डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अमरावती जिल्ह्यातील एका खेड्यात जन्माला आलेले ठाकूरदास बंग 1936 मध्ये नागपूर विद्यापीठात बी.ए.ला पाच सुवर्णपदकांसह प्रथम आले, त्यानंतर अर्थशास्त्रात सुवर्णपदकासह एम.ए. व एल.एल.बी. करून अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून वर्ध्याला रूजू झाले. पण 1942 ला गांधीजींनी ‘चले जाव’ चळवळ सुरू करून ‘करा किंवा मरा’ असे आवाहन केल्यावर प्रोफेसर बंग राजीनामा देऊन भूमिगत झाले आणि स्वातंत्र्य आंदोलनात उतरले. त्यानंतरचे त्यांचे संपूर्ण आयुष्य देशकार्यासाठीच राहिले. विनोबांनी भूदान चळवळ आणि जयप्रकाशनांनी ‘संपूर्ण क्रांती’चे आंदोलन केले तेव्हाही ठाकूरदासजी आघाडीवर राहिले. जवळपास 20 वर्षे ते सर्व सेवा संघाचे आधी महामंत्री व नंतर अध्यक्ष राहिले. आज 95 वर्षांचे असलेल्या ठाकूरदासजींनी आयुष्यातील 70 वर्षे निष्काम कर्मयोगाचा संदेश अंमलात आणला. 

प्रश्न - परवाच तुम्हांला वयाची 95 वर्षे पूर्ण झालीत. तुम्हांला तुमच्या आयुष्याबद्दल काय वाटते? 

श्री. बंग - जणु ईश्वराचं वरदान होतं. 

प्रश्न - तुमच्यावर सर्वांत अधिक परिणाम कशाचा? 

श्री. बंग - भगवद्‌गीतेचा. शरीर नश्वर आहे आणि आत्मा अमर आहे, हा गीतेचा संदेश माझ्यावर खोल परिणाम करून गेला. दुसरा संदेश निष्काम कर्मयोगाचा, हे दोनच आयुष्यभर पुरलेत. प्रश्न - तुच्या आयुष्यातील सर्वांत उज्ज्वल व आनंदाचा क्षण? 

श्री. बंग - 15 ऑगस्ट 1947, भारताला स्वातंत्र्य मिळालं म्हणून, पण सोबतच ते गांधीजींच्या मार्गाने मिळालं म्हणून. 

प्रश्न - आयुष्य पुन्हा मिळालं तर काय करू इच्छाल? 

श्री. बंग - भारतातच जन्म घेऊन सेवा करू इच्छीन. 

प्रश्न - काय केल्याबद्दल तुम्हाला सार्थकता वाटते? 

श्री. बंग - 1942 च्या आंदोलनात सहभाग , 1953 पासून भूदान आंदोलन, व 1973 पासून जयप्रकाशांचे संपूर्ण क्रांती आंदोलन यांत असल्याचा आनंद व रोमांच अजून संपत नाही. 

प्रश्न - काय करायला नको होतं असं आज वाटतं? 

श्री. बंग - बेचाळीसच्या आंदोलनात मी भूमिगत होऊन व मग पुढे तुरुंगात काही तोडफोडीची कृत्यं केलीत. त्याविषयी आज मनात खेद आहे. 

प्रश्न - 1980 नंतरच्या काळात, विनोबा व जयप्रकाश दोघांचाही काळ संपल्यावर, तुम्ही काय करायला हवं होतं असं आता मागे वळून तुम्हांला वाटतं? 

श्री. बंग - आम्ही व्यवस्थेविरुद्ध आंदोलनं केलीत. पण आंदोलनांसोबत सेवाही करायला हवी होती. 

प्रश्न - अण्णा हजारेंच्या आंदोलनाबाबत तुम्ही काय भूमिका घेतली असती? 

श्री. बंग - त्यात सक्रिय सहभाग घेतला असता, पण त्यापूर्वी राळेगणसिद्धीला कामाची साधना केली असती.

प्रश्न - भविष्याविषयी तुम्हाला काय वाटतं? 

श्री. बंग - जग बदलेल. अधिक चांगलं होईल. मी पूर्ण आशावादी आहे. 

प्रश्न - जगात काय व्हावं असं तुम्हाला आज वाटतं? 

श्री. बंग - महाराष्ट्र खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वर व तुकारामांचा व्हावा, आध्यात्मिक व सात्त्विक व्हावा. 
- भारत - केवळ आर्थिक दृष्टीने समृद्ध नव्हे तर आरोग्यवान व्हावा. 
- विश्वात शांती, युद्धमुक्ती व्हावी. कायमची! 

Tags: अण्णा हजारे जयप्रकाश नारायण गांधी १९४२ नागपूर अमरावती जीवनगौरव ठाकूरदास बंग Anna Hajare Jayprakash Narayan Gandhi 1942 Nagpur Amravati Thakurdas Bang weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके