आम्हा दोघींच्या मैत्रीला
वर्षे झाली फार फार;
म्हणती, मी मोठी झाले
लहानच राही खार
माझी खार, माझी खार
झूला फांदीचा करते
मागे-पुढे, वर-खाली
झोके घेते, झोके घेते.
माझी खार, माझी खार
पत्ते पानांचे करते;
मैत्रिणींना जमवून
झब्बू-चॅलेंज खेळते
माझी खार, माझी खार
फ्रूट-सॅलड करते;
चिमण्यांना-साळुक्यांना
खाऊ प्रेमाने घालते
माझी खार, माझी खार
हार फुलांचा करते;
राम मंदिरी जाऊन
हार रामाला घालते.
माझी खार, माझी खार
कधी शर्यती जिंकते;
पाना-फुलांचा मुगुट
माथ्यावर मिरवते
माझी खार, माझी खार
लपss लपss पाणी पिते
कधी फुर्रर्रss करून
चिळकांडी उडवते
माझी खार, माझी खार
फळे-फळे-फळे खाते;
आणि बिया कावळ्यांना
नेम धरून मारते.
माझ्या खारीला आपल्या
शेपटीचा आहे गर्व;
शेपटीच्या विभ्रमांनी
खार सांगे सर्वसर्व
माझी खार, माझी खार
घरी येते, बागडते;
पंख्यावरती बसून
गाणे गाते, गाणे गाते
माझी खार, माझी खार
तेव्हा खुद्दुक हासते;
जेव्हा फेकते मी दाणे
अन् ती अचूक झेलते
खार माझी नी मी तिची
अशी गूळ-तूप गट्टी;
माझ्या खारीत-माझ्यात
कधी होत नाही कट्टी
माझी खार, माझी खार
अशी गुणाची गुणाची;
सर्वांनाच ठाऊकाहे
खार मैत्रीण कुणाची
आम्हा दोघींच्या मैत्रीला
वर्षे झाली फार फार;
म्हणती, मी मोठी झाले
लहानच राही खार
Tags: अनंत भावे माटुंगा मुंबई पंखा मैत्रीण कावळे मंदिर राम साळुंकी चिमणी फांदी खार Anant Bhave Matunga Mumbai Fan Friends Crow Temple Ram Mina Bird Sparrow branch Limb #Squirrel weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या