डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पुस्तक वाचताना मनात आले, या सज्जन धन्वंतऱ्याचा सहकारी, विद्यार्थी, निदान रुग्ण तरी होण्याची संधी आपल्याला मिळायला हवी होती; म्हणजे आपले जीवन कितीतरी अनुभवांनी व अर्थांनी श्रीमंत झाले असते.आपल्या विचारांच्या मांडणीत एक लक्षवेधक चिरेबंदपणा आणि शिस्त आहे. पाल्हाळ, फापटपसाऱ्यांना पूर्ण रजा. विवेचन तर्कशुद्ध, न चुकता आपल्याला विचारलेल्या प्रश्नाच्या मुळाशी प्रथम जायचे. मग टप्प्याटप्प्याने प्रश्नांतर्गत सर्व उपप्रश्नांचा, आक्षेपांचा, इष्टानिष्टतेचा विचार करायचा व आपले मत- निर्णायक-सांगायचे. त्यासाठी आवश्यक तेथे देशी-विदेशी ग्रंथांचा, ग्रंथकारांच्या विचारांचा, अर्थपूर्ण सुभाषितांचा वापर करायचा, आपल्या उदंड अभ्यासाचे, सखोल चिंतन- मननाचे अवलोकन, अभ्यास, अनुभव यांचे भक्कम पाठबळ मदतीला असतेच. सर्व सुस्पष्ट, स्वच्छ आणि लखलखीत. या साऱ्यांमुळे वाचकाच्या विचारांना एक वळण मिळते. त्याची विचारशक्ती सबळ होते. 

आदरणीय डॉक्टरसाहेब,
सविनय शुभेच्छा! 

आपले ‘पोस्टमॉर्टेम’ पुस्तक अप्रतिम. ते पुन:पुन्हा वाचून त्याचा आनंद घ्यावा असे मला वाटले. इतके ते विलोभनीय आहे. या पुस्तकातून जाणवलेले आपले अतिशय सुसंस्कृत, विनीत, कृतज्ञ व समाजहितैषी व्यक्तिमत्त्व फार सुखद आहे. फार दुर्मिळ आहे. म्हणूनच बहुमोलही. त्याला नाटक, संगीत, खेळ, वक्तृत्व अशा ललित कलांची जोड मिळाल्याने त्या व्यक्तिमत्त्वाला इंद्रधनूचे सौंदर्य प्राप्त झाले आहे. पुस्तक वाचताना माझ्या मनात पुन:पुन्हा येत होते की आपण केवळ एक जागतिक कीर्ती लाभलेले निष्णात ‘सर्जन’च आहात असे नसून, एक फार थोर ‘माणूस’ही आहात. ‘माणूस’पणाचा जाणूनबुजून उल्लेख करते, कारण आजच्या बाजारू आणि व्यवहारी जगात ‘अरे, मानसा, मानसा, कधी व्हशील रे माणूस?’ असे म्हणण्याचीच वेळ आली आहे. (आपल्या या माणूसपणाने) वाचकाला पुस्तक वाचताना ‘ज्याच्याजवळ नि:संकोच मनाने आपले सुख-दु:ख बोलावे’ असा विश्वासू व स्निग्ध वृत्तीचा मित्र लाभल्याचा आनंद होतो.

आपण आपले ‘सर्जन’चे काम जितक्या तळमळीने, एकाग्रतेने व कौशल्याने करता तेवढ्याच तळमळीने, एकाग्रतेने व कौशल्याने आपण हे सृजनाचेही काम विलक्षण प्रभावीपणे केले आहे. प्रज्ञा-प्रतिभेचा दुर्मिळ व हृदयंगम संगम या पुस्तकात पाहावयास मिळाला. आपण आपल्या विद्यार्थ्यांचे केवळ शिक्षकच नसून त्यांचे सन्मित्र, सल्लागार, संरक्षक व अचूक मार्गदर्शकही आहात म्हणून आज सेवानिवृत्तीनंतरही त्यांना आपला सल्ला हवासा वाटतो, आपल्याला आवर्जून भेटावेसे वाटते. हे सद्‌भाग्य किती शिक्षकांच्या वाट्याला येत असेल? मी स्वत:ही एक शिक्षक असल्याने माझे मन वाचताना आनंदाभिमानाने भरून आले. आपल्यासारखे असे शिक्षक लाभणारे विद्यार्थी नशिबवानच म्हणावेत. 

आपल्या ‘धन्वंतरी’ मात्या-पित्यांची आपण रेखाटलेली व्यक्तिचित्रे मनात रेंगाळत राहतात. आपल्या शिक्षकांबद्दल, मग ते भारतातील असोत वा परदेशांतील असोत, हीच जिव्हाळ्याची भावना आपण वेळोवेळी व्यक्त केली आहे. ज्याचे श्रेय त्याला देण्यात आपल्या मनाने कंजूषपणा केलेला नाही, हा स्वभावविशेषही मला महत्त्वाचा व मोलाचा वाटला. 

आता पुस्तकाच्या अंतरंगासंबंधी थोडे लिहिते- आपल्या पुस्तकाची छोटीशी व भावपूर्ण अर्पणपत्रिका आपल्या एकूण जीवनदृष्टीवरच प्रकाश टाकते. तिची मला राहून-राहून आठवण येते, इतकी ती माझ्या मनाला भिडली आहे.  

पुस्तकाची रचना विषयवार वर्गीकरण करून नेटकी, नीटस, रेखीव अशी केली आहे. एका फुलातून दुसरे फूल उमलावे तशी पुस्तकाची आखणी झाली असल्याने विषयाचा ओघ खंडित होत नाही. उलट वाचकाची जिज्ञासा व उत्सुकताही वाढत जाते. रचनासौष्ठवामुळे विषय शास्त्रीय असला तरी नीरस, रूक्ष वाटत नाही. आपल्या व्यवसायात आज आढळणाऱ्या अपप्रवृत्ती, भ्रष्टाचार व अशाच अनेक विषयांचा विस्तृत परामर्श आपण घेतला आहे. आपण केलेले सर्व विवेचन, विश्लेषण, चिंतन आपल्या सखोल व सूक्ष्म अभ्यासाचे ‘गोमटे फळ’ आहे. वाचकांच्या भावनांना आवाहन करतानाच त्यांना अंतर्मुख करायचे, जागे करायचे, सावध करायचे, हे काम सोपे थोडेच आहे! आपण ते अतिशय यशस्वीपणे केले आहे.

आपले सर्व लेखन विपुल, समृद्ध अनुभवांवर आधारलेले आहे. हा जणू या पुस्तकाचा बळकट कणाच आहे. हे अनुभवसिद्ध लेखन ‘अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी’ असे आंतरिक उत्कट कळकळीने आविष्कृत झाले आहे. त्याचा आनंद एक आगळाच आहे. 

पुस्तक लिहिताना एक ताजेपण वाचकाला जाणवत असते. त्याचे कारण आपल्या साऱ्या लेखनात एक सहजता आहे. आपली भूमिका आक्रमक नाही. प्रचारकाचा ऊरबडवेपणा नाही. कुणावर अकारण टीकास्त्र सोडले नाही की आत्मप्रसिद्धीची हाव नाही. स्वत:च्या व्यावसायिक जीवनप्रवासाचे प्रांजळ दर्शन घडवावे एवढीच आपली तळमळ आहे. हे खरेच असले तरी चुकीला, दोषाला, चूक वा दोष म्हणताना आपली लेखणी निर्भयपणे, ठामपणे उभी आहे. तिला पक्षपाताचा कलंक लागलेला नाही. ही सारी एक तारेवरची कसरतच आहे. त्या परीक्षेतही आपण उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला आहात. 

पुस्तकाचे स्वरूप आपण प्रश्नोत्तरांचे ठेवलेत आणि सुनीतीबार्इंनी आपल्याला मार्मिक, नेमके व समाजातील अनेक विचारी लोकांच्या मनात येणारे प्रश्न विचारले आहेत. आपल्याला छान बोलते केले आहे. त्यांना खास अभिनंदन केल्याचे कृपया सांगावे. या संवादपद्धतीमुळे लेखनाला एक घरगुती आपुलकी लाभली आहे आणि त्याच वेळी वाचकाच्या ज्ञानात खूप नवी भर पडली आहे. 

पुस्तकात अनेक अनुभव, आठवणी, उदाहरणे दिली आहेत. इथल्या व परदेशस्थ डॉक्टरांचे उल्लेख व वचने दिली आहेत. रुग्णांच्या व्यथांचे डॉक्टरांना येणारे भलेबुरे अनुभव, चित्रमय प्रसंग वाचताना कधी मन गोठते तर कधी डोळे वाहू लागतात, कधी या व्यवसायाला आलेले ‘धंद्याचे’ स्वरूप आपल्या कर्तव्यनिष्ठ मनाला  व्यथित करते. वर्तमानकाळातील या व्यवसायाला आलेल्या स्वरूपाची भूतकाळाशी वारंवार तुलना केली आहे. पण लेखक आशावादी दृष्टीने भविष्याकडे पाहतो आहे, कारण ‘रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल’ अशी त्याची भावना दिसते. आपल्या व्यवसायातल्या (भूतकाळातल्या) उणिवाही आपण प्रांजळपणे मान्य केल्या आहेत. बदललेल्या परिस्थितीची कारणमीमांसाही केली आहे. आपण ‘सर्जन’ आहोत तेव्हा कापाकापी करायची ती रुग्णाच्या भल्यासाठीच, हीच आपली वृत्ती आपल्या लेखणीतही उतरली आहे. 

‘फॅमिली डॉक्टर’, ‘दयामरण’ या विषयांवरचे आपले चिंतन बहुमोल आहे. खरं सांगू, आपले हे पुस्तक वाचताना मला मनापासून वाटत राहिले की, बारावी (विज्ञान)च्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात या पुस्तकाचा क्रमिक पुस्तकाप्रमाणे अंतर्भाव होणे फार जरुरीचे आहे. ज्या क्षेत्रात आपण आयुष्यभराच्या कार्यासाठी पाऊल टाकणार ते क्षेत्र कसे आहे, त्यातील आपली कर्तव्ये कोणती, जबाबदाऱ्या कोणत्या, रुग्णाकडे पाहण्याची दृष्टी कशी निरामय व विशुद्ध हवी या व अशाच अनेक महत्त्वाच्या गोष्टींकडे पाहण्याची एक अत्यावश्यक अशी दृष्टी त्यांना यातून मिळेल. 

एखाद्या मधुर भजनाचे ध्रुपद फार वेळा आळवले तरी गोड लागते, तसे रुग्ण व त्याचा जीव वाचवणे, त्यासाठी त्यांच्याशी सतत आपलेपणाने संवाद साधणे हे आपल्या पुस्तकाचे अविस्मरणीय ध्रुपद आहे. ते जो आळवील त्याला यश नि:संशय मिळणारच. 

या पुस्तकाने मराठी वाङ्‌मयात नि:संशय मोलाची व फार मोठी भर घातली आहे. हे पुस्तक घरोघरी वाचले जावे, पुन:पुन्हा वाचले जावे ही माझी कळकळीची अपेक्षा. शासनाने या गुणी पुस्तकाचा यथोचित सन्मान करावा ही हजारो वाचकांप्रमाणेच माझीही इच्छा. 

आमच्या घटप्रभेच्या कर्नाटक आरोग्यधामांचे ब्रीदवाक्य ‘रुग्ण हाच देव’ असे आहे. त्या ब्रीदाचे शंभर टक्के आचरण करणाऱ्या आपल्यासारख्या थोर, बुद्धिमान धन्वंतऱ्याला परमेश्वराने उदंड आयुष्य द्यावे. 

पुस्तक वाचताना मनात आले, या सज्जन धन्वंतऱ्याचा सहकारी, विद्यार्थी, निदान रुग्ण तरी होण्याची संधी आपल्याला मिळायला हवी होती; म्हणजे आपले जीवन कितीतरी अनुभवांनी व अर्थांनी श्रीमंत झाले असते. 

आपल्या विचारांच्या मांडणीत एक लक्षवेधक चिरेबंदपणा आणि शिस्त आहे. पाल्हाळ, फापटपसाऱ्यांना पूर्ण रजा. विवेचन तर्कशुद्ध, न चुकता आपल्याला विचारलेल्या प्रश्नाच्या मुळाशी प्रथम जायचे. मग टप्प्याटप्प्याने प्रश्नांतर्गत सर्व उपप्रश्नांचा, आक्षेपांचा, इष्टानिष्टतेचा विचार करायचा व आपले मत- निर्णायक-सांगायचे. त्यासाठी आवश्यक तेथे देशी-विदेशी ग्रंथांचा, ग्रंथकारांच्या विचारांचा, अर्थपूर्ण सुभाषितांचा वापर करायचा, आपल्या उदंड अभ्यासाचे, सखोल चिंतन- मननाचे अवलोकन, अभ्यास, अनुभव यांचे भक्कम पाठबळ मदतीला असतेच. सर्व सुस्पष्ट, स्वच्छ आणि लखलखीत. या साऱ्यांमुळे वाचकाच्या विचारांना एक वळण मिळते. त्याची विचारशक्ती सबळ होते. 

आपण प्रस्तावनेत ‘फटकळपणाचा’ उल्लेख केला आहे. त्याबाबत मला असे वाटते की, समाजाच्या हिताचे, पण नाना कारणांनी त्याला अप्रिय सत्य सांगणाऱ्यांना प्रसंगी फटकळ व्हावेच लागते. (औषध रुग्णाच्या कल्याणासाठी दिलेले, पण ते घेताना तो सामान्यत: तोंड वाकडेच करतो). सॉक्रेटिसापासून आगरकरांपर्यंत कितीतरी विचारवंतांना प्रसंगी फटकळ व्हावे लागले आहे, हे आपण वाचतोच! 

आपल्या पुस्तकाचे शीर्षक यथोचित आहे. पण त्याबाबत मला एक जाणवले ते आपल्याला मोकळेपणाने सांगते. ‘पोस्टमॉर्टेम’ म्हणजे शवविच्छेदन असा अर्थ आहे. माझ्या मते ते काम करणारा माणूस सामान्यत: भावबधिर असतो. त्याला रुग्णाच्या सर्व शरीरांतील सर्व घटकांचे साक्षात दर्शन घडते हे खरे. आपले लेखन प्रसंगी कठोर व जळजळीत असले तरी जो विषय आपण मांडत आहात त्यासाठी ते आवश्यकच आहे. पण आपले मन भावना समजून घेणारे व सहृदय आहे. 

आपण एकंदरीच वैद्यकीय व्यवसायाचे आज झालेले विद्रूपीकरण, त्यात आलेली बाजारू दृष्टी (पैसा व झटपट प्रसिद्धीची हाव), त्यात घुसलेल्या अपप्रवृत्ती यांचे प्रभावीपणे पोस्टमॉर्टेम केले आहे हे मात्र नि:संशय खरे आहे. आपल्यासारख्या ‘व्रतस्थ’ धन्वंतऱ्याने ते केले हे उत्तम झाले. समाजाने त्यासाठी उपकृत रहायला हवे. 

देवाखालोखाल सामान्यपणे माणूस ‘डॉक्टर’ना मानतो. त्यांना देव वा देवदूत समजतो ते काय उगीच? हजारो रुग्णांना जणू तो पुनर्जन्मच देत असतो. रोगमुक्त होऊन प्रसन्न व आनंदी चेहऱ्याने माणूस घरी जातो त्यावेळी त्याच्या हास्याने डॉक्टरांचे सर्व परिश्रम सफल होतात. त्या हास्याने डॉक्टरला होणारा आनंद लाखो रुपयांपेक्षा कितीतरी मोठा असतो, मौल्यवान असतो. यातच वैद्यकीय व्यवसायाची अद्वितीय थोरवी साठवलेली आहे. नाही का? आपण आपल्या या व्यवसायात फार मोठे यश मिळवलेत. ते ऐकताना मन आदराने विनम्र होते. अनेक क्षेत्रांतील थोर मंडळी व स्नेहीजन आपण मिळविलेत, गुणीजनांचा संग्रह केलात. आणखी काय मिळवायचे माणसाने? सर्व शुभेच्छा व अभीष्टचिंतन.

(डॉ. रवी बापट यांचे ‘पोस्टमॉर्टेम’ हे मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेले पुस्तक वाचून मालतीबाई किर्लोस्कर यांनी लिहिलेले पत्र- त्यातील हृदगत लक्षात घेऊन प्रसिद्ध करणे औचित्यपूर्ण वाटते. - संपादक)  

Tags: पुस्तक रसग्रहण नवीन पुस्तक कामाचे अनुभव धन्वंतरी अनुभव शल्यक्रियातज्ज्ञ सुसंस्कृत व्यक्तिमत्व पुस्तकाची रचना वरिष्ठ डॉक्टर पोस्टमॉर्टेम पत्र प्रतिसाद डॉक्टर रबी बापट पुस्तक प्रतिसाद मालती किर्लोस्कर Book appreciation New Book work memories Dhanwantri Experience Surgeon cultural personality Book Style Senior Doctor Doctor Ravi Bapat Postmortem Book Letter response Maltibai Kirloskar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

मालती शं. किर्लोस्कर

सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमध्ये 38 वर्षे मराठीचे अध्यापन. 'फुलांची ओंजळ' व 'भावफुले' ही दोन पुस्तके प्रसिद्ध.  


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके