डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

माथ्यावर तळपणारं सूर्यबिंब सगळ्यांचा डोळा चुकवून पश्चिम क्षितिजाकडं घरंगळायला लागे. गावावरची उन्हं कलती होऊ लागत. त्यांची प्रखरता कमी होऊ लागली, तरी उष्मा मात्र फारसा ढळलेला नसे. त्या वेळीही त्याचे चटके जाणवत असत. गच्च झाडांच्या गर्दीतून पक्ष्यांचे लाघवस्वर कानांवर यावेत, तसे मंद वारे हळूहळू गावाच्या दिशेनं वाहत येत. वाऱ्याच्या सुरुवातीच्या थरांतला कडकपणा नंतर हलका होत असे. दर क्षणी वारं निवत चाललं आहे, असंच वाटे. काही वेळानं उघड्या माळावर खेळणारा वारा गावाकडं मोर्चा वळवी. हे वारे ओढ्याच्या पात्रावरून गावात येताच आणखी थंड होत आणि त्यासरशी सगळं गावच एका अल्हाददायक होडीत बसून झुलत राही. हे बदल अनुभवण्यात गुंतलेलो असताना, सूर्यबिंब केव्हाच पश्चिमेकडल्या डोंगराजवळ पोचलेलं असे. गावावर सावळ्या काजळचाहुली उतरत असल्याचं दिसे.

तांबडं फुटलं, की गाव जागं होत असे. हे तांबडं रोज पूर्वेलाच का फुटत असावं, त्याचं आम्हा मुलांना तेव्हा मोठं कोडं असे. शेतात पाटानं येणारं विहिरीचं पाणी धरताना एखादा वाफा तुडुंब होता होताच फुटत असे; आणि मग ते सगळं पाणी इकडंतिकडं धावत असे. अशाच एखाद्या वाफ्यातून हे तांबडं फुटून वाहत असणार, असंच तेव्हा वाटे. झाडांवर पिकलेली डाळिंबं उन्हाच्या तडाख्यानं कधी कधी फुटून निघत; आणि आतले लालबुंद-रसदार दाणे डाळिंबाच्या शेंदरी सालीतून डोकावत असत. पूर्वेला रोजच हे दृश्य दिसत असे. आपला डोळा चुकवून पूर्व दिशेला रोज-रोज या गुलाल मुठी कोठ उधळीत असावं, त्याचा शोध घेण्याचे मनसुबे रचले जात; मात्र ते कधीच शक्य होत नसे, त्यामुळे मन खट्टू होत असे. गावातली रोजची सकाळ या पूर्वरंगाची बोट पकडूनच चालत राही. आकाशाच्या गाभाऱ्यात ही गुलाल उधळण थोडा वेळच दिसे. हळूहळू तिच्यामागून धमक रेषांचे सोनेरी बाण पुढं पावलं टाकू लागत. या मिश्रणानं आधीचा लालिमा केशररंगी होत जाई. पाहता-पाहता कोमट स्पर्शाची कोवळी सूर्यकिरणं पूर्वेच्या डोंगराआडून सरसर वर येऊ लागत. अख्खं गाव काही क्षणांत सोन्याच्या रसानं माखून जाई. पूर्वेला डोंगररांगांच्या पायऱ्या होत्या. त्या उतरत्या उंचीच्या होत्या. त्यामुळं ही उन्हंही पायऱ्या उतरून येत असल्यासारखं वाटे. सकाळची तिरकस किरणं गावावर पसरली, की गावातल्या बहुतेक घरांच्या, झाडांच्या लांबट सावल्या सगळीकडं दिसू लागत. मंदिरांचे कळस, नारळीच्या झाडांनी उंच केलेल्या तुरेदार माना, घरांच्या छपरांवर कुठं कुठं उभी केलेली निशाणं असं एक-एक सावल्यांच्या गर्दीतही ओळखू येत असे. मित्रांच्या घरांची ओळखही या सावल्यांवरून अगदी अचूक करता येई. छोट्या घरांच्या सावल्या मोठ्या कड्यांच्या सावल्यांनी गिळून टाकलेल्या असल्या, तरी मोठ्या सावल्यांच्या पोटात काय-काय लपलेलं आहे, तेही लक्षात येई. पाणवठ्याकडं जाणाऱ्या रस्त्यांवर पावलांच्या येरझारा सुरू झालेल्या असत. डोक्यावर तीन-तीन हंड्यांची-कळश्यांची उतरंड घेतलेल्या सावल्यांच्या आकृत्या तिथून फिरत चालल्यासारखं वाटे. खांद्यावर घेतलेल्या कावडीही अधूनमधून ये-जा करीत. डोंगरपायथ्याशी पसरलेल्या माळरानांवर चरण्यासाठी निघालेले खिल्लारांचे कळपही या सावल्यांतून वाहत असल्यासारखे भासत.

सूर्यबिंब वर वर सरकू लागलं की, सावल्यांचा हा चित्रमय कॅन्व्हास आपलं रूप क्षणांत पालटत असे. त्याआधी बराच काळ उंचावलेल्या सावल्या हळूहळू अखूड होत जात. लांबट सावल्या काहीशा गरगरीत झालेल्या असत. सूर्य कासराभर वर आला, की गावतले व्यवहार बदलून गेलेले असत. तेव्हा घरोघरी जनावरं असत; आणि त्यांच्यासाठी कासरेही असत. नदीकाठी माजलेल्या घायपातापासून ते तयार करून मिळत. विशेष म्हणजे या

कासऱ्यांची जाडी आणि लांबी यांत

तसूचाही फरक आढळत नसे.

हे कारागीर त्याची मोजमापं कधीच करत

नसत; इतकी ती त्यांच्या नजरेत बसलेली

असत. त्यामुळे दिवस कासराभर वर आला, म्हणजे अंदाचे कितीचा सुमार झाला असणार, त्याचे ठोकताळे सगळ्यांच्याच मनात पक्के झालेले असत. देवळाच्या कळसाच्या टोकाची सावली कुठपर्यंत आली आहे, पारावरल्या झाडाची सावली कुठं पोचली आहे, कुणाच्या पडवीवर उन्हं कुठपर्यंत गेलेली आहेत, असल्या रूढ खुणांवर गावातले सगळे व्यवहार चालू असत. मोठी माणसं मुलांना सावल्यांच्या या खुणा पाहायला पाठवीत; आणि त्यावरूनच वेळेचा अंदाज करीत. आमच्यापुढं तेव्हा गावाची दोन रूपं असत. एक- मूळ. जसं आहे तसं दिसणारं गाव, आणि दुसरं- हे सावल्यांचं गाव. एक जिवंत आणि दुसरं चित्रांतलं. एक रंगीबेरंगी आणि दुसरं फक्त कृष्णरंगी. एक कमालीचं लोभस आणि दुसरं रोज अंगाखांद्यांवर खेळणारं. बघता-बघता सूर्य माथ्यावर येऊन तळपू लागे आणि रस्तोरस्ती रखरखीचे प्रवाह भरून जात. वर्दळही कमी झालेली असे. कामाशिवाय कुणीच फार घराबाहेर पडत नसे. शेत-शिवारांतल्या लगबगत्या हालचालीही झाडांखालच्या गोलाकार सावल्यांचा विसावलेल्या असत. सकाळी सकाळी झेपावलेले पक्ष्यांचे थवे झाडांवर पानांआड बसलेले असत. झाडांच्या सावल्या वगळता, आधी दिसणाऱ्या किती तरी सावल्या आता गायब झालेल्या असत. सावल्यांचं गाव मुठीत मावू शकेल, इतकं छोटं झाल्यासारखं वाटे. सगळं गाव सहज उचलून घेता येण्याइतपत हलकं झालंआहे, असं मनात येई आणि ते गाव अनेकदा उचलून तळहातांच्या द्रोणात ठेवूनही दिलं जाई.

माथ्यावर तळपणारं सूर्यबिंब सगळ्यांचा डोळा चुकवून पश्चिम क्षितिजाकडं घरंगळायला लागे. गावावरची उन्हं कलती होऊ लागत. त्यांची प्रखरता कमी होऊ लागली, तरी उष्मा मात्र फारसा ढळलेला नसे. त्या वेळीही त्याचे चटके जाणवत असत. गच्च झाडांच्या गर्दीतून पक्ष्यांचे लाघवस्वर कानांवर यावेत, तसे मंद वारे हळूहळू गावाच्या दिशेनं वाहत येत. वाऱ्याच्या सुरुवातीच्या थरांतला कडकपणा नंतर हलका होत असे. दर क्षणी वारं निवत चाललं आहे, असंच वाटे. काही वेळानं उघड्या माळावर खेळणारा वारा गावाकडं मोर्चा वळवी. हे वारे ओढ्याच्या पात्रावरून गावात येताच आणखी थंड होत आणि त्यासरशी सगळं गावच एका अल्हाददायक होडीत बसून झुलत राही. हे बदल अनुभवण्यात गुंतलेलो असताना, सूर्यबिंब केव्हाच पश्चिमेकडल्या डोंगराजवळ पोचलेलं असे. गावावर सावळ्या काजळचाहुली उतरून येत असल्याचं दिसे. आता पश्चिम दिशेला लालिमा पसरलेला असे. त्याआधी बराच वेळ सायंकाळची तिरकस किरणं गावातल्या सावल्यांना पूर्वेकडे ढकलीत असावीत, तसं भासे. दिवस उगवून येताना गावातल्या वेगवेगळ्या प्रतीकांच्या सावल्या पश्चिमेकडे पसरलेल्या असत. आता ते चित्र पूर्ण उलटं झालेलं असे. या सावल्याही सकाळच्या सावल्यांसारख्या दिसत; पण त्यांत खूप फरक असे. बारकाईनं पाहताना हे फरक नजरेत ठळक होत जात. जोगावलेल्या जनावरांचे कळप त्यांच्याच सावल्यांच्या पायघड्यांवरून घरांकडं परतत असत. त्यांची भरलेली पोटं ऐटदार चालीमुळं एकसारखी हिंदोळताना दिसत. त्यांची अंगंही तुकतुकीत झालेली अस. गळ्यातल्या घुंगुरमाळांच्या आवाजात लगबग आणि ओढ जाणवत राही. पक्ष्यांचे थवे गोलाकारांची बदलती नक्षी रेखीत आकाशनिळाईवर भिरभिरत असत. घरटी जवळ आली, की क्षणांत आत जाऊन पाखरं चिडीचूप होत. ओढ्याच्या पात्रानं काळजमाया पांघरलेली असे. ते पात्र पाहताना, आहे त्यापेक्षा अधिक खोल खोल होत असल्याचे भास होत. ओढ्याच्या पात्रातून गावाकडं निघालेला चढाचा रस्ता तोच काळसरपणा वर ओढून घेत गावात शिरत असे.

कोपऱ्या-कोपऱ्यांवर असलेले ग्रामपंचायतीचे रॉकेलचे दिवे लावण्याची घाई सुरू होई. ग्रामपंचायतीचा शिपाई खांद्याला शिडी अडकवून, हातात रॉकेलचा छोटा डबा आणि एक फडकं घेऊन खांबा-खांबांकडं पोचू लागे. दिव्याच्या खांबाला शिडी लावून तिथल्या काचघरातून तो दिवा घेऊन उतरून येई. दिव्याची काळपट झालेली काच छान पुसून घेई. वातीवरची काजळी साफ करी. काडीपेटीवर काडी ओढल्यानंतर ज्योतीभोवती ओंजळ करून ती वातीला लावी. काच बसवून दिवा पुन्हा ठेवून देई आणि तो पिवळट प्रकाशाच्या वर्तुळानं रस्त्याचा मोठा परिसर कवेत घेई. लगेचच शिडी उचलून शिपायाची पावलं दुसऱ्या खांबाकडं कूच करीत. या प्रकाशातून ये-जा करणाऱ्यांच्या सावल्या चित्रपटांतल्या पात्रांसारख्या वाटत. हा प्रकाश अडवून धरलेल्या झाडांच्या आणि घरांच्या सावल्या आणखीनच वेगळ्या असत. मंदिरांचे गाभारे समयांच्या प्रकाशानं उजळून गेलेले असत. तिथंही देवाच्या मूर्तीच्या सावल्या मोठ्या होऊन गेलेल्या दिसत. मंदिरात आरत्या सुरू होत. तबकातल्या निरांजनाचा प्रकाश वर्तुळाकार फिरू लागत आणि त्याबरोबर जमा झालेल्या लोकांच्या भिंतीवरल्या सावल्याही वर्तुळाकार होत जात. घराघरांत रॉकेलच्या चिमण्या आणि कंदील लागलेले असत. चुलींत निखारे फुललेले असत. गरमागरम भाकरींचे चंद्र बाजूला पडलेले असत. घरांवरल्या अंधारात घरांच्या खिडक्यांतून येणारे करड्या रंगाचे धूर मिसळून जात. गावावर रात्र उतरून आलेली असे. दिवसभर अनुभवलेलं सावल्यांचं गाव कधीच निद्राधीन झालेलं असे.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके