डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार स्वीकारताना

मॉरिशस येथे होणाऱ्या आगामी विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ख्यातनाम नाटककार महेश एलकुंचवार यांची निवड झाली आहे. 10 मार्च या कविश्रेष्ठ कुसुाग्रज यांच्या स्मृतिदिनी एलकुंचवार यांना नाशिकच्या ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’चा ‘जनस्थान पुरस्कार’ ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर एलकुंचवारांनी व्यक्त केलेले हे मनोगत कलावंत, लेखक, व्रतस्थ लेखक यासंबंधीचे त्यांनी केलेले हे मुक्त चिंतन- गांभीर्याने लेखन-वाचन करू पाहणाऱ्या कोणालाही अंतर्मुख करायला लावणारे आहे. - संपादक 

सर्व नाशिककरांना नमस्कार. विजयाबाईंना प्रणाम.

यंदा तात्यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि या जन्मशताब्दी वर्षात, त्यांच्या पुण्यतिथीला हा पुरस्कार मला देताहेत हा योगायोग आहे. फार तर शुभ योगायोग आहे असं म्हणू. तात्यांना मी कधीही भेटलेलो नाही. कधीच नाही. एकतर उठून मोठ्या माणसांकडे जावं हे माझ्या स्वभावात नाही आणि मोठ्या माणसांसमोर माझी वाचा जाते; कारण माझ्या पिढीवर झालेले संस्कार वेगळे होते. मोठ्या माणसांकडे जाऊन आपण बोलू नये. त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं खाली मान घालून मोजक्याच शब्दांत उत्तर द्यावं. शक्यतो दूर राहावं. वचावचा करू नये. आणि या गोष्टी मी आयुष्यात पाळल्या. खरोखरच जी मोठी माणसं असतात त्यांच्याशी आपण काय बोलणार असतो? म्हणजे किशोरी आमोणकर भेटल्यावर त्यांना म्हणावं रियाज-बियाज करता की नाही हल्ली... आपल्याला शुद्ध-कोमल स्वरातला फरक कळत नाही आणि मी त्यांच्याशी गप्पा मारल्या असं कुणी म्हटलं की मला धक्काच बसतो.

मी जात नाही मोठ्या माणसांकडे ते एवढ्यासाठी की, आपण छोटे आहोत हे आपण कबूल केलं पाहिजे. आणि म्हणून तात्यांकडे मी गेलो नाही; पण तात्यांच्या कवितांनी मात्र माझ्या आयुष्यातला एक काळ अक्षरश: व्यापलेला होता. कॉलेजमधले ते ओढाळ दिवस. आमचा पाच-सहा जणांचा ग्रुप होता. आम्ही चक्क पठण करायचो विशाखाचं. एकाने एक कविता वाचायची. दुसऱ्याने दुसरी. विशाखाने भारलेलं वय होतं आमचं. विशाखाने भारलेला तो काळ होता. आणि कुणाचेतरी ‘चांदण्याचे हात’ आपल्या गळ्याभोवती पडतील अशी आशा वाटणारे ते दिवस होते... नागपूरसारख्या शहरात तर ते शक्यच नव्हते. कुणाला वाटलेच तर ‘पृथ्वीचे प्रेमगीत’ किती छान आहे ना! असे म्हणून ती निघून जायची.

‘गमे की तुझ्या रुद्ररूपात यावे

मिळोनी गळा घालुनिया गळा

तुझ्या लाल ओठातली आग प्यावी

मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा’

हे आम्ही आमच्या खोलीतच म्हणायचो. शक्य तेवढे स्वप्नाळू डोळे वगैरे करून म्हणायचो; परंतु ते तेवढंच नव्हतं. तात्या कायम मनात राहिले. अजूनही मी विशाखा काढून वाचत बसतो. ‘नटसम्राट’ पाहिल्यावर डॉ. लागू मला म्हणाले, ‘‘काय रे, कसं वाटलं?’’ मी म्हणालो, ‘‘पहिल्यांदा पाहिल्यावर मी ऐकलं-पाहिलं. दुसऱ्यांदा मी ते नाटक फक्त ऐकलं.’’ ते ऐकून डॉक्टरांना भरतं आलं; कारण नाटककाराचा प्रत्येक शब्द डॉक्टर शिरोधार्य मानतात. त्यातलं ते ‘घर देता का घर’ यामध्ये विलक्षण काव्यात्म लय आहे. आणि ती फक्त नुसती काव्यात्म लय नाही, तर ती आपल्याला वेगळ्या अनुभवविश्वात नेते... असे तात्या.

त्यांच्या गावात, त्यांनी सुरू केलेल्या प्रतिष्ठानने, त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार, त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात मला हा जो पुरस्कार मिळतोय, तो मी ‘प्रसाद’ म्हणून स्वीकारतो. हा पुरस्कार इतर पुरस्कारांसारखा नाही. नाशिक, गोदावरी, तिच्या काठी असणारं जनस्थान, तिथे राहिलेले तात्या, त्यांचं साहित्यावरचं आणि माणसांवरचं उत्कट प्रेम हे सगळं या स्मृतिचिन्हाबरोबर माझ्या ओंजळीत पडलं आहे. त्यामुळे मी अतिशय कृतज्ञ आहे.

या निमित्ताने मी तुमच्याशी बोलणार आहे. एक लेखक म्हणून, कलावंत म्हणून मी  स्वत:ला कसा सापडत गेलो हे सांगणार आहे. असाच प्रवास इतरांचा असतो, असावा असंही नाही. हाच प्रवास बरोबर आहे असंही मला म्हणायचं नाही; पण मला जे वाटतं ते तुमच्याशी वाटून घ्यावं म्हणून मी उभा आहे. पुरस्कार मिळाल्यावर काही वाटत नाही, असं तर नाही; कारण, ‘उपाधी दाटणी, प्रतिष्ठा-गौरव, होतसे माझा जीव कासावीस’ असं काही माझं होत नाही. त्या पातळीला अजून काही पोहोचलो नाही मी. आनंद तर होतोच.

अगदी सुरुवातीला विजयाबाईंनी माझ्या काही एकांकिका केल्या तेव्हा अगदी लहानसं परीक्षण वर्तमानपत्रात येत असे. आजच्यासारख्या वर्तमानपत्राच्या पुरवण्या वगैरे त्या वेळी नव्हत्या. तेव्हा वडील माझ्याकडे राहायला आले होते. त्यांच्यासमोर बोलण्याची तर प्राज्ञाच नव्हती; पण त्यांना दिसेल या हेतूने एक छोटंसं परीक्षण मी सेंटर टेबलवर ठेवलं. दिवसभरात जाता-येताना त्यांनी ते वाचलंच असणार; पण काही बोलले नाहीत ते. पुन्हा परंपरा आपल्याकडे अशी असते की शक्यतो कौतुक करायचं नाही. हल्ली बघतो तर कुठल्यातरी शंकरनगरमधल्या गल्ली नंबर तीनमधल्या भावगीत स्पर्धेत पिंटीचा दुसरा नंबर आला म्हणून सगळे एकमेकांना कडाकडा मिठ्या मारतात. तोंड गोड करतात. हॉटेलमध्ये जेवायला जातात. असं काहीच आमच्या घरात कधीच नव्हतं. मला शेवटी राहवेना म्हणून मी संध्याकाळी विचारलं, ‘‘दादा, माझ्या नाटकाबद्दल छापून आलंय, ते वाचलं का तुम्ही? मला खूप आनंद झालाय...’’ ते फक्त ‘हं...’ असं म्हणाले. नंतर माझ्या आईकडे पाहून म्हणाले, ‘‘ढेकणाशी बाज गड चढ-उतार केवढी...’’ ढेकूण बाजेवर चढतो- उतरतो, चढतो-उतरतो; त्याला वाटतं केवढा गड जिंकला मी. त्यामुळे खाड्‌कन जमिनीवर आलो. मनात आलं आपल्याला लिहायला सुरुवात करून दोनच वर्षं झाली. आपण फार वर चढतोय की काय? माझ्या घरातली माणसं मला पटकन जमिनीवर आणतात. त्यामुळे माझी प्रकृती निकोप आहे.

मी लिहीत होतो. मग मध्यंतरी मोठा गॅप गेला. नंतर विजयाबार्इंनी ‘वाडा चिरेबंदी’ केलं. वाडा चिरेबंदीमुळे मला नाव मिळालं, असं मलाही वाटू लागलं. एकदा बाई नागपूरला आल्या तेव्हा मी त्यांना म्हणालो, ‘‘बाई, 65 साली तुम्ही जेव्हा नागपूरला आलात तेव्हा तुमचं नाटक पाहून तुमच्याशी मला बोलायचं होतं; पण त्या वेळी मी कुणीच नव्हतो ना...’’ तेव्हा त्या पटकन म्हणाल्या, ‘‘आता कोण आहेस?’’ तेव्हापासून पाय जमिनीवर आहेत. आता ते जमिनीत धसत चालले आहेत. दृष्टी वर जावी असं वाटत असताना पाय जमिनीत जातात, कारण माती सुटत नाही. ॲवॉर्डस्‌ मिळत गेले. त्या-त्या वेळी आनंद झाला. आनंद नाही म्हणत मी, सुख झालं. कारण सुख जसं टिकत नाही, पुरत नाही, काही काळानंतर ते शिळं होतं. नाहीसं होतं. तसं झालं. एके काळी मला असं वाटत होतं की, हे सगळं माझ्याकडे चालत आलं की मी खूप आनंदी होईन. सगळ्या जगामध्ये मला प्रतिष्ठा मिळेल. प्रतिष्ठा काय, तात्कालिक असते. ती मिळते; पण माझ्या असं लक्षात आलं की माझे आतले प्रश्न यामुळे काहीच सुटत नाहीत. माझ्या आंतर्जीवनाशी या पारितोषिकांचा काहीही संबंध नाही. कुणीतरी मला चांगला नाटककार म्हणणं, चांगला माणूस म्हणणं म्हणजे मला सर्टिफिकेट देणं याच्यावरच जर मी माझं सुख अवलंबून ठेवणार असेन, तर दु:खाची निश्चिती. दुसऱ्यांच्या पावतीवर जर मला जगावं लागणार असेल, दुसऱ्यांच्या पावतीवर माझ्या अस्तित्वाचा अर्थ ठरणार असेल, तर मला कधीच आनंद मिळणार नाही. तिथून माझा एक थोडा वेगळा प्रवास सुरू झाला.

मला असं वाटू लागलं की दुसऱ्याने आपल्याला जी प्रतिमा दिली ती घेऊनच आपण जगत राहतो. हुशार आहे बरं का. गाढव आहे बरं का. उनाड आहे बरं का. अशा निरनिराळ्या प्रतिमा निरनिराळ्या लोकांनी दिलेल्या असतात आणि त्या प्रतिमांत अडकत आपण जगत राहतो. आतमध्ये बघतच नाही स्वत:ला. आपले आतले प्रश्न असतात ते आपण नाहीसे करण्याचा प्रयत्न करतो या प्रतिमांच्या दगडाखाली. शेंदुराखाली. हे बरोबर नाहीए. मी स्वत:च जर खोटी, सांकेतिक प्रतिमा होऊन बसलो तर कसं लिहिणार? इतरही माणसं सांकेतिक प्रतिमाच असतात. यातून काहीही निष्पन्न होणार नाही. कला तर शक्यच नाही. कलेला एक तर निखळ सूर्यप्रकाशाइतका झळझळीत खरेपणा लागतो. हे लक्षात आल्यावर मला वाटलं (ही माझी नम्रता नाही. हे मूल्यमापन आहे स्वत:चं केलेलं.) की आपण बऱ्यापैकी लेखक आहोत. मी वाचतो खूप. जागतिक वाङ्‌मयाचा अभ्यास मी बऱ्यापैकी केलेला आहे. त्या तुलनेत आपण कुठे असतो? आपला आवाका किती? आपण किती क्षेत्र व्यापलं आहे आणि तेव्हा स्वत:चं छोटेपण माझ्या लक्षात आलं. जीवनाच्या समग्रतेबद्दल आपण बोलतो. सर्वसाधारण अपेक्षा अशी असते की, लेखकाने जीवनाची समग्रता आपल्या कवेत घ्यावी. हे कधीतरी माझ्या लक्षात आलं आणि कळलं की हे तर फक्त व्यासांनाच जमलंय. महाभारतकारांना जमलंय. जीवनाची समग्रता कवेत घेणारा एकच ग्रंथ आणि तो म्हणजे महाभारत. आणि भारतीय माणसाला महाभारताकडे जाण्यावाचून गत्यंतर नाही. आता ज्यांनी महाभारत वाचलंय किंवा ज्ञानेश्वर-तुकाराम वाचलेत त्यांना आपण लेखक आहोत याचा गंड बाळगण्याचं काहीच कारण नाही. लिहिताना आनंद मिळतो, आपण लिहितो. पारितोषिकं मिळतात. लोक तुमच्यावर आरोप करतात थोरपणाचा. प्रतिभावंत असण्याचा. हल्ली जो तो प्रतिभावंत. मी तुम्हांला प्रतिभावंत म्हणायचं. तुम्ही मला प्रतिभावंत म्हणायचं, ते म्हणतात ना, उंटाच्या घरी लग्न होतं. मंगलाष्टकं म्हणायला गाढव. तो म्हणतो, किती सुंदर तुम्ही आणि दुसरा म्हणतो, किती तुमचा आवाज चांगला. हा खेळ मराठी साहित्यात आपण कायम खेळत असतो. त्याच्यामुळे लेखकाने स्वत:कडे सावधपणे बघायला पाहिजे की नक्की आपण कुठे आहोत.

आता ही प्रतिज्ञा जर आपण पाहिली, लेखकाने जीवनाची समग्रता पकडली पाहिजे- तर लक्षात येतं की ते व्यासांशिवाय कुणाला जमलं नाही. काही फार मोठे लेखक आहेत, ज्यांनी जीवनाच्या फार मोठ्या भागावर मोठा प्रकाश टाकला आहे. शेक्सपीअर आहे; पण हा प्रकाश पुन्हा सुटा-सुटा असतो. त्याची बेरीज करून त्यांना जीवन किती कळलंय हे आपण पाहतो; परंतु सर्वसाधारणपणे आधुनिक मराठी साहित्यात असा विश्व कवटाळणारा माणूस मी काही पाहिला नाही. अनंतता आपण लक्षात  घेतली पाहिजे. मुळात आपल्या जीवनाबद्दलच्या व्याख्याच फार कोत्या आहेत. मी, माझं, माझ्यापुरतं, माझ्यासाठी हेच जीवन. कधीतरी जर विकास झाला तर तुम्ही. तुम्ही आणि मी; पण ‘ते’ नाहीत बरं का! असं आपण का समजतो की तुमचं माझं जगणं म्हणजेच जीवन. पृथ्वीवरचं जगणं म्हणजेच जीवन. जीवनाचा अर्थ आपण नीट समजून घेतो का? पृथ्वीच्या बाहेर आहे ते काय आहे?- ते जीवनच आहे. अखंड-अविरत वाहत राहणारं जीवन आहे ते. त्याला आदि-अंत नाही. तिथे महाऊर्जांचा महारास चालला आहे. चैतन्यमय ऊर्जांचा रास चाललाय. तेही जीवनच आहे. त्याला तुमच्या माझ्यासारखं रंग-रूप नाही; पण तेही जीवनच आहे. माझ्या मनाचा जेवढा आकार, तेवढी माझी जीवनाची समज. असं असतं ते. तेव्हा ती वाढवण्यासाठी मीच काहीतरी केलं पाहिजे.

मला एक गंमत वाटते, की थोडंसं वीस-पंचवीस वर्षं- लिहिलं की लोक ‘तपश्चर्या’ वगैरेसारखे शब्द वापरायला लागतात. मला काही मी तपश्चर्या करतो असं वाटत नाही. मला आनंद वाटतो म्हणून मी करतो. कुणी माझ्या मागे लागलं नाही, की नाटकं लिही किंवा ललित लेख म्हणून. तेव्हा यात तपश्चर्येचा प्रश्नच कुठे येतो? आपल्याला हवी ती गोष्ट करीत राहणं यात समाधान आहे. तपश्चर्येचा प्रश्न कुठे येतो? लोकांवर उपकार करण्यासाठी तुम्ही लिहीत असाल, तर तुम्ही कुठेही बरे लिहिणार नाहीत. तेव्हा जीवनाचा अर्थ आपण फार कोता करून घेतो. कलेचा अर्थ समजतच नाही त्याच्यामुळे. यामुळे हा सगळा व्यवहार विलक्षण बनावट, बटबटीत पातळीवर राहातो. असं करून चालत नाही.

‘आत्मशोध’सारखे शब्द फार मोठे होतात. स्वत:ला कायम तपासत राहणं ही प्रत्येक लेखकाची प्राथमिक जबाबदारी आहे. ते जर करत राहिलो तर आपल्याला थोडाबहुत अंदाज येईल. कारण बाहेर आहे तेच आत आहे. अनंतता बाहेरच आहे; असं नाही. ती आतही आहे. प्रत्येक क्षण हा अनंततेने भरलेलाच आहे. मला मोठा पट घेता येणार नाही. ठीक आहे. मला एकच क्षण घेता येईल; पण त्या क्षणाच्या गाभ्यापर्यंत तरी मला पोहोचता येतं का, हे लेखकाने पाहिलं पाहिजे. काय असतं, एक क्षण असतो. एक बिंदू आहे आणि त्या बिंदूच्या आत चैतन्य आहे. ज्याला आपण समग्रता म्हणतो. तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो का? सगळा जन्म त्याच्या परिघाभोवती फिरण्यातच जातो. परिघाच्या आतदेखील पाऊल पडत नाही. क्वचित परिघाच्या आत पाऊल पडलं तर त्या बिंदूपर्यंत जाता येत नाही आपल्याला. सगळं आयुष्य त्यात घालवतो आपण; पण त्या क्षणाची जी अनंतता आहे त्यापर्यंत पोहोचता येत नाही आपल्याला. अशी परिस्थिती जर आहे, तर आपला पुरेसा विकास झालेला नाही, म्हणून आपल्याला ते सापडत नाही. इतका त्याचा साधा सरळ अर्थ आहे. कुमारजींनी अंजनीबाई मालपेकरांची हकीकत लिहिली आहे; की ते त्यांच्याकडे बसलेले असताना त्यांना शिकवत होत्या अंजनीबाई आणि त्यांनी मध्यम लावला. मध्यम लागल्यावर त्या थांबल्या आणि कुमारजी म्हणतात, माझ्या अंगावर प्रकाशाचा झोतच्या झोत पडला. त्या क्षणी काय घडलं असेल ते मला कळतं. मध्यमाचा जो केंद्रबिंदू आहे, त्या क्षणाचा जो केंद्रबिंदू आहे, तिथे अंजनीबार्इंचा आवाज भिडला. असं घडतं; पण त्यासाठी फार मोठी साधना करावी लागते. तिथे आपण जायला पाहिजे. हल्ली फार झालंय. मुळांचा शोध- मुळांचा शोध. अशी कशी लोकांची मुळं हरवतात, मला कळत नाही. आधी आपण आत हरवलेलो असतो. बाहेर नंतर. शहरातला माणूस खेड्यात जातो अन्‌ लोकनृत्य वगैरे पाहतो नि म्हणतो मुळांचा शोध; पण कशाला इतका दूर जातोस बाबा? आत बघ. मी महाभारताचा आवाका सांगितला, की

ऊर्ध्वूलमध:शाखं अश्वत्थ:प्राहुरव्ययं

छंदासि यस्य पर्णानि यस्तं वेदसवेदवित्‌।

की जीवनवृक्षाची मुळं आकाशात आहेत. तुमच्या मनात आहेत ती. तिथपर्यंत जाता आलं तर फार बरं. तरच बाहेरच्या गोष्टींचा उलगडा होईल. मनातच इतका गोंगाट असताना बाहेर कुठेतरी सुसंगती शोधायची हे कुठेतरी धाष्टर्याचं आहे; असं मला वाटतं. आपण स्वत:च्या कल्पनाच स्पष्ट करून घेत नाही. हा एक खेळच आहे. गंभीरपणानं खेळायचा. रविबाबूंचं फार सुंदर गाणं आहे. ते म्हणतात, आता मी स्वत:शीच खेळून-खेळून फार कंटाळलोय. तू जर तुझ्या खेळात मला घेतलंस तर काही प्रश्नच नाही आणि नाही घेतलंस तर काय करावंसं वाटतं, तर निर्भयपणानं मला या क्षितिजापासून त्या क्षितिजापर्यंत प्रलयाच्या झुल्यावर झुलायचं आहे. अकातरे पराणटाके प्रलय दोलाय दोलाते चाई. हे बोलायला प्रचंड मोठा अनुभव लागतो. असं वाक्य कुणालाही लिहिता येत नाही. गंमत अशी आहे की वाङ्‌मयामध्ये खरं आणि खोटं वाक्य पटकन कळतं. सामान्य वाचकालादेखील खरं-खोटं कळतं बरोबर. असं वाक्य जेव्हा माणसं लिहितात, तेव्हा त्यामागे रविबाबूंची असणारी संपूर्ण तपश्चर्या आपल्याला कळते.

मला बेबीतार्इंची (रोहिणी भाटे) एक गोष्ट आठवते. माझा आणि त्यांचा खूप स्नेह होता. त्या जाण्याच्या सहा महिने आधी जेव्हा मी त्यांना भेटलो, तेव्हा सहज विचारलं, ‘‘बेबीताई, एवढा प्रवास तुम्ही केला. एवढं काम केलं. मुक्कामाला पोहोचलो असं तुम्हांला वाटतं का?’’ त्या म्हणाल्या, ‘‘मला कुठे जायचंच नव्हतं.’’ औपनिषदिक वाक्य आहे हे. मला गंतव्य नव्हतं. मला कुठेही जायचं नव्हतं. मला काहीही मिळवायचं नव्हतं. मला प्रशस्तिपत्रकं नको होती. मी आहे तिथंच मला साधना करायची होती. साधना करायला कुठेही बाहेर जावं  लागत नाही. ती एकांत साधना असते. ती आतल्याआत चालू असते. साधनेतच खरा आनंद असतो. साधनेने जडीबूटी मिळावी, सिद्धी मिळावी असं काही नसतं. साधना हेच साध्य आहे. वादकाच्या जीवनात असा क्षण येतो असं मला वाटतं, कारण वाद्य, वादन आणि वादक एकजीव होतात. ते हे संपूर्ण विश्व ओलांडून पलीकडे निघून गेलेले असतात. तिथे लेखकाला जाणं शक्य नाही; कारण लेखक शब्द वापरतो. शब्द हे संकेत असतात. माणसाच्या बुद्धीने बनविलेले संकेत असतात. आता जो प्रदेशच बुद्धीच्या पलीकडचा आहे, बुद्धिगम्य नाही, अनुभवगम्य आहे, इंद्रियातीत आहे - तिथे शब्दांची वल्ही घेऊन जाता येत नाही. त्या समुद्रात ही नाव टाकता येत नाही; पण समुद्र कळला पाहिजे. त्याच्यामुळे तुमच्या लेखनात फरक पडतो; असं मला वाटतं. साधना करीत राहणं, आपण आपल्या जागी उभं राहणं, आपलं काम आपण करीत राहणं हेच खरं. काय त्याचा दृश्य परिणाम व्हायचा तो होईल, नाही तर होणार नाही; पण अमुक मिळावं म्हणून जेव्हा माणसं काही करू लागतात तेव्हा मला त्यांची भीती वाटते.

आमचे म. म. देशपांडे यांची एक कविता आठवते मला. एक बघा जगातल्या सर्व थोर कलावंतांमध्ये ही गोष्ट समान असते, म्हणजे बेबीताई मला म्हणाल्या, ‘‘मला कुठे जायचंच नव्हतं.’’ या वाक्याचा अर्थ पुढचे कित्येक महिने मी लावत होतो, की काय त्यात दडलेलं आहे? - तर एक पुस्तक दडलेलं आहे. म.म. देशपांडेंची एक कविता आहे –

सारा अंधारच प्यावा

अशी लागावी तहान

एका साध्या सत्यासाठी

देता यावे पंचप्राण

अशी इच्छा मनात जागी होते, तेव्हा कुठे शोधाला सुरुवात होते. तेव्हा लेखकाचं पहिलं पाऊल आत्मशोधाला सन्मुख होतं. बाहेर आपण पाहातच असतो. हे पाऊल जर पुढं पडलं तर म.मं.च्याच कवितेत पुन्हा सांगायला पाहिजे की,

जागृतीच्या वृक्षाखाली

स्वप्न पाकळ्यांचा सडा

भ्रम, आग्रह, ईर्ष्या, महत्त्वाकांक्षा, साधना करण्याचा अहंकार, हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे हा लोभ, या सगळ्या पाकळ्या गळून पडून तो वृक्ष निष्पर्ण ताठपणे उभा राहतो ते केव्हातरी आपल्यामध्ये मूल्योदयाच्या चैतन्याची पालवी फुटेल म्हणून. एवढी तयारी झाली पाहिजे लेखकाची. त्या दिशेने निदान प्रवास झाला पाहिजे; असं मला वाटतं. विविध प्रकारचे लोक असतात की जे हिंडतात. अनुभव शोधतात. अमका अनुभव, तमका अनुभव लिहितात. माझं काही त्यांच्याशी भांडण नाही; पण मी व्रतस्थ लेखकांबद्दल बोलतोय. कलावंत लेखकांबद्दल बोलतोय. हा खेळ आहे आणि रविबाबूंनी सांगितल्याप्रमाणे गंभीरपणानं खेळायचाय. मी यात कुठेही देव कल्पना आणत नाहीए. मी फक्त अनंतता, शाश्वतता याच्याबद्दल बोलतोय.

बेबीताई म्हणतात ते, रविबाबू म्हणतात ते तिकडे एमिली डिकिन्सन म्हणते. असं करणाऱ्या माणसाला दहा लोकांमध्ये सारखी उठबस करता येत नाही. त्यामध्ये जी शक्ती जाते, माणूस पथभ्रष्ट होण्याची जी शक्यता असते त्यामुळे ही माणसं थोडी वेगळी राहतात. त्यांना स्वतंत्र राहू देण्याचं औदार्य आपण दाखवलं पाहिजे. सारखं आपलं लेखकाच्या, कलावंतांच्या भोवती घोंगावत राहायचं; (काही लोकांना आवडतंही ते...) परंतु असं न करणं हे अधिक बरं नव्हे का? मागे मी एक गोष्ट सांगितली आहे, की इंग्लंडमधले एक मोठे संगीतकार सिबिलिस यांच्याकडे एक अमेरिकन टूरिस्ट आला आणि टॅक्सीवाल्याला म्हणाला, इथे एक मोठे संगीतकार राहतात, मला त्यांच्याकडे घेऊन चल. पुढे गेल्यावर चालकाने विचारलं, ‘‘तुम्ही त्यांच्या गाठीभेटीची वेळ ठरवली आहे का?’’ तो म्हणाला, ‘‘नाही.’’ टॅक्सीवाल्याने परत टॅक्सी माघारी वळवली आणि म्हणाला, ‘‘मी तुम्हांला त्यांच्याकडे घेऊन जाणार नाही; कारण अशा प्रकारे त्यांच्या एकांताचा भंग करण्याचा तुम्हांला काहीही अधिकार नाही. त्यांना त्रास होऊ नये असेच आम्ही वागतो. एवढंच काय त्यांच्या घरापासून एक किलोमीटरवर रेल्वे रूळ होते. त्यांचा त्यांना त्रास होऊ नये म्हणून सरकारने ते दहा किलोमीटर दूर नेले आहेत.’’

हा सुसंस्कृतपणा आपण केव्हातरी शिकलो पाहिजे. एकांत साधनेविषयी मी बोलतोय. म्हणून एका एमिलिची आठवण होते. या बाईने जन्मभर कविता लिहिल्या आणि एकही कविता कधी प्रसिद्ध केली नाही. वयाच्या 52 व्या वर्षी ती गेली. तेव्हा तिच्या कविता कुठे कपाटाच्या खणात, गादीखाली, उशीखाली, कपड्यांच्या खिशात अशा कुठेतरी सापडल्या. त्यानंतर ती चिटोरी चिटोरी एकत्र करून छापली गेली. त्यानंतरच्या सगळ्या पिढ्या आज एमिलीच्या कवितांनी भारलेल्या आहेत. माझ्या उशाशी तिचं पुस्तक कायम असतं.

आत्मा जेव्हा स्वत:च्या संगतीत राहू इच्छितो तेव्हा तो दार बंद करून घेतो. अशा आशयाच्या तिच्या ओळी वाचल्यावर मला भरून येतं. मला इथे तात्यांची आठवण होते. का? - तर मला जे ऐकीव आहे, ते म्हणजे तात्या दिवसभर माणसांनी वेढलेले असत. रात्री तात्या एकटे असत तेव्हा त्यांच्या अंगणात ते एकटे येरझाऱ्या घालीत असत. पहाटेपर्यंत. ती त्यांची वेळ होती आत्मसंवादाची. ती गरज आहे गंभीर कलावंताची. तात्या खूप सज्जन. म्हणून त्यांनी आजूबाजूची माणसं कायम धरून ठेवली; पण नंतर त्यातून वेळ काढत ते स्वत:शी संवाद साधत राहिले असले पाहिजेत, असं मला वाटतं.

जशी सर्व संतांची भाषा एकसारखी आहे, तशी सर्व कलावंतांची (जे त्या प्रवासाला निघालेत) भाषा एक असते. ते वाचूनसुद्धा माझ्या अंगावर रोमांच येतात; की किती दूर आहोत आपण. शतकयोजनं दूर आहोत आपण या माणसांपासून. काही सापडलं असं म्हणण्याची सोयच नाही. एखादा तुकाराम म्हणू शकतो, ‘‘चौदा भुवने ज्याचिया पोटी। त्यासी कंठी बांधियेला’’ हा आत्मविश्वास साधना केल्यावरच येऊ शकतो.

या निमित्ताने एका दुसऱ्या मुद्‌द्याकडे मी वळतो. सर्वात्मकतेबद्दल बोलतो. त्याच्या प्रवासाकडे कसं जाता येईल याचा थोडासा अंदाज मला आल्याने - म्हणजे अजून तो फक्त बुद्धीलाच कळलाय, अनुभव आला नाही. आणि जोपर्यंत तुमचं कळणं  अनुभवात उतरत नाही, तोपर्यंत ते वांझ असतं. तत्त्वज्ञान अनुभवता आलं, तर ते खरं तत्त्वज्ञान. त्यामुळे मी जे बोलतोय ते बुद्धीला कळलेलं बोलतोय हे लक्षात ठेवा. माझे कोणतेही क्लेम्स नाहीत. हे सगळं झाल्यावर परत महाभारताची आठवण येते; की किती साक्षिभावानं महाभारतकारांनी मानवी जीवनाकडे आणि एकूणच जीवनाकडे पाहिलं आहे. ज्याची मुळं आकाशात आणि फांद्या जमिनीत आहेत, त्याचं भान व्यासांना होतंच; परंतु या सगळ्या व्यवहाराकडे ते साक्षिभावानं पाहत होते. त्याचं एक फार गोड उदाहरण महाभारतात आहे, की रणधुमाळी चालली होती. रक्ताचे पाट वाहत होते आणि कुरुक्षेत्राच्या शेजारी एका पडक्या मंदिराच्या घंटेत एक चिमणी आपल्या बाळासाठी घरटं बांधत होती. दोनच ओळींचा श्लोक आहे तो. जीवन किती विविध प्रकारांनी व्यक्त होतं. आणि विविध प्रकारांनी आविष्कृत होणाऱ्या जीवनाकडे व्यास किती साक्षिभावाने पाहत होते. महाभारत वाचणं हे पाच वर्षांचं काम आहे. ज्याला काही करायचंय त्याने काहीही न करता महाभारत वाचावं. (भांडारकर प्रत वाचा.)

दुसरं असं, की अस्तित्ववाद वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं, की विलक्षण विषण्ण करणारं ते तत्त्वज्ञान आहे. आयुष्याच्या एका टप्प्यावर ते जवळचंही वाटत होतं. हे तत्त्वज्ञान आपल्याकडेही आल्याचं मला जाणवत राहिलं. महाभारतातच आहे ते. अश्वत्थामा हा किती तुटलेला माणूस होता. त्याचा भावनिक पातळीवर स्वत:शी संबंध नाही. आप्तांशी नाही. मित्रांशी नाही. विश्वाशी नाही आणि चिरंतनाचा शाप तर त्याला मिळाला आहे. हे अस्तित्ववादाचं इतकं मोठं उदाहरण आहे, की हे वाचलं असतं तर ‘वेटिंग फॉर द गोदो’ लिहिलं गेलं नसतं; पण तेही व्यास साक्षिभावानं लिहितात. तुकारामांमध्ये सापडतो तुम्हांला असित्ववाद किंवा परात्मभाव.

‘दशदिशा ओस मज वाटे भिंगुळवाणे

जीवलग नेणे माझा कोणी’

असे क्षण आपल्याही आयुष्यात येऊन जातात कधीतरी; परंतु नंतर मी ‘षड्‌दर्शने’ वाचली. ती फार रोखठोक आहेत. ती तुम्हाला कुठलीही आशा दाखवत नाहीत. षड्‌दर्शनांचा देवाशी काही संबंध नाही. प्युअर फिजिक्स आहे ते. या ऊर्जा फिजिकल टर्म्समध्ये नेता येतील अशा आहेत. त्याचा परिणाम होणार. त्या परिणामाचा आणखी परिणाम होणार. एका धाग्यातून दुसरा. हे सतत चाललेलं असतं. भवति... भवति... भवति... म्हणून त्याला ‘भव’ म्हणायचं. म्हणून षड्‌दर्शने खोटी आश्वासनं देत नाहीत; पण धैर्य देतात. इतर सगळ्या तत्त्वज्ञानांत तुम्ही हे केलं तर ते मिळेल; असं सांगितलं जातं. षड्‌दर्शने तसं करीत नाहीत. स्वर्ग-नरक आणि देव कल्पना आपल्या षड्‌दर्शनांत नाहीत; पण तुमच्या जगण्याला तुम्हीच जबाबदार. निर्णयाचं स्वातंत्र्य तुमचं. त्याचं काय करायचं ते ठरवा. एकदा कळलं की माणूस जबाबदारीने वागतो. आशेने जगणं आणि धैर्याने जगणं यात फार मूलभूत अंतर आहे. तो परखडपणा शिकवतात षड्‌दर्शने. हे सगळं महाभारतात येतं. सगळ्या पात्रांकडे व्यास हे साक्षिभावानं पाहतात; पण त्यांच्या मनात असीम करुणा आहे.

अस्तित्व भावामध्ये आणि साक्षिभावामध्ये हा फरक आहे. बेकेट हा परात्मभावाने पछाडलेला लेखक आहे. तत्त्वज्ञानातलं एक चालतं-बोलतं उदाहरण आहे ते; पण साक्षिभावात एकूणच जीवनाबद्दलची समज आणि करुणा आहे. हे बळ प्रचंड मोठं आहे आणि ते भारतीय आहे. तेच लेखकाच्या लक्षात यायला पाहिजे; असं मला कायम वाटतं. हा प्रवास मोठा आहे. कुठून निघालो, कुठे चाललो याचा काही अंदाज नाही; परंतु साक्षिभावानं बघता येणं, जसं ते दस्तोवस्कीमध्ये आहे; पण तसे तुम्ही जेव्हा बघता तेव्हा नीती- अनीती, चांगलं-वाईट, दुष्ट-सुष्ट या कल्पना गळून पडतात. तुम्ही सगळ्यांकडेच करुणेने बघता. दस्तोवस्कीच्या मनात दारुडे, वेश्या, लफंगे, खून करणारे अशा सगळ्यांबद्दलच एक विलक्षण करुणा आहे. अध:पतित माणूस काही सुखी नसतो. तो दु:खीच असतो. सर्वसामान्यपणे आपल्या समाजात अशी पद्धत आहे की ज्याचं अध:पतन झालं आहे, त्याचं जीवन जगणं मुश्किल करून टाकतो आपण.

आपल्या हेच लक्षात येत नाही की मुळातच तो माणूस स्वत:ला कायम जाळून घेतो आहे. त्याला दिला तर आपण आधारच दिला पाहिजे. त्यामुळेच ‘आदर्शवादी’ लिखाण जे लोक करतात, त्यांची मला भीतीच वाटते. प्रबोधन, आदर्श सांगणाऱ्यांचं ठरलेलंच असतं, की कुठे जायचं ते. फक्त कसं जायचं, ते पाहा. म्हणजे काय तर ‘स्त्री ही मन्मंगल माता असते.’ हे ठरवून टाकायचं, मग तिथे कुठल्या वाटेने जायचं ते ठरवा. फार सोपं करून टाकतात ते. मग त्याच्या पलीकडे काही राहत नाही; पण इतकं सोपं नाहीए ना ते. त्यामुळे लेखनाला फार मर्यादा पडतात. त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला लिहिता आलं पाहिजे. पाच मुलांपैकी एखादं मूल जर वेडं असलं, तर वेड्या मुलाविषयी आईला अधिक माया वाटते. याचं कसं होईल, असं वाटत असतं. तशी माया अध:पतितांबद्दल, चुकलेल्या माणसांबद्दल, ज्यांना दिशा सापडत नाही अशा माणसांबद्दल लेखकाला वाटली पाहिजे; पण साक्षिभाव जागा ठेवून. त्याच्या बरोबर तो करुणेच्या प्रवाहात वाहत गेला की फसला; परंतु हा एक सापळा आहे ज्याच्यात लेखक सापडू शकतो. अशी बरीच व्यवधानं आहेत. अशी बरीच पथ्यं आहेत; की जी व्रतस्थ लेखकाला कायम मनात सांभाळूनच चिंतन करावं लागतं.

मला दु:ख याचंच आहे की मला आत्ता वयाच्या 72 व्या वर्षी हे कळायला लागलंय. अजून कितीतरी शिल्लक आहे कळायचं. आता ते केव्हा कळणार, त्याचा अनुभव केव्हा येणार, मग मी केव्हा लिहिणार? ती काही शक्यता मला आता दिसत नाही. मी हे कधी कुठे बोललो नाही.  पण आपण इथपर्यंत प्रवास केला तो वाटून घ्यावा म्हणून, इथे बोललो; कारण मी तात्यांच्या गावात आहे. ते असते तर त्यांच्याशी बोललो असतो. तेवढा त्यांचा अधिकार होता आणि माझंही त्यांच्यावर प्रेम होतं. सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद.

(शब्दांकन : स्वानंद बेदरकर, नाशिक)

Tags: महेश एलकुंचवार भाषण कुसुमाग्रज प्रतिष्ठान जनस्थान पुरस्कार स्वानंद बेदरकर लेखन प्रक्रिया swanand bedarkar kusumagraj partishthan jansthan puraskar speech mahesh elkunchwar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

महेश एलकुंचवार,  नागपूर

ज्येष्ठ नाटककार, ललित लेखक 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके