डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आनंद विंगकर यांच्या या कादंबरीचा लक्षणीय विशेष म्हणजे तीमधून प्रकटलेला जीवनार्थ. हा जीवनार्थ एकारलेला एकरेषीय स्वरूपाचा नाही. तो व्यापक अशा सहनानुभवाचा आहे. समकाळातील गावगाडा आणि त्यातील साऱ्या व्यवस्थेकडे एकांगाने पाहण्याची ही जीवनदृष्टी नाही. तर ती तिच्यामधील सर्व अंतर्विरोधासह समग्रतेने पाहणारी दृष्टी आहे. जात, समाजव्यवस्था, लिंगव्यवस्था यांकडे समग्रपणाने पाहण्याची दृष्टी या लेखकाच्या संवेदनशीलतेत आहे. वर्तमानातील काळवंडलेल्या विपरित दुष्टचक्राचेच केवळ ती कथन करत नाही; तर ग्रामीण जीवनात वर्षानुवर्षे झिरपत आलेल्या माणसाला तगून ठेवणाऱ्या जीवनदायी प्रेरणांचा विचार ती करते.  

ती बाहेर आली. अर्ध्या भाकरीहून लहानसर चंद्र मावळतीला गेला होता. एक शांत भारलेलं वातावरण होतं सर्वत्र. कसली धावपळ नाही, ना कसला कोलाहल. मानवी व्यवहाराला अजून सुरुवात व्हायचीय; इतकं प्राचीन. ती स्वतःशीच पुटपुटली. देवानं माझ्या ओंजळीत वाढलंय ते मी स्वीकारते; आणि उभी राहीन. तिने समोर पाहिलं, आज प्रथमच शुक्राचा तारा पूर्वेतून उगवताना तिला दिसला आणि गाय हंबरली. तिच्या मुखातून शब्द आले, ‘उठलेय मी, नाना.’ तिचा चेहरा खुलला. एका अपरिचित उल्हासाचं भरतं आलं तिच्या सर्वांगात. आणि वर्षानुवर्षे चराचराला परिचित असलेल्या अनुभवी शेतकऱ्यासारखी तिने दिवसाच्या कामाला सुरुवात केली.
(अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट) 

आनंद विंगकर यांची मराठी साहित्याला ओळख आहे ती कवी आणि कादंबरी लेखक म्हणून. ‘आत्मटीकेच्या उदास रात्री’ आणि ‘सुंबरान मांडलं’ या काव्यसंग्रहानंतर त्यांची ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट’ ही कादंबरी 2011 साली प्रकाशित झाली आहे. त्याआधी 2009 च्या ‘परिवर्तनाचा वाटसरू’ या दिवाळी अंकात ती प्रसिद्ध झाली होती. एकविसाव्या शतकाच्या आरंभपर्वात प्रसिद्ध झालेली ही मराठीतील महत्त्वाची साहित्यकृती आहे. समकालीन जीवनाचा आणि कादंबरीतील जीवनाशयाचा जवळचा संबंध आहे. विशिष्ट काळाच्या विपरित अशा काचातून ही कादंबरी निर्माण झाली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना ही कादंबरी अर्पण केली आहे. यावरूनदेखील या कादंबरीची दिशा ध्यानात येते. 

‘अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट’ ही एक सहा दिवसांची वा त्या काळातील घडामोडींची गोष्ट आहे. पश्चिम महाराष्ट्रातील समृद्ध प्रदेशालगत अंग चोरून वसलेल्या एका दुष्काळी प्रदेशातील ही कथा आहे. माणदेशाच्या भूभागात ही कथा घडते. अठराविेशे दारिद्र्य, निसर्गाची अवकृपा आणि अस्मानी सुलतानी काचात अडकलेल्या मानवी समूहाची कथा आहे. यशवंत, त्याची पत्नी पार्वती या शेतमजूर जोडप्याची ही कहाणी आहे. शेतीसाठी त्याने सावकाराकडून कर्ज घेतले आहे आणि दुसऱ्या बाजूला पतसंस्थेतील कर्ज त्याच्यावर आहे. आपल्या शेतात यावर्षी चांगले पीक येईल आणि कर्जाचा हिस्सा आपण काही प्रमाणात पूर्ण करू शकू असा त्याला विश्वास आहे. दरम्यान, त्याच्या घरातील पाळलेले बोकड विकून आलेल्या पैशातून कर्जाचा काही हिस्सा उतराई करू अशी त्याची धारणा आहे. गावातील एक कुत्रे या बोकडाच्या मानेचा लचका तोडते आणि बोकड मरण पावतो. तो कमालीचा संतापतो. या संतापाच्या भरात तो त्या बोकडाच्या लचका तोडलेल्या मानेवर विष टाकतो आणि तो बोकड ओढ्याला नेऊन टाकतो. दुसऱ्या दिवशी गावातील अनेक भटकी कुत्री आणि असंख्य कावळे बकऱ्याचे मांस खाल्ल्यामुळे मरून पडतात. यशवंतला या घटनेचा फार पश्चाताप होतो. 

एका बाजूला कर्जाच्या भितीचे सावट त्याच्या मनावर आहे. दुसऱ्या बाजूला त्याच्या शेतातील पीक बहरले आहे. पावसाचे ऋतुमान नसताना आकस्मिक जोराचा पाऊस कोसळतो. हाताशी आलेले पीक नाहीसे होते. अशावेळी त्याच्या हातून याप्रकारची घटना घडते. या पश्चातापाची भावनेने आणि परिस्थितीने उद्‌भवलेल्या पराकोटीच्या ताणामुळे अखेर यशवंता आपल्या पत्नीसह विष घेऊन आत्महत्या करतो. त्याच्या आत्महत्येच्या घडामोडीचे विस्तारणारे चित्रण या कादंबरीत आहे. या चार दिवसांत त्यांच्या मृत्युपश्चात सामाजिक जीवनातले अनेक पैलू कादंबरीत साक्षात केले आहेत. या कुटुंबाच्या शोकात्म कथेला अनेक कंगोरे आहेत. अनेक समांतर कथा आहेत. यशवंत आणि पार्वतीला तीन मुली आहेत. यशवंताचा भाऊ शहरात स्थायिक झालेला आहे. सया, दिलीप अशा गावातल्या व्यक्ती आहेत. यशवंत आणि पार्वतीच्या मृत्यूनंतर चारेक दिवसांनी थोरली मुलगी उषा जीवनाची नव्याने सुरुवात करते. ती कोलमडून पडत नाही. हे या कादंबरीचे कथनसूत्र आहे. 

कादंबरीच्या या जीवनार्थाला गेल्या दोन-तीन दशकांचा कालावकाश कारणीभूत आहे. जागतिकीकरणाने जे अंतर्विरोध निर्माण केले आहेत, त्या अंतर्विरोधांचे आणि दुष्ट चक्राचे गडद असे सावट कादंबरीतील जगावर आहे. एका बाजूला गतिमान अशा जागतिकीकरणाच्या भूलभुलैय्याचे डांगोरे पिटले जात आहेत; आणि दुसऱ्या बाजूला सार्वत्रिक अभावाचे, कष्टप्रद दुःखाचे जग खेड्यात आहे. जागतिकीकरणाच्या या चमकदार दुनियेपासून कोसो दूर असणारे हे जग आहे. शेती ही नेहमीच आतबट्ट्याची राहिलेली आहे. राज्यकर्ते व सांस्कृतिक धुरिणत्वाने नेहमीच शेतकऱ्यांच्या या जीवनाकडे गौरवीकरणाच्या व रोँटिकपणाच्या भावनेने पाहिलेले आहे. गेल्या वीस वर्षांत या शेतकऱ्याची हालत फार भयावह झालेली आहे. एका बाजूला मानवी कर्तृत्वाने आलेले दुष्टचक्र आहे आणि दुसऱ्या बाजूला निसर्गाची अवकृपा, या काचात दुभंगलेल्या भारतीय खेड्याचे लोकमानस ही कादंबरी व्यक्त करते. 

डोंगराएवढं कर्ज आणि विस्कटलेले गावातील समूह हे अनिष्ट चक्र तीमधून ध्वनित झाले आहे. संतापाने हे शेतकरी ‘कशाला हवी ही जिंदगानी’ ही अटळ परिणती कुणी थांबवू शकणार नाही म्हणून आत्महत्येला सामोरे जातात. या आत्महत्या नाहीत तर विशिष्ट काळातील मानवी हिंसेची व हत्याकांडाचीच रूपे आहेत. उत्तरोत्तर गावगाडा उजाड होत आहे. या गावगाड्याचे मसणवट्यात रूपांतर होते आहे. गावगाड्यातील हे समूह आतून-बाहेरून दुभंगलेले आहेत. एकविसाव्या शतकातील एका अर्थाने आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनाचे अपयश ही कादंबरी अधोरेखित करते. मानवी जीवनातील सार्वत्रिक दुष्टचक्राला सुरुवात झाली आहे. भविष्यात येऊ घातलेल्या अरिष्टांची सुरुवात आणि पृथ्वीचा सर्वनाशाकडे घरंगळत जाणारा जीवनप्रवास ही कादंबरी अधोरेखित करते. शत्रूचा ऑक्टोपसी चौफेर नांगरासारखा फिरणारा पंजा गावगाड्यावर घट्ट बिलगतो आहे. या पंजात घुसमटलेल्या मानवी जीवनाचा आकांत आणि आक्रोश ही कादंबरी चित्रित करते. 

या कादंबरीतील जीवनाशयाला विविधलक्ष्यी पैलू आहेत. बदलता गावगाडा आणि बदलती मानसिकता, शहर आणि खेडे यांतील अंतराय, निसर्ग आणि मानवी जीवन, पशुपक्ष्यांची सृष्टी आणि लोकमानस, मानवी श्रमाची उन्नत अशी रूपे अशा अनेक पैलूंना ही कादंबरी साक्षात करते. त्यामुळे कादंबरीची कक्षा विस्तारते. जरी या कादंबरीचा अवकाश दीर्घकथेचा वाटला तरी त्याच्यात अनेक गोष्टी फार जोरकसपणाने मुरवलेल्या आहेत. समकाळातील मानवी जीवनाचे बहुमुखीपणाच्या गुंतागुंतीचे अनेक स्रोत कादंबरीच्या अवकाशात पसरून ठेवले आहेत. 

ही कादंबरी केवळ एका विशिष्ट कालावकाशातील परिस्थितीच्या काचातून उद्‌भवलेल्या दुःखाचे, समस्येचे वा शोकात्म अनुभवाचे चित्रण करीत नाही. मानवी कर्तृत्वामुळे वाट्याला येणाऱ्या अशा पडझडीच्या काळातही माणूस तगून राहिला पाहिजे. माणसाला जगण्याची ऊर्जा बहाल करणाऱ्या जीवनचक्राचे अखंड भान कादंबरीतील चित्रणातून प्रकट झाले आहे. अपरिमित अशा दुःखाच्या आणि शोकात्म अनुभवातून त्या कुटुंबातील कर्ती मुलगी उषा कोलमडून पडत नाही. ती जीवनाची नव्याने मांडामांड करते. भोवतालचे निळे, हिरवे चराचर तिला खूप जुने परिचित, ओळखीचे वाटते. वर्तानाचे जग जरी मानवी कर्तृत्वामुळे काळवंडलेले असले; अवकाळी कोसळण्यातून सार्वत्रिक पडझड होत असली, तरी भोवतालचा निसर्ग आणि पशुपक्ष्यांची सृष्टी माणसाला जगण्याची ऊर्जा बहाल करते. ती जीवनाचे नूतनीकरण करते; उभारी देतो. भविष्यातील आशादायीपणाचे व तगण्याचे हे समग्रतेचे भान कादंबरीतून आविष्कृत झाले आहे. 

लेखकाची जीवनदृष्टी ही अभावाच्या जगाशी बांधिलकी सांगणारी आहे. श्रम आणि कष्ट यांवर विश्वास ठेवणारी ही जीवनदृष्टी आहे. कादंबरीत सतत मानवी श्रमावर आणि कष्टावर निरंतर असा विश्वास व्यक्त झाला आहे. कुऱ्हाड, पहार, फावडे, खुरपे, टोपली घेऊन बाहेर पडणारी माणसे आणि बायकांचा जथा खुडणीला निघाला आहे. तसेच कादंबरी ही शोकसंवेदनेत अडकून पडत नाही; तर ती नव्या जीवनाचे सूचन करते. या साऱ्या परिस्थितीत पालट होईल. हे सारे बदलेल. अन्यायाच्या विरोधात जिवावर उदार होणारी माणसे याच जीवनातून निर्माण होतील. यावर या कादंबरीकाराचा विश्वास आहे. राबणाऱ्याविषयी तुच्या उरात आस्था असायला हवी; तरच या लढ्याला नैतिकतेचे बळ प्राप्त होईल असा एक सामाजिक बांधिलकीचा जीवनार्थ या कादंबरीत आहे. ‘पुढं चालत राहायचं’ हे सूत्र तीमधून ध्वनित झाले आहे.  

आनंद विंगकर यांच्या या कादंबरीचा लक्षणीय विशेष म्हणजे तीमधून प्रकटलेला जीवनार्थ. हा जीवनार्थ एकारलेला एकरेषीय स्वरूपाचा नाही. तो व्यापक अशा सहनानुभवाचा आहे. समकाळातील गावगाडा आणि त्यातील साऱ्या व्यवस्थेकडे एकांगाने पाहण्याची ही जीवनदृष्टी नाही. तर ती तिच्यामधील सर्व अंतर्विरोधांसह समग्रतेने पाहणारी दृष्टी आहे. जात, समाजव्यवस्था, लिंगव्यवस्था यांकडे समग्रपणाने पाहण्याची दृष्टी या लेखकाच्या संवेदनशीलतेत आहे. वर्तानातील काळवंडलेल्या विपरित दुष्टचक्राचेच केवळ ती कथन करत नाही; तर ग्रामीण जीवनात वर्षानुवर्षे झिरपत आलेल्या माणसाला तगून ठेवणाऱ्या जीवनदायी प्रेरणांचा विचार ती करते. म्हणून या कादंबरीतील लेखकाची संवेदनशीलता ही व्यापक आणि समग्रतेचे भान प्रकट करणारी आहे. समकालीन लेखनातील ही ठळक आणि अधोरेखित करण्यासारखी बाब आहे. ही कादंबरी समकालीन जीवनातील मानवी समूहाला ग्रासलेल्या समस्येचे अंतर्भेदी चित्रण करत असली तरी हे चित्र एकांगी वा एकरेषीय होत नाही; भडक प्रचारस्वरूपाचे होत नाही. मानवी संबंधांत असणाऱ्या मूलभूत भावनांचे नातेसंबंधांतील ओलाव्याचे देखील चित्रण करते. माणसांना तगवून ठेवणाऱ्या जीवनदायी प्रेरणांचा उच्चार करते. त्यामुळे कादंबरीतून प्रकटणाऱ्या जीवनार्थाची कक्षा वाढते. या गावगाड्याच्या जीवसृष्टीचा एक अपरिहार्य भाग म्हणून या कादंबरीत पशुपक्षी प्राणिजीवनाचे चित्रण येते. तेही वरील जीवनदृष्टीचा विस्तार करण्यासाठी येते. ते फार प्रतीकात्मक रीतीने आले आहे. या पशुपक्षी-प्राण्यांशी संबंधित लोकमानसातील, लोकश्रद्धेचे ध्वन्यर्थही तिच्यामधून प्रकटले आहे. 


या कादंबरीचे भाषिक रूप आणि तिची गद्यशैली ही वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. दीडशे पानांच्या या कादंबरीतून अनेक गोष्टी सूचित केल्या आहेत. आशयाला पेलणारी प्रवाही अशी गद्यलय तिच्यामध्ये आहे. माणदेशातील ग्रामसंस्कृतीतील उच्चालय व चिन्हसृष्टी तिच्यामध्ये आहे. निवेदनाचाही सौंदर्यसर्जक असा वापर कादंबरीच्या रूपात केला आहे. लेखकाने कल्पिलेल्या निवेदकाने या कादंबरीवर आपल्या जीवनदृष्टीचा कॅमेरा सेट केला आहे आणि त्यामधून ही सारी दृश्यचित्रे चित्रित केली आहेत. त्यामुळे या तुकड्या तुकड्यांच्या दृश्यांतून एक कॅलिडोस्कोपी सुसंगत असा पट साकारतो. 

या निवेदनात वेगवेगळ्या निवेदनांच्या खुबींची मिसळण केली आहे. प्रथमपुरुषी, सर्वसाक्षी संवाद अशा तऱ्हा आहेत. गोष्ट कथन करण्याचे, वाचकांना सतत खिळवून ठेवण्याचे कौशल्य कादंबरीच्या निवेदनात आहे. काव्यात्मता आहे. कादंबरीतील गोष्ट पुढे नेण्यासाठी लेखकाचे जे प्रश्न आहेत ते वाचकांचेही आहेत. त्यांतूनही तो मार्ग काढत राहतो. निवेदक निवेदनात काही वेळा वाचकांना सहभागी करून घेतो. निवेदक मधूनच सांगतो, ‘पार्वतीला या गोष्टीत मला मारायचं नव्हतं/ म्हणाल तर ही कादंबरी मी इथेच संपवणार होतो’ असे वाचकांना त्याच्यात सहभागी करून घेतले आहे. ग्रामीण जीवनातील कुटुंबजीवनातील लोभस अशी उच्चाररूपे या कादंबरीत आहेत. माणदेशातील प्रादेशिक अशा भाषारूपांच्या निवेदनाची संवादाची व व्यक्तिभाषेची सहजलयीची रूपे या संरचनेत आहेत. 

एकंदरीत ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट’ मधून समकाळातील पृथ्वीवरील विनाशकारी दुष्टचक्राबरोबरच, दुखऱ्या शोकात्म संवेदनेबरोबरच मानवी जीवाच्या तगून राहणाऱ्या जीवनदायी प्रेरणांचा आविष्कार करते.

Tags: आत्महत्या दुष्काळ शेतकरी रणधीर शिंदे अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट पश्चिम महाराष्ट्र आनंद विंगकर Loan Suicides Drought Farmer Randheer Shinde West Maharashtra Anand Vingkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके