डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

करुणा गोखले यांनी मायक्रोबायॉलॉजीमध्ये बी.एस्सी, रशियनमध्ये एम.ए. व एम्‌.फिल आणि भाषाशास्त्रात पीएच्‌.डी केली. त्यांनी आतापर्यंत सात पुस्तकांचे मराठीत अनुवाद केले आहेत; त्यांतील ‘सिमॉन द बोवा’ यांचे ‘सेकंड सेक्स’ आणि बट्राँड रसेल यांचे ‘द कॉन्क्वेस्ट ऑफ हॅपिनेस’ ही दोन पुस्तके विशेष उल्लेखनीय आहेत. प्रत्येक व्यक्तीने आपल्या कार्यक्षेत्रातील एकातरी पुस्तकाचा अनुवाद मराठीत करावा, हा विंदा करंदीकर यांचा विचार ‘सेकंड सेक्स’च्या अनुवादामागची प्रेरणा होती. स्त्रीमुक्तीच्या संदर्भात ‘सेकंड सेक्स’ हे बायबल मानले जाते. ‘बाईमाणूस’ हे स्वतंत्र पुस्तक आहे. वर्तानातील विवाहसंस्था, कुटुंबसंस्थेतील स्त्रीचे स्थान, स्त्रीशिक्षण, स्त्रीविषयक कायदे, स्त्री देहाविषयी धर्माचा व प्रसारमाध्यमांचा दृष्टिकोन यांची चर्चा या पुस्तकात केली आहे. स्त्रीवाद ही स्वयंभू, स्वतंत्र विचारधारा नसून ती लोकशाहीचीच एक शाखा आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न ‘बाईमाणूस’ करते.  

स्वत:च्या लेखन प्रेरणांविषयी काही लिहावे एवढे लेखन माझ्या नावावर नाही. सात अनुवाद आणि दोन स्वतंत्र पुस्तके, एवढीच काय ती खात्यावरची पुंजी. त्यामुळे लेखनामागच्या प्रेरणांऐवजी कारणांवर लिहिणे अधिक संयुक्तिक होईल. स्वत:विषयी लिहिणे तसे अवघडच असते. शिवाय माझ्या लेखनामागची कारणे जाणून घेण्याने कुणाचा काही फायदा होईल, याविषयीही मी साशंक आहे. परंतु ‘साधना’कारांची तशी सूचनाच असल्याने प्रयत्न करते. मी लिहू का लागले, याचा माग काढायला बसले आणि येऊन थडकले सिमोन द बोव्हांच्या काही वाक्यांवर. आपल्या प्रदीर्घ आत्मचरित्रात ती एके ठिकाणी म्हणते, ‘‘जेव्हा स्वास्थ्याची शाश्वती राहत नाही; आयुष्याची घडी बिघडू लागते, तेव्हाच माणूस काहीतरी घडवू बघतो.’’ आयुष्याच्या एका टप्प्यावर मलाही हे विधान लागू झाले, तेही अगदी अनपेक्षितपणे. 

1990 साली मी पीएच.डी. करून भारतात परतले. डोळ्यांसमोर काही उपक्रम होते. त्यासाठी कुठल्या ना कुठल्या शैक्षणिक संस्थेस संलग्न होणे गरजेचे होते. नोकरी घेण्याचे, अर्थार्जनाचे काही बेत होते. परंतु भारतात परतल्या-परतल्या माझी तान्ही मुलगी गंभीररित्या आजारी पडली. पुढची 6-7 वर्षे तिला खूप जपावे लागेल, असे डॉक्टरांनी बजावले. आणि मला अर्थार्जनाच्या सर्व संधी सोडाव्या लागल्या. योजलेला एकही उपक्रम हाती घेणे अशक्य झाले. करीअर बांधणीच्या सर्व शक्यता निदान त्यावेळी तरी संपल्यासारख्या वाटल्या. मुलीच्या प्रकृतीची काळजी आणि स्वत:च्या करीअरविषयीचा अपेक्षाभंग, याने पराकोटीचे वैफल्य आले. या वैफल्यातून बाहेर येण्याचा एकच मार्ग दिसत होता, तो म्हणजे हातून काहीतरी सकारात्मक निर्माण करणे. 

वाचनाचे व्यसन होतेच. एम.फील. आणि पीएच.डी चे प्रबंध लिहिताना लेखनातील शिस्तीचेही प्रशिक्षण मिळाले होते. शिवाय उच्च शिक्षण रशियन भाषेत झाले असल्याने त्यातील काही अजरामर साहित्यकृतींशी चांगला परिचय होता. या सर्व सामग्रीचा उपयोग करून मी आवडलेल्या रशियन सल्झेनित्सिन रास्पुतिन साहित्यातील निवडक उताऱ्यांचा मराठीत अनुवाद करण्याचे काम हाती घेतले. परिस्थितीवर नाराज झालेल्या माझ्या मनाला बौद्धिक समाधान देणारे काम देणे, ही त्यावेळी माझी तातडीची निकड होती. त्यानुसार मी अलेक्झांडर सल्झेनित्सिनच्या ‘कॅन्सर वॉर्ड’मधील माझ्या आवडीच्या उताऱ्यांचा अनुवाद केला. ‘गुलमोहर’ मासिकाचे संपादक श्री. अनिल किणीकर यांनी तो प्रसिद्ध करून प्रोत्साहन दिले. त्यानंतर सल्स्झेनित्सिन आणि वालेंतिन रास्पुतिन या आणखी एका लेखकाच्या काही कथा गुलमोहरसाठी मराठीत भाषांतरीत केल्या. अनुवाद करणे ही किती आव्हानात्मक पण त्याचवेळी आनंदाची प्रक्रिया असते, याचा अनुभव घेतला. हळूहळू या अनुभवाची चटकच लागली. 

लहानपणी ‘चिमुकल्या स्त्रिया’, ‘पाडस’ या अनुवादांनी, ‘गोड गोड गोष्टी’ या रूपांतरांनी वाचनाची भूक भागवली होती. आता स्वत: अनुवाद करू लागल्यावर अनुवादप्रक्रियेकडे अधिक डोळसपणे बघणे गरजेचे वाटू लागले. ‘अँना करेनिना’, ‘डॉ.झिवॅगो’ यांसारख्या अजरामर कलाकृती मूळ रशियनमधून वाचल्या होत्या. याच दोन कादंबऱ्यांचे इंग्लिश अनुवाद वाचून काढले आणि थरारून गेले. जेवढा आनंद मूळ रशियन साहित्यकृतींनी दिला होता. जवळपास तेवढेच समाधान मिळेल एवढे ते समर्थ अनुवाद होते. तेव्हापासून अनुवाद करणे आणि त्याची यथातथ्यता पडताळून बघणे हा छंद जडला. पीएच.डी मिळाली, तरी वेगळ्या पद्धतीची विद्यार्थीदशा सुरू झाली. या काळात नवे आधाशासारखे वाचले; जुने जे आवडले होते, त्याचा अनुवाद केला. तो स्वयंउपचाराचा एक भाग होता हे खरेच; पण त्याचबरोबर ‘‘प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीने आपल्या कार्यक्षेत्रातील एक महत्त्वाचे पुस्तक मराठीत आणावे’’, ही विंदांनी दिलेली प्रेरणापण कामाला लावत होती. The Second Sex चा अनुवाद याच प्रेरणेतून पूर्ण झाला.

 ‘बाईमाणूस’ या पुस्तकाची पार्श्वभूमी

अर्थार्जन, संशोधन यांची आपली गाडी रुळावर येत नाही, त्यामध्ये आपले ‘स्त्री’ असणे हा निर्णायक घटक आहे हे वारंवार प्रत्ययास येत होते. त्यामागची कारणमीमांसा समजून घेणे निकडीचे वाटू लागले. सुदैवाने स्त्री-मुक्ती संघटनेच्या काही कार्यकर्त्यांशी परिचय झाला, सूर जुळले आणि मी मुलीला पाठुंगळी घेऊन त्यांच्या उपक्रमांत सहभागी होऊ लागले. माझ्या विचारांना आणि कामाला निर्णायक वळण मिळाले. नवी दृष्टी लाभली. ग्रामीण आणि शहरी स्त्रियांचे निराळ्या पद्धतींनी होणारे दरिद्रीकरण, विकासाच्या कचकडी संकल्पनांचे स्त्रीच्या अर्थार्जनावर होणारे दुष्परिणाम, स्त्रीचे श्रम आणि त्याग यांवर आधारित कुटुंबव्यवस्था, धर्म, मूल्यव्यवस्था यांद्वारे उभी केलेली आदर्श स्त्रीची प्रतिमा व त्याविषयी स्त्री व पुरुष या दोहोंचाही पद्धतशीरपणे होणारा बुद्धिभेद, मानवी देहाचा व्यापार, स्त्रीचे वस्तूकरण, त्यातून घडणारी अब्जावधींची उलाढाल, मूलतत्त्ववादातून होणारी स्त्रियांची ससेहोलपट... इत्यादी स्त्री प्रश्नांच्या व्याप्तीने डोके भंजाळून गेले. 

स्त्री मुक्ती संघटनेतील माझे काम जेवढे वस्तीपातळीवर चालायचे, तेवढेच अभ्यासात्मकही होते. त्यामुळेच एक भान आले की, व्यक्तीस भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांची मुळे समष्टीत दडलेली असतात. Personal is Political या केट मिलेटच्या उक्तीची प्रचिती येऊ लागली. समाजात मोठ्या प्रमाणावर भेडसावणाऱ्या प्रश्नांची मांडणी ‘व्यवस्थेचे’ विश्लेषण करतच करावी लागते ही उमज आली. आधीचा राजकीय अज्ञपणा काही अंशी तरी कमी झाला. इतर अनेक सामाजिक चळवळींविषयी सजगता वाढली. स्त्रियांसकट सर्वच वंचितांचे प्रश्न हे सत्ताविहीत व सत्ताधारी यांच्यामधील संघर्षातून उद्‌भवतात. त्यामुळे सामाजिक चळवळी या एक प्रकारे राजकीय बदलच घडवू बघत असतात. स्त्री प्रश्नांविषयीच्या जाणीव-जागृती शिबिरांधून आम्ही ही मांडणी करत होतोच. तीच अधिक घट्टमुट्ट होऊन ‘बाईमाणूस’मध्ये अवतरली. 

थोडक्यात ‘बाईमाणूस’ला माझ्या 22 वर्षांच्या स्त्री मुक्ती चळवळीतील कामाची पार्श्वभूमी आहे. या पुस्तकातून काय सांगितले आहे? गेली हजारो शतके पृथ्वीतलावर एक महासत्ता नांदते आहे. ती म्हणजे पुरुषप्रधानता. धर्मसत्ता, अर्थसत्ता आणि ज्ञानसत्ता हे पुरुषकेंद्री महासत्तेचे बालेकिल्ले आहेत. त्यांच्या बळकटीसाठी वापरलेले उच्च प्रसारमाध्यम म्हणजे धर्म! कुटुंबसंस्था हे याच महासत्तेचे छोटे प्रारूप आहे. वरील दृष्टिकोन केंद्रस्थानी ठेवून वर्तानातील विवाहसंस्था, स्त्रीविषयक कायदे, कुटुंबसंस्थेतील स्त्रीचे स्थान, स्त्रीशिक्षण, स्त्री देहाविषयीचा धर्माचा व प्रसारमाध्यमांचा दृष्टिकोन यांची चर्चा या पुस्तकात येते. स्त्रीमुक्तिवाद म्हणजे हजारो वर्षांच्या महासत्तेला दिलेले संघटीत आव्हान आहे. प्रबोधन युग, त्यानंतर झालेली फ्रेंच राज्यक्रांती त्या पाठोपाठ सुरू झालेली औद्योगिक क्रांती यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, समन्याय, व्यक्तिस्वातंत्र्य या मूल्यांना प्रतिष्ठा दिली. मात्र, ही मूल्ये स्त्रियांना लागू केली गेली नाहीत. म्हणून स्त्रीमुक्तिवादाची वेगळी राहुटी उभी करावी लागली. परंतु स्त्रीवाद ही स्वयंभू, स्वतंत्र विचारधारा नसून ती लोकशाहीचीच एक शाखा आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न ‘बाईमाणूस’ करते. 

सदर पुस्तक म्हणजे स्त्रीमुक्ती चळवळीचा इतिहास नाही. त्यात स्त्रीमुक्तिवादाच्या परिघात स्त्री जीवनाशी निगडीत कोणकोणते मुद्दे येतात, त्याची चर्चा केली आहे. स्त्रीमुक्तीचा लढा हा मानवमुक्तीचा लढा आहे. तो केवळ स्त्रीशिक्षण, स्त्रीचे अर्थार्जन, स्त्रीस मतदानाचा अधिकार यांपुरता मर्यादित नाही. स्त्रीवादी साहित्य धर्म, वर्ण, भाषा, आर्थिकस्तर यांच्या सीमा ओलांडून वैश्विकतेकडे झेपावत आहे. समाजाच्या न्यायबुद्धीला धार लावण्याचे मोलाचे काम स्त्रीवादाने केले आहे. आपली इच्छा असो, वा नसो स्त्रीशिक्षण, स्त्रीजागृती यांमुळे समाजाच्या मानसिकतेत आमूलाग्र बदल घडून येत आहेत. प्रत्येक स्त्री-पुरुषाला ते समजून घेऊन स्त्री-पुरुष समानतेविषयी काही एक भूमिका घेणे अपरिहार्य होऊन बसले आहे. अशी भूमिका घेणे सोपे जावे म्हणून ‘बाईमाणूस’ हा स्त्रीमुक्तिवाद म्हणजे नक्की काय, हे समजून सांगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. 

Tags: स्त्रीमुक्ती बाईमाणूस सेकंड सेक्स सिमॉन द बोवा करुणा गोखले Simone de Beauvoir Second sex Baimanus Karuna Gokhale weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

करुणा गोखले
karunagokhale@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके