डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

महोत्सवातील प्रसन्न वातावरणाला गालबोट लागावं अशी एखादीतरी घटना घडतेच. गेल्या वर्षी महोत्सवाच्या विरोधात लिखाण केलं म्हणून एका पत्रकाराचं प्रवेशपत्र रिसेप्शनिस्टनं जप्त केलं. सिनेपत्रकारांपैकी एकानंही संयोजकांना याचा जाब विचारला नाही. या वर्षी 'विश्वप्रकाश' या ओरिया चित्रपटाचे एक रीळ हेतुपुरस्सर दाखवण्यात आलं नाही. बुजुर्ग सिनेअभ्यासक अनिल झणकर वगळता कुणीही याविरुद्ध निषेधाचा आवाज उठवला नाही. सांस्कृतिक क्षेत्रातल्या फॅसिझमची ही सुरुवात मानायची का?

करमणुकीच्या नावाखाली पडयावर नाच-गाणी आणि हिंसेचा धुमाकूळ घालणाऱ्या आजच्या मुख्य प्रवाहातल्या सिनेमाला पडद्यावरचा तमाशा म्हणावं तर तो तमाशा या पारंपरिक कलेचा अवमान ठरेल अशी स्थिती आहे. सिनेमा ही एक कला आहे आणि तिचा चतुर वापर केला तर परिणामकारकरीत्या प्रबोधन साधता येतं हे फिल्म फेस्टिव्हलमध्ये सादर केला जाणारा सिनेमा पाहिला की लक्षात येतं. पण ज्या मंडळींनी सिनेमा या कलेला आजचं विकृत रूप दिलं त्यांना फिल्म फेस्टिव्हलच्या व्यासपीठावर आमंत्रित केलं गेलं, त्यांचे सत्कार केले गेले तर काय करायचं? मामी ऊर्फ ‘मुंबई अकादमी ऑफ द मूव्हिंग इमेज’ ही संस्था दरवर्षी हा वेडगळपणा करत आली आहे. यंदाच्या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात ‘मामि’ नं हेमामालिनीचं नृत्य ठेवलं होतं. ज्या मंडळींनी देशात कलावादी सिनेमाला आकार दिला ती मंडळी उद्घाटन सोहळ्यात प्रेक्षकांत बसून होती. एक सोडून चार मंत्र्यांचे सिनेमाविषयक मौलिक (!) विचार ऐकण्याचा प्रसंग त्यांच्यावर ओढवला होता. महोत्सवात ९० चित्रपट सादर करण्यात आले. त्यातून नेमका कमर्शिअल वळणाचा कराटेपट उद्घाटनासाठी आयोजकांनी निवडला. तर समारोपप्रसंगी 'गजगामिनी' हा आशय आणि तंत्रदृष्ट्या अर्धकच्चा चित्रपट केवळ हुसेन, माधुरी दीक्षित यांच्या ग्लॅमरला भुलून निवडला. अशा गोष्टींमुळे चित्रपट महोत्सवामागील मूळ संकल्पनेवर आपण आघात करीत आहोत, याचं सोयरसुतक ‘मामी’ च्या संयोजकांना नव्हतं. मंत्र्यांच्या भाषणामुळे उद्घाटनसमारंभ इतका लांबला की नको तो महोत्सव, असं प्रेक्षकांना वाटू लागलं. अनेक परदेशी महोत्सवांना हजेरी लावून आलेले बुजुर्ग समीक्षक अशोक राणे एका लेखात म्हणतात- ‘‘बर्लिन चित्रमहोत्सवाचं उद्घाटन वीस मिनिटांत आटोपतं. आपल्या परदेशी महोत्सवात सगळा फोकस उद्घाटनाच्या चित्रपटावर आणि परीक्षक मंडळाचा परिचय करून देण्यावर असतो. जगात कुठंच आपल्यासारखं सिनेमाबाह्य गोष्टींना महत्त्व दिलं जात नाही. असो, आपली गोष्टच वेगळी. फेस्टिव्हलचं संयोजन फेस्टिव्हलमागील हेतू आणि भूमिका ठाऊक नसणा-यांच्या हाती असूनही फेस्टिव्हलमुळे चार चांगले चित्रपट पहायला मिळतात यावरच आपण समाधान मानायचं.’’

यंदाच्या ‘मामि’ महोत्सवात बरीच मराठी माणसं दिसत होती. हेही अपूर्व दृश्य म्हणावं लागेल. महाराष्ट्रात महोत्सव असून महोत्सवातल्या 90 चित्रपटांत एकही मराठी चित्रपट नाही असं कसं, हा प्रश्न ती एकमेकांना विचारत होती. महोत्सवातले चित्रपट पाहिल्यावर त्यांना बहुधा या प्रश्नाचं उत्तर मिळालं असावं; कारण नंतर ही कुजबूज थांबलेली दिसली. निरनिराळ्या देशांतले चित्रपट महोत्सवात दाखवले जात असले तरी त्यांची भाषा एक असल्याप्रमाणे वाटत होते. चित्रपटात शब्द आणि संवाद नेपथ्याप्रमाणे असायचे. काही चित्रपट कमालीचे दृश्यमय होते. 'द ऑइल' नावाच्या कोरिअन चित्रपटातल्या शब्दांची संख्या मोजली तर ती पन्नासच्या वर जाणार नाही. दिनकर द. पाटील, गदिमांच्या चमकदार संवादांवर पोसलेल्या मराठी प्रेक्षकांना हे नवीन होतं. आकर्षक आणि खटकेबाज संवाद हे भालजींच्या चित्रपटाचं प्रमुख वैशिष्ट्य, असं विधान करताना आपण दिग्दर्शक म्हणून भालजींचा अवमान करत आहोत हे आपल्या गावीही नसतं.

महोत्सवात बंगाली सिनेमे मात्र कमालीचे शब्दबंबाळ होते. ऋतुपर्ण घोष आणि अपर्णा सेनचे चित्रपट सत्यजित रायचा वारसा पुढ नेणारे वाटले नाहीत. मृणाल सेनची प्रयोगशीलताही त्यात दिसली नाही. थेट कहाणी निवेदन करण्याचा बाज दोघांनीही निवडला होता. ‘बाडीवाली’ चित्रपटात ऋतुपर्ण घोषनं ती अधिक बेधडकपणे सांगितली. शब्दांच्या जोडीला त्यानं दिलेली दृश्यमालिका समांतरपणे संवाद साधत होती हे मात्र मान्य करायला हवे. एकाच वेळी अनेक मुद्दे पडद्यावर आणायची धडपड या तिन्ही चित्रपटांत दिसून आली. ती यशस्वी झाल्याचे फक्त 'बाडीवाली'त दिसून आलं. सिनेमा सरळसोट कथा-निवेदन शैलीपासून दूर सरकला आहे, हे इतर देशांतले चित्रपट पाहिल्यावर लक्षात आलं. तरीही महोत्सवात सादर झालेल्या सिनेमांत प्रायोगिकतेचा सरसकट अभाव जाणवला. ग्लोबलायझेशनमुळे स्थानिक संस्कृतीला पर्याय निर्माण झाल्याची चाहूल काही सिनेमांत होती. भरकटलेल्या दिशाहीन तरुण पिढीचं दर्शन सर्वच चित्रपटांत होत राहिलं. या उदास चित्रपटांना कंटाळून प्रेक्षक ‘विरी मेंझिल’ या चेकोस्लोव्हाकिअन दिग्दर्शकाच्या चैतन्यमय जीवनवादी चित्रपटाकडे वळताना दिसून येत होते. महोत्सवात मेंझिलच्या चित्रपटांना उत्सवी स्वरूप आलं होतं. मुंबईच्या एका टोकाला नरीमन पॉइंट भागात हा महोत्सव पार पडल्यानं अंधेरी-विरार, ठाणे-डोंबिवलीतले लोक इच्छा असूनही त्यात सहभागी होऊ शकत नव्हते. तरीपण दोन्ही थिएटरमध्ये सर्व शो हाऊसफुल्ल जात होते. उपनगरवासीयांसाठी एका स्वतंत्र महोत्सवाची गरज आहे, हे मात्र सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. विजय तेंडुलकर, शं. ना. नवरे, वसंत आबाजी डहाके, निखिल वागळे, सतीश काळसेकर, निळू दामले, अरविंद आडारकर, वसंत सरवटे, विद्या आपटे, मेघना पेठे, किरण नगरकर, वसु भगत, अनुया पालेकर, पुरुषोत्तम बेर्डे, जयंत धर्माधिकारी, रेखा सबनीस, अनंत भावे, किशोर कदम, अनिल झणकर, प्रेरणा अमर शेख, रजनी परुळेकर, नीता भिसे, नलेश पाटील- यांसारख्या विविध क्षेत्रांत लहानमोठं यश मिळवलेल्या व्यक्ती महोत्सवाच्या प्रांगणात दिसत होत्या आणि थिएटरबाहेर गप्पा छाटत न बसता आत बसून चित्रपटही पाहत होत्या हे आनंददायक दृश्य होतं. 

मराठी कादंबरीकार, कथाकार आणि कविमंडळींना आपण माफ करू या. पण स्मिता तळवलकर, चंद्रकांत कुलकर्णी, अजित दळवी, विनय आपटे, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, नाना पाटेकर, प्रशांत दामले, सुधीर गाडगीळ, रीमा लागू, प्रदीप दीक्षित, अनंत अमेंबल, मंगेश कुलकर्णी, प्रशांत दळवी या कलावंतांचे चेहरे महोत्सवात दिसले नाहीत, हे काही ठीक नाही. नाटक-साहित्य-चित्रपट या माध्यमांत जे कार्यरत आहेत अशा मंडळींनी जागतिक पातळीवर काय घडते आहे याची नोंद घेतली तर त्याचा परिणाम इथल्या सांस्कृतिक जगतावर होऊ शकतो. महोत्सवातले चित्रपट वाईट असोत, वा चांगले. आपल्याबरोबर त्या त्या देशाचा इतिहास, भूगोल घेऊन येतात आणि म्हणून इथल्या कलाजगतानं त्यांच्याशी परिचय करून घेणं महत्त्वाचं असतं. पण हे कलाकार त्याहून महत्त्वाच्या गोष्टींत गुंतले असतील. महोत्सवातील प्रसन्न वातावरणाला गालबोट लागावं अशी एखादी तरी घटना घडतेच. गेल्या वर्षी महोत्सवाच्या विरोधात लिखाण केलं म्हणून एका पत्रकाराचं प्रवेशपत्र रिसेप्शनिस्टनं जप्त केलं. सिनेपत्रकारांपैकी एकानंही संयोजकांना याचा जाब विचारला नाही. यावर्षी 'विश्वप्रकाश' या ओरिया चित्रपटाचं एक रीळ हेतुपुरस्सर दाखवण्यात आलं नाही. बुजुर्ग सिनेअभ्यासक अनिल झणकर वगळता कुणीही याविरुद्ध निषेधाचा आवाज उठवला नाही. सांस्कृतिक क्षेत्रातल्या फॅसिझमची ही सुरुवात मानायची का? हारतुरे, व्यासपीठावरील भाषणे, स्वागत-गीत, सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन यात गुंतलेल्या संयोजकांना अशा किरकोळ बाबींत लक्ष घालायला वेळ कुठून मिळणार, हाही प्रश्न आहेच. पण पत्रकारानं यासाठी सवड काढलीच पाहिजे. देशविदेशांतले उत्तम चित्रपट पाहायची संधी दिल्याबद्दल ‘मामी’ च्या संयोजकांचे आभार मानू या आणि सदोष वर्तनाबद्दल त्यांना खडसावून जाबही विचारू या.
 

Tags: फॅसिझम चित्रपट महोत्सव मामि समीक्षा facizm film festival mami review weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके