डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

ओढ्याच्या पात्रात ठिकठिकाणी थंडगार आणि निवळशंख पाण्याचे झरे होते. संपूर्ण गाव पिण्यासाठी झऱ्याचंच पाणी वापरीत असे. ओढ्याच्या कडेकडेनं शाडूच्या मातीच्या टेकड्या होत्या. तिथल्या फिकट बदामी रंगाच्या कपारींतून झऱ्यांचं पाणी एकसारखं वाहत असे. पाण्याच्या तळाशी असलेले वाळूचे कणही सहज मोजता येतील, एवढं झऱ्याचं पाणी निवळशंख असे. घागरी-कळशा भरून घेता येतील, एवढ्या आकाराचा खड्डा झऱ्याच्या तोंडाशी असे. कितीही पाणी उपसून घेतलं, तरी वाहत्या झऱ्यानं कधीच हात आखडता घेतला नाही. गुडघ्यावर बसून पुढं खाली वाकायचं; आणि झऱ्याच्या पाण्याच्या झुळझुळत्या प्रवाहाचं पाणी प्यायचं हा आम्हा मुलांचा अतिशय आवडता छंद असे. सुरुवातीला ही कृती जमत नसे. त्यात वाकबगार बनलेले मित्र पाहताना तेव्हा खूपच अचंबा वाटे. पुढं पुढं सरावानं असं पाणी पिणं जमत असे.

ओढ्याचं पात्र गावाजवळून वाहत असे. त्याला बारमाही पाणी असे. दुपारी काही वेळ आणि रात्री गावात शांतता झाली, की ओढ्याच्या पाण्याचा खळखळाट घराघरांत ऐकू येई. पाण्याचा प्रवाह जसजसा पुढं जाई, तसा हा आवाजही जणू त्याच्याबरोबर वाहत राही. पात्र वळणावळणांचं होतं; तसाच त्याला उतारही होता. सरळ वाहणाऱ्या पात्राचा खळखळ आवाज जसा ऐकू येई, तसा तो पात्राच्या वळणावर नसे. तिथे आवाज बदलून जाई. वळसा घेऊन जाताना प्रवाहाचं पाणी काठांवर जोरानं धडक देत असे. त्या त्या ठिकाणी पाण्याचे तुषार उंच उडून बाजूला पडत. तिथल्या आवाजात काहीसा जोरही असे; आणि त्याबरोबरच पाण्याचे तुषार शिंपडल्याचा हलकासा आवाजही मिसळलेला असे. हे दोन्ही पाठोपाठ ऐकताना आम्हाला त्याचं ढोलवादनाशी जवळचं नातं असल्यासारखं वाटे. ढोलाच्या एका बाजूला टिपरीनं येणारा मोठा मर्दानी आवाज; आणि दुसऱ्या बाजूला चार बोटांची थाप देऊन येणारा हलका - मृदू आवाज. ग्रामदैवताच्या यात्रेच्या वेळी छबिना सुरू झाला, की त्यात दहा-बारा ढोल एकाच वेळी वाजू लागत. एका सुरात, एका तालात; आणि एकासारख्या गतीनं. तो अनुभव पुन: पुन्हा घेण्यासाठी आम्ही मित्रमंडळी ओढ्याच्या पात्राच्या प्रत्येक वळणावर जाऊन थांबत असू. एकानंतर दुसरं वळण. मग तिसरं. आणखी पुढचं. छबिन्यातल्या ढोलांचा सामूहिक आवाज आमच्या अंगात भरून राही. तो थरार पुढले कित्येक दिवस जाणवत राही. ओढ्याच्या पात्राच्या वळणावळणांवरले हे आवाज आमच्या मनात एवढे रुतून बसलेले होते, की कित्येकदा शांत वेळी ते ऐकताना पात्राजवळ न जाताही  आम्हाला ते सहजपणानं ओळखता येत.

पात्राच्या उतारावर काही धबधबेही होते. मोठमोठ्या दगडांवरून पाणी खोल खड्ड्यांत उड्या मारून येई. जोरानं वाहत आलेल्या पाण्यानं एकदम उडी मारली, की ‘धब्‌’ असे  आवाज येई. असे आवाज एकामागून एक असे करीत धावत असतात, म्हणून त्याला धबधबा म्हणत असावेत, असं आम्हाला तेव्हा वाटत असे. ओढ्याच्या पूर्ण पात्रातलं पाणी निवळशंख असे. वळणांच्या काठांवर आदळून तिथं पाण्याचे गोलाकार बुडबुडे तयार होत; आणि तिथलं पाणी किंचित फेसाळ होऊन जाई. पात्रावरून भरारणारा वारा सगळे बुडबुडे क्षणांत उचलून नेत असे. त्याला चकवा देऊन पुन्हा नवे बुडबुडे तिथं जमा झालेले असत. धबधब्यावरून कोसळल्यानंतर पाण्याचा रंग दुधासारखा शुभ्र होई. निरशा दुधाच्या पृष्ठभागावर जसा फेस जमा होतो, तसाच तो धबधब्याच्या पाण्यातही दिसत राही. धबधब्याजवळच्या पाण्याला अधिक ओढ असे, म्हणून आम्हा मुलांना त्या बाजूला कुणी फिरकू देत नसे. पाण्याच्या फेसाचा तो पारदर्शी चुरा ओंजळीत भरून घ्यावा; आणि त्याच्याशी खेळत बसावे, असे खूप वाटे. आमचे ते स्वप्न सहसा कधीच सत्यात उतरत नसे. ओढ्याच्या ज्या काठावर गाव वसलेलं होतं, त्या बाजूला काही ठिकाणी पेशव्यांच्या सरदारांनी मुद्दाम बांधून घेतलेले दगडी घाट होते. दोन्ही बाजूंनी खाली खाली उतरत जाणारे मोठे दगडी चौथरे, त्यांच्या मधोमध घडीव दगडांच्या एकसारख्या पायऱ्या; आणि त्याच्या पुढल्या बाजूला पात्रात थेट उतरणाऱ्या अर्धगोलाकार पायऱ्या. चौथऱ्यांवर दर्शनी बाजूंना महिरपींची, फुलांची कोरीव नक्षी. काही चौथऱ्यांवर देवदेवतांच्या अतिशय रेखीव आणि सौष्ठवपूर्ण मूर्ती. तेलाचे दिवे ठेवण्यासाठी तिथं छोटे कोनाडे. घाटाच्या पायऱ्या उतरून अर्धगोलाकार पायऱ्यांजवळ पोचल्यावर पुढं ओढ्याचं वाहतं पात्र दिसे. घाटाच्या जवळच्या पात्राची खोली अधिक असे. तिथलं पात्र चांगलं रूंदही असे.

गावात उभं राहून दूर पाहिल्यावर एखाद्या टेकडीएवढा दिसणारा पण प्रत्यक्षात खूप मोठा असणारा डोंगर नजरेत येई. त्या डोंगराला वळसा घालून आमचा ओढा येत असे. ओढ्याच्या दोन्ही तीरांवर मोठमोठी झाडं उभी होती. त्यांच्या आधारानं छोटी झाडं-वेली, गवताचे ताटवे वाढले होते. पात्रात कुठं कुठं मोठे खडक पसरलेले होते. काही ठिकाणी मोठे दगडही येऊन बसलेले होते. ओढ्याचे पात्र हे अडथळे सहज पार करून पुढं धावत असे. काही ठिकाणी पात्रानं या अडथळ्यांना बाजूला ठेवून स्वत: वेगळी वाट शोधली होती. काही खडकांना पोटात घेऊन पाण्यानं पुढचा रस्ता धरला होता. ओढ्याचा जो भाग गावाजवळ होता, तिथंच माणसांची वर्दळ असे. तिथून ओढ्याच्या वरच्या भागाकडं क्वचितच कुणी जाई. वर्दळीच्या भागात एका डगरीवर मारुतीचं देऊळ होतं. संपूर्ण दगडी बांधकामाचं. हे दगड एकमेकांत गुंतवलेले होते. इतकी वर्षं झाली, तरी त्यातला एकही दगड इकडं-तिकडं झालेला नव्हता. उन्हाळ्याच्या दिवसांत या देवळात कमालीचा थंडावा असे. तिथली मारुतीची मूर्तीही भव्य होती. या मूर्तीवर शेंदूरलेप केलेला होता. ‘बजरंगबली की जय’ अशा घोषणांचे सूर विशेषत: सकाळी या मंदिरात हमखास घुमत असत. दंड आणि मांड्या थोपटल्याचे आवाजही होत. ओढ्याच्या पात्रात स्नान करून आलेले काही जण ओलेत्यानेच सूर्यनमस्कार घालीत, जोर-बैठका मारीत. त्यांची उघडी शरीरं एखाद्या कोरीव शिल्पासारखी सौष्ठवपूर्ण दिसत.

मारुतीच्या देवळामागं मोठा डोह होता. त्याचं नावही ‘मारुतीचा डोह’ असंच पडलेलं होतं. पात्राची सर्वाधिक खोली याच डोहात होती. मारुतीच्या देवळामागील उंच डगरीवरून काही जण डोहात सूर मारत. नाक-तोंड आणि डोळे बंद करून पाण्यात मुटका टाकत. ते पाहतानाही अंगाचा थरकाप होई. पाण्यात झेपावलेला तरुण डोहात पाण्याच्या पृष्ठभागावर आल्याचं दिसेपर्यंत ऊर धपापत राही. पृष्ठभागावर येऊन तो हात उंचावून दाखवी, तेव्हा त्याच्या त्या अचाट शौर्याचं भारी कौतुक वाटे. पट्टीचे पोहणारेच असल्या कसरती करत. डोहाच्या वरच्या बाजूला पात्र उथळ होतं. कमरेला कडब्याची पेंढी बांधून, टायर बांधून नव्यानं पोहायला शिकणारे तिथं सराव करीत. गटांगळ्या खाऊन घाबरंघुबरं झालेलं एखादं पोर कुणा मोठ्याला बरोबर घेऊन पुन्हा पाण्यात उतरे; आणि हात-पाय मारू लागे. ‘एके दिवशी उंच डगरीवरून मारुतीच्या डोहात सूर मारायचं’ स्वप्न या प्रत्येक नवशिक्याच्या मनात असे. ओढ्याच्या पात्रात वरच्या टोकाला दगडी बांध घालून पाणी अडवलेलं होतं. त्याच्या मागं पाण्याचा रुंद पसरलेला फुगवटा असे; मात्र तिथलं पाणी फार खोल नसे. बऱ्यापैकी पोहता येऊ लागलेली मुलं बांधाच्या भिंतीवरून पाण्यात उड्या मारण्याचा सराव करीत. पाणवठ्यावर सकाळी बरीच धांदल सुरू असे. चकचकीत घासलेले हंडे-कळशा एकावर एक ठेवून डोक्यावरून पाणी नेणाऱ्या बायका, खांद्यावरल्या कावडीनं पाणी नेणारी पुरुषमाणसं यांची ये-जा सुरू असे. काही वेळानं ओढ्यातल्या खडकांवर - दगडांवर धुणं आपटल्याचे आवाज सुरू होत. काही वेळानं गाई-गुरांचे कळप ओढ्याचं पात्र ओलांडून गवताळ माळरानाकडं जायला सुरुवात होई. त्यामानानं ओढा दुपारी काहीसा शांत होई. दोघं-तिघं धोबी कपडे धुण्यासाठी खडकांवर आलेले असत. धुतलेले कपडे तिथंच वाळूवर पसरून ते वाळवूनच घेऊन जात. त्यामुळे धोब्यांचा वावर ओढ्यावर सगळी दुपारभर असे. ओढ्याच्या पाण्यात खेळण्यासाठी, पोहणं शिकण्यासाठी पोरं-सोरं एकेक करीत ओढ्याच्या दिशेनं निघालेली दिसत. गुरुजींचा डोळा चुकवूनही काही जण तिकडं आलेले असत. शाळा सुटण्याच्या आधी वर्गात पोचून दप्तरं घेऊन घरी येणं जमलं, की हा उद्योग कुणाही वडीलधाऱ्या माणसांना सहसा कळत नसे. काही वेळा गुरुजीच ओढ्यावर येत; आणि मुलांना हाकलून वर्गात आणून बसवत. थोडीफार शिक्षाही करीत. इतर मुलांपेक्षा दुप्पट अभ्यास देण्याची शिक्षा त्यांची आवडती असे. मुलांनाही ती तेवढी त्रासदायक वाटत नसे.

ओढ्याच्या काठाकाठानं निरुद्देश भटकण्यातही एक मौज असे. गावाच्या विरुद्ध दिशेला असलेल्या ओढ्याच्या काठाला लागून दाट झाडी होती. कडुनिंब, बाभळ, वड-पिंपळ, चिंच, कवठ, जांभूळ, माना उंच काढलेले नारळ असं काय काय त्या काठावर होतं. काही भागात आमराईही डोलत होती. या झाडांवर वेगवेगळ्या ऋतूंचे अलंकार फुलून आलेले दिसत. चिंच, कवठ, जांभूळ आणि आंबा यांच्या हंगामात अनेक मुलांचा मुक्काम त्या- त्या झाडाखाली असे.  ओढ्याच्या पात्रात मनसोक्त डुंबायचं; आणि भूक लागली की, फळांवर ताव मारायचा, हा एकमेव कार्यक्रम तेव्हा सुरू राही. जांभळांचा, आंब्याचा हंगाम नेमका उन्हाळ्याच्या सुटीतच बहराला येई. शाळा, अभ्यास यांचा धोशा मुलांच्या मागे नसे. जांभळांच्या झाडांवर किंवा अख्ख्या आमराईवर कुणाचीच मालकी नसे. तिथून ये-जा करणारे कुणीही पांथस्थ झाडांच्या गार सावलीत विश्रांती घेत. पाडाच्या किंवा पिकलेल्या आंब्यांची चव चाखून पाहत. आंब्याच्या झाडाचं एखादं पान किंवा मोहराचा झुबका तळहातावर चुरडला, तरी त्या त्या आंब्याचा विशिष्ट गंध जाणवे. झाडं मोहरानं फुलून गेल्यावर आमराईभर तो हवाहवासा सुवास भरून गेलेला असे. पक्ष्यांनी चोचींनी टोकरलेला आंब्याचा पाड एखाद्या झाडाखाली आढळणं, हे आम्हाला तेव्हा एखाद्या शुभशकुनासारखं वाटे. वाट्याला आलेल्या अशा पहिल्या पाडाच्या कथा मित्र रंगवून रंगवून सांगत, तेव्हा त्यांचा हेवा वाटे.

ओढ्याच्या पात्रात ठिकठिकाणी थंडगार आणि निवळशंख पाण्याचे झरे होते. संपूर्ण गाव पिण्यासाठी झऱ्याचंच पाणी वापरीत असे. ओढ्याच्या कडेकडेनं शाडूच्या मातीच्या टेकड्या होत्या. तिथल्या फिकट बदामी रंगाच्या कपारींतून झऱ्यांचं पाणी एकसारखं वाहत असे. पाण्याच्या तळाशी असलेले वाळूचे कणही सहज मोजता येतील, एवढं झऱ्याचं पाणी निवळशंख असे. घागरी-कळशा भरून घेता येतील, एवढ्या आकाराचा खड्डा झऱ्याच्या तोंडाशी असे. कितीही पाणी उपसून घेतलं, तरी वाहत्या झऱ्यानं कधीच हात आखडता घेतला नाही. गुडघ्यावर बसून पुढं खाली वाकायचं; आणि झऱ्याच्या पाण्याच्या झुळझुळत्या प्रवाहाचं पाणी प्यायचं हा आम्हा मुलांचा अतिशय आवडता छंद असे. सुरुवातीला ही कृती जमत नसे. त्यात वाकबगार बनलेले मित्र पाहताना तेव्हा खूपच अचंबा वाटे. पुढं पुढं सरावानं असं पाणी पिणं जमत असे. वर्गातले काही व्रात्य मित्र झऱ्याच्या कपारीत बसलेले खेकडे पकडण्यासाठी जात. दुपारच्या वेळी झरे निवांत असत. तिथे फार कुणाची ये-जा नसे. अशी वेळ निवडून मित्र तिथं तासन्‌ तास घालवीत. खेकड्यांनी नांगी मारली, की झट्‌कन हात मागं घेत. फिरून प्रयत्न सुरू करीत. कपारीतून खेकडा बाहेर ओढून घेतल्याशिवाय त्यांचं समाधानच होत नसे. ओढ्याच्या परिसरात या मुलांनी आणखी एक वेगळीच दुनिया शोधलेली होती. ओढ्याच्या पात्राला लागून लव्हाळ्याची बेटं माजलेली असत. रानफुलांचे ताटवे बहरलेले असत. रंगीबेरंगी फुलपाखरं, भराऱ्या घेणारे भुंगे, हवेतल्या हवेत कोलांट्या घेणारे छोटे पक्षी, रंग बदलणारे किडे असलं अनोखं विश्व मुलांना तिथं गवसलेलं होतं. गवताळ भागात लपून यांतलं काही पकडण्याचा खेळ ही मुलं किती तरी वेळ खेळत बसत. त्यांच्या दप्तरांतल्या डब्यांत फुलपाखरांचे पंख, किडे असं काही ना काही हमखास असायचं.

गावातल्या मुलांमाणसांचे असले उद्योग निमूटपणानं सहन करणारं ओढ्याचं पात्र कधी कधी फारच रुष्ट होई. त्याचं ते रौद्र रूप काळजाचा ठोका चुकविणारं असे. पाऊस लागून राहिला, की ती संततधार चार-चार दिवसही कोसळत राही. ओढ्याचा उगम ज्या डोंगरावर होता, त्या परिसरात पावसाचा जोर अधिक असला, ती ओढ्याला हमखास पूर येत असे. गावात येणारे रस्ते, छोट्या वाटा पाण्याखाली जात. गावाबाहेर गेलेली मंडळी, बाहेरगावांहून आलेले पाहुणे ओढ्याच्या पलीकडं अडकून पडत. पुराचं पाणी उतरेपर्यंत या सगळ्यांचा मुक्काम तिकडंच असे. ओढ्याला पूर आला, की गावाला चोवीस तास वेढून राहिलेला खळखळाटाचा आवाज गायब होई; आणि त्याची जागा धो-धो अशा दमदार आवाजानं काबीज केलेली असे. रात्री अंगावर पांघरूण ओढून घेऊन झोपी गेल्यावरही तोच आवाज घरांचे दरवाजे ओलांडून कानांवर आदळत राही. पुराच्या पाण्याचा पसारा गावाच्या दिशेनं वाढत चालल्यासारखा दिसे. या पाण्यानं तिथल्या मारुतीच्या देवळाला वेढा घातला, की गावावर चिंतेचे ढग जमा होत. ओढ्याकडे जाणाऱ्या उताराच्या वाटा चढत्या पाण्यानं गिळून टाकलेल्या असायच्या. अशा पावसानंतर मग गावावर जणू काळजीची अतिवृष्टीच सुरू होई. गावातली पोक्त मंडळी पारांवर बसून चर्चा करू लागत. पुराच्या पाण्याची खणा-नारळानं, साडीचोळीनं ओटी भरायचं ठरे. पोत्याच्या खोळी डोक्यावरून घेऊन मंडळी ओटीचं सामान घेऊन ओट्याच्या दिशेनं जात. पुराचं पाणी गावाच्या दिशेनं तोंड करून वर वर चढायच्या प्रयत्नात असे. वेगानं धावणाऱ्या त्या प्रवाहात साडी-चोळी, हिरवा चुडा, नारळ, फुलं, हळद-कुंकू असं वाहून ओटी भरली जाई. ‘आता तरी पाण्याला उतार पडू दे’, अशी प्रार्थना केली जाई. मग हळूहळू पावसाचा जोर कमी होई. गावाच्या दिशेनं वर येणारं पाणी कमी होऊ लागे. पुराला लवकर उतार पडत जाई. पाणी कमी झाल्यावर ओढ्याच्या तीरांवरील झाडांना दोरखंड बांधून त्याच्या आधारानं ये-जा सुरू होई. हळूहळू ओढ्याचं पाणी पहिल्यासारखंच शांत होई; आणि त्याच्या खळखळाटाच्या आवाजानं गावभर आनंद झुलू लागे.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके