डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘शोधग्राम’मध्ये फिरताना प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे बंग दांपत्यापासून ते मेसमध्ये स्वयंपाक करणाऱ्या मावशीपर्यंत प्रत्येक व्यक्तीचे, आपण कोण? आपण काय करतो?, कोणासाठी करतो? याबाबत प्रचंड conviction आहे. सर्चच्या यशाचे तेच एक गमक असावे. ‘निर्माण’चा क्रांतीपेक्षा उत्क्रांतीवर जास्त विश्वास आहे. आकर्षक असतो तो स्वधर्म नसतो. स्वप्नरंजनातही स्वधर्म नसतो. जिथे माझी खरी गरज असेल तोच माझा स्वधर्म. स्वधर्म कर्तव्यरूप असतो या डॉ.अभय बंग यांच्या स्वधर्माच्या व्याख्येला धरून ‘निर्माण’ची रचना झाली. ‘निर्माण’ ध्येयवादी तरुणाईला स्वप्न रचण्यास शिकवते, पण स्वप्नाळू बनवत नाही. त्यांना समाजासाठी कृतिशील बनवते, पण बूर्झ्वा समाजवादी बनवत नाही. 

‘सध्याची तरुण पिढी चंगळवादाच्या आहारी गेली आहे. गलेलठ्ठ पगाराची नोकरी, वीकएंडला मजा आणि आपलं कुटुंब याच कोशात गुरफटून गेलेल्या या पिढीस सामाजिक बांधिलकी नाही, सामाजिक समस्यांची जाण नाही,’ अशी ओरड सर्वत्र होत असते. यात तथ्यांश असला तरी ते सार्वत्रिक सत्य नाही. 

टक्केवारी खूप कमी असेल परंतु या पिढीतही सामाजिक समस्यांचे भान असणारे, त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची इच्छा असणारे, सामाजिक बांधिलकीची जाणीव असणारे युवक-युवती आहेत. त्यांच्यात सुप्त इच्छाशक्ती, ऊर्जा असते. बऱ्याच वेळी ‘काही तरी’ केलं पाहिजे असं वाटत असतं, पण नक्की काय करायचं हे माहीत नसतं. 

कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे वेगळी वाट चोखाळण्याचं धैर्य होत नाही आणि काठावरून परत फिरावं लागल्यामुळे निराशा येते. कधी कधी अण्णा हजारेंच्या लोकपाल आंदोलनाप्रमाणे हा उत्साह तात्कालिक ठरतो. असे होऊ नये, तरुणांच्या या इच्छाशक्ती, ऊर्जेला अनुभवाधारित मार्गदर्शन मिळून त्यास विधायक वळण मिळावे, ‘काहीतरी’ केलं पाहिजे असा विस्कळीतपणा जाऊन त्यास ठोस स्वरूप मिळावे आणि हा उत्साह, सामाजिक भान तात्कालिक न रहाता त्यास स्थायी स्वरूप प्राप्त व्हावे अशा उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्रभूषण डॉ.अभय आणि डॉ.राणी बंग यांच्या प्रेरणेतून ‘निर्माण’ ही युवकांची चळवळ 2006 मध्ये सुरु झाली. 

ज्येष्ठ आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली युवकांची, युवकांनी समाजासाठी चालवलेली ही चळवळ आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या ‘नई तालीम’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या या चळवळीच्या प्रत्येक सत्रात 4 शिबिरे भरवली जातात. पहिल्या शिबिरात ‘मी, माझं मन, माझं शरीर’ याविषयी माहिती देऊन स्वतःला जाणून घेतलं जातं. दुसऱ्या शिबिरात समाज-निसर्ग आणि मानव यांच्या आंतरसंबंधाविषयी माहिती दिली जाते. तिसऱ्या शिबिरात प्रत्यक्ष समस्येच्या ठिकाणी जाऊन प्रश्न अनुभवले जातात. चौथ्या शिबिरात या समस्या सोडवण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांचा ऊहापोह केला जातो. प्रत्येक टप्प्यावर विविध विषयांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळते. 

असे ‘निर्माण’ (पाचव्या सत्राचे पहिले शिबीर) नुकतेच 29 डिसेंबर ते 6 जानेवारी या कालावधीत ‘शोधग्राम’, गडचिरोली येथे पार पडले. या शिबिराला महाराष्ट्राच्या 35 जिल्ह्यांतून सुारे 60 ‘निर्माणी’ जमले होते. एक ‘निर्माणी’ म्हणून या ‘निर्माण’ प्रक्रियेचा आणि ‘शोधग्राम’चा शोध घेण्याचा हा प्रयत्न. 

कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. या शिबिराची सुरुवातदेखील डॉ.अभय बंग आणि प्रत्येक विभागाच्या प्रतिनिधींनी केलेल्या दीपप्रज्वलनाने झाली. परंतु फरक एवढाच की तो दीप प्रत्येकाच्या अंतर्मनातदेखील तेवला. ‘स्व’कडून समाजाकडे आणि समाजाकडून सृष्टीकडे असे ‘निर्माण’ आणि ‘शोधग्राम’चे उद्दिष्ट असल्यामुळे त्याचाच एक भाग म्हणून आणि मानव व निसर्ग यांत नाळ जोडण्याच्या उद्देशाने वडाचे झाड लावण्यात आले. त्या झाडाभोवती माती टाकताना जाणवले की बऱ्याच वर्षांनी मातीला हात लागत आहेत. तो मातीचा स्पर्श बरंच काही शिकवून गेला. 

पहिल्याच दिवशी इतका विलक्षण अनुभव आला आणि असाच अनुभव पुढच्या 7 दिवसांत येत गेला. आपल्या समाजात लैंगिक गोष्टींबाबत मोकळेपणाने बोलण्याची पद्धत नाही. हेच बहुतांश सामाजिक समस्यांचे मूळ आहे आणि कोणत्याही समस्येच्या मुळात जाण्याची ‘शोधग्राम’ची पद्धत असल्यामुळे डॉ.राणी बंग यांनी सकाळच्या स्वच्छ सूर्यप्रकाशात प्रेम, आकर्षण, स्त्री-पुरुषांच्या लैंगिक समस्या, तारुण्यभान याविषयी चर्चा घडवून आणली आणि त्यानंतर स्लाईडसच्या माध्यमातून स्त्री-पुरुष यांचे अवयव, शारीरिक समस्या, मासिक पाळी, प्रजननक्रिया इत्यादींविषयी अत्यंत सखोल आणि शास्त्रीय माहिती दिली आणि शंकानिरसनदेखील केले. ही चर्चा ऐकताना जाणवले की तरुण-तरुणींना या बाबतीत खूप प्रश्न असतात आणि योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने प्रचंड गैरसमज ‘निर्माण’ होतात. त्यामुळे ‘स्व’ला ओळखण्याचा हा पहिला प्रयत्न आहे. इथे हे नमूद केले पाहिजे ही चर्चा अत्यंत मोकळी आणि शास्त्रीय होती पण सवंग मुळीच नव्हती. 

सवंग चर्चा किंवा नुसतेच मतप्रदर्शन ‘निर्माण’ किंवा ‘शोधग्राम’मध्येदेखील अनुस्यूत नाही. इथे फॅक्ट्‌स मांडल्या जातात आणि त्यांचे विश्लेषण केले जाते. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रश्नांवर, विषयांवर गट चर्चा घडवून आणली जाते आणि प्रत्येक गटाच्या निष्कर्षावर आधारित समूह चर्चा घडवून आणली जाते. या विषयांध्ये वैविध्यदेखील असते. तो विषय मग नातेसंबंध, नीती अनीतीच्या संकल्पना याबाबत असतो, धान्यापासून दारू- निर्मितीच्या धोरणाचा असतो, दारूच्या दुष्परिणामांचा असतो किंवा दिल्लीमध्ये नुकत्याच झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर उफाळलेल्या तरुणींच्या उद्रेकाचा अन्वयार्थ लावण्याचा असतो. जेव्हा डॉ.अभय बंग दारू या विषयाशी संबंधित राजकारण, अर्थकारण, समाजकारण आणि आरोग्यविषयक प्रश्नांची चर्चा करतात तेव्हा मन सुन्न होऊन थांबत नाही तर अशा प्रश्नांशी भिडण्याची ईर्ष्या ‘निर्माण’ होते. याचा परिणाम असा होतो की प्रत्येक घटनेचे विविध कंगोरे, दृष्टिकोन, त्या घटनेशी संबंधित मानवी समूहांमध्ये असलेले अंतर्विरोध लक्षात येतात आणि नकळत समाजात घडणाऱ्या घटनांविषयी एक साक्षेपी, संयत आणि समाजहिताची भूमिका घेण्याची वृत्ती ‘निर्माण’ होते. 

‘निर्माण’च्या संपूर्ण शिबिराची रचना अशा प्रकारे केलेली असते की माणूस इतरांशी संवाद साधताना अधिकाधिक स्वतःशी संवाद साधत जातो. शिबिरात रोज डायरी लिहायला लागत असे आणि ती दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला शेअर करावी लागत असे. या शेअरिंगमधून एकमेकांचे अनुभव, स्वभाव समजत गेले. एके दिवशी आम्हांला एक मोठा कार्डबोर्ड आणि स्केच पेन देऊन स्वत:विषयी चित्र काढायला सांगितले आणि त्यानंतर ते चित्र दुसऱ्या एका ‘निर्माणी’ला समजावून सांगायला सांगण्यात आले.

हासुद्धा एक नवीन अनुभव होता. कोणी पिंजऱ्यात बंदिस्त असलेला पोपट काढला, कोणी उडणारा पतंग काढला, कोणी स्पायडरमॅनचा मुखवटा काढला. नंतर समजलं की प्रत्येकाने आपल्या मनातले तरंग त्या दिवशी कागदावर उमटवले होते. 31 डिसेंबरला आम्हाला सरल्या वर्षात घडलेल्या आणि वैयक्तिक, महाराष्ट्राच्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रभाव पडणाऱ्या घटना लिहायला सांगितल्या. वर्ष 2012 झरकन्‌ डोळ्यासमोरून गेले आणि 2013 मध्ये काय करायचं याचा संकल्प करूनच नवीन वर्षाचं स्वागत केलं. 

‘निर्माण’ हे इतर शिबिरांप्रमाणे किंवा समर, विंटर कँपप्रमाणे नाही. ‘निर्माण’ ही एक शैक्षणिक प्रक्रिया आहे आणि ती लवचिक आहे. उत्तरे मिळवणे, निष्कर्ष काढणे एवढेच ‘निर्माण’मध्ये अभिप्रेत नाही तर प्रश्न पडणे, समस्यांची जाणीव होणे आणि त्या समस्यांचे निवारण करण्यासाठी वाटचाल करणे हे ‘निर्माण’चे उद्दिष्ट आहे. हे प्रश्न मी कोण?, मी कोणाचा?, माझ्या अस्तित्वाला अर्थ काय? समाजाच्या जडणघडणीत माझी भूमिका काय? असे मूलभूत स्वरूपाचे असतात. उत्तरे लगेच मिळणार नसतात पण ती मिळवण्याची प्रक्रिया नक्कीच सुरू होते. ‘स्व’ला व्यापक बनवणे आणि समाजात नेऊन सोडणे हे ‘निर्माण’चे उद्दिष्ट आहे. एखाद्या समस्येची तीव्रता समजण्यासाठी संवेदनशीलता महत्त्वाची असते पण ती समस्या सोडवण्यासाठी कौशल्य आणि व्यावसायिकता असावी लागते. ‘निर्माण’मध्ये व्यक्तीमधील संवेदनशीलता, कौशल्य आणि बुद्धीची सांगड घालण्याचा प्रयत्न केला जातो. 

‘निर्माण’ हा ‘सर्च’ आणि ‘शोधग्राम’चा एक कृतिशील उपक्रम. ‘निर्माण’च्या निमित्ताने सर्च आणि ‘शोधग्राम’ जवळून पाहता आले. ‘शोधग्राम’ हे बंग दांपत्याने वसवलेले नीटनेटके गावच आहे. गांधीजींच्या मनातले स्वयंपूर्ण खेडे असेच असावे. अभय बंग यांना सगळे नायना म्हणतात तर राणी बंग यांना अम्या. ‘शोधग्राम’मध्ये निसर्ग आपल्याशी बोलतो, झाडाच्या सळसळी- मधून चैतन्य ओघळत असल्याचा भास होतो. ‘शोधग्राम’ शिस्तप्रिय, शांत आहे पण ही शांतता तणावपूर्ण नसते आणि शिस्त जाचक नसते. ती स्वयंशिस्त असते. इथे रोज संध्याकाळी 6 वाजता प्रार्थना होते. या प्रार्थनेत ‘गीताई’चे अध्याय म्हटले जातात, त्यानंतर डॉ.अभय बंग त्या अध्यायाचे निरूपण करतात. त्यानंतर संगीत ऐकले जाते. यामध्ये कधी जगजितची गझल असते, पं.भीमसेन जोशींचा अभंग असतो किंवा नुसरत फतेह अलीची कव्वालीसुद्धा असू शकते. पण साडेसहानंतर मन शांत झालेले असते. 

‘शोधग्राम’मध्ये काही नवीन प्रथा पडलेल्या आहेत पण त्या नुसत्याच (जुनाट) संस्कृतीला आव्हान देण्याच्या उद्देशातून पाडलेल्या नाहीत, त्यांना एक सूचितार्थ आहे. उदा. औक्षण करण्याची पद्धत. आपल्याकडे फक्त स्त्रिया औक्षण करतात. पण इथे पुरुषदेखील औक्षण करतात. आमच्या शिबिरामध्ये एकाचा वाढदिवस होता तेव्हा आम्यांनी अचानक मला औक्षण करायला बोलावले. पहिलाच प्रसंग असल्याने हाताला कंप सुटला पण लगेच आपल्याला केवढा मोठा मान मिळाला आहे समजले. मी त्यामागची भूमिका समजावून घेण्याचा प्रयत्न केला. 

काय असेल? ज्या घरात स्त्रिया नाहीत तेथेदेखील औक्षण व्हावे? ज्या घरात एकच स्त्री आणि बाकी सगळे पुरुष आहेत त्या घरातल्या स्त्रीलादेखील औक्षण व्हावे? की आपण दर वेळी स्त्रीपुरुष समानतेविषयी बोलतो, तेव्हा फक्त स्त्रीला पुरुषांचे अधिकार मिळण्याविषयी बोलतो, पुरुषांना स्त्रीचे काही अधिकार मिळावेत याविषयी बोलत नाही. हा कदाचित स्त्री-पुरुष समानतेचा व्यापक आविष्कार असावा. 

‘शोधग्राम’मध्ये दर बुधवारी सकाळी श्रमदान केले जाते आणि त्यात सर्व ‘शोधग्राम’वासीय स्वयंप्रेरणेने सामील होतात. इथे स्वतःची खोली स्वतः झाडावी लागते आणि मेसमध्ये स्वतःचे ताट-वाटी स्वतः धुवावी लागते. एखाद्या सकाळी साडेआठ वाजता आपण मेसमध्ये प्रवेश करू लागतो आणि महाराष्ट्रभूषण डॉ.अभय बंग स्वतःची नाश्त्याची प्लेट स्वतः विसळताना दिसतात तेव्हा आपला अहंकार अलगद गळून पडतो आणि पुन्हा डोके वर काढत नाही. 

‘शोधग्राम’मध्ये साधेपणा आहे, पण गबाळेपणाचा लवलेश नाही. कुठल्याच नैसर्गिक, मानवनिर्मित साधनसंपत्तीची हेळसांड आणि उधळपट्टी नाही, पण आवश्यक तेथे ती योग्य प्रमाणात उपलब्ध आहे. इथे आकर्षकपणा नाही पण सुव्यवस्थितपणा आहे. इथे प्रत्येक घराला, इमारतीला झाडाचे नाव दिलेले आहे. उदा. सभागृहाला ‘पिंपळ’, कार्यालयाला ‘औदुंबर’, मुलांच्या वसतिगृहाला ‘रांझी’, तिथल्या रेसिडेंट डॉक्टर्सच्या वसतिगृहाला ‘वेळूबन’ इत्यादी. इतर सामाजिक संस्थांध्ये त्यांच्या व्यस्थापनामध्ये प्रकर्षाने दिसणारा विस्कळीतपणा येथे अजिबात दिसत नाही. 

‘सर्च’ आणि ‘शोधग्राम’मध्ये चालणारे महत्त्वाचे कार्य म्हणजे आरोग्यविषयक संशोधन आणि आरोग्यसेवा. इथे आदिवासींच्या देवतेच्या नावाने स्थापलेले माँ. दंतेश्वरी रुग्णालय आहे. बाह्यरुग्ण विभाग (ओ.पी.डी), सोनोग्राफीसकट निरनिराळ्या चिकित्सा आणि मणक्याच्या शस्त्रक्रियेसारख्या कठीण शस्त्रक्रिया इथे माफक दरात होतात. जेनेरिक मेडिसीनचे दुकान या परिसरात आहे. ‘शोधग्राम’मध्ये व्यक्तीच्या बाह्यरूपावरून त्याचे/तिचे व्यक्तिमत्त्व जोखण्याचा प्रयत्न करू नये. इथे दिसणारी एखादी गावंढळ वाटणारी स्त्री कर्तव्यदक्ष मेट्रन असू शकते आणि ती तुमचे बी.पी. अचूक मोजू शकते किंवा एखादी 18-19 वर्षांची मुलगी तुमचा इ.सी.जी. शिताफीने काढून देते. 

‘शोधग्राम’मध्ये प्रत्येक माणूस आपापल्या कामात व्यस्त असतो. तो इतरांच्या कामात लुडबूड करत नाही. पण याचा अर्थ त्याला इतरांशी देणे-घेणे नसते असे नाही. तुम्ही त्याच्याकडे गेलात तर तुम्हाला मदत करायला तो सदैव तत्पर असतो. ‘सर्च’ आणि ‘शोधग्राम’ची स्थापना आणि आत्तापर्यंतची वाटचाल हा सामूहिक प्रयत्नांचा परिपाक आहे. डॉ.अभय आणि डॉ.राणी बंग यांची विद्वत्ता, नि:स्पृह आणि समाजाप्रती समर्पित वृत्ती जशी यास कारणीभूत आहे, त्याबरोबरच त्यांना सुरुवातीपासून आतापर्यंत (आणि यापुढेदेखील) ज्या व्यक्तींची साथ लाभली, लाभत आहे, लाभेल तीदेखील तितकीच महत्त्वाची आहे. 

‘सर्च’ने आपल्या कामाचा आवाका आणि परीघ वाढवला आहे. त्यामुळे येथे वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक भेटतात. येथे प्रत्येक माणसाकडून काही ना काही शिकायला मिळते. इथे बंग दाम्पत्याच्या कार्यात पहिल्यापासून सहभागी झालेले आणि आता ‘शोधग्राम’चे दैनंदिन कार्य पाहणारे आणि विविध खेळांच्या माध्यमातून आदिवासी तरुणांध्ये आत्मविश्वास जागृत करणारे राजेंद्र इसासरे, ज्ञानेश्वर पाटील आहेत, दोन वर्षांपूर्वी मुंबईचे कॉर्पोरेट जगत सोडून आलेला, सायकॉलॉजीचा तज्ज्ञ असलेला आणि आदिवासींच्या समस्यांची जाणीव व्हावी म्हणून पायात चप्पल घालणे सोडलेला वेंकी अय्यर आहे, पी.आय.सी.टी सारख्या कॉलेजमधून संगणक अभियंता झालेला आणि आता पूर्ण वेळ ‘निर्माण’चे काय करणारा आणि धान्यापासून दारू निर्मितीच्या धोरणाबाबत आग्रही भूमिका घेणारा अमृत बंग आहे; संगणक अभियंता असलेली आणि आता ‘निर्माण’ आणि शिक्षणक्षेत्रात काम करणारी सायली तामणे असेल, अमेरिकेहून थेट गडचिरोलीत येणारे आणि ‘शोधग्राम’मध्ये ओ.पी.डी. सांभाळणारे डॉ.योगेश कलकोंडे असतील, मुंबई-पुण्याचे आरामदायी जीवन सोडून सर्चच्या माध्यमातून गडचिरोलीत आरोग्यसेवा देणारे डॉ.सुजय काकरमठ, डॉ.विवेक आगवणे, डॉ.रामानंद असतील किंवा ग्रामीण भागात असलेली फिजिओथेरेपीची गरज ओळखून पुण्याहून आलेली आणि पूर्णवेळ सर्चमध्ये कार्यरत असलेली डॉ.गौरी चौधरी असेल किंवा आय.आय.टी.मधून एम.टेक करून आता मोबाईल तंत्रज्ञान वापरून ग्रामीण भागात आरोग्यसेवा सुधारण्याचा प्रयत्न करणारा निखिल जोशी असेल, सर्चसाठी सॉफ्टवेअर विकसित करणारे अश्विन-अतुल असतील किंवा फायद्या- तोट्याचा विचार न करता केवळ वाचन संस्कृती रुजवण्याच्या हेतूने गडचिरोलीत पुस्तकांचा व्यवसाय सुरू करणारा शरद अष्टेकर असेल. प्रत्येकाचा प्रवास थक्क करणारा आहे. 

काय असेल त्यांची प्रेरणा? स्वतःचा लागलेला शोध? जीवनातल्या ‘अर्थाला’ नव्हे तर जीवनाच्या अर्थाला दिलेले महत्त्व आणि मूर्त-अमूर्त स्वरूपातलं आणखी बरंच काही. ‘शोधग्राम’मध्ये फिरताना प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे बंग दांपत्यापासून ते मेसमध्ये स्वयंपाक करणाऱ्या मावशीपर्यंत प्रत्येक व्यक्तीचे, आपण कोण? आपण काय करतो?, कोणासाठी करतो? याबाबत प्रचंड conviction आहे. सर्चच्या यशाचे तेच एक गमक असावे. ‘निर्माण’चा क्रांतीपेक्षा उत्क्रांतीवर जास्त विश्वास आहे. आकर्षक असतो तो स्वधर्म नसतो. स्वप्नरंजनातही स्वधर्म नसतो. जिथे माझी खरी गरज असेल तोच माझा स्वधर्म. स्वधर्म कर्तव्यरूप असतो या डॉ.अभय बंग यांच्या स्वधर्माच्या व्याख्येला धरून ‘निर्माण’ची रचना झाली. ‘निर्माण’ ध्येयवादी तरुणाईला स्वप्न रचण्यास शिकवते पण स्वप्नाळू बनवत नाही. त्यांना समाजासाठी कृतिशील बनवते पण बूर्झ्वा समाजवादी बनवत नाही. 

आज आधुनिक म्हणवणाऱ्या शहरी समाजात विविध समूहांचे परस्पर संबंध ताण-तणावाचे, संशयाचे बनलेले आहेत. नातेसंबंधांना व्यावहारिक स्वरूप आले आहे. स्वार्थी वृत्ती, दांभिकता, चंगळवाद बळावतो आहे. स्पर्धा निकोप राहिलेली नाही. ‘सर्वेऽत्र सुखिनः सन्तु:। सर्वे सन्तु निरामयाः’ अशी शिकवण देणाऱ्या समाजातूनच सहजीवनाची संकल्पना लोप पावते की काय अशी परिस्थिती ‘निर्माण’ झालेली आहे. अशा समाजास निराशेच्या गर्तेतून बाहेर काढण्याचा आशावाद ‘निर्माण’ बाळगून आहे. आज वैयक्तिक आणि सामाजिक विकासाच्या मूलभूत संकल्पनेची फेरतपासणी करण्याची आणि विकासाची प्रक्रिया, त्याची प्रारूपे यांध्ये आमूलाग्र बदल करण्याची वेळ आलेली आहे. ‘निर्माण’ ही शैक्षणिक प्रक्रिया त्याला निश्चित साहाय्यभूत ठरेल. 

निसर्गाच्या सानिध्यात आणि डॉ.अभय व डॉ.राणी बंग आणि ‘शोधग्राम’च्या समृद्ध सहवासात शिबिराचे सात दिवस कसे गेले कळलेच नाही. 6 जानेवारीला सकाळची पहिली बस पकडण्यासाठी ‘शोधग्राम’पासून फाट्यापर्यंत चालू लागलो. मनात हुरहूर होती. सूर्य नुकताच उगवत होता. नकळत ‘निर्माण’मध्ये म्हटलेल्या स्फूर्तिगीताच्या ओळी आठवल्या; आम्ही प्रकाशबीजे. रुजवीत चाललो, वाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो. फाट्यावर बसची वाट पाहत थांबलो. इथे आलो तेव्हा मनात संभ्र होता, थोडसं न्यून होत. परत जाताना एक आत्मविश्वास होता. ‘स्व’च्या शोधाची प्रक्रिया सुरू झाली होती. बसचा आवाज आला. दूरवर दिसणारे मिणमिणते दिवे ‘शोधग्राम’चे अस्तित्व दाखवत होते. ते पुन्हापुन्हा बहुधा स्वतःच्याच उदाहरणावरून सांगत होते, विश्वास देत होते... ‘तू जिंदा है तो जिंदगी की जीत पे यकीन कर...!’
 

Tags: गडचिरोली डॉ. राणी बंग डॉ.अभय बंग सर्च शोधग्राम मकरंद दिक्षित Gadchiroli Dr. Rani Bang Dr. Abhay Bang Search Shodhgram Makarand Dixit weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके