डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पंत अगदी सावकाश बोलायचे. बोलताना त्यांचा चेहरा, डोळे, पांढुरक्या भिवया, लालचुटूक ओठ आणि गालांचे उंचवटे हे सारंच मंद हसायचं. अनेकदा, ‘किती?’ या एकमेव प्रश्नांकित शब्दाशिवाय ते फार बोलायचेही नाहीत. हे ‘किती?’ म्हणजे ‘दळण किती?’ मापटं, चिपटं, आधुली ही दळण मोजण्याची परिमाणं तेव्हा रूढ होती. त्या हिशोबातच पंतांच्या ‘किती?’ या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागे. पंतांच्या हातात छोट्या आकाराचा पितळेचा पसरट डबा असे. हा डबा म्हणजे पंतांचा गिरणीच्या आवक-जावकीचा गल्ला. डब्यावर झाकण म्हणून तेवढ्याच आकाराची चौकोनी वही असे.

पंत. गावातल्या एकमेव पीठगिरणीचे मालक. कमालीचे गोरे. पिवळट-लालबुंद गोरेपणा. मध्यम उंची, पण तरुणपणी कमावलेल्या शरीराच्या सौष्ठवपूर्ण खुणा सत्तरीतही वागविणारे. अंगात पांढरं स्वच्छ धोतर आणि शर्ट. त्यांचे केसही कापसासारखे पांढरे. कमालीचे मऊ वाटावेत असे. वाऱ्याच्या झुळकीनंही ते भुरूभुरू उडत. विरळ केस असे हलू लागले की, त्यांच्या तळाशी लपलेलं पंतांच्या माथ्याचं गोरेपण स्पष्ट दिसू लागे. पंतांच्या भिवयांचे आणि पापण्यांचे रंगही पांढुरके झालेले. जवळ उभं राहून त्यांच्याशी बोलताना, लुकलुकणारे डोळे चटकन नजरेत भरत.

पंत गावातल्या रस्त्यांतून ये-जा करताहेत, आठवडे बाजारात काही भाजीपाला खरेदी करताहेत, देवळात चालले आहेत, असं फारसं कधीच दिसायचं नाही. त्यांचं आयुष्य पीठगिरणीशी जणू एखाद्या चक्रासारखं जोडलेलं होतं. त्यामुळं, पंत एक तर त्यांच्या वाड्यात तरी असायचे, नाही तर गिरणीत तरी हमखास भेटायचे.

पंतांचा आवाज खूप मुलायम होता. त्यांचा संवादही गिरणीत ये-जा करणाऱ्यांखेरीज इतर कुणाशी क्वचितच होत असावा. पंत अगदी सावकाश बोलायचे. बोलताना त्यांचा चेहरा, डोळे, पांढुरक्या भिवया, लालचुटूक ओठ आणि गालांचे उंचवटे हे सारंच मंद हसायचं. अनेकदा, ‘किती?’ या एकमेव प्रश्नांकित शब्दाशिवाय ते फार बोलायचेही नाहीत. हे ‘किती?’ म्हणजे ‘दळण किती?’ मापटं, चिपटं, आधुली ही दळण मोजण्याची परिमाणं तेव्हा रूढ होती. त्या हिशोबातच पंतांच्या ‘किती?’ या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागे. पंतांच्या हातात छोट्या आकाराचा पितळेचा पसरट डबा असे. हा डबा म्हणजे पंतांचा गिरणीच्या आवक-जावकीचा गल्ला. डब्यावर झाकण म्हणून तेवढ्याच आकाराची चौकोनी वही असे. खतावणीसारख्या रंगाची. या वहीत पंत छोटे सुटे-सुटे कोरे कागद ठेवीत. दळण किती आहे, हे सांगितलं की पंत पेन्सिलीनं त्यातल्या कागदावर ते माप लिहून देत. त्याचे किती पैसे तेही सांगत. त्यांना तेवढे पैसे दिले, की ते ही चिठ्ठी देत. ती दळणवाल्याकडं द्यायची, मगच दळण मिळे. पंत जवळून पाहायची संधी त्याच वेळी मिळत असे. दळणाचं माप लिहिणं, त्याचे पैसे लिहिणं हे करण्यासाठी ते एका जागी बसून राहत असंही नसे, ते एकसारखे फिरत असत. पंतांना तिथं जाऊनच गाठावं लागे.

पंतांच्या वाड्यालगतच त्यांची गिरणी होती. त्यांचा वाडा दुमजली होता. चांगल्या भक्कम बांधणीचा आणि खिडक्या-दरवाजे यांची अतिशय देखणी रचना असलेला. रस्त्यातून येता-जाता रस्त्याच्या बाजूची वरच्या मजल्याची गॅलरी दिसे आणि कधी कधी त्याच्या आतील बाजूला उघडलेल्या खिडक्या किंवा दरवाजे दिसत. त्यांचे रंग उन्हावर चांगले ठळक होत गेल्यासारखे दिसत. लांबच लांब गॅलरीतून ये-जा करतानाही क्वचित कुणी दिसत असे. पंतांचा वाडा फार कुणी नीट व संपूर्ण पाहिलेला नव्हता बहुधा. ज्यांना ही संधी थोडीफार मिळाली, ते वाड्याचं वर्णन तिखट-मीठ लावून करीत. ते ऐकताना संपूर्ण वाडा पाहायची इच्छा मनातल्या मनात उंचच उंच झोके घेत राही. गिरणीत गेल्यावर कधीतरी तो योग जुळून येई. पंत गिरणीबाहेर नसले, म्हणजे त्यांना शोधण्याच्या बहाण्याने गिरणीजवळच्या दरवाजातून माजघरात डोकावता येत असे. पंतांना शोधण्यापेक्षा आत खोल्या कशा आहेत, त्यात मांडलेले सोफे आणि खुर्च्या कशा आहेत, पितळेच्या भक्कम साखळ्यांना अडकविले चौफाळे कसे आहेत, चकचकीत काचेची हंड्या-झुंबरं किती देखणी आहेत, खिडक्यांवर झुलणारे पडदे कसे आहेत, असले एकेक तपशील पाहण्याकडंच आमचं अधिक लक्ष असे. तेवढ्यात, कुठून कसे ते पंतच समोर दत्त म्हणून उभे राहायचे आणि वाड्याचं निरीक्षण तिथंच संपून जायचं. वाड्याच्या माजघराला लागून बाहेरच्या बाजूनं लांबलचक दगडी बांधणीचं जोतं होतं. त्यावरून सावकाश पावलं टाकीत पंत गिरणीकडं यायचे. तिथं उभं राहूनच ते चिठ्ठ्या लिहून देण्याचं काम करायचे. गिरणीला दोन मोठी दारं होती. त्यांतलं पहिलं दार दळण घेऊन येणाऱ्यांसाठी खुलं असे. दुसरं दार हे फक्त दळण दळून देणाऱ्यासाठीच असे. इतरांना तिकडं जायला मज्जाव होता. काही खोडकर मित्र त्या दुसऱ्या दरवाजातून डोकावून आल्याच्या शौर्यगाथा सांगत. आतल्या बाजूला गिरणीचं मोठं यंत्र कसं पाहिलं, त्याचंही वर्णन करीत. वेगवेगळ्या मित्रांकडून त्या गोष्टी ऐकताना श्रोत्यांच्या अंगातही वीरश्री संचारत असे आणि आता पुढच्या वेळी गिरणीत येऊ, तेव्हा दुसऱ्या दरवाजातून ते यंत्र पाहूनच येऊ, असा निर्धार मनोमन केला जाई.

गिरणीत काम करणारा चंद्रकांत आमच्या घरापासून हाकेच्या अंतरावरच राहत असे. गिरणी सुरू होण्यासाठी वीजनिर्मिती करणारं भलं मोठं यंत्र खूप ताकद लावून सुरू करावं लागे. चंद्रकांत अंगापिंडानं बांधेसूद होता. एखाद्या घडीव शिल्पासारखा. गोरापान. नाकेला. भव्य कपाळाचा. त्यानं केस वाढविले होते. ते मागं फिरवलेले. गोष्टीतल्या चित्रात एखादा राजकुमार असतो, तसाच तो भासत असे. त्याच्याशी दोस्ती वाढवून गिरणीचं यंत्र पाहण्याची संधी मिळवली आणि पुढच्या वेळी गिरणीत गेल्यावर ते यंत्र दाखविण्याची तयारी चंद्रकांतनं दाखवली. पुढचे दोन-तीन दिवस आईकडं आपलं दळण टाकायचं आहे का, अशी चौकशी करीत राहिलो; पण नजीकच्या काळात तशी शक्यता कमी दिसत होती. त्यामुळं मनातून थोडा खट्टू होतो. कसा कोणास ठाऊक; पण हरभऱ्याची डाळ दळून आणण्याच्या निमित्तानं तो योग लगेचच जुळून आला. चंद्रकांत सकाळी गिरणीत जाण्याच्या वेळेला त्याची वाट पाहत थांबलो आणि त्याला गाठून आज गिरणीत आल्यावर यंत्र बघायची रुजुवात घातली. दळण तयार असल्यानं चंद्रकांतबरोबरच गिरणीत गेलो. गिरणी उघडल्यावर एकेक दळणं गिरणीत येऊ लागली. बघता-बघता त्यांची लांब रांग तयार झाली. चंद्रकांतनं सांगितलं, ‘‘दहा दळणं आली, की गिरणी सुरू करायची, हे मी ठरवून टाकलं आहे.’’

त्या दिवशी ही संख्या बरीच पुढं सरकली होती. त्यामुळं लगेचच गिरणी सुरू करण्याच्या हालचाली चंद्रकांतनं सुरू केल्या. तिथं तीन-चार गिरण्या होत्या. गहू, ज्वारी-बाजरी, डाळी, भाजणी असं दळण्यासाठी स्वतंत्र गिरण्या वापरल्या जात. चंद्रकांतने सगळ्या गिरण्यांच्या चाकांवर चांगली ताकद लावून पट्टे चढवले. चाकं फिरवून पाहिली. मग त्यानं खुणेनं गिरणीच्या मागील बाजूस असलेल्या दुसऱ्या दाराकडे बोलावून घेतलं. भराभर पाय उचलत मी तिथं पोचलो. चंद्रकांत म्हणाला, ‘‘आता गिरणी सुरू करू. या यंत्रावर गिरणी चालते, तेव्हा त्याला आधी गती द्यावी लागते.’’ तिथं जवळच खुंटीला अडकवलेला एक भक्कम पट्टा चंद्रकांतनं हातात घेतला. यंत्राच्या मोठ्या चाकाच्या मध्यभागी तो अडकवला आणि खूप ताकद लावून त्यानं तो पट्टा मागं खेचून घेतला. त्याबरोबर मोठी चाकं फिरू लागली. पाहता-पाहता त्यांनी कमालीची गती पकडली आणि या यंत्राच्या पट्ट्याला जोडलेली सगळी चाकं त्यांचे त्यांचे पट्टे ओढत फिरू लागली. त्याबरोबर गिरणीचं धुराडं जागं झालं आणि कुक्‌ कुक्‌ असा आवाज करू लागलं. हा आवाज म्हणजे गिरणीची मोठी खूण होती. एसटीनं स्टँडवर उतरल्यानंतर कुक्‌ कुक्‌ आवाजाची ही पट्टी कानांवर पडली, की गाव आल्याची खूण पटे. हा आवाज काही क्षणांत सगळ्या गावभर जात असे. मग गिरणीत भराभर दळणं येऊ लागत. गिरणीतली सगळी दळणं संपून जाईपर्यंत या आवाजाला उतार नसे.

पैसे ठेवण्याचा पितळेचा डबा आणि त्यावर ठेवलेली कोऱ्या चिठ्ठ्यांची वही घेऊन पंत गिरणीबाहेर येऊन उभे राहिलेले असत. चिठ्ठी लिहून घेण्यासाठी त्यांच्याभोवती चार-पाच जणांचा घोळका सतत उभा असे. पंत जितक्या वेगानं चिठ्ठ्या लिहून देत, त्याच वेगानं चंद्रकांतच्या गिरणीतल्या हालचाली वाढलेल्या असत. फळकुटावरली एकेक दळणं कमी होत जात आणि नवी दळणंही येत राहत. गिरणीच्या आतल्या बाजूला चंद्रकांतशिवाय इतर कुणालाच प्रवेश नसे. अंगात वारं भरलेल्या रणांगणावरील योद्ध्यासारख्या चंद्रकांतच्या गतिमान हालचाली सुरू असत. दळणासाठी आणलेले डबे किंवा पिशव्या उघडून पाहायच्या आणि त्यानुसार विशिष्ट गिरणीजवळ जाऊन ते दळण गिरणीच्या पोटात रिकामं करायचं. गिरणीच्या आवाजाबरोबरच तिथं उपस्थित असलेल्या गिऱ्हाइकांचा गलकाही त्यात मिसळत असे. या कोलाहलात चंद्रकांत काय विचारतो आहे, ते आपल्याला ऐकू येत नसे आणि आपण सांगितलेलं त्याला कळत नसे. ‘‘माझं दळण आधी द्या’’, ‘‘बारीक दळा’’, ‘‘मागल्या वेळी दळण कमी आलं होतं’’, असे आवाज प्रत्येक दळणाबरोबर येत असत. त्या सगळ्याला चंद्रकांत ‘हो’ या एकाच शब्दात उत्तर देत असे. गिरणीच्या यंत्रानं पूर्ण गती पकडली, तेव्हा चंद्रकांतनं पुन्हा मागील दाराजवळ येऊन उभं राहायची खूण केली. तिथं तर यंत्राचाही मोठा आवाज सुरू होता. मोठमोठी चाकं इतक्या वेगानं धावत होती की, यंत्राच्या बाजूनं केवळ गोल रेषाच वेढल्या गेलेल्या आहेत, असं वाटत होतं. ते अजस्र यंत्र पाहावं असंही वाटत होतं आणि त्याची भीतीही तेवढीच वाटत होती. पोटात गोळा येणं, अंगावर रोमांच उभे राहणं असल्या गोष्टींचा अनुभव तिथे असताना कितीतरी वेळ येत राहिला.

गावातल्या घराघरांत, ग्रामपंचायतीच्या दिव्यांच्या खांबांवर तेव्हा रॉकेलचे दिवे होते. पंतांच्या वाड्यात आणि गिरणीत मात्र विजेचे दिवे चमचमत असत. पंतांच्या वाड्याच्या प्रवेशद्वारावरील दिवाही चांगला झगमगीत असे. त्या मानानं गिरणीतील दिवे आकाशात लुकलुकणाऱ्या चांदण्यांसारखे वाटत. या दिव्यांभोवती पिठाचे बारीक थर आणि पिठाचीच जळमटं जमा झालेली दिसत. तरीही गिरणीत ठिकठिकाणी दिवे असल्यानं तेवढा प्रकाशही पुरेसा वाटे. चंद्रकांत सांगे, ‘‘हे दिवे गिरणीच्या यंत्रावर चालतात. यंत्राच्या गतीबरोबर वीज तयार होते आणि तारांमधून ती दिव्यांपर्यंत पोचवली जाते.’’ आम्हां मुलांना हे चित्र अक्षरश: एखाद्या स्वप्नासारखं मोहक वाटे.

आणखी दोन गोष्टींशिवाय पंतांची गिरणी म्हणजे काय प्रकरण होतं, हे लक्षात येणार नाही. पंतांच्या वाड्यात एक तपकिरी रंगाचं मध्यम उंचीचं कुत्रं होतं. पुढच्या बाजूचे त्याचे दोन्ही पाय बाक असलेले. त्यामुळं या कुत्र्याच्या हालचाली काहीशा विचित्र वाटत. धावताना तर ते फारच गमतीशीर दिसे. हे कुत्रं खूप गरीब होतं. त्यानं कधीच कुणाला त्रास दिला नाही किंवा कुणावर ते भुंकलंही नाही. तरी त्याच्या या वेगळ्या रूपामुळं गिरणीत येणाऱ्या मुलांना मात्र त्याची खूप भीती वाटे. दिवसाचा बहुतेक वेळ हे कुत्रं वाड्याच्या आतच असे; पण कधीतरी त्याचा वावर बाहेर, पंतांच्या आजूबाजूला दिसे. कुत्र्याची भीती एवढी होती की, त्याचं दर्शन झालं म्हणजेच अनेकांना पळता भुई थोडी होई. दुसरी गोष्ट आणखी जादूमयी होती. गिरणीच्या यंत्रासाठी डिझेल वापरलं जाई. डिझेल भरलेली पिंपं गिरणीलगतच्या रस्त्यावरच असत. त्यातून डब्यात डिझेल काढून घेतलं जात असताना एक वेगळाच चंद्रकांत समोर दिसे. चंद्रकांत गिरणीतून एक लांब नळी घेऊन येई. तिचं एक टोक डिझेलच्या पिंपात अडकवून दुसऱ्या टोकानं तोंडातून तो हवा काढून घेई. त्याबरोबर काळं-चिकट दाट डिझेल नळीतून एकसारखं येत राही. हे डिझेल चंद्रकांत काढतो कसं, ते त्याच्या तोंडात कधीच कसं उतरत नाही, असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही चंद्रकांतची ती करामत अक्षरश: शेकडो वेळा पाहिली. तेव्हाचं ते आश्चर्य काही केल्या कमीच होत नसे.

पंतांची गिरणी आता राहिलेली नाही. गावात वीज आल्यानं बहुतेक गिरण्या विजेवरच चालतात; तरीही पंतांच्या गिरणीजवळून ये-जा करताना आजही गिरणीच्या धुराड्याचे कुक्‌ कुक्‌ असे आवाज एकामागून एक कानांवर येत राहतात आणि पंतांचे शब्द कानांवर येतात : ‘किती?’

Tags: pant gavgoshti malhararankalle पंत गावगोष्टी मल्हार अरणकल्ले weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके