डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

गोचीदार प्रसंगात अत्यंत उपयुक्त

एकीकडे जगभर स्त्रियांच्या प्रश्नांचा विचार वाढत असला, तरी दुसरीकडे त्याचं ओझंही वाढत चाललंय. एक पाहणी-अभ्यास असं सांगतो. की जगामध्ये स्त्रियांच्या नावावर एक टक्का मालमत्ता आहे आणि नव्याण्णव टक्के पुरुषांच्या नावावर! स्त्रियांना कनिष्ठ मानणाऱ्या पुरुषप्रधान व्यवस्थेचं आणखी कोणतं ढळढळीत उदहारण हवं? या आणि अशा अनेकानेक कंगोऱ्यांचा विचार करणारं, विचार करायला प्रवृत्त करणारं आणि विचार करणाऱ्याला चालना देणारं ‘बाईाणूस’ पुन्हा पुन्हा वाचावं, आपल्या मनातल्या शंका वा अनुभव त्या निकषांवर घासून पाहावेत, परत-परत स्वत:ला नखलून बघावं इतकं ते नेटकं झालं आहे.  

करुणा गोखलेचं एका वाक्यात वर्णन करायचं झाल्यास, ‘"She is a short woman with long strides!’ 

तिची माझी पहिली भेट बऱ्याच वर्षांपूर्वी एका लेखाद्वारे झाली. त्या वेळी ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकात मी काम करत होते. ‘दंतकथा’ या शीर्षकाचा करुणानं लेख पाठवला होता. आपल्या बाळाच्या दाताच्या दुखण्यासाठी दंतवैद्याची पायरी चढल्यानंतर आलेला अनुभव, उपचारांतल्या त्रुटी, त्याकडे ‘नशीब’ म्हणून दुर्लक्ष न करता त्याविरुद्धची दिलेली लढत, यांचं हे उत्तम शब्दचित्र होतं. त्या लेखातले तपशील मला आठवत नाहीत, परंतु त्यातून तिचा प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन, अन्यायाविरुद्ध लढताना कोणताही अभिनिवेश न आणता चोख कायदेशीरपणे पकडलेली वाट आणि या सगळ्याचा आढावा घेताना लिखाणात असलेली वस्तुनिष्ठता मनात कुठेतरी खोलवर रुजली. 

करुणाच्या लिखाणाचा दर्जेदारपणा केव्हाही वाचकाला समृद्ध करून जातो, त्याची ती झलक होती. काही वर्षं अशीच गेली. त्यानंतर करुणा भेटली ती एका अनुवादाच्या निमित्तानं. त्यावेळी मी ‘राजहंस प्रकाशना’मधे होते. करुणाची भाषाशैली, अभ्यासू वृत्ती, विषयाची पकड घेण्याची क्षमता आणि या सर्वांबरोबरीनं स्त्री-मुक्ती चळवळीशी वर्षानुवर्षांचं असलेलं नातं हेरून प्रकाशक दिलीप माजगावकरांनी ‘स्त्रीवाद आणि स्त्री-मुक्ती चळवळ’ या विषयावर जनसामान्यांसाठी तिनं लिहावं, अशी जबाबदारी तिच्यावर टाकली आणि ‘बाईमाणूस’चा जन्म झाला. 

‘स्त्रीवादा’सारखा गहन विषय ‘सोपा’ करून मांडताना ‘पातळ’ होऊ न देणं फार अवघड होतं. परंतु ही अवघड कामगिरी अपेक्षेबरहुकूम करुणानं कमालीच्या सहजतेनं पार पाडली. याचं इंगित अर्थातच करुणाच्या एकूण व्यक्तिमत्त्वात दडलेलं आहे. ती बुद्धिमान आहेच; तिचं वाचन अफाट आहे, प्रत्येक गोष्टीमागे स्वत:चा विचार आहे; स्त्री-मुक्ती चळवळीमधे काम करण्याचा वर्षानुवर्षांचा दांडगा अनुभव आहे आणि त्यातून येत गेलेली प्रगल्भताही आहे. करुणाच्या बाबतीतला आणखी एक विरळा गुण म्हणजे तिच्या सगळ्या विचारांना एक तात्त्विक बैठक आहे. त्यामुळेच तिचं मूळ लेखन असो वा अनुवाद असो, त्या-त्या लिखाणाला अर्थपूर्ण सलगता आणि परिपूर्णता असते. 

करुणाचे सात अनुवाद प्रकाशित झाले आहेत. आता महाराष्ट्र फाऊंडेशनचा वैचारिक साहित्याचा पुरस्कार मिळवणाऱ्या ‘बाईमाणूस’ला महाराष्ट्र शासनाचा भा.ल.भोळे पुरस्कारही मिळाला आहे. ‘बाईमाणूस’, वैशिष्ट्यं मांडण्यापूर्वी मला आवर्जून करुणाच्या अनुवादाच्या ताकदीचा उल्लेख करावासा वाटतो. अनुवाद हा नेहमी भावानुवाद असावा आणि त्या लेखकाचं संपूर्ण लेखन- तो ज्या भाषेत लिहितो- त्यातल्या सांस्कृतिक, भौगोलिक, ऐतिहासिक, राजकीय, सामजिक संदर्भांसहित, अर्थच्छटांसहित समजून घेऊन मगच ते आपल्या भाषेधे उतरवावं, या अभिजात व्याख्येचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे करुणाचे अनुवाद आहेत. दृष्ट लागू नये म्हणून तीट लावण्यासारखा तिच्या लिखाणातला बारीकसा दोष काढायचाच झाला, तर ती विशिष्ट मर्यादेच्या अलीकडे सोपं लिहू शकत नाही, एवढंच! 

‘बाईमाणूस’च्या लेखनप्रक्रियेमधे असतानाच करुणानं एकदा एक फार महत्त्वाचा मुद्दा मांडला. ती म्हणाली, ‘‘चळवळीच्या अनुषंगानं काम करत असताना स्त्रीप्रश्नांबाबत अनेकदा लोकांबरोबर सवाल-जबाब घडत असतात. अशा वेळी स्त्रीवादाचा सखोल अभ्यास असणाऱ्या एका तरी तयारीच्या व्यक्तीला आम्ही बरोबर घेतो; नाहीतर ऐनवेळेला जर योग्य प्रतिउदाहरणं किंवा बिनतोड प्रत्युत्तरं देता आली नाहीत, तर फार पंचाईत होते.’’ हा अनुभव सार्वत्रिकच म्हणावा लागेल. विशेषत: स्त्री-प्रश्नांच्या बाबतीत पुरुषच नव्हेत, तर बायकासुद्धा एवढ्या तोंडघशी पाडतात, की ‘You too Brutus?' असं म्हणावंसं वाटतं. यामागे ‘पुरुषश्रेष्ठत्व’ आणि ‘स्त्रीची नगण्यता’ मानव जमातीत आदिकाळापासून मुरलेलं आहे, हे कारण आहे. 

स्त्रीमुक्ती चळवळीद्वारे आजवर यावर बराचसा ऊहापोह झाला असला, तरीही स्त्री-प्रश्नांबाबतची ‘अनाकलनीयता’ आणि ‘अनभिज्ञता’ एवढी व्यापक आहे, की ‘आला प्रश्न की त्यावर गोळीबंद उत्तर’ फेकता येत नाही. कारण अगदी पुरोगामी म्हणवणाऱ्यांच्या मनातसुद्धा ‘स्त्री-प्रश्नां’बाबत स्पष्टता असतेच असं नाही. याशिवाय, परंपरागत स्त्री-प्रश्नांना आज जरी किमान वाचा फुटली असली, तरीही काळ बदलत जातो, तसतशी प्रश्नांची रूपं कालानुरुप बदलत जातात, त्यांचं काय? पुरुषप्रधानता आणि स्त्रीचं दुय्यमत्व समाजातून उखडून काढून पुन्हा नवनव्या प्रश्नांना सामोरं जात राहणं हे शिवधनुष्यच होऊन राहतं. अशा गोचीदार प्रसंगात अतिशय उपयुक्त ‘मार्गदर्शक’ ठरेल इतकं मूलभूत काम ‘बाईमाणूस’द्वारे करुणानं करून ठेवलं आहे.

या पुस्तकाचा गाभाघटक आणि वेगळेपण नमूद करण्यासाठी करुणाच्याच मनोगतातल्या दोन परिच्छेदांचा आधार घेते. ‘सदर पुस्तक म्हणजे स्त्रीमुक्ती चळवळीचा संक्षिप्त इतिहास नाही. इतिहास म्हटला, की त्यात महत्त्वाच्या घटना, सनावळ्या आल्या. यातलं काहीच या पुस्तकात सापडणार नाही. याचं कारण हे पुस्तक स्त्री-चळवळीच्या अभ्यासकांसाठी नसून, कुठल्याही क्षेत्रातल्या जिज्ञासू अशा वाचकांसाठी आहे. अशा वाचकवर्गाला घटना, सनावळ्या यापेक्षाही विशिष्ट विषयामागील भूमिका/विचार जाणून घेण्यात अधिक रस असतो. म्हणूनच हे पुस्तक ‘स्त्रीमुक्ती’ या ‘संकल्पनेस’ मध्यवर्ती ठेवून रचलेलं आहे. स्त्रीमुक्तिवादाच्या परिघात स्त्रीजीवनाशी निगडित, किंबहुना मानवी समाजरचनेतले कोणकोणते मुद्दे येतात त्यांची चर्चा यात केली आहे. ती करताना क्लिष्टता येऊ नये याचं भान सतत ठेवावं लागलं. याच कारणास्तव स्त्रीमुक्ती या शब्दप्रयोगाच्या विविध व्याख्यासुद्धा इथे उद्‌धृत केलेल्या नाहीत. असं असूनही स्त्रीमुक्ती म्हणजे नक्की काय, याची पुरेशी जाण वाचकाला येईल असा प्रयत्न इथे केला आहे. 

स्त्रीमुक्ती या संकल्पनेची बहुतांश वेळा, बहुतांश लोकांकडून हेटाळणी होते याचं कारण समाजव्यवस्थेत आणि पर्यायानं मनुष्याच्या दैनंदिन व्यवहारात स्त्रीला किती जाचक नियमांनी जखडलेलं असतं ते बहुतांशांच्या लक्षातच येत नाही. स्त्रीवरील एकतर्फी निर्बंध लक्षात आणून देणं हा पुस्तकाचा मुख्य हेतू आहे. स्त्रीच्या ललाटी लिहिलेलं दुय्यमत्व समाजाला तर सोडाच, पण तिलासुद्धा अनेकदा जाणवत नाही. ते जर जाणवलं, तरच ते खटकेल. जर ते खटकू लागलं, तरच त्यांवर पोटतिडिकीनं भाष्य करणारा स्त्रीमुक्तिवाद जाणून घेण्याची इच्छा होईल. तशी ती व्हावी हा या पुस्तकामागचा उद्देश आहे.’ 

जगभरच्या स्त्रीमुक्ती चळवळीला दोनशे वर्षांचा इतिहास आहे. करुणानं हे पुस्तक लिहिण्याआधी स्त्रीवादी लेखिकांच्या बऱ्याच पुस्तकांचा अभ्यास केलेला आहे. या चळवळींनी उघड केलेले प्रश्न आणि त्यांचं विश्लेषण जाणून घेतलं आहे. या पुस्तकाची सुरुवात ‘स्त्रीदेह’ नावाच्या प्रकरणातून होते. यामधे स्त्रीच्या शरीराबाबतच्या तर्कदुष्ट विधानांचा सर्वांगांनी तर्कसुसंगत प्रतिवाद करत ‘स्त्री-पुरुष समानतेची चळवळ’ ही एका दृष्टीनं सुजाण पालकत्वाची चळवळ कशी व्हायला हवी, इथपर्यंत हे प्रकरण आपल्याला बोट धरून आणतं. 

पुस्तकाच्या प्रत्येक प्रकरणामधे त्या त्या विषयाबाबतचे समाजातले प्रचलित समज-गैरसमज, रुढी-परंपरा, शास्त्रीय कारणमीमांसा, स्त्रीमुक्तिवाद्यांचे आणि चळवळीचे त्यांबाबतचे आक्षेप, त्यांवरची उत्तरं आणि चळवळीमागच्या धोरणांची उद्दिष्टं असं व्यापक पटल आहे. आणि सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्याला वर्तानातल्या प्रश्नांची जोड असल्यामुळे त्याची कालसापेक्षता वादातीत ठरली आहे. शिवाय स्त्रीचं समाजाला असलेलं योगदान अधोरेखित करणं हे स्त्रीवादी समीक्षेचं मोठं उद्दिष्टही या पुस्तकातून पुढे येतं. आणि सर्वांत शेवटच्या ‘समारोपा’त स्त्रियांपुढच्या अव्याहत आव्हानांचा एक संक्षिप्त धांडोळा घेण्यात आला आहे. ‘कारण स्त्रीचं काम कधी संपत नाही’ या एका अज्ञात लेखकाच्या वाक्यानं सुरुवात होणारे तीन परिच्छेदच Women's rights are human rights’ कसे, याची फार रसाळ मांडणी करतात. 

‘कारण स्त्रीचं काम कधी संपत नाही.’ ...कारण त्या कामाचा तिला मोबादला मिळत नाही, किंवा कमी मिळतो. ...कारण सगळ्यांत आधी आम्हांलाच  नोकरीवरून डच्चू मिळतो... कारण स्त्रीच्या वाट्याला तीच तीच, एकसुरी, कंटाळवाणी कामं येतात,... कारण आमच्या कामापेक्षा आम्ही दिसतो कसे याला जास्त महत्त्व असतं;... कारण आमच्यावर बलात्कार झाला तर तो आमच्याच चुकीमुळे होतो आणि आम्हांला कुणी मारहाण केली, तर आम्ही त्याला चिथावलेलं असतं म्हणून... 

आम्ही जर आमच्या हक्कांसाठी आग्रह धरला, तर आम्ही आक्रमक आणि पुरुषी; आग्रह नाही धरला, तर आम्ही स्त्रीसुलभ दुबळ्या! आम्हांला जर लग्न करावंसं वाटलं, तर आम्ही पुरुषाला जाळ्यात ओढायला निघालो आहोत असं समजतात आणि लग्न नाही केलं, तर आम्ही विक्षिप्त!.. या आणि अशा अनेक कारणांसाठी आम्ही स्त्रीमुक्ती-चळवळीत सामील झालो आहोत.’ करुणानं प्रत्येक प्रकरणाची सुरुवात करताना, त्यातल्या आशयाला सुसंगत ठरतील अशी स्त्रीवादी लेखकांची वेचक वाक्यं दिली आहेत. उदाहरणच द्यायचं झालं, तर ‘विषयप्रवेश’ करताना तिनं, रेबेका वेस्ट या स्त्रीवादी लेखिकेचं पुढील वाक्य दिलं आहे. ‘स्त्रीमुक्तिवाद म्हणजे नक्की काय हे मला नीटसं कळलेलं नाही. पण मी जेव्हा मला लोकांनी पायपुसणं, किंवा वेश्या समजू नये असं आग्रहानं मांडते, तेव्हा लोक मला स्त्रीमुक्तिवादी म्हणतात.’ 

या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, करुणा कोणत्याही प्रकारे ‘राजकीय डावपेचात’ अडकलेली नाही. मथितार्थ असा, की भारतातल्या स्त्रीमुक्ती चळवळीवर डाव्या राजकीय विचारप्रणालीचा जबरदस्त पगडा आहे. त्यामुळे पुष्कळ वेळा होतं असं, की त्या राजकीय विचारांच्या चौकटीतलीच उदाहरणं देण्याचा मोह पडतो. ‘राजकारण’ आणि ‘चौकट’ या दोन गोष्टी आल्या, की अपरिहार्यपणे प्रतिवादाची तेवढ्याच ताकदीची उदाहरणं समोर उभी राहतात. वस्तुस्थिती एक आणि उदाहरणं दुराग्रहानं विशिष्ट राजकीय विचारप्रणालीला बांधलेली असली, तर मूळ प्रश्न राहतो बाजूला आणि उरतो तो नुसताच अभिनिवेश! करुणानं हे ‘टाळलं आहे’ असं म्हणण्यापेक्षा करुणाच्या व्यक्तिमत्त्वात प्रगल्भता असल्यामुळे या पुस्तकाला एक निखळ वैचारिक आत्मभान लाभलं आहे, असं मी म्हणेन आणि पुस्तकाच्या यशस्वितेागचं ते एक मोठं श्रेयच आहे, असंही मानेन. 

‘स्त्री’ एकसंध समाज नसल्यामुळे तिचे प्रश्न जगड्‌व्याळ आहेत. स्त्रियांचे प्रश्न ‘स्त्रियांचे’ म्हणून नव्हेत, तर मानवी प्रश्न म्हणून मांडायला हवेत, तरच स्त्रीमुक्ती समानतेची चळवळ वृद्धिंगत होऊन अपेक्षित ध्येयापर्यंत पोचेल अशा आशेला नक्की जागा राहील, याची ग्वाही या पुस्तकातून मिळते. मात्र यासाठी पुरुषांची मानसिकताही बदलायला हवी आहे. वर्षानुवर्ष धर्माचं नेतृत्व पुरुषांकडे आणि सांभाळ स्त्रियांकडे राहिल्यानं स्त्रियांच्या प्रश्नांना दु:सह साखळदंड लाभले आहेत. त्यामुळे एकीकडे जगभर स्त्रियांच्या प्रश्नांचा विचार वाढत असला, तरी दुसरीकडे त्याचं ओझंही वाढत चाललंय. एक पाहणी-अभ्यास असं सांगतो, की जगामध्ये स्त्रियांच्या नावावर एक टक्का मालमत्ता आहे आणि नव्याण्णव टक्के पुरुषांच्या नावावर! स्त्रियांना कनिष्ठ मानणाऱ्या पुरुषप्रधान व्यवस्थेचं आणखी कोणतं ढळढळीत उदहारण हवं? 

या आणि अशा अनेकानेक कंगोऱ्यांचा विचार करणारं, विचार करायला प्रवृत्त करणारं आणि विचार करणाऱ्याला चालना देणारं ‘बाईमाणूस’ पुन्हा पुन्हा वाचावं, आपल्या मनातल्या शंका वा अनुभव त्या निकषांवर घासून पाहावेत, परत-परत स्वत:ला नखलून बघावं इतकं ते नेटकं झालं आहे.

Tags: स्त्रीमुक्ती बाईमाणूस सेकंड सेक्स सिमॉन द बोवा करुणा गोखले Simone de Beauvoir Second sex Baimanus Sujata Deshmukh Karuna Gokhale weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके