डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

नोबेल पुरस्कार स्वीकारताना मलालाने केलेले भाषण

प्रिय बंधू आणि भागिनींनो, कदाचित तथाकथित प्रौढ जगाला हे समजू शकेल, पण आम्हा मुलांना हे समजू शकत नाही- ज्यांना आपण शक्तिशाली राष्ट्रे म्हणतो, ती युद्धे करण्यासाठी प्रचंड ताकदवान असतात; पण शांतता प्रस्थापित करण्यासाठी मात्र दुर्बळ ठरतात. असे का? बंदुका पुरवणे सोपे, पण पुस्तके पुरवणे मात्र महाकठीण- असे का? रणगाडे बनवणे सोपे, पण शाळा बांधणे कठीण- असे का?

राजघराण्याचे सदस्य, नॉर्वेच्या नोबेल समितीचे  प्रतिष्ठित सदस्य, प्रिय बंधू आणि भगिनींनो! 

आजचा दिवस माझ्यासाठी विशेष आनंदाचा आहे. नोबेल समितीने माझी या बहुमोल पुरस्कारासाठी निवड  केली, त्याचा मी विनम्रपणे स्वीकार करते. 

तुम्हा सर्वांनी दिलेले प्रेम आणि आधाराबद्दल मनःपूर्वक आभार. जगभरातून मला अजूनही पत्रे आणि  शुभेच्छा येतात, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. तुमचे  सहृदय आणि उत्तेजन देणारे शब्द वाचून मला ऊर्जा व  प्रेरणा मिळते.  माझ्या पालकांनी मला दिलेल्या निःस्वार्थी  प्रेमाबद्दल मी त्यांची ऋणी आहे.

माझ्या वडिलांनी माझे  पंख न छाटता मला उंच आकाशात उडू दिले, म्हणून  त्यांचे आभार. माझ्या आईने मला सोशिक बनायला  शिकवले आणि नेहमी सत्य बोलण्यासाठी प्रेरित केले,  म्हणून तिचे आभार. इस्लामचा हाच खरा संदेश आहे,  असा आमचा ठाम विश्वास आहे. 

हा पुरस्कार मिळालेली मी पहिली पश्तून आहे,  पहिली पाकिस्तानी आहे आणि पहिली तरुण व्यक्ती  आहे, याचा मला अभिमान वाटतो. मला खात्री आहे, आपल्या धाकट्या भावंडांबरोबर अजूनही भांडण  करणारी आणि नोबेल शांतता पुरस्कार मिळवणारी  अशी मी पहिलीच व्यक्ती असेन. मला सगळीकडे  शांतता हवी आहे, पण माझ्या भावांबरोबर माझ्या  अजूनही वाटाघाटी चालू आहेत. 

लहान मुलांच्या अधिकारांचे कैवारी कैलाश सत्यार्थी यांच्या बरोबरीने मला हा पुरस्कार मिळाला,  हा मी माझा सन्मान समजते. माझ्या वयाच्या दुपटीहून  अधिक काळ त्यांनी हे काम केलेले आहे. आम्ही दोघे  येथे बरोबर उभे राहून जगाला दाखवू शकतो की, भारत  व पाकिस्तान हे शांततेसाठी एकत्र येऊ शकतात आणि  लहान मुलांच्या अधिकारासाठी एकत्र काम करू  शकतात. मला याचा विशेष आनंद आहे. 

प्रिय बंधू आणि भगिनींनो, ‘पश्तुनी जोन ऑफ  आर्क’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रेरणादायी  मलालाईवरून माझे नाव ठेवले गेले. मलाला या  शब्दाचा अर्थ ‘दुःखी’ असा होतो. पण त्यात काही  आनंद निर्माण करण्यासाठी माझे आजोबा मला नेहमी  मलाला- जगातली सर्वांत आनंदी मुलगी- म्हणून हाक  मारायचे. आज एका महत्त्वाच्या ध्येयासाठी मी इथे  उभी असल्याचा मला अत्यंत आनंद होत आहे. 

हा पुरस्कार केवळ माझ्यासाठी नाही; तो शिक्षणाची  आस बाळगणाऱ्या पण समाजाला ज्यांचा विसर पडला  आहे, अशा सर्व बालकांसाठी आहे. तो शांतता हवी  असलेल्या पण भेदरलेल्या बालकांसाठी आहे. तो  स्वतःचा आवाज नसलेल्या पण परिवर्तनाची इच्छा  बाळगणाऱ्या बालकांसाठी आहे. 

मी इथे त्यांच्या अधिकारांसाठी, त्यांचा आवाज  उठवण्यासाठी उभी आहे. ही वेळ त्यांची कीव  करण्याची नाही; आता कृती करण्याची वेळ आलेली  आहे, जेणेकरून बालकांवर शिक्षणापासून वंचित  राहण्याची वेळ परत कधी येणार नाही.

लोक माझे वर्णन अनेक प्रकारे करतात, असे माझ्या लक्षात आले आहे. काही लोक म्हणतात की, तालिबानने गोळी घातलेली हीच ती मुलगी. आणि काही जण म्हणतात की, स्वतःच्या अधिकारांसाठी  लढणारी ही मुलगी. 

...आणि आता काही लोक मला ‘नोबेल  पुरस्काराने सन्मानित’ म्हणून ओळखतात.  माझ्या मते, मी फक्त बांधील आणि निग्रही अशी  व्यक्ती आहे. प्रत्येक बालकाला दर्जेदार शिक्षण  मिळावे, प्रत्येक स्त्रीला समान हक्क मिळावेत आणि  जगाच्या कोनाकोपऱ्यात शांतता नांदावी, अशी माझी  इच्छा आहे. 

शिक्षण ही आयुष्यात मिळणाऱ्या मोठ्या देणग्यांपैकी एक आहे आणि गरजांपैकी एक आहे. माझ्या 17  वर्षांच्या आयुष्यातला हा माझा अनुभव आहे. उत्तर पाकिस्तानातल्या स्वात खोऱ्यातल्या माझ्या घरी, मला  नेहमीच शाळा आणि नव्या गोष्टी शिकायला आवडायच्या. विशेष सणा-समारंभाच्या वेळी मी आणि  माझ्या मैत्रिणी आमचे हात मेंदीने रंगवून घ्यायचो, ते मला आठवते आहे. हातावर फुलांची नक्षी रंगवण्याऐवजी  आम्ही गणितामधली सूत्रे आणि समीकरणे रंगवत असू. 

आम्हाला शिक्षणाची तहान होती, कारण आमचे भविष्य त्या शाळेच्या वर्गातच होते. आम्ही एकत्र बसून वाचन करायचो आणि शिकून घ्यायचो. स्वच्छ, परिटघडीचा गणवेश घालायला आम्हाला आवडायचे.  तिथेच बसून आम्ही आमची स्वप्ने रंगवली. आमच्या  पालकांना अभिमान वाटेल असे काही करण्याची आमची  इच्छा होती. ज्या गोष्टी फक्त मुलांनाच जमू शकतात असे  काही लोकांना वाटायचे, अशा गोष्टी मुलींनाही जमू  शकतात; असे सिद्ध करण्याची आणि अभ्यासात विशेष  प्रावीण्य मिळवण्याची आमची इच्छा होती. 

तेथील परिस्थिती बदलत गेली. मी दहा वर्षांची  असताना पर्यटकांना आकर्षित करणारा आमचा सुंदर  स्वात प्रदेश दहशतवाद्यांचा अड्डा बनला. चारशेहून अधिक शाळा उद्‌ध्वस्त केल्या गेल्या. मुलींना शाळेत  जाण्यास बंदी केली गेली. स्त्रियांना मारहाण करण्यात आली. निष्पाप लोक मारले गेले. आम्हा सगळ्यांचे हाल  झाले. आमच्या सुंदर स्वप्नांचे दुःस्वप्नात रूपांतर झाले. 

शिक्षण हा अधिकार होता; तो आता गुन्हा बनला. 

पण माझे जग अचानक बदलून गेले, तेव्हा माझे  अग्रक्रमही बदलून गेले. माझ्यापुढे दोन पर्याय होते. एक  तर गप्प बसणे आणि आपली हत्या केव्हा होते त्याची  वाट पाहणे. नाही तर आपला आवाज उठवणे आणि  मृत्यूला सामोरे जाणे. मी दुसरा पर्याय निवडला. मी  आपला आवाज उठवायचा निर्णय घेतला. 

दहशतवाद्यांनी आम्हाला थांबवायचा प्रयत्न केला.  मी आणि माझ्या मैत्रिणींवर त्यांनी 9 ऑक्टोबर 2012  रोजी हल्ला केला; पण बंदुकांमधून सुटलेल्या त्यांच्या  गोळ्या जिंकू शकल्या नाहीत. आम्ही बचावलो आणि  त्या दिवसापासून आमचा आवाज अधिकाधिक मोठा  होत गेलेला आहे. माझी ही कथा अशा प्रकारची एकमात्र  कथा आहे, म्हणून मी ती सांगते आहे, असे नाही; ही  अनेक मुलींची कथा आहे, म्हणून मी सांगते आहे. 

माझ्या काही बहिणींना मी ऑस्लोला घेऊन आले आहे. पाकिस्तान, नायजेरिया, सिरियामधल्या माझ्या  सख्यांची हीच कर्मकहाणी आहे. माझ्या दोन शूर भगिनी- शाझीया आणि कैनात रियाझ यांच्यावरही  स्वातमध्ये गोळीबार झाला होता. त्यांनासुद्धा दुःखद वेदनांचा सामना करावा लागला. माझी  पाकिस्तानातली भगिनी कैनात सोम्रो हिचा अत्यंत  हिंसक असा छळ झाला. तिच्या भावांचीसुद्धा हत्या  झाली. पण तिने शरणागती पत्करली नाही. 

मलाला फाउंडेशनच्या कामादरम्यान मला  भेटलेल्या आणि आता माझ्या बहिणीसारख्या  असलेल्या मुली आज माझ्याबरोबर आहेत. माझी  सोळा वर्षांची हिम्मतवाली सिरियन बहीण मेझोन सध्या  जॉर्डनमधल्या निर्वासित छावणीत राहते आहे. ती  प्रत्येक तंबूत जाऊन लहान मुला-मुलींना शिकवते.  उत्तर नायजेरियामधली माझी बहीण अमीना. तिथे  बोको हरामकडून शाळेत जायची इच्छा धरणाऱ्या  मुलींचे अपहरण केले जाते. 

जरी मी उंच टाचांच्या बुटांसकट पाच फूट दोन इंच उंचीची एक मुलगी- एक व्यक्ती दिसत असले, तरी मी  एकटी नाही. 

मी शाझीया आहे. 

मी कैनात रियाझ आहे. 

मी कैनात सोम्रो आहे. 

मी मेझोन आहे. 

मी अमीना आहे. 

मी शाळेला मुकलेल्या साडेसहा कोटी मुलींचा  आवाज आहे. 

लोक मला विचारतात की, विशेषतः मुलींसाठी  शिक्षण एवढे महत्त्वाचे का आहे? माझे उत्तर नेहमी तेच  असते, ‘‘पवित्र कुराणाच्या पहिल्या दोन सर्गांतून मी  एक शब्द शिकले आहे, तो म्हणजे इक्रा. त्याचा अर्थ  ‘वाच’. आणि दुसरा शब्द म्हणजे ‘नन वाल-कलाम.’  त्याचा अर्थ ‘लेखणीने’.’’  म्हणून गेल्या वर्षी मी संयुक्त राष्ट्रसंघात  म्हटल्याप्रमाणे- ‘एक बालक, एक शिक्षक, एक  लेखणी आणि एक पुस्तक जग बदलू शकते.’ 

आज अर्ध्या जगात आपण प्रगतीची घोडदौड,  आधुनिकीकरण आणि विकास झालेला पाहतो. पण  असेही अनेक देश आहेत; जिथे कोट्यवधी लोकांना  भूक, गरिबी, अन्याय आणि युद्ध या पुरातन काळापासून  चालत आलेल्या समस्यांना सामोरे जावे लागते. 

खरोखरच 2014 मध्ये पहिल्या महायुद्धाला एक  शतक उलटून गेले आहे, हे आपल्याला आठवते. पण  शंभर वर्षांपूर्वी कोट्यवधी लोकांचे प्राण  गमावल्यानंतरही आपण त्यातून काहीच धडा घेतलेला  दिसत नाही. अजूनही युद्धामध्ये लाखो निष्पाप  लोकांचा बळी जाताना दिसतो. सिरिया, गाझा,  इराकमध्ये अनेक कुटुंबे निर्वासित बनली आहेत. उत्तर  नायजेरियामध्ये मुलींना शाळेत जायचे स्वातंत्र्य  अजूनही नाही. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये  आत्मघातकी हल्ले आणि बॉम्बस्फोट यांत निष्पाप लोक  मृत्युमुखी पडत आहेत.  

गरिबीमुळे आफ्रिकेतल्या अनेक मुलांना शाळेत जाता येत नाही. समाजाने निषिद्ध मानल्यामुळे भारत  आणि पाकिस्तानमधल्या अनेक मुलांना शिक्षणापासून  वंचित राहावे लागते आहे. काही मुलांवर बालकामगार  म्हणून काम करण्याची सक्ती केली जाते, तर मुलींवर  बालविवाहाची. 

धीट आणि आत्मविश्वास असलेल्या माझ्या एका  जिवलग शाळकरी मैत्रिणीचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न  होते. पण ते एक स्वप्नच राहिले. वयाच्या 12 व्या वर्षी  तिचे लग्न लावण्यात आले. वयाच्या 14 व्या वर्षी  म्हणजे पोरवयात तिला एक मुलगाही झाला. मला  माहिती आहे की, माझी ही मैत्रीण एक चांगली डॉक्टर  होऊ शकली असती; पण ती केवळ मुलगी  असल्यामुळे हे होऊ शकले नाही. 

तिच्या या कथेमुळेच मी नोबेल पुरस्काराची रक्कम  मलाला फाउंडेशनला प्रदान करते आहे. जगभरातील  मुलींना चांगले शिक्षण घ्यायला मदत करण्यासाठी मी  जगभरच्या नेत्यांना आवाहन करते की, त्यांनी  माझ्यासारख्या आणि मेझोन किंवा अमीनासारख्या  मुलींना मदत करावी. पाकिस्तानात- विशेषतः स्वात  आणि शांगला या माझ्या जन्मभूमीत- शाळा  बांधण्यासाठी ही पुरस्काराची रक्कम प्रामुख्याने खर्च  होईल. माझ्या स्वतःच्या गावात अजूनही मुलींसाठी  माध्यमिक शाळा नाही. मला अशी शाळा बांधायची  आहे. त्यामुळे माझ्या मैत्रिणींना शिकता येईल;  आपली स्वप्ने साकार करायची संधी मिळेल. 

ही माझ्या कामाची सुरुवात असेल. पण मी  एवढ्यावरच थांबणार नाही. प्रत्येक बालक शाळेत  जाईपर्यंत माझा संघर्ष चालूच राहील. माझ्यावरच्या  हल्ल्याच्या अनुभवातून गेल्यावर मला अधिकच शक्ती  मिळाली आहे, कारण मला माहिती आहे की, मला किंवा  आम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. कारण आम्ही  आता लाखोंच्या संख्येने एकजुटीने उभे आहोत. 

प्रिय बंधू आणि भागिनींनो, यापूर्वी मार्टिन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला, मदर तेरेसा, अंग आन स्यु की  अशा परिवर्तन घडवून आणणाऱ्या श्रेष्ठ व्यक्ती या  मंचावर आलेल्या आहेत. मी आशा करते की, कैलाश  सत्यार्थी व मी आतापर्यंत केलेल्या आणि भविष्यात योजलेल्या कामामुळेसुद्धा काही चिरस्थायी परिवर्तन  घडून येईल. 

मी अतिशय आशावादी आहे की, मुलांच्या  शिक्षणासाठी संघर्ष करण्याची ही शेवटचीच वेळ  असेल. सर्वांनी एकत्र येऊन आम्हाला या कामात मदत  करावी, अशी आमची इच्छा आहे. यातूनच आपण या  प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढू शकतो. आम्ही यासाठी अनेक पावले उचलली आहेत; आता एक  हनुमान उडी घेण्याची वेळ आलेली आहे. 

नेत्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगण्याची गरज नाही, त्यांना ते माहिती आहे. त्यांची स्वतःची मुले चांगल्या  शाळांमध्ये शिकत आहेत. आता त्यांना कृती करायला  सांगण्याची वेळ आलेली आहे. जागतिक नेत्यांनी  एकत्र येऊन शिक्षणाला अग्रक्रम द्यावा, अशी आमची मागणी आहे. पंधरा वर्षांपूर्वी जागतिक नेत्यांनी सर्व जगासाठी सहस्रकाच्या विकासाची काही ध्येये  ठरवली. गेल्या पंधरा वर्षांत आपण काही प्रगती  झालेली पाहिली आहे. शाळा सोडून देणाऱ्या मुलांची  संख्या अर्ध्यावर आलेली आहे. परंतु, जगाने फक्त  प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. प्रगतीचा  फायदा मात्र सर्व लोकांपर्यंत पोहोचला नाही. 

पुढच्या वर्षी- 2015 मध्ये जगभरच्या सर्व लोकांचे  प्रतिनिधी संयुक्त राष्ट्रसंघात एकत्र जमतील आणि  येणाऱ्या काळासाठी शाश्वत विकासाची ध्येये  ठरवतील. त्यातून पुढच्या काही पिढ्यांसाठी जागतिक  इच्छा-आकांक्षा ठरवल्या जातील. नेत्यांनी या संधीचा  फायदा उठवून प्रत्येक बालकाला मोफत आणि दर्जेदार  प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण मिळेल याची हमी  दिली पाहिजे. 

काहीजण म्हणतील की, हे अव्यवहार्य किंवा अतिशय खर्चिक किंवा अत्यंत कठीण आहे; कदाचित  अशक्य आहे. पण आता जगाने काही फार मोठा आणि  वेगळा विचार करण्याची वेळ आलेली आहे. 

प्रिय बंधू आणि भागिनींनो, कदाचित तथाकथित  प्रौढ जगाला हे समजू शकेल, पण आम्हा मुलांना हे  समजू शकत नाही- ज्यांना आपण शक्तिशाली राष्ट्रे  म्हणतो, ती युद्धे करण्यासाठी प्रचंड ताकदवान  असतात; पण शांतता प्रस्थापित करण्यासाठी मात्र  दुर्बळ ठरतात. असे का? बंदुका पुरवणे सोपे, पण  पुस्तके पुरवणे मात्र महाकठीण- असे का? रणगाडे  बनवणे सोपे, पण शाळा बांधणे कठीण- असे का? 

आपण 21 व्या शतकात, आधुनिक काळात राहतो आहोत. अशक्य असे काही नाही, यावर आपला  विश्वास आहे. आपण चंद्रावर जाऊ शकतो आणि  कदाचित लवकरच आपण मंगळावरही पाऊल टाकू  शकू. मग या 21 व्या शतकात आपण असा निर्धार  केला पाहिजे की, सर्वांना दर्जेदार शिक्षण पुरवण्याचे  आपले स्वप्नही आपण साकार करू. 

तेव्हा आपण सर्वांसाठी समानता, न्याय आणि शांतता प्रस्थापित करू या. फक्त राजकारणी आणि जागतिक नेतेच नाही, तर आपण सर्वांनी यासाठी  हातभार लावला पाहिजे. मी. तुम्ही. ही आपली  जबाबदारी आहे. तेव्हा आपण कामाला लागू या. आता कशाची वाट पाहणे नाही. 

माझ्या जगभरच्या बालमित्र-मैत्रिणींना मी आवाहन  करते की, आपण आपल्या अधिकारासाठी उभे राहू या.  प्रिय बंधू आणि भगिनींनो, पिढ्यान्‌पिढ्या चाललेला अन्याय संपवण्याचा निर्धार करणारी पहिली  पिढी आपण बनू या. रिकामे वर्ग, हरवलेले बालपण, वाया गेलेली क्षमता... या सर्व गोष्टी आपल्याबरोबर  संपून जाऊ देत. एखाद्या बालकाने आपले लहानपण एखाद्या कारखान्यात घालवण्याची ही शेवटचीच वेळ  असू दे. एखाद्या मुलीवर बालविवाहाची सक्ती  होण्याची ही शेवटचीच वेळ असू दे. एखाद्या निष्पाप  बालकावर युद्धात प्राण गमवायला लागण्याची ही  शेवटचीच वेळ असू दे. शाळेतला एखादा वर्ग रिकामा  राहण्याची ही शेवटचीच वेळ असू दे. कोणी एखाद्या मुलीला शिक्षण हा अधिकार नसून गुन्हा आहे हे  सांगण्याची ही शेवटचीच वेळ असू दे. एखादे बालक  शाळेच्या बाहेर राहण्याची ही शेवटचीच वेळ असू दे.

 - या शेवटाची सुरुवात आपण करू या. आपल्याबरोबर या सर्व गोष्टींचा शेवट होऊ द्या. या इथे, आता आपण उज्ज्वल भवितव्य घडवू या. धन्यवाद.   

अनुवाद : विवेक गोविलकर

नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे  झालेल्या समारंभात नोबेल पुरस्कार  स्वीकारताना 10 डिसेंबर 2014  रोजी, मलाला या 17 वर्षांच्या मुलीने  केलेले हे संपूर्ण भाषण.

Tags: मलाला फौंडेशन मुलींना शिक्षण नोबेल पुरस्कार मलाला युसुफझाई विवेक गोविलकर vivek govilkar malala foundation girls education nobel award Malala Yusufzai weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

मलाला युसूफझाई

पाकिस्तानी विद्यार्थिनी, शिक्षण चळवळकर्ती, २०१४ मधील नोबेल शांतता पारितोषिक विजेती 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके