्या लेखणीला वेगळीच धार येते. तळागाळातल्या महिलांसाठी तक्रार मंच चालवताना आलेले वेगळे अनुभव त्यांना अंतर्मुख करतात. 

या पुस्तकातील सगळेच विषय आजच्या काळात महत्त्वाचे आहेत. खासकरून पाश्चात्य विचारसरणीचा भारतीय जनमानसावर वाढत चाललेला पगडा, भारतीय अध्यात्मवाद आणि पाश्चात्य चंगळवाद यांध्ये सापडलेली युवा पिढी यासाठी आपल्या समाजातील समस्यांची माहिती असणे गरजेचे आहे. अजूनही स्त्रियांना दुय्यम समजण्याची मानसिकता भारतात आणि काही प्रगत देश वगळता सर्व जगात आहे. स्त्रिया आणि एकूण समाजच जेव्हा लोकशाही हक्कांच्या आधारे धैर्याने लादलेल्या बंधनांविरुद्ध आवाज उठवेल, कालबाह्य रूढी विरोधात उभा राहील तेव्हाच ही मानसिकता बदलू लागेल आणि या प्रक्रियेला एकविसाव्या शतकात जोर येईल असा लीलातार्इंना ठाम विश्वास आहे. 

लीलाताई आवटे यांची आणि माझी ओळख होऊन 20 वर्षे झाली. पेसमेकरच्या पहिल्या ऑपरेशन नंतर जेव्हा त्यांना हरकिसनदास हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो तेव्हा मला सगळ्यांत प्रकर्षाने जाणवला तो त्यांचा दुर्दम्य आत्मविश्वास. त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांचे समाजकार्य अथकपणे चालू आहे. रस्ता क्रॉस करताना झालेल्या अपघातानंतर पायावर झालेली दोन ऑपरेशन्स आणि नंतर झालेली पेसमेकरची दोन ऑपरेशन्स; काठीच्या आधाराने आणि एका पायावर जोर देऊन चालल्यामुळे प्रवास करताना येणाऱ्या मर्यादा या सगळ्यांचा बाऊ न करता त्यांचा ध्येयवादी प्रवास आजही चालू आहे. याहूनही अधिक सांगायचे म्हणजे या सर्व लिखाणामधून मला नेहमी प्रकर्षाने जाणवलेला त्यांचा एक स्वभावविशेष आणि तो म्हणजे त्यांची ability to learn and unlearn. 

आज या वयातही त्या नवीन काही वाचून, त्यावर विचार करून, त्यांची पूर्वापार चालत आलेली मते बदलायला तयार असतात. एकच उदाहरण द्यायचे झाले तर मी गे (समलिंगी) संबंधाबद्दल त्यांच्या झालेल्या मत परिवर्तनाचे उदाहरण आवर्जून देईन. काही वर्षांपूर्वीपर्यंत त्यांच्या पिढीतील (व खरे सांगायचे झाले तर आजच्या पिढीतीलही) समवयस्क लोकांप्रमाणे लीलातार्इंचेही मत या विषयाबद्दल अगदी विरोधी होते. परंतु त्यांनी या विषयाबद्दल मिळेल तेवढे साहित्य वाचले, त्यावर विचार केला आणि शेवटी यामध्ये अनैसर्गिक असे काही नाही आणि तो ज्या त्या व्यक्तीने निवडलेला पर्याय आहे, आपल्याला ते चुकीचे आहे असे मानण्याचे काही कारण नाही असे प्रतिपादन करणारा लेख लिहिला. 

स्वतः मनन, चिंतन करून एवढ्या मोकळेपणे आपल्या वैचारिक चुका मान्य करणारी, आणि तेही अशा वयात जेव्हा माणसे क्वचितच आपली पूर्वापार चालत आलेली मते बदलतात, अशी दुसरी कोणतीही व्यक्ती माझ्या तरी पाहण्यात नाही. लीलातार्इंच्या या दुर्दम्य आशावाद आणि विजीगिषु वृत्तीला माझे प्रणाम. 

Tags: डॉ.भालचंद्र मुणगेकर सोव्हिएत लंडन नेहरू अवार्ड जितेंद्र बने स्त्री प्रश्न भारतीय महिला फेडरेशन महिला आंदोलन पत्रिका महाराष्ट्र फौंडेशन लीला आवटे साहित्य Dr Bhalchandra Mungekar Soviet London Nehru Award Jitendra Bane Bhartiya Mahila Federation Mahila Andolan Patrika Maharashtra Foundataion Leela Avate Literature weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके