डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मुंबईतील एका महाविद्यालयात इंग्रजीच्या प्राध्यापक असलेल्या नीरजा यांनी कथा आणि कविता या दोनही प्रकारात साहित्यनिर्मिती केली आहे. ‘निरर्थकाचे पक्षी’ या कवितासंग्रहात स्त्री-समूहाच्या वाट्याला आलेले दुय्यमत्व, विविध कारणांनी होणारे स्त्रियांचे शोषण आणि उलगडत जाणारा स्त्रीच्या स्वत्वाचा प्रवास या तीनही प्रमुख घटकांची अभिव्यक्ती आहे. शिवाय, या कवितांना जागतिकीकरणाचा संदर्भ असल्याने त्यांना व्यापक अर्थपूर्णता लाभलेली आहे. शोषित व भरडली जाणारी, तरीही व्यवस्थेला जाब विचारून समर्थपणे पुढे जाणारी स्त्री या काव्यसंग्रहातून प्रत्ययकारी रूपात साकार होते.  

कोणतीही विशिष्ट अशी भूमिका नसण्याच्या काळात मी लिहायला सुरुवात केली. वेगवेगळ्या प्रकारचं माझं वाचन, माझं जगणं, ते जगताना पडत गेलेले प्रश्न आणि या प्रश्नांची उत्तरं शोधताना होणारी दमछाक या सर्वांचं प्रतिबिंब माझ्या ‘निरन्वय’ या संग्रहातील कवितेत उमटलं होतं. खूप वाचन केलं होतं मी. मराठीबरोबरच केलेल्या अमेरिकन आणि युरोपियन साहित्याच्या त्या वाचनानं मनात कल्लोळ दाटले होतेच. पण एकूणच जगण्यात आलेल्या निरर्थकत्वाची भावना कामूच्या ‘आऊटसायडर’नं जास्तच गडद केली होती. इलियट, कामू, बेकेट, पिंटर, यांसारखे कवी, कादंबरीकार आणि नाटककार त्या काळात नेणीवेत जाऊन बसले ते कायमचे. अगदी अस्तित्ववादी बाण्यानं जगायला सुरुवात केली तरीही जगण्यातला निरर्थकपणा जाणवत राहिला. त्यामुळेच कदाचित आजही निरर्थकाचे ते पक्षी माझ्या मनात घिरट्या घालत असावेत. 

माझ्यातली कवयित्री आणि कथाकार खरं तर एकाच काळात जन्माला आले. दोन-तीन महिन्यांच्या अंतरानं. कथेचा जन्म पहिला, मग कवितेचा. असं असलं तरी कथेच्या पाठीवर जन्माला आलेली कविता लाडकी होत गेली आणि कथेकडं थोडं दुर्लक्षच झालं. पुढं तर तिच्याकडे लक्ष द्यायला वेळच झाला नाही. अगदी कमी वेळ दिला तरी समाधानी असलेली आणि मनात जागा दिली तरी खूष होणारी कविताच माझ्या आजूबाजूला सतत वावरत राहिली. माणूस जन्माला येताना कोणत्या भूमिका घेऊन येत नाही. आजूबाजूचं समाजवास्तव, ज्या वर्तानात तुम्ही राहत असता ते वर्तान, भूतकाळानं प्रगल्भ केलेल्या जाणीवा आणि भविष्याविषयीच्या अपेक्षा आपल्या जगण्याला व्यापून राहिलेल्या असतात. त्यातून नकळत एक जीवनदृष्टी तयार होत जातेच. मी स्वतः एकाच विचारधारेची कडवी समर्थक नाही. स्त्रीवाद, मार्क्सवाद, समाजवाद अशा विचारधारांतील अनेक गोष्टी माझी जीवनदृष्टी घडवत गेल्या. या विचारधारांतला माणसाला माणूस म्हणून वागवणारा, मानवतेकडे घेऊन जाणारा विचार मला जास्त भावतो. मी देव मानत नाही पण माझी माझ्या विचारांवर, कामावर, काही व्यक्तींवर श्रद्धा आहे. जी जी विचारधारा मानवतावादाकडे, समानतेकडे, धर्मनिरपेक्षतेकडे घेऊन जाते ती मला माझी वाटते. 

कवीच्या अनुभवविश्वाचा आणि ज्या वास्तवात तो जगत असतो त्या वास्तवाचा परिणाम त्याच्या कवितेवर होत असतो. माझ्याही कवितेवर तो होत होताच. केवळ स्त्री म्हणूनच नाही तर एक व्यक्ती म्हणून या समाजात जगताना येणारे अनुभव तुच्या नकळत तुच्या कवितेतून व्यक्त व्हायला लागतातच. या समाजात जगताना मनात उठणारे हजारो प्रश्न तुच्या अवकाशात वावटळीसारखे फिरत रहातात. माझ्या मनात तर खूपच प्रश्न होते. विशेषतः स्त्रीच्या जगण्याविषयीचे, तिच्या या समाजातील स्थानाविषयीचे प्रश्न मनात सतत उभे रहात होते. मी लहानपणी वाचलेल्या कथा-कादंबऱ्यातील नायिका या बऱ्याचशा पारंपरिक, समर्पित जीवन जगणाऱ्या होत्या. त्या तशाच असतात आणि आपल्यालाही तोच आदर्श घेऊन जगायचं आहे असं मनावर बिंबवणारा समाज आजूबाजूला होताच. पण अशा धारणा मनाला पटत नव्हत्या. काहीतरी चुकतं आहे असं वाटण्याच्या काळातच टॉलस्टॉयची ‘अँना कॅरनिना’ वाचली आणि ती माझी सखीच होऊन गेली. आपल्याला एक व्यक्ती म्हणून नाकारलेल्या सुखाचा, आनंदांचा विचार करणारी; त्यासाठी समाजाच्या दृष्टीनं भरभरून असलेल्या सुखाला लाथ मारून बाहेर पडलेली टॉलस्टॉयची अँना आणि इब्सेनची नोरा माझ्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या नायिका होत्या. 

या अशा नायिका मग मला गौरी देशपांडे, सानिया यांच्या कथा-कादंबऱ्यांतूनही भेटल्या. या सगळ्याजणी माझ्या अनुभवविे श्वाचा महत्त्वाचा भाग झाल्या. आपल्या महाकाव्यांतून आलेल्या स्त्रिया माझ्या मनात प्रश्न उमटवू लागल्या. रामानं मातीत बुडवून टाकलेली सीता मला साद घालू लागली. आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असलेली आणि त्याचा सन्मान राखणारी द्रौपदी मला जवळची वाटू लागली. मग आपली व्यथा मांडण्यासाठी माझ्या नकळत ती माझ्या कवितेत आली. ‘कुंडाच्या चार चौकटीतला मासा आंधळा झाला।तेव्हाच साऱ्या वाटा बंद झाल्या होत्या। अंधारात मी तरी कुठं धर्म शोधणार?। अधर्मालाच दिली सारी दाने/तेव्हापासून आजपर्यंत/किती वस्त्रहरणे! किती वस्त्रहरणे!’ असं विधान करू लागली. हळूहळू माझी कविता बऱ्यापैकी आक्रमक होत गेली, विशेषतः लग्नानंतरच्या काळात. मुलगी असूनही जे मोकळेपण मी माझ्या घरात भोगलं होतं, ते या घरात नव्हतं. इथं केवळ सुनेलाच सून म्हणून वागवलं जात होतं असं नाही; तर मुलीलाही तिच्या स्त्रीत्वाशी जोडून येणाऱ्या भूमिका आणि जबाबदाऱ्या पार पाडायचं वळण लावलं जात होतं. आणि मुख्य म्हणजे त्यात काही गैर आहे याचं भान त्यांना नव्हतं. या घरातले लोक वाईट अजिबात नव्हते. पण पूर्णपणे पारंपरिक भूमिका घेऊन जगणारे होते. त्यामुळे सून म्हणून, बायको म्हणून ज्या अपेक्षा आपल्याकडे केल्या जातात त्या माझ्याकडूनही केल्या गेल्या आणि त्या पूर्ण करण्याची जबाबदारी मीही आनंदाने उचलली. 

त्या काळात आपलं स्वतंत्र अस्तित्व सांभाळून चांगली सून बनता येतं का हे आजमावून पहाण्याचं ठरवलं होतं. पण चांगली सून बनण्यासाठी काय करावं लागतं याची कल्पना हळूहळू यायला लागली. पहिली गोष्ट म्हणजे तुमचं स्वतंत्र अस्तित्व विसरावं लागतं; त्याबरोबरच जगाच्या खिडक्या मिटून घ्याव्या लागतात; बाहेरचं वारं अंगावरून वाहतंय असं वाटलं तर स्वतःला घुसमटून टाकेपर्यंत झाकून घ्यावं लागतं; मनात उसळणाऱ्या साऱ्या प्रश्नांचं दफन करावं लागतं आणि हट्टानं आपल्यातली त्याग, समर्पणाची भावना दाखवून द्यावी लागते. हे सारं करण्याच्या प्रयत्नांत मनाची घुसमट होणं सहाजिक होतं. 

नोकरी करणाऱ्या बाईच्या काही गरजा असतात, त्या नोकरीच्याही काही जबाबदाऱ्या असतात हे आपल्याकडे आजही लक्षात घेतलं जात नाही; तर लेखिका म्हणून तिची निकड समजून घेण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. जे काही करायचं आहे - मग ती नोकरी असेल की लेखन - ते सारं आपल्या सून, बायको आणि त्याबरोबर आलेली सगळी नाती सांभाळून कर असा साधा सरळ दृष्टिकोन होता. त्यामुळे माझी वाचनाची, लेखनाची आणि मुख्य म्हणजे स्वतःचं स्वत्व जपण्याची निकड नवरा सोडून कोणालाही कळली नाही. अशा वेळी बाहेरच्या जगापासून पूर्णपणे तुटलेल्या मला आधार उरला तो शब्दांचा. मनातली घुसमट शब्दांत व्यक्त झाली आणि ती स्त्रीच्या पारंपरिक जगण्यावरच वार करायला लागली. 

आज ज्या जगात मी राहते आहे त्या जगातली स्त्री माझ्या लेखनात सतत डोकावत असते. ही स्त्री जशी शोषित आहे; या व्यवस्थेत भरडली गेलेली आहे; तशीच ती ही व्यवस्था भेदून पुढे जाणारीही आहे. या व्यवस्थेला जाब विचारणारी, खंबीरपणे उभी राहणारी, स्वतःचा व्यक्ती म्हणून विचार करणारी, स्वतःला सतत तपासून पहाणारी, स्वतःचे निर्णय घेण्याएवढी सक्षम झालेली स्त्रीही आहे. माझ्या कवितेत आणि कथेत येणारी ही स्त्री स्वतःच्या जगण्यावर भाष्य करणारी आहेच पण ज्या समाजात ती राहते त्या समाजाच्या मानसिकतेचा विचार करतानाच तो बदलण्याचा प्रयत्न करणारी स्त्री आहे. प्रत्येक वेळी ती यशस्वी होतेच असं नाही; पण ती प्रयत्न करते. माझ्या कवितेत येणारं माझ्या आजूबाजूचं जग हे स्त्रीकेंद्री आहेच, पण त्यापलीकडेही एक वेगळं जग आहे याची कल्पना मला आहे. 

अलीकडे माझ्या कवितेत ते जास्त व्यापकपणे यायला लागलंय असं मला स्वतःला वाटतंय. विशेषतः गेल्या दहा-बारा वर्षांतली माझी कविता बदलली आहे. तो बदल ‘निरर्थकाचे पक्षी’ मधील कवितेत ठळकपणे दिसून येतोय. आज संपूर्ण जगात होत असलेल्या राजकीय, आर्थिक, सामाजिक उलथापालथी, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या जगात होणारी प्रगती, रोज नव्यानं अंगावर आदळणारे बदल, जागतिकीकरण, त्याचे समाजमनावर होणारे परिणाम; धर्मभावना आणि जातिभावना दृढ करणारे विचार, त्यांचा समाजमनावर होणारा अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष परिणाम; त्यातून जन्माला आलेला दहशतवाद, दंगली, स्फोट, माणसांच्या मनात वाढत चाललेली असुरक्षिततेची भावना, जगण्यात आलेली अस्थिरता; त्यातून बाहेर येण्यासाठी तो शोधू पहातो आहे ते उपाय, त्याचं दैववादी होणं, अशा अनेक गोष्टी लेखकाच्या नेणिवेत जाऊन बसत असतातच. त्यांतील काही गोष्टी आनंददायक असल्या तरी अनेक गोष्टी त्याला अस्वस्थ करत असतात. या भल्या मोठ्या ग्लोबल गावात आपण रहात असलो तरी आपलं सारं जगणंच तुकड्या-तुकड्यांत विभागलं गेलं आहे. 

अशा विखंडित वास्तवात जगताना लेखक म्हणून त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न मीही करत असते. आज या क्षणी जगण्याच्या या साऱ्या गुंतागुंतीचा शोध घेणंही मला महत्त्वाचं वाटतं. मी ते करते आहे, आणि करत राहीनच. त्यात कितपत यशस्वी होईन माहीत नाही. पण माझ्यात असलेल्या मर्यादांना ओलांडून जाण्याचा प्रयत्न मात्र करत राहीन. 

Tags: स्त्री स्वातंत्र्य इब्सेन टॉलस्टॉय कविता निरर्थकाचे पक्षी नीरजा women freedom Women issues Ibsen Toltstoy Poems Poetry Nirarthakache Pakshi Neeraja weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके