डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आजची आव्हानं समग्रपणे पेलणारी कविता

‘निरन्वय’, ‘वेणा’, ‘स्त्रीगणेशा’ या संग्रहांतील काही निवडक मोजक्या कवितांचा अपवाद केल्यास त्यांच्या अनेक कवितांची घडण ही उपरोधाच्या अंगाने झालेली आहे असे दिसते. ताण, विरोध, उपहास, दंभस्फोट ही त्यांची एकूणच काव्यशैली आहे की काय, असा प्रश्न पडावा इतकी ती शैली त्यांच्या काव्यगत अनुभवकेंद्रावर प्रभाव गाजविताना दिसते. मात्र ‘निरर्थकाचे पक्षी’मध्ये आपल्या या शैलीला छेद देण्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत. परिणामी यातील काव्यानुभव हा सूक्ष्म, अनेकरेषीय आणि प्रसरणशील झालेला दिसतो.

गेली पंचवीस-तीस वर्षे सातत्याने कवितालेखन करणाऱ्या नीरजा यांनी मराठी काव्य-प्रवाहात स्वतःची विशिष्ट अशी नाममुद्रा उमटवलेली आहे. त्यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1960 रोजी मुंबईत झाला. पदव्युत्तर शिक्षणानंतर (एम.ए.- इंग्रजी) त्यांनी दीर्घकाळ श्री चिनॉय कॉलेज ऑफ कॉर्स अँड इकॉनॉमिक्स, अंधेरी येथे कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजीचे अध्यापन केले आहे. अलीकडेच त्या माटुंगा येथील पोद्दार वाणिज्य महाविद्यालयात रुजू झाल्या आहेत. नीरजा यांचे आजवर ‘निरन्वय’ (1987), ‘वेणा’ (1994), ‘स्त्रीगणेशा’ (2003) आणि ‘निरर्थकाचे पक्षी’ (2010) असे चार कवितासंग्रह प्रकाशित झाले असून त्यांच्या सर्वच संग्रहांना प्रतिष्ठेच्या अनेक मान-सन्मानांनी आणि विविध पुरस्कारांनी गौरविले गेले आहे. कवितेशिवाय कथा आणि स्तंभलेखन हीदेखील त्यांची आस्थेची आविष्कार-क्षेत्रे असून या क्षेत्रातदेखील त्यांचे भरीव असे योगदान आहे. ‘जे दर्पणी बिंबले’ (2001), ‘ओल हरवलेली माती’ (2006), ‘पावसात सूर्य शोधणारी माणसं’ (2012) हे कथासंग्रह आणि ‘बदलत्या चौकटी’ (2007) व चिंतनशलाका (2010) हे त्यांचे स्तंभलेखनसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. एका कवयित्रीने जाणीवपूर्वक स्वतःच्या क्षमतांचा आणि शक्यतांचा विविध साहित्यप्रकारांच्या संदर्भात घेतलेला शोध म्हणजे त्यांचे हे कथनात्मक लेखन म्हणता येईल. 

नीरजा यांनी त्यांच्या लेखन-प्रवासासोबत संस्थात्मक कामाशीही स्वतःला अलीकडच्या काळात जोडून घेतले आहे. ग्रंथाली आणि साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या वतीने चालणाऱ्या अनुवाद सुविधा केंद्राच्या कार्यात त्यांनी त्यांचा महत्त्वपूर्ण असा कृतिशील सहभाग नोंदविला आहे. तसेच अनुवाद सुविधा केंद्राच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या ‘माय मावशी’ या षण्मासिकाच्या संपादक आहेत. नीरजा यांनी विविध साहित्यप्रकारांतून जरी लक्षणीय लेखन केलेले असले तरी त्यांची ओळख प्रामुख्याने कवयित्री अशी आहे. ‘निरर्थकाचे पक्षी’ हा त्यांचा कवितासंग्रह म्हणजे त्यांच्यातल्या कवयित्रीने घेतलेले एक महत्त्वपूर्ण वळण म्हणता येईल. समस्त स्त्री-समूहाच्या वाट्याला आलेले दुय्यमत्व अधोरेखित करणे, शोषणाच्या आदी-कारणांचा वेध घेणे, स्त्रीच्या स्व-भानाचा आणि विश्वभानाचा प्रवास ऐतिहासिक कालपटाच्या अनुषंगाने चित्रित करणे आणि मुख्य म्हणजे पारंपरिक स्त्री-संहितेचे आधुनिक संज्ञेने पुनर्रचन करणे ही नीरजा यांच्या आधीच्या तीन कवितासंग्रहातील केंद्रवर्ती आशयसूत्रे ‘निरर्थकाचे पक्षी’ या संग्रहातदेखील आढळतात. परंतु ‘निरर्थकाचे पक्षी’मधील आशयसूत्रांना जागतिकीकरणाचा गुंतागुंतीचा संदर्भ प्राप्त झाल्याने त्यातील काव्यांतर्गत अनुभवाचा प्रदेश हा अधिक व्यापक, विस्तारशील आणि म्हणूनच अनेकायामी झालेला दिसतो. 

नीरजा यांच्या काव्यविषयक जाणिवांच्या जडणघडणीचा संदर्भबिंदू अतिशय महत्त्वाचा आहे. त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘निरन्वय’ हा 1987 मध्ये प्रसिद्ध झाला. याचा अर्थ असा की त्याच्या आधी किमान पाच-दहा वर्षे त्यांनी काव्यलेखनाला सुरुवात केली असावी. हा काळ विविध वाङ्‌मयीन आणि सांस्कृतिक चळवळींनी व्यापलेला होता. साठोत्तरी साहित्याचे आणि 1975 नंतर वेगवान झालेल्या स्त्रीमुक्ती चळवळीचे प्रभाव, पडसाद आणि संस्कार यांपासून कुठलीही संवेदनशील व्यक्ती अलिप्त राहणे शक्यच नव्हते. नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, भालचंद्र नेमाडे, अरुण कोलटकर, तुळशी परब, मनोहर ओक, वसंत आबाजी डहाके, सतीश काळसेकर यांची व्यवस्थात्मक पेचांची- जगण्यातली अवघी जटिलता पकडणारी सर्जनशीलता आणि प्रभा गणोरकर, रजनी परुळेकर, अनुराधा पाटील आणि मल्लिका अमरशेख यांची समस्त स्त्री-समूहाच्या वाट्याला येणाऱ्या दाहक वास्तवाचे अर्थनिर्णयन करणारी भेदक, मर्मग्राही अन्वेषणदृष्टी त्या काळात गांभीर्यपूर्वक काही लिहू पाहणाऱ्या कुठल्याही लिहित्या माणसाप्रमाणे नीरजा यांनाही पूर्वपरंपरेच्या स्वरूपात लाभलेली आहे. एकूणात महत्त्वपूर्ण अशा वाङ्‌मयीन आणि सांस्कृतिक स्थित्यंतराच्या मूल्यात्मक पार्श्वभूमीवर नीरजा यांनी त्यांच्या काव्य-लेखनाचा ओनामा केला आहे. 

प्रा.गंगाधर पाटील यांनी नीरजा यांच्या पहिल्या कवितासंग्रहाला प्रस्तावना लिहिताना म्हटले आहे, ‘या काव्यात्म अनुभवविश्वात प्रामुख्याने तीन प्रकारची अनुभवांगे सामावलेली आहेत. एक- प्रेयविषयक अनुभव, दोनस्त्रीच्या स्वत्वशोषणाविषयीचे अनुभव, तीन- सर्वसामान्य जीवनाविषयीचे चिंतनगर्भ अनुभव.’ (‘निरन्वय’- प्रस्तावना, पृ. 5) त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून व्यक्त होणारे हे काव्यात्म अनुभवविश्व नंतरच्या ‘वेणा’ आणि ‘स्त्रीगणेशा’ या कवितासंग्रहात प्रामुख्याने स्त्रीकेंद्री जाणिवांचा ऐतिहासिक आणि वर्तामानकालीन पट मांडतामांडता, ‘निरर्थकाचे पक्षी’ या संग्रहात मात्र अधिक विस्तृत अवकाश धारण करताना दिसते याचे मुख्य कारण जागतिकीकरणाच्या निर्घृण वास्तवाच्या व्यामिश्रतेला त्या सामोऱ्या गेल्या आहेत. 

नीरजा यांची सुरुवातीपासूनची कविता प्रामुख्याने पुरुषसत्ताक व्यवस्थेविरुद्ध आवाज उठविणारी आहे. साहजिकच त्यांच्या कवितेचा स्व-भाव बंडखोर आहे. उपहास, उपरोध आणि आक्रमकता ही त्यांच्या काव्य- भाषेतील महत्त्वाची हत्यारे आहेत आणि त्याचे अतिशय चपखल, परिणामकारक उपयोजन त्यांनी केले आहे. स्त्री-पुरुष नातेसंबंधात सत्तास्थानाचे राजकारण निहित असते आणि जात, वर्ग, धर्म अशा संरचनांप्रमाणेच पितृसत्ता (Patriarchy) नावाची संरचना प्रत्येक ऐतिहासिक टप्प्यावर मानवी समाजात कार्यप्रवण असते हे भान नीरजा यांच्या समग्र काव्य-विचारामागे सतत जागे राहिलेले आहे. अशा प्रस्थापित वर्चस्ववादी पुरुषप्रधान मूल्यव्यवस्थेला नाकारणारी आणि स्त्रीच्या आत्मशोधाचा प्रवास विविध कोनांमधून पकडू पाहणारी नीरजा यांची कविता मराठीतील समूहलक्ष्यी प्रवाहाशी आंतरिक नाते जोडताना दिसते. 

स्त्रीला कायमच पुरुषाचे उपांग मानण्याच्या सनातनी वृत्तीला ठोकरणारी भाषा नीरजा यांच्या कवितेतून सतत ध्वनित होत असते. स्त्री-प्रतिमांचे सांकेतिक, साचेबंद चित्रण का केले जाते, कसे केले जाते, याची परखड शहानिशा हे त्यांच्या कवितागत अनुभवाचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. स्त्रियांच्या दुःखदायी कहाण्या पराभूत नियतीवादी दृष्टिकोनातून मांडणे अथवा स्त्रियांच्या कर्तेपणाला, शौर्याला पोवाडेसदृश्य जयजयकारात बंदिस्त करणे म्हणजे स्त्री-केंद्री जाणिवेतून लिहिणे अशी निखालस स्त्रीवादाच्या विरोधात जाणारी भूमिका नीरजा घेत नाहीत कारण लिंगभावाच्या जडणघडणीशी (Gender construction) असलेला व्यवस्थात्मक संदर्भ बेदखल करून स्त्री अथवा पुरुषाबाबतचे कोणतेही विधान करता येत नाही, याची पक्की जाणीव कवयित्री नीरजा यांना रोमँटिक होण्यापासून वाचवते. 

‘निरर्थकाचे पक्षी’ या कवितासंग्रहातून नीरजा यांनी उपरोक्त आशयसूत्रांना अधिक मोठ्या पटलावर नेऊन एक कवी म्हणून होत असलेल्या विकासक्रमाच्या खुणा सिद्ध केल्या आहेत. स्त्रीकेंद्री आशयसूत्रांसोबत भोवतालाचे तीव्र भान, अंतर्विरोधात्मक वर्तान वास्तवाचे तपशील आणि अशा भयकारी तपशीलाच्या दाबाखाली जगणारी सर्वच स्तरातली माणसे, त्यांचे जगणे ‘निरर्थकाचे पक्षी’मधून प्रतिमांकित झाले आहे. विशेषतः जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणाचा संत्रस्त कोलाहल, मूलतत्त्ववादात आणि हिंसेत होणारी त्याची अपरिहार्य परिणती, अध्यात्माच्या भरगच्च बाजारपेठांधून ईश्वराला प्राप्त झालेले विक्रीमूल्य आणि त्यातली हरवलेली करुणा, स्त्री-पुरुषांच्या नातेसंबंधांत आलेली विपर्यस्तता, स्त्रीपुरुषांचे स्व-अस्तित्वविषयक भौतिक स्तरावरील वाढते पेच, मॉल-संस्कृतीचे होत असलेले उदात्तीकरण आणि पृथ्वीतलावरच्या एकूणच मानवी समुदायाच्या सभ्यतेचा, मूल्यांचा होणारा विनाश आणि दिवसेंदिवस ठळक होत जाणारी माणसाची केवळ ग्राहककेंद्री ओळख आणि त्यातून येणारी परात्मतेची, विखंडिततेची भावना याचा प्रत्ययकारी कोलाज ‘निरर्थकाचे पक्षी’मधून प्रतिमित झाला आहे. 

उपरोक्त अनेक विषयांना ‘निरर्थकाचे पक्षी’मधील कविता भिडताना दिसतात, म्हणजे सध्याचे ज्वलंत इश्यूज डोळ्यांसमोर ठेवून त्याची विषयवार यादी वगैरे बनवून केवळ लिहायच्या म्हणून लिहिलेल्या आणि वर्णनात्मक पृष्ठस्तरावरच थांबून राहणाऱ्या असे या कवितांचे स्वरूप नाही. ‘निरर्थकाचे पक्षी’मधील व्यापक आशयसूत्रांना सेंद्रिय   एकात्मता लाभते ती नीरजा यांची कवी म्हणून असलेली जीवनदृष्टी, कलादृष्टी, कविता या साहित्य प्रकाराबाबतची त्यांची समझदारी आणि प्रत्यक्ष जीवनवास्तवाचा या सर्वांशी असलेला परस्परसंबंध यांतून. नीरजा या सर्व घटकांना कशा सामोऱ्या जातात; उपलब्ध आशयद्रव्याचे नेके कसे उपयोजन करतात आणि कविता हा साहित्यप्रकार किती सजगतेने हाताळतात हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. 

‘निरन्वय’, ‘वेणा’, ‘स्त्रीगणेशा’ या संग्रहातील काही निवडक मोजक्या कवितांचा अपवाद केल्यास त्यांच्या अनेक कवितांची घडण ही उपरोधाच्या अंगाने झालेली आहे असे दिसते. ताण, विरोध, उपहास, दंभस्फोट ही त्यांची एकूणच काव्यशैली आहे की काय, असा प्रश्न पडावा इतकी ती शैली त्यांच्या काव्यगत अनुभवकेंद्रावर प्रभाव गाजविताना दिसते. मात्र ‘निरर्थकाचे पक्षी’मध्ये आपल्या या शैलीला छेद देण्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत. परिणामी यातील काव्यानुभव हा सूक्ष्म, अनेकरेषीय आणि प्रसरणशील झालेला दिसतो. व्यक्तिलक्ष्यी, समूहलक्ष्यी, सौंदर्यलक्ष्यी असे विभाजन करता येऊ नये अशी विलक्षण सरमिसळ करून त्यांनी आपल्या कवितेची अर्थवत्ता विस्तीर्ण केली आहे. त्यांची सुरुवातीपासूनच साधी सोपी असलेली कविता ‘निरर्थकाचे पक्षी’मध्येही साधी सोपी आहे; परंतु हा साधेसोपेपणा इथे सुलभ न होता काळाशी संवादी राहून अवघडपणाकडे वाटचाल करतो. 

या संग्रहातील ग्लोबल कविता 1 व 2 मधून एकूणच सांस्कृतिक अधःपतनाचा स्वर प्रकट होतो. जागतिकीकरणाच्या तथाकथित प्रगत वास्तवातले स्त्रीवास्तव किती बदतर आहे हे त्या दाखवून देतात. 

उदाहरणार्थ, 
बाईला केवळ शरीर असतं हे तुचं तत्त्वज्ञान 
नाही पोचू देणार तिच्या मेंदूपर्यंत तुम्हांला 
ह्या ग्लोबल गावातही. 
विक्रीला काढलेल्या अनेक वस्तूंपैकी 
एक वस्तू बनवता आहात बाईला 
आणि ज्याम मजा येते म्हणून 
आनंदानं साजरा करताहात तुमचा पुरुषार्थ (पृ. 154) 

‘स्व’ची आदिम ओळख व्यक्तविणारी या संग्रहातील कविता (पृ. 147) तर एकूणच स्त्रियांच्या असतेपणाला, त्यांच्या श्रमाला, इतिहासातल्या त्यांच्या स्थानाला कसे अदृश्य करण्यात आले आहे याचा नितांतसुंदर अल्पाक्षरी पण नेका मागोवा घेते. 

‘निरर्थकाचे पक्षी’मधील भाषिक संवेदन अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असे आहे. भावनिकता आणि वैचारिकता यांचा सांधा नीरजा यांनी संपूर्ण संग्रहात कसोशीने सांभाळलेला आहे. व्यक्तिलक्ष्यी आणि समूहलक्ष्यी अभिव्यक्ती एकमेकांत खेळत्या ठेवून त्यांतून नाट्यमयता निर्माण करणे, अनोखे शब्द घडवणे, शब्दांची अपरिचितता दर्शविणे, शब्द-साहचर्य तत्त्वाला जाणीवपूर्वक विचलित करणे अशा भाषिक लकबी या संग्रहातील काव्याशयाला भावसमृद्ध आणि अर्थसमृद्ध बनवितात. 

Tags: पुरुषसत्ताक प्रा.गंगाधर पाटील माय मावशी प्रज्ञा दया पवार स्त्री स्वातंत्र्य कविता निरर्थकाचे पक्षी नीरजा patriarchy women freedom Women issues Poems Poetry Nirarthakache Pakshi Neeraja weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

प्रज्ञा दया पवार
pradnyadpawar@gmail.com

प्रज्ञा दया पवार ह्या मराठी कवयित्री आणि गद्य लेखिका आहे.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके