डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘अरे, कुरणोजीबुवा म्हणजे या कुरणाचा मालक. म्हणजे खरा नाही. समदे असं म्हणतात. म्हणतात की, हे कुरण त्याचं आहे. तो त्या चिंचेपाशी ऱ्हातो. म्हणजे त्याची आहे ती चिंच. तिथं आम्ही पण नाय जात आणि गुरं पण वायलीच चरतात. तिकडं न्हाई जात.’

रामला आक्रीतच वाटलं. कसा दिसतो हा बुवा? उंच आहे की बुटका? काळा आहे का गोरा? म्हातारा आहे का तरणा? दाढी आहे का त्याला, दाढी? आणि कपडे कसे आहेत त्याचे? पण गंमत म्हणजे कुणीच त्या बुवाजीला प्रत्यक्ष पाह्यलं नव्हतं. मग तो आहे कशावरून? कोण म्हणालं? ‘अरे, गुरं पळवतो ना तो? लपवून ठेवतो. मंग नारळ दिला की देतो परत.’

‘काय रे, मजा आली की नाही?’ किशानं विचारलं.

रामनं तंद्रीतच मान हलवली ‘हो’ म्हणून. 

त्याच्या डोळ्यांना अजून तो न पाहिलेला कुरणोजीबुवाच दिसत होता.

‘येतो का गुरं चारायला?’ काल किशानं त्याला विचारलं, तेव्हा तो एकदम खुशालला होता. त्याच्या घरी चारायला नेण्याएवढी गुरंच नव्हती. संध्याकाळी चालणाऱ्या पोरांच्या गप्पा ऐकायचा नुसता अधूनमधून. म्हणून त्याला किशानं विचारलं तेव्हा तो एकदम तयार  झाला. 

पण लगेच त्याला आजी आठवली. ती आपल्याला जरासुद्धा नजरेआड करत नाही. ती कसली ‘हो’ म्हणणार? तो किशाला तसं म्हणाला, तर किशानं थेट आजीला पटवलं. सगळ्या पोरांमधला तो जरा मोठा. रामला नीट सांभाळून आणतो म्हणाला. वर म्हणाला, ‘एक डाव पाठवा त्याला. आता पुण्याला जाणार तुम्ही. मंग राम कशाला भेटतो परत आम्हांला?’ आणि आजी चक्क ‘जा’ म्हणाली. 

तसं कुठं लांब नव्हतं जायचं. गावाच्या वस्तीला लागून उजव्या अंगाची शेतं ओलांडली की पार डोंगराच्या पायथ्यापर्यंत पसरलेला मोठ्ठा माळ होता. तिथे रोजच पोरं गुरं चारायला न्यायची. माळावर मधोमध रोवल्यासारखं एक मोठं चिंचेचं झाड होतं. झिंज्या पसरून बसल्यासारखं झाड! पोरांनी कलवड्यांच्या शेतालगतच्या झाडांखाली खेळ मांडले, तेव्हा राम किशाला म्हणाला, ‘चल, आपण त्या झाडापर्यंत पळत जाऊ.’

तसं किशानं त्याला एकदम झटकलं. ‘गप रे. बस इथंच. चिंचेपर्यंत जातो म्हणे!’ राम जरासा वरमला. 
पण मग पोरांनी त्याला त्यांच्या खेळात ओढून घेतलं. दुपारभर सगळ्यांचा नुसता कालवा चाललेला. नकला झाल्या, भांडणं झाली, झकापकी झाल्या, खेळणं झालं, सगळं झालं! राम तर खुशीतच आला. कशाला शाळा पाहिजे? हे मस्तच आहे सगळं. 

पमीला आणायला पाहिजे होतं. त्याला बहिणीची आठवण आली. तिला फार मजा वाटली असती; पण ही सगळी पोरंच आहेत. पोरी नाहीतच कुणी. तरी पण पमी सगळ्यांशी खेळलीच असती म्हणा! नाही तर गुरांमागे हिंडत बसली असती तीही.  रामचं लक्ष दूरपर्यंत माळावर चरणाऱ्या गुरांकडे गेलं. काळे, पांढरे, तपकिरी ठिपके हलत होते. केवढी जनावरं आहेत माळावर आत्ता!

‘होय रे किशा, आपापली गुरं कशी ओळखायची आता?’ त्यानं विचारलं. थरकुड्यांचा दिना झाडाच्या फांदीला पाय अडकवून उलटा लटकला होता, तो धपकन्‌ खाली आला. 

‘घ्या. काय पण विचारतोय!’ तो किशाला म्हणाला. 

‘अरे, तुझ्या आजीनं हाक मारली, की आमच्या घोळात असलास तरी जातोस ना तू तुझ्याच घरी? का माझ्या घरी जातोस?’ किशानं रामच्या पाठीत दणका घातला. 

‘आन तुझी कृष्णी?’ दिनानं विचारलं. ‘हजार गायींमधून वळखशील का न्हाय तिला?’

‘हं, हे मात्र खरं आहे. जगात कुठेही असली तरी, कितीही जनावरांच्या गर्दीत असली तरी आपण कृष्णीला बरोबर शोधून काढू आणि मी हाक मारली तर ती पण धावत येणार माझ्याकडे.’ ‘आता कुरणोजीबुवानंच जनावर लपवलं तर विलाज नाही. नायतर जनावर बराबर येतंय आपलं आपल्याकडे.’

‘कोण कुरणोजीबुवा?’ रामला काही ठाऊकच नव्हतं.
दिनानं कपाळावर हात मारून घेतला. किशा पण हसायला लागला. दत्त्या म्हणाला, ‘सांग रे. त्याला काय बी न्हाय म्हाईत.’ 

‘अरे, कुरणोजीबुवा म्हणजे या कुरणाचा मालक. म्हणजे खरा नाही. समदे असं म्हणतात. म्हणतात की, हे कुरण त्याचं आहे. तो त्या चिंचेपाशी ऱ्हातो. म्हणजे त्याची आहे ती चिंच. तिथं आम्ही पण नाय जात आणि गुरं पण वायलीच चरतात. तिकडं न्हाई जात.’

रामला आक्रीतच वाटलं. कसा दिसतो हा बुवा? उंच आहे की बुटका? काळा आहे का गोरा? म्हातारा आहे का तरणा? दाढी आहे का त्याला, दाढी? आणि कपडे कसे आहेत त्याचे? पण गंमत म्हणजे कुणीच त्या बुवाजीला प्रत्यक्ष पाह्यलं नव्हतं. मग तो आहे कशावरून? कोण म्हणालं? ‘अरे, गुरं पळवतो ना तो? लपवून ठेवतो. मंग नारळ दिला की देतो परत.’

‘तो का लपवतो गुरं?’

‘काय की बा. त्याला पन खेळावं वाटत असेल एकांदा डाव.’ दत्त्या म्हणाला. 

‘पर पार कंठाशी येतो जीव, तरी मिळत न्हाई जनावर.’

‘असं नेहमी होतं?’ रामला जाम गंमत वाटायला लागली आणि पोटात थोडी भीतीपण.

‘नेहमी नाही; पण अधूनमधून होतं तसं. घरी जाताना कळतं की, जनावर नाहीच एखादं. मग ओळखायचं की कुरणोजीबुवानं लपवलं त्याला.’ किशा म्हणाला. ‘आणि मग?’

‘मग काय, आपुन बेंबीच्या देठापासून वरडून हाळी दिली तरी गावत न्हाय. एक डाव जनावर तिकडं दिसतं. दिसलं तर धावतं माणूस. जवळ गेलं की गायब. मंग लांब दुसरीकडंच दिसाया लागतं. निस्ता चकवा.’ 
दिनाचा आवाज आधीच घोगरा. रामचे डोळे मोठे होत गेले. बाप रे! असला चकवा पडला, तर जनावर मिळायचं कसं परत? 

‘नाहीच मिळत. कितीपण शोधा तुम्ही. मिळणार नाही म्हणजे नाही. कुरणोजीबुवासमोर नाक घासत त्या चिंचेपाशी नारळ फोडला की मग आपसूक दिसतंय जनावर. तोपर्यंत साफ नाही.’ किशानं सांगितलं. 

‘काय सांगतोस?’ रामचे ओठ कोरडे पडायला लागले.

‘तर मग? ए दत्त्या, सांग. तुझीच गोष्ट सांग ना.’ किशानं दत्त्याच्या पाठीवर थाप मारली. पण दत्त्या मुखदुर्बळ. किशा कसा रंगवून सांगतो. दत्त्याला काय दोन वाक्यं नीट नाही बोलता येत. दिना म्हणाला, ‘नको. दत्त्या नको. आपुन बी होतोच की. तूच सांग किशा, तू लई भारी बोल्तो.’ मग किशा सरसावला. ‘काय झालं, आम्ही त्या  दिवशी असेच परत निघालो. सुर्व्या असाच डुबायला आलेला. गुरं गोळा केली आणि निघालो. तर या दत्त्याचा तो ढाण्या बैल कुठं दिसेना. आम्ही हाळ्या दिल्या. हा दत्त्या धावला इकडं तिकडं, पण बैलाचा पत्त्या नाही. मग एकदम गोप्या ओरडला, ‘एऽ अरे बघा बघा. दत्त्या, चिंचेखाली उभा हाये बघ तुझा बैल.’ आम्ही बघितलं, तर खरंच बैल चिंचेखाली दिसतोय. दत्त्या गेला धावत हाका मारत; पण बैल काय याच्याकडे बघेना की येईना. हा चिडून काठी उगारून गेला त्याच्यावर, तर बैल तिरशिंग्या; उधळला की एकदम आणि झाडामागेच गेला. मग दत्त्या बैलामागे धावतोय आणि बैल झाडाभोवती फिरतोय. नुसत्या गोल गोल चकरा. आमची तर बोलतीच बंद. येड्यागत उभे.’  राम नुसता तोंड वासून ऐकत होता.

दत्त्या म्हणाला, ‘ए, तोंड मीट. अजून तर कायच न्हाय ऐकलं तू. सांग रे किशा फुडं.’ जणू दत्त्या दुसऱ्याच कुणाची गोष्ट ऐकत होता किशाकडून. किशा पण रंगात आला. 

‘तर आम्ही पाहतोय बरं का! पळून पळून या दत्त्याला चक्करल्यागत झालं रे. भेंडाळलाच तो. पण बैल काही हाताला येईना. शेवटी थांबला हा येडा, तर बैल सुतावाणी सरळ त्याच्याकडे येऊन उभा. ह्याला तर कळंना काही. मग हा गेला त्याचा कासरा धरायला तर बैल हिसडायला लागला. आता च्या मारी. यानं झाडाच्या खोडाला लावली पाठ आन्‌ असला जाळ झालाय म्हणता! हा भक्कन्‌ जाळ उठला समोर. यानं तर डोळेच मिटले आणि ठॅ ठॅ ओरडला.  ‘कुरणोजीबुवानं शेवटचा मंतर घातला बैलावर. पार सुधबुध ग्येली माजी.’

दत्त्या म्हणाला, ‘लागलो कापायला लटालटा. घामानं भिजलो लेका. शर्ट पार वला. पाठीपोटाला चिकटलेला. तस्साच बसलोय खाली. घासलं नाक अन्‌ नारळ कबूल केला पैला. नारळ दीन म्हटलं, पर माजा ढाण्या बैल मला मिळू दे.’

‘आणि मिळाला बैल?’ रामच्या तोंडून शब्द फुटला का नाही, ते त्यालाही नीट कळलं नाही. 

‘मिळाला की. आरं बैल एकदम गुमान त्याच्या म्होरंच हुबा. 

दिनानं म्हटलं.‘मंग खालनं गावातनं नारळ आणला, कुरणोजीबुवाला नारळ फोडला आणि समद्यांनी खाल्ला परसाद, तवा मंग घरला ग्येलो.’ 

‘तो प्रसादाचा नारळ असतो बरं का, घरी नाही न्यायचा. तुकडासुद्धा गावात घेऊन जायचा नाही. हितंच संपवला पाहिजे तो. सगळा हितंच संपवायचा.’ ऐकताना रामची टाळ्याला चिकटलेली जीभ एकदम खाली आली. त्याला हसूच आलं. ही युक्ती चांगली आहे. अधूनमधून कुणाचं तरी जनावर हरवणारच. मग कुरणोजीबुवाला नारळ कबूल करून टाकायचा. जनावरही परत मिळणार आणि ओलं खोबरंही खायला मिळणार. सगळं फस्त करायचं न्‌ मगच गावात परत जायचं. नाही तरी कुरणोजीबुवा थोडाच नारळ खातो?

संध्याकाळी उशीरानं पोरांबरोबर परत फिरताना रामनं मागे वळून माळावर सहज एक नजर टाकली. दूरपर्यंत काळपट हिरवं गवत पसरलेलं दिसत होतं. चहूकडून भरार वारा. पुंडल्यांच्या शेताच्या बांधावरचे निवडुंग वेडेवाकडे काळे हात पसरून उभे. मागे पद्मावतीचा थोरला डोंगर तर माळावर वाकून पाहतोय असा दिसत होता. आणि माळावर मधोमध ते कुरणोजीबुवाचं आवडतं चिंचेचं झाड. आता अंधार पडताना ते आणखीनच झिंज्या पसरून बसल्यासारखं वाटत होतं.

आपण पुन्हा काही हे सगळं पाहणार नाही. गाव सोडून आता पुण्याला जायचं. ते म्हणे फार मोठं शहर आहे. कसं आहे कुणास ठाऊक. पण त्याला एकदम वाटलं की, इथे राहिलो असतो तर दत्त्याला सुचल्या तशा गंमतीच्या गोष्टी आपल्याला पण कदाचित्‌ सुचल्या असत्या! 

Tags: कुरणोजीबुवा माळ डोंगर निवडुंग शेताचा बांध वारा grassland mountain cactus farm dam wind weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अरुणा ढेरे,  पुणे

कवयित्री, लेखिका 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके