डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

स्थितिवादी व शून्यवादी धारणेला छेद देण्याचा प्रयत्न

साहित्य : रा. शं. दातार विशेष नाट्य पुरस्कार | मराठी रंगभूमीच्या तीस रात्री : मकरंद साठे

आज मराठी रंगभूमी परत एकदा ताकदीने उभी राहू पाहत आहे. हे चित्र आशादायक आहे आणि त्यामागचं कारण आहे आजच्या तरुण पिढीची प्रचंड ऊर्जा, हे नि:संशय. परंतु त्याच वेळी ही नवी पिढी- काही मोजके अपवाद वगळता- इतिहासापासून तीव्रपणे तुटलेली आणि वैचारिकताविरोधी अशी झालेली दिसते. ‘आम्हाला नवे काही तरी करायचे आहे, आम्हाला काय इतिहासाचे’, अशी स्पष्ट विधानेही कानांवर येतात. वरवर पाहता, ही बंडखोरी वाटते आणि बंडखोरी मला केवळ मान्यच आहे असे नव्हे, तर कुठल्याही चांगल्या कलाकृतीमागे काही किमान बंडखोर जाणिवा असतात, असे मला वाटते. परंतु बंडखोरी अनैतिहासिकेतून कधीच उभी राहत नसते. त्यातून उभा राहतो तो स्थितिवाद आणि कळत वा नकळत आजचा तरुण वर्ग त्याला मोठ्या प्रमाणात बळी पडताना दिसू लागला आहे, असे माझे व्यक्तिगत मत आहे.

महाराष्ट्र फाउंडेशनकडून मला दुसऱ्यांदा पुरस्कार मिळत आहे; शिवाय हा पुरस्कार ‘विशेष पुरस्कार’ म्हणून मिळत आहे, त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो.

एखादे बक्षीस मिळाल्यावर त्यावर प्रतिक्रिया देताना वा त्यानिमित्ताने मनोगत व्यक्त करताना लेखक म्हणून काय बोलावे, हा प्रश्न मला नेहमीच पडतो. कुठलाही चांगला लेखक बक्षीस मिळविण्यासाठी लिहीत नसतो. त्याला आपल्याजवळ काही सांगण्यासारखे आहे असे वाटत असते, ते इतरांना सांगणे प्राप्त आहे अशी त्याची धारणा असते; म्हणून तो लिहितो. पण याचाच अर्थ असा की, त्याला ते ‘इतर कोणाला तरी’ सांगायचे असते. म्हणजे पर्यायाने प्रत्येक कलाकृती वा साहित्यकृती ही एक सामाजिक क्रिया असते. थोडक्यात, कुठलाही चांगला लेखक पुरस्कार मिळविण्यासाठी लिहीत नसला तरी तो मिळणे- विशेषत: ज्या व्यक्ती वा संस्था त्याला महत्त्वाच्या, आदरणीय वाटतात त्यांच्याकडून मिळणे- ही एक आनंददायक बाब असते. पण हा आनंद अभिव्यक्त करून आभार मानल्यानंतर पुढे अधिक काय बोलावे, हा प्रश्न उरतोच. तरीही काही सांगायचे तर त्या पुस्तकाची निर्मिती करण्याबाबत माझी काय भूमिका होती, हे थोडक्यात मांडणे आणि त्यात मला मदत केलेल्या काही संस्था व व्यक्तींचे आभार मानणे योग्य होईल, असे मला वाटते.    

पहिला मुद्दा असा की- मी काही कोणी इतिहासकार वा राज्यशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ नव्हे; विचारवंत वगैरे तर नव्हेच नव्हे, याची मला पूर्ण जाणीव आहे. मी एक ललित लेखक आहे. मग मी हा इतिहास- तो ही सामाजिक-राजकीय अंगाने- लिहिण्याच्या फंदात का पडलो? एक कारण असे की, ललित लेखकाने वैचारिकतेपासून फटकून राहिले पाहिजे; राजकारण, समाजकारणविषयक तत्त्वविचारापासून, सैद्धांतिक विचारांपासून स्वत:ला दूर ठेवले पाहिजे- असे मला वाटत नाही. किंबहुना, आपल्या कुवतीनुसार काही किमान पातळीवरचा असा विचार ललित लेखनासाठी आवश्यकच आहे, अशी माझी धारणा आहे. त्याचप्रमाणे ललित लेखकांची जीवनदृष्टी सामाजिक शास्त्रज्ञांहून वेगळ्या प्रकारची असल्याने, त्यांचे परिप्रेक्ष्यच वेगळे असल्याने वैचारिक बाबतीतही ललित लेखक काही योगदान देऊ शकतात; नव्हे, त्यांनी ते तसे देणे- एका प्रकारे स्वत:चा मॅनिफेस्टोच मांडणे- हे त्यांचे कर्तव्यच आहे, असे मी मानतो. या धारणेतून मी हा इतिहास मांडला आहे. म्हणजे थोडक्यात असे की, हा एका ललित लेखकाने एका आंतरिक ओढीतून घेतलेला आढावा आहे; एखाद्या सामाजिक शास्त्रज्ञाने आपले व्यावसायिक कौशल्य आणि शिक्षण वापरून केलेली मांडणी नव्हे. अर्थात, हे करीत असता वैचारिक शिस्त पाळण्याचा मी कसोशीने प्रयत्न केला आहे.

दुसरा मुद्दा असा की- हे सर्व मान्य केले तरीही त्याचा अर्थ मी अशा इतिहासलेखनाचा प्रयत्न करावा, असा होत नाही. मला एक ललित लेखक म्हणून पडलेले काही प्रश्न या खटाटोपाला कारणीभूत झाले. हे प्रश्नही काही जगावेगळे नव्हेत, जवळजवळ प्रत्येकच ललित लेखकाला आणि कलावंतालाही ते पडत असणार. त्यातले मूलभूत प्रश्न दोन-  मी का लिहितो? आणि चांगलं साहित्य कशाला म्हणावं? या सामान्य वाटणाऱ्या प्रश्नांतूनच पुढचे अधिक खोलवरचे प्रश्न मग स्वाभाविकपणे उद्‌भवतात. मी नक्की कुठल्या परंपरांचा पाईक आहे आणि त्यांना मी नक्की कुठले वळण देऊ पाहत आहे? या प्रश्नापासून ते त्याहूनही अधिक खोलातल्या अशा मूलभूत प्रश्नापर्यंत- ‘मी कोण?’ या सर्वांत कळीच्या आणि अनेक आयाम असणाऱ्या प्रश्नापर्यंत- अनेक प्रश्न उद्‌भवतात.

मी केलेला हा इतिहासाचा अभ्यास म्हणजे या प्रश्नांच्या उत्तरार्थ झालेला माझा प्रवास आहे. त्याला काही ठोस स्वरूप- अभ्यासालाही आणि प्रत्यक्ष मांडणीलाही- 2009 आणि 2010 या दोन वर्षांत आलेलं असलं, तरी त्याची सुरुवात उघडपणे कित्येक वर्षांपासून झालेली आहे. मग आत्ताच या प्रवासाला असं स्वरूप येण्याचं कारण काय? एक कारण असं की- अशी ऐतिहासिक, विशेषत: सामाजिक अंगाने असणारी मांडणी मराठी नाटकाबाबत झालेली नाही. माझ्या या उत्तराच्या शोधातल्या प्रवासात ही उणीव गेली अनेक वर्षे पदोपदी जाणवत होती. या ग्रंथाच्या मांडणीमागचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. इतिहासकार म्हणून, समाजशास्त्राचा विद्यार्थी म्हणून माझ्या असणाऱ्या मर्यादांपेक्षाही ही उणीव अधिक दबाव निर्माण करणारी ठरली आणि मी या पुस्तकाचे लिखाण करण्याचे ठरवले. सुरुवातीस त्याचा आवाका एवढा मोठा व्हावा, अशी योजना अर्थातच नव्हती. तो तसा झाला याचे एकमेव कारण म्हणजे, मराठी नाट्यपरंपरेची श्रीमंती आणि तिच्यातली विविधता. माझ्या परीने मी त्यातील सर्व प्रवाहांना भिडण्याचा प्रयत्न केलेला आहे- विशेषत: त्यातल्या उपेक्षित, दुर्लक्षित पण महत्त्वाच्या प्रवाहांना. मध्यमवर्गीय मर्यादांबाहेर जाण्याचा प्रयत्न अर्थातच सोपा नाही. वर्गाच्या- आणि जाती-वर्णाच्याही- मर्यादा उल्लंघून जाणे सोपे नसतेच. त्या मी उल्लंघून जाण्यात कुठे ना कुठे कमी पडलो असण्याचीही दाट शक्यता उरते. एक समाजशास्त्रज्ञ म्हणून शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास न झाल्यातून उद्‌भवलेल्या मर्यादांप्रमाणेच याही मर्यादा या अभ्यासाला असणार, हे मला मान्य आहे. परंतु त्याबरोबरच खरोखर महत्त्वाचे असेही काही मला सांगायचे आहे, असाही माझा विश्वास आहे. हा विश्वासच लेखकाला लेखक बनवत असतो. मी का लिहितो, याचे हे सर्वांत महत्त्वाचे उत्तरही आहे. याच कारणाने मी आजतागायत लिहीत आलो. आजचा काळ रंगभूमीच्या आणि कादंबरीच्या इतिहासातला पडता काळ, असे सर्वसाधारण मत आहे. अशा काळातला मी एक लेखक आहे; पण त्याच वेळी मला खरोखरच काही वेगळे अर्थ लागताहेत, अशी माझी धारणा होती आणि आहे- मग त्याच्या मर्यादा काहीही असोत. त्यातूनच मी हे धाडस केले. हे धाडस करण्यामागे अजूनही एक कारण आहे. सद्य:स्थिती ही ‘क्रायसिस’ची स्थिती आहे, असे बहुतेक विचारवंतांचे म्हणणे आहे. मला ते मान्य आहे. परंतु ‘क्रायसिस’ची स्थिती ही एक मोठी संधीही असते, असे माझे मत आहे. कुठल्याही लेखकासाठी आजचा कालखंड अत्यंत आव्हानात्मक आहे हे खरेच; पण म्हणूनच तो अत्यंत एक्साइटिंग, उद्युक्त करणाराही आहे. इतिहासाचा परत एकदा नव्यानं अर्थ लावायला भाग पाडणाराही आहे. या प्रयत्नामागचे हेही एक महत्त्वाचे कारण.

अजूनही एक कारण आहे- आज मराठी रंगभूमी परत एकदा ताकदीने उभी राहू पाहत आहे. हे चित्र आशादायक आहे आणि त्यामागचं कारण आहे आजच्या तरुण पिढीची प्रचंड ऊर्जा, हे नि:संशय. परंतु त्याच वेळी ही नवी पिढी- काही मोजके अपवाद वगळता- इतिहासापासून तीव्रपणे तुटलेली आणि वैचारिकताविरोधी अशी झालेली दिसते. ‘आम्हाला नवे काही तरी करायचे आहे, आम्हाला काय इतिहासाचे’, अशी स्पष्ट विधानेही कानांवर येतात. वरवर पाहता, ही बंडखोरी वाटते आणि बंडखोरी मला केवळ मान्यच आहे असे नव्हे, तर कुठल्याही चांगल्या कलाकृतीमागे काही किमान बंडखोर जाणिवा असतात, असे मला वाटते. परंतु बंडखोरी अनैतिहासिकेतून कधीच उभी राहत नसते. त्यातून उभा राहतो तो स्थितिवाद आणि कळत वा नकळत आजचा तरुण वर्ग त्याला मोठ्या प्रमाणात बळी पडताना दिसू लागला आहे, असे माझे व्यक्तिगत मत आहे. त्याच्यात प्रचंड ऊर्जा आहे, हेवा वाटावा अशी कल्पकता आणि सुप्त सर्जनशीलताही आहे; पण त्याच्याच जोडीला ही स्थितिवादी आणि शून्यवादी धारणाही आहे. माझ्या जीवनदृष्टीनुसार या जाणिवांना छेद देण्याचा प्रयत्न करणे अनिवार्य आहे. या दिशेने एक पाऊल जरी पडले तरी माझा हेतू सफल झाला, असे मला वाटेल. म्हणूनच हे पुस्तक जिने नुकतेच तारुण्यात पदार्पण केले आहे अशा माझ्या मुलीला आणि त्याचबरोबर तिच्या आसपासच्या सर्वच तरुण पिढ्यांना मी अर्पण केले आहे. अशा स्वरूपाचे काम अनेकानेक व्यक्तींच्या आणि संस्थांच्या सहभागाशिवाय अशक्यच आहे, हे उघड आहे. त्यांचा ऋणनिर्देश केलाच पाहिजे, कारण त्यांचा वाटा फार मोठा आहे. सर्वांचा उल्लेख येथे करणे शक्य नाही, तो पुस्तकात केलाच आहे.

सर्वप्रथम उल्लेख केला पाहिजे तो बंगलोरच्या ‘इंडिया फाउंडेशन फॉर द आर्ट्‌स’ या संस्थेचा. त्यांनी दिलेल्या अभ्यासवृत्तीशिवाय हे काम शक्य नव्हते. हे पुस्तक प्रकाशित करणे, ही सोपी गोष्ट नव्हती. प्राज फाउंडेशनने त्यासाठी अर्थसाह्य दिले आणि पॉप्युलर प्रकाशनाने ही जोखीम उचलली. त्याचप्रमाणे माझे मित्र आणि प्रसिद्ध चित्रकार श्री.सुधीर पटवर्धन यांनी काहीही मोबदला न घेता याच्या मुखपृष्ठासाठी एक नवे चित्र तर रंगवलेच, पण आतील प्रत्येक प्रकरणासाठी आपली अप्रतिम रेखाचित्रे उबलब्ध करून दिली, त्यांचा मी अत्यंत आभारी आहे.

संदर्भ मिळवून देण्याबाबत तर असंख्य लोकांनी मदत केली. त्यांची यादी इथे देणं शक्य नाही. असे काम प्रसिद्ध होण्याआधी निदान काही जाणकारांनी, तज्ज्ञांनी ते वाचून त्यावर टीका-टिप्पणी करणे, सूचना करणे आवश्यक असते. प्रा.राम बापट, श्री.समर नखाते, श्री.चंद्रशेखर पुरंदरे, श्री.अतुल पेठे, श्री.गजानन परांजपे, डॉ.शांता साठे यांनी संपूर्ण ग्रंथ वाचला. त्यांच्याशी केलेल्या चर्चांचा मला मोठाच फायदा झाला. एकंदरीनेच आजच्या धकाधकीच्या जीवनात आणि विशेषत: ज्या कुटुंबातील सर्वच व्यक्ती गंभीरपणे व बांधिलकीने स्वत:च्या व्यवसायात गुंतलेल्या असतात अशा घरात सर्वांनीच एकमेकांना साह्य केले, तरीही परिस्थिती किती बिकट असते याचा अनुभव अनेकांना आला असेल. त्यातही एखाद्या व्यक्तीने असे काम अंगावर घेतले तर इतरांवर किती दडपण येते, ते सांगणयाचीही आवश्यकता नाही. माझी पत्नी आणि मुलगी यांनी त्यासंबंधी कधी वाच्यता केली नसली तरी त्यांच्यावरही ते आलेच असणार, याची मला पूर्ण जाणीव आहे; पण त्यांचे आभार तरी कसे मानावेत?

Tags: श्याम मनोहर सतीश आळेकर ते पुढे गेले मराठी रंगभूमीच्या तीस रात्री शांता साठे राम बापट श्रीराम लागू नाटक रंगभूमी समर नखाते अतुल पेठे मकरंद साठे Shyam Manohar Satish Alekar Te Pudhe Gele Marathi Rangbumichya Tees Ratri Shanta Sathe Ram Bapat Shriram Lagu Natak Rangbhumi Samar Nakhate Atul Pethe Makarand Sathe weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

मकरंद साठे,  पुणे
makdhan@vsnl.com

नाटककार, लेखक व नाट्यदिग्दर्शक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके