डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

गेली पंचवीस वर्षे मी

गल्ली बोळ नदी नाले

शेती पहाड रस्ते

तुडवत...

कुच-कुचत का होईना

माझ्या खोप्यात

येऊन

पडतोय्‌.

तशी कुठे असते शाश्वती

गेलेला येईलच परत

संध्याकाळी

वर्षाआड

एकेक दोन-दोनदा

चैन म्हणून केवळ

गाडी नव्हे मॉडेल

बदलणारेच

सहज सांगू शकतात

विकाना का हे डबडं भंगारात,

फेका तो खटारा खदानीत

म्हणतात

मुलंही.

हॉर्न सोडून वाजते

बाकी सारी गाडी.

मी आलो वा गेलो घरून

खबर होते साऱ्या गल्लीला

परिचित आवाजाने

खिळ-खिळी झालीयेत हाडे

गाडीची. आपली.

नुकती लागली होती नोकरी

जेव्हा ही नवी नवरी

आणली होती घरी.

कसं झालं होतं मला

कुठे न्‌ कसं ठेवू हिला;

कोण बसेल सांगत.

आपल्या

तशा हिच्याही खस्ता

आता

गेली पंचवीस वर्षे मी

गल्ली बोळ नदी नाले

शेती पहाड रस्ते

तुडवत...

कुच-कुचत का होईना

माझ्या खोप्यात

येऊन

पडतोय्‌.

तशी कुठे असते शाश्वती

गेलेला येईलच परत

संध्याकाळी

घराची

ओढ

असते

तेव्हा

हीच असते एक

सोबत

घरापर्यंत.

इतरांना त्याची

काय किंमत म्हणा.

लायनर अजून चांगले आहेत

उडालेला आहे रंग

ट्यूबची झालीय चाळणी

टायर घासलेय्‌त

गेटर टाकून अण्णाने

राजी केलीय्‌

इंजिन घुर-घुरतं सकाळी

चोक दिल्याशिवाय

नाहीच होत सुरू नाठाळ

तेव्हा संतापतो स्वत:वर

चिडून

आठ-दहा लाथा

घालतो

किक्‌वर

की मग येते

ताळ्यावर

दिवसभर

धावू लागते

बिनबोभाट

कूळ नि मूळ असलं

एक

तरीही

पेट्रोलऐवजी रॉकेल

वापरून

कधी

प्रतारणा केली नाही.

गळती सुरूच राहिलीय

टाकीतून, इंजिनमधून

दाखवावी लागेल तब्येत...

आपल्या मेटाकुटीत

मेळ बसला तर वेळ नसतो

धकाधकीत

माऊली आपली पळतच राहते    

घरी आणण्यासाठी हिला,

अपुऱ्या रकमेत

वडिलांना चोरून वाचवलेल्या

रुपयांची सगळी परचुंडी

गुपचूप माझ्या हाती सोपवणारी

आई आठवतेय आज

आणि आठवतंय मध्यंतरी बेकारीत जगताना,

आजारी झाली तेव्हा

बाह्या मोडून बायकोने

भागवलेला दुरुस्ती-खर्च.

मुलांना शाळेत सोडणं, आणणं,

बिट्टूच्यावेळी अवघडलेली वहिनी

दवाखान्यात वाहून नेणारी

हीच तर होती!

रात्री-बेरात्री डबे

शेतातले, दवाखान्यांतले.

माल विकताना लिलावात

तिष्ठताना घामेजून

भर दुपारी

कोण असायचं

सोबत.

बापू,

बरोबरच्यांनी

नव्या माड्या बांधल्या,

गाड्या घेतल्या.

तुम्ही आहे तिथेच.

हो, बदललो नाही आपण

त्याचा जिता-जागता सबूत

ही गाडीच एक!

बदलले लोक; लोक...

लखलाभ असो त्यांना त्यांचे बदलणे,

लखलाभ असोत त्यांना त्यांच्या

गाड्या-माड्या.

गळणाऱ्या तेलावर

बसावी धूळ-माती

तसा तिच्या-माझ्यातला

स्नेहबंधाचा

दाट थर.

तारुण्यात

मन ओढाळ वासरू

चाऱ्ही पायांत घुंगरू

उधळून चौखूर

वारं प्यालो कानांनी

स्वार होवून

सैर करताना

हिच्यावर

तिचा तो पदर उडायचा

फरारा!

कितीदा पडलो,

भेलकंडलो असेल

भर रस्त्यावर

मागून नव्हते वाहन काही

अवजड म्हणून वाचलो

हिनंच झेललं जसं मायेनं.

डॉक्टरांनीच मोडतोडीची भीती

दाखवून लुटलं

थोडं खरचटलं न्‌ पाय नुसता

मुरगळला तरीही

क्ष-किरणांत.

आई गेली

त्या थंड रात्री

तिला लपेटायला

घरून चादर आणली

दवाखान्यात

मी कोणत्या धुंदीत

याच गाडीवर.

पोरका झालो.

किती सहज बोलून जातात

खटारा फेका हा; लोक

बदलतात निष्ठा

तशा सहज गाड्या

नि तासं-तास बोलतात

तोंड फाटेस्तोवर गाड्यांवर...

सहज उपलब्ध आहे कर्ज,

तत्पर आहेत सावकार तोवर

करा तुम्ही अर्ज

लागतं काय

ही फेका ती घ्या

ती फेका ही घ्या.

Tags: सामाजिक महेंद्र भास्करराव पाटील कविता mahendra patil social poem weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके