डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

गाव डोंगररांगांच्या ओंजळीत अलगद ठेवल्यासारखं वसलेलं होतं. रात्र पुढं पुढं सरकत चालली, की या मोठ्या ओंजळीत गडद अंधाराचं पाणी साठून राहिल्यासारखं दिसे. या काळोखात जवळचंही दिसत नसे. रात्र वाढू लागली, म्हणजे मोठी मंडळी रस्त्याकडं कान फिरवून ट्रकचा आवाज घेत. कुणाकुणाला त्याच्या आवाजाचे नुसतेच भास होत; आणि तो छातीठोकपणे सांगे : ट्रक पहिल्या डोंगराच्या उतारावरून येताना मला लाइट दिसले. त्याच्या या उद्‌गारांनी सगळीकडं चैतन्य पसरे. हालचाली गतिमान होत. आपापल्या भाजीपाल्याची बोचकी कुणीकुणी उगाचच हलवून वजनाचा अंदाज घेत. बराच वेळ उलटून गेला, तरी ट्रकचा मागमूस लागत नसे; आणि मग ती बातमी वाऱ्यावर विरून जाई. ग्रामपंचायतीच्या दिव्यांच्या उजेडात थांबलेल्या माणसांच्या सावल्या लांब लांब झालेल्या असत.

पावसाळ्याचे दिवस लागून राहिले, की आकाशातून सरींच्या साखळ्या एकामागून एक धावत येत. गावात सगळीकडं हिरव्या रंगाच्या छटा सांडलेल्या असत. शेतं, शिवारं, डोंगरमाथी, त्यांचे उतार, लांबच लांब पसरत गेलेली गायरानं, रस्त्यांच्या आणि पाऊलवाटांच्या कडांना लगटून असलेले पट्टे- अशी जिकडं नजर जाई, तिकडं हिरवा मखमली महोत्सवच भेटत असे. डोंगरमाथ्यांवरलं गवत चांगलं उंच असायचं. उतारावरचं गवत त्या मानानं खुरटं आणि काहीसं विरळ असायचं. डोंगरउतारांच्या वाटांतून गायरानात आलं, की सगळीकडं लुसलुशीत गवत वाऱ्यावर नाचत असायचं. वाऱ्याच्या लाटा जसजशा पुढं सरकत जात, तशा गवताच्या टोकांवरल्या रेषाही वर-खाली हेलकावत एका दिशेनं धावत जात. या दाट गवतात मध्यभागी जाऊन उभं राहिलं, की गवताच्या पात्यांचे मुलायम स्पर्श आपल्याशी खेळताहेत, असंच वाटत राही. शेतांतली भाजीपाल्याची पिकं चांगलीच ताजीतवानी दिसायची. कोसळत्या पाऊसधारांनी झाडापानांचे स्नानविधी एकसारखे सुरू असत. त्यांच्या अंगाखांद्यांवर हिरवंगार लावण्य पसरलं असल्यासारखं वाटे. झाडांच्या पानांवर, गवताच्या पात्यांवर थबकून बसलेले पाऊसथेंब उन्हात चमचमून उठत. या थेंबांतून उन्हं आरपार जाताना पाहिली, तर एरवी आकाशात दिसणारं इंद्रधनुष्य अगदी हाताशी येईल असं वाटे; आणि मग गवतात बसकण मारून पाण्याच्या थेंबांतून सूर्यकिरणं पाहण्याचा खेळ सुरू होई. रंगीबेरंगी पंख पसरून गवतात मध्येमध्येे भिरभिरणारी फुलपाखरं काही क्षण इंद्रधनुष्याचा आभास निर्माण करीत; आणि तो आनंद घट्ट पकडून ठेवण्याआधीच दुसरीकडं लहरत गेलेला असे. पानांवर स्थिरावलेला पाण्याचा थेंब, त्यात घुसून पलीकडं जाणारे सूर्यकिरण हा दुर्मीळ योग साधून नजरेचे आरसे त्यावर रोखून पाहावं, तर तेवढ्यात एखादी झुळूक तो थेंबच उचलून नेई; आणि मग कितीतरी वेळ इंद्रधनुष्याचे सप्तरंगी तुकडे निखळून पडत असल्याचा भास होत राही. परिसरातल्या सगळ्या शेतांत पावसाळी भाजीपाल्याची समृद्धी भरून राहिलेली असे. हा भाजीपाला आठवड्यातून एकदा पुण्याला मंडईत विक्रीसाठी पाठविला जाई. तो घेऊन जाण्यासाठी दर बुधवारी रात्री गावात ट्रक येत असे. ‘तरकारीचा ट्रक’ अशी त्याची ओळख अख्ख्या गावभर होती. तरकारी म्हणजे भाजीपाला, म्हणून तर हा ‘तरकारीचा ट्रक’.

आठवड्यातल्या इतर दिवसांपेक्षा आमचा बुधवार खूपच वेगळा असे. एरवी आवराआवर करायला, घरातली कामं करायला अळंटळं करणारे आम्ही त्या दिवशी सुतासारखं सरळ वागत असू. शाळेचा अभ्यास दिवसाउजेडी आटोपत असू. रात्रीचं जेवणही न कुरकुरता लवकर करीत असू; आणि नंतरचा वेळ ‘तरकारीच्या ट्रक’साठी राखून ठेवीत असू. गावात तेव्हा वीज पोहोचलेली नव्हती. संध्याकाळच्या सावल्या लांब लांब पसरत चालल्या, की त्या सावल्यांचं बोट पकडून रात्रीचा अंधार सगळ्या बाजूंनी भरून येई. अंधाराच्या त्या पुरात गाव हेलकावे खात असल्यासारखं वाटे. बुधवारी दिवसभर सगळ्या शिवारांत पिकांचा तोडा चाले. गवार, भेंडी, वांगी, मिरच्या, कारली, टोमॅटो, काकड्या या सगळ्याच भाज्या झाडांवरून तोडून टोपल्यांत, करंड्यांत किंवा पोत्यांत भरल्या जात. अंधार पडायच्या आत करंडे, पोती हे सुतळीनं चांगलं भक्कम शिवून घ्यावं लागे. मग ते उचलून मुख्य गाडीरस्त्याला किंवा गावात पेठरस्त्याला आणून ठेवावं लागे. त्या दिवशी रात्री येणाऱ्या ट्रकनं हा भाजीपाला पुण्याच्या मंडईत विक्रीसाठी आणला जाई. हा सर्व भाजीपाला एका एजंटामार्फत पाठविला जाई. करंडे-पोती त्या ठिकाणी येऊन पडली, की एजंट येत असे. त्याच्याकडं शाईचा भला मोठा बुधला असे. त्यात एक लाकूड बुडवून तो पाठविणाऱ्याचं नाव, ज्यांच्याकडं विक्रीसाठी माल पाठवायचा त्या व्यापाऱ्याचं नाव, गावाचं नाव असं लिही. मोठमोठी अक्षरं. आमच्या वहीच्या एका पानावर एकच अक्षर मावू शकेल, एवढी मोठी अक्षरं. शाळा आणि ग्रामपंचायतीची इमारत यांच्यावर लावलेल्या फलकांवरच आम्ही एवढी मोठी अक्षरं पाहिलेली असत. त्यामुळे एजंट ही नावं लिहीत असताना पाहण्यातही मोठी मौज वाटे. ही नावं लिहिली जात असताना, अक्षरांच्या वळणांचा वेध घेत आमच्या विस्फारलेल्या नजरा तशाच धावत राहत. एका ठिकाणचं काम संपवून एजंट पुढं जाऊन तिथंही तसंच काम सुरू करी. आमच्यातले काही उत्सुक मित्र तिकडंही त्याचा पाठलाग करीत जात. हा माल ग्रामपंचायतीच्या दिव्यांच्या मिणमिणत्या उजेडात मांडून ठेवलेला असे.

गाव डोंगररांगांच्या ओंजळीत अलगद ठेवल्यासारखं वसलेलं होतं. रात्र पुढं पुढं सरकत चालली, की या मोठ्या ओंजळीत गडद अंधाराचं पाणी साठून राहिल्यासारखं दिसे. या काळोखात जवळचंही दिसत नसे. रात्र वाढू लागली, म्हणजे मोठी मंडळी रस्त्याकडं कान फिरवून ट्रकचा आवाज घेत. कुणाकुणाला त्याच्या आवाजाचे नुसतेच भास होत; आणि तो छातीठोकपणे सांगे : ट्रक पहिल्या डोंगराच्या उतारावरून येताना मला लाइट दिसले. त्याच्या या उद्‌गारांनी सगळीकडं चैतन्य पसरे. हालचाली गतिमान होत. आपापल्या भाजीपाल्याची बोचकी कुणीकुणी उगाचच हलवून वजनाचा अंदाज घेत. बराच वेळ उलटून गेला, तरी ट्रकचा मागमूस लागत नसे; आणि मग ती बातमी वाऱ्यावर विरून जाई. ग्रामपंचायतीच्या दिव्यांच्या उजेडात थांबलेल्या माणसांच्या सावल्या लांब लांब झालेल्या असत. अधून मधून त्यांच्या हालचालीही होत. सावल्या स्थिरावलेल्या असताना तिकडं पाहिलं की ‘चांदोबा’तल्या एखाद्या कथेचं मोठ्ठंच्या मोठ्ठं चित्रच पाहत असल्यासारखा भास होई. आम्ही काही मुलंही तिथं ताटकळत बसलेली असू. झगमगत्या दिव्यांचे मोठे डोळे विस्फारलेला ट्रक पाहणं, हे आमचं आकर्षण असे. गावालगतच्या ओढ्याचा उतार ट्रकनं ओलांडला की, वरचा चढाचा रस्ता पार करून येताना ट्रकचे दिवे आकाशाकडं प्रकाशझोत फेकीत आणि मग मात्र सगळीकडंच धांदल उडून जाई. शांत वातावरणात तो गलका फारच मोठा वाटे. टाचा उंचावून आम्ही उगाचच ट्रकच्या दिशेनं माना वर करीत असू. आम्ही थांबलेले असायचो, त्या ठिकाणी ट्रक काही वेळातच दाखल होई; आणि आमच्या डोळ्यांचे कॅमेरे एकदम सुरू होत. पुढच्या सगळ्या हालचाली त्यात टिपून घेतल्या जात. कानांत आवाजांचं, आरोळ्यांचं रेकॉर्डिंग होऊन जाई. ट्रक तिथं येऊन थांबताच, गावातला एजंट खाली उतरे. कुणाला माल ट्रकमध्ये उचलून टाकायचा असे, त्यांची गडबड सुरू होई. काहींना गेल्या आठवड्यात पाठविलेल्या मालाच्या विक्रीचा हिशेब घ्यायचा असे. एजंट त्यांना त्यांच्या त्यांच्या पट्ट्या आणि हिशेबानुसार त्यात दाखविलेले पैसे देई. (पुण्याच्या मंडईतल्या विक्रेत्यानं माल विकल्यानंतर तयार केलेलं बिल म्हणजे पट्टी. हाच शब्द त्यासाठी रूढ होता. एकूण माल किती भरला, भाव काय मिळाला, त्याचे एकूण किती पैसे झाले, त्यातून तोलाई, हमाली, वाहतूक, धर्मादाय अशा काही रकमा वजा केलेल्या असत. उरलेली रक्कम ही ‘फायनल पट्टी’ असे. ती रक्कम शेतकऱ्यांच्या हाती मिळे.)

तरकारीचा हा ट्रक घेऊन येणारा आमच्यातल्या एका मित्राचा मामा होता. या सगळ्या गदारोळात तो मामाचा शोध घेई. त्याच्या आईनं मामाबरोबर देण्यासाठी  काहीबाही केलेलं असे. कधी लाडू असत. कधी पुरणपोळ्या असत. कधी कधी ज्वारीच्या गरमागरम भाकरी, लसणीची चटणी असंही असे. मित्राचा मामा आमचाही मामाच होऊन गेलेला असे. मित्र सांगे : आमचा मामा खूप शक्तिमान आहे. ट्रक मालानं कितीही भरलेला असला, तरी मामा तो जागेवरच थांबवू शकतो. कमी जागेतही ट्रक वळवू शकतो. मामा ड्रायव्हर सीटवर बसून ब्रेक दाबू लागला, म्हणजे खरोखरच खूप शक्तिमान वाटे. आम्ही सगळी मुलं आश्चर्यभरल्या हावभावांचे वेगवेगळे नमुने चेहऱ्यावर आणीत हे सगळं पाहत असू. ‘मोठेपणी कोण व्हायचं?’ या प्रश्नाचं आमच्या स्वप्नांतलं उत्तर ठरलेलं असे : या मामासारखाच शक्तिमान ड्रायव्हर!

ठिकठिकाणचा भाजीपाला घेऊन ट्रक गावकुसाच्या रस्त्याला लागे. तोपर्यंत रात्रही बरीच वाढलेली असे. गावकुसाच्या कोपऱ्यावर ट्रकला आणि मामाला निरोप देऊन आम्ही आपापल्या घराकडं परतत असू. ट्रकच्या दिव्यांतून उधळल्या जाणाऱ्या प्रकाशाची रेषा गावकुसाच्या कडेकडेनं चमचमत सरकत राही; आणि मग सगळंच अंधारात गुडूप होऊन जाई. आमच्या पुढच्या बुधवारपर्यंतचा आठवडा या आठवणींवर झोके घेत राही. वर्गात, वर्गाबाहेर ट्रकचीच चर्चा चाले; आणि आमच्या पाट्यांवर त्या ट्रकचीच चित्रं रंगत राहत.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके