डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

राजा व शहरातील नागरिक, गरीब व दरिद्री बनले. खजिन्यात ठणठण गोपाल! हे पाहून राजाला खूप राग आला, त्याने दिलेले सगळं द्रव्य हस्तगत करण्यासाठी पुन्हा एका क्रूर सेनापतीस सैन्य घेऊन पाठवलं. राजाच्या सैनिकांच्या पाठलागाची कल्पना चौघांच्या लक्षात आली. सेनापती चारही शिलेदारांचा मार्ग रोखून म्हणाला, 'अरे मूखांनो, राजाचं सगळं द्रव्य परत करा. मी तुम्हांला कैद करून तुरुंगात टाकणार आहे. नसता मरणास तयार व्हा.' 

फार पूर्वी एका दुष्ट राजाच्या पदरी एक शूर व इमानी सैनिक नोकरी करीत होता. बरीच वर्षे नोकरी करून व बऱ्याचशा लढाया गाजवून देखील बिचाऱ्या सैनिकास एकही शौर्यपदक देखील मिळाले नाही; किंवा साधे बक्षीसही मिळाले नाही. उलट जेव्हा जेव्हा तो सुट्टीवर घरी जाई, तेव्हा तेव्हा त्यास सोबत थोडासा पाव आणि चांदीची तीन नाणी एवढेच भेटे. एकदा तो असाच घरी निघाला असता तो स्वतःशी म्हणाला, "मी या चिक्कू व दुष्ट राजाला चांगली अद्दल घडवीन." एवढे बोलून त्याने नद्या, जंगल, डोंगर व पर्वताच्याही पलीकडे असलेल्या राजाच्या राजवाड्याकडे आपला मोर्चा वळविला. रस्त्याने जाताना त्याला अगदी उंच ताड माणूस भेटला. तो एवढा उंच होता की त्याची टोपी ढगात लपली होती. त्याने विचारले, 'सैनिक मित्रा, तू कुठे निघालायस?'

सैनिकाने आपली सगळी हकीकत सांगितली. 'गेल्या दहा वर्षांच्या नोकरीत मी त्या दुष्ट राजाकडे नोकरीस असून नेमबाजीत तज्ज्ञ झालो आहे. शिवाय कवायतही उत्तम येते.' 'कवायत?' त्या लंबूने विचारले. कारण कवायत कशी असते, त्याला काहीच माहीत नव्हते. तेव्हा सैनिक म्हणाला, 'शिस्तीत वेगाने चालणे म्हणजे कवायत.' 'अरे वा! मी देखील अगदी दूरपर्यंत अंतर एका पावलात चालू शकतो. त्यामुळे याबाबतीत आपले जमेल, आपण दोघं मित्र झालो.' 

'तर मग आपण दोघं त्या दुष्ट राजाच्या राजवाड्याकडे जाऊ या का? आपण दोघं मिळून त्याला चांगली अद्दल घडवूया!' सैनिक म्हणाला. 

ते दोघं पुढे निघाले तोच त्यांना एक प्रचंड आकाराचा धिप्पाड माणूस आख्खा पर्वत उचलून पोत्यात भरताना दिसला. 'तू काय करतोयस?' या दोघांनी त्याला विचारले. 'माझ्या प्रवासात हा पर्वत अडथळा आणतोय, तेव्हा मी त्याला उचलून घेऊन समुद्रात टाकणार आहे. माझ्या शक्तीचा उपयोग काय?' तो माणूस म्हणाला. सैनिकाला नि लंबूला वाटलं की या विशालकाय बलवंताचा आपल्याला उपयोग होईल. या दोघांनी विचारले, 'मित्रा, आम्ही एका दुष्ट राजाची खोड मोडायला निघालो आहोत. आम्हाला तुझी मदत हवीय: येशील का?' दोघांच्या विनंतीला मान देऊन तो या दोघांबरोबर निघाला.

चालता चालता ते एका मोकळ्या शेतातून जात असताना त्यांना खूप पवनचक्या चालू असलेल्या दिसल्या. एक माणूस त्याच्या एका नाकपुडीने हवा सोडून त्या पवनचक्क्यांच्या पंखांना फिरवीत होता. असं विचित्र दृश्य पाहून असाही एखादा माणूस आपल्याबरोबर असावा असं त्याला वाटलं. तसं त्याला त्यांनी विनवलं. त्यानेही मंजुरी दिली नि चौघे मित्र राजवाड्याच्या रोखानं निघाले. 

सर्वांत पुढे सैनिक, त्याच्या मागे लंबू, त्याच्या मागे बलदंड, प्रचंड माणूस व त्यामागे पवनप्रभू वारा सोडणारा. अशी ही वरात राजवाड्याच्या दारापर्यंत येऊन पोहोचली. प्रवेशद्वाराजवळ रक्षकासारखे क्रूर भयंकर पहारेकरी उभे होते. पण त्यांना न भिता सैनिक धीटपणे म्हणाला, 'मला राजाला भेटायचंय, मी आत जाऊ शकतो का?' तेव्हा पहारेकऱ्यांनी विचारले, 'तू कोण आहेस?' तुझे राजाकडे काय काम आहे?' 'मी एक सैनिक आहे. मी दहा वर्षे इमानदारीने सेवा केली त्याच्या मोबदल्यात मला मिळाला एक एवढासा पाव व चांदीची तीन नाणी! हेच का माझ्या सेवेचे फळ? त्याबद्दल राजाला जाब विचारायला आलोय. असं सैनिक निर्भयपणे म्हणाला. 'ठीक आहे. एका अटीवर मी तुला प्रवेश देतो.' 'कोणती अट?' सैनिकाने विचारले, 'आपण धावण्याची शर्यत लावू या. या शर्यतीत मला हरविल्यास तुला प्रवेश मिळेल. कबूल?" काही वेळ विचार करून सैनिक म्हणाला, 'बस, एवढेच?' हे काम तर मीच काय, पण माझा नोकरसुद्धा करील. आधी तू माझ्या नोकराला हरव, मग माझ्याशी शर्यत लाव.' पहारेकऱ्याने संमती दिली. 

तो लंबूटांग नि पहारेकरी पळण्याच्या पावित्र्यात उभे राहिले! एक-दोन-तीन म्हणताच शर्यत सुरू झाली. पहारेकरी वाऱ्यासारखा धावत होता, तर लंबू दोन पावलं टाकून त्याच्या पुढे हजर! असं करता करता पहारेकरी घामाघूम झाला व धापा टाकीत परतला; हरला नि त्याने सैनिकाला प्रवेश दिला.

सैनिक राजासमोर जाऊन उभा राहिला. राजा त्या सैनिकाला पाहून स्तिमित झाला. सैनिक राजाला म्हणाला, 'महाराज, मी इमाने इतबारे दहा वर्षे सेवा केली. त्याचा पुरेसा मोबदला मला आपण दिला नाही.' 'यापेक्षा अधिक तुला काय हवंय?' 'राजेसाहेब, मला तुमची कन्या द्या. मी तिच्याशी विवाह करीन.'

हा संवाद राजकन्या गुप्तपणे ऐकत होती. ती हा संवाद ऐकून खूष झाली. पण राजा तितकासा खूष दिसत नव्हता. थोडा वेळ विचार करून राजा म्हणाला, 'राजकन्येशी लग्नाची तुझी लायकी तरी आहे का? पण तुझ्या सेवेचा विचार करता पाहिजे तेवढं धनद्रव्य मात्र मी देतो. पण राजकन्या नाही.' तेव्हा सैनिक म्हणाला, "ठीक आहे. एक नोकर मी सोबत आणलाय, तो उचलून नेऊ शकेल तेवढे धन देण्यास तयार असशील तर बोल. आहे कबूल? राजा एकदम खूष झाला. त्याला नोकराच्या शक्तीचं अनुमान करता आलं नाही. म्हणून तो धन देण्यास आनंदाने तयार झाला. खजिनदाराला खजिन्यातून द्रव्य देण्याची आज्ञा दिली. संपूर्ण खजिना रिकामा झाला. त्या विशालकाय मित्रानं आपल्या पोत्यात ते धन घेतलं. पोतं अर्धदेखील भरलं नाही. ते त्याने एका चिमटीत धरून वर उचललं नि म्हणाला, 'बसं! एवांच ओझं! हे तर काहीच नाही.' तेव्हा राजाने आपले शिपाई शहरात पाठविले व सर्व श्रीमंतांकडे असेल नसेल तेवढे द्रव्य आणायला सांगितलं. थोड्याच वेळात वीस गाड्या भरून द्रव्य आणलं, त्या विशालकाय बलवंतानं सगळं द्रव्य दोन्ही हातांनी पोते उचलून आपल्या पाठीवर टाकलं व म्हणाला, 'वा! हे पुरेसं आहे. चला आपण आता निघूया.' 

राजा व शहरातील नागरिक, गरीब व दरिद्री बनले. खजिन्यात ठणठण गोपाल! हे पाहून राजाला खूप राग आला, त्याने दिलेले सगळं द्रव्य हस्तगत करण्यासाठी पुन्हा एका क्रूर सेनापतीस सैन्य घेऊन पाठवलं. राजाच्या सैनिकांच्या पाठलागाची कल्पना चौघांच्या लक्षात आली. सेनापती चारही शिलेदारांचा मार्ग रोखून म्हणाला, 'अरे मूखांनो, राजाचं सगळं द्रव्य परत करा. मी तुम्हांला कैद करून तुरुंगात टाकणार आहे. नसता मरणास तयार व्हा.' 

हे ऐकून पवनप्रभू वायुशक्तीचा वापर करणारा मित्र पुढे सरसावला नि ढगांच्या गडगडाटासारखं हसू लागला. हसता हसता त्याने आपली नाकपुडी दाबली नि दुसऱ्या नाकपुडीने श्वास सोडू लागला. सेनापती सोडून बाकीचं. सैन्य चुरमुऱ्यासारखं उडून ढगात गेलं नि खाली पटापट पडलं नि मेलं. हे अद्भुत दृश्य पाहून सेनापती घाबरला, त्याने चारही जणांची क्षमा मागितली. प्राणाची भीक मागून पळून गेला. 

राजाला हकीकत सांगितली. ती ऐकून राजाही घाबरला. तो स्वतःशीच म्हणाला, निर्धन राजा काय कामाचा? दागदागिन्यांशिवाय राजकन्या कसली? तेव्हा त्या सैनिकाला परत बोलावून राजकन्येशी लग्न लावल्यानेच आपली संपत्ती परत मिळेल असा विचार करून तो सैनिकाकडे गेला. त्याला राजवाड्याकडे चलण्याची विनंती केली. सैनिकाने ती मान्य केली. लवकरच निकटच्या शुभमुहूर्तावर सैनिक व राजकन्येचा धूमधडाक्यात विवाह झाला. राजाने राज्याची सगळी सूत्रे जावयाच्या हातांत दिली. राज्यातील सर्व दुष्टांना हद्दपार केलं. लोकांनी जावयाच्या अर्थातच सुखी व समाधानी राज्यात आपली अखेरची वर्षे सुखा-समाधानाने व्यतीत केली. 

Tags: साहित्य कथा बालसाहित्य बालवाङ्मय महावीर जोंधळे सैनिक नावाचा माणूस Mahavir Jondhale A man named Sainik weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके