डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

डब्यात वडिलांची  लिहिलेली चिठ्ठी रोज हमखास असायची. त्यात ख्यालीखुशालीच्या मजकुरापेक्षा, चिठी लिहितानाचं प्रसन्न वातावरण, गावातलं हवामान, पाऊसपाणी, सणा-उत्सवाची माहिती, कधी शेतातल्या पिकांच्या वाढीची माहिती, आंब्याचा मोहर, फुलावर आलेल्या चिंचा, आवळी भोजनाची मजा- असं काय काय असे. विहिरीचं पाणी नुकतंच दिल्यानं तरारलेले मेथीचे किंवा कोथिंबिरीचे हिरवेगार वाफे, झाडांना लटकू लागलेल्या चवळीच्या किंवा मुगाच्या शेंगा, वाफ्यांत किंवा बांधांवर लावलेले मधेमधे डोकावणारे कांदे या संबंधीही वडील चिठ्ठीत लिहीत असत. आज डब्यात दिलेल्या भोजनाचा बेत काय आहे, याचंही चविष्ट वर्णन वडील कधी कधी कळवीत. ते वाचायचेही खूप. अधूनमधून तेही चिठ्ठीतल्या मजकुरात डोकवायचं.

आजूबाजूनं डोंगरांचे उंचवटे. काही छोटे, काही मोठे. त्यातून वाट शोधत येणारा रस्ता. वळणांचा, चढ-उतारांचा. कुठंकुठं ओढ्याच्या पात्रात उतरणारा. रस्त्याच्या दुतर्फा शेतांचे चौरस. आयत. त्रिकोण. सगळीकडं हिरवी नक्षी उगवून आलेली. कुठं पिकांच्या राखणीचे आवाज. कुठं मोटेवरली गाणी. कुठं पक्ष्यांचा किलबिलाट. जनावरं हाकारल्याच्या ललकाऱ्या. शेतांच्या तुकड्यांना बिलगून बसलेली घरं. कुठं एकेकटी. कुठं पाच-पंचवीस घरांची वस्ती. टेकडीच्या उतारावर जिल्हा परिषदेची कौलारू शाळा. डोंगरउतारांवरल्या गवताळ रानांत तोंडं खुपसून चरणारी जनावरं. घरांच्या-खोपटांच्या छतांतून उंचावणारे धुराचे ढग. वस्तीजवळ रस्त्यांवर विसावलेली कुत्री. इकडून तिकडं सरसर धावणाऱ्या कोंबड्या. त्यांच्या मागं मागं करणारा चिवचिवत्या पिलांचा कळप, घरांच्या अंगणांत किंवा उंबऱ्यांवर उन्हाची तिरीप पकडून पातळशा गुलाबी जिभेनं अंग चाटत बसलेली मांजरं. कळसाची मान वर काढलेली देवळं आणि त्याच्या आसपास रेंगाळणारी चार-दोन डोकी. दूरवर असताना खेळण्यांतल्याएवढी छोटी दिसणारी आणि या रस्त्यावरून येणारी लाल रंगाची एस.टी. डोंगराच्या कुशीतल्या एखाद्या मूठभर गावात रात्रीचा मुक्काम करून एस. टी. निघायची. रस्त्यांलगतच्या असल्या गमती-जमती पाहत-अनुभवत ती आमच्या गावाच्या एस.टी. स्टँडवर येऊन दाखल होई. या एस. टी.ला नाव पडलं होतं : ‘पहिली गाडी’. आमच्या पंचक्रोशीतून पुण्याला येणारी ही पहिली एस. टी. असे, म्हणून ती पहिली गाडी. आमच्या स्टँडवर ही गाडी आली, म्हणजे सकाळचे सात वाजले, असा समज आमच्या अख्ख्या गावात रूढ झालेला होता. घड्याळांपेक्षाही लोकांचा या गाडीवर किंचित अधिकच विश्वास असे. ही एस. टी. काही नियमितपणाचा आदर्श म्हणता येत नसे. कधीकधी पंधरा-वीस मिनिटं गाडी पुढं-मागं असंही करीत असे; पण ही गाडी आणि सकाळची सातची वेळ हे समीकरण कधीच बिघडून गेलं नाही.

पाच-सातशे लोकवस्तीपासून हजार-बाराशे लोकवस्तीपर्यंतची छोटी गावं आणि अगदी पाच-पंचवीस घरांच्या वाड्यावस्त्या पंचक्रोशीत ठिकठिकाणी होत्या. तिथले प्रवासी गोळा करीत आणि जेवणाचे डबे जमा करीत ही एस. टी. आमच्या गावात स्टँडवर येऊन दाखल होत असे. आमचं गाव त्यांतल्या त्यात थोडं मोठं. चार-पाच दुकानांचं आणि आठवडा बाजाराचं गाव. त्या मानानं एस.टी. स्टँडही गजबजलेला असे. उतरणारे प्रवासी एक-दोघेच; पण तालुक्याच्या गावाला किंवा पुण्यासारख्या शहराला जाणारे बरेच असत. एस.टी.त घुसण्यासाठी दाराशी प्रवाशांची झटापट सुरू होई आणि त्याच वेळी जेवणाचे डबे घेऊन उंचावलेल्या हातांचा गाडीभोवती चौफेर वेढा पडे. शिक्षणासाठी किंवा नोकरी-धंद्यासाठी पुण्यात राहणाऱ्यांचे हे जेवणाचे डबे असत. साऱ्या पंचक्रोशीतून जवळजवळ चाळीसएक जेवणाचे डबे आणले जात असत. खिडक्यांच्या बाजूला बसलेल्या प्रवाशांपैकी कुणीही हे डबे घेत असत आणि सामान ठेवण्यासाठी सीटच्या वर असलेल्या जागेत ठेवून देत. त्यांना म्हणायचं डबे; पण ते डबे नसायचेच. बहुतेकांनी फडक्यात भाकरी आणि चटणी किंवा कोरडी भाजी बांधलेली असे. हे जेवण दोन वेळचं असे. निम्मं दुपारी आणि उरलेलं रात्री. काही वेळा फडक्यांत नुसत्याच भाकरी दिल्या जात. अशा वेळी जेवताना एखादी भाजी-आमटी किंवा गाडीवरली गरम भजी घेऊन मुलं ते खात असत. या ‘पहिल्या गाडी’त सगळीकडं गरमागरम भाकरींचा तप्त करणारा गंध पसरून गेलेला असे. आपल्या मुलाबाळांसाठी दिलेल्या त्या घासाघासांत मायेची अवीट चव मिसळलेली असे. ही सगळीच कुटुंबं साधी असायची. कुणी शेतमजूर; तर कुणी अगदी छोट्या तुकड्याएवढ्या शेतावर गुजराण करणारे. सगळ्यांचीच मिळकत बेतासबात. शहरातल्या मुलांना तेव्हाच्या खानावळींचे महिना शंभर रुपये हे दर परवडायचे नाहीत. शिकणाऱ्या मुलांकडं फारसे पैसेच नसायचे; आणि किरकोळ नोकरदारांना ही रक्कम डोईजड असायची. पुण्यापासून पन्नास-साठ किलोमीटरच्या परिघात असलेल्या गावांतून रोजच्या रोज एस.टी.बरोबर डबे देणं शक्य होत असे. पैसे वाचवण्यासाठी चारसहा मित्र एका भाड्याच्या खोलीत राहत. सगळ्यांनी मिळून महिन्याचं भाडं द्यायचं. त्यांना तेवढंच जमत असे. डबा घेण्यासाठी दिवसातून एकदा स्वारगेटवर येऊन जायचं. सायकल हीसुद्धा तेव्हा चैन होती. स्वारगेटवर ये-जा करण्यासाठी बस हा कमी खर्चाचा पर्याय होता. काही वेळा पदयात्रेचा हुकमी मार्ग तर होताच!

लग्नसराईच्या, सणासुदीच्या किंवा सुट्ट्यांच्या दिवसांत एस.टी.ला गर्दी असे. अशा वेळी कंडक्टर एस.टी. स्टँडच्या काहीशी अलीकडं उभी करी. उतरणारे प्रवासी एस.टी.च्या दरवाजाशी येऊन थांबलेले असत. ते पटकन उतरून जात. ते दिसताच स्टँडवर थांबलेल्यांपैकी काही मंडळी तिथपर्यंत पळत जाऊन गाडी पकडत. कंडक्टरची सूचना न जुमानता मंडळी एस.टी.च्या दरवाजातील पायऱ्यांवर दोन पावलं टेकवण्यापुरती जागा मिळवीत. दोन बाकांमधल्या रिकाम्या जागेतून पुढं सरकणं अशक्य झालं, की एस.टी.च्या टपावर पंच वाजवत कंडक्टरचा आवाज होई : ‘‘कोण मागं आहे? पाहुणं, आता दरवाजा ओढून घ्या अन्‌ पट्टी टाका!’’ त्या कोलाहलात काहींनी जेवणाचे डबे खिडक्यांतून पोचविलेले असत. डबे पोचवायला आलेल्या वयस्क मंडळींना ही धावपळ जमत नसे. त्यांनी कुणाच्या हाती डबा पाठविला, तरच तो एस.टी.त जाई; अन्यथा तो तसाच हातात राहून जाई. अलीकडं एस.टी. उभी करून प्रवाशांची चढ-उतार पूर्ण झाली, की मग स्टँडवर न थांबताच एस.टी. निघून जाई. एस.टी.त जाता न आलेल्यांच्या चेहऱ्यांवर; डब्यांची फडकी हातांतच राहिलेल्यांच्या चेहऱ्यावर निराशेचं आणि काळजीचं सावट दिसत राही. ‘दुपारच्या भुकंला पोरगं आता काय खाईल?’ असा प्रश्न या गर्दीतल्या प्रत्येकाच्या डोळ्यांत जाणवत राही. पाय ओढीत घराकडं परतणारी ही माणसं पाहिली, म्हणजे मन गलबलून जाई; आणि त्यांच्या डोळ्यांत दिसणारा काळजीचा प्रश्न काळजाची कालवाकालव करी. कधीकधी रस्त्यात मधेच एस.टी. बंद पडायची. डेपोतून कर्मचारी येणार आणि मग ती सुरू करणार, अशीच पद्धत असे. मागून दुसरी एस.टी. आली, तर काही प्रवासी पुढं पाठवलेही जात; पण अशा वेळी सगळ्यांचे डबे आधीच्या एस.टी.त ठेवले होते, तिथंच राहून जात. जास्तच प्रवासी असतील, तर चार-दोन तासांनी दुसरीच गाडी पाठवली जाई आणि तीमधून प्रवाशांची सोय केली जाई. अशा बदलाबदलीत डब्यांची आठवण कुणाला राहणार? स्वारगेटवर डबे घेऊन जाण्यासाठी येणाऱ्यांना अशा वेळी सक्तीचा उपास घडे.

अशा पद्धतीनं जेवणाचे डबे पाठविण्यासाठी एस.टी. कार्यालयाकडून एक पास दिला जाई. स्वारगेटवरच्या कार्यालयात विशिष्ट रक्कम भरली, की दोन प्रतींत पास दिला जात असे. एक प्रत आपल्याकडं ठेवायची, दुसरी गावाला घरी पाठवायची. कंडक्टरकडं डबा सोपविताना किंवा एस.टी.तून डबा उतरवून घेताना कधीकधी या पासची तपासणी केली जाई. पास उपलब्ध नसेल, तर कंडक्टर खेकसून बोलत असे. डबा स्वीकारायला किंवा द्यायला कुणी नकार देत नसे; पण ‘‘उद्या पास नसेल, तर डबा नेणार नाही किंवा देणार नाही,’’ असा सज्जड दम मिळे. अशा सवलतींमुळे काहींच्या डब्यांची ने-आण पासशिवायच होत राही. काहींचे डबे पत्र्याचे व कडी-कुलपाचे असत. त्यावर डबा पाठविणाऱ्याचं व घेणाऱ्याचं नाव ठळक अक्षरांत लिहिलेलं असे. या डब्यात भाजी-भाकरी, ताक, भात, एखादं तोंडी लावणं असं दिलं जाई. माझा डबा या प्रकारचा होता. कुलपाच्या किल्ल्या एक गावाला घरी आणि दुसरी स्वत:कडं अशा असत. डबा पाठविण्याची तयारी आई आणि वडील पहाटेच सुरू करीत. भाजी, पोळी, भात, ताक किंवा कढी, लोणचं-पापड असं काही, अधूनमधून चटणी असं साग्रसंगीत जेवण डब्यात असे. ताक किंवा कढी अशा पदार्थांसाठी प्लॅस्टिकच्या वेगवेगळ्या बाटल्या असत. सणांच्या दिवशी आई डब्यात गोडधोड देई. त्यांतही मला आवडते, म्हणून पुरणपोळी हमखास असे. हे सगळं तयार करण्यासाठी आई किती वाजता जागी होत असेल, असा विचार तेव्हा कधीच मनात आला नाही. त्या वेळच्या आठवणी जाग्या झाल्या, म्हणजे आज ते प्रकर्षानं जाणवू लागतं. आईनं डबा भरून दिला, की तो घेऊन वडील एस.टी.ला पोचवण्यासाठी स्टँडवर येत. गाडी चुकू नये, म्हणून ते आधीच स्टँडवर येऊन बसत. गाडीत डबा दिला, की ते तिथूनच शेतात जायचे. डब्यात वडिलांची  लिहिलेली चिठ्ठी रोज हमखास असायची. त्यात ख्यालीखुशालीच्या मजकुरापेक्षा, चिठी लिहितानाचं प्रसन्न वातावरण, गावातलं हवामान, पाऊसपाणी, सणा-उत्सवाची माहिती, कधी शेतातल्या पिकांच्या वाढीची माहिती, आंब्याचा मोहर, फुलावर आलेल्या चिंचा, आवळी भोजनाची मजा- असं काय काय असे. विहिरीचं पाणी नुकतंच दिल्यानं तरारलेले मेथीचे किंवा कोथिंबिरीचे हिरवेगार वाफे, झाडांना लटकू लागलेल्या चवळीच्या किंवा मुगाच्या शेंगा, वाफ्यांत किंवा बांधांवर लावलेले मधेमधे डोकावणारे कांदे या संबंधीही वडील चिठ्ठीत लिहीत असत. आज डब्यात दिलेल्या भोजनाचा बेत काय आहे, याचंही चविष्ट वर्णन वडील कधी कधी कळवीत. ते वाचायचेही खूप. अधूनमधून तेही चिठ्ठीतल्या मजकुरात डोकवायचं. माझं नोकरीचं ठिकाण शनिवारवाड्याजवळ होतं. तिथं जेवणासाठी दुपारी एक ते दोन या वेळेत सुट्टी असे. या वेळात मी रोज डबा घेण्यासाठी स्वारगेटला येई. काही वेळा गावातली कुणी कुणी मुलंही डब्यांसाठी तिथं आलेली असायची. अनेकदा सगळे मिळून तिथं जेवण करीत असू. दुपारचं जेवण तिथंच घ्यायचं; आणि रात्रीसाठीचं जेवण बरोबर आणायचं, असंच आम्ही सगळे करीत असू. सकाळी ऑफिसात येतानाच मी तीन पुडांचा रिकामा डबा बरोबर आणत असे. स्वारगेटवर जाताना तो न्यायचा आणि रात्रीचं जेवण त्यात आणायचं. रिकामे डबे धुवून पुन्हा पत्र्याच्या डब्यात ठेवून कुलूप लावून टाकायचं आणि हा डबा परत पाठविण्यासाठी रॅकमधे ठेवून द्यायचा.

स्वारगेटला सकाळी दहा-अकरा वाजेपर्यंत पोचणाऱ्या इतरही गाड्यांतून त्या त्या भागातल्या विद्यार्थ्यांचे-नोकरदारांचे डबे यायचे. या गाड्या येण्याच्या वेळी आमच्यापैकी कुणीच तिथं उपस्थित नसे; म्हणून डबे उतरवून घेण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. ही व्यवस्था कुणी व कधी केलेली होती, ते आम्हांला ठाऊकही नव्हतं; पण ती सुरू होती, म्हणून नव्यानं डबे मागविणारे आपोआपच व्यवस्थेत सहभागी होत असत. पन्नाशीचा एक गृहस्थ हे काम करायचा. त्याबद्दल महिन्याला ठरावीक पैसे तो घेत असे. ही रक्कम सगळ्यांना परवडणारी असे. हा गृहस्थ आम्हां सगळ्यांचाच ‘चाचा’ होता. विटकरी रंगाची पँट, तसल्याच रंगाच्या लहान-मोठ्या फुलांची नक्षी असलेला हाफ मॅनिला, दाढी आणि केस मेंदीनं रंगविलेले, डोक्यावर दोऱ्यांनी विणलेली घट्ट टोपी, यापेक्षा वेगळा वेश चाचानं क्वचितच कधी घातला असेल. चाचानं कधी सुट्टीही घेतल्याचं आठवत नाही. तो म्हणायचा : ‘‘मैं रोज परवरदिगार को खिलाता हूँ। मैंने छुट्टी ली, तो वो भूूखा रह जाएगा।’’ रोजच्या कामात चाचाची हीच वृत्ती दिसून येई. वेगवेगळ्या ठिकाणांहून येणाऱ्या एस.टी. गाड्या स्वारगेट स्थानकावर ज्या भागात थांबतात, तिथंच चाचानं तीन-चार लोखंडी मांडण्या आणून ठेवल्या होत्या. एस.टी. गाड्यांतून उतरवून आणलेले डबे चाचा या मांडण्यांत ठेवीत असे. आपापल्या वेळेनुसार मुलं तिथं यायची; आणि डबे घेऊन जायची. संध्याकाळच्या एस.टी.नं गावाकडं पाठवायचे डबेही तिथंच ठेवायचे. चाचा ते डबे न चुकता त्या त्या गाड्यांत ठेवून देई. रंग उडून गेलेली, बहुतेक पार्ट्‌स खिळखिळे झालेली, स्टँड गायब झालेली एक सायकल चाचाकडं होती. मागच्या चाकावरला मडगार्ड त्याच्या तारा तुटल्यानं सीटखाली एका सुतळीनं बांधून ठेवलेला असे. चाचाची सायकल रस्त्यावरून निघाली, की मडगार्डचा अर्धगोल पत्रा कधी डावीकडं कधी उजवीकडं जाऊन आदळत असे. चाचा कधी या सायकलवरून ये-जा करताना दिसला, की त्याच्या बरोबर मडगार्डचं हे ‘खटकेबाज’ संगीतही धावत असे. चाचानं सायकलीच्या पुढच्या चाकावर भिरभिरं असलेली एक तार बांधलेली होती. सायकल निघाली, की भिरभिऱ्याची चक्राकार गती जोरानं फिरत राही. चाचाच्या त्या जुन्यापुराण्या ‘ऐतिहासिक’ सायकलीवर या भिरभिऱ्याची सजावट तेवढी नवीकोरी दिसे.

आम्हां सगळ्याच मुलांवर चाचाची अकृत्रिम माया होती. आमची गावं कुठली, पुण्यात राहतो कुठं, घरी कोण कोण आहे, ही माहिती चाचानं डोक्यात नोंदवून ठेवलेली असे. या मायेपोटी चाचा आमची ख्यालीखुशाली विचारी. स्वत:बद्दल मात्र फार काही बोलत नसे. चाचाची एक सवय होती. त्याच्या जवळ रॅकमधे ठेवलेला एक उभट आकाराचा डबा असे. रंगीबेरंगी गोळ्या-चॉकलेट्‌स असा ‘खाऊ’ त्यात असे. डबा घ्यायला गेल्यावर, तो पुन्हा ठेवायला गेल्यावर चाचा रॅकपाशी असला, तर हमखास काहीबाही विचारत असे. बोलताना त्याच्या चेहऱ्यावर विशिष्ट प्रकारचं हसू चमकत असे. आम्ही मुलं त्याला ‘समाधानाचं हसू’ म्हणत असू. चाचाच्या चेहऱ्यावरून ते कधीच मावळलं नाही. बोलता बोलता डब्यात हात घालून चाचा गोळ्या-चॉकलेट्‌सनं भरलेली मूठ बाहेर काढी आणि आमच्या हातावर ठेवी. चाचाकडं त्याची मोजदाद नसे. मुठीत घेतलेलं मुलांना वाटून टाकायचं, एवढंच त्याला ठाऊक होतं. गोळ्या-चॉकलेट्‌स जिभेवर ठेवताना क्षणाक्षणाला गोडवा वाढत चालल्याचा अनुभव आम्हांला येई.

एकदा चाचाला विचारलं : ‘‘चाचा, तू कुठला रे?’’

म्हणाला : ‘‘सांगण्यासारखं काही असतं तर कधीच सांगितलं असतं की!’’

पुन्हा प्रश्न : ‘‘चाचा, तुझ्या घरी कोण कोण आहे? तू राहतोस कुठं?’’

चाचा गप्पच.

चेहऱ्यावरचे भाव एकसारखे बदलणारे. कधी कावरेबावरे. कधी गंभीर. कधी सैरभैर. डोळ्यांतलं पाणी कधीही सांडेल, असे भरून आल्यासारखे.

एक आवंढा गिळून चाचा म्हणाला : ‘‘काय सांगू तुम्हांला?’’

चाचा बराच वेळ शांत बसला. हळव्या आवाजात सांगू लागला : ‘‘गनीभाईनं आपल्याला स्वारगेटवरनंच उचललं. घरी नेलं. भाई एकटाच राहायचा. हमाली करायचा. आपण आठ-दहा वर्षांचे असताना तो देवाघरी गेला. आई-वडिलांनी आपल्याला टाकला. मग भाईनंही एकटा सोडला. आपण स्वारगेटवरच किरकोळ हमाली करू लागलो. कधी भाजीची ओझी उतरू लागलो. कधी टपावर चढून एस.टी.वरचं सामान आणू लागलो. मग डब्याचं काम सुरू केलं. आता सगळं ठीक आहे. घरी चार चिल्लीपिल्ली आहेत. आम्ही सगळे सुखात राहतो.’’

चाचानं आणखी माहिती दिली. ‘‘ही पोरं अशीच सोडून दिलेली. माझ्यासारखीच एकेकटी. आणली घरी. त्यांना कोण आहे जगात? म्हणून आपण पुढं झालो. माझ्या गनीभाईसारखे. ही मुलं शिकताहेत. त्यांचं सगळं मी करतो. फार शहाणी आहेत लेकरं. हा चाचा त्यांना शिकवून मोठे साहेब करणार आहे!’’

कोपरात हात दुमडून चाचानं तो वर उचलला. शर्टाच्या बाहीत डोळे खुपसले. पापण्यांआड थबथबलेलं पाणी त्यानं टिपून घेतलं. मान वर उचलून पुन्हा चेहऱ्यावर हसू खेळवीत म्हणाला : ‘‘कशाला काही सांगत बसलो?’’

आम्ही सावरून चाचाकडं पाहिलं. चाचाचा हात गोळ्या-चॉकलेट्‌सच्या डब्याकडं जात होता. काही क्षणांत डब्यातून चाचाची भरलेली मूठ बाहेर आली आणि आम्हां दोघा-तिघा मित्रांच्या हातात ती रिकामीही झाली.

चाचाच्या आयुष्याची कलंदर कहाणी गोळ्यांच्या चवीबरोबर आमच्या पोटात उतरत होती आणि का कुणास ठाऊक; पण पुन:पुन्हा गलबलून येत होतं.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके